Sunday, August 29, 2010

पंपपुराण द्वितीय खंड - ९



पिस्टन पंपामध्ये थोडासा फरक करून डायफ्रॅम पंप तयार केला जातो. पिस्टनला सुलभपणे सिलिंडरच्या आत बाहेर करता यावे, या क्रियेमध्ये घर्षण कमीत कमी व्हावे या दृष्टीने पिस्टन आणि सिलिंडर यांमध्ये अल्पशी फट ठेवावीच लागते. त्या फटीतून होणारी द्रवाची गळती पिस्टन रिंग्ज आणि सील्सचा उपयोग करून थांबवण्याचा प्रयत्न केला जात असतो. हे सगळे करून सुध्दा ती अगदी शून्यावर आणता येत नाही. सील्स, गास्केट वगैरे गोष्टी काळानुसार गळू लागतात आणि त्यामुळे त्यात वाढ होत जाते. अत्यंत महत्वाच्या किंवा धोकादायक द्रवपदार्थांना पूर्णपणे बंदिस्त ठेवण्यासाठी डायफ्रॅम पंपाचा उपयोग करता येतो.

या पंपात पिस्टन आणि द्रवपदार्थ यांच्यामध्ये एक लवचीक पण मजबूत पडदा बसवलेला असतो. पिस्टन आणि सिलिंडरच्या भागात सर्वसामान्य तेल (हैड्रॉलिक ऑइल) भरलेले असते. पिस्टनला पुढे ढकलले की त्या चेंबरमधला दाब वाढतो आणि पडदा पुढे ढकलला जातो. पिस्टनला मागे ओढले की चेंबरमध्ये पोकळी निर्माण झाल्यामुळे पडदा मागे ओढला जातो. अशा प्रकारे मोटरच्या सहाय्याने पिस्टनला मागे पुढे करतांना त्याच्या बरोबर चेंबरमधला पडदासुध्दा मागे पुढे होतो. ज्या द्रवाचा प्रवाह हवा असेल तो चेंबरच्या पडद्यापलीकडल्या भागात भरलेला असतो. पिस्टन पंपाप्रमाणेच या भागातल्या द्रवाचा दाब कमी जास्त होत राहतो आणि तो कमी होताच इनलेट पोर्टमधून द्रव एका बाजूने चेंबरमध्ये येतो आणि दाब वाढताच तो औटलेट पोर्टमधून दुस-या बाजूने बाहेर पडतो. हा चेंबर सर्व बाजूंनी पॅकबंद असल्यामुळे द्रवाच्या वातावरणात गळण्याची शक्यता नसते.

इतर पंपांच्या तुलनेत पाहता डायफ्रॅम पंपांमध्ये आणखी एक वेगळा गुण आहे. त्यात गोल फिरणारे चाक किंवा मागेपुढे होणारा पिस्टन असा कोणताही चलता पुर्जा नसल्यामुळे त्या पुर्ज्यात कचरा अडकल्यामुळे तो जाम होऊन बंद पडण्याची शक्यता नसते. इनलेट आणि औटलेट व्हॉल्ह वगळता सगळीकडे मोकळी जागा असल्यामुळे प्रवाहाला अडथळा निर्माण होत नाही. या कारणामुळे दाट किंवा व्हिस्कस अशा द्रवांसाठी डायफ्रॅम पंपाचा उपयोग करता येतो.

काही ठिकाणी विजेचा प्रवाह उपलब्ध नसतो किंवा थोड्या काळासाठी तात्पुरता उपयोग करायचा असेल तर तेवढ्यासाठी वायरिंग वगैरे करणे खर्चिक असते. अशा जागी एअर काँप्रेसरवर चालणारी न्यूमॅटिक उपकरणे वापरली जातात. बांधकाम, रस्तादुरुस्ती अशा जागी आपल्याला ती दिसतात. अशा ठिकाणी पाणी उपसण्यासारखे काम करण्यासाठी हवेच्या दाबावर चालणारा डायफ्रॅम पंप वापरता येतो. या पंपामधल्या पिस्टनला मागे पुढे करण्यासाठी वेगळी व्यवस्था असते. न्यूमॅटिक हातोडा चालवण्यासाठी अशाच प्रकारची व्यवस्था असते. यात एअर काँप्रेसरद्वारे एका लहानशा टाकीत हवा भरून तिचा दाब वाढवला जातो. वाफेच्या इंजिनाप्रमाणे ही हवा सिलिंडरच्या दोन्ही भागात आळीपाळीने सोडल्यामुळे त्यातला दट्ट्या मागेपुढे होत राहतो. या पिस्टनला हातोडा जोडला तर तो दगड फोडण्याचे काम करतो. याच तत्वाचा उपयोग करून डायफ्रॅम पंप चालवला जातो.

No comments: