Sunday, August 01, 2010

कौटुंबिक संमेलन - ३

या कौटुंबिक मेळाव्यासाठी पुण्याजवळील शांतीवनात सर्वजणांनी संध्याकाळी पाच ते सहा पर्यंत पोचायचे अशा सूचना दिल्या होत्या आणि बहुतेक सर्वांनी तसा प्रयत्न केला होता. पण घरातून निघतांना शेवटच्या क्षणी कोणाचा फोन वाजणे, दरवाजा बंद करतांना कांहीतरी लक्षात येणे, जिन्यातून खाली उतरल्यानंतर अचानक काहीतरी आठवणे, लहान मुले असल्यास त्यांना आयत्या वेळी तहान, भूक लागणे किंवा निसर्गाची हाक येणे वगैरे प्रकार होतातच. शिवाय रस्त्यातली गर्दी, पावसामुळे संथगतीने चालणारी रहदारी अशा कारणाने विलंब होत जातो. त्यामुळे स्थानिक संयोजक मंडळी जरी वेळेवर जाऊन पोचली असली तरी सहा वाजेपर्यंत थोडेसेच लोक शांतीवनात येऊन पोचले होते. पण त्यानंतर ते एकामागोमाग एक येत गेले आणि अंधार पडण्यापूर्वी म्हणजे सातच्य़ा आत जवळजवळ सगळे आले आणि स्वच्छतागृहाला भेट देऊन ताजेतवाने झाले. बाहेरगावाहून आलेल्या आणि पावसात भिजलेल्या लोकांनी कपडे बदलले. लहान मुलांच्या आयांनी आधीच गोड दिसणा-या आपल्या मुलांना आकर्षक कपडे घालून छान सजवले. चहाचा घोट घशाखाली गेल्यानंतर सर्वांना तरतरी आली आणि औपचारिक कार्यक्रमासाठी सगळे तय्यार होऊन बसले.

इतर कसलेही कारण नसतांना आपण सगळ्यांनी एकदा निव्वळ एकमेकांना भेटण्यासाठी म्हणून एका ठिकाणी जमायचे आणि एकादा दिवस एकमेकांच्या सहवासात गप्पागोष्टी करण्यात घालवायचा. अशी सुरुवात झाली होती आणि त्यासाठी मुबलक वेळ ठेवला होता. तरीसुध्दा हा कार्यक्रम मनोरंजक आणि संस्मरणीय व्हावा, त्यात सर्वांनी उत्साहाने भाग घ्यावा, सर्वांना मनसोक्त आनंद मिळावा म्हणून त्याची एक रूपरेखा आखायचे ठरवले आणि आमच्यातल्या कांही उत्साही तसेच अनुभवी लोकांनी पुढाकार घेऊन फोनाफोनी केली आणि आपसातच कांही गोष्टी ठरवल्या. एकमेकांची माहिती आणि विविधगुणदर्शन ही दोन मुख्य सूत्रे ठरवून कांमाची वाटणी करून घेतली. त्यातले पहिले काम मी करायचे ठरले आणि पंधरा वीस दिवस आधीपासूनच मी त्यासाठी कामाला लागलो.

फार पूर्वीच माझ्या माहितीनुसार मी एक वंशावळ तयार करून ठेवलेली होती. श्रीरंगनानाने त्याच्याकडली लिस्ट पाठवली. दोन्ही पाहून झाल्यावर गरजेप्रमाणे काही लोकांना फोन करून त्यातले कांही तपशील पडताळून पाहिले आणि नव्या सदस्यांची भर घालून ती वंशावळ अद्ययावत केली. आजोबा आजींपासून नवजात बालकांपर्यंत सुमारे दोनशे लोकांची ही यादी कशी सादर करता येईल याचा विचार करत असतांनाच पॉवर पॉइंटमध्ये ते काम करायची कल्पना श्रीने सुचवली आणि मी ती लगेच उचलली. वरपासून सुरुवात करून एक जोडपे आणि त्यांची अपत्ये एवढीच नांवे एका स्लाइडमध्ये घातली. त्यातली एक एक मुले, त्यांच्या पत्नी किंवा पती आणि त्यांची मुले पुढल्या स्लाइडमध्ये दाखवली. अशा वीस पंचवीस स्लाइड्स तयार केल्या. पॉवर पॉइंट या दृष्य माध्यमाचा अधिक उपयोग करून घेण्यासाठी स्लाइडमध्ये दाखवलेल्या नांवांच्या पाठोपाठ त्यांची छायाचित्रे दाखवायचे ठरवले. त्यासाठी माझ्याकडे असलेले सारे आल्बम काढून त्यातले फोटो निवडले. अनेक जणांनी आपापल्या कुटुंबांचे फोटो मेलने पाठवले. चैतन्य आणि उत्कर्ष आपटे कुटुंबाचा आल्बम घेऊन माझ्याकडे आले. माझ्या जन्मापूर्वी काढलेला माझ्या आजीआजोबांचा एक ऐतिहासिक फोटो मिळाला. माझ्या लहानपणच्या आमच्या घरात असलेला ऐतिहासिक आल्बमच बार्शीहून आला. त्यातली लहान लहान बालके आता आजोबा किंवा आजी झाल्या आहेत. त्यातल्या फोटोंचे संकलन करून एक अमूल्य असा ठेवाच मिळाला. आजोबा आजी आणि आईवडील ज्या खेडेगावांमध्ये रहात होते त्या गावाचे स्थान दाखवण्यासाठी गूगलअर्थवरून नकाशा काढला आणि त्यात खुणा करून कोण कोण कुठे रहात होते किंवा आता राहतात ती गावे दाखवली. हे सगळे काम करतांना जी मजा आली तिचे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे.

पॉवर पॉइंटवर तयार केलेले हे प्रेझेंटेशन दाखवायची सोय कशी करायची हे पहायचे काम उदयला दिले. शिवाय शंभर लोकांना ऐकू येईल एवढ्या मोठ्याने बोलणे सर्वांना शक्य नसते. त्यासाठी ध्वनिसंवर्धक, ध्वनिप्रक्षेपक असली उपकरणे (माइक, स्पीकर वगैरे) हवीतच. त्यांची सोय शांतीवनाच्या हॉलमध्ये असल्याचे समजले. पण तिथे प्रोजेक्टरची सोय मात्र नव्हती. ती करणे आवश्यक होते. असा प्रक्षेपक कोणाच्याही घरी नव्हताच आणि या व्यवसायात कोणीच नसल्यामुळे माझ्या काँप्यूटरशी सख्य साधू शकेल असा प्रोजंक्टर शोधून काढून तो भाड्याने आणणे हे एक जास्तीचे काम होऊन बसले. सोयीच्या दृष्टीने शांतीवनात घेऊन जाण्यासाठी मी आपला लॅपटॉप पुण्याला नेला आणि त्याच्याबरोबर कम्पॅटिबल असा प्रोजेकेटर निवडून त्याची ट्रायल घेतली. तोपर्यंत तिकडे जाण्यासाठी निघण्याची वेळ झालीच होती. त्यातून आयत्या वेळी गोंधळ झालाच तर वेळ निभावून नेण्यासाठी पुरेसे प्रिंटआउट काढून नेले होते. त्यात चित्रे आली नसली तरी सुवाच्य अक्षरात नामावली तरी दिसली असती आणि सर्वांना वाचता आली असती.

इतर लोकांनीसुध्दा आपापल्या परीने पुरेपूर तयारी केली होती. गायन वादनात प्रवीण असणारे कलाकार आपापली वाद्ये घेऊन आले. तबले, डग्गे, हार्मोनियम वगैरे आलेच, ढोलक, कोंगो बोंगो, कीबोर्ड आणि गिटार वगैरे सर्व वाद्यांनी सुसज्ज असा वाद्यवृंद तयार झाला. मंचावर त्याची मांडणी करणे, त्यांना वीजपुरवठा जोडणे वगैरे तयारी पाहून आता इथे काहीतरी घडणार आहे हे सर्वांना समजले आणि ते सज्ज होऊन पुढे येऊन बसले.

. . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: