Monday, August 02, 2010

कौटुंबिक संमेलन - ४



आमचा हा कौटुंबिक मेळावा २४- २५ जुलैला करायचा ठरवला होता आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यातच एक अत्यंत दुःखद अशी घटना घडली. आमच्यातल्या एका अत्यंत घनिष्ठ आणि ज्येष्ठ व्यक्तीचे म्हणजे विमलताईचे देहावसान झाल्याच्या वृत्ताने सा-या कुटुंबावर शोकाचे सावट पसरले. आता या मेळाव्याचे ठरल्याप्रमाणे आयोजन करावे की करू नये, यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले. पण दुःखाचा पहिला आवेग ओसरल्यानंतर सर्वांनी फोनवर विचारविनिमय केला. पुढच्या पिढीमधल्या मुलांनी पुढाकार घेऊन या मेळाव्याची आखणी केली होती, त्यांच्या, मागल्या आणि पुढल्या पिढीमधल्या लोकांना एकत्र आणण्याचा त्यातला प्रयत्न आणि उद्देश स्तुत्य आणि महत्वाचा होता हे पाहून त्याला हिरवा कंदील मिळाला आणि नियोजित कार्यक्रमाची गाडी पुढे सरकली. पण आमच्या कुटुंबाच्या एका शाखेतून मात्र कोणीच आले नाहीत. ती मंडळी आली असती तर उपस्थितांची एकंदर संख्या सहज शंभरावर गेली असती. या मेळाव्याबद्दल स्वतः विमलताईला खूप इंटरेस्ट होता आणि प्रकृती तितकीशी ठीक नसतांनाही तिथे यायचे ती ठरवत होती. जर तिला ते शक्य झाले असते तर बाकीचेही सगळेच आले असते आणि आमचे संमेलन परिपूर्ण झाले असते. पण काळाला ते मंजूर नव्हते. त्यामुळे निरुपाय झाला.
या मेळाव्यातल्या औपचारिक कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत गांभिर्याने झाली. सभामंचावरील रंगीत पडद्यावर एक शुभ्र बेडशीट लावून तयार केलेल्या कामचलाऊ स्क्रीनवर आधी विमलताईचे छायाचित्र दाखवले. अदृष्यपणे तीसुध्दा त्या ठिकाणी आली असेल अशी मनात कल्पना करून साश्रु नयनांनी तिला भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आणि त्यानंतर मी माझ्या प्रेझेंटेशनची सुरुवात केली. आमच्या पिढीमधल्या सर्वांचे आजोबा आणि आजी यांची थोडक्यात माहिती सांगून त्यांचे वास्तव्य असलेले खेडेगांव नकाशात दाखवले. आमची पिढी त्या गावाच्या जवळपासच्या परिसरात वाढलेली आहे, पण पुढील पिढीमधल्या मुलांपैकी काहीजणांनी तो भाग पाहिला नसण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी त्या भागाची झलक दाखवली. माझ्या वडिलांच्या पिढीमधले सारेच लोक आजोबांचे खेडे सोडून आधी तालुक्याच्या गावात येऊन स्थाइक झाले होते. नंतरच्या काळात सगळे तिथूनही चारी दिशांना पांगले. सत्तर वर्षांपूर्वीच्या एका ऐतिहासिक पण अजूनपर्यंत शाबूत असलेल्या छायाचित्रात मागील पिढीतल्या बहुतेक मंडळींचे दर्शन घडले. ती पिढीसुध्दा आता काळाआड गेली आहे. आमच्या पिढीमधले बरेचजण बालकांच्या स्वरूपात या फोटोत दिसतात. त्यातल्याही कांही व्यक्ती आता नाहीत, तर माझ्यासकट कांही भावंडांचे जन्मसुध्दा तेंव्हा झालेले नसल्यामुळे आम्ही त्या फोटोत दिसत नाही. ही सारी मंडळी जवळची आणि नेहमीच्या पाहण्यातली असल्यामुळे त्यांचे जुने बालरूप पाहून त्यातल्या लोकांना बालपणीच्या अंधुक झालेल्या आठवणी ताज्या झाल्या आणि इतरांना ते खूपच मनोरंजक वाटले.

त्यानंतर आमच्या पिढीमधील एक भाऊ किंवा बहिण आणि तो संपूर्ण परिवार यांची नावे स्क्रीनवर आली की त्यांच्यापैकी जेवढे लोक आले आहेत त्यांनी मंचावर यायचे आणि आपली ओळख करून द्यायची, त्यांच्या परिवाराचे निवडक फोटो दाखवायचे, जे आले नसतील त्यांची माहिती सांगायची असा क्रम सुरू केला. भिडस्तपणामुळे स्वतःबद्दल कोणी सहसा जास्त बोलत नाही हे पाहून एकेकाने इतरांबद्दल सांगितले आणि त्यातून निसटलेल्या कांही महत्वाच्या आणि मजेदार गोष्टी मी किंवा प्रेक्षकांमधून कोणीतरी मंचावर येऊन सांगितल्या. अशा प्रकारे हा ओळख करून घेण्याचा कार्यक्रम खूप रंगला आणि जवळ जवळ दोन तास चाललेला होता. तो संपत आलेला असतांनाच अचानक वीज गेल्यामुळे प्रोजेक्टर बंद पडला. तोपर्यंत भोजनाची तयारी झाली होती आणि पोटात भुकाही लागल्या होत्या. त्यामुळे इमर्जन्सी लाइट्सच्या उजेडात सारे भोजनालयाकडे रवाना झालो.

भोजनालय शांतीवनातल्याच दुस-या ठिकाणी होते. चांगला मोसम असता तर त्या रम्य परिसरात हिंडत फिरत जायला मजा आली असती. पण वरून कोसळणा-या पावसाच्या धारा, खाली शेवाळ साठून निसरडा झालेला रस्ता, तोसुध्दा अनेक जागी उंच सखल, चढउतार आणि पाय-या वगैरेंने भरलेला, वीज गेल्यामुळे गुडुप काळोख यामुळे हे लहानसे अंतर चालणेसुध्दा जिकीरीचे वाटत होते. कांही लोकांनी दूरदर्शीपणा दाखवून टॉर्च आणले होते, कांही लोकांनी मोबाइलचा उजेड दाखवला. विशेषतः पाय-या असलेल्या जागी कोणी ना कोणी उभे राहून मागून येणा-यांना सावध करत होता. जेवण मात्र छान असल्यामुळे श्रमांचे सार्थक झाले. बहुतेकांच्या आवडीचा कोणता ना कोणता पदार्थ त्यात असल्याने सर्व मंडळी तृप्त होऊन हॉलमध्ये परतली. जास्तच वयोवृध्द लोकांसाठी भोजनाची ताटे भरून त्यांना हॉलमध्ये नेऊन दिली.

कार्यक्रमाची रूपरेषा आखतांना सहा साडेसहाला सुरुवात करायची आणि तासाभरात ओळखीचा भाग संपल्यावर भोजनापूर्वी पुष्कळ वेळ शिल्लक असेल त्यात आपल्या कुटुंबाचा इतिहास थोडक्यात सादर करायचा असा विचार केला होता. गेल्या शंभर वर्षांचा त्रोटक आढावा घेतांना त्यातील प्रत्येक दशकातली जागतिक आणि देशामधली परिस्थिती आणि घटना यांच्या बरोबरीने त्या काळखंडात घडलेल्या आपल्या कुटुंबातल्या महत्वाच्या घटना सांगत जाणारा एक माहितीपट मी तयार केला होता. तो ऐकायला कदाचित रुक्ष वाटेल म्हणून त्यातील महत्वाच्या टप्प्यांवर त्या काळात लोकप्रिय असलेले एक गाणे टाकून लोकांचे थोडे मनोरंजन करायची कल्पना होती आणि त्यासाठी बरीच माहिती जमवली होती. चांगल्या आवाजाची देणगी लाभलेल्या मुलांमुलींमध्ये ही गाणी वाटायची, त्यांनी ती तयार करून ठेवायची आणि ठरलेल्या स्लॉटमध्ये गायची असा विचार होता. पण इतर अनेक उद्योग आणि अडचणी सांभाळता सांभाळताच वेळ निघून गेल्यामुळे या कार्यक्रमाचे पध्दतशीर नियोजनच करता आले नाही. रिहर्सल करायचा प्रश्नच उद्भवला नाही. हा कार्यक्रम करण्यासाठी ठेवलेला टाइमस्लॉटही मिळाला नाही. ज्यांनी यासाठी थोडी तयारी केली होती तिचा उपयोग भोजनोत्तर कार्यक्रमात केला.

. . . . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: