Wednesday, September 01, 2010

पंपपुराण - द्वितीय खंड - १०

अगदी लहानपणापासून पंप या शब्दाबरोबर माझी ओळख कशी झाली आणि ती हळूहळू कशी वाढत गेली ते थोडक्यात सांगून झाल्यानंतर सेंट्रिफ्यूगल पंपांच्या विविध रूपांचे दर्शन मी या लेखमालेच्या पहिल्या खंडात करून दिले होते. त्यानंतर या विषयाला थोडी विश्रांती देऊन काही काळानंतर पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंपांचे ठळक प्रकार या लेखमालेच्या पहिल्या नऊ भागात पाहिले. या सर्वांचा थोडक्यात परामर्ष घेऊन हा खंड आता संपवत आहे.

रहाटगाडगे, मोट यासारखी पाणी उपसण्यासाठी उपयुक्त साधने निरनिराळ्या स्वरूपात जगभरात सगळीकडे अनादि काळापासून प्रचारात आहेत. यातला पोहरा (किंवा बकेट, घागर, बादली इ.) पाण्यात सोडला जातो आणि पाण्याने भरून तो वर ओढला जातो. हे नक्कीच सकारात्मक उत्थान किंवा पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट आहे. हाताने दांडा खालीवर करून पाणी उपसण्याचा पंप याच प्रकारात मोडतो आणि जेम्स वॉटने तयार केलेल्या पहिल्या वाफेच्या इंजिनालासुध्दा असाच पंप त्याने जोडला होता. आपल्या आप स्वतःभोवती गिरक्या घेणारी यंत्रांची चक्रे वेगाने फिरायला लागल्यानंतरच्या काळात त्यांना जोडून त्यांच्या सहाय्याने फिरणारे सेंट्रिफ्यूगल पंप पुढे आले.

विशेषतः सुटसुटीत आकाराची ऑइल इंजिन्स आणि त्यांच्यापेक्षाही सुलभपणे चालवता येणा-या विजेच्या मोटारी यांच्या सोबतीने आलेल्या सेंट्रिफ्यूगल पंपांनी पाणीपुरवठ्याच्या क्षेत्रात इतके क्रांतिकारक बदल घडवून आणले की त्यामुळे मानवाचे संपूर्ण जीवनच बदलून गेले. पूर्वीच्या काळात नदी, तलाव, विहीर यासारख्या पाणवठ्याच्या जागेवरून घरात पाणी उचलून आणावे लागत असे. कोणी पाण्याने भरलेले घट डोईवर घट कमरेवर ठेऊन तर कोणी खांद्यावरून कावडी किंवा पखाली वाहून ते आणण्याचे काम करत असे. हे एक अतीशय कष्टाचे आणि रोजचे काम असल्यामुळे त्यातच दिवसातला बराच वेळ खर्च होत असे. त्यामुळे पूर्वीच्या काळातली मानववस्ती पाणवठ्याच्या काठाकाठानेच होत असे आणि घरांची रचनासुध्दा बाहेरून पाणी आणण्याची सोय पाहून त्यानुसार होत असे. पंपाच्या आगमनानंतर हे चित्र पार बदलून गेले. पाणवठ्यापासून दूर असलेल्या नागरी वस्तीमधील घराघरापर्यंत नळातून पाणी येऊन पोचू लागले आणि घराजवळ बसवलेल्या पंपांमधून ते बहुमजली इमारतीच्या डोक्यावर ठेवलेल्या टाक्यांपर्यंत हव्या तेवढ्या उंचीवर चढवता आल्यामुळे घरातल्या कोणत्याही खोलीपर्यंत आणता येऊ लागले. या सोयीमुळे नगररचना तसेच घरांची अंतर्गत रचना पार बदलत गेली.

पूर्वीच्या काळातसुध्दा काही ठिकाणी नद्यांना बंधारे घालून त्यात साठलेले पाणी पाटांमधून वळवले जात असे आणि विहिरींमधले पाणी मोटेने उपसून ते पिकांना दिले जात असे. पण या दोन्हींमध्ये ते पाणी जमीनीच्या उतारावरून जितके दूर वहात जाईल तेवढ्या प्रदेशापर्यंतच पोचत असे. यामुळे बहुतेक ठिकाणची शेती मुख्यतः कोरडवाहू असे आणि सर्वस्वी ती पर्जन्यराजाच्या कृपेवर अवलंबून असे. जलाशयांमधून पंपाने पाणी उपसण्याची आणि पाइपांमधून ते हवे तिकडे वाहून नेण्याची सोय झाल्यानंतर अनेक भागात बागायती करणे शक्य झाले. स्प्रिंकलर आणि ठिबकसिंचन वगैरे सुधारणांमुळे पाण्याची बचत करून त्याचा जास्त चांगला उपयोग होऊ लागला. त्यामुळे कृषीउत्पादनात भरघोस वाढ झाली.

मुबलक पाणी उपलब्ध झाले आणि त्याचा दाब हवा तेवढा वाढवणे शक्य झाले या सुधारणा झाल्यानंतर त्यांचा उपयोग कारखानदारीतसुध्दा मोठ्या प्रमाणात होऊ लागला. वीज निर्मिती आणि रासायनिक प्रक्रिया करणा-या कारखान्यांना यांची फार गरज असते. त्यांची प्रचंड प्रमाणात वाढ होऊन नवनव्या वस्तूंचे उत्पादन सुरू झाले आणि माणसाचे रोजचे जीवन बदलून गेले. शंभर वर्षांपूर्वीच्या काळात घरातली भांडीकुंडी, कपडे वगैरे मोजके जिन्नस सोडले तर घरी येणारे बहुतेक सर्व पदार्थ निसर्गनिर्मित असत. आज शहरांमधल्या घरात कृषिउत्पादनेसुध्दा त्यांवर प्रक्रिया करून येतात. या बदलाच्या मुळाशी वीज आणि पाणी यांची सुलभ उपलब्धता आहे.

पाणीपुरवठा आणि पाण्याचे वहन, अभिसरण वगैरे कामांसाठी मुख्यत्वे सेंट्रिफ्यूगल पंपच वापरले जातात. पाण्याचा दाब आणि प्रवाह यांच्या गरजेनुसार योग्य त्या प्रकाराची आणि आकाराची निवड केली जाते. पण अनेक प्रकारच्या इतर द्रवपदार्थांसाठी मात्र पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंपांचा उपयोग करणे सोयीचे असते, कांही ठिकाणी ते आवश्यक असते. पाण्याच्या मानाने यातला प्रवाह अगदीच कमी असतो, पण काही यंत्रांमध्ये त्यांचा दाब प्रचंड प्रमाणात वाढवला जातो. रसायने, औषधे, खनिज तेले, गळित पिकांपासून काढलेली खाद्य किंवा अखाद्य तेले, चरबी, मध, ग्रीस, क्रीम, मलम, पेस्ट, जॅम, मोरंबे, केचअप, सॉस यासारख्या अनंत वस्तूंचे उत्पादन किंवा त्यांच्यावर प्रक्रिया करणा-या कारखान्यांमध्ये या वस्तू एका पात्रामधून दुस-या पात्रांत नेण्यासाठी आणि अखेर डबे, बाटल्या, कॅन्स वगैरेंमध्ये भरण्यासाठी लहान मोठ्या आकारांच्या आणि निरनिराळ्या प्रकारच्या पंपांचा उपयोग होतो. आपल्या घरातली कोणतीही वस्तू घेतली आणि ती बनवणा-या कारखान्याला भेट दिली तर आपल्याला त्या जागी कोणता ना कोणता पंप दिसणारच. इतके आपले जीवन पंपांवर अवलंबून गेले आहे. निरनिराळ्या प्रकारचे पंप चालवतांना येणारे अनुभव आणि अडचणी हा एक वेगळा आणि गहन विषय आहे. पुढे मागे शक्य झाले तर तिस-या खंडात त्याबद्दल लिहिण्याचा मानस व्यक्त करून हे पंपपुराण इथे संपवत आहे.

इति पंपपुराणः।

No comments: