
शनिवार रात्रीचे जेवणखाण उरकून सारी मंडळी शांतीवनातल्या हॉलवर परत येईपर्यंत वीज आली होती, रंगमंचावर तबला, पेटी, सिंथेसाइजर, गिटार वगैरे वाद्यांची मांडणी करून ठेवली होती आणि वादक मंडळी तयारीत होती. लोक परत येताच विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सुरू झाला. रात्रीचे साजेदहा वाजून गेले असले तरी अख्खा बालचमू टक्क जागा होता आणि उत्साहाने या कार्यक्रमाची वाट पहात होता. काही मुलांनी त्यासाठी बरीच पूर्वतयारी केली होती. पाच वर्षाच्या निधीने काही उत्कृष्ट कविता आणि गद्य उतारे पाठ करून ठेवले होते, ते अस्खलित वाणीत सादर केले. पाठांतराची आणि सादरीकरणाची तिची क्षमता बघून सगळे थक्क झाले. सहा वर्षाच्या इराला राधा ही बावरी हे गाणे आधीपासूनच तोंडपाठ होते आणि त्या गाण्याची चालही तिच्या ओठावर होती, तरीही आदले दिवशी ती हे गाणे सतत तासभर ऐकत होती. त्यातल्या आआआ, ईईई, एएए वगैरे खास लकेरींच्या जागा आणि रिकाम्या जागा (पॉजेस) लक्षपूर्वक ऐकून तिने घटवून ठेवल्या आणि वादक साथीदारांनी दिलेल्या ठेक्यावर जशाच्या तशा सादर करून तुफान टाळ्या मिळवल्या. तीन साडेतीन वर्षांच्या चिटुकल्या आणि धिटुकल्या प्रियाने बडबडगीते, प्रार्थना, नर्सरी -हाइम्स वगैरे जे जे त्या क्षणी सुचेल ते बिनधास्तपणे गाऊन घेतले. अजय-अतुल यांची गाणी श्रेयस आणि सर्वेश ही भावंडे फर्मास गातात. त्यांचे मल्हार वारी तर अफलातून झाले. केतकी, अक्षय, प्रणीता, सानिका वगैरे इतर मुलांनाही या गाण्यांवरून स्फूर्ती मिळाली आणि त्यांनी एकेकट्याने किंवा समूहात निरनिराळी गाणी गाऊन धमाल आणली. शुभंकरोती ते अग्गोबाई ढग्गोबाई आणि ट्विंकल् ट्विंकल ते ऑल ईज वेल् पर्यंत अनेक लोकप्रिय मराठी, हिंदी आणि इंग्रजी गाणी या मुलांनी म्हंटली. त्यात बालगीते, बडबडगीते ते भक्तीगीते आणि चित्रपटगीते वगैरे सगळ्या प्रकारची गाणी झाली. बहुभाषी तृप्तीने मराठी आणि हिंदीशिवाय कन्नड आणि तामीळ भाषेतली गाणी गाऊन दाखवली. जवळजवळ तासभर मुलांनीच रंगमंच गाजवला.
मुलांचा उत्साह ओसरल्यानंतर मोठ्या लोकांना संधी मिळाली. सुधा आणि अलका या पट्टीच्या गायिकांनी अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन रसिक श्रोत्यांची वाहवा मिळवलेली आहे. त्यांनी त्यांची निवडक गाणी गायिलीच, कांही खास गाण्यांची फरमाईशही त्यांना झाली. प्रशांत आणि प्रिया (मोठी) आता तयार झाले आहेत. उदय, जितेंद्ग आणि मंजिरी यांचे गळे चांगले आहेत आणि त्यांना गाण्याची आवड आहे. त्यांनी थोड्या गाण्यांची तयारी करून ठेवली होती, ती सराईतपणे सादर केली. शिवाय प्रेक्षकांमध्ये बसलेल्या अनेकांना आग्रह करकरून एक दोन गाणी म्हणायला लावली. सर्वांचा सहभाग हे या कार्यक्रमाचे मुख्य सूत्र होते. एका लहानशा ग्रुपने कार्यक्रम करायचा आणि इतरांनी तो ऐकायचा असे त्याचे स्वरूप नव्हते. ज्यांना मंचावर यायला संकोच वाटत होता त्यांना बसल्या जागी माईक देण्यात आला. सत्तरीतल्या विजयावहिनी आणि सुलभावहिनी यांनीसुध्दा सुरेल गाणी गायिली.
आमच्याकडल्या संगीताच्या घरगुती बैठकींमध्ये हार्मोनियमची साथ नेहमी प्रभाकर करतात, तशी त्यांनी बराच वेळ केली. अधून मधून इतरांनीही पेटी वाजवून त्यांना विश्रांती दिली. प्रशांतला तबलावादनामध्ये तालमणी हा खिताब मिळालेला आहे. त्याला साजेशी कामगिरी थोडा वेळ करून त्याने तबला डग्गा मीराच्या स्वाधीन केला आणि तो स्वतः सिंथेसाइजरवर बसला. पुढले दोन अडीच तास तबला वाजवून मीराने सर्वांना चकित केले. प्राचीने शास्त्रीय संगीताची झलक दाखवली. मैत्रेय अगदी सुरुवातीपासून अखेरपर्यंत गिटार वाजवून साथ देत होता. त्याने कांही सोलो पीसेसही वाजवून दाखवले. अच्युत, मिलिंद, चैतन्य वगैरे अधून मधून इतर तालवाद्यांवर ठेका धरत होते. यातली गंमत म्हणजे ही सगळी मंडळी वेगवेगळ्या गांवाहून आली होती आणि शांतीवनातल्या स्टेजवरच एकत्र जमली होती. त्यांनी कुठल्याच गाण्यांची आधी प्रॅक्टिस केलेली नव्हती. कोणची गाणी कोण गाणार आहे हेच मुळी ठरलेले नव्हते. संगीतसंयोजन, स्वरलिपी वगैरे प्रकार नव्हतेच. सर्वांनीच आपापल्या हातातली वाद्ये उत्स्फूर्तपणे सुचेल आणि जमेल तशी वाजवूनसुध्दा त्यात सुरेख मेळ जमून येत होता. अशा बैठकांमध्ये सूर ताल लय वगैरेंचा फारसा कीस कोणी काढत नाही, पण गोंगाट आणि संगीत यातला फरक कानाला समजतोच. संपूर्ण कार्यक्रमात गोगाटाचा अनुभव अगदी क्वचित आला आणि बहुतेक वेळ सुरेल संगीतच ऐकायला मिळत गेल्याने त्याची रंगत वाढत गेली.
तबला, पेटी, सिंथेसायजर, गिटार वगैरे वाद्ये आणि वादक मंडळींनी तिथला लहानसा मंच भरून गेला असल्यामुळे नृत्य किंवा नाटक सादर करायला जागाच नव्हती. स्टेजच्या समोर असलेल्या लहानशा मोकळ्या जागेत काही लहान मुले उडत्या चालीच्या गाण्यांच्या तालावर नाचून घेत एवढेच. पण गाण्यांखेरीज इतर काही आयटम सुध्दा या कार्यक्रमात सादर झाले. शुक्रतारा मंदवारा या गाण्याच्या चालीवर प्रसाद आणि सुनीतीने दे आता करुनी चहा हे विनोदी द्वंद्वगीत गाऊन दाखवले तर देहाची तिजोरीच्या चालीवर यशवंत देवांची पत्नीची मुजोरी ही कविता प्रसादने ऐकवली. कोल्हापूर रेडिओस्टेशनवर चालत असलेले पैलवानांच्या शरीरसौष्ठवावरचे भाषण आणि सांगली केंद्रावर चालत असलेली एक पाककृती यातली वाक्ये आलटून पालटून वाचून त्यातून येणारी धमाल या जोडीने ऐकवून पोट धरधरून हसायला लावले. स्वतःचे हंसू आवरून ठरलेली वाक्ये न विसरता गंभीरपणे म्हणणे हे कठीण काम त्यांनी सहज केले. टीव्ही येण्याच्या आधीच्या काळात अशा प्रकारचे विनोदी मिश्रण खूप पॉप्युलर होते. पण जवळ जवळ वेव्हलेंग्थ असलेली दोन आकाशवाणी केंद्रे एकाच वेळी रेडिओवर लागणे शक्य होते, तसे दोन टीव्ही चॅनल लागत नाहीत, शिवाय दृष्य चित्रांची मिसळ करणे जास्त कठीण असते यामुळे रेडिओबरोबरच विनोदाचा हा प्रकार मागे पडत गेला.
कॉलेजकुमार उत्कर्ष मासिकासारखे दिसणारे एक पुस्तक हातात धरून स्टेजवर आला आणि त्याने दोन अर्थपूर्ण कविता वाचून दाखवल्या. प्रसादनंतर लगेचच तो आल्याने त्यानेसुध्दा त्याला आवडलेल्या पण फारशी प्रसिध्दी न मिळालेल्या कविता वाचल्या असाव्यात असे वाटले. त्या कविता त्याने स्वतः रचल्या होत्या, त्याच्या कॉलेजच्या स्मरणिकेत त्या प्रसिध्द झाल्या होत्या आणि प्रत्यक्ष कवीवर्य विंदा करंदीकर यांनी त्याबद्दल त्याला शाबासकी दिली होती हे नंतर बोलण्यातून कळले. माणसाने विनयी असवे, पण आपल्या गुणांची आणि मिळालेल्या यशाची थोडी प्रसिध्दी करावी किंवा खुबीने करवून घ्यावी असा सल्ला मी त्याला दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोणीच करत नव्हता. सगळा उत्स्फूर्त मामला होता. पण अधून मधून स्टेजवर येऊन विनोदी चुटके सांगायचे काम मिलिंद करत होता. त्याच्याकडे विनोदी किश्श्यांचा भरपूर स्टॉक होता आणि होऊन गेलेल्या गाण्याशी सांगड घालून त्यातला नेमका जोक नाट्यपूर्ण पध्दतीने सांगण्याचे कसब त्याने आत्मसात केले आहे. त्याच्या खुसखुशीत कॉमेंट्समुळे कार्यक्रमाला जीवंतपणा येत होता.
रंगत गेलेल्या या कार्यक्रमात जेंव्हा सध्याचे टॉपहिट गाणे आता वाजले की बारा सुरू झाले तेंव्हा घड्याळात अडीच वाजले होते. त्यानंतर तो आवरता घ्यायचे ठरले. तरीही आणखी एक आणखी एक असे करत भैरवी संपेपर्यंत तीन वाजले होते. हॉलभर गाद्या बिछवून ठेवल्या असल्याने बरीचशी मंडळी गाणी ऐकता ऐकता जागीच आडवी झाली होती. पाच सहा कॉटेजेसमध्ये ज्येष्ठ सदस्यांची सोय केलेली होती. आपापल्या जागी जाऊन निजानीज होईपर्यंत आणखी अर्धा तास गेला. पाऊस पडतच होता. कॉटेजच्या वर पत्र्याचे छप्पर असल्यामुळे तव्यावर लाह्या फुटाव्यात तसे पावसाचे थेंब त्यावर तडतड करत होते. पावसाच्या जोराबरोबर त्याची लय कमी जास्त होत होती. पण त्या लयीवरच निद्रादेवीची आराधना करत असतांना ती प्रसन्न झाली आणि तिने सर्वांना आपल्या आधीन करून घेतले.
. . . . . . . . (क्रमशः)
No comments:
Post a Comment