Tuesday, August 10, 2010

कौटुंबिक संमेलन - ७ (अंतिम)


मधुकरला पहिल्यापासूनच नाटकाची आवड आणि अभिनयाचे अंग असल्यामुळे तो गेली चाळीस पन्नास वर्षे या क्षेत्रात वावरतो आहे. बरीच वर्षे हैद्राबादला असतांना तो तिथल्या महाराष्ट्रमंडळाचा अत्यंत उत्साही आणि सक्रिय कार्यकर्ता होता. दरवर्षी नवनवी नाटके बसवून तिथल्या मराठी समाजापुढे सादर करण्यात तो नेहमीच पुढाकार घेत असे. पुण्याला स्थायिक झाल्यानंतरही तो त्याच्या वसाहतीतील सांस्कृतिक विश्वात सक्रिय आहे. आमच्या कौटुंबिक संमेलनात त्याच्या अभिनयकौशल्याची झलक दाखवायचे ठरलेलेच होते, पण शनिवारी रात्री झालेल्या विविधगुणदर्शनाच्या कार्यक्रमात संगीताचेच प्राधान्य होते आणि शांतीवनातल्या छोट्याशा मंचावर मांडलेली वाद्ये बाजूला करून मोकळी जागा करणे व पुन्हा ती सारी मांडून त्यांची विजेशी जोडणी करणे बरेच कठीण होते. त्यामुळे मधुकरचा नाट्याविष्काराचा कार्यक्रम रविवारी सकाळी करायचे ठरवले. त्या दिवशीही अनपेक्षितपणे वीज गेली. तरीही मायक्रोफोनच्या मदतीशिवाय त्याने शारदा नाटकातला एक प्रवेश अप्रतिम पध्दतीने सादर केला. त्यातल्या निरनिराळ्या पात्रांच्या बोलण्यातल्या वेगवेगळ्या लकबी आणि हावभावांमधले बारकावे वगैरे सारे त्याने एकट्याने सादर करून शारदा नाटकातला तो प्रसंग केवळ आपल्या अभिनयकौशल्याने जसाच्या तसा उभा करून दाखवला.

नाटकांचे लेखन, दिग्दर्शन, अभिनय वगैरे सबकुछ जबाबदा-या प्रभाकर एकट्याने पेलतात. त्यांनी स्वतः लिहिलेल्या आणि बसवलेल्या एका नाटकातला प्रवेश त्यांनी सादर केला. त्या नाटकाचे कथानक, त्यातली पात्रे आणि तो विशिष्ट प्रसंग वगैरेंचे मार्मिक विवेचन करून त्यांनी नाट्यसृष्टीतले अंतरंग थोडेसे उलगडून दाखवले. नटाने नाटकातल्या एकाद्या भूमिकेत शिरणे वगैरे सगळ्या गप्पा असतात, तसे करणे शक्य तर नसतेच आणि इष्टही नसते, कोणीही तसे प्रत्यक्षात करत नाही. आपल्या अभिनयाच्या जोरावर आणि शब्दांच्या फेकीतून तसा आभास तो निर्माण करतो. नाटक पहातांना आपल्यालाही त्या नटाचे अस्तित्व जाणवल्याशिवाय रहात नाही. असे त्यांनी ठामपणे सांगितले. मागे एकदा पुलंच्या एका मुलाखतीत त्यांनीसुध्दा असेच काहीतरी सांगितल्याचे मला आठवते.

सुधा, शैला वगैरेंनी त्यांच्या बालपणातल्या काही डोळ्यात पाणी आणणा-या हृदयस्पर्शी आठवणी तर गुदगुद्या करणा-या काही खुसखुशीत हकीकती सांगितल्या. इतरांनीही त्यात भर घातली. पंचवीस वर्षांपूर्वी आमच्या आईने रचलेले अंबरीशाचे आख्यान सरोजला अजून तोंडपाठ आहे. ते तिने केवळ स्मरणातून पूर्ण ऐकवले. आईने केलेल्या आणखी कांही निवडक कवनांचे मी वाचन केले. नंतर आपण केलेले एक विडंबनही वाचून दाखवले. मानसीने रंगवलेल्या अप्रतिम चित्रांचे एक लहानसे प्रदर्शन त्या हॉलमध्ये भरवले होते. तिने काढलेली सुंदर चित्रे त्यासाठी रंगमंचावरील पडद्यावरच चिकटवली किंवा टाचली होती. प्रभाकरांनी आपल्या सुवाच्य अक्षरात लिहून आणि रेखाचित्रांनी सजवून प्रदर्शनात ठेवलेल्या कवितांचे नमूनेही हॉलमधल्या भिंतीवर लावले होते.

या प्रसंगी आलेल्या ज्येष्ठ सदस्यांचा त्यांच्या नातवंडांकडून सत्कार करण्यात आला. एक पुष्पगुच्छ आणि नारळ देणे आणि वाकून नमस्कार करणे एवढेच त्याचे स्वरूप होते. ज्यांची नातवंडे हजर नव्हती त्यांचा सत्कार त्यांच्या कुटुंबातल्या तिथे आलेल्या सर्वात लहान असलेल्या व्यक्तींनी केला. या कार्यक्रमाचे संयोजन आणि त्यासाठी सारी धावपळ करणा-या युवकांचाही नामनिर्देश करून वडिलधा-यांच्या हस्ते त्या सर्वांना फूल आणि नारळ दिले. तोपर्यंत भोजनाची व्यवस्था झाली असल्याची वर्दी आली.

पुण्यातले कांही लोक जेवणासाठी शांतीवनात न थांबता सरळ आपल्या घरी परतले आणि बाहेरगावाहून आलेले काही लोक जेवण आटोपून लगेच परतीच्या प्रवासाला निघाले. त्यामुळे भोजनोत्तर कार्यक्रमासाठी अर्धेच लोक शिल्लक राहिले होते. त्यांनाही परत जावेसे वाटायला लागले होते, पण त्यानंतर जादूचे प्रयोग असल्याची घोषणा केली गेल्यामुळे छोट्या मुलांनी त्यांना जाऊ दिले नाही. हा खेळ शांतीवनातर्फे दाखवला जाणार होता. सर्वांनी भोजनालयात जाऊन आणि जेवण करून परत हॉलमध्ये येईपर्यंत स्टेजवर टेबल ठेवून जादूच्या खेळाची तयारी सुरू झाली होती, पण विजेचा मात्र पत्ता नव्हता. आता मात्र ती येईपर्यंत थांबून तिची वाट पहायची कोणाचीही तयारी नव्हती आणि जादूगारालासुध्दा संध्याकाळी आणखी कुठे जायचे असावे. त्यानेही लाइटिंग आणि माइकशिवायच प्रयोग सुरू करून दिला. कदाचित त्याच्यासाठी हे रोजचेच असेल. तुकडे तुकडे केलेल्या रिबीनीमधून अखंड रिबीन काढून दाखवणे, एकादी वस्तू टेबलावरून अदृष्य करून कोणाच्या खिशातून किंवा टोपीतून ती बाहेर काढणे, रिकाम्या थैलीमधून कबुतरे काढणे वगैरे हातचलाखीचे नमूने दाखवून त्याने छान मनोरंजन केले. यातली ट्रिक शोधून काढण्याचा निष्फळ प्रयत्न करण्यापेक्षा त्या जादूगाराच्या हुषारीची मजा घेत त्याला दाद देणेच मी जास्त पसंत करतो. मुलांना तर ते खरेच वाटते आणि ती विस्मयचकित होतात.

जादूचे प्रयोग संपल्यावर मात्र तिथे जास्त वेळ थांबायची कोणाची तयारी नव्हती. पावसाचा जोर वाढतच होता आणि तो कमी होण्याची लक्षणे दिसत नव्हती. रविवारी संध्याकाळी खडकवासला धरणाच्या काठावर पिकनिकला किंवा भटकंतीला येणा-या पर्यटकांची भरपूर गर्दी असणार हे माहीत होते. त्यामुळे शक्य तितक्या लवकर निघणे चांगले होते. परतीच्या प्रवासात कोणाकोणाच्या गाडीत कोणाकोणाला घ्यायचे याची चर्चा करून ते नक्की केलेले होतेच. आमच्या गाडीमधल्या पॅसेंजरांना गोळा करून आम्हीही परतीला निघालो. बरोबर नेलेल्या सगळ्या सामानाची आवराआवर करून आणि बिले भागवणे वगैरे उरलीसुरली कामे आटोपून शेवटची बॅचसुध्दा तासाभरात परतली.

औपचारिक रीतीने या कार्यक्रमाचा समारोप सोहळा असा झाला नाही. टेलीफोनवर आणि ईमेल, ऑर्कुट, फेसबुक वगैरे माध्यमातून एकमेकांशी संवाद चालत राहिला आणि अजून तो चालला आहे. एकंदरीत पाहता मजा आली असाच सूर यातून निघत आहे.


. . . . . . . . . . . . .. . . . . . . . . . . . (समाप्त)

No comments: