गुरू : वत्सा, आता आपण विज्ञानाचा पहिला धडा सुरू करू. विज्ञानाबद्दल तुझ्या मनात कोणती संकल्पना आहे? विज्ञान हा शब्द उच्चारताच तुझ्या डोळ्यासमोर पटकन कोणत्या गोष्टी येतात?
शिष्य : कोणी जटाधारी आणि अस्ताव्यस्त दाढी वाढवलेले शास्त्रज्ञ प्रयोगशाळेत रात्रंदिवस कसलेसे संशोधन करून शोध लावतात. तेच ना?
गुरू : हा सुध्दा विज्ञानाचा एक अत्यंत महत्वाचा भाग असला तरी आपल्या रोजच्या जीवनात आपण विज्ञानाचा उपयोग कशा प्रकारे करत असतो?
शिष्य : छे! छे! मी कधी नवे प्रयोग बियोग करून पहात नाही बाबा! सगळं नीट चाललं असतांना उगाच कशाला प्रयोग करायचे?
गुरू : बरंय्. मग तू रोज दिवसभर काय करत असतोस?
शिष्य : प्रभातकाली उठून अभ्यंगस्नान करतो, देवपूजा करून स्तोत्रपठण करतो, कार्यालयात जाऊन तिथले काम करतो. आता सगळी दिनचर्या सांगत बसू का?
गुरू : नको. पण जेवण तरी करतोस की नाही?
शिष्य : म्हणजे काय? दिवसातून तीन वेळा आहार घ्यायलाच पाहिजे असे आपल्या आयुर्वेदात सांगितले आहे. तुम्ही घेत नाही?
गुरू : मी पण जेवण करतो, पण ते आयुर्वेदात सांगितले आहे म्हणून करत नाही. मला भूक लागते यासाठी मी आपली क्षुधाशांती करतो. पण तुला दिवसातून तीन वेळा आहार कां घ्यायला हवा?
शिष्य : आयुर्वेदात सांगितलेच आहे तसे.
गुरू : पण तुमचे ऋषीमुनी अन्नप्राशन न करता वर्षानुवर्षे रहात होते म्हणे.
शिष्य ते तसे रहातच होते. यात काही संशय आहे का?
गुरू : म्हणजे आयुर्वेदात काय लिहिले आहे हे त्यांना माहीत नव्हते का?
शिष्य : ते तर सर्वज्ञानी होते. त्यांच्याबद्दल आपण अज्ञ लोक कसली चर्चा करणार?
गुरू : मला एवढेच सांगायचे आहे की अन्न खाण्यासाठी तू दिलेले कारण पुरेसे नाही. समज, तुला एक दिवसभर कांही ही खायला मिळाले नाही तर काय होईल?
शिष्य : भुकेने माझा जीव तळमळेल. आणखी काय होणार?
गुरू : म्हणजेच तसे होऊ नये म्हणून तू दिवसातून दोन तीन वेळा अन्नग्रहण करतो. बरोबर?
शिष्य : असेल कदाचित.
गुरू : पण मला सांग, रोज त्यासाठी इतका वेळ वाया घालवण्यापेक्षा तू एकदम आठवड्याभराचे जेवण का करून घेत नाहीस?
शिष्य : ते करायला मी काय उंट आहे?
गुरू : तू उंट नाहीस हे मला मान्य आहे. ज्या पध्दतीने तू हा प्रश्न विचारलास त्यावरून तू स्वतःला उंटाहून श्रेष्ठ समजत असणार. पण तुच्छ उंटाला जे जमते ते तू कां करू शकत नाहीस?
शिष्य : साधी गोष्ट आहे. कारण मी उंट नाही, तो उंट आहे. तो माझ्यासारखे बोलू शकतो का?
गुरू : ठीक आहे. तू रोजच्या जेवणात काय काय खातोस?
शिष्य : हेच आपले वरण, भात. पोळी, भाजी, उसळ, चटणी, कोशिंबीर वगैरे
गुरू : आणि गवत, चारा, झाडाची पाने ...
शिष्य : असले खायला मी काय बैल आहे की शेळी आहे? तुम्ही मला काय समजलात? मघापासून विज्ञान सोडून कसले भलते सलते प्रश्न विचारत सुटला आहात?
गुरू : वत्सा शांत हो. थोडा धीर धरलास आणि लक्षपूर्वक विचार केलास तर या सगळ्या संभाषणाचा विज्ञानाशी काय संबंध आहे ते लवकरच तुला जाणवेल. पण एक गोष्ट चांगली लक्षात ठेव. कोणतीही विद्या आत्मसात करायची असेल तर त्यासाठी सहनशक्ती, एकाग्रता आणि सारासार विवेकबुध्दी यांची आवश्यकता असते. निरुत्साह न होता एकाग्रचित्त होऊन चिकाटीने व नेटाने प्रयत्न करत रहाण्याची क्षमता अंगात असल्याखेरीज कोणताही माणूस विज्ञानाचे अध्ययन करू शकणार नाही. आतापर्यंतच्या तुझ्या बोलण्यातून तू यासाठी किती अपात्र आहेस हेच दाखवत आला आहेस. तुझ्यासमोर मी आता दोन पर्याय ठेवतो. एकतर तू मनातून इच्छा नसतांना विद्यार्थ्याचे केवळ सोंग आणले आहेस हे मान्य कर आणि हे नाटक इथेच थांबव. अथवा मी सांगितलेले गुण जागृत कर आणि विज्ञानासंबंधीची माहिती जाणून घेण्याचा निदान एक प्रामाणिक प्रयत्न कर.
शिष्य : तुमच्याकडून कांही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत असे आता मलाही पटायला लागले आहे. त्यामुळे मी मनावर संयम आणि जिभेवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करेन.
गुरू : छान! आता सांग, गायबैल वगैरे पशु चारा खातात, शेळ्यामेंढ्या झाडांचा पाला खातात, असे ते का करतात?
शिष्य : कारण ती जनावरे आहेत.
गुरू : वाघसिंह ही सुध्दा जनावरेच आहेत, पण ती गवत कां खात नाहीत?
शिष्य : कारण ती हिंस्र जनावरे आहेत.
गुरू : आपली कुत्रीमांजरे तर एवढी हिंस्र नसतात, पण ती सुध्दा चारा खात नाहीत.
शिष्य : कारण प्रत्येक प्राण्याचा आहार वेगळा असतो.
गुरू : हे मात्र तू अगदी १०० टक्के बरोबर सांगितलेस. आता सांग, कोणते अन्न कोणी खायचे हे कोण ठरवत असेल?
शिष्य : अर्थातच ही सगळी त्या परमेश्वराची अगाध लीला आहे. ज्याने प्राणीमात्र निर्माण केले त्यानेच त्यांचे अन्नसुध्दा निर्माण केले.
गुरू : हे सुध्दा अचूक उत्तर आहे. कोणी त्याला परमेश्वर म्हणेल, कोणी निसर्ग म्हणेल. ही ज्याची त्याची श्रध्दा जशी असेल तसे होईल. पण प्रत्येक प्राणीमात्राचे अन्न निसर्गात तयार होत असते. तो स्वतः ते उत्पन्न करत नाही, एवढे खरे आहे. आता सांग तू जे अन्न रोज खातोस ते कोण बनवते?
शिष्य : अर्थातच माझी आई.
गुरू : आणि सकाळी कोणती भाजी करायची किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी कोणती डाळ शिजवायची हे कोण ठरवतो?
शिष्य : तेही बहुतेक वेळा माझी आईच ठरवते, कधीकधी बाबा सांगतात किंवा आम्ही मागणी करतो.
गुरू : म्हणजे कोणते अन्न खायचे आणि ते कशा प्रकाराने तयार करायचे यातले कांही निर्णय माणसे घेतात.
शिष्य : कांही नव्हे, ते सारे निर्णय आम्हीच घेतो.
गुरू : अगदी असेच म्हणता येणार नाही, कारण तृणधान्ये, कडधान्ये, पालेभाज्या, फळभाज्या वगैरे आपले मुख्य अन्नपदार्थ आपल्याला निसर्गाकडून घ्यावे लागतात. पण आपण त्यांची लागवड करतो, त्यांच्या रोपांची मशागत करतो, आलेल्या पिकांची कापणी करतो अशा प्रकारे माणसांचा सहभाग त्यात असतो. त्यानंतर भाजणे, शिजवणे, तळणे वगैरे प्रक्रिया करून आपण त्यांचेपासून रुचकर पदार्थ बनवतो तसेच त्यांच्या पचनाला मदत करतो. त्यामुळे आपण जे अन्न खातो ते तयार होण्यातले कांही निर्णय देवाचे किंवा निसर्गाचे असतात तर कांही माणसांचे असतात. यातला जो भाग निसर्गाचा आहे त्याचा पध्दतशीर अभ्यास करणे हा विज्ञानाचा विषय आहे. जे निर्णय माणूस घेतो त्यांचा अभ्यास पाकशास्त्र, समाजशास्त्र, संस्कृतीचा अभ्यास वगैरे नांवाखाली केला जातो. विज्ञानाशी त्याचा निगडित संबंध असू शकतो. पण एकंदरीतच जीवनाच्या सर्वच क्षेत्रात निसर्गाच्या नियमांचा अभ्यास हेच विज्ञानाचे मुख्य ध्येय असते.
. . . . . . . . . (क्रमशः)
3 comments:
अनुभवसिद्ध ज्ञान म्हणजे विज्ञान ही विज्ञानाची उपनिषदातील व्याख्या आहे. ज्ञानाचे विवेचनही विज्ञानस्वरूपात केले जाऊ शकते.
वाचतोय...
संवाद चांगल्या धाटणीचा वाटतोय...
आपल्या विद्वत्तापूर्ण प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
शब्दांचा उपनिषदकालीन अर्थ शोधण्यात मला रस नाही. तो कांहीही असला तरी आज जर प्रचलित नसेल तर सामान्य माणसाला त्याचा उपयोग नाही. इंग्रजीमधील सायन्स या शब्दाचा पर्याय या अर्थाने आज विज्ञान हा शब्द वापरण्यात येतो. त्याचीही व्यापक व्याख्या करता येऊ शकते. पण हा शब्दच्छल फक्त विद्वांनांसाठी असू शकेल.
या शाखेचे स्वरूप सर्वसामान्य लोकांना थोडक्यात सांगण्याचा एक प्रयत्न मी या लेखमालिकेत करतो आहे. समजायला सोपे जावे यासाठी रोजच्या जीवनातील उदाहरणे देऊन तो संवादरूपाने दिला आहे.
Post a Comment