Thursday, March 25, 2010

गुरुशिष्यसंवाद (पूर्वार्ध)

शिष्य : गुरुवर्य, आपल्याकडून अंमळ मार्गदर्शन घ्यावे हा हेतू मनात बाळगून मी मोठ्या आशेने आपल्याकडे आलो आहे, माझ्यावर अनुग्रहाची कृपा करावी.
गुरू : वत्सा, तुझ्या अंगावरील वस्त्रे, भाळावरील टिळा वगैरे पाहता तू कोणत्या मठातून आला आहेस हे मला स्पष्ट दिसते आहे. त्याला सोडून ....
शिष्य : छे! छे! तसा विचार स्वप्नातसुध्दा माझ्या मनाला शिवणार नाही. आपल्या मठात राहूनच फावल्या वेळात इतरत्र जाऊन ज्ञानाचे कांही जास्तीचे कण गोळा करावेत अशी माझी मनीषा आहे. विज्ञान या विषयाची ओळख करून घेण्यासाठी मी आपले नांव ऐकून आपल्याकडे आलो आहे.
गुरू : माझ्या नांवाची ख्याती तुझ्या मठापर्यंत पोचली हे ऐकून मला परमसंतोष होत आहे. त्यामुळे मी तुला अवश्य मदत करेन, पण माझ्या मनात एक शंका येते. विश्वातील सर्व ज्ञानसंभार तुझ्या मठाधिपतींच्या स्वाधीन केला गेला होता असे नेहमी सांगण्यात येते.
शिष्य : ते खरेच आहे. अब्जावधी वर्षांपूर्वी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने आपल्या चार मुखांतून चार वेदांचे ज्ञान आमच्या महर्षींना सांगितले होते. त्यानंतर त्याखेरीज ज्ञानाचा कणमात्र कधीही आणि कोठेही निर्माण झाला नाही अशी आमची गाढ श्रध्दा आहे. ज्ञानाचा हा ओघ पुढे युगानुयुगातील कोट्यावधी वर्षे गुरूशिष्यपरंपरेतून आपल्या देशात वहात राहिला होता. कलीयुग आल्यानंतर दु्ष्ट म्लेंच्छांनी आक्रमण करून विध्वंस केल्यामुळे त्यातले बरेचसे नष्ट झाले. एकट्या नालंदा विश्वविद्यालयातली ग्रंथसंपदा सतत दहा की वीस वर्षे जळत राहिली होती आणि त्याचा धूर दहावीस कोसांवरून दिसत होता अशा नोंदी आहेत ..... गुरुवर्य, गुरुवर्य, तुमचे लक्ष कुठे आहे?
गुरू : तुझे चालू दे, मी आंतर्जालावर मला आलेले विरोप तोंपर्यंत वाचून घेत आहे.
शिष्य : तर मी कुठे होतो?
गुरू : तू जिथे असशील तिथे ठीकच होतास, पण आज माझ्याकडे कशासाठी आला आहेस?
शिष्य : त्याचे निवेदन मी आधीच केले होते ते आपल्या स्मरणात असेलच.
गुरू : अरे, एक प्रकट निवेदन आणि दुसराच अंतःस्थ उद्देश अशी दुहेरी नीती बाळगणे हे तर तुझ्या मठाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे तुला पाहून मला कचदेवयानी आख्यानाची आठवण झाली. पण कांही हरकत नाही. मला देवयानीसारखी हट्टी कन्यका नाही आणि मी फारसे वारुणीप्राशन करत नाही, कधीतरी एकादा चषक ओठांना लावलाच तरी त्यात राख मिसळलेली मला कळणार नाही इतक्या मद्यधुंद अवस्थेपर्यंच मी कधी पोचत नाही. त्यामुळे शुक्राचार्यांसारखी माझी अवस्था होण्याचा धोका मला वाटत नाही. शिवाय षट्कर्णी होताच विफल होईल अशी कोणतीही विद्या मी शिकलेलो नाही. माझ्या मते अशी कोणतीही विद्या अस्तित्वातच नाही. ज्या विद्येचे थोडेसे अध्ययन मी केलेले आहे ती देण्यामुळे कमी होत नाही, उलट ती वाढते. त्यामुळे ती शतकर्णी, सहस्रकर्णी झाल्यास त्यातून माझा लाभच होणार आहे. ती प्राप्त करण्यासाठी जो कोणी माझ्याकडे येतो त्याला मी कधी नकार देत नाही. तुलाही मी नाही म्हणणार नाही. पण दुसरी एक शंका माझ्या मनात येते.
शिष्य : कोणती?
गुरू : विज्ञानाची खरोखर उपासना करणारे लोक आयुष्यभर स्वतःला त्या मार्गाचे वाटसरू समजतात. आपण अंतिम मुक्कामावर पोचल्याचा दंभ ते भरत नाहीत. आपण जसजसे पुढे जाऊ तसतसा पुढील भाग नजरेसमोर येत जातो, कोणीही क्षितिजापर्यंत कधी पोहचू शकत नाही, हे त्यांना चांगले ठाऊक असते. पण आपल्याला विज्ञानातले सारे कांही समजलेले आहे असा आविर्भाव आणून त्यावर प्रवचने झोडणारे आणि ग्रंथलेखन करणारे महाभाग तुझ्या मठात आहेत.
शिष्य : म्हणजे काय? असे महान लोक आमच्याकडे आहेतच मुळी! आमच्या महंत सुरेशजींनी प्राचीन भारतातील विज्ञान या विषयांवर एक महान ग्रंथ लिहिला आहे. आम्ही सारे भक्तगण नेहमी त्याची पारायणे करत असतो. हिंदी भाषेत लिहिलेल्या या ग्रंथातले अल्पसे ज्ञानामृत मराठीभाषिक लोकांसाठी मराठी भाषेत उपलब्ध करून देऊन त्यांना त्याचा लाभ मिळवून देण्याचा उपक्रम मी सध्या सुरू केला आहे. पाश्चिमात्य पंडितांनी हल्लीच्या काळात विज्ञानात कांही नवे दिवे लावले आहेत असे ते म्हणतात. त्यांचाही उल्लेख करून माझ्या लेखांची आकर्षकता किंचित वाढवण्याच्या हेतूने मी आता विज्ञानाचे प्राथमिक पाठ घेण्याचे ठरवले आहे.
गुरू : म्हणजे शिळ्यापाक्या खिचडीवर खिसलेले ताजे खोबरे पसरून ते सुग्रास अन्न या नांवाने खपवण्याचा तुझा बेत आहे तर!
शिष्य : कांही तरीच काय? साक्षात् ब्रह्मदेवाने दिलेले ज्ञान कधी शिळे होणे शक्यच नाही. शिवाय आपली अब्जावधी वर्षे म्हणजे त्याचा फक्त एक निमिषमात्र असतो. त्यामुळे तसेही हे सारे ताजेतवानेच आहे. म्लेंच्छांनी केलेल्या .......... आणि त्यानंतर आलेल्या लबाड गौरवर्णीयांनी तर उरलीसुरली ग्रंथसंपदा इथून चोरून नेली आणि त्यातले एकेक पान ते आपल्या नांवाने खपवत गेले. परकीय अंमलाखाली आपल्या लोकांनाही ते ऐकून घ्यावे लागले असेल, पण स्वातंत्र्यप्राप्तीला साठ वर्षे होऊन गेली असली तरी आपल्या लोकांची मानसिक गुलामगिरी कांही गेलेली नाही. आपले मूर्ख विद्वान अजूनही त्यालाच खरे मानून पाश्चात्य संशोधकांचीच वाहवा करत असतात. आपल्या महान पूर्वजांच्या कार्याची कोणाला कदरच नाही. त्यांच्या हक्काचे पण उपटसुंभ लोकांनी काबीज केलेले श्रेय ते हिरावून घेणा-यांकडून परत हिसकावून घेऊन आपल्या पूर्वजांना ते अर्पण करण्याचा विचार इतर कोणी करत नसला तरी आमचा मठ त्यासाठी कटीबध्द आहे ...... अहो, अहो, अहो, अहो, अहो, अहो, अहो, अहो, मी काय सांगतो आहे?
गुरू : तुझे चालत राहू दे. असला मठ्ठपणा ऐकण्याची मलाच नव्हे तर या भिंतींनाही आता संवय झाली आहे. त्याचा प्रतिवाद करण्यात मी माझा वेळ वाया घालवणार नाही. तुझ्या मस्तकातली ध्वनीफीत संपल्यावर आपण मुद्यावर येऊन चर्चा करू. तोंपर्यंत मी माझे काम करतो, तू तुझे भाषण चालू ठेव.
शिष्य : तर मी कुठे होतो?
गुरू : तू जिथे असशील तिथे ठीकच होतास, पण आज माझ्याकडे कशासाठी आला आहेस असे मात्र मी आता विचारणार नाही कारण तुझ्या मनातला सुप्त हेतू आता पूर्णपणे प्रकट झाला आहे. त्या कामात माझी मदत होणे शक्य नसल्यामुळे तू तुझे भाषण संपल्यानंतर आपल्या मठात परत जाऊ शकतोस.
शिष्य : पण तुम्ही तर मला मार्गदर्शन करायला तयार झाला होता.
गुरू : बरोबर आहे, पण उन्नतीच्या वाटेवर जायचा रस्ता दाखवणे याला मार्गदर्शन असे आमच्याकडे म्हणतात. तू निवडलेला रस्ताच वेगळा आहे. तो दाखवणारे गुरूही तुला लाभलेले आहेत.
शिष्य : आपल्याकडे आलेल्या कोणालाही विज्ञानाचे धडे द्यायला आपण नकार देत नाही असेही तुम्ही म्हणाला होतात.
गुरू : त्यासाठी मी आजही उत्सुक आहे. तू विद्यार्थी व्हायला तयार असशील तर मी मास्तर बनेन, पण मग मी सांगतो ते तुला लक्ष देऊन ऐकायला पाहिजे. तुझ्या मस्तकात सतत फिरत असलेली ही तुझ्या पंथाची ध्वनिमुद्रिका कांही वेळासाठी बंद करून ठेवावी लागेल. एवढे एक पथ्य तुला पाळावे लागेल. हे तुला मान्य असेल तर मी लगेच तुला विज्ञानाचा पहिला धडा शिकवेन.


..... (क्रमशः)

2 comments:

शिरीष said...

ह्याला छान म्हणावे की अप्रतिम हे अजून उमगले नाही पण तरीही अभिप्राय द्यावासा वाटला... म्हणून तोही क्रमशः द्यायला बहुदा हरकत नसावी.

Anand Ghare said...

धन्यवाद.
कांही हरकत नाही. वाचत रहा एवढीच विनंती.