Friday, March 12, 2010
पंपपुराण भाग ११
वेगवेगळ्या आकारांच्या इंपेलरांचा उपयोग करून पंपाची क्षमता तसेच कार्यक्षमता कशा प्रकारे वाढवली जाते हे आपण पाहिले. इंपेलरप्रमाणेच व्हॉल्यूट केसिंगच्या आकारात फेरफार करून पंपाच्या कामात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले जातात. सेंट्रिफ्यूगल पंपाचा इंपेलर वेगाने फिरून पाण्याला त्याच वेगाने परीघाकडे ढकलत असतो, पण पंपातून बाहेर पडलेल्या पाण्याचा पाइपातून वाहण्याचा वेग इतका जास्त नसतो. त्यामुळे इंपेलरने वेगाने ढकललेले पाणी परीघाजवळून सावकाशपणे पुढे जाणा-या पाण्यावर आदळत राहते. या आदळआपटीतून कंपने निर्माण होतात आणि ती पार पंपाच्या फाउंडेशनपर्यंत जाऊन धडकतात. या धकाधकीमुळे जागोजागी असलेले खिळे मोळे सैल होतात, गास्केटांमधून पाणी बाहेर झिरपायला लागते आणि एकंदरीत पंपाचे आयुष्य कमी करायला त्याची मदत होते. असा कोणताही प्रॉब्लेम दिसला की इंजिनियर्स त्यावर तोडगा शोधून काढणारच. ते कशा प्रकारचे असतात हे वर दिलेल्या चित्रांमध्ये दाखवले आहेत.
पहिल्या चित्रात दाखवल्याप्रमाणे पंपाचा इंपेलर आणि व्हॉल्यूट केसिंग यांच्या दरम्यान अनेक डिफ्यूजरांची एक माळ बसवली जाते. या डिफ्यूजरला सुध्दा इंपेलरसारखीच अनेक वक्राकार पाती असतात, पण ती फिरत नाहीत. केसिंगला चिकटून ती एका जागी स्थिर राहतात, यामुळे गोल फिरणा-या इंपेलरचे चक्र आणि शंखाकृती केसिंग यांच्या दरम्यान पाण्याला वाहण्यासाठी अनेक समांतर मार्ग तयार होतात. इंपेलरमधून निघालेले पाणी एकदम केसिंगवर जाऊन आदळत नाही किंवा इंपेलरच्या वेगवेगळ्या पात्यांनी ढकललेले पाणी एकमेकांवर न आपटता डिफ्यूजरमधील पात्यांच्या वक्राकार आकारानुसार वळत वळत पुढे जाते आणि सावकाशपणे एकमेकात मिसळते. जास्त प्रवाह देणा-या अॅक्शियल इंपेलरमध्ये डिफ्यूजरची गरज आणि उपयुक्तता अधिक असते.
इंपेलरमधून वेगाने बाहेर पडणारे पाणी व्हॉल्यूटमधून फिरत असतांना त्यातून जो दाब निर्माण होतो, त्यामुळे इंपेलरवर परिणाम होतो. हा कमी अधिक असल्यास त्यात असंतुलन होऊन त्याचा भार बेअरिंगवर पडतो. लहान पंपात याचा जोर विशेष नसला तरी पंपाचा आकार मोठा असला आणि त्यातल्या पाण्याचा दाब जास्त असला तर तो वाढत जातो. त्यातून पंप जेंव्हा त्याच्या क्षमतेहून खूप खालच्या स्तरावर काम करत असेल, म्हणजे त्यातून होणारा पाण्याचा प्रवाह पूर्ण क्षमतेच्या अर्धा किंवा त्याहून कमी असेल तर हे असंतुलन घातक ठरू शकते. हे होऊ नये यासाठी दुहेरी व्हॉल्यूटचा उपयोग करतात. अशा प्रकारच्या पंपात चित्रातील दुस-या आकृतीत दाखवल्याप्रमाणे व्हॉल्यूटच्या अर्ध्या भागात एक पार्टीशन घालून दोन वाटा तयार केल्या असतात. इंपेलरच्या अर्ध्या भागाने फेकलेले पाणी त्यातील एका भागातून आणि दुस-या अर्ध्या भागाने ढकललेले पाणी वेगळ्या मार्गातून फिरत जोते. पंपाच्या मुखापाशी हे दोन्ही प्रवाह पुन्हा एकत्र येतात. यामुळे इंपेलरवर पाण्याच्या दाबामुळे पडणा-या जोराचे संतुलन होते. अशा प्रकारचा दुहेरी व्हॉल्यूट चेंबर जास्त प्रेशर निर्माण करणा-या पंपात मुख्यत्वे वापरला जातो.
या दोन्ही सुधारणा करण्यासाठी केसिंगच्या आंत मोकळ्या जागेची आवश्यकता असते. त्यामुळे त्या सुधारणा मोठ्या आकाराच्या पंपांमध्येच केल्या जातात. लहान आकाराच्या पंपांना त्यांची फारशी गरज नसते.
. . . . . . . . . . . (क्रमशः)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment