Saturday, March 20, 2010

नव्या वर्षाची नवी सुरुवात


१ जानेवारीला तारखेनुसार नव्या वर्षाची सुरुवात झाली त्या वेळेसच मी अनपेक्षितपणे एका कामात मग्न झालो होतो, त्यामुळे ब्लॉगकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही. ते काम हातावेगळे करून झाल्यानंतर ब्लॉगसाठी पुन्हा संवड मिळू लागली लागली होती. त्यात पंपपुराण सांगणे सुरू केले. मराठी पंचांगानुसार नवीन वर्ष कसे जाणार याची थोडी चुणुक मिळाली होती, पण स्पष्ट कल्पना नव्हती. गुढी पाडव्याला नववर्षाचे स्वागत ब्लॉगवर कसे करावे याबद्दल विचार चालला असतांनाच सल्लामसलतीसाठी आणखी एक नवे आमंत्रण घरबसल्या चालून आले आणि ते स्वीकारायचे ठरवले. पाठोपाठ मुलाचा फोन आला आणि त्याने तांतडीने पुण्याला बोलावून घेतले. ध्यानीमनी नसतांना तिकडे चालले गेलो. त्यामुळे ब्लॉग आणि आंतर्जालाकडे पहायला फुरसत मिळाली नाहीच.

मुलाने विकत घेतलेल्या नव्या घराची कायदेशीर कागदपत्रे पूर्ण करायची होती. आर्थिक वर्षाची अखेर होण्यापूर्वी हा व्यवहार करणे आवश्यक असल्यामुळे हे काम अतितुरत झाले होते. सरकारी कामासाठी लागणारे शुल्क भरण्यासाठी डिमांड ड्राफ्ट काढून आणले. गृहनिर्माणसंस्थेच्या कार्यालयाला गुढी पाडव्याची सुटी दिली नव्हती. या मुहूर्तावर मिळेल तेवढा व्यवसाय करून नफा मिळवण्याची संधी कोण सोडेल? गुढी पाडव्याच्या आधी चार पाच दिवसातील वर्तमानपत्रे गृहसंकुलांच्या जाहिरातींनी भरल्या होत्या. कांही वृत्तपत्रांनी तर खास रंगीत पुरवम्या काढल्या होत्या. आमच्या बिल्डरने तर रस्त्यात मोठे फलक उभारले होते. ते पहात आम्ही ऑफीसात गेलो. प्राथमिक बोलणी, घरकुलाची निवड, जागेच्या भावाची घासाघीस, आगाऊ रक्कम देणे वगैरे झालेलेच होते. त्यानंतर सर्व ग्राहकांच्या नांवाने व्यवस्थित फोल्डर तयार करून ठेवलेले होते. मुलाच्या नांवाचा फोल्डर काढला. त्यात प्रत्येकी पन्नास तरी पाने असलेला करारनामा केलेला होता आणि त्यातील प्रत्येक पानाच्या चार चार प्रती होत्या. एक बिल्डरसाठी, एक ग्राहकासाठी, एक बँकेसाठी आणि एक सरकारजमा करण्यासाठी. या करारनाम्यावर जवळजवळ प्रत्येक पानावर सही करायची होती. यातला सर्व मजकूर मी वाचला आहे आणि मला तो समजला आहे असेसुध्दा एका पानावर लिहिलेले दिसले. प्रत्यक्षात मात्र कोणीही हे करत नव्हते, किंवा तशी अपेक्षाच नव्हती. प्लँटचा नंबर, क्षेत्रफळ, किंमत आणि आपले नाव, पत्ता एवढ्या गोष्टी तपासून बाकीच्या कागदांवर धडाधड सह्या ठोकल्या, तरीसुध्दा ते आटपायला दोन तास लागले.

कागदोपत्री करारनामा झाला असला तरी अजून थोडे बांधकाम व्हायचे शिल्लक असल्यामुळे लगेच गृहप्रवेश करणे शक्य नव्हते. शहराबाहेर असलेल्या त्या नव्या वसाहतीच्या कांही भागात अनेक कुटुंबे रहायला आलेली होती आणि उरलेल्या भागात नवी घरे बांधली जात होती, त्यात आमचा फ्लॅट होता. ऑफिसातले काम संपल्यावर तो पहायला गेलो. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर एक लहानशी पूजा केली. त्यासाठी देवांच्या तसबिरी, हळदकुंकू, फुले, नैवेद्य वगैरे सगळे बरोबर नेले होतेच. नळाला पाणी मिळाले. तेही नसते तर पिण्यासाठी नेलेल्या बिसलरीच्या बाटलीमधून घेतले असते. घटकाभर बसण्यासाठी सतरंजा नेल्या होत्या, पण पंखे लावले गेले नसल्यामुळे उकाडा असह्यच वाटत होता, शिवाय पोटपूजा करण्यासाठी तिथे कांही सोय नव्हती. त्यामुळे घराचे निरीक्षण आणि वेगवेगळ्या खिडक्या आणि बाल्कन्यांमधून दिसणा-या व्ह्यूजचे कौतुक करून झाल्यावर झटपट पूजा आरती करून परत आलो. नवे काम अंगावर घेतले असल्यामुळे मला पुण्याला थांबता आले नाही. खरे तर त्याच दिवशी बडोद्याला जायचे तिकीटही हातात आले होते, पण मी ते रद्द करायला लावले. तरी मुक्कामाला मुंबईला परतणे भाग होते.

दुसरे दिवशी सकाळी, म्हणजे भल्या पहाटे उठून विमानाने बडोदा गांठले. पुढले तीन दिवस ऑफीसात बसून ड्रॉइंग्ज आणि स्पेसिफिकेशन्स पाहणे, कारखान्यांना भेटी देऊन तिथे असलेली यंत्रसामुग्री पाहणे, त्यावर चर्चा आणि वादविवाद करणे यात गेले. ठरलेले काम संपवून परत आलो. आठवडाभरच्या गैरहजेरीत पोस्टाच्या डब्यात अनेक बिले येऊन पडली होती आणि ईमेलचे डबे संदेशांनी भरले होते. ते पाहून त्यांची सोय किंवा विल्हेवाट करण्यात एक दिवस चालला गेला.

मराठी नववर्षाची सुरुवातही अशी धामधुमीत गेली. संकेतस्थळांवर भ्रमण करतांना "या वर्षी तुम्ही काही वेगळे काम करून संपत्ती मिळवाल" असा होरा कोणीतरी दिलेला वाचला आणि थक्क झालो. छापलेले भविष्य इतके खरे झालेले मी पहिल्यांदाच पहात होतो.

No comments: