Tuesday, March 09, 2010
पंपपुराण भाग १०
वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून त्याच्या परीघाला जोडणा-या सरळरेषेला इंग्रजीत रेडियस असे म्हणतात आणि त्या रेषेने दर्शवलेल्या दिशेला रेडियल डायरेक्शन असे संबोधित केले जाते. उदाहरणार्थ, सूर्यापासून निघालेले सूर्यकिरण रेडियली सर्व बाजूंना जात असतात. सेंट्रिफ्यूगल पंपाच्या इंपेलरच्या केंद्रापाशी असलेले पाणी असेच रेडियल दिशेने त्याच्या परीघाच्या पलीकडे ढकलले जात असते, असे आतापर्यंत दिलेल्या उदाहरणांवरून पाहिले. कांही पंपांची रचना थोडी वेगळी असते.
आपल्या घरातला सीलिंग फॅन छताला आणि जमीनीला समांतर अशा आडव्या प्लेनमध्ये फिरत असतो, पण त्याने निर्माण केलेला वारा मात्र त्याच्या काटकोनात वरून खाली येतो. मोटर लाँच आणि आगबोटीला जोडलेले प्रोपेलर गोल फिरता फिरता पाण्याला दूर ढकलतात आणि त्याच्या प्रतिक्रियेमुळे ती नौका पुढे सरकते. याच तत्वाचा उपयोग पाणी पुरवण्यासाठी कांही पंपांमध्ये केला जातो.
नेहमीच्या साध्या सेंट्रिफ्यूगल पंपात येणारे पाणी जलाशयामधून निघून एका नलिकेद्वारे इंपेलरच्या केंद्राजवळ पोचते. त्या वेळी त्याचा प्रवाह पंपाच्या अक्षाशी समांतर म्हणजे अॅक्शियल असतो. इपेलरमध्ये तो रेडियल बनून केसिंगमध्ये जातो आणि तिथून टँजन्शियल दिशेने तो पंपाच्या बाहेर पडतो. अशा रीतीने तो सतत आपला मार्ग बदलत असतो. अॅक्शियल फ्लो या प्रकारच्या पंपात तो न बदलता अॅक्सियलच राहतो. या पंपातील इपेलरची रुंद आकाराची पाती इंपेलरच्या रिंगला तिरकस करून जोडलेली असतात. इंपेलर फिरू लागला की ही पाती त्यांच्या मागे असलेले पाणी पुढे ढकलतात. अर्थातच ते पाणी पात्यांसोबत गोल फिरतच पुढे जाते, पण केसिंगचा आकार असा दिलेला असते की परीघाकडे जाण्यापेक्षा पुढे जाण्याकडेच त्या पाण्याचा ओढा जास्त असतो.
जेंव्हा पाण्याला विवक्षित उंची गाठायची नसेल आणि त्याच्या प्रवाहात अडथळे नसतील तर तो प्रवाह निर्माण करण्यासाठी जास्त दाबाची गरज पडत नाही. अशा प्रकारे कमी दाब आणि मोठा प्रवाह पाहिजे असेल तर त्यासाठी अॅक्शियल इंपेलरचा उपयोग केला जातो. मिक्स्ड फ्लो इंपेलरचा उपयोग करून अॅक्शियल आणि रेडियल या दोन्ही प्रकारांचा थोडा थोडा लाभ उठवला जातो. यातली पाती रुंदीला थोडी कमी असतात आणि त्यांचा तिरकसपणाचा कोनही वेगळा असतो.
. . . . . . . . . . . (क्रमशः)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment