Wednesday, March 03, 2010
पंपपुराण भाग ८
पंपाचा विचार करतांना तो दर मिनिटाला अमूक इतके लीटर पाणी पुरवू शकतो एवढी माहिती पुरेशी नसते. तेवढे पाणी त्याने किती मीटर उंच उचलले जाऊ शकते हे सुध्दा महत्वाचे असते. या दोन्ही संख्यांचा गुणाकार करून त्या पंपाच्या कार्यशक्तीची कल्पना येते. एकच विशिष्ट पंप जास्त उंचीवर कमी पाणी चढवू शकतो आणि कमी उंचीवर जास्त पाण्याचा पुरवठा करू शकतो, पण या दोन गोष्टी अगदी व्यस्त प्रमाणात नसतात. दर मिनिटाला दोनशे लीटर पाणी वीस मीटर उंचावर पोचवणारा पंप वीस लीटर पाणी दोनशे मीटर उंच उचलू शकत नाही. कदाचित पंचवीस तीस मीटरच्या वर पाण्याचा एक थेंबसुध्दा जाणार नाही. याचप्रमाणे पाण्याला खूप अधिक दाब देऊ शकणारा पंप कमी दाबावर फार मोठा प्रवाह उत्पन्न करू शकत नाही. पण कोणताही ठराविक पंप किती दाबाचा किती प्रवाह निर्माण करू शकतो हे समजून घेता येणे शक्य तसेच आवश्यक असते.
नवीन उत्पादन बाजारात आणतांना त्याचा एक नमूना तयार करून त्याचे टाइप टेस्टिंग करतात. यासाठी त्या पंपाला जोडलेल्या नळाला एक प्रेशर गेज, फ्लोमीटर आणि व्हॉल्व्ह जोडून ते पाणी त्यांच्यावाटे पुन्हा जलाशयात सोडले जाते. हा व्हॉल्व्ह पूर्णपणे बंद केला की पाइपमधून पाणी वाहण्याचा मार्ग बंद होतो. त्यामुळे इंपेलरने केंद्रामधून बाहेरच्या बाजूला ढकललेले पाणी पंपाच्या बाहेर पडू शकत नाही, ते पंपाच्या आंतच बंदिस्त राहते आणि त्यामुळे पंपाच्या आतील पाण्याचा दाब वाढतो. त्यानंतर इंपेलरमुळे आंतले पाणी जागच्या जागीच घुसळले जाते. इतर प्रकारची बहुतेक यंत्रे अशा प्रकारचा अडथळा आल्यास बिघडतात, पण सेंट्रिफ्यूगल पंप निदान कांही काळ तरी सुरळीतपणे पाणी घुसळत राहतो. त्यामुळे पाणी तापते आणि तपमान वाढल्यामुळे वेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होतात, शिवाय त्यात ऊर्जेचा अपव्यय होतो, या कारणांमुळे मुद्दाम कोणी हा पंपही निष्कारण असा चालवू नये, पण चांचणी घेण्यासाठी तो तसा चालवला जातो आणि त्याने कांही नुकसान होत नाही. पंपामुळे निर्माण होणारा हा पाण्याचा अधिकतम दाब असतो, पण तो प्रत्यक्ष व्यवहारात कुठल्याही कामाचा नसतो. फक्त पंप आणि पाइप वगैरेंच्या डिझाईनच्या आंकडेमोडीसाठी हा आकडा विचारात घ्यावा लागतो.
त्यानंतर तो व्हॉल्व्ह थोडासा उघडला की त्यातून पाण्याचा प्रवाह सुरू होतो आणि पाण्याला वाहण्यासाठी वाट मिळाल्यामुळे त्याचा दाब कमी होतो. त्या प्रवाहाचे प्रमाण तसेच त्यावेळी असलेला पाण्याचा दाब हे दोन्ही वेगवेगळ्या उपकरणांमार्फत मोजून त्याची नोंद ठेवतात. जसजसा व्हॉल्व्ह अधिकाधिक उघडला जातो तसतसा पाण्याचा प्रवाह वाढत जातो आणि दाब कमी होत जातो. तो पूर्णपणे उघडल्यानंतर जेवढा प्रवाह त्यातून निघेल त्याहून जास्त मिळू शकत नाही. ही अधिकाधिक क्षमतासुध्दा क्वचितच उपयोगी पडते. पाण्याचा प्रवाह आणि दाब मोजत असतांनाच त्यासाठी किती वीज खर्च झाली याचीही मोजणी करून पंपाची कार्यक्षमता ठरवली जाते. जास्तीत जास्त कार्यक्षमता ज्यायोगे मिळेल अशा प्रकाराने पंपाचा उपयोग करणे शहाणपणाचे असते. ही सगळी मोजमापे आणि निष्कर्ष तक्त्यात मांडून ठेवली जातात आणि त्यांचा आलेख काढला जातो. याला पंप कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतात. पंपाची निवड करण्यापासून तो कशा प्रकारे चालवायचा हे ठरवण्यापर्यंत अनेक प्रसंगी त्याचा उपयोग होतो.
असा एक आलेख वरील चित्रात दाखवला आहे. एकाच प्रकारच्या तीन वेगवेगळ्या साइझच्या तीन वक्ररेषा यांत दिसतात. जसजसा साइझ वाढेल त्यानुसार त्या पंपातून अधिक दाब निर्माण होऊ शकतो. ज्या सर्किटमध्ये पाण्याचा प्रवाह जात असतो त्यात असलेल्या पाइपलाइनी, त्यातील चढ-उतार, वळणे, व्हॉल्व्ह, मीटर वगैरे सर्वांमुळे प्रवाहाला जो अडथळा होतो त्यामुळे जास्त प्रवाहासाठी जास्त दाबाची गरज पडते. प्रवाह आणि दाब यांच्यामधला परस्परसंबंध लाल रंगाच्या दोन सिस्टीम कर्व्हमधून दाखवला आहे. लाल आणि काळ्या रंगांमधल्या वक्ररेषा ज्या बिंदूशी एकमेकींना छेद देतात त्याला ऑपरेटिंग पॉइंट म्हणतात. त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये पंपातून पाण्याचा किती प्रवाह वाहेल आणि त्यासाठी पाण्याचा किती दाब निर्माण होईल या गोष्टी हा बिंदू दर्शवतो.
. . . . . . . . . . . (क्रमशः)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment