Monday, December 09, 2013

विक्रांत, वस्तुसंग्रहालय आणि त्यावरील चर्चा

विक्रांतच्या लिलावाबद्दलचा लेख मी मिसळपाव या संकेतस्थळावर दिला होता. या वेळी माझ्या लेखाला बरेच वाचक लाभले आणि त्यांनी अनेक प्रतिसादसुद्धा दिले. आपल्या देशाच्या नौदलाच्या इतिहासातला मैलाचा दगड असलेली विक्रांत ही बोट भंगारात जाऊन तिची तोडमोड होऊ नये असेच बहुतेक सर्वांना वाटत असावे असे दिसले. त्यातल्या काही जणांनी 'कालाय तस्मै नमः' म्हणून प्राप्त परिस्थिती मान्य केल्याखेरीज गत्यंतर नाही हे मान्य केले तर काही जणांनी भारतातले केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातले राज्य सरकार व ते चालवणारे राजकारणी यांच्यावर तोंडसुख घेण्याची संधी साधून घेतली.  काही लोकांना 'जुने जाऊ द्या मरणालागुन' ही शिकवण आठवली. अशा एका वाचकाने लिहिलेः
"आता कधी तरी असल्या वस्तू नष्ट कराव्या लागतीलच की. ब्रह्मास्त्र , रामाचा बाण .... ते विक्रांत .. सगळं स्टोअर करत बसलं तर लोकाना समुद्रात रहायला जावं लागेल. "
त्यावर माझे उत्तर असे होतेः
ब्रह्मास्त्र , रामाचा बाण यासारखी शस्त्रास्त्रे एकदा वापर केल्यानंतर आपोआप नष्ट होत असतात. तोफेमधून उडालेले गोळे सुद्धा सहसा कोणी जपून ठेवत नाहीत. बंदुकीच्या किंवा पिस्तुलाच्या गोळ्या शोधून काढून मिळाल्या तर न्यायालयात पुरावा म्हणून दाखवण्यापुरत्या ठेवल्या जातात. विक्रांत त्या कॅटेगरीमध्ये येत नाही. त्याची एक्स्पायरी डेट निघून गेली असली तरी त्याच्या आठवणींचे आयुष्य अजून दहा वीस वर्षे शिल्लक असावे. त्यानंतर कदाचित कोणाला काही वाटणार नाही. पण माणसाचे मन थोडे विचित्र आहे. त्याला काल परवाच्या वस्तू जुन्या म्हणून फेकून द्याव्याशा वाटतात, पण दहा वीस हजार वर्षांपूर्वी जगून आणि मरून गेलेल्या अनामिक लोकांची गाडगी मडकी आणि लाखो वर्षांपूर्वी जगून आणि मरून गेलेल्या अनामिक लोकांची हाडे आणि कवट्या पाहून त्याल कसला आनंद मिळतो कोण जाणे.

डॉ.सुबोध खरे यांनी काही काळ विक्रांत या जहाजावर काम केले होते. त्यांनी अत्यंत सविस्तर आणि विचारपूर्वक असा प्रतिसाद दिले. त्यातला मुख्य भाग असा होता.

विक्रांतचे संग्रहालय बनवून एक इतिहासाचा वारसा जपून ठेवावा या बद्दल कोणतेच दुमत नाही. परंतु त्यात येणारे वेगवेगळे प्रश्न असे आहेत. नौदलाच्या गोदीत जागा नाही. नवीन येणाऱ्या विक्रमादित्य अगोदर असणा-या विराट या दोन युद्धनौका ठेवायच्या असतील तर विक्रांतला दुसरी जागा देणे आवश्यक आहे. ही जागा महारष्ट्र सरकारने देणे आवश्यक आहे. कारण मुंबई बंदरात किंवा न्हावा शेवा मध्ये जागा नाही. जर तिला दुसरी जागा तयार करायची असेल तर त्या जागेला जाण्यासाठी पायाभूत सुविधा म्हणजे गोदी/जेटी, त्याला जोडणारा रस्ता ई पायाभूत सुविधा आवश्यक आहेत. यासाठी येणारा खर्च २००२ साली चारशे पन्नास कोटी होता हा पैसा उभा करणे आपल्या कल्याणकारी राज्याला (जे अगोदरच कर्जात बुडालेले आहे असे ऐकतो) शक्य झाले नाही. एवढा पैसा टाकून त्याचे संग्रहालय उभारणे हे खाजगी संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न केले गेले पण त्याला येणारा खर्च आणी त्यातून मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ जमेना म्हणून कोणतीही खाजगी संस्था त्याला तयार झाली नाही. नौदलाने आपला इतिहासाचा वारसा जपण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु काही दिवसात येणाऱ्या विक्रमादित्य या जहाज साठी जागा रिकामी करणे निकडीचे आणि तातडीचे झाल्याने ती भंगारात विकण्याचा निर्णय शेवटी घेतला गेला. नौदलाला विक्रांत केवळ चालू ठेवण्यासाठी वर्षाला बारा कोटी रुपये खर्च येत होता. आणि त्यावर कमीत कमी पस्तीस माणसे हिच्या बंद स्थितीतहि यासाठी लागतात. यात हे जहाज गेली कित्येक दशके समुद्राच्या खा-या पाण्यात उभे असल्याने गंजाचे प्रमाण अफाट आहे. त्यामुळे एवढ्या अवाढव्य जहाजाला दर सहा महिन्यांनी रंग लावावा लागतो. त्याच्या आतील कक्षात विजेचे दिवे चालू ठेवावे लागतात यासाठी वीज लागते. मध्येच वीज गेली तर ताबडतोब पर्यायी व्यवस्था उपलब्ध होण्यासाठी कमीत कमी एक जनित्र चालू ठेवावे लागते त्याल लागणारा डीझेलचा खर्च असे अनेक खर्च (आग लागली तर आग विझवायला लागणाऱ्या बाटल्या रिचार्ज करणे, पिण्याचे पाणी भरणे त्याच्या टाक्या साफ ठेवणे ई ई ) आणि शेवटी त्या पस्तीस माणसांच्या मनुष्यबलाचा खर्च. हे सर्व प्रकरण हाताबाहेर जाऊ लागल्याने नाईलाजाने ती भंगारात विकण्याचा निर्णय घेण्यात आला.

जहाज पाण्यात उभे असते तेंव्हा त्याला गंज लागणे ही कायम चालू असणारी प्रक्रिया आहे. पावसाळ्यानंतर पडणा-या पावसाने गंजाचे ओघळ जहाजाच्या बाह्य पृष्ठभागावर दिसतात. तसे दिसू नयेत म्हणून त्यावर लगेच रंग लावावा लागतो. दोन वर्षात रंगाचा एक थर जमा होतो तो ठोकून काढून टाकावा लागतो आणि नवा रंग लावावा लागतो. जहाजावर असणारे सगळे खिळे स्क्रू नट बोल्ट हे पितळेचे असावे लागतात कारण लोखंडाचे स्क्रू गंजून घट्ट होतात आणि नंतर उघडत नाहीत. आता हे पितळेचे स्क्रू सुद्धा त्यःची चमक जाऊ नये म्हणून त्यावर ब्रासो लावून दर एक दिवसा आड पॉलिश करावे लागते. पाण्याची टाकी लोखंडाची असल्याने तिच्या तळाशी गंज जमा होतो तो दर दोन वर्षांनी साफ करावा लागतो. असा रोजच करावा लागणारा मेंटेनन्स वर्षनुवर्षे करणे फार जिकीरीचे असते.

यानंतर एकदा मी स्पष्टपणे म्हटले होते कि विक्रांत संग्रहालय करणे महाराष्ट्र सरकारला झेपत नसले तर ती विकून टाकणे योग्य होईल. यावर तेथे गरमागरम चर्चा झाली. मी शांतपणे म्हटले कि आपले आपल्या वडिलांवर कितीही प्रेम असले तरी त्यांचा पार्थिव देह आपण कवटाळून ठेवत नाही. त्याचे योग्य अंत्य संस्कार करावेत आणि एक सुंदर स्मारक बांधावे. असेच विक्रांतचे स्मारक जमिनीवर बांधा म्हणजे त्याला अवाढव्य खर्च येणार नाही आणि त्याला सुस्थितीत ठेवण्यासाठीसुद्धा एवढा खर्च होणार नाही. त्यात विक्रांतचे असलेले सर्व फोटो किंवा स्लाईड शो दाखवावा. अंदमानच्या सेल्युलर जेल मध्ये दाखवतात तसा.
सैनिकांचे मोठे स्मारक बांधण्यापेक्षा त्यांच्या मुलांच्या पुढच्या शिक्षणाची सोय करून द्यावी. त्यांच्यासाठी वसतिगृहे किंवा तत्सम सोयी उपलब्ध कराव्यात. असा एक पर्यायही त्यांनी सुचवला होता.

श्री.खरे यांनी सुचवलेल्या स्मारक किंवा मुलांसाठी सोयी या कल्पनांना कांही वाचकांनी अनुमोदन दिले.

यावर मी थोडा विचार करून मला जे वाटले ते असे व्यक्त केले.
मुंबईतल्या लहान घरातसुध्दा ठेवायला जागा नाही म्हणून आपल्याला अनेक गोष्टी अनिच्छेने देऊन टाकाव्या लागतात आणि त्या घेणारा भेटला नाही तर त्या टाकून द्याव्या लागतातच. त्या वस्तूंबद्दल असलेले ममत्व त्या वेळी सोडून द्यावे लागतेच. याची मला कल्पना आणि भरपूर अनुभव आहे. मी सेवानिवृत्त होईपर्यंत अनेक वर्षे सरकारच्या कृपेने आलीशान निवासस्थानात रहात होतो. त्यामुळे हौसेने घेतलेल्या किंवा निरनिनिराळ्या ठिकाणांहून आणलेल्या अनेक शोभेच्या वस्तू, प्रियजनांनी दिलेल्या भेटवस्तू वगैरे वर्षानुवर्षे जमा करून ठेवलेल्या वस्तू तिथे पडून राहिलेल्या होत्या. त्या प्रत्येक वस्तूबरोबर काही सुहृदांच्या किंवा प्रसंगांच्या आठवणी निगडित होत्या. ती जागा सोडून टूबीएचकेच्या फ्लॅट्मध्ये येतांना सगळे सामान बरोबर आणले असते तर फक्त ते सामान ठेवायलासुद्धा पुरेशी जागा माझ्याकडे नव्हती. त्यामुळे पुढील जीवनासाठी आवश्यक तेवढ्याच वस्तू ठेवून घेऊन बाकीच्या सगळ्या वस्तू सोडून द्याव्या लागल्याच. याचप्रमाणे आता नेव्हीची मजबूरी मान्य व्हायलाच हवी.

लिलावात बोली करण्याएवढे पैसे ज्यांच्या कडे असतील ते काही योजना आखतीलच. समुद्रकिनार्‍यावर जागा घेऊन या जहाजाला पाण्यात ठेवणे महाग पडत असेल तर एकादी ड्राय डॉक बांधून तिथे ही बोट ठेवता येणे शक्य असावे. रेल्वेची ईंजिने आणि विमाने हॉलमध्ये मांडून ठेवलेली मी अनुक्रमे इंग्लंड आणि अमेरिकेत पाहिली आहेत. हे जहाज कोणाला विकायचे हे ठरवतांना तो बिडर त्याचे काय करणार आहे हे देखील पहायला हवे आणि चार पैसे जास्त मिळतील म्हणून ते शिपब्रेकिंगला देऊ नये. त्या बाबतीत आपल्या अकौंटंट आणि ऑडिट्वाल्या मंडळींनी सूट द्यायला हवी असे मला वाटते.

व्यवहारी जगामध्ये टिकून रहायचे असल्यास प्रत्येक कार्याचा ताळेबंद (बॅलन्सशीट) ठेवावाच लागतो. देशाचे संरक्षण करणे हे नौदलाचे मुख्य काम आहे. नेव्हल डे साजरा करणे वगैरे काही नैमित्यिक कामे त्याबद्दल जनतेला माहिती व्हावी यासाठी लहान प्रमाणात केली जातात. इतिहासाची जपणूक करणे हे काम नागरी संस्थांचे आहे. त्याचा आर्थिक तसेच प्रशासकीय बोजा संरक्षण दलावर पडणे योग्य नाहीच. या मुद्यावर दुमत असायचे कारण नाही.
मी स्वतः इंजिनियर असल्यामुळे कुठल्याही यंत्राचा मेंटेनन्स थांबवून त्याची रिप्लेसमेंट करावी लागते आणि असे निर्णय घेणे त्या क्षणी भावनिक दृष्ट्या किंचित अवघड वाटले तरी तांत्रिक कारणांमुळे ते घेणे किती आवश्यक असते याचे मला भान आहे. विक्रांतच्या जागी विराट आली आणि तिचेही दिवस संपत आले आहेत, आता विक्रमादित्य आली आहे आणि नवी विक्रांत बांधायला घेतली आहे. हे सगळे आवश्यकच आहे आणि याला पर्याय नाही. याबद्दलही कसला वाद नाही.

निकामी झालेल्या विक्रांतचे पुढे काय करायचे यावरच मतभेद आहेत. मी नोकरीत असतांना कारखान्यातल्या जुन्या यंत्रांची कशी विल्हेवाट लावायची यावर सविस्तर अभ्यास करून त्यासंबंधी माझे विचार मांडलेले आहेत, वेळोवेळी त्यासंबंधी निर्णयसुद्धा घेतले आहेत. पण भावनात्मक कारणामुळे विक्रांतबद्दल 'डिस्पोजल' हा शब्द वापरायला मन थोडे कचरते. मृत व्यक्तींबद्दल बोलायचे झाल्यास अगदी अपवादास्पद परिस्थितीमध्ये त्यांचे शरीर ममी करून जपून ठेवले जाते, पण सामान्यपणे ते शक्य नसते. मानवाचे शरीर हा निसर्गाचाच भाग असल्यामुळे त्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था निसर्गाने केलेली आहे. त्या प्रक्रियेमध्ये गिधाडांसारखे पक्षी (तेही आता दुर्मिळ झाले आहेत) त्या देहाचे लचके तोडतात, मुंग्यांसारखे कीटक त्यातले कण कण वेचून नेतात आणि काही सूक्ष्म जीवजंतू (बॅक्टीरिया) त्याला सडवून त्यातून मिथेन वायू निर्माण करतात वगैरे वगैरे. मृत व्यक्तीबद्दल आपल्या मनात असलेल्या भावनांमुळे (पारशी समाज वगळता) आपल्याला ते सगळे नैसर्गिक असले तरी पहावले जात नाही. त्यामुळे त्या व्यक्तीच्या निर्जीव देहाचे दहन, दफन वगैरे करून त्याला नजरेआड केले जाते.

विक्रांत हे जहाज निर्जीव असले तरी त्याच्याशी भावनात्मक धागेदोरे जुळलेले असल्यामुळे ते भंगारात विकले गेल्यानंतर त्याला गॅस टॉर्चने आडवे उभे कापून आणि त्याच्यावर घणाचे घाव घालून छिन्नविछ्छिन्न केले जाणे, ते तुकडे भट्टीत टाकून त्यांना वितळवणे वगैरेच्या विचाराने अस्वस्थता वाटणार. हे जहाज कुठल्या तरी सागर किना-यावर असेच सोडून दिले किंवा एकाद्या सुरक्षित जागी त्याला जलसमाधी दिली तर समुद्राच्या खा-या पाण्याने त्याचे जे काय व्हायचे ते होईल, पण ते डोळ्यासमोर असणार नाही. हजारो टन पोलाद अशा प्रकारे वाया घालवणे शहाणपणाचे नाही असा विचार कदाचित मनात येणार नाही.

या जहाजाला नष्ट न करता आहे त्या रूपामध्ये समुद्रात तरंगत ठेवणे, त्यावरील विमानांना उडतांना आणि उतरतांना पाहता येणे हे सर्वात चांगले. सैन्यदलाच्या कामगिरीसाठी नाही, पण पर्यटकांना पाहतांना आनंद देण्यासाठी हे करता येणे शक्य असल्यास उत्तमच. ते परवडण्यासारखे नसेल तर त्या जहाजाला जमीनीवर आणून ठेवले तर गंज लागून ते हळूहळू क्षीण होत जाईल, पण बुडण्याची भीती राहणार नाही. त्याला एकादा स्वस्तातला रंग लावला तरी काही दशके तरी ते टिकू शकेल. तोपर्यंत सध्याची माणसांची पिढी काळाआड जाईल. त्यानंतर त्या नौकेचे काही का होईना याचे सोयरसुतक तेंव्हाच्या पिढीतल्या लोकांना वाटणार नाही.
स्वर्गवासी झालेल्या महान व्यक्तींच्या स्मारकांची दुरवस्था पाहता त्यात निर्जीव वस्तूंच्या स्मारकांची भर घालावी असे मला तरी अजीबात वाटत नाही. स्मारक असे नाव न देता, विक्रांतचे फोटोग्राफ, मॉडेल्स वगैरे जतन करून ठेवावेत, त्याची प्रदर्शने भरवावीत, त्याची वेबसाईट बनवून ती अपडेट करत रहावे वगैरे अगदी कमी खर्चाची कामे करायला हरकत नाही. कदाचित ती होतही असतील तर त्यांना प्रसिद्धी मिळायला हवी.

विक्रांतचे रूपांतर वस्तुसंग्रहालयात करावे या विचाराला बहुसंख्य लोकांचा पाठिंबा असावा असे दिसते. यासाठी लागणारा खर्च सव्वाशे कोटी आहे की पाचशे कोटी की अधिक हे तिथे नेमके काय काय करायचे यावर अवलंबून आहे. तसेच त्यासाठी लागणारी जागा कुठली घ्यायची यावरही आहे. सरकारच्या अंदाजपत्रांचे जे लक्षावधी करोडोंचे आकडे आपण वाचतो त्यामानाने हा खर्च फार जास्त वाटत नाही. पण नुसता खर्च केला आणि विक्रांतला भंगारात जाण्यापासून वाचवले तर त्याला फारसा अर्थ नाही. ते वस्तुसंग्रहालय प्रेक्षणीय झाले, ते पहावे असे लोकांना वाटले आणि काही काळ तरी ते पहाण्यासाठी लोकांनी गर्दी केली तर तो खर्च सत्कारणी लागेल आणि त्यातला काही भाग वसूल सुद्धा होईल.

मागे एकदा नेव्ही डेच्या दिवशी उन्हातान्हात तासनतास रांगेमध्ये उभे राहून मी एक युद्धनौका पाहिली होती. त्या वेळी आम्हाला फक्त डेकवरून पाच मिनिटे फिरवून परत पाठवले होते. इंजिनरूम, होल्ड्स, आर्मामेंट्स किंवा डेकवरल्या इतर खोल्यासुद्धा कुलुपात बंद ठेवल्या होत्या. सुरक्षेच्या दृष्टीने हे आवश्यक होते. पण यामुळे मला तरी काहीच पाहिल्यासारखे वाटले नाही. या कारणानेच मध्यंतरी विक्रांत या मोठ्या जहाजाला पहाण्याची संधी ठेवलेली असतांना सुद्धा ती घ्यावी असे आवर्जून वाटले नव्हते. तो अनुभव आठवून या दृष्टीने विचार केला तर जाणवले की जहाजाची रिकामी डेक अजीबात आकर्षक नसते. पैसे आणि वेळ खर्च करून ती पहायला लोक येणार नाहीत आणि आले तरी निराश होतील, आणखी कोणाला तिकडे जायची शिफारस करणार नाहीत.

परदेशातली काही म्यूजियम्स पाहितांना मला जाणवले की पर्यटकांना रिझवण्यासाठी तिकडे किती गोष्टी केल्या जातात. तिथे ठेवलेल्या वस्तूंची निवड, त्यांची मांडणी, प्रकाशयोजना, त्यांच्या सोबत लावलेले स्पष्ट वाचता येण्याजोगे आणि थोडक्यात माहिती देणारे सुबक फलक, याशिवाय जागोजागी ठेवलेले काँप्यूटर टर्मिनल्स, त्यावर अधिक मनोरंजक माहिती देणारे इंटरअॅक्टिव्ह आणि ऑडिओव्हिज्युअल प्रोग्रॅम्स, काही जागी काही वेळा होत असलेले लाइव्ह शोज, फिल्म शोज, लहान मुलांच्या मनोरंजनासाठी खास व्यवस्था, थोडा वेळ बसून विश्रांती घेण्याच्या तसेच खाण्यापिण्याच्या उत्कृष्ट सोयी, फोटोग्राफीला बंदी वगैरे न घालता देण्यात येणारे प्रोत्साहन या सगळ्यामुळे तिथून बाहेर पडावेसे वाटत नाही आणि शक्य असल्यास तिथे पुन्हा पुन्हा जावेसे वाटते. बाहेर जाण्याच्या वाटेवर सॉव्हेनिर्सची दुकाने असतात आणि त्यात लहान लहान मॉडेल्सपासून ते चित्रमय रुमाल, पिशव्या, टोप्या, टीशर्ट्स आणि काहीकाही ठेवलेले असते. आठवण म्हणून त्यातले काही तरी विकत घेतले जाते आणि घरात ठेवले जाते.

विक्रांतचे रूपांतर वस्तुसंग्रहालयात करण्याची संधी खरोखरच कुणाला मिळाली आणि त्यात अशा काही गोष्टी केल्या तर ते प्रेक्षणीय होईल आणि ते करण्यात घातलेले पैसे आणि श्रम कारणी लागतील.


डॉ.सुबोध खरे यांनी यावर लिहिले होते
मी विक्रांतवर असताना तेथील विजेच्या तारांची लांबी सत्तर हजार किमी आहे असे ऐकले होते. आता इतक्या मोठ्या प्रमाणावर असलेले तांबे शिवाय प्रत्येक पितळेचा नट बोल्ट ई गोष्टी काढून जर पुन्हा तशाच किंवा धातू म्हणून वापरता आल्या तर ते एका पिढीच्या दर्शनासाठी फुकट घालवण्यापेक्षा चांगले. केवळ पोलादच नव्हे तर अनेक उत्तम लाकडाच्या वस्तू आणी फर्निचर सुद्धा तसेच वाया घालवणे कदाचित बरोबर नाही.

पण हे मुद्दे मला तितकेसे महत्वाचे वाटत नाहीत. तांबे किंवा पितळ या धातूंपासून विजेच्या तारा (वायरी) किंवा नटबोल्ट वगैरे तयार करण्यात येणारा खर्च खूप जास्त असतो. या गोष्टी एका ठिकाणाहून काढून जशाच्या तशा दुसरीकडे वापरणे बहुतेक वेळा अशक्य किंवा असुरक्षितपणाचे धोकादायक असते. यामुळे इंडस्ट्रीमध्ये तसे कधीच केले जात नाही. त्यातल्या मूळ धातूची भंगारात मिळणारी किंमत अगदी नगण्य असते. हा अनुभव सर्वांनी घेतला असेल.

या लेखावर आलेले आणखी काही प्रतिसाद असे होते.

जगातली ५०% मोडीत निघालेली जहाजे ही भंगार स्वरूपात गुजरातमध्ये येतात. अलंग शिपयार्ड मध्ये त्यांना मोडीत काढून रिसायक्लींग, हॅझार्डस वेस्ट वगैरे वेगळे करणे चालते...

या बाबतीत इंग्लंड, फ्रान्स, इटली आदि युरोपियन देश आणि विशेषतः अमेरिका आपल्या खूप पुढे आहे. कुठलीही जुनी वस्तू आकर्षक रीतीने मांडून ती पहायला येणा-या लोकांच्या खिशामधून पैसे काढून घेणे त्यांना चांगले जमते पण आपल्याला ते तितकेसे जमत नाही. हे बरोबर आहे पण तरी देखील अमेरीकेसंदर्भात किंचीत असहमत. वॉशिंग्टन डिसी मधली स्मिथसोनियनची सगळी वस्तुसंग्रहालये ही जनतेसाठी मोफत आहेत. (माझ्या अमेरिका भ्रमणात मी तरी बहुतेक सगळ्या जागी १०-१५ डॉलर्स इतके प्रवेशमूल्य भरलेले आहे.) या सर्वच देशात (पक्षि: पाश्चात्यांमधे) इतिहासाचे दस्ताइवज अधिकृतपणे संग्रहीत करून ठेवायची पद्धतच नाही तर परंपरा आहे. दुर्दैवाने आपल्यातही ती जरी कधीकाळी असली तरी कुठेतरी वाटते की ब्रिटीशांच्या काळातील पारतंत्र्यात ती निघून गेली. जिथे वेगळी जागा न लागणारे किल्ले नीट ठेवले जात नाहीत तेथे विक्रांतची काय अवस्था

लिलावातून काय अगदी देशाच्या तिजोरीत फार मोठी भर पडेल इतके पैसे मिळतील असे नाही. त्यामुळे जर कोणी खरंच संग्रहालय करत असेल तर ते आर्थिकदृष्ट्या मानवण्यासाठी बोट कमी भावातही द्यायला हरकत नाही... किंबहुना तसेच करून संग्रहालयाच्या उत्तम असण्याबद्दलच्या अटी मान्य करून घ्याव्या असे मला वाटते. मात्र चलाखी करून आता कमी किंमतीत घेऊन नंतर अनावस्था करणार नाही किंवा भंगारात देऊन पैसे कमावणार नाही असे क्लॉजेस विक्री करारात टाकणे आवश्यक आहे.


"कोण मुर्ख ५०० कोटी गुंतवुन ५० वर्ष फीटायची वाट बघत बसेल?." ही गुंतवणूक किती आतबट्ट्याची आहे ?
विक्रांतचे स्मारक बनावे हा प्रश्न सुद्धा लाखो सैनिकांच्या श्रद्धेचा असू शकतो. मला असे कित्येक सैनिक माहित आहेत ज्यांनी आपल्या आयुष्याची तीस वर्षे विक्रांत आणि त्याची दुरुस्ती यार्ड यात सेवा करण्यात काढली आहेत.
-----------------------------------------------

No comments: