Wednesday, December 04, 2013

अरेरे, विक्रांत लिलावात चालली


इंग्रजी भाषेत एक म्हण आहे, "The King is dead, Long live the King!" (आधीचा) राजा मरण पावला, (नवा) राजा चिरायु होवो. "विक्रांत या विमानवाहू नौकेचा लवकरच भंगार म्हणून लिलाव होणार आहे" अशी बातमी आज नौदल दिनाच्या दिवशीच वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर होती आणि नव्याने तयार होत असलेल्या विक्रांत या महाकाय जहाजाचा उल्लेख नौदल दिवसाच्या खास पुरवणींध्ये होता. त्यावरून या म्हणीची आठवण झाली.

सुमारे पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे नोव्हेंबर १९६१ मध्ये या विमानवाहू नौकेचा समावेश भारतीय नौदलात दिमाखाने झाला होता. त्या वेळी मी कॉलेजमध्ये शिकायला सुरुवात केली होती. पण विक्रांतचे आगमन ही एक खूप मोठी घटना होती आणि तिचा प्रचंड गाजावाजा झाला होता हे अजून आठवते. दस्तुरखुद्द पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांनी या समारंभाला हजेरी लावली होती यावरून त्याला केवढे महत्व दिले गेले होते हे लक्षात येईल. या युद्धनौकेला ठेवलेले 'विक्रांत' हे नावही तेंव्हापासूनच कायमचे स्मरणात घर करून राहिले आहे. ही आगबोट इंग्लंडमधून आणली गेली होती आणि तिचे आय एन एस विक्रांत असे नामकरण व्हायच्या आधी तिला एचएमएस हर्क्युलस असे नाव होते असेही वाचले होते. त्यामुळे तिला बहुधा ब्रिटिश नेव्हीमधून त्यांच्या स्टँडर्डनुसार निरुपयोगी झाल्यामुळे रिटायर केल्यानंतर भारताच्या गळ्यात बांधले गेले असेल किंवा कदाचित तात्पुरते औदार्य दाखवून पुढे त्याचे स्पेअर्स वगैरेंचा व्यवहार करण्यासाठी बहाल केली असेल अशी अनेकांची कल्पना झाली होती. तो काळच असा होता की आधुनिक काळातली फारच कमी यांत्रिक उत्पादने भारतात होत असत आणि जी काही होत असत त्यातली बहुतेक उत्पादने परकीयांच्या सहाय्याने कोलॅबोरेशनमध्ये होत असत. येनकेनप्रकारेण काही तरी चांगल्या उपयोगी वस्तू पदरात पाडून घेणे एवढेच खूष होण्यासाठी त्या काळात पुरेसे असायचे. संरक्षण खात्याच्या सर्वच व्यवहारात कमालीची गुप्तता राखली जात असल्यामुळे त्याच्याकडे असलेल्या तोफा, रणगाडे, विमाने, आगबोटी वगैरेंच्या खरेदीच्या बाबतीत उघडपणे चर्चा होतही नसत आणि झाल्या तरी त्या समजून घेण्याइतपत मी मोठा झालो नव्हतो. त्यामुळे ही जुनी आठवण वर लिहिल्याइतपतच स्पष्ट होती. या आगबोटीवर विमाने ठेवलेली असतात आणि त्यांना हवेत उडवण्यासाठी किंवा खाली उतरण्यासाठी धावपट्ट्या (रनवे) तयार केलेल्या असतात यावरून तिच्या अवाढव्य आकाराची पुसटशी कल्पना येत होती. तोपावेतो मी कुठलेच विमानही पाहिलेले नसल्यामुळे ती कल्पनासुद्धा तशी धूसरच होती. नंतरच्या काळात अनेक वेळा बातम्यांमध्ये विक्रांतचे नाव आले आणि तिच्याबद्दल अधिकाधिक माहिती मिळत गेली. 

या नौकेचा भारतात येण्यापूर्वीचा इतिहाससुद्धा मनोरंजक आहे. १९४३ साली म्हणजे दुसरे महायुद्ध जोरात चाललेले असतांना इंग्लंडमधल्या एका प्रसिद्ध कारखान्यात या नौकेची बांधणी सुरू झाली. त्या महायुद्धात नौदल आणि विमानदलांनी खूप महत्याची कामगिरी बजावली होती. ते युद्ध फक्त युरोपच्याच भूमीवर नव्हे तर इतर खंडांमध्ये तसेच महासागरांमध्येसुद्धा लढले जात होते. विमानवाहू जहाज समुद्रात दूर नेता येते आणि तिथून शत्रूवर हवाई हल्ला करता येतो अशा दुहेरी सागरी युद्धासाठीच या खास प्रकारच्या आगबोटीची रचना केली होती. पण ऑगस्ट १९४५ मध्ये हे महायुद्ध संपले आणि ही बोट सप्टेंबर १९४५ मध्ये तयार झाली. तोपर्यंत युद्ध संपलेले होते आणि त्यात इंग्लंड विजयी झाले असले तरी त्या देशाची आर्थिक स्थिती खस्ता झाली होती. मनुष्यबळ खच्ची झाले होते. ज्या साम्राज्यावर कधीच सूर्य मावळत नाही अशी प्रौढी इंग्रज लोक मारत असत ते पंचखंडात अस्ताव्यस्त पसरलेले साम्राज्य सांभाळणे त्यांना अशक्य झाले होते. यानंतर एका पाठोपाठ एक करून बहुतेक सगळ्या देशांना स्वातंत्र्य देणे भाग पडणार आहे याची स्पष्ट कल्पना आली होती. तसे होणार असेल तर विस्तारलेले साम्राज्य सांभाळण्यासाठी उभे केलेले अवाढव्य आरमार उगाचच कशाला ठेवायचे? असा सूज्ञ विचार करून तशा प्रकारचे धोरण आखले गेले. यामुळे एचएमएस हर्क्युलस असे नाव ठेवले गेल्यानंतरसुद्धा या बोटीला शस्त्रसज्ज करण्याची कारवाई केली गेलीच नाही. १९४६ साली तिला गुपचुप आडबाजूला नेऊन ठेऊन दिले गेले.

मोठ्या युद्धनौकांची बांधणी हे सुद्धा अचाट काम असते. ही जहाजे हजारो टन वजनाची आणि प्रचंड आकाराची असतात. सर्वसाधारण आकाराच्या कारखान्यात हे काम करता येत नाही. जहाजबांधणी करता येण्याजोग्या विशाल कारखान्यांना सुकी गोदी (ड्राय डॉक) असे म्हणतात. समुद्राच्या किंवा मोठ्या नदीच्या किना-यावर उभारलेल्या एका सुक्या गोदीत आधी जहाजाचा सांगाडा (स्ट्रक्चर) रचून उभा करतात. विशिष्ट प्रकारच्या पोलादाच्या जाड प्लेट्सचे शेकडो तुकडे विशिष्ट आकारांमध्ये कापून आणि त्यांना हवा तेवढाच बाक देऊन जोडणीसाठी तयार करतात. हे सगळे तुकडे एकमेकांना आणि त्या सांगाड्याला वेल्डिंग करून जोडतात. सगळ्या भागांची जोडणी आणि निरीक्षण (इन्स्पेक्शन) पूर्ण झाल्यावर त्या रिकाम्या जहाजाला हळूहळू पाण्यात ढकलत नेतात. याला लाँच करणे म्हणतात. हा पहिला महत्वाचा टप्पा असतो. त्याच्या अनेक चाचण्या घेऊन ती बोट खवळलेल्या समुद्राच्या पाण्यात सुद्धा सुरक्षितपणे चालू शकेल याची खात्री करून झाल्यानंतर तिला पुन्हा ड्राय डॉकमध्ये नेऊन तिच्यावर यंत्रसामुग्री, शस्त्रास्त्रे वगैरे चढवतात. समुद्रात गेल्यानंतर त्या नौकेला महिनोंमहिने तिथे काढायचे असतात. त्या कालखंडात त्या नावेवर काम करणा-या खलाशांच्या सर्व गरजा पूर्ण करण्याच्या व्यवस्था ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे नौका चालवण्याची यंत्रसामुग्री, हल्ला किंवा बचाव करण्यासाठी ठेवलेल्या शस्त्रास्त्रांना चालवण्याची यंत्रणा आणि खलांशांना रहाण्याच्या द़ष्टीने ठेवलेल्या सुखसोयी या सगळ्या गोष्टी नीटपणे चालवून त्या व्यवस्थितपणे चालतात की नाही हे तपशीलवार पहावे लागते. त्यात ज्या बारीक सारीक त्रुटी आढळतात त्यांना दूर करणे आवश्यक असते. हे काम जिकीरीचे आणि वेळ खाणारे असते. याला कमिशनिंग म्हणतात. एचएमएस हर्क्युलस लाँच झाली असली तरी तिचे कमिशनिंग झालेले नव्हते.

दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच्या काळात भारतावर ब्रिटीशांची सत्ता असतांना त्यावर समुद्रमार्गे आक्रमण होण्याची शक्यता शून्याच्या जवळपास होती. त्यामुळे ब्रिटीश इंडिया सरकारला फार मोठी नेव्ही बाळगण्याची आवश्यकता नव्हती. व्यापारी किंवा प्रवाशांची वाहतूक करणा-या जहाजांना समुद्री चांच्यां(पायरेट्स)पासून संरक्षण देणे एवढीच गरज त्या काळात होती. पण स्वतंत्र भारताला मात्र संरक्षणाच्या सर्वच बाबतीत सुसज्ज होणे अत्यंत आवश्यक होते. त्या दृष्टीने नियोजन करतांना आरमारासाठी एक विमानवाहू जहाज घ्यायचे ठरवले गेले. त्याबद्दल विचारविनिमय, वाटाघाटी वगैरे होऊन १९५७ साली ब्रिटनबरोबर एचएमएस हर्क्युलसच्या खरेदीचा करार करण्यात आला. दहा अकरा वर्षे नुसत्या पडून राहिलेल्या या जहाजाला पुन्हा सुसज्ज करून आणि त्यात काही आवश्यक अशा सुधारणा (मॉडिफिकेशन्स) करून त्या बोटीचे कमिशनिंग करणे, त्यावर अत्याधुनिक यंत्रसामुग्री बसवणे, त्यावर ठेवण्यासाठी योग्य आणि सक्षम अशी विमाने निवडून त्यांची खरेदी करणे, या सगळ्यांची कसून चाचणी घेऊन पाहणे, तंत्रज्ञांचे आणि कामगारांचे प्रशिक्षण वगैरे करण्यात आणखी तीन चार वर्षांचा कालावधी लागला. मार्च १९६१ मध्ये सगळे काम पूर्ण झाल्यानंतर इंग्लंडमधील भारताच्या त्याकाळच्या राजदूत विजयालक्ष्मी पंडित यांना ती सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर आवश्यक अशा इतर बाबी पूर्ण करून आणखी काही महिन्यानंतर तिचा भारतीय नौदलात समावेश करण्यात आला. 

हे अवाढव्य आकाराचे जहाज तब्बल २१३ मीटर लांब, ३९ मीटर रुंद आणि सात मीटर उंच (किंवा खोल) असून त्याचे पूर्ण वजन (फुल लोड) १९,५०० टन इतके होऊ शकते. यावरून अंदाज येईल. ४०००० अश्वशक्ती किंवा ३० मेगावॉट (३०००० किलोवॉट) इतक्या शक्तीची दोन टर्बाइन्स त्यावर बसवलेली असून त्यांना वाफेचा पुरवठा करणारे चार बॉयलर्स ठेवलेले आहेत. चार प्रकारची अनेक विमाने या जहाजावर ठेवली जात होतीच. शिवाय बारा मोठमोठ्या तोफा आणि दारूगोळ्याचा भरपूर साठा त्यावर ठेवलेला असे. १००० पासून १३०० पर्यंत नौसैनिक या जंबो जहाजावर तैनात केले जात.

पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धांमध्ये आय एन एस विक्रांतने अत्यंत महत्वाची कामगिरी केली आणि नावाला जागून विजय मिळवून दिला. पूर्व पाकिस्तानच्या (आताच्या बांग्लादेशातल्या) नेव्हीचा पुरा बीमोड केलाच, तिथल्या बंदरांची नाकेबंदी करून बाहेरून कसल्याही प्रकारची मदत मिळणे अशक्य करून ठेवले होते. काळाबरोबर नव्या प्रकारच्या अधिक शक्तीशाली आणि वेगवान विमानांची गरज पडली. त्यांचा उपयोग करता येणे शक्य व्हावे यासाठी विक्रांतमध्ये काही सुधारणा केल्या गेल्या. तिची जुनी झालेली इंजिने काढून त्यांच्या जागी चांगली नवी इंजिने बसवली गेली. असे करत करत आणखी पंधरा वीस वर्षे गेल्यानंतर मात्र या जहाजाचा वृद्धापकाळ सुरू झाला. त्यानंतर तिची डागडुजी होत राहिली असली तरी तिला खोल समुद्रात दूरवर पाठवणे धोक्याचे वाटायला लागले.

१९८७ साली एचएमएस हर्मिस ही विक्रांतहून मोठी विमानवाहू आगबोट खरेदी करून तिचे नाव विराट असे ठेवले गेले आणि विक्रांतला हळूहळू बाजूला करण्यात येऊन १९९७ मध्ये तिला नेव्हीच्या सेवेमधून मुक्त करण्यात आले. त्यानंतर या जहाजाचे काय करायचे हा प्रश्न गेली सोळा वर्षे विचाराधीन आहे. तिचा उपयोग प्रशिक्षण देण्यासाय़ी करावा असा एक विचार होता, तर त्या जहाजाचे रूपांतर सागरी वस्तुसंग्रहालयात (म्यूजियममध्ये) करावे हा विचार जवळ जवळ पक्का झाला होता. पण प्रदर्शनाचे काम नेव्हीच्या अखत्यारात येत नाही. ते राज्य सरकार करू शकते. पण एवढे अवाढव्य जहाज कुठे ठेवायचे? ते पहायला जाणा-या पर्यटकांना तिथे कसे न्यायचे? किती लोकांना ते पहायची उत्सुकता असेल? आणि ते म्यूजियम चालवायला येणारा खर्च कसा भागवायचा? वगैरे प्रश्न समाधानकारक रीतीने न सुटल्यामुळे त्यातले काहीच यशस्वी रीतीने होऊ शकले नाही. या बाबतीत इंग्लंड, फ्रान्स, इटली आदि युरोपियन देश आणि विशेषतः अमेरिका आपल्या खूप पुढे आहे. कुठलीही जुनी वस्तू आकर्षक रीतीने मांडून ती पहायला येणा-या लोकांच्या खिशामधून पैसे काढून घेणे त्यांना चांगले जमते पण आपल्याला ते तितकेसे जमत नाही. भारतातील एकादी खाजगी संस्था किंवा व्यक्ती ही कला आत्मसात करून घेईल आणि विक्रांतचे रूपांतर आकर्षक अशा प्रदर्शनात करेल अशी एक आशा अजूनही वाटते.

निकामी पडलेले जहाज आणि तिच्यावरील यंत्रसामुग्री यांचेसुद्धा मेन्टेनन्स तर करावे लागते आणि त्यासाठी मनुष्यबळ आणि पैसे खर्च होतात. "हा पांढरा हत्ती असाच पोसत राहणे आता आपल्याला शक्य नाही." असे सांगून नौदलाने आपले हात झटकले आहेत आणि म्हाता-या झालेल्या विक्रांतचा आता नाइलाजास्तव भंगार म्हणून लिलाव करण्यात येत आहे. तिला खरेदी करण्यासाठी कोणती गि-हाइके बोली लावणार आहेत? विकत घेतल्यानंतर ते तिला बाळगणार आणि जपणार आहेत की तिची तोडफोड करून त्यातले पोलाद वितळवून वापरणार आहेत? एके काळी भारताचा मानदंड असलेली ही नौका परदेशातला कोणी व्यापारी विकत घेऊन दुसरीकडे घेऊन जाणार आहे का? की ही नौका वस्तुसंग्रहालयाच्या रूपाने अनंत काळपर्यंत आपल्याकडे राहील? अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे काळाच्या उदरात दडली आहेत.

सगळ्याच आगबोटी, मग त्या सामानाची वाहतूक करत असोत किंवा प्रवाशांची, त्यांची उपयुक्तता संपल्यानंतर मोडीत काढल्या जातात. युद्धनौकासुद्धा त्याला अपवाद नाहीत, पण विक्रांत ही भारताची पहिली विमानवाहू नौका होती आणि छत्तीस वर्षे आपल्या आरमाराचा महत्वाचा भाग होती, त्यातली सहवीस वर्षे ती एकमेव होती, युद्धामध्ये तिने अविस्मरणीय अशी कामगिरी केली होती. या सगळ्यामुळे तिने भारतीयांच्या मनात घर करून ठेवले आहे. आता तिचा काही उपयोग राहिला नसला तरी तिच्या नाहीशा होण्याची हळहळ तीव्रतेने वाटते, पण व्यावहारिक दृष्टीने त्याला काय मोल आहे? आणि अशा किती गोष्टी आपण सांभाळून ठेवू शकणार आहोत? त्यासाठी किती खर्च करणे परवडण्याजोगे आहे? असे अनेक प्रश्न आहेत.

जुनी विक्रांत बोट जरी आता कायमची नजरेआड जाण्याची शक्यता समोर ऊभी ठाकली असली तरी संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली विमानवाहू नौका या वर्षीच लाँच झाली आहे. तिचेही नाव विक्रांत असेच ठेवून ते नाव पुढे चालत राहण्याची व्यवस्था केली आहे. विराट सुद्धा आता जुनी व्हायला आली असून नवी विक्रांत कार्यान्वित झाल्यानंतर तिलाही रजा द्यावी लागणार आहे. दरम्यान नौदलाने विक्रमादित्य ही आणखी एक मोठी विमानवाहू नौका घेतली गेली आहे. पण आता या प्रकारच्या आगबोटींची निर्मितीच आपल्या देशात कोची इथे होऊ लागली असल्यामुळे गरजेनुसार त्या तयार केल्या जात राहतील. पहिली विक्रांत लिलावात निघाली तरी तिचे नाव आणखी काही दशके तरी चालत राहील.No comments: