Sunday, December 15, 2013

श्री दत्तगुरूंचे २४ गुरू

 श्री दत्तगुरूंचे २४ गुरू


बृहस्पती हे सर्व देवांचे गुरू होते असे सांगितले जाते. अत्यंत बुद्धीमान माणसाला बृहस्पतीची उपमा दिली जाते. पण ते नेमके कोणत्या देवांचे गुरू होते हे मात्र समजत नाही. गणपती, मारुती, महादेव, राम, कृष्ण, अंबाबाई वगैरे जितक्या देवतांच्या मूर्ती आपल्या घरातल्या देव्हा-यात किंवा गावातल्या देवळात असतात त्यातल्या कोणीही कधी बृहस्पतीकडे जाऊन शिक्षण किंवा मार्गदर्शन घेतले असा उल्लेख मी तरी ऐकलेला किंवा वाचलेला नाही. दत्तगुरूंना मात्र सर्व जगाचे गुरू असे मानले जाते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींनी मिळून दत्तात्रेयाचे रूप घेतले त्या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा होती. या दिवशी दत्तजन्माचा सोहळा केला जातो. या जगद्गुरू अवधूतांनी स्वतः २४ गुरू केले होते आणि त्यांच्याकडून काही गुण किंवा शिकवण घेतली होती असे त्यांनी यदुराजाला सांगितले होते अशी पुराणातली आख्यायिका आहे. दत्तगुरूंनी मानलेले हे २४ गुरू असे आहेत  
१.पृथ्वी. २.वायू, ३.आकाश. ४.पाणी, ५.अग्नी, ६.चंद्र, ७.सूर्य, ८.कबूतर, ९.अजगर, १०.समुद्र, ११.पतंग कीटक (मॉथ), १२.मधमाशी, १३.हत्ती, १४.भुंगा, १५.हरीण, १६.मासा, १७.पिंगला नर्तकी, १८.टिटवी, १९.बालक, २०.बांगड्या, २१.बाण तयार करणारा कारागीर, २२.साप, २३.कोळी (स्पायडर) २४. अळी. या यादीमधील नावे आणि त्यांचा क्रम यात काही पाठभेद आहेत. कोणी यात यमाचा समावेश केला आहे. मला जी एक यादी सहजपणे मिळाली ती मी या ठिकाणी दिली आहे. यातील प्रत्येक जीवंत व्यक्ती, प्राणी किंवा निर्जीव वस्तूपासून काही गुण शिकण्यासारखे आहेत तर काही वाईट गुण ओळखून ते टाळणे आवश्यक आहे. त्यांनाही दत्तगुरूंनी गुरूपद दिले आहे.

सूर्याचे तेज, चंद्राची शीतलता, पृथ्वीची सहनशीलता, अग्नीचे पावित्र्य, सागराचा अथांगपणा, स्त्रीची ममता, बालकताचे निरागसपण, मधमाशीची संग्रहवृत्ती वगैरे काही गुणविशेष प्रसिद्ध आहेत आणि त्यांचे उल्लेख नेहमी होत असतात किंवा त्यांची उदाहरणे दिली जात असतात. यांचे यापेक्षा वेगळे काही गुण दत्तगुरूंना दिसले होते. समुद्र आणि त्यातले पाणी यांची वेगवेगळी गणती केली आहे. समुद्र त्याला मिळणा-या सर्व नद्यांना स्वतःमध्ये सामावून घेतो तर "पानी तेरा रंग कैसा? जिसमें मिलाओ वैसा" या उक्तीप्रमाणे पाणी कशातही मिसळून जाते. हे गुण भिन्न आणि थोडे परस्परविरोधी आहेत. दिव्याच्या ज्योतीवर झेप घेऊन स्वतःला जाळून घेणा-या पतंगाचे उदाहरण प्रेमाचे द्योतक म्हणून दिले जाते, पण क्षणिक मोहाने असा अविचार करू नये हे यातून शिकण्यासारखे आहे. हत्ती हा प्राणी मदांध किंवा कामांध होऊ शकतो. मासा अधाशीपणाने आमिशाला खायला जातो आणि स्वतःच गळाला लागतो. त्याचप्रमाणे हरीण संगीताकडे आकर्षले जाते आणि माणसाच्या (शिका-याच्या) जवळ येऊन त्याच्या तावडीत सापडते. ही सगळी काय करू नये याची उदाहरणे आहेत.

काही गुणविशेष आपल्या किंबहुना माझ्या समजुतीपेक्षा वेगळे दिसतात. यात अलिप्तपणा हा कबूतराचा (नसलेला) गुण सांगतला आहे. एका कबूतराच्या जोडीच्या पिल्लांना शिकारी घेऊन गेला, त्यांच्यासाठी आणलेला चारा घेऊन कबूतरी आणि तिच्या मागोमाग नर कबूतर त्या शिका-याकडे गेले आणि त्याच्या ताब्यात सापडले. त्यांच्याकडे अलिप्तपणा असला तर ते स्वतंत्र राहिले असते. या कथेमध्ये निर्भयपणा हा सापाचा गुण सांगितला आहे. त्या एक कारण तो निर्धास्तपणे मुंग्यांच्या वारुळात जाऊन राहतो आणि दुसरे म्हणजे आपल्या सर्वांगावरचे कात़डे (कात) काढून टाकतो. बांगड्या आणि एकांतवास यात काय संबंध असेल असे वाटेल. इथे हे लक्षात घ्यायचे आहे की एका हातात दोन किंवा जास्त बांगड्या असल्या तर त्या किणकिण करतात, पण एकच बांगडी असली तर ती आवाज करून कोणाचे लक्ष वेधून घेत नाही. कुंभारमाशीची गोष्ट मी लहानपणी ऐकली होती. ही माझी मातीचे लहानसे घर बांधते आणि त्यात अळी (किंवा अळ्या) नेऊन ठेवते. ही माशी येऊन आपल्याला खाईल या भीतीने ती अळी सारखा तिचा विचार करते आणि त्यात इतकी एकरूप होते की स्वतःच कुंभारमाशी होते अशी ती गोष्ट होती आणि यातल्या अळीप्रमाणे आपण परमेश्वराचे सारखे स्मरण केले तर आपणही त्याच्याशी एकरूप होतो अशी शिकवण त्यातून दिली होती. अंडे, अळी, कोष आणि कीटक असे त्याचे चार जन्म असतात हे  त्यावेळी मला माहित नव्हते.

या २४ गुरूंपैकी काही गोष्टींचे संदर्भ मला नवीन होते. पिंगला ही नृत्यांगना (तवाइफ) एका ग्राहकाची आतुरतेने वाट पहात बसते पण तो येत नाही. तेंव्हा तिला असे वाटते की याऐवजी आपण अंतर्मुख होऊन (देवाचे) ध्यान केले असते तर त्याचा फायदा झाला असता, आपला उद्धार झाला असता. एकाग्रचित्ताने बाण तयार करत बसलेला एक कारागीर (लोहार) आपल्या कामात इतका मग्न झाला होता की वाजत गाजत बाजूने जात असलेली राजाची मिरवणूकसुद्धा त्याच्या लक्षात आली नाही. मनाची एकाग्रता (कॉन्सेन्ट्रेशन) हा त्याचा गुण शिकण्यासारखा आहे.  एकदा एक टिटवी (लहानसा पक्षी) काही खाद्य खाण्यासाठी उचलून घेऊन आली, तिच्याकडून ते खाद्य  हिसकावून घेण्यासाठी कावळे, घारी वगैरे इतर मोठ्या पक्ष्यांनी तिच्यावर हल्ला केला. त्या टिटवीने शहाणपणा केला आणि चोचीमधले खाद्य जमीनीवर टाकून देऊन तिथून पोबारा केला. काळवेळ पाहून क्षुल्लक बाबींचा अशा प्रकारे त्याग करणे हिताचे ठरते.  हा बोध यावरून मिळतो.

ही काही उदाहरणे आहेत. माझ्या मते जगातल्या प्रत्येक गोष्टीपासून काही ना काही शिकण्यासारखे असते आणि प्रत्येक प्रसंगातून काही बोध घेण्यासारखा असतो. फक्त आपली इच्छा आणि तयारी असायला हवी.



No comments: