Wednesday, December 25, 2013

या वर्षातल्या नवलकथा - अॅप्स आणि आपइसवी सन २०१३ आता शेवटच्या आठवड्यात आले आहे. "नेमेचि येतो बघ पावसाळा हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा" या उक्तीप्रमाणे गेल्या वर्षातसुद्धा हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा येऊन गेले आणि आता पुन्हा थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. इतर वर्षांत होऊन जातात त्यासारख्या इतर सर्वसामान्य घटना घडून गेल्याच, त्यातल्या काही सुखद आणि काही दुःखद होत्या. उत्तराखंडामध्ये आलेला प्रलयंकारी महापूर ही नैसर्गिक आपत्ती आणि सिंधूरक्षक  या पाणबुडीवर झालेला भयानक अपघात या अत्यंत दुर्दैवी घटना घडून गेल्या. अशा प्रकारच्या घटना अधून मधून जगात कुठे ना कुठे घडत असतात, पण त्या दूरदेशी घडल्या तर आपल्याला त्यांची तीव्रता जाणवत नाही. विस्तवाचा चटका त्याच्या जवळ असलेल्याला अत्यंत दाहक असतो पण जसजसे दूर जाऊ तसतशी त्याची दाहकता कमी होते. याचप्रमाणे अशा घटना ज्या भागात घडतात किंवा ज्या लोकांचा त्यांच्याशी  निकटचा संबंध असतो त्यांना त्या सुन्न करून सोडतात, त्यांच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम करतात. इतरांना काही काळ वेदना, दुःख, हळहळ वगैरे वाटते आणि हळूहळू शांत होते. या वर्षात आपल्या देशाच्या किंवा देशवासीयांच्या दृष्टीने पाहता काही चांगल्या घटनासुद्धा घडल्या, पण त्या घटना सहसा क्षणार्धात घडत नाहीत. कित्येक दिवस, महिने, वर्षे चिकाटीने मेहनत केल्यानंतर एकादा टप्पा गाठल्याचा तो आनंद असतो. एकाद्या पर्वतशिखरावर चढून जाण्यासाठी खूप कष्ट आणि प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर मिळाले तर त्याचे फलित मिळते, पण कुठेतरी पाय घसरून कडेलोट झाला तर त्याला एक क्षण पुरेसा असतो. तसेच हे आहे. गेल्या वर्षातल्या सगळ्याच मुख्य  घटनांची खूप चर्चा होऊन गेलेली आहे आणि या आठवड्यात त्यांची उजळणी होईल.

या भागात मला काही नवलकथांबद्दल सांगायचे आहे. निदान मला तरी ज्याची यत्किंचित अपेक्षा किंवा कल्पनासुद्धा नव्हती अशा काही नव्या गोष्टी या वर्षी समोर आल्या आणि त्यांच्या अनपेक्षित आगमनामुळे मला त्यांचे नवल वाटावे असे काही बाबतीत घडले. मराठीत अआइई प्रमाणे किंवा इंग्रजीत एबीसीडी कसेही पाहिले तरी 'अॅप्स' आणि 'आप' यांचाच अव्वल नंबर लागेल म्हणून आधी त्याच घेऊ. त्यातल्या अॅप्सने मोबाईल फोन्सच्या जगात विजयी घोडदौड केली आणि एकाद्या धूमकेतूसारखा आप पक्ष उदयाला आला आणि त्याने राजकीय क्षेत्रात हलकल्लोळ माजवला.

खिशात बाळगण्याजोगा पिटुकला सेलफोन किंवा मोबाइल बाजारात आला आणि त्याने माणसांचे जीवनच बदलून टाकले. तुम्ही घरी, ऑफिसात, बाजारात, प्रवासात कुठेही असला तरी तिथून कोणाशीही बोलणे शक्य झाले आणि नोकियाच्या जुन्या काळातल्या जाहिरातीप्रमाणे दिवसाचे चोवीस तास सतत 'कनेक्टेड' राहिला. साध्या परंपरागत टेलिफोनमधून फक्त बोलणे शक्य होते, त्याच्या पन्नास वर्षांनंतर आलेल्या टेलेक्समधून मजकूर (टेक्स्ट) पाठवणे सुरू झाले. आणखी वीस पंचवीस वर्षांनंतर फॅक्स करून चित्रे पाठवली जाऊ लागली. पण फॅक्सचे आयुष्यमान जास्त नव्हते कारण ते पूर्णपणे रुळायच्या आधी त्याच्या पाठोपाठ आलेल्या ई मेलने त्याला हद्दपार केले. टेलिफोन, टेलेक्स आणि फॅक्स यांचेसाठी वेगवेगळी यंत्रे लागत असत. पण काँप्यूटर आणि इंटरनेट आल्यानंतर ध्वनि, मजकूर आणि चित्रे या सर्वांना ई मेलमधून इकडून तिकडे पाठवण्यासाठी एकच यंत्र पुरेसे झाले आणि तेसुद्धा आपल्या घरी बसून करता येऊ लागले. हे बदल होण्यासाठी जवळजवळ शंभर वर्षांचा काळ लागला होता. पण मोबाईल फोनने मात्र आल्या आल्या काही वर्षांमध्ये हे सगळे आपल्यात सामावून घेतले.

सुरुवातीला आपल्या शहरात, मग देशभर असे करत करत काही वर्षांमध्येच मोबाईल फोनवरून जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या कोणत्याही माणसाशी मनात येईल त्या क्षणी बोलणे शक्य झालेच. त्याच्या जोडीला या सेलफोनवरून लिखित मजकूर (टेक्स्ट मेसेज) पाठवता येऊ लागला. त्यातही सुरुवातीला फक्त इंग्रजी भाषा असायची, नंतर मराठी भाषेत आणि देवनागरी लिपीमध्येसुद्धा लिहिणे वाचणे शक्य झाले. मोबाईलला कॅमेरा जोडला गेला आणि मनात आल्या आल्या त्या क्षणी छायाचित्रे काढून ठेवता आली. त्यानंतर ध्वनि आणि अक्षरे एवढ्यावर न थांबता त्यांनाही इकडून तिकडे पाठवता येऊ लागले. आणखी प्रगती होऊन हालचाली आणि हावभावांसह चालती बोलती चित्रे (व्हीडिओ क्लिप्स) घेऊन पाठवता येऊ लागली. या सगळ्याचे मुख्य कारण म्हणजे ध्वनि, चित्रे आणि अक्षरे यांचे डिजिटल सिग्नल्समध्ये आणि त्याच्या उलट परिवर्यन करणे याच्या मागे असलेले सायन्स चांगल्या प्रकारे समजले होते आणि कमीत कमी ऊर्जेचा वापर करून ते काम करून घेण्यात यश आले होते. यामुळे तीन मोठ्या आणि महाग यंत्रांऐवजी एका पिटुकला मोबाईल फोनमधून हे सगळे होऊ लागले होते.

काँप्यूटरमध्ये एक शक्तीशाली आणि वेगवान प्रोसेसर (सीपीयू नावाचा त्याचा मुख्य भाग) असतो तो निरनिराळी असंख्य कामे चुटकीसरशी करू शकतो. ती कामे करण्यासाठी सिस्टम सॉफ्टवेअर असते, पण त्या प्रोसेसरला विशिष्ट काम सांगून त्याचेकडून ते करवून घेण्यासाठी अप्लिकेशन सॉफ्टवेअर बनवले जातात. मोटार कार चालवणा-या माणसाला ऑटोमोबाईल इंजिनियरिंगचे ज्ञान असण्याची गरज नसते त्याप्रमाणेच काँप्यूटरचा वापर करणा-या सर्वसामान्य माणसाला या सॉफ्टवेअरबद्दल काही माहिती असण्याची गरज नसते इतके ते आता यूजर फ्रेँडली झाले आहे. स्क्रीनवर दिसणा-या सूचना वाचून आपल्या आपण कोणीही माऊस व कीबोर्डद्वारा आपले काम करून घेऊ शकतो.

या काँप्यूर्सचा एक लहान भाऊ मायक्रोप्रोसेसर त्यातली काही कामे करू शकतो. तो आकाराने लहान अलतो आणि त्याला दिलेल्या कामांना जास्त वीज लागत नाही. अशा मायक्रोप्रोसेसरची चिप मोबाईल फोनमध्ये बसवली जाते. त्याच्या वापरासाठी जे खास अप्लिकेशन सॉफ्टवेअर बनवले जाते त्याला अॅप्स असे म्हणतात. ही अॅप्स तयार व्हायला ३-४ वर्षांपूर्वीच सुरुवात झाली होती, पण त्यांचा उपयोग करता येण्याजोगे स्मार्ट मोबाईल फोन्स आणि त्यांच्यासाठी संदेशवहन करण्यासाठी आवश्यक असलेली थ्री जी सेवा सामान्य लोकांच्या आटोक्यात यायला वेळ लागला.  मी जरी अद्याप तिचा लाभ घेऊ शकलो नसलो तरी माझ्या परिचयाच्या काही लोकांकडे मला हा मोबाइल पहायला मिळाला तो या वर्षीच.

ध्वनि, चित्रे आणि अक्षरे यांची देवाण घेवाण करणे ही वर दिलेली कामे हा एक भाग झाला. यामध्ये कोणीतरी ही माहिती गोळा करून पाठवणारा असतो आणि दुसरा कोणी ती घेणारा असतो. याखेरीज अनेक कामे या अॅप्समधून करता येणे शक्य आहे. त्यातली मुख्य म्हणजे माहिती मिळवणे. यात ती देणारा कोणी हजर असण्याची आवश्यकता नसते. आधी कोणी ती माहिती जमा करून ठेवलेली असली तर ती शोधून उचलून घेता येते. दुसरे म्हणजे प्रवासासाठी किंवा सिनेमाची तिकीटे काढणे यावरून करता येते. फेसबुकसारख्या सोशल नेटवर्कवर हवे तेंव्हा जाता येते, यूट्यूबवरील गाणी पाहता आणि ऐकता येतात, मोबाईलवर अंगठा फिरवून एकाद्या ठिकाणचा पत्ता शोधता येतो इतकेच नव्हे तर जीपीएसच्या सहाय्याने तिथे कसे जाऊन पोचायचे हेसुद्धा समजते. बँकेमधल्या आपल्या खात्याचा हिशोब पाहता येतो आणि त्या खात्यामधून बिले भरता येतात. अॅप्सच्या आधारांनी काय काय करता येते याबद्दल ऐकावे तेवढे नवलच वाटते. अल्लाउद्दीनच्या जादूच्या दिव्यामधला राक्षस येऊन सांगेल ते काम क्षणार्धात करायचा असे सुरस कथांमध्ये वाचले होते. मोबाईलवरील अॅप्स हे त्याचेच नवे अवतार वाटतात. यातले काही अॅप्स विकत घ्यावे लागतात तर काही फुकट मिळतात. व्हॉट्सअॅप हे आता यात इतके लोकप्रिय झाले आहे की त्यामुळे फेसबुकवर कमी गर्दी होऊ लागली आहे. नव्या पिढीतली मंडळी प्रत्यक्षात कधी भेटतात आणि बोलतात की नाही? त्यांचे सगळे बोलणे व्हॉट्सअॅपवर चॅट करतांनाच संपून तर जात नसेल ना? असे वाटायला लागले आहे.


भ्रष्टाचाराच्या विरोधात लोकपाल विधेयक आणण्यासाठी अण्णा हजारे यांनी जंतर मंतरवर उपोषण सुरू केले होते तेंव्हा त्यांच्या सभोवती जमा झालेल्या मंडळींमध्ये अरविंद केजरीवाल हे नाव पहिल्यांदा ऐकले. त्यानंतर त्यांच्यासंबंधी उलटसुलट बातम्या येत गेल्या. ते व्यक्तिशः अण्णांपासून आणि त्यांच्या सत्याग्रहाच्या मार्गापासून दूर जात असल्याचेही सांगितले जात होते. या वर्षी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यावर ते अचानकपणे प्रकट झाले आणि गेले काही महिने सतत प्रकाशझोतामध्ये राहिले. आम आदमी पार्टी (आप) या नावाचा एक नवा पक्ष त्यांनी स्थापन केला. दिल्लीच्या राज्यावर आळीपाळीने ताबा मिळवलेल्या दोन्ही प्रमुख राष्ट्रीय पातळीवरील पक्षांवर घणाघाती प्रहार केले, त्यात त्यांनी काही वेळा राणा भीमदेवी वक्तव्ये केली, काही वेळा विनम्रतेची पराकाष्ठा केली, काही अवाच्या सव्वा आश्वासने दिली, दिल्लीमधल्या गल्ल्यागल्ल्यांमध्ये सभा, मेळावे वगैरे घेतले. या सर्वांमध्ये ते आश्चर्य वाटावे इतक्या आत्मविश्वासाने वावरत होते आणि गर्दी खेचत होते. तरीसुद्धा मनसेप्रमाणे त्यांचीही कामगिरी मतांची विभागणी करण्याइतपतच होईल अशा अटकळी बहुतेक पंडितांनी बांधल्या होत्या. 

त्या सगळ्यांना खोटे पाडत त्यांच्या पक्षाने ७० पैकी २८ जागांवर विजय मिळवला. दिल्लीमध्ये अत्यंत लोकप्रिय समजल्या जाणा-या भूतपूर्व मुख्यमंत्री शीला दिक्षित यांनासुद्धा आम आदमीकडून पराभूत होण्याची वेळ आली. आम आदमी पक्षाला बहुमत मिळाले नसले तरी सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजपलासुद्धा बहुमत मिळाले नाही. त्यामुळे दुस-या क्रमांकावर असलेल्या आम आदमी पक्षाला त्याने लडवलेल्या पहिल्याच निवडणुकीत सत्तेवर येण्याचीसुद्धा संधी मिळणार आहे. आता तिचा लाभ कशा प्रकारे आणि किती घ्यायचा किंवा घेता येईल हे मुख्यतः अरविंद केजरीवाल यांच्या परफॉर्मन्सवर ठरणार आहे. पक्षाची पुढील धोरणे आणि त्यावर होणारी अंमलबजावणी यांच्या आधाराशिवाय मुत्सद्दीपणाची खूप गरज पडणार आहे. पुढे जे होईल ते होईल आम आदमी पक्षाने (आपने) इथवर जी मजल मारली त्याचेच नवल वाटते.    

No comments: