Wednesday, December 11, 2013

३ ४ ५ ..... ११ १२ १३


"एक दो तीन, चार पाँच छे सात आठ नौ, दस ग्यारा बारा तेरा" या गाण्यावर नाचत नाचत माधुरी दीक्षितने सिनेमाक्षेत्रात पदार्पण केले आणि थेट शिखरापर्यंत मुसंडी मारली. तिचे त्यापूर्वीचे काही चित्रपट येऊन गेले असले तरी ते मला माहीत नाहीत. "एक दो तीन" हे गाणे असलेला 'तेजाब' हा मी पाहिला तिचा पहिलाच चित्रपट होता आणि त्यानंतर केवळ तिची भूमिका आहे म्हणून मी अनेक सिनेमे पाहिले. हिंदी चित्रपटसृष्टी गाजवत असतांनाच माधुरी लग्न करून सुगृहिणी (हाउसवाइफ) झाली आणि अमेरिकेला चालली गेली तेंव्हा अनेक लोकांना त्याची चुटपुट लागली होती. पण आता ती पुन्हा "आजा नचले" करत परत आली आहे आणि जाहिरातीतल्या भांडी घासणा-या गंगूबाईपासून ते स्टेजशोमधल्या प्रमुख पाहुण्यांपर्यंत अनेक रूपांमध्ये टीव्हीवर दिसू लागली आहे, मुख्य म्हणजे तिचे दिसणे आणि हंसणे पहिल्याइतकेच गोड राहिले आहे. असे असले तरी माधुरी दीक्षित हा या लेखाचा विषय नाही पण "तीन चार पाच" आणि "बारा तेरा" म्हणतांना तिची आठवण आल्याखेरीज राहणे शक्य नाही.

विसावे शतक संपून सन २००० सुरू होण्याच्या नेमक्या क्षणाला वायटूके (Y2K) असे नाव काँप्यूटरवाल्यांनी दिले होते. वर्ष दाखवणा-या ९७, ९८, ९९ अशा आकड्यांना सरावलेल्या त्या काळातल्या मठ्ठ काँप्यूटरांना २००० सालातला ०० हा आकडा समजणारच नाही आणि ते गोंधळून जाऊन बंद पडतील. त्यामुळे त्यांच्या आधारावर चालणार्‍या सगळ्या यंत्रणा एकाएकी पार कोलमडून पडतील. हॉस्पिटलमधल्या कुठल्या रोग्याला कोणते औषध द्यायचे किंवा कुणावर कसली शस्त्रक्रिया करायची हे कुणाला समजणार नाही. स्वयंचलित यंत्रांना कच्चा मालच मिळणार नाही किंवा चुकीचा माल त्यात घुसवला जाईल. नोकरदारांना पगार मिळणार नाही, त्यांची बँकांमधली खाती बंद पडतील आणि एटीएम यंत्रांमधून पैसे बाहेर येणार नाहीत. जमीनीवरली विमाने उडलीच तरी भलत्या दिशांना जातील आणि आकाशात भ्रमण करणारी विमाने दगडासारखी खाली कोसळतील. अशा अनेक वावड्या उडवल्या जात होत्या. असे होऊ नये म्हणून त्या दिवशी (म्हणजे रात्री) सर्व ऑफिसांमधल्या विजेच्या कनेक्शन्सचे फ्यूज काढून ठेवावेत, कोणतेही विमान उडवू नयेच, जमीनीवरल्या विमानांच्या इंधनाच्या टाक्या रिकाम्या करून ठेवाव्यात वगैरे सावधगिरीच्या सूचना अतिघाबरट लोकांनी दिल्या होत्या असे म्हणतात. त्या संबंधातली सर्वात भयानक अफवा अशी होती की वेगवेगळ्या महासत्तांच्या भूमीगत गुप्त कोठारांमधले अनेक अण्वस्त्रधारी अग्निबाण (न्यूक्लियर मिसाईल्स) बाहेर निघून ते आकाशात भरकटत जातील आणि इतस्ततः कोसळून संपूर्ण पृथ्वीवर हलकल्लोळ माजवतील.

असा अनर्थ घडू नये म्हणून सगळे संगणकविश्व कंबर कसून कामाला लागले होते. नव्या भारतातले संगणकतज्ज्ञ प्राचीन काळात भारताने शोधून जगाला दिलेल्या शून्याचा अर्थ जगभरातील संगणकांना नव्याने समजावून देण्याच्या कामाला लागले. त्या काळात ते रात्रंदिवस काम करून निरनिराळ्या सॉफ्टवेअर्सना 'वायटूकेफ्रेंडली किंवा कंप्लायंट' बनवत राहिले. कदाचित त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेही असेल, पण वायटूकेचा बार फारच फुसका निघाला. ती वेळ आली तेंव्हा त्यातून साधे फुस्ससुध्दा झाले नाही.

वायटूकेच्या सुमाराला आकडेवीरांची मात्र चंगळ सुरू झाली. वायटूकेच्या सुमारे तासभरानंतर १ जानेवारी २००१ साली १ वाजून १ मिनिटे आणि १ सेकंद ०१:०१:०१:०१:०१:०१ हा क्षण येऊन गेला, पण नव्या शतकाची सुरुवात झाल्याच्या जल्लोशात सगळे लोक बुडून गेलेले असल्यामुळे हा क्षण येऊन गेल्याचे त्या वेळी कोणाच्या लक्षातच आले नाही. त्यानंतर  ०२:०२..., ०३:०३... वगैरे विशेष वेळा दर वर्षी येत राहिल्या. त्याशिवाय ०१:०२:०३:०१:०२:०३ किंवा ०१:०२:०३:०३:०२:०१ अशासारखे काही विशेष क्षणही येऊन गेले. त्यातल्या बहुतेक सगळ्या वेळा रात्री झोपेच्या काळात असल्याने कुणाला जाणवल्याही नाहीत. २००७ साली जुलै महिन्याच्या ७ तारखेला युरोपातल्या स्पेन या देशात एक आंतरराष्ट्रीय संमेलन भरवून त्यात ०७:०७:०७:०७:०७:०७ या वेळी म्हणजे सकाळी ७ वाजून ७ मिनिटे आणि ७ सेकंद या क्षणाचा मुहूर्त साधून पुरातनकाळातील माणसांनी बांधून ठेवलेल्या जगातील सात जुन्या आश्चर्यांची नवी जगन्मान्य यादी जाहीर करण्यात आली.

त्यानंतर ०८:०८... ०९:०९... वगैरे क्षण येऊन गेले. दोन वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या ११ नोव्हेंबर २०११ या दिवशी ११ वाजून ११ मिनिटे ११ सेकंद या वेळेत ११ हा आकडा ६ वेळा किंवा १ हा आकडा १२ वेळा येऊन गेला होता. तो याहीपेक्षा जास्त येण्याची वेळ यापूर्वी सन ११११ मध्ये येऊन गेली होती, पण त्या काळात सेकंदांपर्यंत अचूक वेळ दाखवणारी घड्याळेच अस्तित्वात नसल्यामुळे तब्बल अकरा हजार वर्षांमध्ये एकदा येऊन गेलेल्या या क्षणाचे महत्व कोणाच्या ध्यानातही आले नसेल. मागील वर्षी १२-१२-१२ हा दिवस उजाडून त्या दिवशी दुपारचे १२:१२:१२ म्हणजे १२ वाजून १२ मिनिटे १२ सेकंद वाजून गेले. बारा बारा बारा ... वाजता कोणाकोणाचे बारा वाजणार आहेत अशी शंका काही लोकांच्या मनात आली होती, पण तसे काही झाले नाही. अशा प्रकारच्या गणिती योगायोगाची ती या शतकातली शेवटची संधी होती, इंग्रजी कॅलेंडर्समध्ये कधीच तेरावा महिना येत नसल्यामुळे गेली बारा वर्षे दर वर्षी येणारा अशा प्रकारचा योग आता यानंतर एकदम सन २१०१ मध्ये येईल  असे त्या दिवशी वाटले होते. 

पण आज आणखी काही असे विशिष्टसंख्यापूर्ण क्षण येऊन गेले. आजची तारीख ११ डिसेंबर २०१३ म्हणजे ११:१२:१३. त्यामुळे सकाळचे आठ वाजून नऊ मिनिटे दहा सेकंद म्हणजे ०८:०९:१०:११:१२:१३ झाले आणि सकाळी ११ वाजून १२ मिनिटे १३ सेकंद ही वेळ ११:१२:१३:११:१२:१३ झाली. आजचाच आणखी एक विशेष म्हणजे हा या महिन्यातला ३४५वा दिवस आहे. त्यातसुद्धा ३ ४ आणि ५ असा क्रम आहे. हा दुहेरी योगायोग म्हणायचा. एका वर्षामध्ये बाराच महिने असतात आणि घड्याळात बाराच तास दाखवले जातात यामुळे यानंतर मात्र अशी विशेष काँबिनेशन्स येण्याची शक्यता दिसत नाही.

गेली तेरा वर्षे हे विशिष्ट वेळांचे क्षण त्यांच्या त्यांच्या ठरलेल्या वेळी येऊन गेले. त्यातल्या कोठल्याही क्षणी नेमके काय घडले? खरे तर कांही म्हणजे कांहीसुद्धा झाले नाही. बाहेर अंधार, उजेड, ऊन, पाऊस वगैरे सगळे काही ऋतुमानाप्रमाणे होत राहिले. कुठे पावसाची भुरभुर आधीपासून सुरू असली तर त्या क्षणानंतरही ती तशीच होत राहिली. तो क्षण पहायला सूर्य कांही त्या वेळी ढगाआडून बाहेर आला नाही. वारा मंद मंद किंवा वेगाने वहात होता आणि पानांना सळसळ करायला लावत होता. सगळे कांही अगदी नेहमीसारखेच चाललेले होते. आणि त्यांत कांही बदल होण्याचे कांही कारण तरी कुठे होते?

निसर्गाचे चक्र अनादी कालापासून फिरत आले आहे. त्या कालचक्राची सुरुवात कशी आणि कधी झाली हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. माणसानेच कुठून तरी वेळ मोजायला सुरुवात केली आणि आपण त्यातल्या विशिष्ट आकड्यांपर्यंत पोचत राहिलो. तारीख, महिना, वर्ष, तास, मिनिटे, सेकंद हे सगळे माणसाच्या मेंदूतून निघाले आहे आणि त्याच्या सोयीसाठी तो ते पहात राहिला आहे. निसर्गाला त्याचे कणभर कौतुक नाही. गेल्या तेरा वर्षांत अगदी योगायोगानेसुध्दा त्यातल्या अशा प्रकारच्या विशिष्ट तारखांना विशिष्ट क्षणी कोठलीच महत्वाची अशी चांगली किंवा वाईट घटना जगात कुठेच घडली नाही. न्युमरॉलॉजी वगैरेंना शास्त्र समजणार्‍यांनी याची नोंद घ्यावी.

दक्षिण अमेरिकेतल्या कुठल्याशा जमातीच्या ऋषीमुनींनी प्राचीन काळात लिहून ठेवलेल्या भविष्याप्रमाणे सगळ्या जगाचेच २०१२ साली बारा वाजणार आहेत असा धाक काही लोक दाखवत होते. २००० साली वायटूकेमुळे होऊ पहाणारा अनर्थ किंवा त्याचा केला गेलेला बाऊ मानवनिर्मित होता आणि माणसांच्याच सावधगिरीमुळे किंवा हुषारीने तो तर टळला, 'दैवी' सिध्दी प्राप्त झालेल्या लोकांनी वर्तवलेले हे इंकांचे तथाकथित भविष्यही फुसकेच निघाले. तसे ते निघणार यात कसलीही शंका नव्हतीच, त्याने एक मनोरंजन होऊन गेले.

गेल्या काही वर्षात काही लोकांनी मात्र ठरवून हे क्षण संस्मरणीय केले. मुंबईच्या ब्रॅन्डन परेरा आणि एमिली डिसिल्वा यांनी साखरपुडा केला १०/१०/१० रोजी. कोर्टात रजिस्टर लग्न केले ११/११/११ रोजी. आणि चर्चमध्ये देवा-पाद्र्याच्या साक्षीने लग्न केले १२/१२/१२ रोजी! (पुढचे प्लॅनिंग समजले नाही). अशाच एका आकडेवीराने लग्नाचा मुहूर्त ठेवला होता ६ जुलै २००८ ला सकाळी ९ वा. १० मिनिटांचा म्हणजे ६-७-०८:९:१०. आजसुद्धा अनेक उत्साही लोकांनी अशा मुहूर्तांवर लग्नाच्या गाठी बांधल्या असल्याचे सकाळी एका चॅनेलवर दाखवले होते. 

No comments: