Sunday, October 07, 2012

आमचे दादा




माझे वडील सर्व भावंडांमध्ये मोठे होते. त्यांची लहान भावंडे त्यांना 'दादा' म्हणत असत आणि इतर आप्तही त्यांना 'दादा' असे म्हणू लागले. ते ऐकून त्यांची मुलेही म्हणजे आम्ही भावंडे सुध्दा त्यांना 'दादा' म्हणायला लागलो आणि पुढे दादांच्या नातवंडांनीही त्याचे अनुकरण केले. माझ्या वडिलांचे नावच 'दादा' असे पडले होते. पूर्वीच्या काळी अशीच पध्दत रूढ होती. घरातले सारे लोक दादा, अप्पा, नाना, ताई, माई, अक्का अशासारख्या उपनावाने संबोधले जात असत, मग ती व्यक्ती नात्याने काका, मामा, मावशी, आत्या, माता, पिता वगैरे कोणी का असेना ! मोठेपणी कधी त्याचे रूपांतर दादासाहेब, अप्पासाहेब वगैरेंमध्ये होत असे. दादांची पत्नी म्हणून माझ्या आईला 'वहिनी' म्हंटले जात असे. 'वहिनी' या शब्दाचा 'वयनी', 'वैनी' असा अपभ्रंश होऊन अखेर 'वैनी' हेच त्यांचे नाव पडले. आजकाल पितृपक्ष चालला आहे. या पंधरवड्यात आपल्या प्रिय आणि आदरणीय अशा दिवंगत व्यक्तींना श्रध्दांजली अर्पण करावी या विचाराने आज हा लेख लिहीत आहे.

तात्या म्हणजे आमचे आजोबा 'सावळगी' नावाच्या लहानशा गावात (किंवा मोठ्या खेड्यात) स्थाईक झाले होते. त्या काळात हे गाव जमखंडी संस्थानांतर्गत होते, आता हा भाग कर्नाटकातील बागलकोट (पूर्वीच्या विजापूर) जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यात येतो. आपल्या दादांचा जन्म बहुधा सावळगीला झाला आणि बालपण सावळगीतच गेले. तात्या स्वतःच शाळामास्तर असल्यामुळे दादांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्याकडेच झाले आणि त्यांचे माध्यमिक शिक्षण जमखंडी येथील परशुराम भाऊ (पी.बी.) हायस्कूलमध्ये झाले. या शाळेच्या सुवर्ण महोत्सवाच्या स्मरणिकेत उल्लेखनीय माजी विद्यार्थी म्हणून दादांची केलेली नोंद मी लहानपणी पाहिली आहे.

सावळगीपासून जमखंडी गाव बारा मैल (सुमारे एकोणीस कि.मि.) अंतरावर आहे, शिवाय वाटेत जमगी येथे कृष्णा नदी ओलांडावी लागते. पूर्वीच्या काळात वाहतुकीची सोय नव्हतीच. त्यामुळे सावळगीहून जमखंडीला जाण्यासाठी आधी आठ मैल चालत जाऊन, नावेमधून किंवा पोहत नदी पार करायची आणि पुन्हा पुढे चार मैल पायपीट असे करावे लागत असे. एरवी संथपणे वाहणाऱ्या कृष्णामाईला पावसाळ्यात महापूर आला की ती संथ न वाहता अतीशय वेगाने खळाळत धावते आणि तिला येऊन मिळणाऱ्या ओढ्यानाल्यांमध्ये नदीचे पाणी उलट दिशेने शिरल्यामुळे त्यांना सामावून घेऊन कृष्णा नदीचे पात्रच मैल दीड मैल इतके रुंद होते. त्या काळात जमगीपाशी तिला पार करणे दुरापास्त होऊन जाते. अशा अडचणींमुळे शालेय शिक्षणासाठी दादा जमखंडीला स्थायिक असलेल्या आप्तांकडे रहात असावेत.

पहिल्यापासूनच दादा हुषार विद्यार्थी होतेच. कुशाग्र बुध्दी, चांगली आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती हे सर्व गुण त्यांच्या ठायी होते. मॅट्रिक ही त्या काळातली शालांत परीक्षा ते उत्तम गुण घेऊन उत्तीर्ण झाले. त्या काळात जमखंडीच्या आसपास कोठेही पुढील महाविद्यालयीन शिक्षणाची सोय नव्हती. आमच्या आजोबांचे कुटुंब तसे खाऊन पिऊन सुखी असले तरी कॉलेजशिक्षणासाठी रोख पैसे बाजूला काढून देणे त्या काळात बरेच कठीण होते. तात्यांना शिक्षणाचे खूप महत्व वाटायचे आणि दादांनी आपली योग्यता सिध्द करून दाखवली होती. पण संसाधनांचा प्रश्न होता. अशा वेळी "आम्ही वाटल्यास एक वेळ जेवून राहू, पण दादाला कॉलेजला पाठवा." असे दादांच्या लहान बहिणीने म्हणजे आमच्या गंगूआत्यांनी आपल्या वडिलांना सांगितले. ही गोष्ट दादांनी आयुष्यभर लक्षात ठेवली होती आणि त्यांच्या अखेरच्या दिवसात सुध्दा ती जुनी आठवण सांगतांना त्यांना गहिंवरून येत असे. 

अशा ओढाताणीच्या परिस्थितीतही दादा निग्रहाने सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये शिक्षणासाठी गेले आणि त्यांनी बी.ए. ही पदवी संपादन केली. तो सुमारे १९२० ते २२ चा काळ असेल. त्या काळात साधे ग्रॅज्युएशन हीच फार मोठी उपलब्धी असायची. दादाच्या पिढीमधील काका मामांसारख्या आमच्या नातेवाईकांमधला इतर कोणीच तेंव्हा स्नातक झाला नव्हता. त्या काळात बी.ए.नंतर एल. एल. बी. पास करून वकील बनणे हे आजकालच्या इंजिनियरिंग किंवा मेडिकलपेक्षासुध्दा अधिक प्रतिष्ठेचे आणि हमखास चांगले उत्पन्न मिळवण्याचे साधन समजले जात असे. अभ्यास करून ते लक्ष्य गाठण्याएवढी दादांची बौध्दिक पात्रता आणि तयारी होती. सहजपणे छाप पाडणारे प्रभावी व्यक्तीमत्व आणि तर्कशुध्द विचार करून ते सुसंगतपणे मांडण्याची क्षमता वगैरे गोष्टी त्यांच्या बाजूने असल्यामुळे ते वकीलीच्या व्यवसायात यशस्वी ठरलेही असते. पण त्या काळातल्या कौटुंबिक परिस्थितीचा विचार करता त्यांनी या उच्च शिक्षणापेक्षा नोकरी करण्याचा मार्ग स्वीकारला. त्यातही मुंबईपुण्यासारख्या मोठ्या शहरांकडे न वळता घराकडे परत येऊन ते जमखंडी संस्थानाच्या सेवेत रुजू झाले.

जमखंडी संस्थानच्या राज्यकारभारात त्यांनी चांगला लौकिक मिळवला. जमखंडी गावात ते 'रावसाहेब' या नावाने संबोधले जात असत. कर्नाटकातील कुंदगोळ आणि सातारा जिल्ह्यातील शिरवडे या गावी जमखंडीच्या संस्थानिकांच्या जहागिरी होत्या. काही काळासाठी त्या ठिकाणचे वहिवाटदार म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. अर्थातच त्या ठिकाणचे ते सर्वेसर्वा असत. या घटना माझ्या जन्मापूर्वीच्या किंवा मी तान्हे बाळ असतांनाच्या असल्यामुळे मला यातले काहीच आठवत नाही, पण मोठ्या लोकांच्या बोलण्यामधून त्याबद्दल मी असंख्य वेळा ऐकले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही काळासाठी भारतातले सगळे संस्थानिक जवळ जवळ सार्वभौम राजे झाले होते. पण सरदार वल्लभभाई पटेलांनी नेट लावून त्यांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण घडवून आणले. त्या वेळी सर्व संस्थानिकांच्या सेवकांना राज्य सरकारांच्या सेवेत समाविष्ट करून घेण्यात आले. त्या काळात जमखंडी संस्थान मुंबई इलाख्यात होते, त्यामुळे दादांना मुंबई राज्याच्या शासनात पद दिले गेले. पण आता त्यांची बदली जमखंडीहून बाहेरगावी झाली. राज्यपुनर्रचनेनंतर नव्याने निर्माण झालेले त्या काळातले मैसूर राज्य (आताचे कर्नाटक) किंवा द्विभाषिक मुंबई राज्य यातून त्यांना निवड करायची होती. जमखंडी हे गाव मैसूर राज्यामध्ये गेल्यामुळे दादांनीही तिथून जवळ राहण्याच्या दृष्टीने मैसूर राज्याच्या सेवेत जाण्याचे ठरवले. त्यानंतर त्यांना जमखंडीचे पोस्टिंग मात्र कधीच मिळाले नाही. 

या काळात नोकरीच्या गावी ते एकटेच रहात असत आणि आमच्या एकत्र कुटुंबातील इतर सगळे सदस्य जमखंडीच्या घरात रहात. मला कळायला लागल्यापासून मी हीच परिस्थिती पहात मोठा झालो. दरवर्षी दिवाळीला आणि आजी आजोबांचे श्राध्द व सर्व पितरांचे पक्ष या कार्यासाठी दादा न चुकता जमखंडीला येऊन जात. त्याशिवाय महिना दोन महिन्यातून एकाद्या दिवशी धूमकेतूसारखे अचानक येऊन एक दोन दिवसात परत जात असत. त्यांच्या या भेटीमागे काही कारण असले तरी त्याची चर्चा मुलांसमोर कधीच होत नसे. बहुतेक वेळी ते आले म्हणून घरात आनंदाचे वातावरण व्हायचे त्यात आम्हीसुध्दा खूष होत असू. श्राध्दपक्षाच्या दिवशी कोणत्या पुरोहितांना बोलवायचे, नैवेद्याला कोणते विशिष्ट पदार्थ करायचे, गावातील कोणकोणत्या इतर नातेवाईकांना तर्पण आणि प्रसादासाठी घरी बोलवायचे वगैरेबद्दल ठरलेले परंपरागत नियम होते आणि घरातल्या सर्वांनाच ते चांगले ठाऊक होते. इतर वेळी दादांच्या आगमनानंतर त्यांच्या मित्रमंडळींचे संमेलन हमखास भरत असे. त्यासाठी बोलवायच्या लोकांची यादी वेगळी होती. ते मित्र जमले की त्यांच्या हंसण्याखिदळण्याला ऊत येत असे, पण त्यांचे बोलणे ऐकण्याला मुलांना सक्त बंदी असल्यामुळे त्या काळात तरी मला त्याचे कुतूहल वाटत असे. त्यात काही चावटपणा किंवा नॉनव्हेज जोक्सचा भाग असणार हे दहा बारा वर्षांनंतर माझ्या लक्षात आले.

नोकरीत असतांना दादांच्या अनेक ठिकाणी बदल्या झाल्या, पण त्या काळात भूगोलाचे फारसे ज्ञान नसल्यामुळे मला त्याचा अर्थ समजत नव्हता आणि त्या गावांची नावेही आता स्मरणातून नाहीशी झाली आहेत. धारवाड जिल्ह्याच्या पार दक्षिणेच्या टोकाला असलेल्या राणीबिन्नूर या गावी ते असतांना मे महिन्याच्या सुटीत आम्हीही तिकडे गेलो होतो. माझ्या आठवणीतला तो पहिलाच लांबचा प्रवास असल्यामुळे कायमचा चांगला लक्षात राहिला आहे. त्यानंतर काही वर्षे ते बागलकोट जवळील इलकल या गावी होते. हातमागावर विणलेल्या काठापदरांच्या खास इरकली लुगड्यांसाठी हे गाव प्रसिध्द आहे. दादा इलकल येथे असतांना त्याच्यासाठी रोज एस् टी बसमधून जेवणाचा डबा पाठवला जात असे आणि त्यासोबतच आम्ही पत्रेही पाठवत असू. इंग्रजी आणि गणित यासारख्या काही विषयांमधील प्रश्नोत्तरे मी त्यांना लिहून पाठवत होतो आणि ती तपासून त्यामधील चुका आणि दुरुस्त्या दादा लगेच पाठवत असत. अशा प्रकारे ते दूर राहूनही माझा अभ्यास घेत होते.

१९५८ साली रिटायरमेंटनंतर दादा कायमचे राहण्यासाठी जमखंडीला आले. तोपर्यंत माझे सर्व मोठे भाऊ कॉलेजचे शिक्षण किंवा नोकरीसाठी परगावी रहात होते. जमखंडीच्या घरात दादा, वैनी, सोनूआत्या आणि मी एवढे चारजणच होतो. दिवाळीच्या वेळी मात्र सगळी मंडळी गोळा झाली की घर भरून आणि गजबजून जात असे. 

दादांचा कल आधीपासून देवभक्तीकडे होताच, रोज पहाटे जाग आल्यानंतर अंथरुणावर पडल्यापडल्याच ते अभंग म्हणत असत. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आणि इतर संतांचे शेकडो अभंग त्यांना तोंडपाठ होते, त्यांना संगीताचे ज्ञान होते आणि अत्यंत सुरेल आवाजात आणि चिपळ्यांच्या ठेक्यात ते अभंग गात असत. सेवानिवृत्तीनंतर ते पूर्ण वेळ भक्तीमार्गाला लागले होते. दररोज विठ्ठल मंदिरात आणि विशिष्ट दिवशी दत्ताच्या देवळात ते भजनासाठी जात होते. अधून मधून त्यांची प्रवचनेही होत असत. या काळात मित्रमंडळींच्या टोळक्यांच्या बैठका कमी कमी होत बंदच पडल्या किंवा दादांनी त्यात सहभागी होणे थांबवले होते.

दादा संस्कृत भाषेतले पंडित होते. जमखंडीच्या राजपुत्राच्या मौंजीबंधनाच्या वेळी त्यांनी संस्कृतमध्ये मंगलाष्टके रचली होती. कवितांमधील विविध वृत्ते, छंद वगैरेंचे समग्र ज्ञान त्यांना होते. घरामधील लग्नमुंजींसारख्या प्रसंगी घरातल्या मुलांनी मंगलाष्टके रचण्याची सुरुवात माझ्या सर्वात मोठ्या भावापासून झाली होती आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली ती परंपरा माझ्यापर्यंत आली होती. ते भारतीय पध्दतीच्या बुध्दीबळामध्ये निष्णात होते. या खेळात विरुध्द पक्षाचे सर्व मोहरे मारून चालत नाही. त्याचा कमीत कमी एक मोहरा जीवंत ठेऊन त्याच्यावर मात करावी लागत असे. आमच्याशी खेळतांना ते चांगल्या खेळी रचून आधी आमचे बरेचसे मोहरे खाऊन टाकत, पण उरलेला शेवटचा मोहरा मात्र मरणाची भीती नसल्यामुळे धीटपणे कसाही वावरत असला आणि बिनधास्तपणे कुठेही घुसत असला तरी त्याला न मारता त्याचा हल्ला चुकवून तो खेळ ते जिंकत असत. शिवाय मात देणारा शेवटचा शह प्यादे किंवा घोड्यानेच देऊन मात करायची अशा गंमती ते आधी सांगून करून दाखवत असत. पाश्चात्य नियमांप्रमाणे चेस खेळून त्यांनी स्पर्धेत भाग घेतला असता तरीही त्यांनी त्यात नक्कीच बक्षिसे मिळवली असती. पण त्यांच्या काळात कदाचित अशा स्पर्धा होत नसाव्यात.

त्या काळात तशी विचित्र पध्दतच होती की काय ते देव जाणे, पण घरातल्या कर्त्या पुरुषांचा प्रमाणाबाहेर दरारा असायचा. काही कामासाठी दादा घराबाहेर गेलेल्या वेळी इतर लोक हास्यविनोद किंवा वादाडी करू शकत, पण दादांचे पाऊल उंबऱ्यात पडल्याची चाहूल आली की सगळेजण चिडीचुप्प होऊन जात असत. त्यानंतर कोणीही मोठ्या आवाजात बोलायचे नाही, रडायचे, ओरडायचे किंवा भांडायचे तर नाहीच अशी सक्त ताकीद लहान मुलांना दिली जात असे. शोले चित्रपटातला "यहाँसे पचास पचास कोसतक .." हा सुप्रसिध्द संवाद ऐकल्यानंतर मला अचानक दादांची आठवण झाली. त्यांना कोणीही कसलाही प्रश्न विचारायचा नाही, उलट उत्तर तर नाहीच, सरळ उत्तरसुध्दा शक्य तोवर मान हलवून निःशब्दपणे द्यायचे असा अलिखित नियम होता. अनवधानाने, अज्ञानामुळे किंवा गैरसमजुतीमधून त्यांनी एकादे चुकीचे विधान केले तरी ती चूक दाखवून देणे हा अक्षम्य अपराध होता. लहान असतांना हे ठीक होते, पण मलाही कॉलेजात गेल्यावर शिंगे फुटायला लागली, मी बाहेरचे जग पाहिले आणि मला ते वागणे पटेनासे झाले, पण गत्यंतर नव्हते. त्यामुळे माझ्या मनाची एक प्रकारची कुचंबणा होत होती. मनात एक प्रकारची आढी निर्माण होत गेली. त्यात माझ्या भल्यासाठी त्यांनी सांगितलेल्या काही चांगल्या गोष्टीसुध्दा त्यावेळी मनाविरुध्द असल्यामुळे अनावश्यक किंवा अतीशयोक्त वाटल्या होत्या. मला त्यांचे मोल कित्येक वर्षांनंतर समजले. पण दादा हयात असेपर्यंत त्यांच्याबरोबर मनमोकळा संवाद करण्याचा मार्ग उपलब्ध नव्हता आणि मला तो कधीच करता आला नाही ही खंत मात्र मनात राहून गेली. 

मला इंटर सायन्सच्या परीक्षेत सुवर्णपदक मिळाले होते, पण त्याबद्दल मला दादांच्याकडून  शाबासकी मिळाली नाही अशी समजूत करून घेऊन मी उगाचच खट्टू झालो होतो. मुलांचे जास्त कौतुक केले तर ते त्यांच्या डोक्यात जाऊन ती बिघडतात अशी त्यांची थिअरी होती. वास्तविक पाहता ही गोष्ट ते अभिमानाने गावात इतरांना सांगत होते हे मला नंतर समजले. कॉलेजमधील बक्षीससमारंभात मला ते पदक मिळाल्यानंतर मी सुटीसाठी घरी जाण्यापूर्वीच दादा आजारी पडल्याचे समजले. अशा वेळी त्यांना भेटायला जातांना सोबत पदक घेऊन जाणे योग्य ठरेल की नाही अशी शंका माझ्या मनात आली. शिवाय मनातील बारीकशा आढीमुळे मला मिळालेले सुवर्णपदक त्यांना दाखवायला मी बरोबर घेऊन गेलो नाही. आमच्या दुर्दैवाने त्या दुखण्यामधून ते वाचले नाहीत, माझ्या आठवणीतला तो त्यांचा पहिलाच मोठा आजार शेवटचा ठरला आणि आपल्या या मूर्खपणाची हुरहूर माझ्या मनात कायमची मनात राहून गेली.

दादा गेले तेंव्हा आमचे कुटुंब एकखांबी तंबूसारखे होते. तो आधार अचानक नाहीसा झाल्यानंतर होणाऱ्या पडझडीत आमचे काय होईल याची कल्पनाच करवत नव्हती. पण त्यांनी आयुष्यभर कमावलेली पुण्याई आमच्या पाठीशी होती आणि त्यांनी आम्हाला दिलेली शिकवण लाखमोलाची होती. माणसे जोडणे हा त्यांचा सर्वात मोठा विशेष होता. त्यांच्या संपर्कात आलेल्या असंख्य लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल श्रध्देची भावना होती. कोणत्याही रीतीने मदत करून त्यांच्या ऋणामधून मुक्त होण्याचा प्रयत्न ते करत होते. कोणीही आम्हाला एकटे वाटू दिले नाही. काटकसर करून साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचा वस्तुपाठ दादांनी स्वतःच्या आचरणातून आम्हाला दिला होता. घरातले कोणतेही काम घरातील सर्वांना यायलाच पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असे. त्या बाबतीत ते मुलगा आणि मुलगी यात भेदभाव करत नव्हते. त्यामुळे शेणाने जमीन सारवणे, त्यावर रांगोळी काढणे, भांडी घासणे, कपडे पिळून वाळवत टाकणे यासारखी बायकांची समजलेली कामे मी मुलगा असूनसुध्दा गरज पडल्यास करत आलो होतो. घरातले कोणतेही काम आपले असते, त्यासाठी गडीमाणसे किंवा कामवाल्या बायका येत असल्या तरी ते काम त्यांचे ठरत नाही, त्याची मुख्य जबाबदारी घरातल्यांच्यावरच असते हे त्यांनी सर्वांच्या मनावर इतके ठसवले होते की एकाद वेळेस ते काम करणारी व्यक्ती गैरहजर किंवा आजारी असली तरी इतर लोक ते काम बिनबोभाटपणे करून टाकत. कुठलेही काम कमीपणाचे न समजता ते मन लावून केले पाहिजे असे त्यांनी सांगितले होतेच, त्याची गुणवत्ता (क्वालिटी) चांगलीच असली पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. कसलाही कामचुकारपणा किंवा थातुरमातुरपणा ते मुळीच सहन करून घेत नसत. त्यात चुका आढळल्यास ते त्या लगेच दुरुस्त करायला लावत. यामुळे आम्हाला अभ्यासासकट सगळी कामे आळस न करता मन लावून करायची सवय लागली ती आयुष्यभर उपयोगी पडली. 

दादाच्या बद्दल सांगण्यासारखे इतके आहे की ते कधीच लिहून संपणार नाही. शिवाय भावना आणि विचार यांची गल्लत होऊन लिहिणे कठीण होत राहणार. या कारणामुळे मी यापूर्वी तसा प्रयत्नही केला नव्हता. आज थोडा धीटपणा करून एक अंधुकशी झलक थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तो गोड मानून घ्यावा.

2 comments:

Unknown said...

खूप छान आम्ही दादांच्या बद्दल ऐकून होतो, कारण आम्ही तुमच्या घरात 67 ते 74 राहत होतो, प्रदीप आपटे

Anonymous said...

Khup chan dole panavale dhanyavad