Wednesday, October 10, 2012

आमच्या वैनी



माझे वडील सर्व भावंडांमध्ये मोठे असल्यामुळे त्यांची भावंडे त्यांना 'दादा' म्हणत असत आणि त्यांचे नावच 'दादा' असे पडले होते. पूर्वीच्या काळी अशीच पध्दत रूढ होती. घरातले सारे लोक दादा, अप्पा, नाना, ताई, माई, अक्का अशासारख्या उपनावाने संबोधले जात असत, मग ती व्यक्ती नात्याने काका, मामा, मावशी, आत्या, माता, पिता वगैरे कोणी का असेना ! दादांची पत्नी म्हणून माझ्या आईला 'वहिनी' म्हंटले जात असे. 'वहिनी' या शब्दाचा 'वयनी', 'वैनी' असा अपभ्रंश होऊन अखेर 'वैनी' हेच त्यांचे नाव पडले. माझ्या काकूंना मात्र त्यांच्या मुली 'ताई' म्हणत आणि आम्ही मुले नात्याप्रमाणे 'काकू' किंवा 'मामी' म्हणत होतो.

आमच्या वैनींचा जन्म मध्यप्रदेशातल्या होशंगाबाद या गावी झाला होता. त्या लहान असतांनाच त्यांचे काका त्यांना जमखंडीला घेऊन आले आणि कालांतराने लग्न होऊन त्या तिथेच राहिल्या. ही हकीकत मला माहीतसुध्दा नव्हती. त्या माझ्याकडे मुंबईला रहात असतांना एकदा रेशनिंगचा किंवा खानेसुमारीचा असा कोणतासा फॉर्म भरण्याच्या वेळी मला ते कळले. माझ्या लहानपणापासून वैनींच्या माहेरचे कोणीच सख्खे नातेवाईक नव्हते. त्यांचे एक चुलत भाऊ जमखंडीलाच रहात होते ते गोविंदमामा तेवढे चांगल्या परिचयाचे होते. त्यांच्या घरी आमचे नेहमी जाणे येणेही होत असे. त्या मामांचे सख्खे भाऊ आणि बहिणी परगावाहून अधून मधून कधी जमखंडीला आले तर आम्हालाही भेटून जायचे त्यामुळे ते परिचयाचे होते. आमच्या वैनी आणि (त्यांच्यासोबत मी) माहेरपणासाठी कुणाकडे आठ दहा दिवस जाऊन राहिल्याचे मात्र मला आठवत नाही. 'धुरांच्या रेघा' हवेत काढणाऱ्या 'झुकुझुकुगाडी'त बसून 'पळती झाडे' पहात 'मामाच्च्या गावाला' जाण्याचे भाग्य मला तरी कधीच लाभले नाही. वैनींनी आपणहून सहसा कधी त्यांच्या माहेरच्या लोकांचा विषय काढला नाही की घरातील इतरांच्या बोलण्यात तो कधी आल्याचे मला आठवत नाही. थोडक्यात सांगायचे झाल्यास त्या ९९.९९ टक्के सासुरवाशीण झाल्या होत्या. आमच्या काकूंची गोष्ट वेगळी होती. त्यांचे माहेर गावातच होते आणि अधूनमधून त्या तिकडे जाऊन काही दिवस राहून येत असत. त्यांच्या बोलण्यातही नेहमी त्यांच्या माहेरकडल्यांचे कौतुक येत असे.

मी लहान असतांना आमचे दादा नोकरीमुळे परगावी रहात असत. त्यामुळे आमच्या एकत्र कुटुंबाची सगळी व्यवस्था पाहण्याची जबाबदारी वैनींच्यावर असे आणि ती गोष्ट त्या अत्यंत कौशल्याने आणि सक्षमपणे करत होत्या. मोठ्या एकत्र कुटुंबातल्या लोकांच्या निरनिराळ्या पसंती, आवडीनिवडी असतात. प्रत्येकाचे वेगळे स्वभाव, टेंपरामेंट असतात, मानापमानाच्या वेगळ्या कल्पना असतात. त्या सर्वांची मर्जी राखून, गोडीगुलाबीने पण परंपरेनुसार योग्य त्या रीतीने सगळ्या गोष्टी करवून घ्यायच्या ही तारेवरची कसरत करणे वैनींना जमत असे. यासाठी ते काम करणारा माणूस एकच गोष्ट करू शकतो, ती म्हणजे स्वतःच्या आवडीनिवडी आणि अहम् (इगो) यांना थोडा वेळ बाजूला ठेवणे. बहुतेक वेळी वैनी हेच करत होत्या. पण गरज पडल्यास त्या खंबीरपणाही दाखवत असत. 

पू्वी आमच्या घरातल्या संयुक्त कुटुंबामधील सदस्यांची संख्या बरीच होती, शिवाय परगावाहून येणाऱ्या जाणाऱ्यांचे प्रमाणही बरेच होते. गावात कोणा आप्ताचे घर असतांना हॉटेलात जाऊन राहणे किंवा जेवणे याची त्या काळात कल्पनाही केली जात नव्हती. त्यामुळे त्या सर्वांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था आमच्या स्वयंपाकघरातूनच केली जात असे. गॅस, कूकर, मिक्सर, ओव्हन यासारखी वेळ आणि कष्ट वाचवणारी साधनेही तेंव्हा उपलब्ध नव्हती. 'रेडी टु ईट' असे तयार खाद्यपदार्थ किंवा एमटीआरचे सेमीकुक्ड प्रॉडक्ट त्या काळी बाजारात मिळत नव्हते. कच्च्या मालापासून सुरुवात करून सर्व पाकक्रिया घरीच करावी लागत असे. त्यामुळे गृहिणींचा संपूर्ण दिवस स्वयंपाकघरात राबण्यातच जात असे.

स्वयंपाकातले कलाकौशल्य वैनींना अवगत होतेच, त्यातले विज्ञान त्यांना चांगले समजले होते आणि त्याचा उपयोग करून त्यातील तंत्रज्ञानाचा त्या कुशलपणे उपयोग करून घेत होत्या. वहन, अभिसरण आणि उत्सर्जन (कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन) या तीन प्रकाराने ऊष्णता इकडून तिकडे जात असते याचे ज्ञान त्यांनी थर्मोडायनॅमिक्स विषयाच्या पुस्तकात वाचले नव्हते आणि त्यातली समीकरणे मांडून ती सोडवणे त्या शाळाकॉलेजात जाऊन शिकल्या नव्हत्या. पण या सर्वांचा उत्तम अंदाज त्यांना अनुभवाने आला होता. कच्च्या मालापासून कोणताही खाद्यपदार्थ तयार करतांना त्याला तव्यावर किंवा प्रत्यक्ष आगीत घालून भाजणे, उकळत्या पाण्यात बुडवून ठेवून किंवा नुसत्या वाफेवर शिजवणे आणि तापलेल्या तेलात किंवा तुपात तळणे किंवा परतणे (बेक, रोस्ट, बॉइल, डीप किंवा शॅलो फ्राय) या प्रक्रियांचा उपयोग केला जातो. त्यासाठी कशा प्रकारच्या किती ऊष्णतेची आवश्यकता असते, त्याला किती वेळ लागतो आणि त्या प्रक्रियांमध्ये त्या पदार्थावर ऊष्णतेचा परिणाम होऊन त्यांच्या गुणधर्मांमध्ये कसे बदल होत असतात वगैरेंचे त्यांनी अत्यंत बारकाईने निरीक्षण केले होते. चुलीवर ठेवलेल्या भांड्यामधून बाहेर पडणारी वाफ, ऊष्ण हवा किंवा धूर पाहून, त्यामधून पसरणारा गंध, त्यावेळी होणारा सूक्ष्म आवाज वगैरेमधून त्या पात्राच्या आत काय चालले आहे याचा अचूक अंदाज त्यांना येत असे. कोणत्या पदार्थासाठी कोणते पातेले, कढई किंवा तवा घ्यायचा, कोणती चूल, शेगडी किंवा स्टोव्ह पेटवायचा वगैरे गोष्टी त्या पदार्थाच्या कृतीवर विचार करून त्या अचूकपणे ठरवायच्या. गरज पडल्यास काही खास पदार्थासाठी मुद्दाम वेगळ्या प्रकारची चूल किंवा शेगडी त्या दगडमातीमधून स्वतःच तयार करून घेत असत. 

मी आठवी नववीत गेल्यानंतर वैनींना मदत करण्यासाठी अधून मधून आमच्या स्वयंपाकघरात जाऊ लागलो होतो. त्यांनी मला एकही रेसिपी सांगितली नाही, एकाही विशिष्ट पदार्थाची कृती शिकवली नाही, पण वर दिलेल्या सर्व औष्णिक प्रक्रिया आणि कुटणे, वाटणे, खोवणे, दळणे, लाटणे यासारख्या यांत्रिक (मेकॅनिकल) क्रियांसंबंधी मूलभूत माहिती दिली आणि मी जर हे शिकून घेतले आणि लक्षात ठेवले तर पुढील आयुष्यात मला हवा तो पदार्थ करता येईल असे शिकवले. यालाच खरे शास्त्रीय शिक्षण म्हणतात. जमखंडीतल्या आमच्या स्वयंपाकघरातले पाटा-वरवंटा, उखळ-मुसळ, चूल-फुंकणी, सूप यासारखे कोणतेही उपकरण आमच्या आताच्या घरात नाही आणि आमच्या आताच्या स्वयंपाकघरातली फ्रिज, ओव्हन, फूड प्रोसेसर यातली एकही वस्तू त्या काळात उपलब्ध नव्हती. पण लहानपणी खाल्लेले खाद्यपदार्थ मात्र आम्ही आताही तयार करू शकतो कारण त्याच्या मागे असलेले पाकशास्त्र तेच आहे.

त्या काळात आमच्या स्वयंपाकघरात कुकिंग गॅस आणि विजेचा वापर होत नव्हता. वखारीतून फोडून आणलेली बाभळीची कोरडी लाकडे हे मुख्य इंधन होते आणि अर्धवट जळलेल्या लाकडांपासून कोळसा बाजूला काढून त्याचा उपयोग शेगड्यांमध्ये केला जात असे. न जळलेले लाकडाचे तुकडे, रद्दी कागद, चिंध्या, नारळाच्या करट्या वगैरे सटरफटर गोष्टी बंबार्पण केल्या जात असत. याशिवाय ऑइल मिल्समधून भुईमुगाची टरफले आणि सॉमिल्समधून लाकडाचा भुसा अशा वेगळ्या टाकाऊ वस्तू घरी आणून त्यांचा इंधनासाठी उपयोग करायचे स्पेशल तंत्रज्ञान वैनींकडे होते किंवा त्यांनी ते विकसित केले होते. त्यासाठी पत्र्यांच्या रिकाम्या डब्यांपासून खास प्रकारच्या शेगड्या त्या मुद्दाम तयार करून घेत असत. आमच्या घरात कसल्याही प्रकारची भट्टी किंवा ओव्हन नव्हती, पण अनेक ड्रॉवर असलेला एक पत्र्याचा डबा वैनींनी कुठून तरी आणला होता. त्याच्या खाली, वर आणि बाजूला निरनिराळ्या प्रकारांनी गरम हवा खेळवून त्या मस्त खुसखुशीत बिस्किटे घरीच तयार करत असत. कोणताही नवा पदार्थ खात असतांना तो कशापासून तयार केला गेला असेल आणि त्यात कोणकोणती इतर खाद्य द्रव्ये मिसळली असतील हे त्यांना चवीवरून समजत असे आणि लहान प्रमाणात प्रयोग करून तो पदार्थ स्वतः बनवून पहाण्याचा छंद त्यांना होता. हे करतांना त्यांना सामान वाया जाण्याची भीती वाटत नसे. ते तसे होऊच देत नसत. त्यांनी ठरवलेला पदार्थ त्यांच्या अपेक्षेनुसार होतांना दिसला नाही तर मध्येच त्यात बदल करून त्यातून एक वेगळा चांगला पौष्टिक व रुचकर पदार्थ करणे हा त्यांच्या हातचा मळ होता. यामुळे आम्हालाही अनेक नवे नवे अनोखे पदार्थ खायला मिळाले.

विणकाम, भरतकाम, शिवणकाम इत्यादी कलांची साधारण मूलभूत माहिती वैनींना होती, पण त्यांना त्यांची मनापासून खूप आवड नसावी. स्वयंपाकघरातील कामे संपल्यावर उरलेला वेळ अशा प्रकारच्या कलाकुसरीच्या आणि शोभेच्या कामामध्ये घालवण्यापेक्षा तो वाचनात घालवणे त्यांना आवडत असे. त्यांचे वाचन मुख्यतः धार्मिक स्वरूपाचे होते, पण त्यांचे अवांतर वाचनसुध्दा भरपूर होते. मासिकांमधून येणारे लेख, कथा वगैरे साहित्य त्या आवडीने वाचत असत. त्यात मनोरंजनापेक्षा ज्ञानाला जास्त प्राधान्य असायचे. आमच्या घरात असलेली बहुतेक सगळी धार्मिक पुस्तके अनेक वेळा वाचून आणि पोथ्यांची पारायणे करून त्यांना ती जवळ जवळ तोंडपाठ झाली असतील. त्यांना संगीताचे वावडे नव्हते, साधे गाणे ऐकायला आवडत होते, पण संगीताच्या शास्त्रात मात्र त्यांना रुची किंवा गती नव्हती. संतांनी लिहिलेले अभंग, ओव्या वगैरेंचा खूप मोठा स्टॉक त्यांच्याकडे होता. त्यांना प्रसंगानुसार यथायोग्य अशा म्हणी, वाक्प्रचार किंवा सुवचने तत्काळ सुचत असत. रामायण, महाभारत आदि पुराणकालातल्या कथांमधील सगळी मुख्य पात्रे तर त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक होतीच, शिवाय त्या पात्रांचे काका, मामा, नणंदा, भावजया वगैरे आप्तसंबंधींची नावे आणि त्यांचा इतिहासही त्या सविस्तर सांगत असत. त्या पौराणिक कथा छान रंगवून सांगत असत. त्यांच्याकडे काव्य लिहिण्याची प्रतिभा आणि त्याचा छंद होता. त्यांनी लिहिलेल्या काही कवनांचे संकलन धनंजयने केले आहे. त्यात देवाची स्तुती, प्रार्थना वगैरे आहेत, काही पौराणिक आख्याने आहेत, एक दोन व्यक्तीगत स्वरूपाच्या कविता आहेत.

जमखंडीला त्यांच्या समवयस्क आणि समविचारी महिलांचा ग्रुप होताच, सवड मिळेल तेंव्हा भेटून त्या गप्पागोष्टींबरोबर थोडे वाचन, पठण, मनन. चिंतन, चर्चा वगैरे करत असत. नंतरच्या काळात त्या बार्शी किंवा अणुशक्तीनगरला असतांनासुध्दा त्यांच्याभोवती अशी मंडळे गोळा होत असत आणि त्यांच्या सुसंस्कृत सहवासाचा लाभ घेत असत. त्यांनी स्वतःचे म्हणून कसले विचार मांडून इतरांना उपदेश करण्याचा आव कधी आणला नाही, पण मुख्यतः संतविभूतींच्या काव्यामधील ओळी उद्धृत करून किंवा त्यांच्या जीवनामधील घटनांचे दाखले देऊन त्या सर्वांना योग्य असे मार्गदर्शन करत असत. स्वतःच्या जीवनातसुध्दा त्यांनी अशाच प्रकारे नेहमी योग्य निर्णय घेतले असतील, आणि त्याला इतस्ततः भरकटू न देता योग्य ती दिशा दिली असेल हे वेगळे सांगायची गरज नाही. सभोवतालच्या जगात बरीवाईट माणसे असतात, त्यांच्या कृती चांगल्या किंवा वाईट असतात, त्यातल्या चांगल्याकडे आपण पहावे, त्यात समाधान मानावे, इतरांमधल्या वाईटाचा विचार करून स्वतःला त्रास करून घेण्यात अर्थ नाही, आपण त्यापासून सावध व्हावे, आपल्याला उपसर्ग होणार नाही किंवा त्रास झाला तर तो कमी व्हावा असा प्रयत्न करावा असे त्या सांगत असत. पुढील आयुष्यात ऑफीसचे हजारो रुपये खर्च करून आयोजित केलेल्या कार्यशाळांमध्ये सकारात्मक विचारपध्दतीबद्दल मी जे शिकलो त्याची बीजे लहानपणी वैनींनी माझ्या मनात पेरलेली होती हे ते शिकतांना मला जाणवत होते.

कोठल्याही नव्या गोष्टीबद्दल त्यांना प्रचंड उत्साह असायचा आणि नवनिर्मितीचे खूप कौतुक वाटत असे. घरातल्या किंवा परिसरातल्या कोठल्याही समारंभाच्या वेळी त्यांच्या अंगात हत्तीचे बळ येत असे आणि त्यात त्या उत्साहाने पुढाकार घेत असत. त्यातल्या बारीकसारीक बाबी त्या काळजीपूर्वक पहात असत. त्यांनी मला सांगितलेले कुठलेही काम "मला येत नाही किंवा जमणार नाही." असे म्हणून टाळणे शक्यच नव्हते. "येत नसेल तर शिकून घे, जमणार नाही असे वाटत असेल तर आधी प्रयत्न तरी करून बघ. जमेल तेवढे तरी कर, त्यात काय प्रॉब्लेम येतात ते आपण पाहू." असे सांगून ते काम त्या करवून घेत असत. "या पूर्वी मी हे काम कधी केले नाही." हे उत्तर तर त्यांना अजीबात मान्य नव्हते. "केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे।" हे समर्थ रामदासांचे वचन लगेच त्यांच्या ओठावर यायचे. कोणतीही गोष्ट कधी तरी कोणी तरी पहिल्यांदा केलीच होती असा त्यांचा युक्तीवाद असे. "बालपणी बाळांची कोमल तरुतुल्य बुध्दी वाकेल। घेईल ज्या गुणांना ते गुण विकसून तेही फाकेल ।।" असा त्यांचा एक आवडता श्लोक होता. त्यामुळे लहानपणी कुठल्याही विषयातले जे जे काही ग्रहण करता येईल ते सगळे आमच्या डोक्यात कोंबण्याच्या दृष्टीने त्या प्रयत्नशील असत. पण ते आमचा मूड पाहून आमच्या कलाकलाने होत असल्यामुळे त्याचा भडिमार वाटत नसे किंवा वैताग येत नसे.

"दादांच्या बद्दल सांगण्यासारखे इतके आहे की ते कधीच लिहून संपणार नाही. शिवाय भावना आणि विचार यांची गल्लत होऊन लिहिणे कठीण होत राहणार. या कारणामुळे मी यापूर्वी तसा प्रयत्नही केला नव्हता. आज थोडा धीटपणा करून एक अंधुकशी झलक थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे." असे मी मागील लेखात लिहिले होते. वैनींच्या बाबतीत ते शंभरपट जास्त प्रकर्षाने जाणवते. एक तर त्यांचा सहवास खूपच निकटचा होता आणि आम्हाला तो तुलनेने दीर्घ काळ लाभला. मी लहान असतांना मला मिळालेल्या संस्कारांबद्दल मी थोडेसे वरील परिच्छेदांमध्ये लिहिले आहे. मोठेपणीसुध्दा सतत त्यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन आणि भक्कम आधार आम्हाला मिळत राहिला. जीवनामधली त्यांची जागा कधीही भरून निघाली नाही आणि निघणारही नाही हे निदान माझ्या बाबतीत तरी शंभर टक्के खरे आहे.



No comments: