Tuesday, October 02, 2012

गणपती बाप्पा वर्तमानपत्रांमधला - भाग ६ - टिळकांच्या काळातली आणि आताची परिस्थिती (उत्तरार्ध)

"आजच्या काळातसुध्दा गणेशोत्सव साजरे होतच आहेत, शिवाय त्याच्या आकारात अनंतपटीने वाढच होत चालली आहे. याचे कारण म्हणजे हा उत्सव ही या काळातली गरज राहिलेली नसली तरी त्यातून अनेक प्रकारचे लाभ मिळतात." असे मी मागील लेखाच्या अखेरीस लिहिले होते. हे लाभ कशा प्रकारचे आणि कोणाला मिळतात या प्रश्नाला एकच उत्तर नाही. आजच्या सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये अनेक प्रकार आहेत आणि त्या प्रत्येकांमागे निरनिराळे उद्देश असतात, त्यानुसार त्यांचे फायदे संयोजकांना मिळतात.

लोकमान्य टिळकांच्या काळापासून चालत असलेली आणि त्यावरून प्रेरणा घेऊन सुरू झालेली काही गणेशोत्सव मंडळे अद्याप कार्यरत आहेत. समाजसेवेच्या उद्देशाने काम करणा-या सेवाभावी संस्था आहेत. टिळकांच्या काळातली बहुतेक उद्दिष्टे आज शिल्लक राहिलेली नसली तरी वेळोवेळी समाजापुढे असलेल्या मुद्द्यांवर आणि समस्यांवर प्रकाशझोत टाकण्याचे काम ही मंडळी करीत आली आहेत. चित्ताकर्षक देखावे, पोस्टर्स, पॅम्फ्लेट्स, व्याख्याने, वादविवाद स्पर्धा, चर्चासत्रे अशा निरनिराळ्या मार्गाने ही मंडळी गणेशोत्सवात समाजाचे प्रबोधन करतात. महात्मा गांधींच्या काळात दारूबंदी, अस्पृश्यतानिर्मूलन, खादी व ग्रामोद्योग यासारखे विषय होते, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पंचवार्षिक योजना, औद्योगिक क्रांती, समाजवादी विचारसरणी, शिक्षणाचा प्रसार यासारखे विषय आले तर चीन आणि पाकिस्तानबरोबर होऊन गेलेल्या युध्दांच्या काळात देशाचे संरक्षण हा ज्वलंत मुद्दा होता. गेल्या दोन तीन दशकांच्या काळात अवकाशात भरारी, संगणकक्रांती, माहितीतंत्रज्ञान, धूम्रपानबंदी, पोलिओचे निर्मूलन, एड्स, स्वाईन फ्ल्यू, अपहरण, दहशतवाद आदि अनेक विषयांकडे लक्ष वेधले गेले होते. पर्यावरणाचे संरक्षण हा तर हल्लीच्या काळातील गणेशोत्सवांमध्ये कळीचा मुद्दा बनून गेला आहे. पॅकिंगसाठी थर्मोकोल आणि बांधकामासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे जेवढे उत्पादन वर्षभर सतत होत असते त्याच्या तुलनेत पाहता या पदार्थांचा गणेशोत्सवामध्ये होणारा उपयोग अगदी नगण्य असतो अशी वस्तुस्थिती असली तरी जणू काही गणेशोत्सवामुळेच पर्यावरणाचा सत्यानाश होणार आहे अशा थाटाचा प्रचार होत असतो. पण या निमित्याने का होईना, पर्यावरणाच्या जपणुकीकडे लोकांचे लक्ष वेधले जात आहे ही चांगली गोष्ट आहे. या वर्षी आम्ही सुध्दा शंभर टक्के पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा केला. आवर्जून शाडू मातीची मूर्ती आणली, कागद, कापूस आणि कापड यांच्यातून देखावा निर्माण करून आरास केली. उत्सव संपल्यानंतर ते पदार्थसुध्दा व्यवस्थित गुंडाळून ठेवले आणि गणेशमूर्तीचे विसर्जन तात्पुरत्या उभारलेल्या पाण्याच्या कृत्रिम टाकीत केले. अशा प्रकारे या वर्षी आम्ही मुळामुठा नद्यांच्या पात्रात एक कणसुध्दा टाकला नाही. ज्या गणेशोत्सवांमध्ये सामाजिक विषय किंवा तत्कालीन समस्यांकडे लक्ष वेधले जाते त्याचा समाजावर चांगला परिणाम होण्याची शक्यता असते.

मुंबईमधील लालबागचा राजा आणि पुण्यातला दगडूशेठहलवाई गणेशोत्सव यासारख्या अनेक उत्सवांमधील मूर्ती आता असंख्य भाविकांची श्रध्दास्थाने बनल्या आहेत. हे देव नवसाला पावतात या विश्वासाने त्यांचे दर्शन घेऊन त्यांच्याकडे काही मागण्यासाठी किंवा त्याच्या प्राप्तीनंतर नवस फेडण्यासाठी लक्षावधी लोक त्यांचे दर्शन घेण्यासाठी तास न् तास रांगा लावतात आणि पैसे, सोने, चांदी, दागदागीने वगैरे भरपूर मौल्यवान वस्तू स्वेच्छेने त्यांना अर्पण करतात. अर्थातच त्या भक्तांच्या गर्दीची सोयीस्कर व्यवस्था करणे आवश्यक ठरते. अशा ठिकाणचे गणेशोत्सवसुध्दा धूमधडाक्यात साजरे होतात. त्या ठिकाणी अत्यंत लक्ष्यवेधी सजावट असते, या वर्षी दगडूशेठहलवाईच्या गणेशमंदिराला जयपूरच्या हवामहलाचे रूप दिलेले होते. हजारो भक्तांनी एकत्र येऊन अथर्वशीर्षाचे पठण करण्याचा धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी होतो. लालबागच्या राजाचा राजवाडासुध्दा नेहमीच प्रेक्षणीय असतो. या उत्सवांनिमित्य होणा-या उलाढाली आता कोट्यवधी रुपयांच्या घरात गेल्या आहेत. त्यांचे आयोजन करणा-या धर्मादाय संस्थांची संस्थाने झाली आहेत असे म्हणता येईल. उत्सवाच्या दहा दिवसांव्यतिरिक्त इतर काळातसुध्दा त्यांच्यातर्फे अनेक समाजोपयोगी कामे केली जात असतात. गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना किंवा गरीब रुग्णांना त्यांच्याकडून मदत केली जाते. काही संस्था आपला वार्षिक ताळेबंद जाहीर रीत्या प्रकाशित करतात. नवस सायास वगैरेंवर व्यक्तीशः माझा विश्वास असो किंवा नसो, पण त्यामधून अनेक लोकांना मानसिक समाधान मिळत असेल, तर ते हिरावून घेण्याचा मला अधिकारही नाही आणि माझी तशी इच्छाही नाही. त्यामुळे अशा प्रकारचे गणेशोत्सवसुध्दा समाजाच्या दृष्टीने हिताचेच म्हणता येतील.

शाळा, कॉलेजे, ऑफीसे, कारखाने, सहकारी गृहनिर्माणसंस्थांच्या किंवा सरकारी नोकरांच्या वसाहती अशा अनेक जागी दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. या काळात एकाद्या स्नेहसंमेलनाचे वातावरण तिथे असते. या निमित्याने अनेक लोक सहकुटुंब एकत्र येतात, त्यात काही लोकांच्या भेटी होतात, नव्या ओळखी होतात आणि जुन्यांना तजेला मिळतो. या निमित्य ठेवल्या गेलेल्या स्पर्धांमध्ये चित्रकला, शिल्पकला, लिणकाम, भरतकाम, पुष्परचना, संगीत, नृत्य, वक्तृत्व इत्यादि क्षेत्रांमधील आपापले कला गुण दाखवण्याची संधी अनेक लोकांना मिळते. सजावट, आरत्या, सांस्कृतिक कार्यक्रम, विसर्जन वगैरे गोष्टी सामूहिक रीतीने करतांना लोकांना एकत्र येऊन काम करण्याची संधी आणि अनुभव मिळतो. यातून आनंद मिळतो आणि काही नवे अनुभव, नवी माहितीही मिळते.

बदललेल्या परिस्थितीतील गणेशोत्सवात जर असे सगळे चांगलेच घडत असेल त्याच्या विरोधात इतकी ओरड का केली जाते असा प्रश्न पडेल. ती ओरडही अनाठायी वाटत नाही, कारण जास्तीत जास्त गोंधळ आणि गोंगाट सुध्दा काही गणेशोत्सवामध्येच होत असतो. हे उत्सवाच्या नावाने होत असलेले उरूस अनेक प्रकाराने समाजाला त्रासदायक ठरतात. याची सुरुवात दोन तीन महिन्याआधी वर्गणी गोळा करण्यापासून होते. ती करतांना स्वेच्छेपेक्षा दबावावर जास्त भर दिला जातो. मांडव घालण्यासाठी भर रस्त्यांमध्ये खड्डे खणले जातात आणि ते कधीच बुजवले जात नाहीत. अर्धा रस्ता मांडवात गेल्यामुळे आधीच अरुंद असलेला रस्ता आणखी संकुचित होतो आणि एरवीसुध्दा जिथे वाहनांची गर्दी असते तिथली वाहतूक जवळजवळ बंदच पडते. कर्णकर्कश भोंग्यामधून वेळी अवेळी अभिरुचीहीन गाणी मोठमोठ्याने ऐकवली जातात आणि कधीकधी त्यांच्या तालावर बीभत्स असे नाच केले जातात. या सगळ्या धांगडधिंग्यात मांगल्याचा मागमूसही दिसत नाही आणि याला धार्मिक का म्हणायचे हेच समजत नाही. अशा हिडीस स्वरूपाच्या उत्सवातून समाजाला काही चांगले मिळण्याची फारशी शक्यता नसते. त्याचे आयोजन करणा-यांना त्यातून फायदे होतात. त्यांच्या टोळक्यांना दहा बारा दिवस फुकटात मनसोक्त मजा करता येते आणि त्यांच्या म्होरक्यांना मिरवायला मिळते. त्यांचा धाक आणि भाव थोडा वधारतो. सर्वसामान्य माणूस थोडी कुरकुर करण्यापलीकडे काही करायला धजत नाही. वाटल्यास गणपतीबाप्पानेच या लोकांना चांगली बुध्दी द्यावी अशी प्रार्थना त्याला हात जोडून करतो. एकादा वैतागलेला लेखक आता पुढल्या वर्षी येऊच नका अशी प्रार्थना गणपतीबाप्पाला करतो. पण अशा स्वरूपाचे उत्सव साजरे करणे हा ज्यांचा धंदा बनला असेल आणि त्यात बरकत असेल तर तो आपला धंदा वाढवतच जाणार. जेंव्हा ते सुध्दा अती होईल आणि सहनशक्तीच्या पलीकडे जाईल तेंव्हा समाजच त्याला आळा घालेल.





No comments: