Monday, October 15, 2012

घटस्थापना

उद्याच्या घटस्थापनेपासून नवरात्र सुरू होत आहे. माझ्या आधीच्या पिढीपर्यंत बहुतेक लोक संयुक्त कुटुंबांमध्ये रहात असत. प्रत्येक घरी पिढ्यान् पिढ्यांपासून चालत आलेले त्यांच्या घराण्याचे कुलाचार पाळले जात. त्यात आश्विन महिन्यातल्या देवीच्या नवरात्राला मोठे महत्व असायचे. काहीही झाले तरी हे नवरात्र व्यवस्थितपणे पाळले गेले पाहिजे याचा विचार करून त्यानुसार इतर कोणतेही कौटुंबिक किंवा व्यक्तीगत कार्यक्रम ठरवले जात असत. आता कुटुंबे विभक्त झाल्यानंतरही कुटुंबातल्या एका व्यक्तीच्या (बहुधा सर्वात ज्येष्ठ व्यक्तीच्या) घरी नवरात्र बसवायचे आणि कुटुंबातील इतर लोकांनी शक्य तो एक दोन दिवसासाठी तिथे जाऊन देवीचे दर्शन घेऊन यायचे, तिला नवस करायचे आणि ते फेडायचे वगैरे अनेकांच्या घरी चालत असलेले दिसते.

आश्विन शुध्द प्रतीपदेच्या दिवशी सकाळी घटस्थापना करून या नवरात्राची सुरुवात केली जाते. पुढील नऊ दिवस देवीजवळ नंदादीप तेवत ठेवतात. रोज देवीची पूजाअर्चा, आरत्या, नैवेद्य वगैरे विधी शक्यतो यथासांग केले जातात. ललितापंचमी, अष्टमी वगैरे काही खास दिवशी जास्तीचे कार्यक्रम असतात. अष्टमीच्या रात्री शिजवलेल्या भाताच्या उकडीपासून देवीचा मुखवटा बनवून त्याच्या समोर घागरी फुंकतात. नऊ दिवस रोजच्या पूजेसाठी निरनिराळ्या रंगाची वस्त्रे आणि फुले देवीला अर्पण करतात. आजकालच्या महिला स्वतःच रोज निरनिराळ्या रंगाच्या साड्या किंवा ड्रेसेस परिधान करतात. या सगळ्यात त्या घटाची कोणाला आठवण किंवा माहिती असते कोण जाणे.

घटस्थापना याचा शब्दशः अर्थ (मातीच्या) घटाची स्थापना करणे असा होतो. गेल्या शतकात घटाचे महत्व कमी होत गेले आहे. पण मानवी संस्कृतीची सुरुवात झाल्यापासून ते अगदी कालपरवापर्यंत म्हणजे त्या हजारो वर्षांच्या कालखंडात मातीपासून तयार केलेल्या पात्रांना अनन्यस्धारण महत्व होते. जेंव्हा मनुष्यप्राण्याने शेतीभाती करून घरात रहायला सुरुवात केली तेंव्हापासून त्याला अन्नधान्य, दूधदुभते आणि इतर आवश्यक वस्तूंचा संग्रह करण्याची गरज पटायला लागली. त्यासाठी लाकूड, माती यासारख्या सुलभपणे उपलब्ध असलेल्या कच्च्या मालापासून टोपल्या, खोके, गाडगी, मडकी, रांजण वगैरे तो तयार करू लागला. लोह, ताम्र इत्यादी घातूंची निर्मिती सुरू झाल्यानंतर काही प्रमाणात त्यांची पात्रे बनू लागली, पण सर्व लोकांना मातीच सहजपणे उपलब्ध असल्यामुळे तिचा उपयोग होत राहिला. जगाच्या पाठीवरील सर्व ठिकाणच्या उत्खननामधून निघालेल्या प्राचीन अवशेषांमध्ये खापरांचे तुकडे सापडतात. आजसुध्दा खेड्यामधील गरीबांच्या घरात मातीची मडकी, घडे वगैरे असतात आणि शहरातील श्रीमंतांच्या घरात सुध्दा चिनी मातीची सुबक पात्रे आणि शोभेच्या वस्तू ठेवलेल्या असतात.


अग्नी आणि चाक यांचे शोध हे मानवाच्या प्रगतीमधील अत्यंत महत्वाचे टप्पे मानले जातात. मातीपासून घटांचे उत्पादन करण्यात या दोन्हींचा उपयोग केला जातो. कुंभार आपले चाक गरागरा फिरवून मातीच्या गोळ्याला गोलाकार देतो आणि त्या कच्च्या मडक्याला भट्टीत भाजून कठीण आणि टिकाऊ बनवतो. त्यात आपले कौशल्य पणाला लावून कुंभारांनी त्यांना सुबक आकार दिले आणि खास प्रकारच्या मातीचा उपयोग करून आकर्षक रंग आणि इतर गुणधर्म देऊन त्यांचे रांजण, सुरया वगैरे विविध रूपे त्यांना दिली. ही प्रगती हजारो वर्षांपासून होत राहिली आहे.

लोखंड, तांबे, पितळ आदी धातूंचा पत्रा बनवून त्यांची पात्रे तयार करण्यात आली, पण या धातूंची अन्नपदार्थांबरोबर रासायनिक क्रिया होत असल्यामुळे स्वयंपाकघरात त्यांचा उपयोग जपून करावा लागतो. विशेषतः दही, ताक यासारखे दुग्धजन्य पदार्थ त्यात ठेवता येत नाहीत. गेल्या शतकात आलेल्या अॅल्युमिनियम आणि स्टेनलेसस्टीलच्या भांड्यामुळे आता ही परिस्थिती बदलली आहे. पण तोपावेतो त्यासाठी मातीच्या घटांचाच उपयोग केला जात असे. कृष्णावतारात त्याचे बालपण गोकुळात गेल्यामुळे, गोप, गोपिका आणि दहीदूधलोणी या सर्वांना महत्व प्राप्त झाले आणि त्याबरोबर घटांना सुध्दा साहित्यात वेगळे अजरामर स्थान लाभले.

हे सगळे असले तरी घट आणि देवीचे नवरात्र यांचा संबंध कुठे येतो हा प्रश्न राहतोच. नवरात्र बसवतांना देवीच्या सोबत जसा नंदादीप लावतात, तसा एक मातीचा घटसुध्दा ठेवायची पध्दत असावी. नंदादीपामधून ज्योतीची आराधना होते आणि घटाचा आकार आकाशासारखा गोल असतो त्यातून आकाशाचे प्रतिनिधित्व होते असा काहीसा विचार यामागे असावा. आजकाल नवरात्र म्हणजे गरबा, दांडिया, रास असे नवे समीकरण झाले आहे. गुजराथमधून आलेल्या या उत्सवात मात्र घटाला (किंवा घटांना) सुंदर रंगरंगोटी करून छानसे सजवलेले असते. त्यासभोवती फेर धरून नाचतांना 'मुन्नी बदनाम हुई' किंवा 'हलकट जवानी' यासारखी अभिरुचीहीन गाणी लाऊडस्पीकरवर वाजवतात हे त्यांचे आणि आपले दुर्दैव.

No comments: