Saturday, October 27, 2012

को जागर्ती ? .... कोजागिरी पौर्णिमा

को जागर्ती ?

आजकाल रात्र पडली तरी घरात आणि घराबाहेरही विजेच्या दिव्यांचा झगमगाट असतो. त्यामुळे सगळे लोक हिंडून फिरून आणि बाजारहाट किंवा इतर कामे आवरून सावकाशपणे घरी परततात. जेवणे खाणे वगैरे आटोपून झोपी जाईपर्यंत रात्रीचे दहा अकरा तरी वाजतातच. बाकीचे सगळे झोपायला गेले असले तरी काही जणांना झोप येत नाही. त्यातला कोणी टीव्हीवर एकादी मालिका बघत बसतो तर कोणाला परदेशात चाललेली क्रिकेट किंवा फुटबॉलची मॅच पहायची असते, कोणाला इंटरनेटवर सर्फिंग करायचे असते नाहीतर वॉट्सअॅप किंवा फेसबुकवर रेंगाळत रहायचे असते. मुलांना सेलफोन किंवा टॅबलेटवर गेम्स खेळायचे असतात. त्यामुळे बाकीचे सगळे झोपले तरी त्यातला एकादा जागत राहतो किंवा हळूच उठून टीव्ही किंवा काँप्यूटर लावतो. त्यातून निघणारे आवाज आणि उघडझाप करणारे प्रकाशझोत यामुळे झोपमोड झालेला एकादा माणूस वैतागून उठतो आणि ओरडतो "कोण तो अजून जागतो आहे ? (को जागर्ती ?)" त्यानंतर त्या जागणा-याच्या आणि ओरडणा-याच्या वयानुसार पुढील संवाद ठरतात. जागणारा लहान मुलगा असल्यास "आता झोप पाहू मुकाट्याने, उद्या सकाळी शाळेला जायचं आहे ना?" असा दम दिला जातो आणि मोठी व्यक्ती असल्यास "काय मेली कटकट, सुखानं झोपावं म्हंटलं तर तेवढं सुख सुध्दा आमच्या नशीबात कुठं आलंय्?" किंवा "आता कृपा करून आम्हाला जरा झोपू देता का?" असे काही तरी बोलले जाते. त्यामुळे 'को जागर्ती ?' हा प्रश्न आता त्रासिकपणाचाच झाला आहे.

पूर्वीच्या काळातली परिस्थिती वेगळी होती. रात्रीच्या वेळी घराबाहेर चहूकडे अंधारगुडुप व्हायचा. सूर्यास्त होण्याच्या आधीच सगळी कामे आणि खेळबीळ संपवून फक्त मुलीच नव्हे तर मुले आणि मोठी माणसेसुध्दा 'सातच्या आत घरात' येऊन जायची. त्यानंतर मुलांनी शुभंकरोती कल्याणम्, परवचे, रामरक्षा, भीमरूपी महारुद्रा, इतर श्लोक, स्तोत्रे वगैरे म्हणायची, देवाला आणि घरातल्या सगळ्या मोठ्यांना वाकून नमस्कार करायचा. तोपर्यंत रात्रीचे जेवण तयार झालेले असायचे. ते खायचे आणि पथा-या पसरायच्या. रात्रीच्या काळोखात घराच्या बाहेर पडायची सोय नव्हती. गावातील ठिकठिकाणच्या झाडांवर मुंजा, हडळ, पिशाच वगैरे अतृप्त आत्मे दबा धरून बसलेले असायचे आणि त्यांच्या तावडीत कोणी एकटा दुकटा सापडला तर मग त्याची खैर नाही अशी भीती दाखवली जायची. पावसाळ्यात चमकणा-या विजा आणि ढगांचा गडगडाट यामधून या समजांना जास्तच जोर चढत असे. यामुळे रात्र पडली की लोक दरवाजे खिडक्या घट्ट बंद करून घ्यायचे. बाहेर काय चालले आहे याची त्यांना शुध्द नसायची.

पण आषाढात जोरात सुरू झालेला पाऊस श्रावणात कमी होऊन 'क्षणात येते सरसर शिवरे, क्षणात फिरुनी ऊन पडे' असा येत जात रहायचा आणि भाद्रपदानंतर तो जवळ जवळ संपून जात असे. त्यानंतर येणा-या आश्विन महिन्यात पिठूर चांदणे पडायचे. प्रतीपदेपासून हळूहळू वाढत जाऊन पौर्णिमेला निरभ्र आकाशात पूर्ण चंद्र दिसायचा. त्याचे दर्शन अत्यंत विलोभनीय असायचे. पण निसर्गाचे हे अद्भुत रूप पहाण्यासाठी आधी लोकांनी जागे तरी रहायला हवे ना ! यासाठी एक मजेदार अशी कथा सांगितली जात असे. त्या कथेनुसार आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला रात्री प्रत्यक्ष लक्ष्मी देवी पिठूर चांदण्यामधून पृथ्वीतलावर येते आणि घरोघरी जाऊन "को जागर्ती ?" असे विचारते. तिला जो कोणी माणूस जागा दिसेल त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला ती भरपूर संपत्ती देते. ही संपत्ती मिळण्याच्या आशेने सगळे लोक त्या रात्री उशीरापर्यंत जागत राहिले आणि त्यांना निसर्गसौंदर्याच्या संपत्तीचा लाभ होत गेला. लोकांनी जागत राहून वेळ घालवण्यासाठी चांदण्यात एकत्र बसून गाणी म्हणायची, खेळ खेळायचे वगैरे सुरू केले. या दिवसात चांगले दूधदुभते मिळते. त्यामुळे आटीव दुधाचा नैवेद्य दाखवून सर्वांनी ते प्राशन करायचे वगैरे परंपरा पडत गेल्या. 'को जागर्ती ?' या वाक्यावरून या पौर्णिमेला 'कोजागिरी पौर्णिमा' असे नाव पडले आणि हा दिवस साजरा करायची एक सुंदर प्रथा पडली.

--------------------------------------------------------------------------------

No comments: