Thursday, October 11, 2012

महर्षी धोंडो केशव कर्वे



'दगड्या', 'धोंड्या', 'काळ्या' असले एकादे खत्रुड नाव मुलाला ठेवले तर काळसुध्दा त्याच्याकडे ढुंकून पाहणार नाही आणि त्यामुळे त्याला दीर्घायुष्य मिळेल अशी एक अजब समजूत पूर्वीच्या काळी प्रचलित होती. लहान मुलांनी नमस्कार केल्यानंतर त्यांना "शतायुषी भव" असा घसघशीत आशीर्वाद दिला जात असे. या दोन्ही समजुतींची प्रचीती एका महापुरुषाच्या बाबतीत आली. मात्र त्याचे नाव विचित्र असूनसुध्दा त्याने आपल्या कर्तृत्वाने सर्व जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. शंभरावर वर्षे मिळालेल्या आयुष्यात त्यांना उदंड कीर्ती आणि मानसन्मान मिळालेच, पण त्यांनी सुरू केलेले महान कार्य त्यांच्या निर्वाणानंतर सुध्दा जोमाने चालत राहून त्याचा खूप विस्तार झाला आणि त्यातून त्यांचे नाव पुढील शतकानुशतके शिल्लक राहील यात शंका नाही. या महापुरुषाचे नाव आहे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे.

पण हे यश त्यांना सहजासहजी मिळाले नाही. ते मिळण्याच्या आधी त्यांनी अत्यंत खडतर तपश्चर्या केली होती, ती नावलौकिक मिळवण्यासाठी नव्हती, तर समाजातील महत्वाच्या घटकाला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी. कोकणातल्या एका लहानशा गावी इसवी सन १८५८ मध्ये धोंडो केशव कर्वे यांचा जन्म झाला. तत्कालीन समजुतीनुसार अदृष्य दुष्ट शक्तींपासून वाचवण्यासाठी त्यांचे नाव 'धोंडो' असे ठेवले होते. पण हा मुलगा अद्वितीय होता. त्या काळामधील भारतीय लोकांना (त्या काळच्या भाषेत 'एतद्देशीय मनुष्यांना') जेवढे ज्ञान प्राप्त होणे पुरेसे आहे असे मेकॉलेसारख्या साहेबांनी ठरवले होते ते त्यांनी स्थानिक शाळेत जाऊन झटपट शिकून घेतले. त्या काळातली शालांत म्हणजे 'व्हर्नाक्युलर फायनल' ही परीक्षा देण्यासाठी कोकणातील मुलांना मुंबईला जावे लागत असे. बालक धोंडो त्यासाठी मुंबईकडे जायला निघाला, पण तिकडे जाणारी बोट चुकली. त्यामुळे निराश न होता धोंडोने घाटावरील क-हाड की सातारा या शहराची वाट धरली. त्या काळात मोटारी नव्हत्या आणि त्यासाठी लागणारे हमरस्तेही बांधले गेले नव्हते. एका खेड्यापासून शेजारच्या खेड्याकडे जाणा-या पायवाटा किंवा फार तर बैलगाडीच्या चाकोरीमधून इतर वाटसरूंच्या सोबतीने शंभरावर मैल दूर चालत चालत, धो धो पावसात आणि हिेस्र वन्य पशूंची भीती न बाळगता मजल दरमजल करीत ते तिसरे दिवशी क-हाड की साता-याला जाऊन पोचले. त्या ठिकाणच्या शिक्षणाधिका-याने धोंडोची किरकोळ शरीरयष्टी आणि चेहे-यावरील निरागस भाव पाहून त्याला 'अजाण बालक' ठरवले आणि वयाच्या अटीवरून फायनलच्या परीक्षेला बसायची अनुमती दिली नाही. निमूटपणे आपल्या गावी परत येऊन धोंडोपंत अभ्यास करत राहिले आणि यथावकाश मुंबईला जाऊन त्यांनी ती परीक्षा दिलीच, त्यानंतर मुंबईमध्ये राहून हायस्कूल आणि कॉलेजचे शिक्षण घेतले. त्या काळात शाळा, कॉलेज आणि अभ्यास सांभाळून त्यातून वेळ काढून शिकवण्या केल्या आणि त्यातून आपला उदरनिर्वाह केला.

बी.ए. पास झाल्यानंतर मायबाप इंग्रजी सरकारची नोकरी त्यांना सहजपणे मिळू शकली असती, पण त्यांचा कल समाजसेवेकडे होता. त्या काळच्या समाजात रूढी आणि परंपरांच्या नावाने अनेक अनिष्ट प्रथा चालत आल्या होत्या. लहानपणीच मुलांची लग्ने लावून दिली जात होती, धोंडोपंतांचासुध्दा बालविवाह झाला होता. अपमृत्यूंचे प्रमाणही मोठे असल्यामुळे काही दुर्दैवी मुली अज्ञवयातच बालविधवा होऊन जात. त्यांचे केशवपन करून त्यांना अत्यंत वाईट वागणूक दिली जात असे. उंच माझा झोका ही अलीकडे लोकप्रिय झालेली मालिका आणि काकस्पर्श हा उत्कृष्ट सिनेमा यातून त्या काळातील जीवनाचे थोडे दर्शन घडते. काही समाज सुधारकांनी या रूढींविरुध्द आवाज उठवायला सुरुवात केली होती, पण त्यांची चळवळ लेख, भाषणे, अर्ज विनंत्या या मार्गाने चालली होती. धोंडोपंतांनी प्रत्यक्ष कृतीमधून समाजकार्यात उतरायचे ठरवले.

ते पुण्याला आले आणि लोकमान्य टिळक व आगरकर यांनी सुरू केलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजात गणिताचे प्राध्यापक झाले. आपल्याला मिळणा-या वेतनाचा एक भाग फक्त समाजकार्यासाठी बाजूला काढून ठेवायचा आणि वैयक्तिक आयुष्यात कुठलीही अडचण आली, कसलीही गरज पडली तरी त्या पैशांना स्पर्श करायचा नाही असे त्यांनी ठरवले आणि हे व्रत कसोशीने पाळले. या स्वतःच्या मिळकतीतून शिल्लक टाकलेल्या निधीत भर टाकण्यासाठी त्यांनी इतर उदार लोकांना आवाहन केले आणि त्यातून जमलेल्या निधीचा फक्त समाजकार्यासाठीच विनियोग केला. सदाशिव पेठेमधील राहत्या जागेत बालविधवांना आश्रय देऊन त्यांनी या कार्याची सुरुवात केली. त्यांना शिक्षण देऊन सक्षम बनवणे हा त्यांचा उद्देश होता. पण तत्कालीन समाजाला तो अजीबात मान्य नव्हता. कर्वे कुटुंब आणि त्या आश्रित महिलांना त्यांनी वाळीत टाकले, त्यांना सन्मानाने जिणे अशक्य केले.

कर्व्यांच्या एका सुधारक मित्राने यातून मार्ग काढण्यासाठी त्यांना शहराबाहेर हिंगणे इथे त्यांना जमीन देऊ केली. त्यावर एक पर्णकुटी बांधून त्यात कर्व्यांनी त्या पीडित महिलांसाठी आश्रम सुरू केला. त्या आवारातच पुढे मुलींच्या शिक्षणासाठी शाळा, वसतीगृहे वगैरे सुरू करत गेले. १८९६ साली त्यांनी सुरू केलेली स्त्रीशिक्षणसंस्था आजवर कार्यरत आहे आणि तिचा पसारा अनंतपटीने वाढला आहे. या संस्थेच्या साठ शाखा असून त्यात २५००० विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. पूर्वप्राथमिक पातळीपासून स्नातकोत्तर (पोस्ट ग्रॅज्युएट) शिक्षणापर्यंत आणि अनेक शाखांमधून ते शिक्षण घेण्याची व्यवस्था या संस्थेकडून केली जाते. त्यात इंजिनियरिंग, आर्किटेक्चर आणि फॅशन डिझाईनसारख्या आधुनिक विषयांमधील शाखांचा समावेश आहे. महर्षी कर्वे यांनीच पुढाकार घेऊन एस.एन.डी.टी. युनिव्हर्सिटी हे भारतातले पहिले खास महिलांचे विश्वविद्यालय सुरू केले होते. कालांतराने ते मुंबईला नेले गेले. त्याच्या शाखासुध्दा अनेक ठिकाणी पसरल्या आहेत.


दुर्दैवाने धोंडोपंताच्या पत्नीचे अकाली निधन झाले. त्या काळच्या प्रथेनुसार त्यांच्या दुस-या विवाहासाठी स्थळे सांगून येऊ लागली होती. पण पुनर्विवाह केला तर तो विधवेशीच करायचा असे त्यांनी पक्के ठरवले होते. त्यांच्या एका मित्राची बहीण बाया अनाथ बालविधवा झाली होती. धोंडोपंतांशी विवाह करून बाया कर्वेंनी त्यांच्या जीवनात प्रवेश केला. कर्वे यांची पत्नी होणे हे सुध्दा अग्निदिव्य होते. ते तर दिवसरात्र आपल्या कार्यात मग्न असत. घर चालवणे आणि मुलांना मोठे करणे सर्वस्वी पत्नीलाच करावे लागत होते. त्यात फक्त समाजाचाच विरोध नव्हता, तर कर्व्यांच्या घरातील मंडळींचासुध्दा होता. लग्न करून ही दंपती जेंव्हा कोकणातल्या मुरुड या त्यांच्या गावी गेली, तेंव्हा नव्या सुनेचे स्वागत तर झाले नाहीच, गावातील सर्वांनी त्यांच्या घराचे दरवाजे त्यांना बंद केले.


धोंडोपंत आयुष्यभर आपल्या तत्वांवर ठामपणे उभे राहिले होते. त्याचे एक उदाहरण असे आहे. त्याच्या विम्याची मुदत संपल्यावर त्याचे जे पैसे त्यांना मिळणार होते ते त्यांनी उदारहस्ते आपल्या शिक्षणसंस्थेला देणार असल्याचे जाहीर केले. त्या वेळी त्यांचा मुलगा कॉलेजला जाण्याच्या वयाचा झाला होता. हे पैसे त्याच्या शिक्षणावर खर्च करावे अशी त्यांच्या पत्नीची इच्छा असणे साहजीक आहे. इतर कोणीही तसेच केले असते. पण कर्व्यांचे म्हणणे असे होते की जर त्यांच्या जिवाचे काही बरे वाईट झाले तर त्यांच्या कुटुंबाला आधार मिळावा या उद्देशाने त्यांनी विमा उतरवला होता. आता ते जीवंत असतांना तशी गरज राहिली नाही, त्यामुळे त्या पैशाचा विनियोग त्यांच्या कार्याकरताच व्हायला हवा. त्याहून त्यांच्या पत्नीला ते पैसे पाहिजेच असतील तर तिने आपला पती निधन पावला आहे असे समजावे, त्यांच्याशी संबंध ठेवू नये आणि तसे जाहीर करावे तरच तिला ते मिळतील.

पत्नी किंवा मुलांबरोबर ते असे कठोरपणे वागत असले तरी समाजावर मात्र त्यांनी कधी राग धरला नाही. समाजाने त्यांचा अनन्वित छळ केला तरी हे लोक अज्ञ आहेत, आपण काय करत आहोत हे त्यांना समजत नाही अशी येशू ख्रिस्तासारखी भूमिका घेऊन त्या समाजाच्या हितासाठीच ते झटत राहिले. संत एकनाथांच्या काळात त्यांनीसुध्दा समानता, विश्वबंधुत्व वगैरेंना धार्मिक समजुतींपेक्षा जास्त वरचे स्थान दिले होते आणि यामुळे तत्कालीन रूढीवादी लोकांचे वैर पत्करले होते. एकदा ते नदीवरून स्नान करून परत येत असतांना कोणी खोडसाळपणे त्यांच्या अंगावर गलिच्छ राड उडवली, त्याच्यावर न रागावता किंवा त्याच्याशी न भांडता एकनाथ महाराज शांतपणे पुन्हा नदीवर जाऊन स्नान करून आले. याची पुनरावृत्ती होत राहिली, पण एकनाथांनी आपला शांतपणा सोडला नाही. अखेर चिखल उडवणाराच कंटाळला. त्याने नाथांची क्षमा मागितली. त्यानर नाथांनी उलट त्याचे आभार मानले आणि तुझ्यामुळे मला आज इतक्या वेळा गोदावरीचे स्नान घडले आणि त्याचे पुण्य लाभले असे सांगितले. महर्षी कर्व्यांची मनोवृत्ती साधारणपणे अशीच होती.

कर्वे यांच्या कामाची महती हळूहळू लोकांना पटत गेली. समाजाची विचारसरणी त्यांना अनुकूल होत गेली. पुराणमतवादी लोकांची पिढी मागे पडून सुशिक्षित आणि उदारमतवादी लोकांची संख्या वाढत गेली. कर्वे यांच्या स्त्रीशिक्षणसंस्थेमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या अनेक महिलांनी स्वतःला या कार्याला वाहून घेतल्या. त्यांनी केलेल्या प्रगतीमधून आणि त्यांच्या सद्वर्तनातून समाजापुढे चांगली उदाहरणे आली. स्त्रियांना शिक्षण दिल्याने त्यांची आणि समाजाची अधोगती होईल या जुन्या खोडांनी दाखवलेल्या भीतीमधील हवा निघून गेली. समाजाने कर्व्यांना साथ द्यायला सुरुवात केली. त्यांच्या सचोटीबद्दल तिळमात्र शंका नसल्यामुळे त्यांना उदारहस्ते देणग्या मिळत गेल्या आणि त्यांनी त्यातली पै न पै त्यांनी सत्कारणी लावली. त्यांची संस्था मोठी होत गेली. अनेक नामवंत त्यांच्या संस्थेला भेट देऊन त्याला सहाय्य देऊन गेले.

अर्थातच त्यांना अनेक मानसन्मानही मिळाले. अनेक विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ही पदवी दिली. भारतामधील सर्वोच्च असा भारतरत्न हा पुरस्कार त्यांना मिळाला. ते महर्षी म्हणवले जाऊ लागले. पूर्वीच्या हिंगणे या गावाच्या परिसरालाच कर्वेनगर असे नाव दिले गेले. पुणे शहराचा विस्तार इतका झपाट्याने झाला की एके काळी ओसाड असलेला हा भाग गजबजून गेला आणि पुणे शहराचा एक महत्वाचा भाग झाला. पूर्वीच्या पुणे शहरापासून हिंगणे या खेड्याकडे जाणा-या रस्त्यालाही कर्वे रोड असे नाव दिले आणि आज हा अत्यंत गजबजलेला हमरस्ता झाला आहे. मुंबईमधील मरीन लाइन्सच्या परिसरातील एक मोठा रस्ता त्यांच्या नावाने ओळखला जातो. पुण्यातील कर्वे रस्त्याच्या कडेला या स्त्रीशिक्षणसंस्थेचे मूळ आणि आजचेही मुख्य स्थान आहे. त्यात अनेक शाळा, कॉलेजे आणि हॉस्टेल्स आहेत. महर्षी कर्वे आणि बाया कर्वे यांची समाधी आहे, तसेच एक स्मारक आहे. कर्वे यांच्या शाळेमधील हजेरीपटापासून ते त्यांना मिळालेल्या भारतरत्न या पदकापर्यंत त्यांच्या जीवनाशी निगडित अशा अनेक वस्तू तेथे मांडून ठेवल्या आहेत. तसेच अनेक छायाचित्रे आणि तैलचित्रांमधून त्याच्या जीवनातील महत्वाच्या घटना दाखवल्या आहेत. प्रत्येक सुजाण नागरिकाने हे संग्रहालय अवश्य पहावे आणि त्यामधून स्फूर्ती घ्यावी.





9 comments:

Gouri said...

हे सगळे कर्वे कुटुंबीयच कुठल्या तरी वेगळ्या मातीचे बनले होते असं वाटतं. महर्षी कर्वे काय, रघुनाथराव काय ... प्रत्येकाने आपलं म्हणून जे क्षेत्र निवडलं, त्यात आभाळाएवढं मोठं काम केलंय.

Anand Ghare said...

खरे आहे. पण महर्षी कर्वे यांचे कार्य आज स्त्रीशिक्षणसंस्थेच्या स्वरूपात सर्वांना दिसते तसे र.धों.कर्वे यांचे कार्य उघडपणे दिसत नाही. त्यांनी कुटुंबनियोजनाचा प्रचार केला, पण त्यांच्या काळात किती लोकांनी तो मानला याची आकडेवारी मला तरी माहीत नाही. पुढे सरकारने या कामात पुढाकार घेतला त्याचा पाया रधोंनी घातला होता असे कदाचित म्हणता येईल.

ऊर्जस्वल said...

कर्वे कुटुंबियांच्या सामाजिक कर्तृत्वाचे गुणगान करतांना शब्द अपुरे पडतात. वर्तमानातील पिढ्यांना त्यांच्या कर्तृत्वाची पुरेशी ओळख होण्याकरता आपला लेख मोलाचा ठरेल.

महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पणती डॉ.प्रियदर्शिनी आनंद कर्वे, संचालक अप्रोप्रिएट रूरल टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट (ARTI-आरती), पुणे (महर्षी धोंडो केशव कर्वे व त्यांच्या पत्नी आनंदीबाई ऊर्फ बाया; दिनकर धोंडो कर्वे व त्यांच्या पत्नी इरावती; आनंद दिनकर कर्वे व त्यांच्या पत्नी मीना; प्रियदर्शिनी आनंद कर्वे); ह्यांना बुधवार, २१ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता दूरदर्शन केंद्राच्या वरळी येथील प्रांगणात आयोजित झालेल्या सह्याद्री हिरकणी सन्मान पुरस्कार सोहळ्यात “आरती” चिलीच्या विकसनार्थ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण समारंभाचे प्रसारण शनिवारी ३१ मार्च रोजी दुपारी ३.३० ते ६.३० या वेळेत सह्याद्री वाहिनीवरून करण्यात आले.

महर्षी कर्वेंबद्दल आणखीही माहिती मी आमच्या कोकण सहली दरम्यान मुरूड ह्या त्यांच्या जन्मगावी पोहोचल्याचे वर्णन करत असता, लिहून ठेवलेली आहे. http://nvgole.blogspot.in/2010/12/blog-post_21.html#links.

मनसेच्या संकेतस्थळावरही महर्षी कर्वेंबद्दल उपयुक्त माहितीचे संकलन केलेले आहे.

ऊर्जस्वल said...

चुकीची दुरूस्ती.....

चिलीच्या


चूलीच्या असायला हवे.

Anand Ghare said...

धन्यवाद. कहर्षी कर्वे यांच्या कुटुंबातील चौथी पिढीसुध्दा समाजकार्यात गुंतलेली आहे हे वाचून खूप आनंद झाला. मागील महिन्यात पुण्याच्या स्त्रीशिक्षणसंस्थेला भेट देण्याचा योग आला. तेंव्हा जे पाहिले, ऐकले ते लिहून टाकावेसे वाटले. पूर्वीपासून मी महर्षा कर्वे यांचे नाव ऐकले होते, पण दीर्घायुष्य, स्त्रीशिक्षण आणि विधवांचा उध्दार एवढे ढोबळ मुद्दे माहीत होते. आनंदीबाईंच्याबद्दल नाटकात दाखवली तेवढीच माहिती होती.
आरती चूल कोणी विकसित केली याची मला कल्पनी नव्हती. तिचा खेडोपाडी घरोघरी वापर सुरू झाल्यास पर्यावरणाला त्याचा लाभ होईल.

Unknown said...

मी शहाजी कांबळे , मु.पोस्ट, पुळूज. ता.पंढरपूर, एक छोटे गाव आहे . लहानपणापासून समाजकार्याची आवड आहे, आज मी विधवा विवाह केला आहे, समाज मला सामाऊन घेत नाही, पण मी समाजाला दोष देत नाही त्यांच्यातील अज्ञानाला दोष देतो, शाळेच्या वयात असताना ऐकले होते कार्वेनी विधवा विवाह केला, त्याकाळी मी मार्क मिळवण्यासाठी ते पाठ केले होते, पण आज आयुष्यात विधवा विवाह करून माज्या जीवनाला एक वळण मिळाले , आणि आज मी सुखी आहे, मी आणि माझी पत्नी आम्ही समाजातील सर्व विधवा महिलांचा विवाह लावण्याचा ध्यास घेतला आहे,

शहाजी कांबळे ७७५६८१९९४८

Anand Ghare said...

शहाजीराव, आपले कौतुक करावे तेवढे थोडे आहे. विधवेशी विवाह करून तुम्ही दोघेही सुखाने जीवन जगत आहात हे महत्वाचे आहे. ग्रामीण भागातील लोकांंचे व्हावे तेवढे प्रबोधन आजवर न झाल्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास सहन करावा लागावा हे दुर्दैव पण तुम्ही त्याला धीराने तोंड दिले याबद्दल पुन्हा एकदा कौतुक. आपले कार्य असेच चालवत रहा. यासाठी तुम्हाला सदीच्छा आणि आशीर्वाद.

Dhamane HN said...

कर्वे रोड ला हे नाव कधीपासून देण्यात आले?

Anand Ghare said...

हे मलाही माहीत नाही. मला तरी निदान गेल्या पन्नास वर्षांपासून तो कर्वे रोड याच नावाने ठाऊक आहे.