Tuesday, February 28, 2012

शाश्वत ऊर्जा कार्यशाळा -भाग १

अलकासाठी औषधे घेऊन मी हॉस्पिटलकडे जात असतांना गेटजवळ समोरून भावे येतांना दिसले. आम्हा दोघांनाही थोडी घाई असल्यामुळे थोडीशी जुजबी विचारपूस करून आम्ही एकमेकांचे टेलीफोन नंबर विचारून घेतले आणि आपापल्या दिशांना चालले गेलो. दोन तीन दिवसांनी मला खरोखरच भाव्यांचा फोन आला. त्यांनी विचारले, "आता वहिनी कशा आहेत?"
"आता तिची तब्येत बरी आहे, उद्यापरवाकडे डिस्चार्ज मिळेल."
"तुम्हाला एक विचारायचं होतं, पण विचारावं की नाही असं वाटलं. "
माझी क्षमता आणि स्वभाव याबद्दल भाव्यांना साधारण कल्पना असल्यामुळे ते मला कसलाही अवघड प्रश्न विचारणार नाहीत याची मला होती. मी म्हंटलं, "विचारा ना. फार फार तर मला माहीत नाही असं सांगेन किंवा मला जमणार नाही म्हणेन."
" अणूऊर्जा या विषयावर चार शब्द बोलायचे आहेत."
"हा तर माझा आवडता विषय आहे. कुठं आणि कधी बोलायचं आहे?"
".... .... संस्थेचा एक कार्यक्रम आहे. त्यात त्यांना या विषयासाठी कोणीतरी जाणकार वक्ता पाहिजे आहे."  भावे त्या संस्थेचे नाव पटकन बोलून गेल्यामुळे माझ्या काही ते लक्षात आले नाही. बहुधा ती संस्था माझ्या परिचयाची असावी असे त्यांना वाटत असणार. मला त्यामुळे विशेष फरक पडणार नव्हता म्हणून मीही काही ते नाव विचारले नाही. त्यांना विचारले, "हा कार्यक्रम कुठं होणार आहे?"
"नाशिकला."
"जवळच आहे. एका दिवसासाठी अलकाची काळजी घेण्याची काही तरी व्यवस्था करता येईल."
"मग मी तुमचं नाव सुचवतो. संस्थेचे लोक तुमच्याशी संपर्क साधतील."
"ठीक आहे."

दोन दिवसांच्या आतच मला त्या कार्यशाळेच्या संयोजकांचा फोन आला. मला किती वेळासाठी, कुठल्या भाषेत आणि कोणासमोर बोलायचे आहे वगैरेचा अंदाज येण्यासाठी मी थोडी साधारण माहिती विचारून घेतली. पाठोपाठ त्यांचे ईपत्रसुध्दा आले.
"आमच्या विनंतीचा मान राखून आपली संमती दर्शवल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आपला संक्षिप्त परिचय आणि व्याख्यानाचा सारांशही त्वरित पाठवावा." अशा अर्थाचे काही तरी त्यात लिहिले होते. मी विचार केला, कसली विनंती आणि कसली संमती? मग मी सुध्दा तसाच मानभावीपणा दाखवत उत्तर दिले, "मला ही संधी दिल्याबद्दल मीसुध्दा आपला अत्यंत आभारी आहे. माझा संक्षिप्त परिचय आणि व्याख्यानाचा सारांश सोबत पाठवत आहे. आपल्या संस्थेसाठी मी हा पहिलाच कार्यक्रम करत असल्यामुळे व्याख्यात्यांना कोणत्या सुविधा पुरवल्या जातात याचा अंदाज मला मिळाला तर फार चांगले होईल." (साध्या रोखठोक भाषेत सांगायचे झाल्यास यायचे की नाही ते मला ठरवता येईल.)

चार पाच दिवस झाले तरी माझ्या पत्राला उत्तर आले नाही. "याला आपण व्यासपीठ दिले आहे तेवढे पुरे नाही का? आणखी काय द्यायची गरज आहे?" असा विचार ते लोक बहुधा करत असावेत असा अंदाज मी केला आणि ती गोष्ट विसरून गेलो. नोकरीत असेपर्यंत मी माझ्या ऑफीसचा प्रतिनिधी म्हणून जात असल्यामुळे सगळी व्यवस्था आपोआप होत असे. सेवानिवृत्त झाल्यानंतर ज्यांच्याकडून मला आमंत्रण मिळते ते करतात. याची संवय झालेली असल्याने मी त्यावर विसंबून होतो. योगायोगाने पुन्हा भाव्यांची भेट झाली. माझ्या पत्राची एक प्रत मी त्यांना पाठवली असल्यामुळे त्याचा मतितार्थ त्यांच्या लक्षात आला असावाच. तरीही चाचपून पहाण्यासाठी त्यांनी विचारले, "तुमचा कार्यक्रम नक्की झाला आहे ना?"
"मी त्यांच्या उत्तराची वाट पहातो आहे." मी सांगितले.
"आमची सेवाभावी संस्था असल्याकारणाने ती कोणाला मानधन वगैरे देऊ शकत नाही."
"मला त्याची अपेक्षाही नाही. मुंबईतल्या एकाद्या ठिकाणी कार्यक्रम असला तर मी तिथे सहज जाऊ शकलो असतो, पण नाशिकसारख्या नवख्या ठिकाणी मी कसा जाणार, कुठे थांबणार, तुम्हीच विचार करा."  तेसुध्दा माझ्यासारखेच सेवानिवृत्त अधिकारी असल्यामुळे आम्ही एकाच होडीतले वाटसरू होतो. संभाषणाचा चेंडू मी त्यांच्याकडे टोलवला.
"बरोबर आहे तुमचं, मी त्याबद्दल बोलून घेईन." भाव्यांनी आश्वासन दिले आणि ते पाळले.
त्या संस्थेच्या उच्च पदाधिका-यांकडून फोन आणि विरोप आला. त्यांची सेवाभावी संस्था असल्याकारणाने ते कोणाला मानधन वगैरे देऊ शकत नाहीत हा मुद्दा स्पष्ट करून माझा नाशिकला जाण्यायेण्याचा कार्यक्रम काय आहे याची विचारणा केली होती, तसेच माझ्या प्रेझेंटेशनची सॉफ्ट कॉपी २२ तारखेच्या आत पाठवून देण्याची विनंती केली होती. मीसुध्दा माझा मुद्दा स्पष्ट करून माझी जाण्या येण्याची तसेच राहण्याची सोय करण्याची विनंती त्यांना केली. (त्याखेरीज मी येणार नाही हे प्रच्छन्नपणे पण जवळ जवळ स्पष्ट केले.) त्यानंतर सारी चक्रे वेगाने फिरली. माझी सर्व सोय केली गेली असल्याची पुष्टी करण्यात आली, माझ्या प्रवासाची जबाबदारी एका कार्यकर्त्यावर दिली गेली तसेच माझ्या राहत्या घराचा पत्ता विचारून घेतला गेला.

त्यानंतर मात्र सारे काही कल्पनातीत सुरळीतपणे घडत गेले. कार्यशाळा सकाळीच सुरू होत असल्यामुळे आदल्या दिवशी दुपारी पुण्याहून निघून संध्याकाळी नाशिकला पोचणा-या वाहनामध्ये मला जागा दिली होती. दुपारी दीडच्या सुमाराला मला घेण्यासाठी ते वाहन आमच्या घराकडे येईल असे त्या कार्यकर्त्याने मला सांगितले आणि मी सुध्दा त्या वेळी प्रवासासाठी तय्यार होऊन बसलो असेन असे त्याला सांगितले.
तो दिवस नेहमीसारखाच उजाडला, पण अलकाची तब्येत ठीक दिसत नव्हती. दहा साडेदहाच्या सुमाराला तिला डॉक्टरांकडे नेले. तिचा रक्तदाब बराच वाढला असल्याचे निदान त्यांनी केले आणि तिला संपूर्ण विश्रांती घ्यायला सांगितले. माझी दुविधा मनःस्थिती झाली. नाशिकला जायचे की नाही हे ठरवता येत नव्हते. इतकी खटपट करून माझी जाण्यायेण्याराहण्याची व्यवस्था करून घेतल्यानंतर आता नाही म्हणणे मला बरे वाटत नव्हते. नोकरीत असतांना मी अशा वेळी एकाद्या चांगल्या सहका-याला पाठवून दिले असते, इथे आयत्या वेळी कोणतीही पर्यायी व्यवस्था करणे शक्यच नव्हते. शिवाय माझ्या मनातही इतर वक्त्यांची व्याख्याने ऐकण्याची इच्छा होतीच. दोन अडीच तासात अलकाला थोडे बरे वाटायला लागले. जवळच रहात असलेल्या एका पोक्त नातेवाइकांनी दिवसभर तिच्यासोबत राहण्याची तयारी दाखवली आणि मला निश्चिंत मनाने नाशिकला जायला सांगितले. मी आपली बॅग भरायला घेतली. दोन दिवसांचे कपडे आणि इतर आवश्यक गोष्टी बॅगेत कोंबेपर्यंत गाडी येत असल्याची सूचना आलीच. इतर सहप्रवासी आणि कार्यशाळेसाठी नेण्याचे साहित्य घेऊन नाशिकसाठी प्रस्थान केले आणि सुखरूपपणे तिथे जाऊन पोचलो.

माझ्या रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था केलेली होतीच. प्रख्यात संगणकतज्ज्ञ आणि वैज्ञानिक डॉ.विजय भटकर हे मुख्य पाहुणे आधीच येऊन पोचले होते. त्यांच्याशी माझी ओळख करून देण्यात आली. जेवणाच्या वेळी पंगतीला त्यांच्या बाजूला बसण्याचा मान आणि संधी मिळाली. इतरही अनेक सन्माननीय पाहुणे आणि यजमान मंडळी त्या खान्याला उपस्थित होती. जेवण तसे पाहता साधेच पण सात्विक व रुचकर होते. त्यात दिखाऊ बडेजावाचा भाग नव्हता, तसेच कोणाच्याही वागण्यात आढ्यता नव्हती. मनमोकळ्या गप्पागोष्टींनी भोजन रंगत गेले.. . . . . . . (क्रमशः)

No comments: