Thursday, February 16, 2012

माधवन नायर



दुसरे महायुध्द चालले असतांना मुंबईच्या रक्षणासाठी किंवा इथे बंडाळी झाली तर ती मोडून काढण्यासाठी ब्रिटिश सरकारने फौजेच्या काही तुकड्या तैनात केल्या होत्या आणि त्यांच्या राहण्यासाठी राहुट्या बांधल्या होत्या. बांद्र्याच्या बँडस्टँडजवळ अरबी समुद्रात घुसलेल्या जमीनीच्या एका लहानशा सुळक्यावर अशीच एक तात्पुरती छावणी उभारली होती. युध्द संपल्यानंतरही त्या झोपड्या (निसान हट्स) रिकाम्या पडलेल्या होत्या. अणुशक्ती विभागात प्रशिक्षण घेण्यासाठी येणा-या विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था त्यात केली गेली.

प्रशिक्षण प्रशालेमध्ये (ट्रेनिंग स्कूल) माझी निवड झाल्यावर मीही तिथे रहायला गेलो. आमच्या बॅचमध्ये काश्मीर ते केरळ आणि गुजरात ते आसामपर्यंत पसरलेल्या भारताच्या सर्व भागांमधून मुले आली होती. हजर होऊन नेमणूक पत्र आणि प्रमाणपत्रे वगैरे दाखवली की लगेच खोलीचा क्रमांक मिळत असे. ते आधीपासून ठरवले होते की क्रमानुसार जो जो येत गेला त्याला त्याला देत होते वगैरेची काही चौकशी न करता मिळालेल्या खोलीत मी जाऊन आपले सामान ठेवले. माझा सहरहिवासी (रूममेट) बंगाली होता. आजूबाजूच्या इतर खोल्यांमधूनसुध्दा निरनिराळ्या राज्यातून आलेल्या आणि निरनिराळ्या भाषा बोलणा-या मुलांच्याच जोड्या तयार झाल्या होत्या. मात्र आमच्या शेजारच्या एका खोलीत दोन्ही केरळीय मुले होती. ती थेट केरळपासून एकमेकांसोबत येऊन एकत्रच दाखल झाल्यामुळे आपोआप एका खोलीत आली होती की त्यांनी त्यासाठी मुद्दाम प्रयत्न केले होते कोण जाणे. त्या काळातले आमचे प्राचार्य केरळीय होते आणि त्या काळात मुंबईत सगळीकडेच मोठ्या संख्येने मल्याळी स्टेनो असायचे, तसे ते ट्रेनिंग स्कूलमध्येही असावेत. त्यामुळे कदाचित त्यांची मदत झाली असेल असे बोलले जात होते.
मराठी आणि कानडी या दोन भाषा मी लहानपणी घरातच शिकलो होतो, शालेय शिक्षणात हिंदी व इंग्रजी आल्या, सायन्स कॉलेजात असतांना मुख्यत्वे गुजराथी भाषिकांचा भरणा असलेल्या हॉस्टेलमध्ये राहिल्यामुळे ती भाषा अवगत झाली होती. इंजिनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये काही पंजाबी मुले होती, काही तामीळ किंवा तेलुगूभाषीसुध्दा होती. सत्यजित रे, मृणाल सेन वगैरेंचे बंगाली सिनेमे पाहणे ही त्या काळातली फॅशन असल्यामुळे त्या भाषेतले शब्द कानावर पडत होते. या सगळ्या भाषा समजत नसल्या तरी मला त्या ओळखता येत होत्या. मल्याळी भाषा मात्र मी पहिल्यांदा ऐकत होतो. आमच्या केरळी शेजा-यांकडे नेहमी त्यांचे आणखी काही मित्र येत आणि त्यांचे वाद, विवाद, संवाद वगैरे जोरजोराने चालत असे. लयबद्ध आणि सुरांना हेलकावे देत बोलली जाणारी ही भाषा ऐकायला मजेदार वाटत होती.

त्या दोघांपैकी उन्नीकृष्णकार्ता मेकॅनिकल इंजिनियरिंगच्या म्हणजे माझ्याच वर्गात होता आणि दुसरा माधवन नायर इलेक्ट्रिकल ब्रँचमध्ये होता. दोन्ही वर्गांना काही समाईक विषय होते, त्या क्लासला आम्ही एकत्र बसत असू. त्या काळात भारतात फारशी कारखानदारी नसल्यामुळे इंजिनियरांना कमी मागणी होती. परदेशी जाणे फार कठीण होते. अणुशक्तीखात्याचे जबरदस्त आकर्षण असल्यामुळे हजारोंनी अर्ज येत असत. त्यांच्यामधून निवडले गेलेले आमचे बहुतेक सगळेच ट्रेनी ए प्लस दर्जाचे होते. तरीसुध्दा प्रशिक्षण सुरू असतांना दर आठवड्यात होणा-या परीक्षांमध्ये त्यांना मिळणा-या मार्कांत खूप तफावत दिसत असे. फारच कमी गुण मिळवणा-या मुलांना एकादी ताकीद देऊन काढून टाकले जात असे. काही मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचे असे किंवा ही नोकरी करण्याची इच्छा नसे. बाँडमधून सुटका करून घेण्यासाठी अशी मुले मुद्दाम नापास होत असत. उन्नी आणि नायर हे दोघेही टॉप रँकिंगमध्येही येत नसत किंवा तळाशी जात नसत. वर्गाच्या सरासरीच्या जवळपास असत. ते दोघेही बोलण्यात स्मार्ट होते, पण अभ्यासावर फार जास्त मेहनत करण्याची त्यांना गरज वाटत नसावी.

ट्रेनिंग संपल्यावर प्रशिक्षणार्थींनी नियुक्तीसाठी विभाग निवडायचा असे आणि गुणवत्तेनुसार जो उपलब्ध असेल तो दिला जात असे. त्या वेळी तारापूर आणि रावतभाटा येथे अणुऊर्जाकेंद्रांच्या उभारणीचे काम सुरू झाले होते आणि त्यांचे बरेचसे काम मुंबईच्या हेडऑफीसमधून केले जात असे. प्रकल्पाच्या जागी किंवा मुख्य कार्यालयात नेमणूक होण्याची प्रत्येकाला इच्छा असे. थुंबा इक्विटोरियल रॉकेट लाँचिंग स्टेशन नावाची अणुशक्ती खात्याची एक लहानशी शाखा केरळमधील थुंबा नावाच्या गावात स्थापन होत होती. तिथे नेमके काय काम आहे याची कोणालाच कल्पना नव्हती. टेलीव्हिजन नसल्यामुळे वर्तमानपत्रे हाच माहिती मिळण्याचा एकमेव स्त्रोत होता आणि अग्निबाण, कृत्रिम उपग्रह वगैरेबद्दल कोणालाच विशेष माहिती नव्हती. अमेरिका, रशीया वगैरे देशातच असले काही काम चालते असे कधीतरी छापून आले तर आले. भारताकडे असल्या गोष्टी नव्हत्या. गरम वायूने भरलेले फुगे आभाळात उडवून विरळ वातावरणाचा अभ्यास करणे अशा प्रकारचे संशोधन त्या काळी थुंबा येथे चालते असे ऐकीवात होते. त्यामुळे कोणताही इंजिनियर तिथे जाण्यासाठी उत्सुक नव्हता. आमच्या केरळी मित्रांना काही खास माहिती समजली होती का हे माहीत नाही, पण घराशेजारी राहता येईल या उद्देशाने त्यांनी तिथे पोस्टिंग मागून घेतले. त्या काळात कोकण रेल्वे नव्हती आणि मुंबईहून केरळला जाणारी थेट रेल्वे गाडीसुध्दा नव्हती. मद्रास (चेन्नाई) मार्गे जावे लागत असे आणि चांगले दोन तीन दिवस प्रवासात जात. त्यामुळे त्यांना नोकरीसाठीच केरळला जाण्याचे किती आकर्षण वाटत असेल हे समजण्यासारखे होते.

त्यानंतरच्या काळात परिस्थिती आश्चर्यकारक झपाट्याने बदलत गेली. भारत सरकारचा स्वतंत्र अवकाश विभाग (डिपार्टमेंट ऑफ स्पेस) स्थापन झाला. स्पेस कमिशन अस्तित्वात आले आणि प्रचंड वेगाने त्याचा विस्तार झाला. माझे दोन्ही मित्र त्या विभागातल्या पहिल्या वहिल्या मोजक्या अधिकारीवर्गात असल्यामुळे जसजसा त्यांच्या खात्याचा विस्तार होत गेला तसतशी त्यांना एकाहून एक चांगली अधिकारीपदे मिळत गेली. अणुशक्ती खात्यात आम्ही रुजू होण्यापूर्वीच हजारावर माणसे होती. आम्हाला त्यांच्या मागेमागे राहूनच प्रवास करायचा होता. त्यांच्यातले जे लोक होमी भाभांच्या काळापासून होते त्यांचीसुध्दा अशीच झपाट्याने प्रगती होत गेली होती असे फक्त ऐकले होते. आम्हाला ती संधी मिळण्याची शक्यता नव्हती. तिकडे विक्रम साराभाई आणि सतीश धवन यांच्या अधिपत्याखाली नव्या अवकाश विभागाचा पाया घातला गेला आणि अब्दुल कलामसारख्यांचे सारथ्य मिळाल्यावर त्या इवल्याशा रोपाचा वेलू गगनावरी गेला. त्याबरोबर त्या वृक्षांच्या शीर्षस्थानावर असलेल्या व्यक्तींची उंची देखील वाढत गेली.

डिपार्टमेंट ऑफ स्पेस निराळे झाल्यानंतर आमचा त्याच्याशी कसलाही संपर्क राहिला नाही आणि तिकडे काय चालले आहे याबद्दल आम्ही अनभिज्ञ होतो. आमची नोकरी सुरू झाल्यानंतर पंधरासोळा वर्षांनी तिस-याच एका कारखान्यात अचानकपणे उन्नीकृष्णकार्ता भेटला. त्या वेळी मी माझ्या तिस-या बढतीची अजून अपेक्षा करत होतो. उन्नी आणि माधवन दोघांनाही चार चार प्रमोशन्स मिळून गेल्याचे त्याच्याकडून कळले आणि चाटच पडलो. माधवन तर एका संस्थेचा डायरेक्टर झाला होता असे त्याच्याकडून समजले. त्यांच्या प्रगतीच्या मार्गात तेच सर्वात पुढे असल्यामुळे जितक्या वेगाने त्यांना धावणे शक्य होते त्यानुसार तिचा वेग त्यांनीच ठरवायचा होता. या बाबतीत माधवनने आघाडी घेतली आणि सातत्याने ती सांभाळली. इस्रो आणि स्पेस कमिशनच्या अध्यक्षपदापर्यंत तो जाऊन पोचला आणि पद्मविभूषण पुरस्काराचा सन्मानही त्याला मिळाला. प्रशिक्षणाच्या काळात आमच्या शेजारच्या झोपडीत रहात असलेला हा आमच्यातलाच काहीसा अबोल आणि सामान्य वाटणारा मुलगा पुढे इतकी उंच भरारी घेणार आहे असे तेंव्हा कोणालाही वाटले नव्हते.

माधवन स्पेस कमिशनचा अध्यक्ष असतांनाच चंद्रयानाचे यशस्वी उड्डाण झाल्याने तो प्रखर अशा प्रकाशाच्या झोतात आला. त्याच्या सचित्र मुलाखती वर्तमानपत्रात आणि टेलीव्हिजनवर झळकू लागल्या. इतर व्हीआयपीजप्रमाणे तोसुध्दा जागोजागी व्याख्याने देऊ लागला, बक्षिससमारंभांमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून दिसू लागला. त्याचा उल्लेख ज्येष्ठ शास्त्रज्ञ असा होऊ लागला. हे वाचतांना गंमत वाटत असे आणि अभिमानसुध्दा वाटत असे.

काही दिवसांपूर्वी त्याचाही उल्लेख एका घोटाळ्याच्या संदर्भात आला. मग त्यावर त्याची आणि त्याच्यावर आरोप करणा-याची प्रतिक्रिया आली. त्या घोटाळ्याचे स्वरूप नीटपणे समजलेही नाही. त्यात अनियमितता दिसत असली तरी त्यामुळे कोणाला किती लाभ झाला असे काही छापून आले नाही. एका कंपनीबरोबर काही करार झाला होता, पण त्याची अंमलबजावणी न होताच तो रद्दबातल करण्यात आला असे काहीसे झाले असावे. स्पेस कमिशनच्या कारभारात सरकारी लाल फितीला अर्धचंद्र दिला आहे, निर्णयाची प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक केली आहे असे ऐकले होते. त्यांचे उदाहरण इतरांना दिले जात होते. त्या फास्ट ट्रॅक प्रक्रियेमध्ये कदाचित काही रूढ पध्दतींना फाटा दिला असेल आणि हेच नडले असेल अशीही शक्यता आहे. याबद्दल कसलीच माहिती नसल्यामुळे तर्क करण्यात अर्थ नाही. पण माधवनचा वर वर जात असलेला पतंग एका झटक्यात खाली कोसळला याचे वाईट वाटले. सरकारी कारभाराबद्दल तितकेसे चांगले जनमत नसले तरी अवकाश खात्याची प्रतिमा उज्ज्वल होती, ती मलीन झाल्याचे जास्तच खटकले.

2 comments:

ऊर्जस्वल said...

घारे साहेब,

आपल्या स्मृतीच्या कोषातून ह्या सुरस आठवणी इथे वाटून दिल्याखातर आपणास मन:पूर्वक धन्यवाद!

मात्र माधवन नायर यांच्यावरचे आरोप खरे असावेत किंवा नसावेत ह्याबाबत आपल्या मित्रत्वाचे आधारे आपण निरसन करायला हवे होतेत असे मला वाटते. ज्येष्ठ शास्त्रज्ञांवर बेछूट आरोप करणार्‍यांना काहीतरी ताळतंत्र शिकवण्याची आवश्यकता मला जाणवते आहे.

शास्त्रज्ञ, ही ’कुणीही यावे टिकली मारून जावे’ अशा स्वरूपाची वस्तू नाही!

Anand Ghare said...

ज्यासंबंधी मला यत्किंचित माहिती नाही अशा वादग्रस्त विषयांवर माझे अंदाज व्यक्त करणे मला योग्य वाटत नाही. माझे विचार मी ्व्यक्त स्वरूपात मांडले आहेत