Wednesday, March 07, 2012

धुळवड, होली आणि जागतिक महिला दिवस

माझ्या लहानपणी ज्या प्रदेशात आम्ही रहात होतो त्या भागात तरी होळी पौर्णिमा किंवा शिमगा या उत्सवाला बरेच बीभत्स स्वरूप आले होते. घरात पुरणाची पोळी आणि कटाची आमटी खायला मिळत असल्याने आम्ही आनंदात असू, पण बाहेर जाऊन रस्त्यात चाललेल्या सार्वजनिक धिंगाण्यात आम्हाला सहभागी होता येत नव्हते. होळीच्या दहा बारा दिवस आधीपासूनच लाकडे आणि लाकडाच्या वस्तूंची पळवापळवी सुरू होत असे. काही वात्रट मुले आपण कुठून काय पळवून आणले याची फुशारकी मारायची, पण त्या वस्तू कुठे लपवून ठेवल्या आहेत याचा थांगपत्ता लागू देत नसत. ते शोधून काढून त्यावर डल्ला मारण्याचे काम आणखी कोणी करत असे. शेवटी सगळे अग्निनारायणाच्याच स्वाधीन करायचे असल्यामुळे तो चोरीचा अपराध समजला जात नसला तरी ते काम करणारा मुलगा सापडला तर त्याला भरपूर चोप मिळायचाच. स्वतःची असो किंवा त्याने ढापलेली असो, पण ज्याची वस्तू पळवली गेली जायची तो पळवणा-याच्या नावाने शंख करायचाच. होळीचा दिवस अगदी जवळ आल्यावर मुलांची टोळकी उघड उघडपणे घरोघरी जाऊन लाकडे जमवून आणत आणि जो कोणी देणार नाही त्याच्या घरासमोर शंखध्वनि करत. त्यामुळे बहुतेक लोक बंबात घालण्यासाठी किंवा चुलीत जाळण्यासाठी ठेवलेल्या ढिगामधून थोडी लाकडे, काटक्या, ढलपे वगैरे देत असत. काही मुले जमवलेल्या ज्वलनशील वस्तूंची राखण करायचे काम करत असत. होळीच्या दिवशी संध्याकाळ झाली की ते ढिगारे भर रस्त्यांत मधोमध आणून पेटवून दिले जात आणि रात्रभर ते जळत रहात. त्यावेळी तिथे जमलेल्या लोकांमध्ये गलिच्छ शिवीगाळ करण्याची चढाओढ चालत असे. आमच्या घरातले वातावरण जास्तच सोवळे असल्याकारणाने त्या गोंधळात सामील होण्याची परवानगी कधीच मिळाली नाही. पण गल्लीत चाललेला गोंधळ कानावर येत असे तसेच घराच्या गच्चीवरून दिसतही असे.
त्याच्या दुसरे दिवशी म्हणजे धुळवडीला गलिच्छपणाचा सुमारच नसे. होळीत जळालेल्या लाकडांची राख त्या दिवशी एकमेकांना फासायची असा पूर्वीचा रिवाज असला तरी त्या राखेतच माती, शेण आणि गटारातली कसलीही घाण मिसळून त्यात ज्याला त्याला लोळवणे चालत असे. ते करणा-या जमावाच्या हातात एकादा अनोळखी इसम सापडला तर त्याची पुरती वाट लावली जाई. असल्या धुडगुसात सामील होण्याचा विचारसुध्दा करणे आमच्या घरी कोणाला शक्य नसल्य़ामुळे धुळवडीच्या दिवशी सकाळी कुठल्याही कारणासाठी कोणीही बाहेर पडत नसे. त्या दिवशी कुठे कुठे कोणकोणते घाणेरडे प्रकार घडले याच्या बीभत्स पण सुरस कहाण्या पुढील काही दिवस कानावर येत रहात. मनातला सगळा ओंगळपणा या वेळी बाहेर काढून टाकायचा आणि त्याला स्वच्छ करायचे हा होळीच्या मागला उद्देश असतो असे सांगितले जात असले तरी त्याचा अतिरेक होत असल्यामुळे ते साध्य होत नसे. उलट त्यातून नवेच हेवे दावे निर्माण होत आणि झालेल्या अपमानाचे पुढल्या वर्षी उट्टे काढण्याचा निर्धार केला जात असे. शिमगा संपला तरी त्याचे कवित्व शिल्लक राहते अशी म्हणच पडली आहे ती त्यामुळेच.
होळी पौर्णिमेच्या दुसरे दिवशी सकाळी (आपल्या धुळवडीला) उत्तर भारतीय लोक रंग खेळतात. हिंदी सिनेमांमध्ये केले जाणारे होलीच्या उत्सवाचे प्रचंड उदात्तीकरण पाहून त्याचे पडसाद मुंबईसारख्या महानगरातील समाजातसुध्दा दिसायला लागले. मुंबईमधून तरी मराठी माणसांची परंपरागत रंगपंचमी आता लुप्तच झाली आहे असे दिसते. पुण्यासारख्या शहरात ती काही प्रमाणात खेळली जात असली तरी हिंदी सिनेमातल्या होलीची सर त्याला येत नाही. अणुशक्तीनगरसारख्या प्रामुख्याने शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांच्या वसाहतीत खूपच सभ्य वातावरणात होली खेळली जात असे. त्या दिवशी एकमेकांना (कडकडून) भेटणे, रंग उधळणे किंवा रंगाने माखणे याबरोबरच घरोघरी निरनिराळ्या मिठाया आणि नमकीन पदार्थ खायला मिळत आणि गाणी, विनोद वगैरेंच्या मैफली अंगावर टाकल्या जाणा-या रंगाइतक्याच रंगत असत. खरोखरच होलीचा त्योहार एक सांस्कृतिक उत्सव या भावनेने साजरा होत असे. उत्तर भारतीय आणि बंगाली लोक यात अमाप उत्साहाने भाग घेत असत आणि आम्हालाही त्यात सामील करून घेत असत. एक दोन वर्षातच आम्हीसुध्दा त्यात त्यांच्याइतक्याच उत्साहाने भाग घेऊ लागलो. लहानपणच्या काळात होळी किंवा धुळवड यात सामील होण्यास महिलावर्गाला सक्त मनाई होती. त्या दिवसात त्या कधी चुकूनसुध्दा घराबाहेर पडतसुध्दा नसत. पण अणुशक्तीनगरमधल्या होलीमधील रंगणे, रंगवणे, खाणेपिणे आणि गाणे वगैरे सगळ्या भागात त्या पुरुषवर्गाच्या दुप्पट उत्साहाने भाग घेत असत. सेवानिवृत्त होऊन वाशीला रहायला गेल्यानंतरसुध्दा दोन तीन वर्षे आम्ही होलीचा आनंद घेण्यासाठी पूर्वीच्या ठिकाणी जात होतो.

उद्या योगायोगाने धुळवड आणि होळीबरोबरच जागतिक महिला दिवससुध्दा आहे. एका बाजूला महिलांना पूर्णपणे निषिध्द असलेली धुळवड आणि त्याच दिवशी महिलांसाठी साजरा करण्यासाठी ठरवलेला त्यांचा खास दिवस. पूर्वीच्या काळातल्या शिव्यागाळीमध्ये नाहक आयाबहिणींचा उध्दार होत असे. आता तो प्रकार थांबला असेल तर चांगलेच आहे. त्या दिवशी महिला दिनाच्या निमित्याने त्यांचेबद्दल  काही गौरवास्पद बोलले आणि लिहिले गेले तर किती चांगले?

2 comments:

mynac said...

घारे साहेब,आजच्या जागतिक महिला दिनाची आपण ह्या होळीच्या दिवशी घेतलेली दखल मला विशेष आवडली."एका बाजूला महिलांना पूर्णपणे निषिध्द असलेली धुळवड आणि त्याच दिवशी महिलांसाठी साजरा करण्यासाठी ठरवलेला त्यांचा खास दिवस. " हा योगायोग बहुदा प्रथमच जुळून आला असावा.
धन्यवाद..

Anand Ghare said...

धन्यवाद. ठराविक तिथी आणि ठराविक तारीख यांचे (योगायोगाने) एकाच दिवशी येणे हे दर एकोणतीस वर्षांनी घडत असते असे मी खगोलशास्त्रविषयक गणिताच्या आधाराने एका लेखात दाखवले आहे. अर्थातच तो निव्वळ योगायोग मानता येणार नाही. पण अर्थपूर्ण जीवनात एक किंवा दोन वेळाच येऊ शकत असल्यामुळे दुर्मिळ मात्र आहे.