Thursday, February 02, 2012

मदत

आजकाल आपण आपली बहुतेक सगळी महत्वाची कामे कोणा ना कोणाच्या सहाय्याने करत असतो. इतर लोकांनी त्यांची स्वतःची गरज, कर्तव्य किंवा त्यांना मिळणारा लाभ वगैरे गोष्टी पाहून आपल्याला सहाय्य करणे काही वेळा अपेक्षितच असते, त्यामुळे त्याचे विशेष वाटतही नाही. आधी आवळा देऊन पुढे कोहळा काढायचा किंवा परोपकार करून पुण्यसंचय आणि पापक्षालन करायचा हेतू काही लोकांच्या मनात असतो. कोणालाही मदत करतांना त्या माणसाचा आपल्याला काही उपयोग आहे का असा विचार बहुतेक लोक करतात. तशा प्रकारे केलेली मदत ही एका प्रकारची गुंतवणूक (इन्व्हेस्टमेंट) असते, त्यातून पुढे मागे काही फायदा मिळण्याची शक्यता असते. एकाद्या माणसाने केलेल्या मदतीची लगेच दुस-या रूपात परतफेड मागितली तर तो सौदा ठरतो. या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन निव्वळ माणुसकीच्य़ा भावनेनेसुध्दा इतरांना मदत करणारेसुध्दा अनेक लोक आढळतात. किंबहुना सगळेच लोक ते करत असतात. आपण दुस-याला मदत केली, तर तो तिस-याला, तो चौथ्याला अशी साखळी निर्माण होऊन एक चांगले सामाजिक वातावरण निर्माण होते आणि वेळप्रसंगी त्याचा आपल्यालासुध्दा फायदा होतो अशी मनोधारणा त्याच्या मागे असते. हे माणसांच्या अंतःप्रेरणेमधून घडते की त्यांच्यावर झालेल्या संस्कारामुळे याबद्दल नक्की सांगता येणार नाही. पण त्यामुळे त्यांना जमेल तेवढे ते दुस-यांच्यासाठी करत असतात. सहाय्य किंवा मदत या शब्दांचा आर्थिक आधार असा संकुचित अर्थ यात अभिप्रेत नाही. इतर अगणित प्रकारे आपण इतरांच्या उपयोगी पडू शकतो आणि पडतही असतो. दुस-याच्या कामाला हातभार लावणे, त्याला आवश्यक किंवा महत्वाची माहिती देणे, न समजलेले समजावून सांगणे वगैरेंपासून त्याला फक्त सोबत करणे किंवा त्याचे बोलणे ऐकून घेऊन त्याला आपले मन मोकळे करून देणे अशासारख्या लहान लहान गोष्टींची त्याला मदत होते.

व्यक्तीगत जीवन आणि व्यावसायिक जीवन यांना वेगळे ठेवावे आणि एकाचा उपसर्ग दुस-याला होऊ देवू नये असे बिझिनेस स्कूल्समध्ये शिकवले जाते. आपली व्यक्तीगत सुखदुःखे, राग, लोभ, चिंता वगैरेंचा परिणाम व्यावसायिक जीवनात घेतल्या जाणा-या निर्णयांवर होता कामा नये आणि ते घेतांना दया-माया, प्रेम-द्वेष वगैरेंना थारा न देता वस्तुनिष्ट विचार करायचा असतो. अर्थातच कामाच्या निमित्याने भेटणा-या माणसांशी कामापुरतेच संबंध ठेवायचे असतात. त्यांच्यात गुंतायचे नसते. पण प्रत्यक्षात मनाचे दरवाजे असे पाहिजे तेंव्हा उघडता किंवा मिटता येत नाहीत. निदान मला तरी तसे जमले नाही. ऑफीसात इतर चकाट्या पिटायच्या नाहीत हे पथ्य जरी मी कसोशीने पाळायचा प्रयत्न केला असला तरी न बोलून दाखवता सुध्दा आपुलकीचे बंध निर्माण होतच राहिले आणि निरोपसमारंभाच्या भाषणानंतर ते काही एकदम तुटले नाहीत. पूर्वी रोज भेटणारी माणसे भेटण्याची जागाच त्यानंतर राहिली नाही आणि एकंदरीतच त्यांच्या भेटीगाठी कमी कमी होत गेल्या, तसतसे ते बंध विरत गेले. माझ्या आधीपासून ऑफीसात असलेले ज्येष्ठ सहकारी तर आधीच सेवा निवृत्त झाले होते, माझ्या बरोबरीचे तसेच कनिष्ठ सहकारीसुध्दा एक एक करून निवृत्त झाले. माझ्याबरोबर प्रत्यक्ष काम करणारे कोणीच शिल्लक उरले नव्हते. त्यांच्या पुढच्या पिढीकडे सारी सूत्रे गेली होती आणि माझा त्यांच्याशी कधीच थेट संपर्क जुळला नव्हता. आमच्या बरोबर एका वसाहतीमध्ये राहणारे लोक पांगत गेले होते, कोणी दूरच्या उपनगरात रहायला गेले, कोणी परगावी किंवा परदेशी गेले आणि काही परलोकवासी झाले. टेलीफोन आणि इंटरनेटमुळे संपर्क साधणे शक्य असूनसुध्दा सगळेच जण संपर्कात राहिले नाहीत. जे ऑफीसात होत होते तेच काही प्रमाणात व्यक्तीगत जीवनातसुध्दा घडत गेले. मागली पिढी काळाआड गेली, पुढच्या पिढीमधील अनेक मंडळी परप्रांतात किंवा परदेशात चालली गेली आणि मुंबईत राहणा-या निकटच्या आप्तांची संख्या रोडावत गेली.

मागच्या आठवड्यात अलकाला बरे वाटत नव्हते म्हणून आमच्या इस्पितळाच्या बाह्यरुग्ण विभागात घेऊन गेलो. काही तपासणी करून झाल्यावर तिला उपचारासाठी अतिदक्षताविभागात (आयसीयू मध्ये) दाखल करावे लागले. पूर्वी केलेल्या काही चांचण्यांचे रिपोर्ट्स डॉक्टरांना हवे होते, पण ते घरी ठेवलेले होते. घरी जाऊन ते घेऊन येण्यासाठी निदान दोन तास वेळ लागला असता, पण आयसीयू मध्ये पेशंट असला तर त्याच्या जवळच्या आप्ताने बाहेर थांबणेही आवश्यक असते. या दोन्ही गोष्टींचा मेळ कसा घालायचा? आमच्या घरात त्यावेळी तिसरे कोणी नव्हतेच. बोलावल्याबरोबर पटकन येऊ शकेल असे जवळ राहणारेही कोणी नव्हते. त्यामुळे जवळ राहणा-या अलकाच्या दोन मैत्रिणींना विचारले. त्या तयार झाल्या आणि त्यातली एक लगेच धावत आली. तिच्याशी बोलून मी घरी जायच्या तयारीत होतो, तेवढ्यात दुरूनच मला पाहून एक जुना मित्र प्रसाद तिथे आला. तोसुध्दा नुकताच निवृत्त होऊन खारघरला रहायला गेला होता, शिवाय त्याची नव्वदीला आलेली आई त्याच्याकडे असल्यामुळे तिची काळजी घेण्यासाठी तिच्यासोबत राहणे त्याला आवश्यक होते. त्यामुळे इच्छा असूनसुध्दा मला मदत करणे त्या वेळी त्याला शक्य नव्हते.

"रात्री काय करणार आहेस?" या त्याच्या प्रश्नावर माझ्याकडे उत्तर नव्हते. दिवसभराच्या दगदगीनंतर मीसुध्दा थकून गेलो होतो आणि रात्रभर थांबून राहण्याएवढे त्राण आणणे मला कठीण होते. पण रिपोर्ट्स आणून दिल्यानंतरच मी त्यासाठी काही करू शकत होतो, ते सुध्दा हॉस्पिटलमध्येच राहून फोनवरच करायला हवे होते, त्यासाठी कोणाला जाऊन प्रत्यक्ष भेटणेही मला शक्य नव्हते. "तोपर्यंत मी थोडे प्रयत्न करतो" असे सांगून प्रसाद त्याच्या घराकडे गेला. तो नुकताच सेवानिवृत्त झालेला असल्यामुळे या वेळी ऑफीसात कोणत्या हुद्द्यावर कोण आहे हे त्याला ठाऊक होते. एक दोघांशी फोनवरच बोलून मला मदत हवी असल्याचे त्याने त्या मित्रांना सांगितले.
रिपोर्ट्स घेऊन मी हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत भरत, जयपाल आणि त्यागी तिथे हजर होते आणि माझी वाट पहात उभे होते. तीघेही मला दहा ते पंधरा वर्षांनी कनिष्ठ असल्यामुळे ते कधीच माझ्या थेट संपर्कात आले नसले तरी कामाची चर्चा करतांना त्यात सहभागी होत होते. तेवढ्या सहवासामध्ये त्यांनी जे काही अनुभवले असेल आणि त्यांच्या वरिष्ठांकडून माझ्याबद्दल जे ऐकले असेल तेवढाच आमच्यातला दुवा होता. पण त्यांनी अत्यंत आपुलकीने अलकाची आणि माझी विचारपूस केली आणि मला स्वतःला विश्रांती घेणेसुध्दा किती आवश्यक आहे हे सांगितले. हॉस्पिटलजवळच वसाहतीत राहणा-या एका आप्तांकडे मी जाऊन झोप घ्यायची आणि भरतच्या खात्यातला कोणी युवक येऊन त्याने रात्रभर माझ्याऐवजी हॉस्पिटलमध्ये राहायचे असे ठरले. अलकाची प्रकृती तशी ठीकच असल्यामुळे रात्री कसली गरज पडायची शक्यता नव्हतीच, पण तशी वेळ आलीच तर हॉस्पिटलमध्ये राहणारा मला लगेच बोलावून आणू शकत होता. भरत आणि त्याच्या साथीदारांनी तिथल्या तिथे एकमेकांशी बोलून नितिनकुमारची निवड केली आणि त्याला बोलावून घेतले. मी सेवा निवृत्त होऊन गेल्यानंतर तो नोकरीला लागला होता. त्यामुळे आम्ही कधी एकमेकांना पाहिलेसुध्दा नव्हते. पण भरतने सांगताच यत्किंचित कुरकुर न करता किंवा आढेवेढे न घेता यावेळी तो माझ्या मदतीला आला. आम्ही दोघांनी एकमेकांचे मोबाईल फोन नंबर घेतले आणि हॉस्पिटलमध्ये भेटायची वेळ ठरवली.
ठरलेल्या वेळी नितिन तयारी करून आला आणि रात्रभर हॉस्पिटलमध्ये बसून राहिला. रात्रभर झोप झाल्याने ताजे तवाने होऊन सकाळी मी हॉस्पिटलला गेलो. नितिनचे आभार मानून त्याला मोकळे केले आणि घरी पाठवून दिले. पुढे दिवसभर मी हॉस्पिटलमध्ये राहिलो होतो, पण इतर कोणी कोणी मध्ये येऊन मला सोबत करत किंवा थोडा वेळ सुटी देत राहिले. पुण्याहून उदय यायला निघाला होता, पण त्याला काही अनपेक्षित अडचणी आल्या. तोपर्यंत दुसरी रात्र आली. भरत माझ्या संपर्कात होताच. त्याने दुस-या रात्रीची व्यवस्थासुध्दा केली. नितिनच्याच वयाचा, त्याच्याप्रमाणेच माझी ओळख नसलेला संदीप त्या रात्री आला आणि रात्रभर हॉस्पिटलमध्ये माझ्यासाठी बसून राहिला. तिसरे दिवशी सकाळी उदय येऊन पोचल्यानंतर आम्हाला बाहेरच्यांच्या मदतीची आवश्यकता उरली नाही.
पण जेंव्हा मला मदतीची आवश्यकता होती आणि ती कोठून मिळेल हे देखील ठाऊक नव्हते, तेंव्हा दोन अनोळखी तरुण पुढे आले आणि कसलाही आविर्भाव न आणता मला हवी असलेली मदत करून गेले हे विशेष!

No comments: