एकोणीसशे सत्तरच्या सुमाराला देवनारजवळ अणुशक्तीनगर या वसाहतीची उभारणी सुरू झाली, तसेच मुंबई दूरदर्शनच्या प्रसारणाला सुरुवात झाली आणि अस्मादिकांचे शुभमंगल झाले. माझ्या जीवनावर सखोल प्रभाव करणा-या या तीन्ही गोष्टींचा एकमेकींशी काहीही संबंध नसला तरी त्यांचे जे एकत्रित चांगले परिणाम झाले त्यातूनच श्री.डी.आर.खडके या अफलातून गृहस्थाशी माझा परिचय झाला. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या ख्याल गायकीची विलंबित लयीमधील आलापांमधून होणारी सुरुवात नवख्यांसाठी कंटाळवाणी असते. त्यामुळे लग्नाच्या आधी मी सहसा त्या संगीताच्या वाटेला जात नसे. पण अलकाला संगीताची उपजतच विलक्षण आवड असल्यामुळे तिला शास्त्रीय संगीताचे जबरदस्त आकर्षण वाटते. मुंबई दूरदर्शनाच्या सुरुवातीच्या काळात पं.विजय राघव राव आणि सुहासिनी मुळगावकर हे निर्माते शास्त्रीय संगीताचे उत्तमोत्तम कार्यक्रम अत्यंत मनोरंजक पध्दतीने सादर करीत असत. ते सारे कार्यक्रम अलका न चुकता आणि तल्लीन होऊन पहात असे. त्यामुळे मलासुध्दा सूर, ताल, लय, राग वगैरेंची थोडी समज आली आणि शास्त्रीय संगीत ऐकण्यात गोडी निर्माण झाली. अणुशक्तीनगरमध्ये आम्ही रहायला गेलो त्या काळात के.एस.सोनी नावाचे एक सद्गृहस्थ तिथे रहात होते. त्यांनी स्वतःला शास्त्रीय संगीताच्या प्रसाराला वाहून घेतले होते. त्यात रुचि असणा-या लोकांना त्यांनी घरोघरी जाऊन शोधून काढले आणि त्यांना एकत्र आणून स्वरमंडल नावाची सार्वजनिक संस्था सुरू केली. थोडासा निधी गोळा करून आधी स्वतःच्या घरी आणि नंतर शाळेच्या हॉलमध्ये उदयोन्मुख गायक वादकांचे कार्यक्रम ठेवले. प्रतिष्ठित मंडळींना या कार्यक्रमाला आमंत्रित केले. एक उत्साही तरुण कार्यकर्ता म्हणून मी ही संगीताव्यतिरिक्त इतर किरकोळ कामे करून त्यात सहभाग घेत असे. अशाच एका कार्यक्रमात श्री.खडके हे सन्मान्य अतिथी म्हणून आले असतांना माझी त्यांच्याशी भेट झाली. ते एक रिटायर झालेले सी.आय.डी.चे मोठे अधिकारी आहेत आणि आता संगीताच्या क्षेत्रात त्यांचा दबदबा आहे एवढेच तेंव्हा समजले होते.
त्या काळातले नाट्यसंगीतामधले सुपरस्टार श्री.रामदास कामत हे सुध्दा पोलिस अधिकारी असल्याचे ऐकले होते. रंगभूमीवर मत्स्यगंधेला "नको विसरू संकेत मीलनाचा" असे म्हणत तिची आर्जवे करणे आणि "रेडच्या टायमाला फोर्स घेऊन तिथं पोचायचंच" असे हाताखालच्या अधिका-याला दरडावून सांगणे या दोन्ही गोष्टी ते करत असत. श्री.खडके यांचे नाव मात्र मी संगीत किंवा नाटकाच्या कार्यक्रमात किंवा टीव्हीवर कुठेच ऐकले नव्हते. कॉलेजचे शिक्षण घेत असतांना त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला होता, पण पोलिसखात्यात रुजू झाल्यानंतर सर्व लक्ष तिकडेच पुरवले. अनेक उत्तमोत्तम कामगि-या यशस्वी रीतीने बजावून पदोन्नती तसेच पदके मिळवली. त्यात इंडियन पोलिस पदक आणि राष्ट्रपती पदक यांचा समावेश आहे. खुद्द माननीय यशवंतराव चव्हाण आणि इंदिरा गांधी यांच्याकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.
नोकरीच्या काळात संगीताची श्रवणभक्तीच करणे त्यांना शक्य होते, पण सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सारी कसर भरून काढली. पं.वामनराव सडोलीकर या जयपूर घराण्याच्या सुप्रसिध्द गायकांचे शिष्य होऊन बावीस वर्षे त्यांचे मार्गदर्शन घेतले. शंभर दीडशे श्रोत्यांसमोर शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम व्यवस्थितपणे सादर केला. पण गायक म्हणून मैफल गाजवणे हा त्यांचा उद्देश नव्हताच. शास्त्रीय संगीताचा स्वर्गीय आनंद स्वतः मिळवणे आणि अधिकाधिक लोकांना तो मिळवून देणे हे त्यांनी आपले जीवितकार्य ठरवले होते. चेंबूर येथील त्यांच्या राहत्या घराचा दिवाणखाना त्यांनी या कामासाठी उपयोगाला दिला. दर बुधवारी संध्याकाळी तिथे एक बैठक होत असे. कोणत्याही गायक किंवा वादकाने यावे आणि आपला कार्यक्रम त्यात सादर करावा अशी मुभा होती. असंख्य नवोदित कलाकारांना यामुळे एक मंच मिळाला. त्याशिवाय दर महिन्याच्या पहिल्या रविवारी एकाद्या मुरलेल्या कलाकाराला ते आमंत्रित करत असत आणि त्यांच्या गायन वादनाचा आस्वाद रसिक श्रोत्यांना घेता येत असे. हे सर्व पूर्णपणे निःशुल्क असे. कलाकाराला किंवा श्रोत्याला त्यासाठी मूल्य देण्याची आवश्यकता नसे.
जयपूर अत्रौली घराण्याचे मूळ पुरुष पै.अल्लादियाखाँ यांच्या पुण्यतिथीनिमित्य एक संगीत सभा भरवण्याचे खडके काकांनी १९७६ साली ठरवले आणि आतापर्यंत ३६ वर्षे हा उत्सव चालवला. सुरुवातीच्या काळात पं.वामनराव सडोलीकर आणि त्यांच्या कन्यका श्रुति यांच्या मुख्य आधारावर हा कार्यक्रम चालत असे. खडके काका दरवाज्यापाशी एका खुर्चीत बसून येणा-यांचे आगत स्वागत करताहेत आणि मंचावरील सर्व व्यवस्था, आयोजन, निवेदन वगैरे बाजू श्रुति समर्थपणे सांभाळते आहे असेच चित्र अनेक वर्षे मी पहात होतो. स्व.वामनराव आणि श्रुति यांचे गायन हा या उत्सवातला एक परमोच्च बिंदू असे. पुढे श्रुति सडोलीकर काटकर हिने संगीताच्या क्षेत्रात स्वतःचे असे खास आणि उच्च स्थान निर्माण केल्यानंतर तिला इतर कामांसाठी वेळ मिळणे कठीण होत गेले असणार. हळूहळू ती अदृष्य होत गेली. चेंबूर येथील बालविकास संघाच्या हॉलमध्ये गुढी पाडवा किंवा गुड फ्रायडे या सुमारास हा कार्यक्रम होत आला आहे. पहिली कित्येक वर्षे तो सलग चोवीस तास चालायचा. त्यामुळे दिवसाच्या आठही प्रहरांमधील रागांचा समावेश त्यात होत असे. कालांतराने सरकारी नियमांप्रमाणे तो वेळेत संपवणे आवश्यक झाले. हल्ली तो तीन दिवस संध्याकाळी आणि अखेरच्या (रविवारच्या) दिवशी सकाळी असा चार दिवस असतो. स्व.भीमसेन जोशी, स्व.कुमार गंधर्व, स्व.मल्लिकार्जुन मनसूर, स्व.गंगूबाई हंगल, पं.जसराज, श्रीमती किशोरी आमोणकर, श्री.यशवंत देव यासारख्या बहुतेक सर्व आजी माजी मोठ्या कलाकारांनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. हा कार्यक्रमसुध्दा विनामूल्य असतो. श्रोत्यांनी स्वेच्छा दिलेल्या देणग्या स्वीकारण्याची व्यवस्था असते. त्यातूनच पुरेसा निधी बहुधा जमत असावा. या समारंभातले कार्यक्रम इतक्या उच्च दर्जाचे असतात की ते ऐकल्यानंतर कोणाचाही हात खिशात जावा आणि सढळ हाताने देणगी दिली जावी असे होते. ज्या मोठ्या नामवंत कलाकारांना टाटा थिएटर किंवा नेहरू सेंटरसारख्या ठिकाणी खूप दुरून पहावे लागत असे अशा दिग्गजांच्या अगदी पुढ्यात बसून त्यांचे गायन ऐकण्याची संधी या महोत्सवात मिळाली.
दर वर्षी होणा-या अल्लादियाखाँ संगीत समारोहामध्ये श्री.खडके यांचे थोडा वेळ भाषण असे. श्रेष्ट भारतीय संगीत, महान संगीतकार, त्यांचे गुरू, कार्यक्रमात भाग घेणारे कलाकार, रसिक श्रोते वगैरेंचे गुणगान करून झाल्यानंतर ते आपले मनोगत व्यक्त करत असत. आता आपले वय झाल्यामुळे तरुण लोकांनी पुढे येऊन या कार्यक्रमाची धुरा सांभाळावी असे आवाहन त्यात असे. हे मी निदान वीस पंचवीस वर्षांपासून ऐकत आलो आहे. पण त्या काळापासूनसुध्दा सगळे तत्कालीन तरुण लोक आपल्या उदरनिर्वाहाच्या कामातच इतके गुरफटलेले असायचे की त्यांच्या प्रापंचिक कामासाठीसुध्दा वेळ काढणे त्यांना कठीण व्हायचे. उतार वयाकडे झुकलेले अनेक लोक सहाय्य करतांना दिसत, पण ते दीर्घ काळ टिकत नसावेत. खडके काकांच्या अपेक्षांची पूर्ती करणे सोपे नसणार. या समारोहाची कायम स्वरूपाची काही व्यवस्था खडके काका करू शकले की नाही याबद्दल संदिग्धताच राहिली.
त्यांनी वयाची नव्वद वर्षे पूर्ण केली त्यावेळी त्यांचा सातारा या त्यांच्या गावी जाहीर सत्कार केला गेला होता, त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी त्यांच्या लहानपणात घडलेल्या अनेक गोष्टींबद्दल सविस्तर सांगितले होते. अखेरपर्यंत त्यांची स्मरणशक्ती चांगली होती. नोकरी आणि कार्य या निमित्याने असंख्य माणसे त्यांच्या सहवासात आली असतील. तरीही समोरच्या माणसाची ओळख पटताच ते त्याच्याशी सुसंगत असे बोलत असत. काही महिन्यांपूर्वीच माझ्या एका मित्राच्या घरी झालेल्या संगीताच्या बैठकीला ते आले होते. वयोमानानुसार आलेला अशक्तपणा आणि मंद झालेली दृष्टी यामुळे कोणाच्या आधाराची शारीरीक गरज त्यांना भासत होती, पण त्या जोरावर ते हिंडत फिरत होते, तसेच सर्वांबरोबर बोलत होते. मागल्या वर्षीपर्यंत ते अल्लादियाखाँ पुण्यतिथी समारंभात उपस्थित होऊन शक्य तेवढा सहभाग घेतच होते. त्यामुळे ते शऱदांचे शतक झळकवणार असे वाटले होते. पण तसे झाले नाही. ते आम्हाला सोडून गेल्याची बातमी अचानक येऊन थडकली. त्यांच्या स्मृतीला शतशः प्रणाम.

No comments:
Post a Comment