Sunday, January 22, 2012

दिसणे आणि असणे

"दिसतं तसं नसतं आणि म्हणून जग फसतं" अशी म्हण आहे. तिचा अनुभव आपल्याला वेळोवेळी येत असतो. हे स्वतःचे वेगळे दिसणे कोणी मुद्दाम करत असला तर त्याच्याबद्दल "हत्तीचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे असतात" हे उदाहरण दिले जाते. 'चकाकणारे सगळेच सोने नसते', 'दुरून डोंगर साजिरे' वगैरे म्हणीसुध्दा आहेत. पण 'दिसते तसे नसणे' हे बहुधा अपवादच असतात. बहुतेक वेळा आपली नजर फसत नाही. काही गायी शिंगे मोडून वासरात शिरण्याचा प्रयत्न करतात आणि काही बुढ्ढ्या घोड्या लाल लगाम लावून मिरवतांना पाहून हंसू येते. याचे कारण त्या जशा आहेत त्यांपेक्षा कोणी वेगळे असल्याचा आव आणतात, पण त्यांचा तो प्रयत्न फसतो. त्यामुळे त्या जशा असतात तशाच पाहणा-याला दिसतात. एकंदरीत पाहता बहुतेक वेळा 'चक्षुर्वै सत्यम्' असाच अनुभव येतो.

कधीकधी दिसणे आणि असणे यात काही विसंगती नसली तरी ते व्यक्त करण्यातून फरक पडतो. दिसणे आणि असणे या दोनच क्रियापदांच्या उपयोगातून कशा वेगळ्या छटा निर्माण होतात याचा एक अनुभव सांगतो. एकदा आमचे घरकाम करणारी एक कामवाली बाई काम सोडून गेली. जातांना तिने तिच्या बदल्यात कोणाला आणूनही दिले नाही. त्यामुळे आमच्या गृहमंत्र्यांनी नवी बाई शोधायची मोहीम सुरू केली. किंबहुना ती मुद्दाम करावी लागली नाही. कामवाल्या बाईशिवाय आपले जीवन कसे असह्य होत चालले आहे हे रोजच्या फोनाफोनीमध्ये मैत्रिणींना सांगताक्षणीच सर्वांनी त्यातून मार्ग काढण्यासाठी हातभार लावला आणि त्यांच्या माहितीमधल्या निरनिराळ्या कामवाल्या बायांना त्या आमच्याकडे पाठवून द्यायल्या लागल्या.

या उमेदवारांचा एकंदर अवतार आणि त्यांच्या बोलण्यातून जे काही इम्प्रेशन पडेल त्यावरूनच नवी बाई ठरवायची होती. याबद्दलचे सर्वाधिकार सौ.कडेच होते, कारण तिलाच त्या बाईकडून रोज घरकाम करून घ्यायचे होते आणि त्याचा अनुभव होता. त्या बायका भेटायला आल्यावेळी मी घरी असलो तर माझ्या नजरेलाही त्या क्षणभर पडत असत. त्यामुळे निर्णय घेण्याचा अधिकार फक्त पत्नीचाच आहे असे असले आणि तिला हे माहीत असले तरी ती माझा सल्ला विचारायची. म्हणजे उद्या काही प्रॉब्लेम आला तर मग माझ्यावर त्याची जबाबदारी ढकलणे तिला सोयीचे झाले असते. कोठल्याही बाईबद्दल माझे अगदीच वाईट मत झाले नसेल तर मी आपला गुळमुळीत उत्तर देत असे, "ही तशी बरी दिसते आहे, नाही का?" आपण उगाच तिच्यातले दोष कशाला काढायचे? मला तरी क्षणभरात ते कसे कळणार होते? आणि ते दिसले तरी मला त्याच्याशी काय देणे घेणे आहे? शिवाय दिसणे आणि असणे यात किती तरी फरक असू शकतो. तेंव्हा सावधपणे बोललेले बरे.

"अहो, असं काय करताय्?, तुम्ही हे पाहिलंत का?, ते पाहिलंत का?" किंवा "नुसती बरी दिसते आहे की चांगली वाटते आहे?" वगैरे प्रश्नांवर मी आपला नंदीबैलासारखी मान हलवीत असे. त्याचा तिला हवा तो अर्थ काढायचे तिला पूर्ण स्वातंत्र्य होते.

एकदा मात्र "ही बाई बरी दिसते आहे" म्हणण्याऐवजी चुकून मी "ही बाई दिसायला बरी आहे" असे म्हणून गेलो. पुढे काय झाले ते सांगायची गरज आहे का?

'दिसणे' आणि 'असणे' हे दोनच शब्द पण त्याचे अर्थ किती निराळे होतात? पहिल्या उदाहरणातले तिचे 'दिसणे' म्हणजे तिचे 'सभ्य किंवा असभ्य वागणे', 'सरळ किंवा तिरकस बोलणे', 'नीटनेटकेपणा किंवा वेंधळेपणा', 'स्वच्छता किंवा गलिच्छपणा', 'प्रामाणिकपणा' किंवा 'लबाडपणा', 'विनय किंवा ऊर्मटपणा', 'सालस किंवा चवचाल वृत्ती', 'विश्वसनीयता किंवा बिनभरोसा' वगैरे गुणांचा त्यात समावेश होतो. फक्त चेहरा पाहून आणि एकादे वाक्य ऐकून आपल्याला त्यात किती गोष्टी दिसतात? या गुणांमुळे ती आपले घरकाम कसे करेल हे ठरणार होते. त्याच्या पुढे आलेल्या 'आहे' या शब्दाला फक्त व्याकरणापुरताच अर्थ असतो. कदाचित ती जशी दिसते तशी नसण्याची शक्यता त्यात दडली असते.

दुस-या उदाहरणातले 'दिसणे' म्हणजे मात्र फक्त तिचे 'रूप' असाच अर्थ बहुधा काढला जातो. त्याचा घरकामाशी काही संबंध नाही. आणि 'आहे' याचा अर्थ निश्चितपणे 'सकारार्थी' असाच होतो, किंवा तसे माझे मत आहे असे त्यातून दिसते. एकाद्या परस्त्रीबद्दल मी असे उद्गार (पत्नीसमोर) काढणे म्हणजे ते अगदी ताळतंत्र सोडून देणे झाले. त्यातून नको ते अर्थ निघण्याची शक्यता होती.

तात्पर्य काय तर कोणत्याही भाषेमधल्या सुट्या शब्दांचा अर्थ माहीत असणे पुरेसे नसते, ते शब्द थोडे मागे पुढे झाले तरी कधी कधी संदर्भ बदलतात आणि अर्थाचे अनर्थ होतात.



No comments: