Sunday, January 15, 2012

मकरसंक्रमण



आज मकरसंक्रांत आहे. म्हणजे काय आहे हे सांगणारे लेख बहुतेक वर्तमानपत्रात आले आहेतच. माझ्या लहानपणी आमच्या घरात टिळक पंचांगाचा उपयोग केला जात असे. हे पंचांग वापरणारे फारच थोडे लोक गावात रहात असल्यामुळे ते मुद्दाम पुण्याहून मागवले जात असे. त्या काळात टिळकपंचांगातली संक्रांत दरवर्षी १० जानेवारीला येत असे. वर्षभरातले बाकीचे सारे सण तिथीनुसार येतात आणि दरवर्षी ते वेगळ्या तारखांना येतात, पण ही संक्रांत तेवढी इंग्रजी तारखेनुसार कशी येते याचे आश्चर्य वाटायचेच, शिवाय इतर पंचांगात ती १४ तारखेला येत असतांना टिळक पंचांगात चार दिवस आधी का येते याचे एक वेगळे गूढ वाटत असे. कदाचित देशभक्त टिळकांवर इंग्रजांचा राग असल्यामुळे ते लोक संक्रांतीला त्यांच्याकडे आधीच पाठवत असावेत.



संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून तिच्या फलाचे वाचन केले जात असे. घरातील सर्वांनी एकत्र बसून ते ऐकण्याची प्रथा होती. गणपतीचे वाहन उंदीर, शंकराचे नंदी याप्रमाणे सर्व देवदेवतांची वाहने ठरलेली आहेत, पण ही संक्रांत मात्र दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असे, शिवाय तिचे एक उपवाहन असे. ती कुठल्यातरी दिशेकडून येत असे आणि कुठल्यातरी दिशेला जात असे. शिवाय तिचे मुख तिसरीकडे असे आणि दृष्टी चौथ्या दिशेला. त्या सर्व दिशांना राहणा-या लोकांना त्यानुसार फळ मिळते अशी धारणा होती. या सर्व दिशा कोणत्या केंद्रबिंदूच्या सापेक्ष आहेत ते दिले नसल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार त्याचा अर्थ लावायला मोकळा होता. या सगळ्यातून काय अर्थ निघणे अपेक्षित आहे याचा मला आजपर्यंत पत्ता लागलेला नाही.
एकाद्यावर संक्रांत आली म्हणजे त्याचा आता विनाश किंवा निदान नुकसान तरी होणार असे समजले जाते. तिचा स्वभाव विध्वंसक आहे असे यात गृहीत धरले आहे. संक्रांतीची गणना दैत्य, राक्षस, असुर अशा वर्गात होत नाही तरीही असे का असावे कुणास ठाउक. तिला खूष करून आपला बचाव करून घेण्यासाठी तिळगुळाचा नैवेद्य दाखवला जातो की स्वतः बलवान होऊन येऊ घातलेल्या संकटांना सामोरी होण्यासाठी तो खाल्ला जातो हे ही स्पष्ट होत नाही. तिळातली स्निग्धता आणि गुळातला गोडवा यांच्यामुळे तो चविष्ट असतोच, शिवाय त्यात अनेक प्रकारचे शक्तीवर्धक गुण असल्यामुळे तो खाणे हे माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने किती हितकारक आहे याचे वर्णन करणारे लेख आता नियतकालिकांमध्ये वाचायला मिळतील. पण असे असेल ते बाराही महिने खायला काय हरकत आहे? थंडीच्या दिवसात शरीराला जास्त ऊर्जेची आवश्यकता असते असे असले तरी निदान महिनाभर आधीपासून थंडी पडायला लागलेली असते तेंव्हापासून तरी खायला सुरू करावे. पुणे मुंबई दरम्यान प्रवास करणारे लोक मात्र वाटेत लोणावळ्याची चिक्की खाऊन वर्षभर संक्रांत साजरी करत असतात.

मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीमधून मकर राशीत प्रवेश करतो. आभाळात सर्वांना दिसणारा सूर्य एकच असतो आणि स्पष्टपणे न दिसणा-या राशीसुध्दा समानच असाव्यात. असे असतांना टिळक पंचांगवाल्यांचा सूर्य चार दिवस आधीच मकरसंक्रमण कसे करत असेल असा प्रश्न मला लहानपणी पडत असे. धनू आणि मकर राशींमधल्या सीमारेषा काही आभाळात कोणी आंखून ठेवलेल्या नाहीत. सूर्य या राशीमधून त्या राशीत गेला ही गोष्ट प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत नाही. काही निरीक्षणे आणि प्रचंड आकडेमोड करून गणिताच्या आधाराने ती ठरवली जाते. गणिताची पध्दत परंपरेनुसार ठरत गेली असल्यामुळे त्यात मतभेद असू शकतात. पूर्वीच्या काळात पंचांग तयार करणा-या ज्या विद्वानांबद्दल आदर वाटत असे किंवा त्यांच्या पध्दतीवर ज्यांचा विश्वास असे त्यानुसार लोक आपापली पंचांगे ठरवत असत. आजच्या राहणीमध्ये या गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत.
मकरसंक्रांतीच्या दिवशी दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते असे सांगितले जाते. हजार वर्षांपूर्वी कदाचित तसे होत असेल. मकरसंक्रांत माझ्या बालपणी इतर पंचांगांमध्ये १४ जानेवारीला येत असे, हल्ली १५ जानेवारीला येते. याचा अर्थ तिची तारीख हळू हळू पुढे जात आहे. मागे मागे गेल्यास कधी तरी ती २१ - २२ डिसेंबरला येत असावी. ग्रेगोरियन कँलेंडरमध्ये वेळोवेळी सुधारणा केली गेली असल्यामुळे वर्षातला सर्वात लहान दिवस (विंटर सोलस्टाइस) आजसुध्दा २१ किंवा २२ डिसेंबरलाच येतो. त्यानंतर दिवस मोठा होऊ लागतो आणि सूर्योदय व सूर्यास्ताला ज्या ठिकाणी सूर्याचे बिंब क्षितिजाला टेकतांना दिसते तो बिंदू उत्तरेच्या दिशेने सरकू लागतो. याचा अर्थ सूर्याचे उत्तरायण आधीच सुरू होऊन गेलेले आहे.

पृथ्वीचा आंस वाटतो तेवढा स्थिर नाही. अत्यंत सूक्ष्म गतीने त्याचा तिरकसपणा बदलत असतो यामुळे शेकडो वर्षांच्या कालावधीत क्षितिजामध्येही किंचित बदल येत असतो आणि त्याच्या सापेक्ष दिसणारे राशीचक्र किंचित बदलत असते. यामुळे हा फरक येतो. आपले पंचांग पूर्णपणे राशीचक्रामध्ये होत रहाणा-या ग्रहांच्या भ्रमणावर आधारलेले असल्यामुळे विंटर सोलस्टाइस आणि मकरसंक्रांत आता वेगळ्या दिवशी येतात.

मकरसंक्रांतीला एकमेकांना तिळगूळ देऊन आपले संबंध दृढ करायची प्रथा तर आहेच, शिवाय नवीन लग्न झालेली मुलगी, गरोदर स्त्री, नवजात बालक अशा संक्रमणाच्या स्थितीत असलेल्यांचा संक्रांतसण साजरा केला जातो. त्या दिवशी हलव्याचे दागिने तयार करून ते त्यांना चढवले जातात. लहान मुलांचे बोरन्हाण घातले जाते. मराठी माणसांनी या प्रथा आता साता समुद्रापार नेल्या आहेत. अमेरिकेत राहणारे मराठी लोकसुध्दा हे सण साजरे करतांना दिसतात. संक्रांतीचे हळदीकुंकू करून त्यात जमलेल्या सर्वजणींना एकादी क्षुल्लक अशी भेटवस्तू दिली जाते. पण याला लुटवणे असे म्हणायची पध्दत आहे.

3 comments:

Sanket said...

मकरसंक्रमण
तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला. वाहन बद्दल मला माहित नव्हत. वाचून ज्ञानात भर पडली.
१४ jan आली कि मनात अजून १ आठवण येते ती म्हणजे "पानिपत" ची लढाई. प्रत्येक मराठी मनात खोल वर जखम लावणारी.
मला तुमच्या कडून त्या लडाई बद्दल story तुमच्या कडून ऐकायला खूप आवडेल. माझी विनंती or वाचकाची public demand :)
धन्यवाद ,
संकेत.

Anand Ghare said...

धन्यवाद. पानिपतच्या लढाईची जखम सराठी समाजमनात इतकी खोलवर रुतून बसलेली आहे की आता दहापेक्षा जास्त पिढ्या होऊन गेल्या असल्या तरी ती भळभळते. माझा इतिहासाचा फारसा अभ्यास नाही. त्यामुळे अधिकृत माहिती मला देता येणार नाही. तरीही कधीतरी मनातल्या भावना ब्लॉगवर व्यक्त करण्याचा प्रयत्न करेन.

Anand Ghare said...

संक्रांतीच्या वाहनाचे पंचांगातले एक चित्र ब्लॉगवर चढवीत आहे.