Monday, January 09, 2012

माझ्या ब्लॉग्जचे वाचक

या ब्लॉगवर चार ओळी लिहायला सुरुवात केल्यापासूनच कोणी तरी त्या वाचाव्यात असे मला वाटत असे. अर्थातच किती लोक त्या वाचतात हे मला कळायला हवे हे ओघाने आलेच. सहा वर्षांपूर्वीच्या काळात फक्त याहू ३६० या स्थळावर ही सोय असल्यामुळे मी तिथे आपले खाते उघडून लिहायला लागलो. सुरुवातीला शंभर दोनशे पर्यंत पोचण्यासाठीसुध्दा खूप वेळ वाट पहावी लागायची. आपल्या ब्लॉगकडे कोणी फिरकत नाही म्हणून माझे मन विषण्ण होत असे, पण नेटाने तो प्रयत्न चालू ठेवल्यावर हळूहळू परिस्थिती बदलत गेली. वाचनांची संख्या शंभर, दोनशे वरून हजार, दोन हजार करीत वर्षाअखेर दहा हजारावर गेली तेंव्हा माझ्या आनंदाला सीमा राहिली नव्हती. त्यामुळे माझ्या अंगात हुरुप संचारला आणि दुस-या वर्षात खूप भाग लिहिले. वाचकांनीही अपेक्षेपेक्षा जास्त आधार दिला आणि वाचनसंख्या पांचपटीने वाढून अर्ध्या लाखावर गेली. यामुळे तिस-या वर्षाची (२००८ ची) सुरुवात अत्यंत उत्साहाने झाली होती, पण थोड्याच दिवसांनी याहू ३६० च्या क्षितिजावर अनिश्चिततेचे ढग जमू लागले. तरी ही पुढच्या काळात याहू ३६० ब्लॉग चालत राहिला. १६ ऑक्टोबर २००८ रोजी त्याच्या वाचनसंख्येने लाखाचा आकडा पार केला आणि १२ मे २००९ ला सव्वा लाखांचा टप्पा गाठला. त्यानंतर मात्र लवकरच तो कायमचा बंद झाला.
ब्लॉगस्पॉटवरील माझा हा प्रयत्न वर्ष दीड वर्ष कोमात गेला होता, २००८ च्या सुरुवातीला त्याच्या अंगात धुगधुगी आल्याचे लक्षात आल्यावर त्यात नवे चैतन्य आले. याच सुमारास कधी तरी गूगलने 'ब्लॉगस्पॉट'वर ताबा मिळवून त्याचे 'ब्लॉगर'मध्ये रूपांतर केले असावे. त्या काळात ब्लॉगस्पॉटवर वाचकांची संख्या समजण्याची सोय नव्हती. १ मे २००८ पासून मी एक बाहेरचा फ्री काउंटर लावून घेतला. त्यामुळे भेट देणा-यांची संख्या समजू लागली. सुरुवातीला ती संख्यासुध्दा हळूहळूच वाढत होती. दोन वर्षांनंतर म्हणजे २०१० च्या मध्यापर्यंत ती ३०००० चे वर गेली होती. पण त्यानंतर हा काउंटर अधून मधून बंदच पडू लागला असल्याचे लक्षात आले. तरीही २०१० अखेर ती संख्या ५०००० वर गेली होती. गेल्या महिन्यात सुध्दा तीन चार दिवस तो बंद पडला होता. पण इतर वेळी चालत असल्याने त्याची संख्या वाढत वाढत आता सत्याऐंशी हजारांवर गेली आहे. तो चालत राहिला तर आतापर्यंत मी कदाचित लक्षाधीश होण्याच्या बेतात आलो असतो असे दुस-या गणकावरून दिसते.
काही काळापूर्वी ब्लॉगरने स्वतःच व्हिजिटर्सची आकडेवारी द्यायला सुरुवात केली. १ डिसेंबर २०१० ला फ्री काउंटर वर ४७९६२ आणि ब्लॉगरवरील संख्या २०१२४ होती, म्हणजेच त्या वेळी दोन्हींमध्ये २७८३८ एवढा फरक होता. त्यानंतर फ्री काउंटर अधून मधून थांबत थांबत आणि ब्लॉगरचा गणक व्यवस्थितपणे चालत राहिला असावा असे समजायला हरकत नाही. आज फ्री काउंटरवर ८७२१४ आणि ब्लॉगरच्या हिशोबाने ७२९६१ इतक्या संख्या आहेत. म्हणजे दोन्हीमधील फरक १४२५३ इतकाच आहे. कदाचित काही दिवसांनी ब्लॉगरवरील आकडा पुढे जाईल. त्यानंतर फ्री काउंटरला अर्थच राहणार नाही.



ब्लॉगरवरील आकडेवारीत बराच मजेदार तपशीलसुध्दा मिळतो. किती वाचकांनी या ब्लॉगला भेटी दिल्या एवढा एकच आाकडा फ्री काउंटरवर मिळतो. पण कोणत्या लेखावर किती टिचक्या पडल्या आणि कोणकोणत्या देशामधील वाचकांनी त्या मारल्या, तसेच किती लोकांना माझ्या ब्लॉगचा पत्ता कुठून मिळाला वगैरेची आकडेवारी इथे मिळते. ती माहितीसुध्दा गेला एक दिवस, एक आठवडा, एक महिना आणि आतापर्यंत अशा निरनिराळ्या कालावधीसाठी मिळते. २०११ साली या ब्लॉगला ४७८३१ भेटींची नोंद आहे, म्हणजे सरासरी दर महिन्याला सुमारे चार हजार झाले. कमीत कमी संख्या २६५५ आणि जास्तीत जास्त ४९९३ इतक्या आहेत. एकूण भेटींची संख्या पन्नास हजाराला आणि महिन्यातली संख्या पाच हजाराला थोडी कमी पडली.

ब्लॉगवरील माझ्या लेखांची संख्या आणि वाचकांची संख्या यात जवळचा संबंध दिसत नाही. २००८ मध्ये याचे पुनरुज्जीवन केल्यानंतर त्या वर्षी २५१ आणि २००९ साली २२६ भाग टाकले होते. दोन्ही मिळून ४७७ इतकी पोस्ट झाली होती. यातले बरेचसे भाग पूर्वी याहू ३६० वर प्रकाशित केलेले असल्यामुळे ते तयार होते. त्यानंतर पुढील वर्षी म्हणजे २०१०मध्ये आणि मागील वर्षी मुख्यतः नवे भाग लिहिले असल्यामुळे अर्थातच त्यांची संख्या १०० आणि ८८ अशी कमी भरली होती. वाचकांची संख्या मात्र या काळात २००८ आणि २००९ मिळून सुमारे २००००, सन २०१०मध्ये ३०००० आणि २०११मध्ये ४७००० अशी वाढत गेली आहे. याचा अर्थ जुने भाग कालांतराने वाचणा-यांची संख्या मोठी आहे. कोणता लेख कितीजणांनी वाचला याची आकडेवारी वर दिलेल्या कोष्टकात दिली आहे. त्यावरून हेच दिसते. पण या लेखांच्या वाचकांची एकत्र संख्या एकंदर वाचकांच्या १५-२० टक्के एवढीच भरते त्यामुळे इतर ८०-७५ टक्के लोक काय वाचत असतील ते कळायला मार्ग नाही. मनोगत, मिसळपाव आणि उपक्रम या संस्थळावर मी काही लेख पाठवले होते. त्या ठिकाणी मात्र पहिल्या दोन तीन दिवसात जितक्या वाचकांनी ते वाचले असतील तेवढेच. त्यानंतर वाचकांचा आकडा वाढलाच तर तो मुख्यतः प्रतिसादांमुळे असतो. मूळ लेख सहसा कोणी पुन्हा वाचत नसावा.
बहुधा २००९ च्या सुरुवातीला माझ्या ब्लॉगवर फॉलोअर्सची नावे दिसायला सुरुवात झाली. माझे (सुध्दा) कांही अनुयायीगण आहेत ही भावना जरी अत्यंत उत्साहवर्धक असली तरी ते कोण आहेत आणि कसल्या बाबतीत ते माझ्या कोणत्या मार्गाचे अनुसरण करतात हे काही समजले नाही. यांच्यातले दोन चारजण मला मनोगताच्या कट्ट्यावर किंवा ब्लॉगर्सच्या मेळाव्यात भेटले होते तेवढेच. 'फॉलोअर' या इंग्रजी शब्दाला 'अनुयायी' असा प्रतिशब्द असला तरी या बाबतीत मला तो तेवढा सयुक्तिक वाटत नाही. त्यामुळे मी त्यांना माझे 'पाठीराखे' असे म्हणायचे ठरवले. हे लोक नक्कीच माझे लिखाण वाचत असावेत आणि कदाचित त्याची शिफारस करीत असावेत. या पाठीराख्यांची संख्या वाढून आता पंच्याण्णऊवर पोचली आहे. यात कोण कधी आले आणि कोण किती दिवस राहून (कंटाळून) सोडून गेले वगैरेचा हिशोब मी कधी ठेवला नाही. तशी माहिती सोयीस्कररीत्या उपलब्धही नाही. सचिन तेंडुलकरच्या शतकांच्या शतकाप्रमाणेच या पाठीराख्यांचे शतकही २०११ मध्ये पुरे झाले नाही.



माझे बहुतेक सारे वाचक भारतवासीच आहेत. ते मराठीभाषिकच असणार हे लिहिण्याची आवश्यकता नाही, पण ते कोणकोणत्या राज्यांमध्ये निवास करतात याची माहिती उपलब्ध नाही. मराठी भाषिकांची संख्या अमेरिकेत भरपूर झाली असल्यामुळे परदेशीय वाचकांमध्ये त्यांची संख्या सर्वात मोठी असणे हे अपेक्षित आहे. व्हिएटनाम किंवा दक्षिण कोरियासारख्या देशात मराठी वाचणारे लोक असतील आणि माझ्यासारखा एकजण (स्क्रीनच्या) पांढ-यावर काळे करत असल्याचा त्यांना पत्ता लागत असेल हे समजल्याने गंमत वाटली.

वाचकांना वाचेवे असे वाटेल असे लिहिण्याची माझी इच्छा आहे, पण मी जे लिहू शकतो त्यातले त्यांना काय वाचायला आवडते ते मला समजणे जरा कठीण आहे. त्यामुळे मला जे लिहायला आवडते तेच लिहित राहणे भाग आहे. वाचकांनी ते गोड मानून वाचावे आणि मला प्रोत्साहन देत रहावे अशी नम्र विनंती.

5 comments:

mynac said...

घारे साहेब,
आपल्या ब्लॉगला भेट द्यायचे मुख्य कारण म्हणजे आपले लेखन हे नेहमी "स्वतःचे" असते आणि त्याला अनुभवाची जोड,खोली असते, हा मुद्दा,तुमचा एक नियमित वाचक म्हणून मला सांगायला आवडेल.मुळात "स्वतःचे" काही लिहिता येणे हि एक कला आहे आणि ती नेमक्या पण मोजक्या शब्दात मांडणे नि वाचकांसमोर ठेवणे हि त्यातील म्हटले तर खुबी आहे आणि आपण ह्या दोन्ही गोष्टींचा समन्वय चांगल्या रितीने साधता हि आपली खासियत आहे.आपल्या पुढील वाटचाली साठी आपणास हार्दिक शुभेच्छा.

Anand Ghare said...

उत्साहवर्धक प्रतिसादासाठी धन्यवाद. कालपरवा तर आपली जालावर भेट झाली आणि एवढ्यात आपण नियमित वाचक झालात हे वाटून मूठभर मांस चढले.

Sanket said...
This comment has been removed by the author.
Sanket said...

नमस्कार आनंद काका, मी संकेत. मी singapore ला असतो. तुमच्या वाचक count मध्ये singapore तर्फे माझा सिंह चा वाटा आहे बर का... :)
साधारण वर्ष भरा पूर्वी नेट surf करत असताना मी तुमचा ब्लोग पहिला. १-२ लेख वाचले आणि भाषा शैली सोपी आणि easy वाटली. आणि मग रेगुलर वाचताच गेलो.
तुमचे बरेच लेख मी वाचले आहेत. पण "आली दिवाळी" हा माझा all time favorite एकदम छान जमली आहे ती artical खूप च छान.
साधारण तुम्ही सर्व विषय वर तुमेचे स्वताचे मत लिहिता आणि ते खूप छान वाटते.
असेच छान छान लेख लिहित राहा आणि आम्हा वाचकांचे मनोरंजन , माहिती व ज्ञान वाढवत राहा.
आपला पंखा (FAN ),
संकेत

Anand Ghare said...

संकेत, मी तुमचा आभारी आहेच, सिंगापूरसारख्या परमुलुखात राहतांना मराठी वाचन करता हे कौतुकास्पद आहे. मरीठीमध्ये इतके समृध्द साहित्य असतांना आपल्याला माझे लिखाण वाचावे असे वाटते हे अत्यंत उत्साहवर्धक आहे. स्वांतसुखाय वगैरे ठीक आहे, पण कोणी तरी वाचावे म्हणूनच लिहावेसे वाटते हे जास्त खरे आहे.