Wednesday, January 04, 2012

नव्या वर्षाची सुरुवात

नवे निश्चय, निर्धार, योजना वगैरेंनी नव्या वर्षाची सुरुवात करायची अशी जुनी प्रथा आहे. निदान तसा विचार तरी बहुतेकजण करतात. मीसुध्दा ते करीत आलो होतो. पण यंदा मात्र असे काही करायचे नाही, आपण पुढाकार न घेता काय काय घडते आहे ते नुसते पहायचे असेच मी ठरवले होते. या वर्षीचे वेगळेपण यातच होते. अमेरिकेतल्या इंका जमातीच्या नोस्ट्रॅडॅमस किंवा भृगु ऋषींनी तर २०१२ साल उजाडणारच नाही असे वर्तवले होते म्हणे. त्यामुळे त्यापूर्वीच जेवढी मजा करून घ्यायची तेवढी करून घेण्याचा सपाटा काही मंडळींनी लावला होता. आपल्याकडच्या गटारआमूशेची ही अमेरिकन आवृत्ती म्हणायची! चुकून माकून समजा अशी जगबुडी आलीच तर नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी आपण केलेली पूर्वतयारी उगाच वाया गेली असती!

आदले दिवशीच उदय, शिल्पा, ईशा आणि इरा पुण्याहून आलेले होते आणि घरामधले चैतन्य जागे झाले होते. त्यांच्याबरोबर गप्पागोष्टी आणि चांगले चुंगले खाणेपिणे, टीव्हीवरील खास कार्यक्रम पाहता पाहता त्यांच्यावर शेरेबाजी, टीकाटिप्पणी वगैरे करता करता रात्रीचे 'वाजले की बारा' आपोआप घडले. मागच्या वर्षी त्याची वाट पहाता पहाता मला अनावर झोप आली होती. नवी खरेदी, कपडे वगैरे दाखवणे, जुने फोटोंचे आल्बम पाहणे वगैरेंमध्ये कपाटांमधले बरेच सामान बाहेर निघाले होते आणि चिमुकल्या ईशाइरांची खेळणी माळ्यावरून खाली काढून दिली होती, शिवाय त्यांनी घरातल्या आणखीही थोड्या वस्तू काढून त्या सगळ्या घरभर पसरवून ठेवल्या होत्याच, पुण्याहून आणलेल्या बॅगांमधले सामानही उचकटवून त्यात मिसळले होते आणि त्यातच खेळता खेळता त्या स्वतःही आडव्या झाल्या होत्या. मध्यरात्रीनंतर ते सगळे आवरण्याचा मूड कोणालाही नव्हता. त्यामुळे मधला पसारा बाजूला सरकवून थोडी मोकळी जागा करून मोठी मंडळी त्यात झोपी गेली.

अचानक टेलीफोनची घंटा खणाणली. गाढ झोपेत असल्यामुळे ती कोणालाच ऐकू गेली नाही की कोणाचीही उठायची तयारी नव्हती कोण जाणे, पण ती खणाणत राहिली. दहाबारा सेकंदानंतर मीच उठून हॉलमध्ये गेलो. भारतामधले कोणीही रविवारी इतक्या पहाटे उठून फोन करेल असे वाटत नव्हते, तसेच झाले. अमेरिकेतून अजयचा फोन होता. या वेळी आमच्याशी बोलायला त्यांना फुरसत होती आणि सगळ्यांशी पोटभर गप्पा मारायच्या होत्या. पण इथे तर सारे ढाराढूर झोपलेले होते. मी एकट्यानेच त्यांच्याशी चारपाच मिनिटे बोलून घेतले आणि तिकडे ते लोक झोपायच्या तयारीला लागण्यापूर्वी पुन्हा फोन करायला त्याला सांगितले. तोपर्यंत इकडची बहुतेक मंडळी झोपेतून उठण्याची शक्यता होती.

माझी झोप मात्र आता पूर्णपणे उघडली होती. बाहेर झुंजूमुंजू उजाडलेही होते. कपडे बदलून मी रोजच्यासारखाच फिरायला बाहेर पडलो. आज पार्कमध्ये फारच कमी माणसे आली होती. य़ा वर्षी लोकांनी कोणते नवे निर्धार केले होते माहीत नाही, पण सकाळी लवकर उठून फिरायला जाणे हे त्यात नक्कीच नव्हते. उलट रोजच्यातल्या काही लोकांनी हवेमधला गारवा पाहून आज मॉर्निंग वॉकला फाटा द्यायचे ठरवले असावे असा विचार करत मी दूध घेऊन घरी परत आलो. दूधवाले, पेपरवाले वगैरे मंडळी मात्र आपल्या नेहमीच्या कामावर दिसत होती. त्यांच्यासाठी नववर्षदिवस काही वेगळा नव्हता. दूध तापेपर्यंत माझ्यापुरता एक कप चहा बनवला आणि कप घेऊन काँप्यूटरसमोर जाऊन बसलो.

इंटरनेटवरून आलेल्या शुभेच्छापत्रांचा भला मोठा ढीग टपालपेटीत जमा झाला होता. काही वर्षांपूर्वी मी सुध्दा दरवर्षी खास सचित्र शुभेच्छापत्र तयार करून ते सर्वांना पाठवत असे. त्यावेळी माझ्या ईमेलच्या पत्त्यांच्या यादीत पंधरावीसच नावे होती. ती वाढत गेली तसतसा माझा उत्साह कमी होत गेला. आता त्या अॅड्रेसबुकात दोनअडीचशे नावे झाली आहेत, त्यातल्या कोणाकोणाला ग्रीटिंग्ज पाठवायचे याची निवड करायलासुध्दा सहज दिवसभर लागला असता आणि तो मिळाला नव्हता. इराने काढलेल्या एका छानशा चित्रावर थोडा मजकूर घालून एक कार्ड झटपट बनवले आणि ब्लॉगवर तेवढे टाकले. लोकांना ते पाठवायचे राहूनच गेले. ज्यांच्याकडून मला छान सचित्र किंवा अर्थपूर्ण अशी कार्डे आली होती तेवढ्या लोकांना "तुम्हालासुध्दा (सेमटुयू)" एवढे उत्तर देण्यातच तास दोन तास गेले.

तोपर्यंत घराला जाग आली, पुन्हा चहाची आवर्तने झाली, मनपसंत नाश्ता झाला, अजयचा फोन आला आणि सगळ्यांचे आलटून पालटून त्यावर तासभर संभाषण चालले होते. इतर आप्तेष्ट आणि मित्रमंडळींचे फोनसुध्दा दुस-या यंत्रावर येत होतेच. त्यातला एक बार्शीच्या प्रसादचा होता. तो आजच कामासाठी वाशीला आला होता. त्याला आमच्या घराचे नेमके स्थान आणि आजूबाजूच्या खाणाखुणा सांगितल्या. त्यांच्या आधाराने अर्ध्या तासात तो स्वतःही येऊन पोचला. त्याच्याशी वार्तालाप होईपर्यंत जेवायची वेळ झाली होती, पण त्याला एका ठिकाणी जेवायला जायचे आधीपासून ठरले असल्यामुळे तो थांबला नाही.

नववर्षाचा पहिला दिवस बाहेर जेवून साजरा करण्याचा निर्णय एकमुखाने झाला. त्यासाठी एकाद्या आगळ्या ठिकाणी जाणे ओघाने आलेच. रघुलीलामधल्या द व्हिलेजला जाऊन थडकलो. तिथे आत तर गर्दी होतीच, प्रवेशद्वारातच दहा माणसे वाट पहात उभी होती. तिथला मॅनेजर आणखी कोणाला नंबरसुध्दा द्यायला तयार नव्हता. पंधरावीस मिनिटे टंगळमंगळ करून इतर पर्यांयांवर चर्चा केली आणि पुन्हा व्हिलेजमध्ये गेलो. आता काही लोक बाहेर पडू लागले होते. त्यामुळे चाटपाणीपुरी वगैरेंनी सुरुवात करेपर्यंत बसायला जागा मिळण्याची आशा निर्माण झाली होती.

मॉलमधल्या एका मोठ्या हॉलमध्ये डेरेदार वटवृक्षांचे चार पाच कृत्रिम बुंधे उभे करून आणि त्याला वर फांद्या पाने वगैरे अडकवून हे खेड्याचे दृष्य बनवले होते. त्यातच सगळ्या कडांनी झोपड्यांसारखे दिसणारे स्टॉल्स ठेवले होते, बसायला कुठे बाकडी, कुठे खुर्च्या तर कुठे खाटा ठेवल्या होत्या. राजस्थानमधील ग्रामीण वाटावेत असे कपडे आणि पगड्या धारण केलेले सेवक इकडे तिकडे हिंडत होते. एका कोप-यात कुंभाराचे चाक ठेवले होते आणि कोणालाही त्यावर ठेवलेल्या मातीच्या गोळ्याला आपल्या बोटांनी आकार देऊन त्यातून छोटेसे मडके साकारण्याची सोय केली होती. एका झाडाच्या बुंध्यापाशी पानवाला, ज्योतिषी आणि कासार बसले होते. एकंदरीत द व्हिलेजचे अँबियन्स आणले होते. त्या वातावरणाशी अगदी विसंगत असे पॉप म्यूजिक कानठळ्या बसवत होते आणि त्याच्या ठेक्यावर अनेक तरुण तरुणी आणि मुले मुली मधल्या मोकळ्या जागेत मुक्तपणे नाचत होते. त्यांचे आप्तेष्ट आणि चाहते त्यांचा नाच कॅमेरा किंवा सेलफोनवर रेकॉर्ड करत होते.

आम्हाला यायला आधीच खूप उशीर झालेला असल्यामुळे आम्ही सरळ खाण्याकडे मोर्चा वळवला. मुख्यतः राजस्थानी पदार्थांच्या जोडीला पंजाबी, गुजराथी, मराठी आणि चिनी खाद्यपदार्थसुध्दा निरनिराळ्या झोपड्यांमध्ये ठेवलेले होते, ते आपण स्वतःच पाहून वाढून घ्यायचे होते. कोणीही कितीही वेळा कुठेही जाऊन कोणताही पदार्थ घ्यायला मुभा होती आणि बहुतेक लोकांचे खाणे होऊन गेले असल्यामुळे त्यासाठी रांगा नव्हत्या. खूप विविधता असल्यामुळे कुठे काय ठेवले आहे हे शोधून इतरांना सांगणे आणि स्वतः तिथे जाऊन त्यातले हवे ते वाढून घेणे यात वेळ चांगला जात होता. शिवाय कानावर संगीत आणि पहायला धांगडधिंगा यानेही थोडे मनोरंजन होत होते. या अनुभवाने एकंदरीत सर्वांना मजा आली.

निरनिराळ्या पदार्थांची थोडी चंव चाखून पाहण्यामध्येच पोट गच्च भरून गेले आणि घरी आल्यावर सर्वांनी ताणून दिली. संध्याकाळी पुण्याच्या मंडळींना परत जायचे होते. वामकुक्षी घेऊन झाल्यानंतर त्यांनी आपले सामान बॅगांमध्ये भरले, कपडे बदलले आणि निघायच्या तयारीत असतांना फोनवरून एक महत्वाची बातमी समजली. लगेच टीव्हीवर चालत असलेला प्रोग्रॅम बदलून मराठी बातम्या लावल्या. नववर्षाच्या दिवशी मुंबई पुणे, मुंबई गोवा आणि पुणे कोल्हापूर हमरस्त्यांवर ठिकठिकाणी अपघात झाले होते. त्यातल्या पुणे महामार्गावर झालेल्या अपघातामुळे वाहतूक बंद पडली होती आणि दोन्ही बाजूला रस्त्यांवर मोटारींच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या वगैरेचे वर्णन चालले होते. रात्रीच्या वेळी अशा निर्जन ठिकाणी जाऊन अडकून पडण्यात काही अर्थ नसल्यामुळे मंडळींचा मुंबईतला मुक्काम वाढला. अर्थातच आम्ही खूष झालो, पुन्हा एकदा गप्पागोष्टी आणि चर्चासत्रे सुरू झाली. पुण्याला गेल्यानंतर लगेच ईशाइरांच्या परीक्षा होत्या. त्यामुळे एका खोलीत त्यांच्या अभ्यासाची तयारी, दुस-या खोलीत काँप्यूटरवर इंटरनेट आणि दिवाणखान्यात टीव्हीवरील मनोरंजक कार्यक्रम अशी विभागणी झाली खरी, पण कोणीच एका खोलीत जास्त वेळ टिकत नव्हते.

दोन तारखेला सकाळी लवकर उठणे सर्वांना भागच होते. पुण्याची मंडळी तिकडे चालली गेली. अलकाला रक्ततपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये जायचे होते, ती त्यांच्याही आधी घरातून निघाली. मी इंटरनेट लावून बसलो. थोड्याच वेळात वीज चालली गेली. इंटरनेट, काँप्यूटर, टीव्ही, फ्रिज, मायक्रोवेव्ह, पाण्याचा फिल्टर, वॉशिंग मशीन, गीजर वगैरे सगळे काही बंद. सूर्यप्रकाशाच्या उजेडात वाचन करणे किंवा डोळे मिटून स्वस्थ पडून राहणे एवढेच शक्य होते. तासभर वीज आली नाही म्हणून चौकशी केली, तेंव्हा ट्रान्स्फॉर्मरवर काम चालले असल्याचे समजले. म्हणजे आता दिवसभर ती काही येणार नव्हती. काल गजबजलेले घर आता अगदी शांत झाले होते ते एका दृष्टीने चांगलेच झाले होते. या सगळ्या सुखसोयींना चटावलेल्यांचे तक्रार करणारे आवाज तरी नव्हते. थोडा वेळ वाचन, थोडी विश्रांती आणि थोडी बाहेरची कामे करून येणे यात दिवस घालवायचा असे ठरवले.

काही वेळाने अलकाशी तिच्या मोबाईलवर बोललो. ती एका मैत्रिणीकडे उपाहार करत बसली होती पण जाम वैतागलेली दिसत होती. दोन महिने आधीपासून ठरवलेली तिची रक्ततपासणी समजुतीच्या काही घोटाळ्यामुळे झालीच नव्हती. आता त्या बाजूची आणखीही इतर काही कामे उरकून संध्याकाळी परत यायचा तिचा विचार होता. इकडे परत यायची मुळीसुध्दा घाई करू नको असे तिला सांगितले. पुण्याला फोन लावला तर मुलींना घेऊन शिल्पा तातडीने शाळेत गेली आहे असे समजले. चार तारखेला परीक्षा सुरू होणार आहे असे ती समजत होती, पण ती दोनलाच सुरू असल्याचे तिला पुण्याला गेल्यानंतर कळले. सकाळी मुंबईहून निघून तिथे पोचेपर्यंत सकाळच्या शाळा केंव्हाच सुरू होऊन गेल्या होत्या. नव्या वर्षाच्या पहिल्या कामाच्या दिवसाची लक्षणे काही ठीक दिसत नव्हती. आदल्या दिवशीच्या वर्तमानपत्रांमध्ये तर सगळ्यांचीच भविष्ये मारे भन्नाट छान दिलेली होती याचीही आठवण झाली.
संध्याकाळपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत झाला. घरातली सगळी यंत्रे कामाला लागली आणि दोन दिवसांचा अनुशेष भरून काढणे चालू झाले. अलकाने तिच्या रक्ततपासणीबद्दल हॉस्पिटलमध्ये याला त्याला गाठून त्यांच्याशी बोलून घेतले होते आणि दुस-या दिवशीची अॅपॉइंटमेंट घेतली होती. शिल्पाशी बोलणे झाले. मुलींच्या लेखी परीक्षा पूर्वी ठरल्याप्रमाणे चार तारखेलाच होणार होत्या. दोन तारखेला त्यांच्या तोंडी परीक्षा घेण्याचे अचानक ठरले होते. उशीरा पोचल्यामुळे मुलींची ती परीक्षा बुडली की काय असे आधी वाटले होते, पण तिने शिक्षकांना भेटून ती करवून घेतली होती. दिवसभरात आलेला त्याबद्दलचा थोडासा ताण नाहीसा झाला होता. नव्या वर्षाची सुरुवात थोडी अनपेक्षित अशी झाली असली तरी आता सगळे सुरळीत झाले होते.

No comments: