हा लेख मी सप्टेंबर २०११ मध्ये लिहिला होता. त्याचे ३१-०३-२०१६ रोजी किंचित संपादन केले.
"गाण्यांना फक्त चाली लावण्याचे सत्कार्य करणारा कोणी वेगळा महान संगीतकार असतो हेच मुळात मला ठाऊक नव्हते अशा त्या अज्ञानी बाळपणाच्या काळापासून मी महान कवी, गायक आणि संगीतकार श्री.यशवंत देव यांची कित्येक गाणी आवडीने ऐकत आलो होतो" असे मी देवसरांच्याबद्दल लिहिले होते. पण ज्या संगीतकाराची त्यांच्याहून जास्त गाणी मला त्या काळात अधिक आवडत होती त्याचे नाव श्रीनिवास खळे आहे हे मात्र मला खूप काळानंतर समजले. त्यांच्या समवयस्क संगीतकारांपैकी यशवंत देवांच्याबद्दल मी बरेचसे लिहिले असल्याने त्याची लगेच पुनरावृत्ती करण्याची गरज नाही. सुधीर फडके आणि हृदयनाथ मंगेशकर हे माझेच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राचे अत्यंत लाडके संगीतकार ! तसेच ते दोघेही उत्तम गायकही ! त्यांनी गायिलेली अनेक गाणी तुफान लोकप्रिय झालेली असल्यामुळे त्यांचा आवाज सारखा माझ्या कानावर पडत राहिला. हे दोघे महापुरुष नेहमी प्रकाशझोतामध्ये असत. पं.हृदयनाथ आजसुध्दा असतात. या दोघा महान संगीतकारांना मी निदान चार पाच वेळा प्रत्यक्षात आणि चाळीस पन्नास वेळा तरी टीव्हीवर पाहिले आहे. या ना त्या निमित्याने ते वर्तमानपत्रात तर नेहमीच दिसायचे. बाबूजींचे (सुधीर फडके यांचे) देशप्रेम, निष्ठा आणि विचारसरणी यांचे दर्शन त्यांच्या संभाषणातून होत असे आणि बाळासाहेबांचा (हृदयनाथ यांचा) गाढ अभ्यास, ज्ञान आणि पांडित्य यांचा प्रत्यय त्यांच्या बोलण्यातून येतो. यशवंत देवांची चौफेर फटकेबाजी मी जरा जवळून पाहिली आहे. या तीघांची गणना उत्तम गायक आणि संगीतकार यांच्या जोडीला उत्कृष्ट वक्ते म्हणून सुध्दा होईल, या त्रिमूर्तींच्या नावांना त्यांच्या खास व्यक्तीमत्वांच्या उज्ज्वल छवि (इमेज) जोडलेल्या आहेत. पण प्रसिद्धीपरान्मुख श्रीनिवास खळ्यांची गोष्ट पूर्वीच्या काळात तरी त्या मानाने निराळी होती. कोणत्या संगीत दिग्दर्शकाने कोणत्या गीतांना स्वरबध्द केले आहे हे मुद्दाम म्हणून जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतरच मला त्या क्षेत्रातील त्यांचे उच्च स्थान समजले. मी जो पर्यंत हे करत नव्हतो तोपर्यंत मला त्यांचे नाव ऐकून सुध्दा ठाऊक नव्हते.
दहा बारा वर्षांपूर्वीपर्यंत मी त्यांना कोणत्याही जाहीर कार्यक्रमात प्रत्यक्ष किंवा दूरदर्शनावर पाहिले नव्हते. त्यांचा फोटोसुध्दा कधीच माझ्या पाहण्यात आला नव्हता. कदाचित तोपर्यंत मी रोज सकाळी मराठी वृत्तपत्रे वाचत नसल्यामुळे तसे झाले असणे शक्य आहे. इतर संगीतकारांच्या मुलाखतींमध्ये मी खळेकाकांचा उल्लेख सहसा ऐकला नाही. त्यामुळे जरी मला लहानपणापासून त्यांची कित्येक गाणी अतीशय आवडत होती आणि त्यांचे नाव जरा मोठा झाल्यावर ऐकले होते, तरीसुध्दा त्याच्या पलीकडे मला त्यांची कणभरही माहिती नव्हती. ते कसे दिसतात, कुठे राहतात, त्यांनी संगीताचे किती धडे कुणाकडून घेतले, मुळात ते गायक आहेत की वादक आहेत, त्यांनी कुणाकुणाकडे उमेदवारी केली, ते या क्षेत्रात कसे आणि कधी आले वगैरे वगैरे बहुतेक मोठ्या लोकांच्याबद्दलची माहिती सर्वश्रुत असते. पण श्रीनिवास खळे ही इतकी मोठी व्यक्ती मात्र त्याला अपवाद होती. त्यांची संगीतरचना असलेली गाणीच तेवढी आणि तीही मला खूप काळानंतर माहित झाली होती. सुधीर फडक्यांचे गीतरामायण, हृदयनाथांचे भावसरगम आणि यशवंत देवांची देवगाणी, शब्दप्रधान गायकी वगैरे सांगीतिक कार्यक्रम आम्ही कोठे कोठे दूरवर जाऊन आवर्जून पाहिले होते. त्या कार्यक्रमांमध्ये त्यांचे गायन ऐकायला मिळालेच, शिवाय त्यांचे विचार आणि काही मजेदार तर काही चटका लावणारे अनुभवसुध्दा त्यांनी सांगितले. श्रीनिवास खळ्यांच्या गीतांचा कार्यक्रम कोठे आहे असे आम्हाला समजले असते तर आम्ही तो पाहण्याचा आटोकाट प्रयत्न केला असता. पण ते कार्यक्रम झालेच तरी फारच क्वचित आणि दूर कुठेतरी होत असावेत. तो कार्यक्रम पाहण्याची (खरे तर ऐकण्याची) संधी काही मला मिळाली नाही.
टी व्ही चॅनल्सवर सारेगमप सारख्या मराठी सुगम संगीताच्या स्पर्धा सुरू झाल्यानंतरच म्हणजे वयाची सत्तरी गाठल्यानंतर श्रीनिवास खळ्यांचे नाव प्रकर्षाने पुढे येण्याला सुरुवात झाली असावी. मी सर्वात पहिल्यांदा शंकर महादेवन यांना त्यांच्याबद्दल भरभरून बोलतांना ऐकले. अवधूत गुप्ते, सलील कुलकर्णी, अजय अतुल वगैरे सारेच अँकर श्रीनिवास खळे यांना किती थोर संगीतकार मानतात ते त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत होते, तसेच खळ्यांच्या संगीत निर्देशनामधील त्यांची खास आणि अद्भुत अशी वैशिष्ट्ये त्या लोकांनी उलगडून दाखवल्यामुळे मला समजली. त्यामुळे माझ्या मनातला त्यांच्याबद्दल आदरभाव वाढत गेला. गीताला चाल लावणे म्हणण्यापेक्षा नवी सुरेल चाल सुचणे हे महा कठीण काम आहे आणि दैवी देणगी असलेल्यांनाच ते साध्य होते यात शंका नाही.
अलीकडील दहा बारा वर्षांच्या काळात एक दोन वेळा श्रीनिवास खळे यांची मुलाखतही टीव्हीवर पहायला मिळाली. पण त्यातसुध्दा ते थोडे त्रोटकच बोलत आहेत असे मला वाटले. ते आपणहून तर स्वतःबद्दल काही सांगतच नव्हते, मुलाखतकाराने खोदून खोदून विचारल्यानंतर ते त्या प्रश्नाला एकाद्या वाक्यात उत्तर देत. त्यांच्या सांगण्यातून एवढे समजले की लिहिलेली कविता आधी वाचून आणि कोणता गायक ती गाणार आहे हे ठरवल्यानंतर त्या गाण्यातील भाव आणि गायकाची ताकद यांच्या आधाराने ते सुरेल आणि सुयोग्य अशी स्वररचना करत असत. आधी ट्यून बनवून त्या चालीवर गीतकाराला शब्दरचना करायला सांगायचे ही आजकाल सर्रास दिसणारी रूढी खळ्यांना पसंत नव्हती. कदाचित त्यामुळे त्यांनी भरमसाट चित्रपटांना संगीत दिले नसावे, पण ज्यांना दिले त्यांचे मात्र सोने झाले.
श्रीनिवास खळे यांनी बडोद्याच्या सयाजीराजे विद्यापीठात शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले होते आणि संगीत दिग्दर्शन करतांना त्यांना हव्या असलेल्या नेमक्या जागा ते गायकांना दाखवून देत असत. अर्थातच त्यांना गायनकला चांगली अवगत असणार, पण त्यांच्या स्वतःच्या आवाजात त्यांनी ध्वनिमुद्रित करून घेतलेले एकही गाणे मी कधी ऐकले नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी आपला आवाज गाण्यासाठी दिला अशा गायक गायिकांची संख्या शंभर इतकी आहे. लिट्ल चँप आर्या आंबेकर ही शंभरावी आहे आणि या गाण्याचे रेकॉर्डिंग नुकतेच झाले. त्यांच्या गाण्यावरील सारेगमपचा स्पेशल एपिसोड काही दिवसापूर्वीच प्रसारित झाला. त्याच्या चित्रीकरणाच्या आधी सारे स्पर्धक खळ्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटून आणि आपले गायन त्यांना ऐकवून आले होते. त्यांना आशीर्वाद देतांना किती मार्मिक आणि नेमक्या सूचना खळे काकांनी दिल्या होत्या हे मी टीव्हीवर पाहिले होते. जीवनाच्या अखेरपर्यंत श्रीनिवास खळे कामात मग्न होते हेच यावरून दिसते.
चेंबूरला 'आमची शाळा' नावाची एक शाळा आहे. तिथे झालेल्या मुलांच्या गाण्याच्या स्पर्धांचे परीक्षण करायला एकदा अलकाला बोलावले होते. श्रीनिवास खळे हे त्यावेळी प्रमुख पाहुणे होते. एवढे मोठे सुप्रसिध्द आणि यशस्वी संगीत दिग्दर्शक म्हणजे त्यांचा केवढा दबदबा आणि थाटमाट असेल असे तिला वाटले होते. पण त्यांचे दिसणे, वागणे, बोलणे वगैरे कशातच तिला तो दिमाख व डौल दिसला नाही. त्यांच्या मुलीच्या वयाच्या अलकाशी बोलतांनासुध्दा "आपण कुठे राहता? कशा आहात?" असे अतीशय अदबीने त्यांनी विचारलेले ऐकून तिलाच अवघडल्यासारखे झाले.
श्रीनिवास खळे यांना प्रत्यक्ष भेटण्याची एक संधी मलाही मिळाली. त्या घटनेची चित्तरकथा तर अद्भुत म्हणावी लागेल. चार वर्षांपूर्वी एकदा आम्ही दूरदेशीच्या प्रवासातून परत आलो तेंव्हा घरी पोचून अंथरुणावर पडेपर्यंत अर्ध्याहून अधिक रात्र होऊन गेली होती. सकाळी आम्ही अजून झोपेतच असतांना अचानक आमचा दूरध्वनी खणखणला. आमच्या ओळखीच्या एका व्यक्तीने फोन केला होता. श्रीनिवास खळ्यांच्या मुलाखतीवर आधारलेला 'माझे जीवनगाणे' या नावाचा एक कार्यक्रम ई टीव्हीवर होणार असल्याचे आणि त्यात भाग घेण्याची संधी असल्याचे तिच्याकडून समजले. खळे यांच्या गाण्याची आवड असलेले प्रेक्षक म्हणून त्या कार्यक्रमाला हजर राहून शोभा आणण्याचे आवडते काम आम्हाला मिळणार होते. आम्ही युरोपच्या टूरवर गेलो असतांना पंधरा दिवस रोज प्रवास करून शरीराला शीण आलेला होता. घराची सफाई, कपडे धुणे यापासून वीज आणि टेलीफोनची बिले भरण्यापर्यंत न केलेल्या अनेक कामांचा मोठा ढीग साचला होता. उन्हाळ्याची सुटी लागली असल्याने व लग्नसराई सुरू झालेली असल्याने त्या निमित्याने केंव्हाही अगांतुक पाहुणे घरी येऊन थडकण्याची शक्यता होती आणि कांही समारंभांची आमंत्रणे आधीच घरी येऊन पडली होती. त्यामुळे खरे सांगायचे झाले तर त्या वेळी आमच्याकडे मोकळा असा वेळ नव्हताच. पण या कार्यक्रमाचे आकर्षण एवढे जबरदस्त होते की क्षणभरही विचार न करता आम्ही नक्की येणार असल्याचे सांगून टाकले आणि त्याचा पाठपुरावा केला.
दोन तीन दिवसांतच ते शूटिंग होणार होते. त्याला 'जाणकार रसिक' म्हणून जायचे झाले म्हणून त्यासाठी थोडीशी तयारी केली. बहुतेक सर्वच लोकप्रिय मराठी गाणी मला माहीत असली तरी त्यातली श्रीनिवास खळ्यांनी स्वरबद्ध केलेली कोणती त्याची यादी बनवून त्यातली जी गाणी घरातल्या कॅसेट वा सीडीवर होती ती लक्षपूर्वक ऐकून घेतली. यादीचा कागद घडी करून खिशात ठेऊन घेतला. ते चित्रीकरण सकाळीच होणार होते. त्यामुळे आम्ही भल्या पहाटे उठून तयार झालो पण त्याची वेळ पुढे ढकलत ढकलत जात असल्याचे फोनवरून समजत राहिले. आम्ही सगळे संध्याकाळी स्टूडिओत जाऊन पोचल्यानंतर तिथली एक सहाय्यिका बाहेर आली आणि तिने आत परत जाण्यापूर्वी त्या कार्यक्रमातला आमचा 'रोल' आम्हाला समजावून सांगितला, तसेच दोघातीघा इतर सहाय्यकांनी आमच्याकडून त्याची रंगीत तालीमही करवून घेतली.
अखेर रात्रीपर्यंत सगळे चित्रीकरण व्यवस्थित पार पडले. निवेदक तुषार दळवींनी सफाईने प्रश्न विचारले. मला आणि इतर श्रोत्यांनाही प्रश्न विचारू दिले. त्या सर्व प्रश्नांना खळेकाकांनी समर्पक आणि माहितीपूर्ण उत्तरे दिली. श्रीनिवास खळे यांच्या निवडक गाण्यांचे चित्रीकरण झाले. मंदार आणि शिल्पा या नव्या पिढीतल्या गुणी गायकांनी तसेच साथसंगत करणार्यानी गायन व वादनाची उत्तम कामगिरी केली. तांत्रिक कारणांमुळे त्यात कांही रीटेक करावे लागले, पण तेवढे ते लागतातच असे कळले. आम्हाला दिलेल्या जाणकार प्रेक्षकांच्या भूमिका आम्ही रीटेकशिवाय पार पाडल्या. त्यात चुका झाल्या असल्या तरी त्यामुळे त्या भूमिका नैसर्गिक वठल्यासारख्या वाटल्या असाव्यात. कार्यक्रम संपल्यानंतर खळेकाकांची ओझरती भेट झाली. तोंवर बराच उशीर झालेला असल्यामुळे त्यांना तसेच आम्हालाही घरी परतण्याची घाई होती. चित्रीकरणाच्या दरम्यान आमचा (ठरवून दिलेला) संवाद झाला होताच. त्यामुळे अनौपचारिक भेटीत आम्ही त्यांना केलेल्या अभिवादनाला त्यांनी स्मितहास्य करून मान डोलावून आणि हात हलवून खुणेनेच प्रत्युत्तर दिले.
त्या मालिकेचे प्रसारण पुढे अनेक महिन्यांनंतर झाले. आम्ही भाग घेतलेला एपिसोड सुरुवातीलाच होता. आम्हाला त्याची पूर्वसूचना न मिळाल्यामुळे आम्ही ते कोणालाही सांगू शकलो नव्हतो. एके दिवशी आम्ही पुण्याला गेलो असतांना टीव्ही लावला होता आणि रिमोटच्या बटनांशी सहज चाळा करतांना अचानकपणे श्रीनिवास खळ्यांचा हंसरा चेहेरा समोर आला आणि स्टूडिओमधला सेट तसेच गाणेही ओळखीचे वाटले. आम्ही ज्यात भाग घेतला होता तोच एपिसोड चालला होता. तो पहात असतांना आम्ही आपल्या घरी नसतांनासुध्दा चार जणांनी पुण्यातल्या घरी फोन करून आमचे अभिनंदन (कशाबद्दल?) केले. आम्हाला श्रीनिवास खळ्यांच्या सहवासात चार क्षण घालवायला मिळाले ही देखील काही लहान सहान गोष्ट नव्हती. त्याचा उल्लेख आम्ही जन्मभर करू शकणार होतो आणि करतही होतो.
दोन तीन आठवड्यापूर्वीच त्यांना लिट्ल चँप्सबरोबर पाहिले होते तेंव्हा प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते स्टूडिओत येऊ शकले नाहीत असे निवेदन झाले होते, पण घरच्या घरी ते ठीक वाटत होते. चांगले चालत बोलत होते. अचानक त्यांच्या निधनाची बातमी येईल अशी कल्पनाही तेंव्हा मनात आली नव्हती. पण विधीलिखित असे अज्ञातच असते आणि अचानक दत्त म्हणून समोर येऊन पुढ्यात उभे राहते. आता आपण त्यांच्या आठवणींचे स्मरण करून त्यांना वंदन करू शकतो.
No comments:
Post a Comment