Friday, September 30, 2011

नवरात्राचे गाणे

आरती : नव देवता स्वरूपांची

चला सख्यांनो नवरात्राचे गाणे आपण गाऊ
नव रूपा ही जगन्माउली डोळे भरुनी पाहू ।।धृ।।

मनोमनी आठवी शिवाला करांत ही वरमाला
सागर तीरी उभी राहिली कोण असे ही बाला ?
कोण असे ही बाला ?
रूप तियेचे कुमारिकेचे पहिले दिवशी पाहू
नव रूपा ही जगन्माउली डोळे भरुनी पाहू ।।१।।
चला सख्यांनो --

"शुभं करोती" वदली वाणी जोडुनि दोऩ्हि करांना
तेजोमय ही मूर्ति तियेची प्रसन्न करि नयनांना
प्रसन्न करि नयनांना !!!
सांजवातिला सुवासिनी ही दुसरे दिवशी पाहू
नव रूपा ही जगन्माउली डोळे भरुनी पाहू ।।२।।
चला सख्यांनो --

मृदुल करांनी छेडित वीणा उधळित सप्त सुरांना !
स्फ़ुर्ति दायिनी स्फ़ुर्ति देउनी धुन्द करी रसिकांना
धुन्द करी रसिकांना !!!
मयुर वाहिनी सरस्वतीला तिसरे दिवशी पाहू
नव रूपा ही जगन्माउली डोळे भरुनी पाहू ।।३।।
चला सख्यांनो --

बोल "भवानी माता की जय !" गर्जत दाहि दिशांना
प्रसाद घेउनि तलवारींचा सिद्ध होति लढण्याला
सिद्ध होति लढण्याला !
शिवरायाची भवानि आई चौथे दिवशी पाहू ।
नव रूपा ही जगन्माउली डोळे भरुनी पाहू ।।४।।
चला सख्यांनो --
नवयौवन संपन्न नववधू हिरवा शालू ल्याली !
फ़ुलवेलीचा साज घालुनी वसुन्धरा ही आली
वसुन्धरा ही आली !!!
वनदेवीचे रूप तियेचे पांचवे दिवशी पाहू !
नव रूपा ही जगन्माउली डोळे भरुनी पाहू ।।५।।
चला सख्यांनो --

भाळी मळवट हिच्या शोभला कंठी रुळते माळा
खल निर्दालन करण्यासाठी त्रिशुल हातिचा सजला
त्रिशुल हातिचा सजला !!!
उग्र रूप हे व्याघ्राम्बरिचे सहावे दिवशी पाहू !
नव रूपा ही जगन्माउली डोळे भरुनी पाहू ।।६।।
चला सख्यांनो --

हाती घेउनि अमृत कुम्भा आज कमलिनी आली
शेषशायि भगवान चरणी सेवारत ही झाली
सेवारत ही झाली !!!
सौभाग्याचे व्रत हे घेउनि कुंकुम तिलका लावू !
नव रूपा ही जगन्माउली डोळे भरुनी पाहू ।।७।।
चला सख्यांनो --

तव नामाचा उदो उदो चा नादहि भरला कानी
तव आगमने मांगल्याचा सुगंध भरला गगनी
सुगंध भरला गगनी !!
अष्टहि कमळे अष्टभुजेच्या चरणांवरती वाहू !!!
नव रूपा ही जगन्माउली डोळे भरुनी पाहू ।।८।।
चला सख्यांनो --

भावसुरांचे आसन तुजला हृदय मंदिरी केले
पंचप्राण कुरवंडी करण्या नेत्र दीप लावियले !
नेत्र दीप लावियले !!!
दर्शन घेउन तुझेच माते आरति मंगल गाऊ !
नव रूपा ही जगन्माउली डोळे भरुनी पाहू ।।९।।
चला सख्यांनो --

Thursday, September 29, 2011

श्री नवरात्री देवीची आरती

ही आरती समर्थ रामदासांनी लिहिली आहे. त्यांच्या काळी देवळां देवळांत सार्वजनिक रीत्या साजरा होणारा नवरात्र महोत्सव कसा असायचा याचे चित्रणही देवीच्या अनेक रूपांबरोबरच या आरतीत पहायला मिळते.


उदोऽ बोला उदोऽ अंबाबाई माउलिचा हॊऽऽ
उदोकारे गर्जति काय महिमा वर्णू तिचा हो ।।धृ।।

अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसलि सिंहासनी हो
प्रतीपदे पासुनि घटस्थापना ती करुनी हो
मूलमंत्र जप करुनि भोंवते रक्षक ठेवुनि हो
ब्रह्मा विष्णू रुद्र आइचे पूजन करिती हो ।।१।।

द्वितियेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो
सकळांमध्ये श्रेष्ठ परशूरामाची जननी हो
कस्तुरि मळवट भांगी शेन्दुर भरुनी हो
उदोकारे गर्जति सकल चामुण्डा मिळुनी हो ।।२।।

तृतियेचे दिवशी अंबे श्रृंगार मांडिला हो
मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफ़ळा हो
कंठीची पदके कांसे पीताम्बर पीवळा हो
अष्टभुजा मिरविसि अंबे सुन्दर दिसे लीला हो ।।३।।

चतुर्थीचे दिवशी विश्र्वव्यापक जननी हो
उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंत:करणी हॊ
पूर्ण कृपे तारिसि जगन्माते मनमोहिनी हो
भक्तांच्या माउली सुर ते येती लोटांगणी हो ।।४।।

पञ्चमीचे दिवशी व्रत ते "उपांगललिता" हो
अर्घ्य पाद्य पूजने तुजला भवानी स्तविती हो
रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो
आनंदे प्रेम ते आले सद्भावे क्रीडता हो ।।५।।

षष्ठीचे दिवशी भक्तां आनंद वर्तला हो
घेउनि दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो
कवडी एक अर्पिता देसी हार मुक्ताफ़ळा हो
जोगवा मागतां प्रसन्न झाली भक्त कूळा हो ।।६।।

सप्तमीचे दिवशी सप्तश्रृंग गडावरी हो
तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो
जाई जुई शेवन्ती पूजा रेखियली बरवी हो
भक्त संकटी पडता घेसी झेलुनि वरचे वरी हो ।।७।।

अष्टमीचे दिवशी अष्टभूजा नारायणी हो
सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगज्जननी हो
मन माझे मोहिले शरण आलो तुज लागुनी हो
स्तनपान देउनि सुखी केले प्रसन्न अंत:करणी हो ।।८।।

नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणे हो
सप्तशती जप होम हवने सद्-भक्ती करुनी हो
षड्र्स अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो
आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे करुनी हो ।।९।।

दशमीचे दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो
सिंहारुढ करि शस्त्रे दारुण अंबे त्वां घेउनि हो
शुम्भ निशुम्भादिका राक्षसा किती मारिसी रणी हो
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो ।।१०।।
उदो उदो उदो उदो
जगदम्ब जगदम्ब जगदम्ब जगदम्ब

Wednesday, September 28, 2011

सप्तश्लोकी दुर्गास्तोत्र

आज घटस्थापना आहे. गेले काही वर्षे मी नवरात्राच्या सुरुवातीला देवीची स्तुती करण्याचा पायंडा पाडायचा प्रयत्न करत आहे. आज काय लिहावे याचा विचार करत असतांना हे सप्तश्लोकी दुर्गास्तुती स्तोत्र मिळाले. यासाठी मी माझे वडील बंधू डॉ.धनंजय घारे यांचा आभारी आहे. दुर्गा सप्तशती या मोठ्या ग्रंथाबद्दल ऐकले असेलच. त्याचे सार या सात श्लोकात सामावले आहे असे म्हणतात.

ॐ अथ सप्तश्लोकी दुर्गा (सप्तशती)
ॐ अस्य श्री दुर्गा सप्तश्लोकी स्तोत्र मंत्रस्य नारायण ऋषि: अनुष्टुप् छ्न्द: श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवता: श्री दुर्गा प्रीत्यर्थम् सप्तश्लोकी दुर्गा पाठे विनियोग:

ॐ ज्ञानिनां अपि चेतांसि देवी भगवती हि सा
बलाद् आकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति ।।१।।

दुर्गे स्मृता हरसि भीतिम् अशेष जन्तो:
स्वस्थै: स्मृता मतिं अतीव शुभां ददासि
दारिद्र्य दु:ख भय हारिणि का त्वदन्या
सर्वोपकार करणाय सदार्द्र चित्ता ।।२।।

सर्व मङ्गल माङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते ।।३।।

शरणागत दीनार्त परित्राण परायणे
सर्वस्यार्ति हरे देवि नारायणि नमोऽस्तुते ।।४।।

सर्वस्वरूपे सर्वेशे सर्व शक्ति समन्विते
भयेभ्य: त्राहि नो देवि दुर्गे देवि नमोऽस्तुते ।।५।।

रोगान् अशेषान् अपहंसि तुष्टा
रुष्टा तु कामान् सकलान् अभीष्टान्
त्वां आश्रितानां न विपत् नराणां
त्वां आश्रिता हि आश्रयतां प्रयान्ति ।।६।।

सर्वा बाधा प्रशमनं त्रैलोक्यस्य अखिलेश्र्वरी
एवं एव त्वया कार्यम् अस्मद् वैरि विनाशनं ।।७।।

इति सप्तश्लोकी दुर्गास्तोत्र सम्पूर्णा





Saturday, September 24, 2011

सात नवी आश्चर्ये आणि एक लेख


०७-०७-२००७ च्या मुहूर्तावर कदाचित ०७ वाजून ०७ मिनिटे ०७ सेकंद हा क्षण गाठून स्पेनमध्ये झालेल्या एका मोठ्या समारंभात जगातील नव्या ७ आश्चर्यांची घोषणा केली होती. ही सर्वच आश्चर्ये जुन्या काळातच बांधली गेलेली आहेत. त्यातल्या सात आश्चर्यांची फक्त एक वेगळी यादी त्या दिवशी नव्याने केली गेली होती. हीच सात आश्चर्ये आहेत असे कोणी ठरवले होते? आणि ते ठरवण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला होता? वगैरे प्रश्न तेंव्हाही माझ्या मनात आले होते, तसेच त्यावर जाहीर खडाजंगी चर्चाही झाल्या होत्या. कोणा उत्साही मंडळींनी यासाठी एक संस्था स्थापन करून तब्बल सात वर्षे काम केले होते आणि २१ नावांची लहान सूची (शॉर्ट लिस्ट) तयार केली होती. त्यातून सातांची निवड करण्यासाठी यावर जगातील सर्व नागरिकांकडून मते मागवली होती आणि इंटरनेटवर तसेच वृत्तपत्रांमध्ये त्याचा मोठा गवगवा झाला होता. भारताला त्यात निदान एक तरी स्थान मिळाले पाहिजेच म्हणून ताजमहालाला सर्वांनी मते द्यावी अशी प्रचार मोहीम निघाली होती. 'ताजमहाल' नको, 'तेजोमहालय' म्हणा असे सांगणा-यांनी त्यावेळी बहुधा शांतता बाळगली होती. त्यांनी विरोध करण्याचे कारण नव्हतेच. कुठल्या का नावाने ही इमारत जगातील सात आश्चर्यांत गणली गेली तरी नंतर पुन्हा आपल्याला हवे ते नाव तिला देण्याचे आणि इतक्या आश्चर्यजनक वास्तूवरील आपल्या (हिंदू) पूर्वजांचा हक्क सांगण्याचे त्यांचे स्वातंत्र्य अबाधितच राहणार होते. ते काही असो, नव्याने ठरवल्या गेलेल्या सात आश्चर्यात ताजमहालाची गणना झाली आणि बहुधा ती सुध्दा पहिल्या क्रमांकाने !

त्या काळात मी या विषयावर माझ्या याहू ३६० वरील ब्लॉगवर एक लेख लिहिला होता. त्या काळात किती जणांनी तो वाचला होता ते समजायला मार्ग नव्हता. पुढे याहू बंद झाला तेंव्हा इतर लेखांच्या बरोबर हा लेख सुध्दा मी २००८ मध्ये ब्लॉगरवरील या स्थळावर टाकला होता आणि ती गोष्ट विसरून गेलो होतो. अलीकडे ब्लॉगला भेट देणा-यांची संख्या ब्लॉगरवर मिळू लागली आहे. त्यात कोणता ब्लॉग जास्त लोकांनी पाहिला याची वेगळी आकडेवारी देतात. ती पाहून असे दिसले की त्यांनी मोजणी सुरू केल्यापासून आतापर्यंत ज्या साडेअठ्ठावन्न हजार लोकांनी या ठिकाणाला भेट दिली त्यांच्यापैकी सर्वात जास्त म्हणजे २१३९ लोकांनी सात आश्चर्ये हा लेख (आजपर्यंत) पाहिला. अजूनही हा आकडा सतत वाढतच आहे. या ब्लॉगला गेल्या आठवड्यात ३५, तर महिनाभरात १८१ वाचक मिळाले आहेत. माझ्या या ब्लॉगवर असा एक लेख लिहिला गेला आहे ही माहिती वाचकांना कशी मिळते आणि ते तिथपर्यंत कसे येऊन पोचतात ते तेच जाणोत! मला आतापर्यंत स्वतःच्या बाबतीत जेवढी आश्चर्यकारक माहिती समजली त्यातल्या सातांमध्ये हे एकसुध्दा असेल.
त्यामुळे पूर्वी या लेखात मी एवढे काय लिहिले होते असे माझे मलाच कुतूहल वाटले आणि मी वाचकसंख्येच्या त्या आकड्यात माझी स्वतःची एकाने भर टाकली. लहानपणी मला कळायला लागल्यापासून जागतिक पातळीवरील 'सात आश्चर्यां'बद्दल मी काय काय ऐकत गेलो आणि त्या यादीत कसा बदल होत गेला हे मी त्या लेखात लिहिले आहे. नवी यादी नुकतीच प्रसिध्द झालेली असल्याने त्यांची फक्त नावेच तेवढी दिली होती. आता त्यातील प्रत्येकावर भरपूर माहिती उपलब्ध आहे. पण ती जमवून देण्यासारखे निमित्य उपलब्ध नाही. त्यांची आणि इतर चौदा फायनॅलिस्ट्सची चित्रे वर दिली आहेत, तसेच पाश्चिमात्य जगाच्या प्राचीन काळात तत्कालीन ग्रीकांनी ठरवलेली भूमध्य समुद्राच्या पूर्व किना-यावरील प्रदेशातली मूळची सात आश्चर्येही दाखवली आहेत. इजिप्तमधील गिंझा येथील पिरॅमिड्स हे त्यातले फक्त एकच आश्चर्य आज शिल्लक राहिले आहे. बाकीची सहा आश्चर्ये काळाच्या उदरात गडप झाली आहेत. या एका आश्चर्याचा समावेश नव्या यादीत झाला नाही हे पाहून इजिप्तने तक्रार केली होती. म्हणून २००७ मध्ये या पिरॅमिड्सना सन्माननीय आश्चर्याचा दर्जा दिला गेला होता.
नव्या यादीमधला ताजमहाल आपलाच आहे. त्याबद्दल काय काय आणि किती किती लिहिले गेले आहे ? '' यमुनाकाठी ताजमहाल'', '' ताजमहलमे आ जाना'' वगैरे गाणी आपण गुणगुणत आलो आहोत, '' वाः ताज बोलिये।'' सारख्या जाहिराती पाहतो. चीनमधील शेकडो किलोमीटर लांबलचक भिंत जगप्रसिध्द आहे. अनेक इंग्रजी सिनेमांमध्ये आणि आता तर चाँदनी चौक टू चायनासारख्या हिंदी सिनेमातसुध्दा तिला पाहिले आहे. ही भिंत चंद्रावरूनसुध्दा दिसते असे पूर्वी ऐकले होते. आता फोटोग्राफी इतकी उच्च दर्जाची झाली आहे की आपल्या शर्टावर पडलेला डागसुध्दा उपग्रहाने काढलेल्या छायाचित्रात दिसतो म्हणे! रोममधले कॉलेजियम पाहून झाले आहे. अक्षरशः जीवघेणी मारामारी पाहण्यासाठी त्या काळातले रासवट लोक या खुल्या सभागृहात हजारोंनी गर्दी करत होते आणि तरीही त्यांना सिव्हिलायझेशन असे नाव देतात याचेच जास्त आश्चर्य वाटले. साडे चार हजार वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये बांधलेला गिंझा पिरॅमिड या यादीतून आता कटाप झाला आणि  दीड हजार वर्षांपूर्वी मेक्सिकोत बांधलेल्या चिचेन इझाने त्याची जागा घेतली आहे. या निमित्याने दक्षिण अमेरिकेलाही आपल्या देशातील मूळ रहिवाशांच्या पूर्वजांची आठवण झाली ते बरे झाले. खरे तर आज तिथे राहणा-या युरोपियन वंशाच्या लोकांच्या युरोपातून तिकडे गेलेल्या पूर्वजांनी त्या काळातील अमेरिकेतल्या मूळ रहिवाशांचा खातमाच करून टाकला होता. जे थोडे फार लोक रानावनात पळून गेले आणि तग धरून राहिले त्यांच्या वंशजांना आता जरा दिलासा मिळाला असेल. चिचेन इझाच्या जोडीला पेरूमधली माचूपिचू ही एक डोंगरमाथ्यावर केलेली अजब इमारतींची रचना आली आहे. निसर्ग आणि मानवी प्रयत्न यांच्या संयोगाने निर्माण केलेले हे दृष्य अद्भुत म्हणता येईल. दक्षिण अमेरिकेमधलीच ख्राइस्ट द रिडीमर ही ब्राझीलमधली १९३१ साली उभी केलेली महाकाय मूर्ती या प्राचीन आश्चर्यांच्या संगतीत विसंगत वाटते. ख्रिश्चनांच्या धार्मिक भावनांना हात घालून हिचा प्रचार केला गेला होता असे म्हणतात. माझ्या मते त्यापेक्षा आपली श्रवणबेळगोळा येथील गोमटेश्वराची मूर्ती या मानाला कदाचित जास्त लायक ठरली असती. भारतात केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणात या मूर्तीचा क्रमांक ताजमहालाच्याही वर लागला होता. अखेरचे आश्चर्य राहिले जॉर्डनमधील पेट्रा. हा काय प्रकार आहे हे मला नीटसे समजले नाही. कदाचित पेट्रोडॉलर्सचा प्रताप असावा.

हे वाचून आणखी कोणाला माझा पूर्वीचा ब्लॉग वाचण्याची इच्छा असेल तर खालील दुव्यावर टिचकी मारावी.

http://anandghan.blogspot.com/2008/08/blog-post_16.html




Sunday, September 18, 2011

माझ्या ब्लॉगच्या वाचकांची संख्या


२००६ सालच्या सुरुवातीला मी ब्लॉग लिहायला सुरुवात केली त्या वेळेपासूनच आपले लिखाण कोणी तरी वाचावे असे मला वाटत होते आणि कोणी ते वाचत आहे की नाही हे कळावे अशी इच्छासुध्दा अधून मधून मनात होत असे. हा ब्लॉग आधी ब्लॉगस्पॉटवर सुरू केलेला असला तरी याहूवर लिहिणे जास्त सोयीचे असल्यामुळे त्या काळात मी याहू ३६० या स्थळावर लिहीत होतो. त्या साईटतर्फेच रोजच्या रोज त्याला भेट देणा-यांची संख्या समजत होती हा दुसरा फायदा त्यात होता. पण सुरुवातीला माझे मीटर पुढेच सरकत नव्हते. 'आधी लेखन की आधी वाचक' या नावाचा एक लेख लिहून मी यावर आपले मनोगत व्यक्त केले होते.
सुरुवातीचे कांही दिवस आपल्या ब्लॉगकडे कोणी फिरकत नाही म्हणून माझे मन विषण्ण होत असे, पण नेटाने तो चालू ठेवल्यावर हळूहळू परिस्थिती बदलत गेली. वाचनांची संख्या शंभर, दोनशे वरून हजार, दोन हजार करीत वर्षाअखेर दहा हजारावर गेली तेंव्हा माझ्या आनंदाला सीमा राहिली नव्हती. त्यामुळे माझ्या अंगात हुरुप संचारला आणि दुस-या वर्षात खूप भाग लिहिले. वाचकांनीही अपेक्षेपेक्षा जास्त आधार दिला आणि वाचनसंख्या पांचपटीने वाढून अर्ध्या लाखावर गेली. यामुळे तिस-या वर्षाची (२००८ ची) सुरुवात अत्यंत उत्साहाने झाली होती, पण थोड्याच दिवसांनी याहू ३६० च्या क्षितिजावर अनिश्चिततेचे ढग जमू लागले. तरी ही पुढच्या काळात याहू ३६० ब्लॉग चालत राहिला. १६ ऑक्टोबर २००८ रोजी त्याच्या वाचनसंख्येने लाखाचा आकडा पार केला आणि १२ मे २००९ ला सव्वा लाखांचा टप्पा गाठला. त्यानंतर मात्र लवकरच तो कायमचा बंद झाला.

ब्लॉगस्पॉटवरील पहिला ब्लॉगगिरीचा माझा हा प्रयत्न वर्ष दीड वर्ष कोमात गेला होता, २००८ च्या सुरुवातीला त्याच्या अंगात धुगधुगी आल्याचे लक्षात आल्यावर त्यात नवे चैतन्य भरून याहू 360 ब्लॉगवरील लेख ब्लॉगस्पॉटवरील ब्लॉगवरसुध्दा द्यायचे ठरवले. एकेक लेख वाचून आणि त्यावर थोडे संस्कार करून तिकडे चढवण्याचा सपाटा चालवला आणि वर्षभरात तीनशेहून अधिक लेखांना दुसरा जन्म दिला. याच दिवसात कधी तरी गूगलने 'ब्लॉगस्पॉट'वर ताबा मिळवून त्याचे 'ब्लॉगर'मध्ये रूपांतर केले असावे. त्यानंतर त्याची कार्यक्षमतासुध्दा खूप सुधारली आणि अजून तरी चांगली आहे.

ब्लॉगस्पॉटवर वाचकांची संख्या समजण्याची सोय नव्हती. १ मे २००८ पासून मी एक फ्री काउंटर लावून घेतला. त्यामुळे भेट देणा-यांची संख्या समजू लागली. सुरुवातीला ती संख्यासुध्दा हळूहळूच वाढत होती. दोन वर्षांनंतर म्हणजे २०१० च्या मध्यापर्यंत ती ३०००० चे वर गेली होती. पण आता हा काउंटर अधून मधून बंदच पडू लागला आहे असे लक्षात आले. त्या कालखंडात या ब्लॉगचा त्या काउंटरच्या साइटशी संपर्क तुटत असल्यामुळे त्या काळात माझ्या ब्लॉगला भेट देणा-यांची गणतीच केली जात नसे. यावर काय करावे ते मला समजत नव्हते. त्यानंतर थोडे संशोधन केल्यानंतर असे लक्षात आले की आता ब्लॉगरने स्वतःच व्हिजिटर्सची आकडेवारी द्यायला सुरुवात केली आहे. या आकडेवारीत बराच अवांतर तपशीलसुध्दा वाचायला मिळतो.

ही आकडेवारी पाहिल्यावर त्यात एक गोची दिसली. वर दिलेल्या ग्राफमध्ये मे २००९ ते सप्टेंबर २००९ नंतर एकदम ऑक्टोबर २०१०वर उडी घेतली आहे. मला असे वाटते की पहिला कालावधी बहुधा मे २०१० ते सप्टेंबर २०१०चाच असणार. या सगळ्या तारखा उलटून गेल्यानंतर मी हा चार्ट पाहिला असल्यामुळे त्याबद्दल तर्क करण्यापलीकडे काही करू शकत नाही. १ डिसेंबर २०१० ला फ्री काउंटर वर ४७९६२ आणि ब्लॉगरवरील संख्या २०१२४ होती, म्हणजेच दोन्हींमध्ये २७८३८ एवढा फरक होता. त्यानंतर फ्री काउंटर थांबत थांबत आणि ब्लॉगरचा गणक व्यवस्थितपणे चालत राहिला असावा असे समजायला हरकत नाही.
फ्री काउंटरने आता 'अवघे पाउणशे' लाख पार केले आहेत. पण वरील गृहीतकृत्याप्रमाणे हिशोब केला (ब्लॉगरच्या वाचकसंख्येत २७८३८ मिळवले) तर आज एकूण संख्या ८५ हजारांच्या पलीकडे गेली असल्याचे दिसते. १ डिसेंबर २०१०च्या आधी देखील अनेक वेळा फ्री काउंटर बंद पडला होता, त्यामुळे मी त्याच्याकडे पाहणेच सोडून दिले होते. ब्लॉगरवर मिळत असलेल्या माहितीबद्दल मी अनभिज्ञ होतो. यामुळे ब्लॉगरवरील गणती ज्या दिवशी सुरू झाली तोपर्यंत फ्री काउंटरवर किती हिट्स रेकॉर्ड झाले होते वगैरे त्या कालखंडामधील परिस्थिती समजण्याचा मार्ग माझ्याकडे नाही. पहायला गेल्यास या आकड्यांपासून मला मानसिक समाधानाव्यतिरिक्त काहीच लाभ मिळत नाही. त्यामुळे त्याच्या अचूकपणाबद्दल अधिक विचार करण्यात अर्थ नाही. रोजच्या रोज निदान शंभर वाचक इकडे फिरकतात हेच खूप मोठे समाधान आहे.

त्यांनी माझ्यावर आपली कृपादृष्टी अशीच ठेवावी अशी नम्र विनंती.



Saturday, September 17, 2011

तेथे कर माझे जुळती - ९ - श्रीनिवास खळे



हा लेख मी सप्टेंबर २०११ मध्ये लिहिला होता. त्याचे ३१-०३-२०१६ रोजी किंचित संपादन केले.

"गाण्यांना फक्त चाली लावण्याचे सत्कार्य करणारा कोणी वेगळा महान संगीतकार असतो हेच मुळात मला ठाऊक नव्हते अशा त्या अज्ञानी बाळपणाच्या काळापासून मी महान कवी, गायक आणि संगीतकार श्री.यशवंत देव यांची कित्येक गाणी आवडीने ऐकत आलो होतो" असे मी देवसरांच्याबद्दल लिहिले होते. पण ज्या संगीतकाराची त्यांच्याहून जास्त गाणी मला त्या काळात अधिक आवडत होती त्याचे नाव श्रीनिवास खळे आहे हे मात्र मला खूप काळानंतर समजले. त्यांच्या समवयस्क संगीतकारांपैकी यशवंत देवांच्याबद्दल मी बरेचसे लिहिले असल्याने त्याची लगेच पुनरावृत्ती करण्याची गरज नाही. सुधीर फडके आणि हृदयनाथ मंगेशकर हे माझेच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राचे अत्यंत लाडके संगीतकार ! तसेच ते दोघेही उत्तम गायकही ! त्यांनी गायिलेली अनेक गाणी तुफान लोकप्रिय झालेली असल्यामुळे त्यांचा आवाज सारखा माझ्या कानावर पडत राहिला. हे दोघे महापुरुष नेहमी प्रकाशझोतामध्ये असत. पं.हृदयनाथ आजसुध्दा असतात. या दोघा महान संगीतकारांना मी निदान चार पाच वेळा प्रत्यक्षात आणि चाळीस पन्नास वेळा तरी टीव्हीवर पाहिले आहे. या ना त्या निमित्याने ते वर्तमानपत्रात तर नेहमीच दिसायचे. बाबूजींचे (सुधीर फडके यांचे) देशप्रेम, निष्ठा आणि विचारसरणी यांचे दर्शन त्यांच्या संभाषणातून होत असे आणि बाळासाहेबांचा (हृदयनाथ यांचा) गाढ अभ्यास, ज्ञान आणि पांडित्य यांचा प्रत्यय त्यांच्या बोलण्यातून येतो. यशवंत देवांची चौफेर फटकेबाजी मी जरा जवळून पाहिली आहे. या तीघांची गणना उत्तम गायक आणि संगीतकार यांच्या जोडीला उत्कृष्ट वक्ते म्हणून सुध्दा होईल, या त्रिमूर्तींच्या नावांना त्यांच्या खास व्यक्तीमत्वांच्या उज्ज्वल छवि (इमेज) जोडलेल्या आहेत. पण प्रसिद्धीपरान्मुख श्रीनिवास खळ्यांची गोष्ट  पूर्वीच्या काळात तरी त्या मानाने निराळी होती. कोणत्या संगीत दिग्दर्शकाने कोणत्या गीतांना स्वरबध्द केले आहे हे मुद्दाम म्हणून जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतरच मला त्या क्षेत्रातील त्यांचे उच्च स्थान समजले. मी जो पर्यंत हे करत नव्हतो तोपर्यंत मला त्यांचे नाव ऐकून सुध्दा ठाऊक नव्हते.

दहा बारा वर्षांपूर्वीपर्यंत मी त्यांना कोणत्याही जाहीर कार्यक्रमात प्रत्यक्ष किंवा दूरदर्शनावर पाहिले नव्हते. त्यांचा फोटोसुध्दा कधीच माझ्या पाहण्यात आला नव्हता. कदाचित तोपर्यंत मी रोज सकाळी मराठी वृत्तपत्रे वाचत नसल्यामुळे तसे झाले असणे शक्य आहे. इतर संगीतकारांच्या मुलाखतींमध्ये मी खळेकाकांचा उल्लेख सहसा ऐकला नाही. त्यामुळे जरी मला लहानपणापासून त्यांची कित्येक गाणी अतीशय आवडत होती आणि त्यांचे नाव जरा मोठा झाल्यावर ऐकले होते, तरीसुध्दा त्याच्या पलीकडे मला त्यांची कणभरही माहिती नव्हती. ते कसे दिसतात, कुठे राहतात, त्यांनी संगीताचे किती धडे कुणाकडून घेतले, मुळात ते गायक आहेत की वादक आहेत, त्यांनी कुणाकुणाकडे उमेदवारी केली, ते या क्षेत्रात कसे आणि कधी आले वगैरे वगैरे बहुतेक मोठ्या लोकांच्याबद्दलची माहिती सर्वश्रुत असते. पण श्रीनिवास खळे ही इतकी मोठी व्यक्ती मात्र त्याला अपवाद होती. त्यांची संगीतरचना असलेली गाणीच तेवढी आणि तीही मला खूप काळानंतर माहित झाली होती. सुधीर फडक्यांचे गीतरामायण, हृदयनाथांचे भावसरगम आणि यशवंत देवांची देवगाणी, शब्दप्रधान गायकी वगैरे सांगीतिक कार्यक्रम आम्ही कोठे कोठे दूरवर जाऊन आवर्जून पाहिले होते. त्या कार्यक्रमांमध्ये त्यांचे गायन ऐकायला मिळालेच, शिवाय त्यांचे विचार आणि काही मजेदार तर काही चटका लावणारे अनुभवसुध्दा त्यांनी सांगितले. श्रीनिवास खळ्यांच्या गीतांचा कार्यक्रम कोठे आहे असे आम्हाला समजले असते तर आम्ही तो पाहण्याचा आटोकाट प्रयत्न केला असता. पण ते कार्यक्रम झालेच तरी फारच क्वचित आणि दूर कुठेतरी होत असावेत. तो कार्यक्रम पाहण्याची (खरे तर ऐकण्याची) संधी काही मला मिळाली नाही.

टी व्ही चॅनल्सवर सारेगमप सारख्या मराठी सुगम संगीताच्या स्पर्धा सुरू झाल्यानंतरच म्हणजे वयाची सत्तरी गाठल्यानंतर श्रीनिवास खळ्यांचे नाव प्रकर्षाने पुढे येण्याला सुरुवात झाली असावी. मी सर्वात पहिल्यांदा शंकर महादेवन यांना त्यांच्याबद्दल भरभरून बोलतांना ऐकले. अवधूत गुप्ते, सलील कुलकर्णी, अजय अतुल वगैरे सारेच अँकर श्रीनिवास खळे यांना किती थोर संगीतकार मानतात ते त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत होते, तसेच खळ्यांच्या संगीत निर्देशनामधील त्यांची खास आणि अद्भुत अशी वैशिष्ट्ये त्या लोकांनी उलगडून दाखवल्यामुळे मला समजली. त्यामुळे माझ्या मनातला त्यांच्याबद्दल आदरभाव वाढत गेला. गीताला चाल लावणे म्हणण्यापेक्षा नवी सुरेल चाल सुचणे हे महा कठीण काम आहे आणि दैवी देणगी असलेल्यांनाच ते साध्य होते यात शंका नाही.
अलीकडील दहा बारा वर्षांच्या काळात एक दोन वेळा श्रीनिवास खळे यांची मुलाखतही टीव्हीवर पहायला मिळाली. पण त्यातसुध्दा ते थोडे त्रोटकच बोलत आहेत असे मला वाटले. ते आपणहून तर  स्वतःबद्दल काही सांगतच नव्हते, मुलाखतकाराने खोदून खोदून विचारल्यानंतर ते त्या प्रश्नाला एकाद्या वाक्यात उत्तर देत. त्यांच्या सांगण्यातून एवढे समजले की लिहिलेली कविता आधी वाचून आणि कोणता गायक ती गाणार आहे हे ठरवल्यानंतर त्या गाण्यातील भाव आणि गायकाची ताकद यांच्या आधाराने ते सुरेल आणि सुयोग्य अशी स्वररचना करत असत. आधी ट्यून बनवून त्या चालीवर गीतकाराला शब्दरचना करायला सांगायचे ही आजकाल सर्रास दिसणारी रूढी खळ्यांना पसंत नव्हती. कदाचित त्यामुळे त्यांनी भरमसाट चित्रपटांना संगीत दिले नसावे, पण ज्यांना दिले त्यांचे मात्र सोने झाले.

 श्रीनिवास खळे यांनी बडोद्याच्या सयाजीराजे विद्यापीठात शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले होते आणि संगीत दिग्दर्शन करतांना त्यांना हव्या असलेल्या नेमक्या जागा ते गायकांना दाखवून देत असत. अर्थातच त्यांना गायनकला चांगली अवगत असणार, पण त्यांच्या स्वतःच्या आवाजात त्यांनी ध्वनिमुद्रित करून घेतलेले एकही गाणे मी कधी ऐकले नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी आपला आवाज गाण्यासाठी दिला अशा गायक गायिकांची संख्या शंभर इतकी आहे. लिट्ल चँप आर्या आंबेकर ही शंभरावी आहे आणि या गाण्याचे रेकॉर्डिंग नुकतेच झाले. त्यांच्या गाण्यावरील सारेगमपचा स्पेशल एपिसोड काही दिवसापूर्वीच प्रसारित झाला. त्याच्या चित्रीकरणाच्या आधी सारे स्पर्धक खळ्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटून आणि आपले गायन त्यांना ऐकवून आले होते. त्यांना आशीर्वाद देतांना किती मार्मिक आणि नेमक्या सूचना खळे काकांनी दिल्या होत्या हे मी टीव्हीवर पाहिले होते. जीवनाच्या अखेरपर्यंत श्रीनिवास खळे कामात मग्न होते हेच यावरून दिसते.

चेंबूरला 'आमची शाळा' नावाची एक शाळा आहे. तिथे झालेल्या मुलांच्या गाण्याच्या स्पर्धांचे परीक्षण करायला एकदा अलकाला बोलावले होते. श्रीनिवास खळे हे त्यावेळी प्रमुख पाहुणे होते. एवढे मोठे सुप्रसिध्द आणि यशस्वी संगीत दिग्दर्शक म्हणजे त्यांचा केवढा दबदबा आणि थाटमाट असेल असे तिला वाटले होते. पण त्यांचे दिसणे, वागणे, बोलणे वगैरे कशातच तिला तो दिमाख व डौल दिसला नाही. त्यांच्या मुलीच्या वयाच्या अलकाशी बोलतांनासुध्दा "आपण कुठे राहता? कशा आहात?" असे अतीशय अदबीने त्यांनी विचारलेले ऐकून तिलाच अवघडल्यासारखे झाले.

श्रीनिवास खळे यांना प्रत्यक्ष भेटण्याची एक संधी मलाही मिळाली. त्या घटनेची चित्तरकथा तर अद्भुत म्हणावी लागेल. चार वर्षांपूर्वी एकदा आम्ही दूरदेशीच्या प्रवासातून परत आलो तेंव्हा घरी पोचून अंथरुणावर पडेपर्यंत अर्ध्याहून अधिक रात्र होऊन गेली होती. सकाळी आम्ही अजून झोपेतच असतांना अचानक आमचा दूरध्वनी खणखणला. आमच्या ओळखीच्या एका व्यक्तीने फोन केला होता. श्रीनिवास खळ्यांच्या मुलाखतीवर आधारलेला 'माझे जीवनगाणे' या नावाचा एक कार्यक्रम ई टीव्हीवर होणार असल्याचे आणि त्यात भाग घेण्याची संधी असल्याचे तिच्याकडून समजले. खळे यांच्या गाण्याची आवड असलेले प्रेक्षक म्हणून त्या कार्यक्रमाला हजर राहून शोभा आणण्याचे आवडते काम आम्हाला मिळणार होते. आम्ही युरोपच्या टूरवर गेलो असतांना पंधरा दिवस रोज प्रवास करून शरीराला शीण आलेला होता. घराची सफाई, कपडे धुणे यापासून वीज आणि टेलीफोनची बिले भरण्यापर्यंत न केलेल्या अनेक कामांचा मोठा ढीग साचला होता. उन्हाळ्याची सुटी लागली असल्याने व लग्नसराई सुरू झालेली असल्याने त्या निमित्याने केंव्हाही अगांतुक पाहुणे घरी येऊन थडकण्याची शक्यता होती आणि कांही समारंभांची आमंत्रणे आधीच घरी येऊन पडली होती. त्यामुळे खरे सांगायचे झाले तर त्या वेळी आमच्याकडे मोकळा असा वेळ नव्हताच. पण या कार्यक्रमाचे आकर्षण एवढे जबरदस्त होते की क्षणभरही विचार न करता आम्ही नक्की येणार असल्याचे सांगून टाकले आणि त्याचा पाठपुरावा केला.

दोन तीन दिवसांतच ते शूटिंग होणार होते. त्याला 'जाणकार रसिक' म्हणून जायचे झाले म्हणून त्यासाठी थोडीशी तयारी केली. बहुतेक सर्वच लोकप्रिय मराठी गाणी मला माहीत असली तरी त्यातली श्रीनिवास खळ्यांनी स्वरबद्ध केलेली कोणती त्याची यादी बनवून त्यातली जी गाणी घरातल्या कॅसेट वा सीडीवर होती ती लक्षपूर्वक ऐकून घेतली. यादीचा कागद घडी करून खिशात ठेऊन घेतला. ते चित्रीकरण सकाळीच होणार होते. त्यामुळे आम्ही भल्या पहाटे उठून तयार झालो पण त्याची वेळ पुढे ढकलत ढकलत जात असल्याचे फोनवरून समजत राहिले. आम्ही सगळे संध्याकाळी स्टूडिओत जाऊन पोचल्यानंतर तिथली एक सहाय्यिका बाहेर आली आणि तिने आत परत जाण्यापूर्वी त्या कार्यक्रमातला आमचा 'रोल' आम्हाला समजावून सांगितला, तसेच दोघातीघा इतर सहाय्यकांनी आमच्याकडून त्याची रंगीत तालीमही करवून घेतली.

अखेर रात्रीपर्यंत सगळे चित्रीकरण व्यवस्थित पार पडले. निवेदक तुषार दळवींनी सफाईने प्रश्न विचारले. मला आणि इतर श्रोत्यांनाही प्रश्न विचारू दिले. त्या सर्व प्रश्नांना खळेकाकांनी समर्पक आणि माहितीपूर्ण उत्तरे दिली. श्रीनिवास खळे यांच्या निवडक गाण्यांचे चित्रीकरण झाले. मंदार आणि शिल्पा या नव्या पिढीतल्या गुणी गायकांनी तसेच साथसंगत करणार्‍यानी गायन व वादनाची उत्तम कामगिरी केली. तांत्रिक कारणांमुळे त्यात कांही रीटेक करावे लागले, पण तेवढे ते लागतातच असे कळले. आम्हाला दिलेल्या जाणकार प्रेक्षकांच्या भूमिका आम्ही रीटेकशिवाय पार पाडल्या. त्यात चुका झाल्या असल्या तरी त्यामुळे त्या भूमिका नैसर्गिक वठल्यासारख्या वाटल्या असाव्यात. कार्यक्रम संपल्यानंतर खळेकाकांची ओझरती भेट झाली. तोंवर बराच उशीर झालेला असल्यामुळे त्यांना तसेच आम्हालाही घरी परतण्याची घाई होती. चित्रीकरणाच्या दरम्यान आमचा (ठरवून दिलेला) संवाद झाला होताच. त्यामुळे अनौपचारिक भेटीत आम्ही त्यांना केलेल्या अभिवादनाला त्यांनी स्मितहास्य करून मान डोलावून आणि हात हलवून खुणेनेच प्रत्युत्तर दिले.

त्या मालिकेचे प्रसारण पुढे अनेक महिन्यांनंतर झाले. आम्ही भाग घेतलेला एपिसोड सुरुवातीलाच होता. आम्हाला त्याची पूर्वसूचना न मिळाल्यामुळे आम्ही ते कोणालाही सांगू शकलो नव्हतो. एके दिवशी आम्ही पुण्याला गेलो असतांना टीव्ही लावला होता आणि रिमोटच्या बटनांशी सहज चाळा करतांना अचानकपणे श्रीनिवास खळ्यांचा हंसरा चेहेरा समोर आला आणि स्टूडिओमधला सेट तसेच गाणेही ओळखीचे वाटले. आम्ही ज्यात भाग घेतला होता तोच एपिसोड चालला होता. तो पहात असतांना आम्ही आपल्या घरी नसतांनासुध्दा चार जणांनी पुण्यातल्या घरी फोन करून आमचे अभिनंदन (कशाबद्दल?) केले. आम्हाला श्रीनिवास खळ्यांच्या सहवासात चार क्षण घालवायला मिळाले ही देखील काही लहान सहान गोष्ट नव्हती. त्याचा उल्लेख आम्ही जन्मभर करू शकणार होतो आणि करतही होतो.

दोन तीन आठवड्यापूर्वीच त्यांना लिट्ल चँप्सबरोबर पाहिले होते तेंव्हा प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते स्टूडिओत येऊ शकले नाहीत असे निवेदन झाले होते, पण घरच्या घरी ते ठीक वाटत होते. चांगले चालत बोलत होते. अचानक त्यांच्या निधनाची बातमी येईल अशी कल्पनाही तेंव्हा मनात आली नव्हती. पण विधीलिखित असे अज्ञातच असते आणि अचानक दत्त म्हणून समोर येऊन पुढ्यात उभे राहते. आता आपण त्यांच्या आठवणींचे स्मरण करून त्यांना वंदन करू शकतो.

Monday, September 12, 2011

या ब्लॉगवरील गणेशोत्सव

मी शाळेत असतांनासुध्दा गणेशोत्सवात घरी, शाळेत आणि गावात त्याची धामधूम चालत असे. ते दिवस अगदी वेगळे वाटायचे. पुण्यामुंबईकडे आल्यानंतर इकडल्या उत्सवाबद्दल तर विचारायलाच नको. त्याचे स्वरूप बदलत चालले असले तरी त्यामागे दिसणारा उत्साह तसाच आहे किंबहुना तो वाढतो आहे. गणेशोत्सवातले दिवस त्यामुळे काहीसे वेगळे आणि संस्मरणीय असेच असतात.

हा ब्लॉग लिहायला मी २००६ साली सुरुवात केली. त्या वर्षी गणेशोत्सवाच्या सुमारास मी एका मोठ्या आजारातून देवाच्या कृपेने बरा होण्याच्या मार्गावर होतो. अजून हिंडायफिरायला लागलो नव्हतो त्यामुळे घराच्या बाहेरील उत्साहाच्या वातावरणात सामील होणे मला शक्य नव्हते. घरात बसल्याबसल्याच किंवा अंथरुणावर पडल्या पडल्या गणरायाची विविध रूपे मनात आठवून आणि टेलिव्हिजन, इंटरनेट वगैरेवर पाहून त्यावर 'कोटी कोटी रूपे तुझी' ही लेखमालिका मी लिहिली. त्या काळात माझ्या अंगात काही काम करायचे फारसे त्राण नव्हते आणि मनोबलसुध्दा बरेच ढासळलेले होते. पण तरीही नेटाने अकरा दिवस रोज काही लिहू शकलो आणि त्या काळात माझ्या काँप्यूटर आणि इंटरनेटनेही साथ दिली, घरातली वीज गेली नाही की बाहेरची केबल तुटली नाही. ही विघ्नहर्त्याची कृपा असावी असे वाटायला लागले. त्यानंतर परिस्थितीत सुधारणा होत गेली आणि आत्मविश्वास पूर्ववत होत गेला.
२००७ मध्ये गणपतीचा सण साजरा करण्यासाठी मी पुण्याला गेलो होतो. त्या वर्षी हा ब्लॉग कोमात गेला होता, पण याहू ३६० वर याच नावाचा दुसरा ब्लॉग चालत होता. (पुढे तो बंद पडला) माझा मराठीभाषी संगणकसखा त्या वेळेस माझ्यासोबत नव्हता. एक इंग्रजीभाषी लॅपटॉप हाताशी आला, पण त्याला मराठी भाषा कशी शिकवायची याचे ज्ञान माझ्याकडे नव्हते. या घोळाची पूर्वकल्पना असल्यामुळे मी थोडी पूर्वतयारी करून पुण्याला गेलो होतो. त्या वेळेस गजाननाची कांही विशेष रूपे आणि त्याची कांही लोकप्रिय गाणी चित्ररूपाने दाखवण्याचा प्रयत्न मी याहूवर केला होता. तीच गाणी मी नंतर २००८ साली 'गणपतीबाप्पा मोरया' या मथळ्याखाली या ब्लॉगवर दिली. शिवाय 'उंदीरमामाकी जय' हा नवा लेख लिहिला, तसेच अलीकडील काळात जिव्हाळ्याचा विषय बनलेल्या पर्यावरणावर गणेशोत्सवाचा काय आणि किती प्रमाणात परिणाम होतो याचा आढावा घेतला. २००९ आणि २०१० साली काही स्फुट लेख लिहिले.
या वर्षी गणेशोत्सवाला चारच दिवस राहिले असतांना हॉस्पिटलाची वारी करावी लागली. गणेशचतुर्थीच्या आदले दिवसापर्यंत तबेत थोडी नरम गरमच होती. गणेशाची स्थापना झाली, अनेक आप्तस्वकीयांच्या भेटी झाल्या, घरातले वातावरण चैतन्याने भारले गेले आणि त्यातून मलाही ऊर्जा मिळाली असावी. पुन्हा एकदा या दिवसात फक्त गणेशाबद्दल लिहायचे ठरवले. अगदी रोजच्या रोज लिहायले जमले नाही पण आठ लेख लिहिले गेले. त्यांना यथायोग्य अशी नवी चित्रे मात्र देता आली नाहीत.
गेल्या पाच वर्षातील लेखांची यादी खाली दिली आहे.


२००६ कोटी कोटी रूपे तुझी - पुष्प १ ते ११

२००७ साली हा ब्लॉग बंद होता.

२००८ गणपतिबाप्पा मोरया भाग १ ते ३

          उंदीरमामाकी जय

          गणेशोत्सव आणि पर्यावरण १ ते ५

२००९ आधी वंदू तुज मोरया

          मूषक आणि माउस

         लोकमान्य टिळक आणि गणेशोत्सव -१, २

         यंदाचा आमचा गणेशोत्सव

          पुढच्या वर्षी लवकर या ... की एकदा येऊच नका?

२०१० गणेशोत्सवातली उणीव

         यंदाच्या गणेशोत्सवातील आगळेपण

         यंदाच्या गणेशोत्सवातील आणखी काही आगळ्या गोष्टी

२०११  गणपती, तुझी नावे किती ?

            ॐकार गणेश

             अथर्वशीर्षामधील गणपतीचे वर्णन

              पुराणातला गणपती

              पारंपरिक पध्दतीची गणपतीची गाणी -१ ते ४

हे सर्व लेख खालील दुव्यावर एकत्र उपलब्ध आहेत.
http://anandghare2.wordpress.com/category/%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%95/%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80/

Saturday, September 10, 2011

पारंपरिक पध्दतीची गणपतीची गाणी - ४

काशी आणि रामेश्वर ही सर्वात मोठी पवित्र देवस्थाने आहेत असे मी लहानपणी ऐकले होते. त्यांच्या खालोखाल पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरची अंबाबाई, गाणगापूरचा दत्त वगैरे देवस्थानांमध्ये पुळ्याच्या गणपतीचे स्थान होते. पुण्याला असतांना कसबा पेठेतील गणपती आणि मुंबईला आल्यानंतर टिटवाळ्याच्या गणपतीचे महात्म्य ऐकले. प्रभादेवीचा सिध्दीविनायक हा आमचा नेहमीचा सुखकर्ता दुखहर्ता झाला. अडचणींच्या किंवा आनंदाच्या बहुतेक प्रसंगी आम्ही त्याचे दर्शन घ्यायला जात असतो. यांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात गणपतीची आठ प्रमुख देवस्थाने आहेत आणि त्यांना अष्टविनायक म्हणतात हे मात्र कानावर आले नव्हते. यातील बहुतेक स्थाने खेडोपाड्यात आहेत. पूर्वीच्या काळात ग्रामीण भागातील रस्त्यांची परिस्थिती दारुण होती आणि वाहतुकीच्या साधनांचा अभाव होता. त्यामुळे माझ्या माहितीत तरी कोणी या अष्टविनायकाची यात्रा केल्याचे मी ऐकले नव्हते. पण १९७९ साली अष्टविनायक नावाचा एक चित्रपट आला आणि त्याने अमाप लोकप्रियता मिळवली. त्या चित्रपटाच्या द्वारे अष्टविनायकांना भरपूर प्रसिध्दी मिळाली. त्यातील नायकाला जसा लाभ मिळाला तसा आपल्याला व्हावा या इच्छेने असंख्य भाविकांना अष्टविनायकाची यात्रा करण्याची प्रेरणा मिळाली. सर्व यात्रा कंपन्यांनी त्यासाठी खास पॅकेज टूर्स बनवल्याच, इतर अनेक लोक अशा यात्रांचे आयोजन करायला लागले. माझे एक जवळचे आप्त नोकरी सांभाळून सप्ताहांतात (वीक एंड्सना) यात्रेकरूंना अष्टविनायकांचे दर्शन घडवून आणत होते.

या चित्रपटाला जे प्रचंड यश मिळाले त्यात त्यातील गाण्यांचा फार मोठा वाटा आहे. यातील तीन अजरामर गाणी आजदेखील गणेशोत्सवात जागोजागी ऐकायला मिळतात.

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता,
मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया ।।
ओंकारा तू, तू अधिनायक , चिंतामणी तू, सिद्धिविनायक,
मंगलमूर्ती तू भवतारक, सर्वसाक्षी तू अष्टविनायक,
तुझ्या कृपेचा हात मस्तकी, पायी तव मम चिंता ।।
मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया ।।

देवा सरू दे माझे मीपण, तुझ्या दर्शने उजळो जीवन ।
नित्य करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण ।
सदैव राहो ओठांवरती, तुझीच रे गुणगाथा ।।
मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया ।।

पं. वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा यांनी गायिलेले हे गोड गाणे भक्तीगीतांच्या पठडीतले आहे. त्यात थोडी गणेशाची स्तुती करून त्याची कृपादृष्टी आपल्याकडे वळावी, आपले जीवन उजळून निघावे अशी प्रार्थना केली आहे. अशा प्रकारची अनेक गाणी मी एक दोन वर्षांपूर्वी गणेशोत्सवावरील लेखात दिली होती. पं.वसंतराव देशपांडे यांनीच गायिलेल्या पुढील गाण्यात शास्त्रीय संगीतातील यमन रागाचे विलोभनीय दर्शन घडवले आहे. हे गाणे एकादे नाट्यगीत वाटावे इतके क्लासिकल ढंगाचे आहे. यात गणपतीच्या अनेक रूपांचे वर्णन आणि स्तुती यांना प्राधान्य आहे आणि मागणे जरा कमी आहे.

प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना, गणराया ।।

विघ्नविनाशक , गुणिजन पालक, दुरीत तिमीर हारका ।
सुखकारक तू, दुःख विदारक, तूच तुझ्या सारखा ।
वक्रतुंड ब्रम्हांड नायका, विनायका प्रभूराया ।।

सिद्धी विनायक, तूच अनंता, शिवात्मजा मंगला ।
सिंदूर वदना, विश्वाधीशा, गणाधीपा वत्सला ।
तूच ईश्वरा साह्य करावे, हा भव सिंधू तराया ।।

गजवदना तव रूप मनोहर, शुक्लांबर शिवसूता ।
चिंतामणी तू अष्टविनायक, सकलांची देवता ।
रिद्धी सिद्धीच्या वरा, दयाळा, देई कृपेची छाया ।।

 अष्टविनायक या सिनेमाच्या शीर्षकगीताने अनेक उच्चांक मोडले असावेत. जवळ जवळ वीस मिनिटे चालणारे (तरीही कंटाळा न आणणारे) इतके मोठे दुसरे एकही गाणे मला तरी माहीत नाही. हे गाणे अनेक गायक गायिकांनी मिळून गायिले आहे. त्यातील कडव्यांमध्ये लोकगीतांचे अनेक रंग पहायला मिळतात. सुरुवातीला अष्टविनायकांची नावे एका शार्दूलविक्रीडित वृत्तामधील श्लोकात दिली आहेत. हा श्लोक अनेक वेळा लग्नामधील मंगलाष्टकातसुध्दा म्हंटला जातो. किंबहुना कुर्यात सदा मंगलम् या अखेरच्या चरणावरून तो मंगलाष्टकांसाठीच लिहिला असावा असे वाटते.
त्यानंतर एका कडव्यात गणपती या देवतेचे गुणगान केल्यानंतर प्रत्येक स्थानी असलेल्या मंदिराचे सुरेख वर्णन तसेच त्या विशिष्ट स्थानासंबंधीच्या आख्यायिका, तिथली वैशिष्ट्ये वगैरे एकेका कडव्यात दिली आहेत. ग्रामीण भाषेत सुलभ अशा वाक्यरचनेत केलेले हे वर्णन अप्रतिम आहे. नानांनी म्हणजे स्व.जगदीश खेबूडकरांनी हे इतके मोठे आणि सुरेख गीत एका रात्रभरात लिहून दिले असे सचिन याने अलीकडेच टीव्हीवरील एका कार्यक्रमात सांगितले. ते ऐकून आश्चर्याला पारावार उरला नाही. ठराविक वृत्त किंवा छंदामध्ये बध्द नसलेल्या या गाण्यातील कडव्यांना अनिल अरुण यांनी लोकगीतामधील निरनिराळ्या चाली लावल्या आहेत. यातले त्यांचे कौशल्य आणि त्याला दिलेली विविध वाद्यसंगीताची जोड सगळे काही लाजवाब आहे. अशा प्रकारचे गाणे क्वचितच जन्माला येत असते.

संस्कृत श्लोक

स्वस्तिश्री गणनायकं गजमुखं मोरेश्वर सिद्धीदम्‌ ।
बल्लाळं मुरुडं विनायकं मढं चिंतामणी थेवरम्‌।
लेण्यांद्रिं गिरीजात्मजं सुवरदंविघ्नेश्वरं ओझरम्‌ ।
ग्रामोरांजण स्वस्थित: गणपती कुर्यात्‌ सदा मंगलम्‌ ।।

अष्टविनायकांचे वर्णन

जय गणपती गुणपती गजवदना ।
आज तुझी पूजा देवा गौरीनंदना ।
कुडी झाली देऊळ छान, काळजात सिंहासन ।
काळजात सिंहासन, मधोमधी गजानन ।
दोहीकडे रिद्धिसिद्धि उभ्या ललना ।।
अष्टविनायका तुझा महिमा कसा ।
दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा ।।१।।

गणपती, पहिला गणपती, मोरगावचा मोरेश्वर लई मोठं मंदिर ।
अकरा पायरी हो अकरा पायरी हो, नंदी कासव सभामंडपी नक्षी सुंदर ।
शोभा साजरी हो शोभा साजरी हो. मोरया गोसाव्यानं घेतला वसा ।।२।।
अष्टविनायका तुझा महिमा कसा ।।

गणपती, दुसरा गणपती, थेऊर गावचा चिंतामणी ।
कहाणी त्याची लई लई जुनी ।
काय सांगू डाव्या सोंड्याचं नवाल केलं सा-यांनी ।
विस्तार त्याचा केला थोरल्या पेशव्यानी ।
रमा बाईला अमर केलं वृंदावनी ।
जो चिंता हरतो मनातली चिंतामणी ।
भगताच्या मनी त्याचा अजूनी ठसा ।।३।।
अष्टविनायका तुझा महिमा कसा ।।

गणपती, तिसरा गणपती, सिद्धिविनायका तुझं सिद्धटेक गाव रं ।
पायावरी डोई तुझ्या भगताला पाव रं ।
दैत्यामारु कैकवार गांजलं हे नगर।
विष्णुनारायण गाई गणपतीचा मंतर ।
टापूस मेलं नवाल झालं टेकावरी देऊळ आलं ।
लांबरुंद गाभाऱ्याला पितळेचं मखर ।
चंद्र सूर्य गरुडाची भोवती कलाकुसर ।
मंडपात आरतीला खुशाल बसा ।।४।।
अष्टविनायका तुझा महिमा कसा ।।

गणपती, चौथा गणपती, पायी रांजणगावचा देव महागणपती ।
दहा तोंड हिचं हात जणू मूर्तीला म्हणती ।
गजा घालितो आसन डोळं भरुन दर्शन ।
सूर्य फेकी मूर्तीभर वेळ साधून किरण ।
किती गुणगान गावं किती करावी गणती ।
पुण्याईचं दान घ्यावं ओंजळ पसा ।।५।।
अष्टविनायका तुझा महिमा कसा ।।

गणपती, पाचवा गणपती, ओझरचा इघ्नेश्वर लांब रुंद होई मूर्ती ।
जड जवाहीर त्याचं काय सांगू शिरीमंती ।
डोळ्यामंदी माणकं हो हिरा शोभतो कपाळा ।
तहानभूक हरपती हो सारा बघून सोहळा ।
चारी बाजू तटबंदी मधी गणाचं मंदिर ।
इघ्नहारी इघ्नहर्ता स्वयंभू जसा ।।६।।
अष्टविनायका तुझा महिमा कसा ।।

गणपती, सहावा गणपती, लेण्याद्री डोंगरावरी नदीच्या तीरी ।
गणाची स्वारी तयार गिरिजात्मक हे नाव ।
दगडामंदी कोरलाय्‌ भक्तिभाव ।
रमती इथे रंका संगती राव ।
शिवनेरी गडावर जल्म शिवाचा झाला हो ।
लेण्याद्री गणानी पाठी आशिर्वाद केला हो ।
पुत्राने पित्याला जन्माचा प्रसाद दिला हो ।
किरपेने गणाच्या शिवबा धाऊनी आला हो ।
खडकात केले खोदकाम दगडात मंडपी खांब ।
वाघ सिंह हत्ती लई मोठं दगडात भव्य मुखवट ।
गणेश माझा पुत्र असावा ध्यास पार्वतीचा ।
आणि गिरिजात्मज हा तिनं बनवला पुतळा मातीचा ।
दगडमाती रुपदेवाचं लेण्याद्री जसा ।।७।।
अष्टविनायका तुझा महिमा कसा ।।

सातवा गणपती राया, महड गावाची महसूर वरदविनायकाचं तिथं एक मंदिर ।
मंदिर लई सादसूद जसं कौलारू घर ।
घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची कळसाच्यावर ।
सपनात भक्ताला कळं देवळाच्या मागं आहे तळं ।
मूर्ती गणाची पाण्यात मिळं त्यानी बांधलं तिथं देऊळ ।
दगडी महिरप सिंहासनी या प्रसन्न मंगलमूर्ती हो ।
वरदानाला विनायकाची पूजा कराया येती हो ।
चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा ।।८।।
अष्टविनायका तुझा महिमा कसा ।।

आठवा आठवा गणपती आठवा,
पाली गावच्या बल्लाळेश्वरा आदिदेव तू बुद्धीसागरा ।
स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमूख सूर्यनारायण करी कौतुक ।
डाव्या सोंडेचे रूप साजिरे कपाळ विशाळ डोळ्यात हिरे ।
चिरेबंद या भक्कम भिंती देवाच्या भक्तीला कशाची भीती ।
ब्रम्हानंदी जीव होई वेडा की पिसा ।।९।।
अष्टविनायका तुझा महिमा कसा ।।

अखेर गणपतीच्या आठ नावांचा गजर
मोरया मोरया मंगलमूर्ती, मोरया मोरया मयुरेश्वरा मोरया ।
मोरया मोरया चिंतामणी मोरया, मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया ।
मोरया मोरया महागणपती मोरया, मोरया मोरया विघ्नेश्वरा मोरया ।
मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया, मोरया मोरया वरदविनायक मोरया ।
मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया, मोरया मोरया अष्टविनायक मोरया ।।
. . . . . . . . . . . . . . . . (समाप्त)







पारंपरिक पध्दतीची गणपतीची गाणी - २

का कोणास ठाऊक, हा भाग ब्लॉगवर चढवायचा राहून गेला होता.


कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात गणेशाचे स्मरण करून करण्याची पध्दत आहे. हदगा किंवा भोंडल्याची सुरुवात 'ऐलोमा पैलोमा गणेशदेवा, माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा' या गाण्याने करतात. कोणत्याही धार्मिक समारंभात अग्रपूजेचा मान गणपतीला असतो. आधी त्याची पूजा करून आपले ईप्सित कार्य निर्विघ्नपणे पार पडो अशी प्रार्थना त्याला करून नंतर सत्यनारायण किंवा महालक्ष्मी वगैरे मुख्य देवतेची पूजा सुरू होते. आरत्यांमध्ये सर्वात पहिली आरती 'सुखकर्ता दुखहर्ता' हीच असते. मराठी माणसांमध्ये ही आरती महाराष्ट्रगीतापेक्षासुध्दा जास्त लोकप्रिय आहे असे नक्की म्हणता येईल. इंग्लंड अमेरिकेला गेलेल्या मराठी लोकांनी ही आरतीसुध्दा साता समुद्रापलीकडे नेलेली आहे.

तमाशांची सुरुवात गण नावाच्या काव्याने होतो. गणपतीचे स्तवन करून त्याची प्रार्थना या गाण्यात केली जाते. पेशवाईच्या काळात होऊन गेलेल्या पठ्ठेबापूराव यांनी रचलेला एक गण असा आहे.

आधी गणाला रणी आणला, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना ।।

पुढे शारदा आणि सद्गुरूंचे स्मरण करून झाल्यानंतर पठ्ठे बापूराव म्हणतात,

माझ्या मनाचा मी तू पणाचा, जाळून केला चुना चुना ।
पठ्ठेबापूराव कवि कवनाचा, हा एक तुकडा जुना जुना ।।
नाहीतर रंग पुन्हा सुना सुना ।।
शाहीर साबळे यांनी त्यांच्या खड्या आवाजात गाऊन अजरामर केलेले दोन पारंपरिक गण असे आहेत.

पयलं नमन हो करितो वंदन, पयलं नमन हो पयलं नमन ।
तुम्ही ऐका हो गुणिजन, आम्ही करितो कथन ।।
अरे हो .....

पयलं नमन करुनी वंदन, इडा मांडून, इडा देवाला, इडा गावाला, इडा पाटलाला, आणि इडा मंडळिला ।।

आम्ही सांगतो नमन, तुम्ही ऐका हो गुणिजन, पयलं नमन हो पयलं नमन ।
आम्ही सांगतो कथन, तुम्ही ऐका हो गुणिजन ।।
अरे हो .....

विस्कटली हरा आम्ही घेत फुले, अज-गज-गौरीवर चवरी डुले ।
विस्कटली हरा आम्ही घेत फुले ।।

लहान मुलं-मुली जमून चिमुकाली, खेळ भातुकलीचा खेळताना नकली ।
अकलेच्या चिखलात नेत्र खुले, विस्कटली हरा आम्ही घेत फुले ।।
गणपती आला अन्‌ नाचुन गेला रं, गणपती आला अन्‌ नाचुन गेला ।
नटवार पार मांग झाला रं, गणपती आला अन्‌ नाचुन गेला ।।
अरे हो .....

पयलं नमन हो करितो वंदन, पयलं नमन हो पयलं नमन ।।

या गणात गमफतीचे फारसे वर्णनही नाही की प्रारथनाही नाही. फक्त त्याची आठवण काढून त्याला नमन केले आहे एवढेच.

महाराज गौरीनंदना, अमर वंदना, दैत्यकंदना, हे मंगलमूर्ती ।
ठेव कृपा दृष्टी एकदंत दीनावर पुरती ।।

हे स्वयंभू शुभदायका, हे गणनायका, गीत गायका, अढळ दे स्फूर्ति ।

भवसमुद्र जेणे करून सहजगती तरती ।।
म्हणवून लागतो चरणी हे गजमुखा ।
दे देवा निरंतर स्मरणीच्या मज सुखा ।
दूर करी अंत:करणीच्या बा दु:खा ।
जय हेरंब लंबोदरा, स्वरूप सुंदरा, स्वामी सहोदरा, हे विघ्न निवारी ।
मज रक्षी रक्षी सहकुटुंब सहपरिवारी ।।

तिन्ही त्रिकाळ गण गंधर्व न करिता गर्व साधुनी पर्व सर्व देवांनी ।

आळविली तुला गाऊन मधूर ही गाणी ।।
हे प्राणी प्राण तव स्मरणाने जगवती ।
शशिसूर्य तुझ्या बळ भरणाने उगवती ।
हे धन्य धन्य अन्नपूर्णे श्री भगवती ।
कविराज असा हा दक्ष, सेवेमध्ये लक्ष, तयाचा पक्ष, धरुन मज तारी ।
महादेव प्रभाकर रक्षी या अवतारी ।।
महाराज गौरिनंदना हो महाराज गौरिनंदना ।।

हा गण मात्र अगदी एकाद्या स्तोत्रासारखा वाटतो. त्यातील संस्कृतप्रचुर भाषा पाहून हा तमाशाचा भाग असेल असे पटतच नाही. शिवाय प्रास, यमके वगैरे छान जुळवली आहेत.

लावणीप्रधान चित्रपटात देखील छान छान गण लिहिले गेले आहेत, उदाहरणार्थ हे दोन गण. श्रीगणेशाला अभिवादन करून आपला खेळ चांगला होऊ दे, त्यातील कलावंतांचे कौतुक होऊ दे, त्यांना यश,कीर्ती, संपत्ती वगैरे मिळून त्यांची भरभराट होऊ दे, अशी प्रार्थना या दोन्ही गणात केली आहे.

हे गणनायक सिद्धीविनायक, वंदन पहिले तुला गणेशा ।
रसीकजनांनी भरले अंगण, व्हावे मनाच्या त्यांच्या रंजन,
लवकर यावे दर्शन द्यावे, घ्यावे जवळी एकच आशा ।।

चाळ बोलती छुनछुन पायी, जणू अवतरली इंद्रसभा ही,
गुणवंतांचा आश्रय मिळतो, किर्तनरूपी असे तमाशा ।।

मेळा जमला ताल-सुरांचा, रंग उधळला शिणगाराचा,
दिनरातीला जागत राहो, जनसेवेतून अमुचा पेशा ।।


हे शिवशंकर गिरीजा तनया गणनायका प्रभुवरा।

शुभकार्याच्या शुभ प्रारंभी नमन तुला ईश्वरा ।।
प्रसन्न होऊनी विघ्न हरावे, नम्र कलेचे सार्थक व्हावे ।
तुझ्या कृपेने यश कीर्तीचा बहर येऊ दे भरा ।।
वंदन करुनी तुजला देवा, रसिक जनांची करितो सेवा ।
कौतुक होऊनी आम्हा मिळवा सन्मानाचा तुरा ।।

. . . . . . . . . .. . . . . . (क्रमशः)

Friday, September 09, 2011

पारंपरिक पध्दतीची गणपतीची गाणी - ३

कोळीगीते हा एक अत्यंत आकर्षक असा लोकगीतांचा प्रकार आहे. त्यातल्या ठेक्यावर आपोआप पावले थिरकायला लागतात. मल्हारी, एकवीरा आई वगैरे कोळी मंडळींची दैवते आहेत आणि असली तर बहुधा त्यांचीच स्तुती कोळीगीतांमध्ये असते. पण कोळीगीतांसारख्या ठेक्यावर आणि ठसक्यात गायिलेले गणपतीचे हे गाणे तुफान लोकप्रिय झाले होते आणि अजूनही आहे.


तुच सुखकर्ता तुच दु:खहर्ता, अवघ्या दीनांच्या नाथा ।
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा ।।

पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्षाने एकदाच हर्ष ।
गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा जाणुनी हा परामर्श ।
पुऱ्या वर्षाची, साऱ्या दु:खाची, वाचावी कशी मी गाथा ।।
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा ।।

पहा आली कशी आज वेळ, कसा खर्चाचा बसावा मेळ ।
गुळ-फुटाणे-खोबरं नि केळ, साऱ्या प्रसादाची केली भेळ ।
कर भक्षण आणि रक्षण तूच पिता अन्‌ तूच माता ।।
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा ।।

नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे ।
हाल ओळख साऱ्या घरांचे, कधी येतील दिवस सुखाचे ?
सेवा जाणुनी, गोड मानुनी, द्यावा आशीर्वाद आता ।।
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा ।।

या गाण्यातील कारुण्याचा भाव हृदयद्रावक आहे. वर्षभरातून एकदा गोड अन्नाचा स्पर्श होतो आहे आणि को सुध्दा गुळ-फुटाणे-खोबरं नि केळं यांचा. केवढी दैन्यावस्था ? पण अशा परिस्थितीतसुध्दा मायबाप गजाननावर अमाप श्रध्दा आहे, यातून तोच बाहेर काढेल, दुःखांचा नायनाट करेल आणि सुखाचे दिवस आणेल असा विश्वास आहे.



मराठी कोळीगीते आणि गुजराथी गरबा या दोघांचीही आठवण करून देणा-या ठेक्यावरले एक गाणे एका काळी लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोचले होते आणि अजूनही गणेशोत्सवात ऐकायला हमखास मिळते. ते आहे.

अशी चिक मोत्यांची माळ होती ग तीस तोळ्यांची ग ।
जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा हो ।।

या चिकमाळेला रेशमी मऊ दोरा ग ।
मऊ रेशमाच्या दौऱ्यात नवरंगी माळ ओविली ग ।। १।।

अशा चिकमाळेला हिऱ्याचे आठआठ पदर गं ।
अशी तीस तोळ्याची माळ गणपतीला घातली गं ।। २।।

मोरया गणपतीला खुलुन माळ शोभली ग ।
अशी चिक माळ पाहून गणपती किती हसला गं ।। ३।।

त्यान गोड हासूनी गोड आशीर्वाद दिला गं ।
चला करू या नमन गणरायला गं ।। ४।।

या गाण्याचा आशय अगदी साधा आहे. एक अनमोल अशी हि-यामोत्यांची माळ करून गणपतीला घातली, ती त्याला शोभून दिसली आणि त्याने प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला वगैरे गोष्टी इतक्या सहजपणे सांगितल्या आहेत की ते गाणे ऐकायला मजा वाटते आणि ठसकेदार उडत्या चालीमुळे गुणगुणावेसे वाटते.

सगळ्या कामांची सुरुवात गणेशाचे स्मरण करून करायची पध्दत असली तरी मराठी नाटकांच्या सुरुवातीला नटवराला नमन करण्याचा पायंडा आपल्या आद्य नाट्याचार्यांनी पाडला आहे. सव्वाशे वर्षांपूर्वीच्या संगीत शाकुंतल या नाटकातली नांदी आजही ऐकायला मिळते.

पंचतुंड नररुंडमाळधर पार्वतीश आधीं नमितो ।
विघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नेश्वर गणपति मग तो ॥

यात नटेश्वर शंकराला आधी वंदन केल्यानंतर लगेच विघ्नविनाशक गणपतीचे आवाहन करून आपले नाटक निर्विघ्नपणे पार पडावे अशी त्याला विनंती केली आहे. 'सबकुछ बाळ कोल्हटकर' या पध्दतीने त्यांनी सादर केलेल्या नाटकांमध्ये 'वाहतो ही दुर्वांची जुडी' या नाटकाला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. गणेशावर श्रध्दा हा या नाटकाचा विषयच असल्यामुळे त्याच्या शीर्षकगीतात गणपतीची भक्ती येणारच. हे गीत आहे.

गजाननाला वंदन करूनी, सरस्वतीचे स्तवन करोनी,
मंगल शिवपद मनी स्मरोनी. सद्भावाने मुदित मनाने,
अष्टांगांची करूनि ओंजळ, वाहतो ही दुर्वांची जुडी ।।

अभिमानाला नकोच जपणे, स्वार्थासाठी नकोच जगणे,
विनम्र होऊन घालव मनुजा, जीवन हे हर घडी ।।

विघ्न विनाशक गणेश देवा, भावभक्तीचा हृदयी ठेवा,
आशिर्वाद हा द्यावा मजला, धन्य होऊ दे कुडी ।।

पार्वती नंदन सगुण सागरा, शंकर नंदन तो दुःख हरा,
भजनी पुजनी रमलो देवा, प्रतिमा नयनी खडी ।।

वाहतो ही दुर्वांची जुडी ।।

या गीतात गणपतीविषयी भक्तीभाव आहेच, शिवाय निस्वार्थ, निरभिमान आणि विनम्र वागणूक ठेवावी असा हितोपदेशसुध्दा आहे.

. . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

Thursday, September 08, 2011

पारंपरिक पध्दतीची गणपतीची गाणी

मराठी संगीतातील लोकधारेला मोठी परंपरा आहे. कित्येक गाणी परंपरेने मागील पिढीकडून पुढील पिढीकडे चालत आली आहेत. काही गाणी संत किंवा शाहीरांनी लिहिली आहेत, तर आजच्या काळातील काही कवींनीसुध्दा लोकगीतांच्या शैलीमध्ये पद्ये रचली आहेत. प्रभातकाल मंगलमय करण्यासाठी गायिलेल्या भूपाळ्या, जात्यावरील ओव्या, मंगळागौर किंवा हदगा यासारखे स्त्रियांचे मेळावे, आरत्या, भजन, कीर्तन, भारुडे, तमाशामधील गण, गौळण, लावण्या, शाहीरांचे पोवाडे अशा विविध स्वरूपात हे लोकसंगीत ऐकायला मिळते. यामध्ये निरनिराळ्या प्रकारे आपल्याला गणपतीचे दर्शन होते.

माझ्या लहानपणी मी ऐकलेल्या आणि पाठ केलेल्या भूपाळ्यांमध्ये खालील दोन प्रमुख होत्या. सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात गणपतीच्या स्मरणाने करावी (म्हणजे दिवस चांगला जातो) ही शिकवण या दोन्ही गाण्यांमध्ये दिली आहे.

उठा उठा हो सकल जन, वाचे स्मरावा गजानन ।
गौरीहराचा नंदन, गजवदन गणपती ।।
ध्यानि आणुनि सुखमूर्ती, स्तवन करा एके चित्ती ।
तो देईल ज्ञानमूर्ती, मोक्ष सुख सोज्वळ ।।
जो निजभक्तांचा दाता, वंद्य सुरवरां समस्तां ।
त्यासी गाता भवभय चिंता, विघ्नवार्ता निवारी ।।
तो हा सुखाचा सागर, श्री गणराज मोरेश्वर ।
भावे विनवितो गिरीधर, भक्त त्याचा होऊनी ।।

पारंपारिक पध्दतीने कोणा गिरिधर कवीने ही भूपाळी रचली आहे. त्याच्याविषयी काही माहिती नाही. गजाननाचे स्मरण आणि स्तवन केल्यामुळे भक्ताला कसा लाभ होतो याचेच वर्णन या भूपाळीत आहे.


उठा उठा हो सकळिक, वाचे स्मरावा गजमुख ।
ऋद्धि-सिद्धींचा नायक, सुखदायक भक्तांसी ।।
अंगी शेंदुराची उटी, माथां शोभतसे कीरिटी ।
केशर कस्तूरी लल्लाटीं, कंठी हार साजिरा ।।
कानीं कुंडलांची प्रभा, सूर्य-चंद्र जैसे नभा ।
माजी नागबंदी शोभा, स्मरतां उभा जवळी तो ।।
कांसे पीतांबराची धटी, हाती मोदकांची वाटी ।
रामानंद स्मरतां कंठी, तो संकटी पावतो ।।

माझी आई ही भूपाळी पारंपारिक चालीवर म्हणत असे. पुढे लता मंगेशकरांच्या गोड आवाजात हे गाणे रेडिओवर मंगलप्रभात या कार्यक्रमात ऐकू येऊ लागले. हे कवी रामानंद कोणत्या काळात होऊन गेले की हे कोणा कवीचे टोपणनाव आहे हे गूढच राहिले. या भूपाळीत गणपतीचे रूप आणि त्याने परिधान केलेली वस्त्रे अलंकार वगैरेंचे सविस्तर वर्णन करून शेवटी हा देव संकटसमय़ी पावतो असे आश्वासन दिले आहे.

ॐकार प्रधान रूप गणेशाचे हा संत तुकारामांनी लिहिलेला अभंग मी आधी एका लेखात दिला होता. तुकोबानी गणेशाला उद्देशून याशिवाय आणखी काही अभंग लिहिले आहेत. यातला एक असा आहे.

गणराया लवकर येई, भेटी सकलासी देई ।।
अंगी शेंदुराची उटी, केशर कस्तुरी लल्लाटी ।।
पायी घागु-या वाजती, नाचत आले गणपती ।।
अवघ्या गणांचा गणपती, हाती मोदकाची वाटी ।।
तुका म्हणे शोधून पाहे, विठ्ठल गणपती दुजा नोहे ।।

तुकारामांचा दुसरा एक अभंग असा आहे.

धरुनिया फरश करी, भक्तांची विघ्ने वारी ।।
ऐसा गजानन महाराजा, त्याला नमस्कार माझा ।।
शेंदूर शमी बहु प्रिय त्याला, तुरा दुर्वांचा शोभला ।।
उंदीर असे ज्याचे वाहन, माथा जडित मुकुट पूर्ण ।।
नाग यज्ञोपवीत रुळे, शुभ्र वस्त्र शोभी साजरे ।।
भाव मोदक हारा भरी. तुका भावे पूजा करी ।।

तुकारामांनी असेही लिहिले आहे.

सिध्दीकांता चिंतामणी, माझी एका विनवणी ।।
घडो गणेशाचा संग, मनी रंगो बुध्दारंग ।।
चराचरी गजानन, माझे पाहोत नयन ।।
मायबापा सखया, तुका वंदीतो मोरया ।।

विठ्ठल आणि गणेश हे दो्ही एकच आहेत असे तुकारामांनी म्हंटलेले आहेच, सर्व देव एकच आहेत असे सांगतांना संत नामदेवांनी आपल्या अभंगात असे लिहिले आहे.

गणेश म्हणू तरी तुझाची देखणा, म्हणूनि नारायणा नमन तुज ।।
सारजा नमू तरी ते तुझी गायनी, म्हणूनि चक्रपाणी नमन तुज ।।
वेद नमू तरी तुझाचि स्थापिता, म्हणूनि लक्ष्मीकांता नमन तुज  ।।
नामा म्हणे भेटी भेटी झाली पै राया, कोण गणो कोण गणो वा या सेवकासी ।।

जुन्या काळातील पंतकवींनी लिहिलेले श्लोक, आर्या वगैरे हा मराठी पद्याचा मोठा खजिना आहे. लहानपणी पाठ केलेला आणि अनेक वेळी म्हणून शाबासकी मिळवून देणारा हा श्लोक.


नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे ।
माथा शेंदुर पाझरे वरी वरी दुर्वांकुराचे तुरे ।
माझे चित्त हरे मनोरथ पुरे देखोनि चिंता नुरे ।
गोसावीसुत वासुदेव कवी रे या मोरयाला स्मरे ।।

गणेशाचे किती सुंदर वर्णन या श्लोकात केले आहे !




. . . . . . . . (क्रमशः)

Wednesday, September 07, 2011

पुराणातला गणपती

ॐ गणानाम् त्वाम् गणपतीम् हवामहे कवीम् कवीनाम् उपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजो ब्राह्मणाः ब्रह्मणस्पदआनश्रृण्वन्नीतीभीःसीदसादनम् असा (साधारणपणे) एक मंत्र गणपतीच्या आरतीनंतर (मंत्रपुष्पात) म्हणतात. ऋग्वेदामधील या मंत्रात गणपतीची आराधना केली आहे. गणपतीअथर्वशीर्ष हे एक उपनिषद मानले जाते. अनेक पुराणांमध्ये गणपतीसंबंधीची आख्याने आहेत तसेच त्याची स्तोत्रे आहेत. मत्स्य, वायु, भागवत, विष्णू, गरुड, ब्रह्म, नारद, वामन, कुर्म, पद्म, स्कंद, मार्कंडय, शिव, अग्नी, वराह, ब्रम्हांड. ब्रह्मावैवस्वत आणि भविष्य ही अठरा मुख्य पुराणे मानली जातात. त्यामधील मत्स्यपुराण, स्कन्दपुराण, शिवपुराण, वराहपुराण, वामनपुराण, पद्मपुराण या प्रमुख पुराणग्रंथांमध्ये तसेच बृहद्धर्मपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, लिंगपुराण, ब्रह्मांड पुराण, देवीपुराण या गौण पुराणांत आणि महाभारतात गणेशाचे उल्लेख आहेत, शिवाय एक स्वतंत्र गणेश पुराणसुध्दा आहे.

शिवपुराण, स्कंदपुराण, बृहद्धर्मपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, पद्मपुराण, लिंगपुराण, वराहपुराण, देवीपुराण, मत्स्यपुराण आणि वामनपुराण या पुराणांमध्ये गणेशजन्माची निरनिराळी आख्याने आहेत. त्यातील बहुतेक कथांमध्ये साधारणपणे एकच गोष्ट आहे. त्यानुसार पार्वतीने शंकराच्या अनुपस्थितीत गणपतीची निर्मिती केली, शंकराला ते ठाऊक नव्हते. तो परत आल्यावर गणपतीने त्याला अडवले. त्यामुळे क्रोधित होऊन शंकराने त्या (उध्दट वाटणा-या) मुलाचे शिर उडवले, ते पाहून पार्वतीने हाहाःकार केला. त्यानंतर शंकराने त्याच्या शरीराला हत्तीचे मुख जोडून जीवंत केले आणि त्याला आपल्या गणांचा प्रमुख बनवले. प्रत्येक पुराणांमधील साधारणपणे अशा अर्थाच्या कथात त्यातील तपशीलात थोडा थोडा फरक फरक आहे. काही पुराणांमध्ये मात्र निराळ्याच गोष्टी आहेत. एकामध्ये गणपतीला जन्मतः मस्तक नव्हते म्हणून त्याला हत्तीचे तोंड लावून दिले अशी कथा आहे, आणखी एकात शंकर आणि पार्वती या दोघांच्या संयोगातून गणपतीचा जन्म झाला आणि एका कथेत तर एकट्या शंकरानेच गणपतीची उत्पत्ती केली असे आहे. ब्रह्मवैवर्त पुराण आणि शिवपुराणात गणपतीच्यासंबंधीच्या इतर काही कथा आहेत. यातली कोणतीच पुराणे मी वाचलेली नाहीत आणि संस्कृतमध्ये असल्यामुळे मला ती वाचून समजणारही नाहीत. वरील माहिती मी विकीपीडियावरून घेतली आहे.

महर्षी व्यासांनी महाभारताची रचना केली तेंव्हा त्यांच्या लेखनिकाचे काम गणपतीने केले असे मी लहानपणीच ऐकले होते. महर्षी व्यासांनी एक एक ओळ किंवा श्लोक सांगायचा आणि गणपतीने ते तत्परतेने लिहून घ्यायचे असे त्यांचे आपसात ठरले. पण हे प्रचंड खंडकाव्य रचता रचता सांगतांना व्यासांनी मध्येच कुठेही थांबायचे नाही अशी अट गणेशाने घातली होती. व्यासमहर्षी थांबले आणि गणेशांनी लेखणी खाली ठेवली की आपले काम तिथेच थांबवून ते लगेच अंतर्धान होणार होते. पण हजारो श्लोक रचून ते सांगतांना व्यासमहर्षींनी कोठेही पळभर विश्रांती घेतली नाही किेवा ते अडखळले नाहीत आणि गणपती ते श्लोक लिहीत राहिले. अशा त-हेने संपूर्ण महाभारताचे एकटाकी लेखन झाले. अशी आख्यायिका आहे. (पण महाभारत हा ग्रंथ निरनिराळ्या काळात होऊन गेलेल्या आणि व्यास हे टोपणनाव धारण केलेल्या अनेक विद्वानांच्या लेखनातून निर्माण झाला असावा असे काही इतिहाससंशोधकांचे सांगणे आहे.)

नारदमुनींनी रचलेले संकट नाशन गणेश स्तोत्र नारद पुराणात आहे. श्री गणेश द्वादश नाम स्तोत्र, योगशांतिप्रद स्तोत्र, सिद्धिविनायक स्तोत्र, परब्रह्म रूप कर स्तोत्र आणि श्रीगणेश गीतासार स्तोत्र ही स्तोत्रे मुद्गल पुराणात आहेत. ढुंढि स्वरूप वर्णन नावाचे स्तोत्र गणेश पुराणात आहे. ही स्तोत्रेसुध्दा माझ्या आप्तांकडून मला मिळाली. संकटनाशन स्तोत्र आणि द्वादशनामस्तोत्रांमध्ये गणेशाची बारा नावे देऊन ती नावे रोज वाचली किंवा ऐकली तर सर्व विघ्ने दूर होतील आणि मनातल्या इच्छांची पूर्ती होईल असे आश्वासन दिले आहे. या दोन श्लोकात दिलेल्या प्रत्येकी बारा नावांमधील साम्यस्थळे आणि त्यांच्यामधील फरकांबद्दल मी आधी एका लेखात लिहिले आहे. योगशांतिप्रद स्तोत्रात आधी इतर देवांनी गणेशाचे वर्णन आणि स्तुती केली आहे आणि अखेरच्या श्लोकात श्रीगणेशाने प्रसन्न होऊन हे स्तोत्र वाचणा-या सर्वांना वरदान दिले आहे, श्री सिद्धिविनायक स्तोत्रात विघ्नविनाशक विनायकाची प्रार्थना केली आहे. परब्रह्म रूप गणेशस्तोत्रातील श्लोकांच्या पहिल्या तीन चरणांमध्ये गणेशाच्या विराट विश्वरूपाचे वर्णन करून चौथ्या ओळीत परब्रह्म रूपं गणेशं भजेम असे म्हंटले आहे. हे वाचतांना जगद्गुरू शंकराचार्यांच्या चिदानंदरूपः शिवोहम् शिवोहम् ची आठवण येते. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली होती हे सर्वांना माहीत आहे. गणेशगीतासार स्तोत्रात प्रत्यक्ष शंकर भगवानांनी गणेशाकडे उपदेश मागितला आणि गणपतीने त्यांना गीतेचा सारांश सांगितला अशा संवादात्मक पध्दतीने हे स्तोत्र लिहिलेले आहे. मूळ गीतेप्रमाणेच यातदेखील बरेच ब्रह्मज्ञान आहे. गणेशपुराणामधील ढुंढिरूपवर्णन स्तोत्रात गण, गज, ऋध्दी, सिध्दी वगैरे शब्दांचे आध्यात्मिक अर्थ देऊन गणपतीचे एक आध्यात्मिक दर्शन घडवले आहे.
पुराणामध्ये अशा त-हेने गणपती या देवतेचे विविध अंगांनी दर्शन घडवले आहे. त्यात सुरस कथा आहेत, गजाननाचे रूप आणि त्याने केलेला साजश्रुंगार, ल्यायलेले दागदागिने वगैरेंची रसभरीत वर्णने आहेत आणि अगम्य असे अध्यात्मही आहे.

Sunday, September 04, 2011

अथर्वशीर्षामधील गणपतीचे वर्णन

माझ्या ओळखीतील बहुतेक मराठी लोकांना गणपती अथर्वशीर्ष ठाऊक असते, अनेकांना ते पाठ असते. त्या मानाने आजकाल रामरक्षा कमी लोकप्रिय आहे. अथर्वशीर्ष या स्तोत्रात लहान लहान आणि तुलनेने सोपी वाटणारी वाक्ये आहेत. सुमारे दोन मिनिटात त्याचे वाचन किंवा पठण पूर्ण होते. गणेशोत्सवाच्या दिवसात हे स्तोत्र म्हंटले जाते. काही लोक जमेल तेंव्हा त्याची एकवीस आवर्तने करतात. काही मंडळी एकत्र जमून १००१ आवर्तनांचा सामूहिक कार्यक्रम करतात. पुण्यात हजारो स्त्रीपुरुष एकत्र येऊन त्याचे पठण करतांनाची छायाचित्रे बहुतेक दरवर्षी पहायला मिळतात.
या स्तोत्रात गणपतीची स्तुती केली आहे, तसेच त्याला विनंती केली आहे. स्तोत्र संपल्यानंतर शेवटी त्याला पुनःपुनः नमस्कार करतांनाच (नमोनमः) त्याचा शिवसुताय (शंकराचा मुलगा) असा (दुय्यम वाटणारा) उल्लेख येतो. संपूर्ण स्तोत्रात त्याचे वर्णन तोच सर्वोच्च (एकमेव) परमेश्वर असेच केलेले आहे. सुरुवातीलाच "त्वमेव केवलं कर्तासि । त्वमेव केवलं धर्तासि । त्वमेव केवलं हर्तासि ।" असे म्हणतांना या विश्वाचा तोच एकटा कर्ता, धर्ता आणि हर्ता असल्याचे सांगितले आहे. पुढील भागात "सर्वं जगदिदं त्वत्तो जायते । सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति ॥ सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति ।" असे म्हणून ही गोष्ट अधिक स्पष्ट केली आहे. या वाक्यांचा अर्थ सारे जग तुझ्यातूनच जन्म घेते, तुझ्यामुळेच उभे राहते (चालते) आणि अखेर तुझ्यातच विलीन होते असा होतो.
जगामधील सर्व गोष्टी पंचमहाभूतांपासून निर्माण होतात आणि त्यांच्यात विलीन होतात हे आपण पाहतोच. पण पृथ्वी आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते म्हणजे स्वतः गणपतीच आहे असे "त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः ।" या वाक्यात म्हंटले आहे. ब्रह्मा, विष्णू आणि शिव ही त्रिमूर्ती या विश्वाचे कर्ता, धर्ता व हर्ता आहेत अशी हिंदू धर्मानुसार धारणा आहे. " त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवःस्वरोम् " या वाक्यानुसार गणेश हा ब्रह्माविष्णूमहेश तर आहेच, शिवाय इंद्र, अग्नी, वायू, सूर्य, चंद्र वगैरे सर्व काही आहे. विश्वामध्ये चैतन्याच्या जेवढ्या खुणा आपल्याला दिसतात त्या सर्वांमध्ये गणेश आहे. संत तुकारामांच्या अभंगात आणि संत ज्ञानेशांच्या ओव्यांमध्ये असेच सांगितलेले आहे.
गणेशाने सर्व बाजूंनी (पूर्व, पक्ष्चिम, उत्तर, दक्षिण, वर आणि खाली अशा दिशांनी) आपले रक्षण करावे असे "अव पश्चात्तात् । अव पुरस्तात् । अवोत्तरात्तात् । अव दक्षिणात्तात् । अव चोर्ध्वात्तात् । अवाधरात्तात् ।" या वाक्यांमध्ये म्हणतांना गणपतीचा वास सर्वत्र आहे असेच सुचवले आहे. आपल्याला ज्ञात असलेल्या सगळ्या जागी तर तो आहेच, त्याच्याही पलीकडील अज्ञात अशा प्रदेशातसुध्दा तो आहे असे "त्वं गुणत्रयातीतः । त्वं देहत्रयातीतः । त्वं कालत्रयातीतः । या ओळींमध्ये म्हंटले आहे. तो सत्व, रज, तमोगुणांच्या पार आहे, तसेच भूत भविष्य वर्तनमानकाळांच्या पलीकडे अनादी अनंत असा आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर त्याची व्याप्ती आपल्या कल्पनाशक्तीच्या खूप पलीकडेपर्यंत पसरलेली आहे.
अशा या अगम्य रूपाची आराधना करणे सामान्य माणसाला जमणार नाही. त्याच्यासाठी सोपे मार्ग आहेत. ॐ या अक्षरात तो सामावला आहे असे मागील लेखात लिहिले होते. गं या अक्षरामधील "गकारः पूर्वरूपम् । अकारो मध्यमरूपम् । अनुस्वारःश्चान्त्यरूपम् । बिन्दुरूत्तररूपम् । नादः सन्धानम् " असे अथर्वशीर्षात सांगितले आहे. त्यानुसार ॐगंगणपतयेनमः हा त्याचा मंत्र झाला.

"एकदन्तंचतुर्हस्तंपाशमङ्कुशधारिणम् ।

रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् ।

रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम् ।

रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितम् । "

असे त्याचे दृष्य वर्णन केले आहे. त्याप्रमाणे एक दात, सुपासारखे कान, मोठे उदर, चार हात, त्यापैकी तीन हातात पाश, अंकुश आणि रद धारण केलेले आणि चौथा वरदहस्त वर देण्याच्या मुद्रेमध्ये, रक्तवर्ण म्हणजे तांबूस कांती, त्याच रंगाची वसने, गंध आणि फुले असे त्याचे रूप या श्लोकांमध्ये दिले आहे आणि तेच साधारणपणे सगळीकडे दिसून येते. काही जागी तपशीलात थोडा बदल केला तरी इतर वैशिष्ट्ये टिकून ठेवली जातात. प्रकृती आणि पुरुष किंवा ब्रह्म आणि माया यापासून बनलेल्या सृष्टीच्या पार असलेल्या या देवाने भक्तांची अनुकंपा वाटल्यामुळे त्यांच्यासाठी हे रूप धारण केले आहे असा खुलासा खालील श्लोकात केला आहे.

"भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् ।

आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् । "
अशा प्रकारे गणपतीचे विश्वाच्या पार असलेले अगम्य अपार असे विशाल रूप आणि डोळ्यांना दिसणारे, वाचेने बोलता तसेच कानाने ऐकता येण्यासारखे सोपे रूप या सर्व रूपांची वर्णने गणपतीअथर्वशीर्षात केली आहेत.

Saturday, September 03, 2011

ॐकार गणेश


प्रत्येक स्तोत्राची सुरुवात श्रीगणेशायनमःने करण्याची पध्दत आहे. संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी या नावाने प्रसिध्द) या ग्रंथाच्या सुरुवातीला गणेशाचे वंदन असे केले आहे.

ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥ जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥
देवा तूंचि गणेशु । सकळमति प्रकाशु ॥ म्हणे निवृत्ति दासु । अवधारिजो जी ॥२॥
अकार चरण युगुल । उकार उदर विशाल ॥ मकार महामंडल । मस्तकाकारें ॥३॥
हे तिन्ही एकवटले । तेथें शब्दब्रम्ह कवळलें ॥ ते मियां श्रीगुरुकृपें नमिलें । आदिबीज ॥४॥


तर संत तुकारामांनी एका अभंगात असे लिहिले आहे,

ॐकार प्रधान रूप गणेशाचे । हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ॥१॥
अकार तो ब्रम्हा, उकार तो विष्णु । मकार महेश जाणियेला ॥२॥
ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न । तो हा गजानन मायबाप ॥३॥
तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी । पहावी पुराणे व्यासाचिया ॥४॥


समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकांची सुरुवात अशी केली आहे,

गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ।।


या तीन्हीवरून असे दिसते की गणेश किंवा गणपती हा हिंदू धर्माच्या मान्यतेप्रमाणे आद्य देव आहे. ब्रह्मा आणि विष्णूसह भगवान शंकर या सर्वांचा समावेश या ॐकार आदिदेवात होतो. सर्व चराचरात भरलेला हा परमेश्वर निर्गुण निराकार असा आहे. उपासना करण्यासाठी त्याने गजाननाचे सगुण रूप घेतले आहे. शंकर पार्वतीचा पुत्र हे त्याचे एक रूप असेल, पण त्याने इतर अनेक रूपे घेतली असल्याचे पुराणामधील कथांमध्ये सांगितले जाते. दोन, चार किंवा दहा हात असलेल्या गणेशाच्या मूर्ती पुरातन मंदिरांमध्ये दिसतात काही रूपांमध्ये त्याला अनेक मस्तकेसुध्दा दाखवली आहेत. त्यामागे निरनिराळी कारणे असल्याचे खुलासेही केले जातात. त्यातून चतुर्भुज आणि एकदंत गजमुखाची आकृती आजकाल सर्वत्र प्रमाण समजली जाते. पण हे भक्तांनी ठरवले त्याप्रमाणे ठरले.

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांनी वेदाचा आधार घेऊन सांगितले आहे की अ, उ आणि म मिळून झालेला ॐकार हेच गणेशाचे मुख्य रूप आहे. अकार हे पाय, उकार हे पोट आणि मकार हे मस्तक असे ज्ञानेश्वर सांगतात तर अकार, उकार आणि मकार हे अनुक्रमे ब्रह्मा विष्णू महेश असल्याचे तुकारामांनी सांगितले आहे. याचाच अर्थ गणपती हे दैवत विश्वाच्या सुरुवातीपासून आहे असा होतो. चतुर्थीला त्याचा जन्म झाला ही घटना एका अवतारापुरती आहे. असे म्हणता येईल.

Friday, September 02, 2011

गणपती, तुझी नावे किती ?

कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्यचंद्रतारे, कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देव्हारे ।। असे एका गाण्यात म्हंटले आहे. या रूपांची अशीच अगणित नावेही आहेत. या लेखमालिकेच्या पहिल्या भागातल्या दोन स्तोत्रांमध्ये श्रीगणेशाची बारा नावे दिली आहेत. नारद विरचित संकटनाशन गणेशस्त्रोत्रातील नावे आहेत
१. वक्रतुंड, २. एकदंत, ३. कृष्णपिंगाक्ष, ४ गजवक्त्र, ५. लंबोदर, ६. विकट. ७.विघ्नराजेंद्र, ८.धूम्रवर्ण, ९. भालचंद्र, १०.विनायक, ११. गणपती आणि १२. गजानन

तर गणेशद्वादशनामस्तोत्रातील नावे आहेत
१.सुमुख, २.एकदंत, ३.कपिल, ४.गजकर्णक, ५.लंबोदर, ६.विकट, ७. विघ्ननाश, ८. विनायक, ९.धूम्रकेतू, १०.गणाध्यक्ष, ११.भालचंद्र १२.गजानन

यातील काही नावे दोन्ही याद्यांमध्ये आहेत
१.एकदंत, २.लंबोदर, ३.विकट, ४.भालचंद्र, ५.विनायक, ६.गजानन

काही नावांचे अर्थ एकसारखे आहेत
१.गणपती आणि गणाध्यक्ष

काही नावांचे अर्थ परस्परविरोधी आहेत
१.वक्रतुंड आणि सुमुख, २.विघ्नराजेंद्र आणि विघ्ननाश

काही नावे स्वतंत्र आहेत
१.कृष्णपिंगाक्ष, २.धूम्रवर्ण, ३.कपिल, ४.धूम्रकेतू

या बारा नावांशिवाय गणपतीची खाली दिलेली नावे किंवा त्याला दिलेली विशेषणे या स्तोत्रांमध्येच आली आहेत
गौरीपुत्र, शुक्लांबरधर, शशिवर्ण, चतुर्भुज, प्रसन्नवदन, विघ्नहर, गणाधिपती, चंड, त्रिलोचन, वरदात

महाराष्ट्रामधील अष्टविनायकांची नावे आहेत
मोरेश्वर, बल्लाळेश्वर, गिरिजात्मज, वरदविनायक, विघ्नेश्वर, चिंतामणी, महागणपती, सिध्दीविनायक,

पूर्वीच्या पिढीमध्ये हेरंब हे गणपतीचे नाव ठेवले जात असे, श्रीपती आणि अनंत ही विष्णूचीही नावे आहेत. नव्या पिढीमधील अमित, अमेय, अमोघ वगैरे नावे सुध्दा गणपतीचीच आहेत. माझे नाव आनंद हेसुध्दा गणपतीचे नाव असल्याचा शोध मला आजच लागला. गणपतीच्या ११० नावांची खालील यादी जालावर मिळाली. त्यात अशी इतरही काही नावे मिळाली.

१) विघ्नेश
२) विश्ववरद
३) विश्वचक्षू
४) जगत्प्रभव
५) हिरण्यरूप
६) सर्वात्मन्
७) ज्ञानरूप
८) जगन्मय
९) ऊर्ध्वरेतस
१०) महावाहू
११) अमेय
१२) अमितविक्रम
१३) वेददेद्य
१४) महाकाल
१५) विद्यानिधी
१६) अनामय
१७) सर्वज्ञ
१८) सर्वग
१९) शांत
२०) गजास्य
२१) चित्तेश्वर
२२) विगतज्वर
२३) विश्वमूर्ती
२४) विश्वाधार
२५) अमेयात्मन्
२६) सनातन
२७) सामग
२८) प्रिय
२९) मंत्रि
३०) सत्त्वाधार
३१) सुराधीश
३२) समस्तराक्षिण
३३) निर्द्वंद्व
३४) निर्लोक
३५) अमोघविक्रम
३६) निर्मल
३७) पुण्य
३८) कामद
३९) कांतिद
४०) कामरूपी
४१) कामपोषी
४२) कमलाक्ष
४३) गजानन
४४) सुमुख
४५) शर्मद
४६) मूषकाधिपवाहन
४७) शुद्ध
४८) दीर्घतुण्ड
४९) श्रीपती
५०) अनंत
५१) मोहवर्जित
५२) वक्रतुण्ड
५३) शूर्पकर्ण
५४) परम
५५) योगीश
५६) योगेधाम्न
५७) उमासुत
५८) आपद्धंत्रा
५९) एकदंत
६०) महाग्रीव
६१) शरण्य
६२) सिद्धसेन
६३) सिद्धवेद
६४) करूण
६५) सिद्धेय
६६) भगवत
६७) अव्यग्र
६८) विकट
६९) कपिल
७०) कपिल
७१) उग्र
७२) भीमोदर
७३) शुभ
७४) गणाध्यक्ष
७५) गणेश
७६) गणाराध्य
७७) गणनायक
७८) ज्योति:स्वरूप
७९) भूतात्मन्
८०) धूम्रकेतू
८१) अनुकुल
८२) कुमारगुरू
८३) आनंद
८४) हेरंब
८५) वेदस्तुत
८६) नागयतज्ञोपवीतिन्
८७) दुर्धर्ष
८८) बालदूर्वांकुरप्रिय
८९) भालचंद्र
९०) विश्वधात्रा
९१) शिवपुत्र
९२) विनायक
९३) लीलासेवित
९४) पूर्ण
९५) परमसुंदर
९६) विघ्नान्तक
९७) सिंदूरवदन
९८) नित्य
९९) विभू
१००) प्रथमपूजित
१०१) दिव्यपादाब्ज
१०२) भक्तमंदर
१०३) शूरमह
१०४) रत्नसिंहासन
१०५) मणिकुंडलमंडित
१०६) भक्तकल्याण
१०७) अमेय
१०८) कल्याणगुरू
१०९) सहस्त्रशीर्ष्ण
११०) महागणपती

Thursday, September 01, 2011

गणपतीची स्तोत्रे

आज गणेशचतुर्थी आहे. या प्रसंगी श्रीगणरायाला साष्टांग प्रणिपात.
हा उत्सव सर्वांना फलदायक ठरो अशा शुभेच्छा. या दिवसानिमित्य गणेशाची दोन स्तोत्रे खाली देत आहे.

१ संकट नाशन गणेश स्तोत्र (नारद पुराण, नारद विरचित)

नारद उवाच

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं
भक्तावासं स्मरेत् नित्यं आयु: कामार्थ सिद्धये ।।१।।

प्रथमं वक्रतुण्डं च एकदंतं द्वितीयकं
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं ।।२।।

लंबोदरं पञ्चमं च षष्ठमं विकटमेव च
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णम् तथाष्टकं ।।३।।


नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकं

एकादशं गणपतिम् द्वादशं तु गजाननं ।।४।।


द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेत् नर:
न च विघ्नभयं तस्य सर्व सिद्धिकरं भवेत् ।।५।।

विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ।।६।।

जपेत् गणपति स्तोत्रं षड्भि: मासै: फ़लं लभेत्
संवत्सरेण सिद्धिम् च लभते नात्र संशय: ।।७।।


अष्टेभ्यो ब्राह्मणेभ्यश्र्च लिखित्वा य: समर्पयेत
तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादत: ।।८।।

इति श्री नारद पुराणे नारद विरचितं
“संकटनाशनं” नाम श्रीगणेश स्तोत्रं संपूर्णम्

शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु

ॐ श्री गजानन प्रसन्न 

ॐ गं गणपतये नम:
----------------------------------------------------------------------

२ श्री गणेश द्वादश नाम स्तोत्र (मुद्गल पुराण )


ॐ श्री गणेशाय नम:

शुक्लाम्बर धरं देवं शशिवर्णम् चतुर्भुजं
प्रसन्न वदनं ध्यायेत् सर्व विघ्नोपशांतये ।।१।।
अभिप्सितार्थ सिद्ध्यर्थम् पूजितो य: सुरासुरै:
सर्व विघ्नहर: तस्मै गणाधिपतये नम: ।।२।।

गणानां अधिप: चण्डो गजवक्त्र: त्रिलोचन:
प्रसन्नो भव मे नित्यं वरदात: विनायक: ।।३।।
सुमुख: एकदंतश्च कपिलो गजकर्णक:
लंबोदरश्च  विकट: विघ्ननाशो विनायक: ।।४।।
धूम्रकेतु: गणाध्यक्ष: भालचन्द्र: गजानन:

द्वादश एतानि नामानि गणाध्यक्षश्च य: पठेत् ।।५।।
विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं
इष्टकामं तु कामार्थी धर्मार्थी मोक्षं अक्षयं ।।६।।
विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा
संग्रामे संकटे चैव विघ्न: तस्य न जायते ।।७।।

इति श्री मुद्गल पुराणोक्तं श्रीगणेश द्वादश नाम स्तोत्रं संपूर्णम्

शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु