Tuesday, August 16, 2011

स्मृती ठेवुनी जाती - ३ बसप्पा दानप्पा जत्ती


१५ ऑगस्ट, भारताचा स्वातंत्र्यदिन नुकताच होऊन गेला. या वेळी लहानपणच्या काही आठवणी जाग्या झाल्या. मी जमखंडीच्या सरकारी शाळेत शिकायला जात होतो. त्या काळात त्या गावात खाजगी शाळा हा प्रकारच अस्तित्वात नव्हता. आमच्या काळात शाळेचा गणवेश नसायचा. नेहमीचे साधे कपडे घालूनच मुले शाळेला जात असत. १५ ऑगस्टला सकाळी शाळेत ध्वजारोहण होत असे आणि त्यानंतर प्रभातफेरी. त्या दिवशी जरा बरे दिसणारे कपडे (इस्त्री वगैरे काही न केलेले) अंगावर चढवून आम्ही हौसेने त्यात भाग घेत असू. अर्धा पाऊण तास गावातल्या एक दोन मोठ्या रस्त्याने रांगेतून मिरवत आणि जोरजोरात घोषणा देत आम्ही कचेरीच्या आवारात जाऊन पोचत असू. गावात तीन चार सरकारी शाळा होत्या. त्यातली सगळी मुले त्या आवारात जमा होत असत आणि तिथल्या मोठमोठ्या वडाच्या झाडांच्या सावलीत बसून रहात.

गावातल्या पोलिसांची परेड झाल्यानंतर सार्वजनिक झेंडावंदन होत असे. त्याला एकादा स्थानिक पुढारी उपस्थित असायचा. त्या ठिकाणी असलेला एकंदर गोंगाट आणि ध्वनिक्षेपकातली खरखर आणि घूँघूँच्या आवाजातून आम्हाला त्याचे भाषण कधी ऐकूही नीट गेले नाही आणि जेवढे कानावर पडले त्यातले काही समजले नाही. त्याचे हातवारे आणि आविर्भाव तेवढे दिसत असत. इतरांपेक्षा वेगळी अशी एकच व्यक्ती मात्र थोडी लक्षात राहिली आहे. त्यांचे नाव बसप्पा दानप्पा जत्ती.

ज्या काळात जगभरात लोकशाहीचे वारे वहायला लागले होते त्या काळात जमखंडी संस्थानातसुध्दा स्थानिक प्रजातंत्राची सुरुवात झाली होती. बसप्पा जत्ती हे नुकतेच एलएलबी करून गावातील कोर्टात वकीली करत होते. ते त्या स्थानिक राजकारणात उतरले आणि नगरपालिकेचे सभासद, नगराध्यक्ष वगैरे पाय-या झपाझप चढत गेले. भारताला स्वातंत्र्य मिळाय़च्या काळापावेतो ते जमखंडी संस्थानाचे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान असे जे कोणते पद असेल तिथपर्यंत पोचले होते. त्या काळात शासनाचे सर्व अधिकार संस्थानिकाकडेच असले तरी प्रजा आणि राजा यांच्यामधील दुवा हे त्या मंत्र्याचे मुख्य काम असावे. मला समजायला लागले त्या काळापर्यंत संस्थाने विलीन होऊन गेली होती आणि पक्षीय राजकारण सुरू झाले होते. बसप्पा जत्ती तेथील सर्वोच्च नेतेपदी पोचलेले होते आणि मी शाळा संपून गाव सोडेपर्यंत त्या पदावर तेच विराजमान होते. पहिल्या सार्वत्रिक निवडणूकांमध्ये ते जमखंडीहून आमदार म्हणून निवडून आले आणि मी शाळेत असतांना झालेल्या प्रत्येक निवडणुकीत तेच जिंकत राहिले. जमखंडी संस्थानाचे मुंबई राज्यात विलीनीकरण झाल्यानंतर स्थानिक नेतृत्व टिकवून ठेवले असतांनाच जत्ती राज्यपातळीवरही जाऊन पोचले होते.

असे असले तरी त्यांचे व्यक्तीमत्व आणि वागणे कमालीच्या साधेपणाचे दिसायचे. १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीचे झेंडावंदन असो किंवा गावातला कोणताही मोठा राजकीय सोहळा असो, अनेक प्रसंगी ते मुख्य पाहुणे किंवा स्वागताध्यक्ष या नात्याने मंचावर असायचे. ते त्यांचे विचार आणि मुद्दे अत्यंत सौम्य शब्दात मांडायचे. त्यांच्या भाषणात राणा भीमदेवी आकांडतांडव कधी दिसले नाही. त्यांची लहानशी मूर्ती, संयमी स्वभाव, वागण्या बोलण्यातला साधेपणा पाहता इतरांवर त्यांची छाप कशी पडत होती याचे मला आजही नवल वाटते. जत्तींनी केलेल्या प्रयत्नामुळे एकदा पंडित नेहरूंनी जमखंडीसारख्या लहान गावाला धावती भेट दिली होती. त्या काळात आजसारखी अतिरेक्यांची भीती नसली तरी गर्दी आवरण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. माझ्या आठवणीत सर्व गावाला इतक्या मोठ्या प्रमाणात भारून टाकणारा दुसरा कोणताही प्रसंग घडला नाही. गावाबाहेरील मैदानावर तुफान गर्दी झालेल्या जाहीर सभेला जायची परवानगी आम्हा लहान मुलांना मिळाली नाही, पण त्यानंतर हे दोन्ही नेते उघड्या मोटारीत बसून आमच्या घराजवळील रस्त्यावरून गेले तेंव्हा आम्हाला बाल्कनीत उभे राहून त्यांचे दर्शन घेता आले. टीव्हीवर रोजचराजकारणी लोकांचे नको तेवढे दर्शन घडत असल्यामुळे् आज त्या गोष्टीला काहीच महत्व वाटणार नाही. पण पन्नास वर्षांपूर्वी ते एक अप्रूप वाटायचे आणि ती जन्मभर लक्षात रहाण्यासारखी मोठी गोष्ट होती
मुंबई राज्याच्या मंत्रीमंडळात ते उपमंत्री झाले होते. भाषावार राज्यपुनर्रचना झाल्यानंतर आमचा भाग मैसूर राज्यात समाविष्ट झाला. (पुढे त्याचे कर्नाटक असे नामांतरण झाले) त्यामुळे जत्ती बंगलोरला गेले आणि तेथील मंत्रीमंडळात त्यांना जागा मिळाली. त्या काळात मूळच्या मैसूर संस्थानातले हनुमंतय्या आणि मुंबई, हैद्राबाद, मद्रास वगैरे राज्यामधील कन्नडभाषिकांच्या बाहेरून जोडल्या गेलेल्या भागातले निजलिंगप्पा असे काँग्रेसमध्ये दोन गट होते. त्या दोघात सारखी सुंदोपसुंदी चालत असे. या राजकारणातून मार्ग काढण्यासाठी हाय कमांडने सर्वांशी मित्रत्वाने वागणा-या मवाळ स्वभावाच्या जत्तींची निवड केली आणि त्यांना मुख्यमंत्रीपद प्रदान केले आणि चार वर्षे ते त्या पदावर राहिले. पुढे सक्रिय राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर ते ओरिसाचे राज्यपाल आणि त्यानंतर भारताचे उपराष्ट्रपती झाले. फकरुद्दीन अली अहमद यांच्या आकस्मिक निधनानंतर काही काळासाठी जत्तींनी कार्यवाही राष्ट्रपतीचे पदसुध्दा भूषवले होते आणि त्या काळात त्यांना महत्वाचे निर्णय घ्यावे लागले होते.
मी लहान असतांना एकदा तिथल्या दरबार हॉलमध्ये त्यांचा भव्य नागरी सत्कार झाला होता. बहुधा त्या काळात त्यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली असावी. त्यांनी मोटारीतून उतरण्याच्या जागेपासून हॉलच्या प्रवेसद्वारापर्यंत जाण्याच्या मार्गाच्या दोन्ही बाजूंना स्काऊट्सनी जवळ जवळ उभे राहून आणि हात उंच करून एकमेकांना हातातल्या काठ्या जोडून कमानीसारखा मांडव केला होता. त्यातला एक मीसुध्दा होतो. आमच्यातील प्रत्येकाकडे पाहून हंसून आमचे कौतुक करत ते त्याखालून पुढे गेले. त्यावेळी एक सेकंदच मी त्यांना अगदी वीतभर अंतरावरून पाहिले आणि जवळून त्यांच्याशी नजरानजर झाली. पण तो क्षण मात्र कायमचा आठवणीत रुतून राहिला.

राजकारणात होत असलेल्या उलथापालथीत काही काळासाठी जत्तींचे मंत्रीपद गेले होते. त्या काळात ते जमखंडीला येऊन राहिले होते आणि माझ्याच वयाचा त्यांचा मुलगा तेथील सरकारी शाळेत आमच्याबरोबर शिकत होता. बहुधा त्यांनी मुंबई किंवा बंगलोरला बंगले बांधून ठेवले नसावेत. माझे आजोबा सावळगीला रहात होते. माझे वडील, काका, आत्या वगैरे सर्व भावंडांचे बालपण सावळगीतच गेले होते. जमखंडीजवळच असलेले हे एक लहानसे खेडेगांव होते. जत्तींचा जन्म आणि बालपण सावळगीतच गेले होते आणि ते साधारणपणे समवयस्क असल्यामुळे घरातील सर्व वडीलमंडळींनी त्यांना लहानपणापासून पाहिलेले होते. त्या काळातील समाजात जात, पंथ, भाषा वगैरेनुसार तट पडलेले होते आणि त्यांच्यात नेहमीच तेढ निर्माण झालेली असे. जत्तींच्या आणि आमच्या कुटुंबात त्यामुळे वितुष्ट आलेले नसले तरी सख्यही नव्हते. एरवी एकमेकांच्या घरी जाणे येणे नव्हतेच. पण ते एवढ्या मोठमोठ्या पदावर विराजमान असतांना आमच्या घरातले कोणीच कधीही त्यांना जुनी ओळख सांगत भेटायला गेले नाही.

सावळगीच्या आमच्या आजोबांच्या घरी कोणीही रहात नसले तरी त्याघराची डागडुजी वगैरे करण्यासाठी कोणी ना कोणी दरवर्षी तिकडे एक चक्कर मारून येत असे. नववी दहावीत असतांना मीसुध्दा जात असे. त्या खेड्यात तोपर्यंत वीज आणि पाण्याच्या नळाची व्यवस्थासुध्दा झालेली नव्हती. रिकामा वेळ घालवण्यासाठी करमणुकीचे साधनच नव्हते. आजोबांच्या घराजवळच बसप्पांच्या भावाचे, इरप्पांचे किराणा मालाचे दुकान होते. थोडा वेळ तिथेच जाऊन मी त्यांच्याशी गप्पा मारत बसत असे. सावळगीच्या मानाने जमखंडी पुढारलेले गाव होते आणि पुण्यामुंबईचे पाहुणे आमच्या घरी नेहमी येत असल्यामुळे मला तिकडली माहिती समजत असे. त्यामुळे इराप्पा माझ्यासारख्या मुलाला एकाद्या पूर्वीच्या काळातल्या फॉरेन रिटर्न्ड माणसासारखे वागवायचे, त्यांच्याबरोबर बोलत असतांना बसप्पांचा उल्लेख यायचाच. त्यातून त्यांच्याविषयी वाटणारा आदरभाव वाढत गेला.

बसप्पांना चांगले दीर्घायुष्य लाभले होते. पण एकदा राष्ट्रपतीपदापर्यंत पोचल्यानंतर कोणतेही लहान पद पत्करता येत नाही. त्यामुळे पुढील वीस पंचवीस वर्षे त्यांनी कशी घालवली याबद्दल कधीच छापून आले नाही. २००२ साली त्यांचे देहावसान झाल्याचे वृत्त आले. त्यांची माहिती देणारे लेख आले. त्यानंतर त्यांचे नाव जवळ जवळ अंधारात लुप्त झाले. माझ्यासारख्याच्या मनातली अशीच एकादी जुनी आठवण जागी झाली तर तेवढ्यापुरते त्यांचे नाव समोर येत असेल. कर्नाटकात त्यांच्या नावाने काढलेल्या काही संस्था आहेत. त्यांच्यामुळे संबंधित लोकांच्या कानावर ते नाव येत आहे आणि राहील.

No comments: