लहानपणी श्रावणाचा महिना म्हणजे निव्वळ खादाडी, खेळ, उत्सव आणि मजाच मजा वाटत असे. निसर्गसुध्दा या काळात किती रम्य असतो ते बालकवींनी दाखवले आहेच. श्रावण महिन्याला दुसरी एक बाजू असते आणि ती अनेक लोकांना जाचक वाटू शकते असे मात्र तेंव्हा कधी वाटलेच नव्हते. आषाढातल्या पावसाच्या एक दोन झडीत सापडून सचैल स्नान घडले, डोक्यावरचे केस भिजल्याने ओले कच्च राहिले आणि त्यानंतर सर्दी खोकला झाला किंवा तो होईल असे आईला वाटले तर लगेच केशकर्तनालयात नेऊन अगदी बारीक हजामत केली जायची आणि पुढे महिना दीड महिना केसांना वाढू दिले जायचे. त्यामुळे श्रावण महिन्यात कटिंग केली नाही तरी ती गोष्ट लक्षात येत नसावी. त्या काळात दाढीमिशांचा प्रश्नच नव्हता. महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरात आल्यानंतर पंचांगाशी संबंध तुटला होता, श्रावणाचे आगमन झालेलेही समजले नव्हते. नेहमी आपला चेहेरा रोज चांगला घोटून तुळतुळीत ठेवणारे काही लोक ऑगस्ट महिन्याच्या सुमाराला मात्र दाढीचे खुंट वाढवू लागल्याचे मला जाणवले आणि त्याचे थोडे नवल वाटले. मी नेहमीसारखा हेअर कटिंग सलूनमध्ये (त्या काळात त्यांना जेंट्स पार्लर वगैरे नावे नव्हती) गेलो तर तिथे नेहमीसारखी गर्दी नव्हती. मोठ्या अदबीने मला मऊ खुर्चीवर बसवून केशकर्तनकाराने श्रावण महिन्याचे पुराण सुरू केल्यामुळे मला त्याचा उलगडा झाला. निष्कारण त्याच्या पोटावर पाय आणणारा हा असला कसला पायंडा? या त्याच्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हते. श्रावण महिन्याचा आणि दाढी किंवा हजामत न करण्याचा परस्पराशी काय संबंध असू शकतो हे मला आजपर्यंत समजलेले नाही.
आमच्या बाळबोध घरात अभक्ष्यभक्षण आणि अपेयपानच नव्हे तर त्यांचा बोलण्यात उल्लेख करणेसुध्दा वर्ज्य होते. दारू, मांस, अंडे अशा शब्दांच्या उच्चारानेसुध्दा आपली जीभ विटाळायची नाही, अगदीच आवश्यक झाले तर त्या गोष्टी खुणांनी दाखवायच्या असा संकेत होता. ज्या गोष्टी मुळातच कधीच खाल्ल्या प्यायल्या जात नव्हत्या त्या श्रावणमहिन्यात खायच्या प्यायच्या नाहीत असा नियम तरी कुठून असणार ? त्याबद्दल मी अनभिज्ञच होतो. घर सोडून बाहेरच्या जगात रहायला लागल्यानंतर माझे जग बदलले. त्याबरोबर 'तीर्थ' आणि 'प्रसाद' या शब्दांना नवा अर्थ प्राप्त झाला. आपण 'तीर्थप्राशन' केले असल्याच्या बढाया मारणारी काही मुले हॉस्टेलमध्ये असली तरी प्रत्यक्ष 'पिणारी' कोणी त्या काळात नव्हती. पण नॉनव्हेजचा समावेश मेसच्या नेहमीच्या खाण्यातच होता. दर रविवारी मिळणा-या फीस्टमध्ये कोंबडीच्या लुसलुशीत तंगडीऐवजी पचपचीत रसगुल्ला खाणारे अगदीच बावळट समजले जायचे. शिवाय पुढे फॉरीनला गेलो तर तिथे दूधभात आणि भेंडीची भाजी मिळणार नव्हती, तिकडच्या लोकांसारखा आहारच घ्यावा लागणार होता आणि तो जास्त पौष्टिक समजला जात असे. असा दूरदर्शी विचार केला आणि थोड्याच दिवसात मी सामिष भोजनावर ताव मारू लागलो. पण श्रावण महिना सुरू झाला आणि आमची टिंगल करणारी काही मुले एकदम शुध्द शाकाहारी बनली. आता त्यांना खिजवायचा चान्स मला मिळाला, कारण माझ्यासाठी श्रावण महिन्यात अमूक तमूक पदार्थ खायचे नाहीत असा वेगळा नियम नव्हताच. अभक्ष्यभक्षण न करण्याचा सर्वसाधारण नियम एकदा तोडल्यानंतर मग श्रावण महिना आहे की भाद्रपद आहे याने काय फरक पडतोय्?
नोकरीला लागल्यानंतर कधी कधी तीर्थप्राशन करण्याचे प्रसंग येऊ लागले. मला त्याची चंव फारशी आवडली नाही आणि परिणामाचेही विशेष आकर्षण कधी वाटले नाही. हिंदी सिनेमातले हीरो 'गम भुलानेके लिये' पीत असतात. माझ्या सुदैवाने तसली दुःखे माझ्या वाट्याला आली नाहीत. त्यामुळे मी कधीही पिण्याच्या नादी लागलो नाही. पण एकाद्या पार्टीच्या निमित्याने भरलेला पेला समोर आला तर मग त्यावेळी एकच प्यालामधला सुधाकर आणि तुझे आहे तुजपाशीमधला काकाजी या दोघांचे मनातल्या मनात द्वंद्व चालायचे आणि कधी या बाजूची तर कधी त्या बाजूची सरशी व्हायची. त्यातही श्रावण महिना आल्याने फरक पडत नसे कारण त्याची आठवणच येत नसे आणि श्रावण महिन्यासाठी खास नियम माझ्याकडे नव्हते. ज्या मित्रांना चटक लागली होती आणि श्रावण महिनाभर मद्याला स्पर्शही करायचा नव्हता, त्यांची मात्र पंचाईत होतांना दिसायची.
अशा एका रसखान विडंबनकाराने बालकवींचे शब्द थोडेसे बदलून लिहिले आहे,
श्रावणमासी, विरस मानसी, हळहळ दाटे चोहिकडे ।
क्षणात येते मनात पाप, क्षणात पश्चाताप घडे ।। खरे तर खाण्यापिण्यामध्ये कसले पाप आले आहे? पण तशी समजूत असेल तर वाटायला लागते. या मनस्थितीचे वर्णन करतांना त्याला वाटते,
पुरण नकोसे, वरण नकोसे, उतरेना कंठी बासमती ।
मटणाच्या त्या रश्श्यावाचून कुंठित होई येथ मती ।।बिच्चारा ! ! !
No comments:
Post a Comment