Sunday, August 07, 2011

श्रावणमास

श्रावणमासातला पहिला आठवडा संपायला आला आहे, तरी मला त्या महिन्याच्या सुरू होण्याने काही फरकच पडला नाही. हे किती विचित्र वायतंय् ? माझ्या लहानपणी असे होणे शक्यच नव्हते. श्रावणमहिना म्हणजे निरनिराळ्या प्रकारच्या वेगळेपणाने अगदी गच्च भरलेला असायचा. पहिल्याच दिवशी जिवतीचा पट लावून रोज तिची पूजा सुरू होत असल्यामुळे श्रावण महिन्याचे आगमन झाल्याचे सर्वांना समजत असे. रोजचा वार आणि तिथीनुसार त्या दिवशीच्या कहाण्या वाचायच्या. महिनाअखेरपर्यंत त्या तोंडपाठ होऊन जात असत. काही कहाण्यांमध्ये मजेदार आणि उद्बोधक गोष्टी असायच्या. शुक्रवारच्या कहाणीवर महादेवशास्त्री जोशी यांनी एक सुंदर कथा लिहिली होती आणि त्यावर मराठी चित्रपटसुध्दा निघाला होता. बहुतेक वारी काही वेगळा मेनू असायचा.

सोमवारी घरातली काही वडीलधारी माणसे उपास करत असत आणि बाकी सर्वांसाठी धान्यफराळ बनत असे. गेल्या पन्नास वर्षात 'धान्यफराळ' हा शब्दच कधी माझ्या कानावर पडला नाही. त्यामुळे त्याचे नियम मला आता सांगता येणार नाहीत. पण उपास म्हणजे साबूदाण्याची खिचडी, रताळी, खजूर वगैरे पदार्थ असत त्याऐवजी या धान्यफराळात वेगळे पदार्थ असत. बहुधा पाण्याऐवजी दुधात कणीक भिजवून त्याच्या दशम्या, चुर्मा असे काही तरी असे. दर सोमवारी आमच्या जमखंडी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रामतीर्थाची जत्रा असे आणि सगळी मुले टोळकी करून त्याला जाऊन मौजमजा करत असू. आमच्या घरात किंवा नात्यात कोणाकडेही एकादी तरी नवी सून किंवा माहेरपणाला आलेली मुलगी असायची आणि तिची मंगळागौर थाटाने केली जात असे. त्यात मुलांना धुडगूस घालायला वाव नसला तरी गोड धोड खायला तरी मिळायचे आणि दुरून थोडी गंमत पहायला, एकायला मिळत असे. शुक्रवारी पुरणाच्या दिव्याने जिवतीची आरती केली जायची आणि त्यानंतर घरातल्या सगळ्या बाळगोपाळांचे औक्षण व्हायचे. शनिवारी जेवणात ज्वारीच्या कण्या आणि बाजरीची भाकरी असायची. या दोन्ही गोष्टी माझ्या आवडीच्या नसल्या तरी त्यांच्या जोडीला चमचमीत कालवण असल्याने त्यांच्या आधाराने त्या घशाखाली उतरवल्या जायच्या.

तिथीनुसारसुध्दा श्रावण महिन्यात अनेक सणवार येत असत.  नागचवत आणि नागपंचमीच्या दिवशी नागोबांना घेऊन गारुडी लोक दारोदारी फिरत असत. गोल आणि चपट्या आकाराच्या खास बास्केट्स आणि त्यातले नागाचे वेटोळे यांचे नाते सर्वांच्या मनात इतके पक्के बसलेले असे की त्या बास्केटचा उपयोग दुसरी कोणतीही वस्तू ठेवण्यासाठी करायचा विचारही कोणी करत नसेल. तिकडच्या ग्रामीण भागात साप हा एक स्थानिक जैवसृष्टीचा अविभाज्य घटक असल्यामुळे त्याला पाहण्यात तसे नाविन्य नसले तरी नागपंचमीची गोष्ट वेगळी असायची. एरवी सापांना बहुधा माणसांची भीती वाटत असल्यामुळे ते बिळात किंवा झुडुपात लपून बसलेले असायचे आणि बाहेर आले तरी चाहूल लागताच संरक्षणासाठी पळतांना दिसत असत. सापाकडे पाहून भीती वाटण्यासारखे त्याचे रूप अक्राळ विक्राळ नसते, पण त्याच्याबद्दल भीतीदायक गोष्टी ऐकलेल्या असल्यामुळे माणसेही त्यांना घाबरतच असत. साप पाहून एक तर ती धूम पळ काढीत किंवा त्याला ठेचून मारून टाकीत असत. फणा उभारलेल्या नागाच्या डोळ्यांना डोळे भिडवून त्याच्यासमोर बसून किंवा उभे राहण्याचे धारिष्ट्य कोणी दाखवत नसावे, माझ्या बाबतीत तर ते अशक्य होते. त्याच्याकडे टक लावून त्याचे सौंदर्य निरखून बघायची संधी फक्त नागपंचमीला मिळत असे.


कर्नाटकात नागपंचमीला तंबिट्टाचे लाडू केले जात तर नारळी पोर्णिमेला नारळीभाताचा बेत असे. रक्षाबंधन केले जात असे, पण त्याचा मोठा सोहळा नसायचा. भाऊबीजेला जेवढे महत्व होते तेवढे या कार्यक्रमाला नसायचे. पाऊस पाणी, नद्यांचे पूर वगैरेमुळे या दिवसात प्रवास करणे थोडे अनिश्चित असल्यामुळे परगावाहून कोणी राखीसाठी येत नसे. श्रावण महिन्यात श्रावणी नावाचा एक धार्मिक विधी असायचा. तो मात्र अनिवार्य असे. गोकुळाष्टमीला रात्रीचे बारा वाजेपर्यंत जागून कृष्णजन्म साजरा करत असू. तोपर्यंत भजन, कीर्तन, गाणी वगैरे चालत असे. बहुतेक लोक श्रावणातल्या एकादे दिवशी घरी सत्यनारायणाची पूजा करत असत आणि सर्व आप्तेष्टांना दर्शनासाठी बोलावू प्रसाद देत असत. त्या निमित्याने साजुक तुपातला शिरा वरचेवर खायला मिळत असे. एकंदरीत पाहता श्रावण महिन्याते आगळेपण जन्मभर लक्षात राहण्यासारखे असायचे.

बालकवी ठोंबरे यांनी लिहिलेली श्रावणमासी हर्ष मानसी ही कविता माझ्या लहानपणी शाळेच्या पाठ्यपुस्तकात कोणत्या ना कोणत्या इयत्तेला असायचीच. तेंव्हा ती पाठ झालेली होतीच. आता आंतर्जालावर सगळ्या गोष्टी शोधणे सोपे झाले आहे. ती खाली दिली आहे.

श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे ।
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे ।।

वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे ।
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे ।।

झालासा सूर्यास्त वाटतो, सांज -अहाहा तो उघडे ।
तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे ।।

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा ।
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा ।।

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते ।
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते ।।

फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती ।
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती ।।

खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे ।
मंजूळ पावा गाई तयांचा श्रावण महिमा एकसुरे ।।

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला ।
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला ।।

सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती ।
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती ।।

देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात ।
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत ।।No comments: