Wednesday, August 31, 2011

स्यमंतक मण्याची कहाणी

कहाणी भाद्रपद चतुर्थीच्या चन्द्र दर्शन दोष निवारणाची
ऐका परमेश्वरांनो, गणेश, चन्द्र व श्रीकृष्णांनो तुमची कहाणी.

चन्द्र हा प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचाच अवतार आहे, पण तो चन्द्रवंशी क्षत्रिय कुलाचा मूळ पुरुष मानला जातो. चन्द्रवंशी घराण्याचा सर्वांत उज्वल तारा म्हणजे भगवान श्रीकृष्ण. तेंव्हा श्रीकृष्णाकडून भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी चन्द्राच्या दर्शनाचे अजूनही राहून गेलेले लांछन मिटवण्यावर एक उपाय निर्मिला गेला हेहि सर्वथा योग्यच झाले. हा उपाय काय म्हणजे 'स्यमंतक मण्याचे आख्यान श्रवण' करणे व त्यासंबंधित एका संस्कृत श्लोकाचे (सिंह: प्रसेनं अवधीत् सिंहो जांबवताहत: सुकुमारक मा रोदी तव हि एष स्यमंतक: ) पठण करणे. या कथेत भगवान श्रीकृष्णाच्या दोन प्रमुख बायकांशी (जांबवंती व सत्यभामा) त्याच्या विवाहांची नोंद पण गुंतलेली आहे. ती कथा अशी आहे.



'द्वापर' युगांती "उग्रसेन" राजाला सिंहासनाधिष्ठित करून भगवान श्रीकृष्ण व बलराम यांची जोडी द्वारकेला राज्यकारभार सांभाळीत होते. द्वारकेतील एक यादव श्रेष्ठ 'सत्राजित्' याने घोर तपश्र्चर्या करून सूर्याला प्रसन्न करून घेतले. वरदान म्हणून सूर्याकडून 'स्यमंतक' मणी मिळवला. हा मणि सूर्या सारखाच तेज:पुंज होता व रोज १२ भार सोने ओकीत असे. तसेच त्याला धारण करताना अत्यंत स्वच्छतेची, शुद्धतेची, पावित्र्याची काळजी घ्यावी लागे, अन्यथा अपवित्रपणे धारण करणारा घोर प्राण संकटात पडत असे.

स्यमन्तक मणी धारण करण्या मागच्या सर्व धोक्यांचा विचार करून श्रीकृष्णाने सत्राजिताला असा सल्ला दिला की हा मणी राजा उग्रसेनाकडेच योग्य प्रकारे सुरक्षितपणे सांभाळला जाईल. इतरांना ते फ़ारच कठीण काम आहे व संकटांना आमंत्रित करण्या सारखे आहे. पण कृष्णाचा हा मैत्रीचा व सद्भावनेने दिलेला सल्ला सत्राजिताला कांही आवडला नाही. मणी उग्रसेनाला दिला म्हणजे तो अप्रत्यक्षपणे कृष्णालाच वापरायला दिल्यागत होईल व त्या मण्याच्या लोभानेच त्याने हा सल्ला आपल्याला दिला असणार असे त्याच्या मनाने घेतले व त्याने तो मणी उग्रसेनाला देण्याचे साफ़ नाकारले.
पुढे काय झाले की एकदा सत्राजिताचा भाऊ प्रसेन भगवान श्रीकृष्णा बरोबर अरण्यांत शिकारीला गेला. अरण्यांत घुसल्यावर दोघे आपाआपल्या कोणत्या तरी पशूचा पाठलाग करता करता एकमेका पासून दूर गेले. त्या दिवशी अपवित्रपणे प्रसेनाने स्यमंतक मणी गळ्यांत घातला होता. त्याचा परिणाम असा झाला कि त्याने सिंहाला मारण्याच्या ऐवजी तोच सिंहाकडून मारला गेला. नंतर त्या झटपटीत तो मणी सिंहाच्या गळ्यांत पडला व तो सिंह जांबवंताच्या दृष्टीस पडला. तेंव्हा जांबवंताने त्या सिंहाला ठार मारून तो मणी मिळवला व आपल्या गुहेत नेऊन आपल्या लहान मुलाच्या पाळण्यावर बांधला. त्यानंतर तो मुलगा रडू लागला की त्या मुलाची बहीण 'जांबवंती' हा मणी पहा. रडू नको. म्हणून त्याचे सांत्वन करीत असे.
इकडे काय झाले कि भगवान श्रीकृष्ण त्यांच्या पारधीचे काम आटोपून एकटेच द्वारकेला परतले. प्रसेन परत आला नाही व श्रीकृष्ण मात्र परत आला हे पाहून सत्राजिताला श्रीकृष्णाचा सल्ला आठवला. प्रसेनाजवळ मणी होता तेंव्हा, श्रीकृष्णानेच त्याला एकटा पाहून त्याचा खून करून मणी पळवला असणार असे त्याच्या मनाने घेतले आणि नीट विचारपूस व विचारही न करताच त्याने "श्रीकृष्णाने असे केलेच" म्हणून अपप्रचार करण्यास सुरुवांत केली. श्रीकृष्ण हा लहानपणापासूनच नटखट-कारस्थानी म्हणून सुप्रसिद्धच होता त्यामुळे लगेचच लोकांचा या खोट्या आळावर विश्वास बसला.

श्रीकृष्णाने ते ऐकल्यावर बरोबर अनेक पोक्त साक्षीदार माणसे घेऊन तो अरण्यांत प्रसेनाच्या शोधांस गेला. तेथे त्याने सर्वांना प्रसेनाचे प्रेत व त्याला सिंहाने मारले असल्याच्या खाणाखुणा दाखवल्या. नंतर ते सर्व त्या सिंहाच्या पावलांचा मागोवा घेत पुढे गेले तेंव्हा त्यांना तो सिंहही मेलेला आढळला. त्या सिंहाची अस्वलाशी झटापट होऊन त्यांत तो मेल्याच्या खुणाहि पाहून मंडळी त्या अस्वलाच्या पाउलांचा मागोसा घेत घेत जांबवंताच्या गुहेपाशी आली.
सिंहालाही मारू शकणारे अस्वल वास करते त्या गुहेत घुसण्याचे धाडस कृष्णाने "साक्षीदारकी" करण्याच्या उद्देशाने बरोबर आणलेल्या कोणलाही होईना. शेवटी त्या सर्वांना "तुम्ही इथेच माझी वाट पहा" असे सांगून त्यांना गुहेच्या दारातच ठेवून कृष्ण एकटांच गुहेत घुसला. खूप आंत गेल्यावर त्याला तो स्यमंतक मणी एका लहान मुलाच्या पाळण्यांवर शोभेकरिता व मुलाचे लक्ष वेधण्यासाठी बांधून ठेवलेला दिसला. त्या मुलाची मोठ्ठी बहीण त्याला अंगाई गीत गाऊन झोपवण्याचा प्रयत्न करीत होती. ते गीत होते "सिंह: प्रसेनं अवधीत् सिंहो जांबवताहत:
सुकुमारक मा रोदी तव हि एष स्यमंतक:” (हे एक श्लोकी गीतच चन्द्र दर्शनाचा दोष शमवण्याचा "मंत्र" झाला आहे.)

कृष्णाला अचानक गुहेत आलेला पाहून जांबवंतीला आश्चर्य वाटले व आनंदही झाला. तिने स्यमंतक मणी कृष्णाला देऊ केला व निजलेला जांबुवंत उठण्यापूर्वीच निघून जाण्यास सुचवले. तेंव्हा कृष्णाने शंख फ़ुंकून जाम्बवन्ताला जागे केले. मग जांबुवंताचे व कृष्णाचे जवळ जवळ महिनाभर घोर युद्ध झाले. शेवटी जांबुवंत थकला व आपल्याला हरवणारा दुसरा कोणी असणे शक्य नाही, हा प्रत्यक्ष श्रीरामच पूर्वी दिलेल्या वचनानुसार श्रीकृष्ण अवतारात आपल्याला भेटायला आलेला आहे हे त्याने ओळखले व त्याला नमस्कार करून त्याची स्तुती केली. श्रीकृष्णानेहि प्रसन्न होऊन त्याला "श्रीराम" दर्शन घडवले. नंतर जांबुवंताने आपल्या कन्येचे जांबवंतीचे कन्यादान त्याला करून 'स्यमंतक' मणी "वर दक्षिणा" म्हणून प्रदान केला. मग श्रीकृष्ण जांबवंतीला बरोबर घेऊन गुहे बाहेर आला.

इकडे गुहेबाहेरील माणसांनी जवळ जवळ तीन आठवडे श्रीकृष्णाची वाट बघितली. नंतर श्रीकृष्ण गुहेत अस्वलाकडून मारला गेला असणर म्हणून समजून ती मंडळी द्वारकेला परतली आणि त्यांनी श्रीकृष्णाच्या मृत्यूचे वृत्त सर्वांना सांगितले. सर्वाना फ़ार शोक झाला व त्यांनी श्रीकृष्णाचे श्राद्धादिक क्रियाकर्मही केले.

गुहे बाहेर कोणीच नाही हे पाहून श्रीकृष्णाला आश्चर्य वाटले पण ते लोक द्वारकेला परत गेले असणार हे ओळखून तो जांबुवंतीसह द्वारकेला आला. त्याला अशा प्रकारे परत आलेला पाहून सर्वांना आनंद झाला. पण सत्राजिताला आपल्या आततायी मूर्खपणाने आपण श्रीकृष्णावर घातलेल्या चोरीच्या खोट्या आळाचा पश्चात्ताप झाला. श्रीकृष्णाने सत्राजिताला दरबारांत बोलवून सर्वांच्या समक्ष तो स्यमंतक मणी त्याच्या हवाली केला तेंव्हा तर सत्राजिताला फ़ारच ओशाळे झाले. केलेल्या चुकीच्या प्रायश्चित्तासाठी त्याने आपली कन्या 'सत्यभामा' हिचे कन्यादान श्रीकृष्णाला केले व स्यमंतक मणीही देऊ केला. पण श्रीकृष्णाने सत्यभामेशी लग्न केले पण मणी घेण्याचे साफ़ नाकारले.
मण्याचे अपशकुनी अस्तित्व खरोखरच आपल्याला फ़ारच धोकादायक आहे हे सत्राजिताच्या लक्षांत आले व त्याने तो मणी गुप्तपणे अक्रूलाला दिला. अक्रूर तो मणी घेऊन गुपचुपपणे काशीस जाऊन राहिला व त्या मण्यांतून निघणारे सोने वापरून अनेक यज्ञ याग करीत लोकोपयोगी परोपकारी व धार्मिक कृत्ये करण्यांत आयुष्य घालवू लागला.
एकदा श्रीकृष्ण व बलराम पांडवांना भेटायला हस्तिनापुराला गेल्यावेळी वेळ साधून शतधन्व्याने सत्राजिताचा खून केला आणि स्यमंतक मणी त्याचे जवळ – घरी दारी शोधला पण तो त्याला मिळाला नाही. तेंव्हा तो श्रीकृष्णाच्या भीतीने द्वारका सोडून पळून जाऊ लागला. श्रीकृष्णाला सत्यभामेकडून शतधन्व्याने केलेल्या सत्राजिताच्या वधाची बातमी कळल्यावर श्रीकृष्ण व बलराम लगेचच द्वारकेला परतले व त्यांनी शतधन्व्याचा पाठलाग करून त्याला लाथा बुक्क्यांच्या प्रहारांनीच ठार मारले. त्यांनाही मणी अक्रूराकडे काशीत आहे हे माहीत नव्हते. शतधन्व्याकडे मणी नाही हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले व बलरामालाही या सगळ्या प्रकरणांत श्रीकृष्णाचाच कांहीतरी हांत असावा अशी शंका आली व तो श्रीकृष्णाची भर्त्सना करून विदर्भाला निघून गेला.

स्यमंतक मण्याच्या चोरीचे भूत पुन:पन: आपल्यावर सवार होते हे पाहून श्रीकृष्णाला फ़ार दु:ख झाले व तो अशा दु:खाने म्लानवदन होऊन बसला असताना नारद मुनींनी त्याला पाहिले. त्याच्या चिन्तेचे कारण समजून घेतल्यावर त्यांच्या लक्षांत आले की हे सर्व भाद्रपद शुक्ल चतुर्थीला चन्द्रदर्शनाचा दोष लागल्यानेच घडत असणारं. त्यांनी यावर उपाय म्हणून गणेशाची व्रते उपवास जप तप होम हवन इत्यादिक मार्गाने गजाननाला प्रसन्न करून घेण्याचा मार्ग सुचवला. त्याप्रमाणे श्रीकृष्णाने व्रतादिक तपश्र्चर्या करून गणेशाला प्रसन्न करून घेतले. गणेशाने त्याला हे स्यमंतक मण्याचे आख्यान जे श्रवण करतील व "सिंह: प्रसेनं अवधीत् सिंहो जांबवताहत: सुकुमारक मा रोदी तव हि एष स्यमंतक:” हा मंत्र जे म्हणतील त्यांना यापुढे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला चन्द्रदर्शनाचा दोष लागणार नाही असा वर दिला.

श्रीगणेश कृपेने स्यमंतक मण्याच्या काशीतील अस्तित्वाची खबरही श्रीकृष्णाला कळली व त्याने बलरामासही ही सर्व वास्तविकता पटवून दिल्यावर तो द्वारकेला परतला व दोघे सलगीने सुखासमाधानाने राहू लागले.

अशा प्रकारे श्रीकृष्णाला ज्याप्रमाणे गणेश प्रसन्न झाला तसाच तुम्हां आम्हांवरही होवो.

ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफ़ल संपूर्ण.

-----------------------------------------------------------------------------------

ही कहाणी माझे बंधू डॉ.धनंजय घारे यांनी मला पाठवली आहे. त्यांचे आभार

----------------------------------------------------------------------------------



निष्कर्ष



पन्नास वर्षांपूर्वी उडत उडत कानावर पडलेली किंवा अर्थ न समजता वाचन केलेली स्यमंतक मण्याची कहाणी (किंवा सुरस आख्यान) आता छान तपशीलवार वाचायला मिळाली. यामधल्या सत्राजिताने घोर तपश्चर्या करून हा मणी प्राप्त करून घेतला, पण त्याचा किती उपभोग किंवा उपयोग करून घेतला ते तोच जाणे. आधी तो मणी त्याच्यापासून दुरावला आणि अखेर त्यापायी त्याला स्वतःचे प्राण गमवावे लागले, प्रसेन आणि शतधन्वा हेही त्यांच्या प्राणांना मुकले. यावरून असे दिसते (बोध मिळतो) की अप्राप्य आणि अमूल्य अशी वस्तू सांभाळण्याचे सामर्थ्य अंगात नसेल तर तिचा हव्यास धरणे म्हणजे सर्वनाशाला आमंत्रण देणे असते. याशिवाय काही उपनिष्कर्ष काढता येतील. उदाहरणार्थ

१. आपल्याला न पेलेल असे वरदान घेऊ नये

२. आपल्याकडील खास वस्तू कोणालाही देऊ नये. (भावालासुध्दा)

३. बाहेर जातांना (विशेषतः ओसाड जागी) अंगावर दागीने घालू नयेत

४. जोखमीची वस्तू सांभाळण्याची जबाबदारी फार कठीण असते. त्यात प्राण गमावण्याची वेळ येऊ शकते.

५. मित्राच्या सल्ल्यावर विचार करावा

६. संशयाला कोणतेही निमित्य पुरते आणि त्याला औषध नाही.

..... वगैरे

या स्यमंतक मण्याच्या निमित्याने श्रीकृष्णाला दोन बायका मिळाल्या ... कशामुळे काय घडेल याचा काही नेमच नाही. या आख्यानामध्ये घडत जाणा-या अनेक चमत्कृतीपूर्ण घटनांचा सुसंगत व सुसंबध्द असा अर्थ लावणे माझ्या आवाक्याबाहेर आहे. जांबुवंतीने गायिलेल्या "सिंह: प्रसेनं अवधीत् सिंहो जांबवताहत:
सुकुमारक मा रोदी तव हि एष स्यमंतक:” या अंगाईगीताचा गणेशाशी किंवा चंद्राशी काय संबंध असू शकतो हे निव्वळ अतर्क्य आहे.



Sunday, August 28, 2011

गणेश व चंद्रदेवाची कहाणी

ऐका परमेश्र्वरा गणेशा व चंद्र देवा तुमची कहाणी.

एकदां भाद्रपद शुक्ल चतुर्थीला ब्रह्मदेवानं श्रीगणेशाची पूजा केली. त्याला अष्टसिद्धींचं कन्यादान केलं व आपले सृष्टीची उत्पत्ती करण्याचे कार्य निर्विघ्न पार पडावे असा वर मागितला. गणेशानं "तथास्तु” म्हणून वरदान दिलं.

पुढे काय झालं ? गणेश आपल्या मूषक वाहनावर बसून आठी बायकांसह लग्नाचं वऱ्हाड घेऊन आकाश मार्गानं परतत होते. तो वाटेत मूषकाचा पाय अडखळला व गणेश मूषकावरून खाली पडले. ते चन्द्रानं पाहिलं. गजाननाचं हत्तीसारखं तोण्ड, मूषकाच वाहन, पाय घसरून पडणं सर्व काही विनोदात्मकच दिसत होतं खरं. पण वाटेत पाय घसरून पडलेल्याला काही इजा झालीय का ? लागलंय कां ? मदत हवीय कां ? असे योग्य विचार मनांत न आणता चन्द्र खदखदून हसू लागला. त्या दृश्याची मौज घेऊ लागला. ते पाहून गणेशाला फ़ार राग आला. त्याने चन्द्राला शाप दिला. तो कांय दिला ? गणेश म्हणाले "चन्द्रा, तुला आपल्या सौन्दर्याचा फ़ार अहंकार झाला आहे. आज पासून जो कोणी तूझे तोण्ड पाहील त्याचेवर चोरीचा वृथा आरोप येईल. सर्व जण तुझे दर्शन निषिद्ध मानतील.”

या शापानं काय झालं ? सगळे चन्द्राचे तोंड पाहीनासे झाले. त्याला चुकवू लागले. टाळू लागले. अपशकुनी मानू लागले. चन्द्रही फ़ार घाबरला. आपल्यामुळे सर्व लॊकांना त्रास होऊ नये म्हणून लपून बसला. कोणाला तोण्ड दाखवेना. सर्व देवांना त्याची दया आली. त्यांनी ब्रह्मदेवाकडे जाऊन चन्द्राच्या शापावर उपाय मागितला. ब्रह्मदेव म्हणाले. गणेश मलाही अत्यंत पूज्य आहे. त्याचा शाप मला फ़िरवता येणार नाही. विष्णु व महादेवालाही ही गोष्ट साध्य होणार नाही. तरी चन्द्राने श्रीगणेशालाच शरण जावे. त्याला प्रसन्न करून घ्यावे व झाल्या अपराधाची क्षमा मागावी. म्हणजे गजानन उ:शाप देईल.”

सर्व देवांनी जाऊन ही युक्ती चन्द्राला सांगितली. चन्द्राने गणेशाची व्रते, पूजा, अथर्वशीर्ष पठण, मंत्र जप, स्तोत्रपठण वगैरे मार्गाने उपासना केली. प्रार्थना केली. झाल्या अपराधाची क्षमा मादितली. सर्व देवांनीही गणेशाची प्रार्थना केली. चन्द्राला उ:शाप द्यायची विनंती केली. मग गजानन प्रगट झाले. त्यांनी चन्द्राला उ:शाप दिला. "ब्रह्मदेवांच्या शब्दाला व सर्व देवांच्या विनंतीला मान देऊन उ:शाप देतोय" म्हणाले. "यापुढे फ़क्त भाद्रपद चतुर्थीला मात्र चन्द्राला माझा शाप लागू राहील. चन्द्र दर्शन निषिद्ध राहील. इतर दिवशी नाही.” सर्वांना आनंद झाला. चन्द्राला उ:शाप मिळाला.

पण चन्द्राचं पूर्ण समाधान झालं नाही. चन्द्रानं आणखी खूप तपश्र्चर्या केली. .गाणेश व्रते केली. पूजा केली. मंत्र जप केला. स्तुती-स्तोत्रे गाइली. झाल्या अपराधाची मनोभावे क्षमा मागितली. प्रार्थना केली. मग शेवटी गजानन प्रसन्न झाला. चन्द्राला वर दिला. "इथून पुढे माझ्या संकष्ट-चतुर्थीच्या व्रताला तुझे दर्शन घेऊनच लोक उपवास सोडतील. सर्व तुझ्या चन्द्रोदयाची आणि चन्द्रदर्शनाची प्रतीक्षा करतील” असे सांगितले. मग चन्द्राला समाधान झाले. आपल्या दर्शनासाठी लोक वाट पाहतील. दर्शन घेतील. अक्षता उधळतील. म्हणून आनंदित झाला. पुऩ्हा हसू खेळू लागला.

जसा चन्द्राला गणेश प्रसन्न झाला तसाच तुम्हां आम्हांला पण होवो.

ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफ़ल संपूर्ण.
---------------------------------------------------------------------------------------------
 
ही कहाणीसुध्दा माझे बंधू डॉ.धनंजय यांनी पाठवली आहे. 
त्यातला भावार्थ (आजच्या युगातील भाषेत) असा असावा असे मला वाटते
 
गणेशाच्या कहाणीचा अर्थ

माझ्या मते या कहाणीमधील गणेश आणि चंद्र हे दोघे आपल्या मनामधील निरनिराळ्या प्रवृत्तींची प्रतीके आहेत, त्यांच्यामध्ये कधी संघर्ष चालतो आणि कधी सख्य असते. पण ते समजावून सांगणे आणि समजून घेणे जरा कठीण आहे. त्यामुळे माझ्या कल्पनेप्रमाणे मी या कहाणीचे आजच्या काँप्यूटरच्या युगातील भाषेत एक इंटरप्रिटेशन केले आहे. यात कोणाचाही अधिक्षेप करण्याचा माझा हेतू नाही.

ब्रह्मदेव हा (जगाच्या) निर्मितीचा प्रमुख आहे तर गणेश हा विद्येचा अधिधाता आहे. एक हार्डवेअरचा प्रमुख तर दुसरा सॉफ्टवेअरचा असे म्हणता येईल. सॉफ्टवेअर लिहिण्यासाठी आधी हार्डवेअर लागतेच. ब्रह्मदेवाने आठ (सिध्दी) ऑपरेटिंग सिस्टिम्स आणि त्यावर चालणारे असंख्य प्रोग्रॅम बनवायला गणेशाला मदत केली आणि अर्थातच गणेशाने त्यांना तपासून बिनचूक करून घेतले. सुरुवातीला सगळे सॉफ्टवेअर चांगले डिबग केले असले तर प्रॉग्रॅम वारंवार सुरळीतपणे चालतो. त्याचप्रमाणे गणेशाने व्हॅलिडेशन आणि व्हेरिफिकेशन केल्यानंतर ब्रह्मदेवाचा कारखाना व्यवस्थित काम करून विश्वाची निर्मिती करू लागला.

सॉफ्टवेअर्सच्या डेव्हलपमेंटचे काम गणपती करत असतांना एकदा त्याचा माऊस थोडा स्लिप झाला आणि प्रोग्रॅम हँग झाला. चंद्र हा मौजमजा करणारा, सर्वांना आवडणारा, देखणा पण उनाड प्रवृत्तीचा, वेळी अवेळी निरनिराळ्या वेशात उगवणारा किंवा गायब होणारा असा मजेदार देव आहे. निर्मितीच्या कामात त्याचा सहभाग नसतो, तो इतरांचे मनोरंजन करत असतो. सीरियस स्कॉलरटाइप चिकित्सक माणसाची फजीती झाली तर अशा हीरोंना हंसू फुटते, त्याची टिंगल करायचा चान्स मिळतो, तसे झाले. अर्थातच गणेशाला राग आला. ”आता मला हसतांना तुला मजा वाटते आहे, पण काम नीटपणे होण्यासाठी सखोल अभ्यासच महत्वाचा आणि उपयोगाचा असतो. तुझ्यासारख्या उनाडांच्या मागे लागलेल्या लोकांकडून कसलीही कामे धडपणे होणार नाहीत. आयत्या वेळी कुणाची तरी कॉपी करायची वेळ (चोरीचा आळ) त्यांच्यावर येणार आहे. त्यामुळे (परीक्षेची वेळ आली की) सगळे तुला टाळतील. अशा वेळी माझी मदत ज्यांना पाहिजे असेल ते यापुढे तुझे तोंड देखील पहाणार नाहीत.” असे त्याला बजावले.

खरेच तसे होऊ लागल्यामुळे चंद्राला पश्चात्ताप झाला. तो खजील होऊन तोंड लपवून बसला. त्यामुळे इतर देवांना चुकल्याचुकल्यासारखे वाटायला लागले. त्यांनी सृष्टीचे कर्ता, धर्ता आणि हर्ता म्हणजे कन्स्ट्रक्शन, ऑपरेशन आणि डिस्पोजल डिपार्टमेंट्सच्या डायरेक्टरांना जाऊन त्यांना गणपतीचे मन वळवण्यासाठी त्यांची मनधरणी केली, पण त्या तीघांचेही गणपतीशिवाय पान हलत नसल्यामुळे त्यांनी थेट गणपतीकडेच जायला त्यांना सांगितले. चंद्राने त्याला शरण जाऊन त्याची क्षमा मागितली तर गणेश आपला आदेश मागे घेईल असे सांगितले.

त्याप्रमाणे चंद्राने गणपतीची स्तुती करून त्याची माफी मागितली. इतर देवांनीही चंद्गासाठी रदबदली केली. गणेशाने प्रसन्न होऊन चंद्राला सांगितले की वर्षातून एक दिवस भाद्रपद चतुर्थीला सारे लोक माझी भक्ती करतात, त्यावेळी त्यांनी तुझ्याकडे लक्ष दिलेले मला चालणार नाही. इतर दिवशी त्यांना तुझ्यापासून मिळणारा आनंद मिळवायला माझी काही हरकत नाही.

अशा प्रकारे चंद्रावर टाकलेला बहिष्कार मागे घेतला गेला असला तरी त्याचे उदास झालेले मन उल्हसित झाले नव्हते. त्यासाठी त्याला आणखी काही हवे होते (ये दिल माँगे मोअर). गणपतीच्याच कृपेने ते मिळेल याचीही त्याला खात्री होती. त्याने गणपतीची मनधरणी आणखी पुढे चालत ठेवली. शेवटी गणपती पुन्हा त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी चंद्राला सांगितले की यापुढे जे लोक माझ्याकडे येतील (माझी उपासना करतील) ते महिन्यातून एकदा संकष्टीच्या रात्री तुलासुध्दा भेटतील, त्यासाठी मुद्दाम तुशी वाट पहातील.

हे ऐकून चंद्राला खूप आनंद झाला त्यामुळे चंद्राची कळी खुलली, तो पहिल्यासारखा चांदण्याची बरसात करू लागला.







Tuesday, August 23, 2011

कहाणी गणपतीची

पूर्वीच्या काळात श्रावण महिन्यात रोज कहाण्या वाचायची प्रथा होती. विजेचे दिवे नसल्यामुळे रात्री बाहेर सगळा अंधारगुडुप असे. त्यामुळे संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेस घरातील सर्व मंडळी घरी परत येत असत. सर्वांनी एकत्र जमायचे, एकाद्या चुणचुणीत मुलाने त्या दिवसाची आणि कधीकधी तिथीची कहाणी मोठ्याने वाचायची आणि इतर सर्वांनी ती भक्तीभावाने श्रवण करायची असा रिवाज होता. प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात गणपतीचे स्मरण करून करण्याची पध्दत आहे. त्याप्रमाणे गणपतीची कहाणी वाचून या कार्यक्रमाची सुरुवात होत असे. ही कहाणी खाली दिली आहे. माझे बंधू डॉ.धनंजय घारे यांनी सांगितलेला या कहाणीचा अन्वयार्थही खाली दिला आहे.


गणेशाची कहाणी.

ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी.

निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष आणि सुवर्णाची कमळे. विनायकाची देवळे राउळे. मनचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा ? श्रावण्या चौथीस घ्यावा. माघी चौथीस संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावे ? पशा पायलीचे पीठ कांडावे. त्याचे अठरा लाडू करावे. सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे. सहाचं सहकुटुंब भोजन करावे. अल्पदान महापुण्य. ऐसा गणराज मनी ध्याइजे, मनी पाविजे. चितलं लाभिजे. मन:कामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे. ही पांचा उत्तरांची कहाणी सांठा उत्तरी सुफ़ल संपूर्ण.

तात्पर्य व बोध :

श्रीगणेशाच्या सर्वोत्कृष्ट पूजेसाठी श्रीगणेश मूर्तीची मनामध्येच ध्यान-धारणा मार्गाने स्थापना करून पूजा करावी. हा मानस पूजा विधी षोडश उपचाराने सिद्धीस नेण्यास उपयोगी अशी काहि संस्कृत स्तोत्रे आहेत. त्यातील एखादे तोंड पाठ केल्यास वा संपूर्ण पूजाविधीच तोंड पाठ केल्यास अशी पूजा करणे सहज शक्य होते.

या मानस पूजेचेच एक सहा महिन्यांचे "व्रत" करावे (वसा घ्यावा). श्रावण शुक्ल चतुर्थीस प्रारंभ करून सहा महिने माघी शुक्ल चतुर्थी पर्यन्त हे व्रत पाळून त्याचे नित्य नेमाने आचरण करावे. यां वशाला एका दमडीचाही खर्च येत नाही. त्यामुळे अत्यंत गरीबांतही गरीब अशा माणसांनाही हा वसा घेणे (वा व्रत करणे-पाळणे) अगदी सहज सुलभ साध्य आहे.

नंतर या व्रताचे उद्यापन करावे. त्यांतहि अगदी कमी खर्चात व स्वत:च्या आर्थिक स्थितीला परवडेल अशा प्रकारे ते (उद्यापन) कसे करावे ते वरील कहाणीत वर्णन केलेले आहे. श्रीगणेशाला प्रत्येक कार्यारंभी नमन करून 'निर्विघ्न कार्यसिद्धि' साठी त्याची प्रार्थना करण्याची पद्धत आहे.

Tuesday, August 16, 2011

स्मृती ठेवुनी जाती - ३ बसप्पा दानप्पा जत्ती


१५ ऑगस्ट, भारताचा स्वातंत्र्यदिन नुकताच होऊन गेला. या वेळी लहानपणच्या काही आठवणी जाग्या झाल्या. मी जमखंडीच्या सरकारी शाळेत शिकायला जात होतो. त्या काळात त्या गावात खाजगी शाळा हा प्रकारच अस्तित्वात नव्हता. आमच्या काळात शाळेचा गणवेश नसायचा. नेहमीचे साधे कपडे घालूनच मुले शाळेला जात असत. १५ ऑगस्टला सकाळी शाळेत ध्वजारोहण होत असे आणि त्यानंतर प्रभातफेरी. त्या दिवशी जरा बरे दिसणारे कपडे (इस्त्री वगैरे काही न केलेले) अंगावर चढवून आम्ही हौसेने त्यात भाग घेत असू. अर्धा पाऊण तास गावातल्या एक दोन मोठ्या रस्त्याने रांगेतून मिरवत आणि जोरजोरात घोषणा देत आम्ही कचेरीच्या आवारात जाऊन पोचत असू. गावात तीन चार सरकारी शाळा होत्या. त्यातली सगळी मुले त्या आवारात जमा होत असत आणि तिथल्या मोठमोठ्या वडाच्या झाडांच्या सावलीत बसून रहात.

गावातल्या पोलिसांची परेड झाल्यानंतर सार्वजनिक झेंडावंदन होत असे. त्याला एकादा स्थानिक पुढारी उपस्थित असायचा. त्या ठिकाणी असलेला एकंदर गोंगाट आणि ध्वनिक्षेपकातली खरखर आणि घूँघूँच्या आवाजातून आम्हाला त्याचे भाषण कधी ऐकूही नीट गेले नाही आणि जेवढे कानावर पडले त्यातले काही समजले नाही. त्याचे हातवारे आणि आविर्भाव तेवढे दिसत असत. इतरांपेक्षा वेगळी अशी एकच व्यक्ती मात्र थोडी लक्षात राहिली आहे. त्यांचे नाव बसप्पा दानप्पा जत्ती.

ज्या काळात जगभरात लोकशाहीचे वारे वहायला लागले होते त्या काळात जमखंडी संस्थानातसुध्दा स्थानिक प्रजातंत्राची सुरुवात झाली होती. बसप्पा जत्ती हे नुकतेच एलएलबी करून गावातील कोर्टात वकीली करत होते. ते त्या स्थानिक राजकारणात उतरले आणि नगरपालिकेचे सभासद, नगराध्यक्ष वगैरे पाय-या झपाझप चढत गेले. भारताला स्वातंत्र्य मिळाय़च्या काळापावेतो ते जमखंडी संस्थानाचे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान असे जे कोणते पद असेल तिथपर्यंत पोचले होते. त्या काळात शासनाचे सर्व अधिकार संस्थानिकाकडेच असले तरी प्रजा आणि राजा यांच्यामधील दुवा हे त्या मंत्र्याचे मुख्य काम असावे. मला समजायला लागले त्या काळापर्यंत संस्थाने विलीन होऊन गेली होती आणि पक्षीय राजकारण सुरू झाले होते. बसप्पा जत्ती तेथील सर्वोच्च नेतेपदी पोचलेले होते आणि मी शाळा संपून गाव सोडेपर्यंत त्या पदावर तेच विराजमान होते. पहिल्या सार्वत्रिक निवडणूकांमध्ये ते जमखंडीहून आमदार म्हणून निवडून आले आणि मी शाळेत असतांना झालेल्या प्रत्येक निवडणुकीत तेच जिंकत राहिले. जमखंडी संस्थानाचे मुंबई राज्यात विलीनीकरण झाल्यानंतर स्थानिक नेतृत्व टिकवून ठेवले असतांनाच जत्ती राज्यपातळीवरही जाऊन पोचले होते.

असे असले तरी त्यांचे व्यक्तीमत्व आणि वागणे कमालीच्या साधेपणाचे दिसायचे. १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीचे झेंडावंदन असो किंवा गावातला कोणताही मोठा राजकीय सोहळा असो, अनेक प्रसंगी ते मुख्य पाहुणे किंवा स्वागताध्यक्ष या नात्याने मंचावर असायचे. ते त्यांचे विचार आणि मुद्दे अत्यंत सौम्य शब्दात मांडायचे. त्यांच्या भाषणात राणा भीमदेवी आकांडतांडव कधी दिसले नाही. त्यांची लहानशी मूर्ती, संयमी स्वभाव, वागण्या बोलण्यातला साधेपणा पाहता इतरांवर त्यांची छाप कशी पडत होती याचे मला आजही नवल वाटते. जत्तींनी केलेल्या प्रयत्नामुळे एकदा पंडित नेहरूंनी जमखंडीसारख्या लहान गावाला धावती भेट दिली होती. त्या काळात आजसारखी अतिरेक्यांची भीती नसली तरी गर्दी आवरण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. माझ्या आठवणीत सर्व गावाला इतक्या मोठ्या प्रमाणात भारून टाकणारा दुसरा कोणताही प्रसंग घडला नाही. गावाबाहेरील मैदानावर तुफान गर्दी झालेल्या जाहीर सभेला जायची परवानगी आम्हा लहान मुलांना मिळाली नाही, पण त्यानंतर हे दोन्ही नेते उघड्या मोटारीत बसून आमच्या घराजवळील रस्त्यावरून गेले तेंव्हा आम्हाला बाल्कनीत उभे राहून त्यांचे दर्शन घेता आले. टीव्हीवर रोजचराजकारणी लोकांचे नको तेवढे दर्शन घडत असल्यामुळे् आज त्या गोष्टीला काहीच महत्व वाटणार नाही. पण पन्नास वर्षांपूर्वी ते एक अप्रूप वाटायचे आणि ती जन्मभर लक्षात रहाण्यासारखी मोठी गोष्ट होती
मुंबई राज्याच्या मंत्रीमंडळात ते उपमंत्री झाले होते. भाषावार राज्यपुनर्रचना झाल्यानंतर आमचा भाग मैसूर राज्यात समाविष्ट झाला. (पुढे त्याचे कर्नाटक असे नामांतरण झाले) त्यामुळे जत्ती बंगलोरला गेले आणि तेथील मंत्रीमंडळात त्यांना जागा मिळाली. त्या काळात मूळच्या मैसूर संस्थानातले हनुमंतय्या आणि मुंबई, हैद्राबाद, मद्रास वगैरे राज्यामधील कन्नडभाषिकांच्या बाहेरून जोडल्या गेलेल्या भागातले निजलिंगप्पा असे काँग्रेसमध्ये दोन गट होते. त्या दोघात सारखी सुंदोपसुंदी चालत असे. या राजकारणातून मार्ग काढण्यासाठी हाय कमांडने सर्वांशी मित्रत्वाने वागणा-या मवाळ स्वभावाच्या जत्तींची निवड केली आणि त्यांना मुख्यमंत्रीपद प्रदान केले आणि चार वर्षे ते त्या पदावर राहिले. पुढे सक्रिय राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर ते ओरिसाचे राज्यपाल आणि त्यानंतर भारताचे उपराष्ट्रपती झाले. फकरुद्दीन अली अहमद यांच्या आकस्मिक निधनानंतर काही काळासाठी जत्तींनी कार्यवाही राष्ट्रपतीचे पदसुध्दा भूषवले होते आणि त्या काळात त्यांना महत्वाचे निर्णय घ्यावे लागले होते.
मी लहान असतांना एकदा तिथल्या दरबार हॉलमध्ये त्यांचा भव्य नागरी सत्कार झाला होता. बहुधा त्या काळात त्यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली असावी. त्यांनी मोटारीतून उतरण्याच्या जागेपासून हॉलच्या प्रवेसद्वारापर्यंत जाण्याच्या मार्गाच्या दोन्ही बाजूंना स्काऊट्सनी जवळ जवळ उभे राहून आणि हात उंच करून एकमेकांना हातातल्या काठ्या जोडून कमानीसारखा मांडव केला होता. त्यातला एक मीसुध्दा होतो. आमच्यातील प्रत्येकाकडे पाहून हंसून आमचे कौतुक करत ते त्याखालून पुढे गेले. त्यावेळी एक सेकंदच मी त्यांना अगदी वीतभर अंतरावरून पाहिले आणि जवळून त्यांच्याशी नजरानजर झाली. पण तो क्षण मात्र कायमचा आठवणीत रुतून राहिला.

राजकारणात होत असलेल्या उलथापालथीत काही काळासाठी जत्तींचे मंत्रीपद गेले होते. त्या काळात ते जमखंडीला येऊन राहिले होते आणि माझ्याच वयाचा त्यांचा मुलगा तेथील सरकारी शाळेत आमच्याबरोबर शिकत होता. बहुधा त्यांनी मुंबई किंवा बंगलोरला बंगले बांधून ठेवले नसावेत. माझे आजोबा सावळगीला रहात होते. माझे वडील, काका, आत्या वगैरे सर्व भावंडांचे बालपण सावळगीतच गेले होते. जमखंडीजवळच असलेले हे एक लहानसे खेडेगांव होते. जत्तींचा जन्म आणि बालपण सावळगीतच गेले होते आणि ते साधारणपणे समवयस्क असल्यामुळे घरातील सर्व वडीलमंडळींनी त्यांना लहानपणापासून पाहिलेले होते. त्या काळातील समाजात जात, पंथ, भाषा वगैरेनुसार तट पडलेले होते आणि त्यांच्यात नेहमीच तेढ निर्माण झालेली असे. जत्तींच्या आणि आमच्या कुटुंबात त्यामुळे वितुष्ट आलेले नसले तरी सख्यही नव्हते. एरवी एकमेकांच्या घरी जाणे येणे नव्हतेच. पण ते एवढ्या मोठमोठ्या पदावर विराजमान असतांना आमच्या घरातले कोणीच कधीही त्यांना जुनी ओळख सांगत भेटायला गेले नाही.

सावळगीच्या आमच्या आजोबांच्या घरी कोणीही रहात नसले तरी त्याघराची डागडुजी वगैरे करण्यासाठी कोणी ना कोणी दरवर्षी तिकडे एक चक्कर मारून येत असे. नववी दहावीत असतांना मीसुध्दा जात असे. त्या खेड्यात तोपर्यंत वीज आणि पाण्याच्या नळाची व्यवस्थासुध्दा झालेली नव्हती. रिकामा वेळ घालवण्यासाठी करमणुकीचे साधनच नव्हते. आजोबांच्या घराजवळच बसप्पांच्या भावाचे, इरप्पांचे किराणा मालाचे दुकान होते. थोडा वेळ तिथेच जाऊन मी त्यांच्याशी गप्पा मारत बसत असे. सावळगीच्या मानाने जमखंडी पुढारलेले गाव होते आणि पुण्यामुंबईचे पाहुणे आमच्या घरी नेहमी येत असल्यामुळे मला तिकडली माहिती समजत असे. त्यामुळे इराप्पा माझ्यासारख्या मुलाला एकाद्या पूर्वीच्या काळातल्या फॉरेन रिटर्न्ड माणसासारखे वागवायचे, त्यांच्याबरोबर बोलत असतांना बसप्पांचा उल्लेख यायचाच. त्यातून त्यांच्याविषयी वाटणारा आदरभाव वाढत गेला.

बसप्पांना चांगले दीर्घायुष्य लाभले होते. पण एकदा राष्ट्रपतीपदापर्यंत पोचल्यानंतर कोणतेही लहान पद पत्करता येत नाही. त्यामुळे पुढील वीस पंचवीस वर्षे त्यांनी कशी घालवली याबद्दल कधीच छापून आले नाही. २००२ साली त्यांचे देहावसान झाल्याचे वृत्त आले. त्यांची माहिती देणारे लेख आले. त्यानंतर त्यांचे नाव जवळ जवळ अंधारात लुप्त झाले. माझ्यासारख्याच्या मनातली अशीच एकादी जुनी आठवण जागी झाली तर तेवढ्यापुरते त्यांचे नाव समोर येत असेल. कर्नाटकात त्यांच्या नावाने काढलेल्या काही संस्था आहेत. त्यांच्यामुळे संबंधित लोकांच्या कानावर ते नाव येत आहे आणि राहील.

Sunday, August 14, 2011

अणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग ९ - समारोप

समारोप

सायन्स न शिकलेल्या अनेक लोकांना 'अॅटॉमिक' या शब्दाचा अर्थ माहीत नसतो. "हे ऑटोमेटिक एनर्जीवर काम करतात." अशा शब्दात अनेक लोकांनी माझी ओळख करून दिली आहे. त्यामुळे आपोआप तयार होत जाणारी वीज पुरवण्याचे अजब तंत्र मला अवगत आहे अशी काही लोकांची गैरसमजूत होते. "तुमची वीज केवढ्याला पडते हो? " या प्रश्नाला मला नेहमीच उत्तर द्यावे लागते. विजेचे बिल भरणा-या कोणाच्याही मनात हा प्रश्न उठणे जेवढे साहजीक आहे तेवढेच या प्रश्नाचे उत्तर देणे अवघड आहे.
कोणत्याही वस्तू किंवा सेवेचा बाजारभाव 'मार्केट फोर्सेस'मुळे ठरत असतो. मागणी आणि पुरवठा यातील समतोलाप्रमाणे तो कमी जास्त होत असतो असे ढोबळमानाने म्हंटले तरी हे दोन्ही घटक सहसा स्थिर पातळीवर नसतात. या दोन घटकांमध्ये उतार चढाव निर्माण करणारी असंख्य इतर कारणे असल्यामुळे त्याबद्दल काहीही नेमकेपणाने सांगता येणे कठीण आहे. शिवाय त्यावर सरकारी नियंत्रण असले तर त्यामधला गोँधळ जास्तच वाढतो.
विजेचेच उदाहरण घेतले तर केवळ मुंबईतीलच दक्षिण मुंबई, उपनगरे आणि नवी मुंबई या भागात विजेच्या दरांची निरनिराळी कोष्टके आहेत. घरगुती, औद्योगिक किंवा वाणिज्यिक उपयोग, कृषी, सार्वजनिक यासारख्या ग्राहकांच्या निरनिराळ्या श्रेणी आहेत, प्रत्येक श्रेणीमध्ये पहिले १०० युनिट्स, पुढील २०० किंवा ३०० युनिट्स, त्यावरील जास्तीचे युनिट्स वगैरेंच्या वीजशुल्कासाठी निरनिराळे दर आहेत, याशिवाय वीज आकार, इंधन समायोजन आकार, कर, उपकर वगैरे त्यात जोडले जाऊन एकूण बिल बनते. त्यामुळे आपल्या घरी येणारी वीज नेमकी 'केवढ्याला' पडते हे मीच काय, हा प्रश्न विचारणाराही सांगू शकत नाही.
वीज वितरण (डिस्ट्रिब्यूशन) करणा-या कंपनीकडून आपल्याला विजेचे बिल येते आणि आपण ते भरतो. त्यातला काही हिस्सा विजेचे वहन (ट्रान्स्मिशन) करणा-या केपनीला आणि काही भाग विजेची निर्मिती (जनरेशन) करणा-या कंपनीला मिळतो. त्यांना किती पैसे मिळावेत यावरसुध्दा सरकारी नियंत्रण असते. एकाच कंपनीच्या निरनिराळ्या वीजनिर्मिती केंद्रांमध्ये निर्माण झालेल्या विजेचे मूल्य वेगवेगळे असते. त्यात पुन्हा ड्यूअल प्राइसिंग पॉलिसीनुसार पहिले काही मेगावॉट्सपर्यंत एक दर आणि त्याहून अधिक विजेसाठी दुसरा दर असतो. भारतात निदान हे दर तरी सारखे बदलत नाहीत. युरोप आणि अमेरिकेत दिवसातल्या वेगवेगळ्या काळासाठी निरनिराळे दर लागू होतात. इतर वस्तू किंवा सेवांप्रमाणे तिकडे विजेचे ऑन लाइन ट्रेडिंगही चालते. थोडक्यात सांगायचे झाल्यास विजेच्या विक्रीचे दर अत्यंत अनिश्चित असतात.
विजेची निर्मिती करण्यासाठी किती खर्च येतो याचा काही प्रमाणात हिशोब करता येतो. कारखान्यात तयार होत असलेल्या इतर वस्तूंप्रमाणेच यासाठी काही भांडवली खर्च (कॅपिटाल एक्स्पेंडिचर) आणि काही महसुली खर्च (रेव्हेन्यू एक्स्पेंडिचर) असतो. वीजकेंद्राच्या उभारणीसाठी जमीनीची खरेदी करणे, इमारतीचे बांधकाम, यंत्रसामुग्रीची खरेदी आणि जोडणी वगैरेसाठी लागणारा खर्च भांडवली स्वरूपाचा असतो. कामाला सुरुवात होताच या खर्चाची सुरुवात होते आणि त्यासाठी लागणारे भांडवल कर्जाने घेतलेले असल्यास त्यावरील व्याजाची आकारणीही सुरू होते. पण विजेची निर्मिती करून तिच्या विक्रीमधून उत्पन्न यायला अवकाश असतो. या दरम्यानच्या काळात द्याव्या लागणा-या व्याजाला आय.डी.सी. (इंटरेस्ट ड्यूरिंग कन्स्ट्रक्शन) म्हणतात आणि भांडवली खर्चात त्याचा समावेश केला जातो. वीजकेंद्र काम करू लागल्यानंतर ते चालवत ठेवण्यासाठी जो खर्च येतो तो दोन प्रकारचा असतो. कामगारांचे पगार आणि भत्ते, ऑफीसमधील दिवे, पंखे वगैरे चालवण्यासाठी लागणारा खर्च यासारखे काही फिक्स्ड एक्सपेंडिचर्स असतात, केंद्र बंद असले तरी हे खर्च होतच राहतात, तर इंधनाची किंमत, यंत्रे चालवण्यासाठी येणारा खर्च वगैरे काही खर्च वीजनिर्मितीच्या प्रमाणात होतात.
भांडवली खर्चासाठी घेतलेल्या कर्जावर व्याज द्यावे लागते, तसेच त्याची परतफेडही करायची असते. याप्रमाणे त्याचे हप्ते ठरतात. हे हप्ते भरणे, फिक्स्ड खर्च भागवणे आणि खर्ची पडलेल्या इंधनाची किंमत भरून येणे हे सारे झाल्यानंतर जी शिल्लक राहील तो नफा असतो. व्यावसायिक तत्वावर कोणतेही काम करणा-याला नफ्याची अपेक्षा असतेच, तसा वाजवी नफा त्याला मिळावा असा विचार करून त्यानुसार विजेची किंमत ठरवली जाते. वीज कधीही साठवून ठेवता येत नाही, तिचे उत्पादन होताच क्षणभरात वितरणही होते. त्यामुळे या सगळ्या खर्चांचे अंदाज बांधून आणि अमूक इतके युनिट्स वीज तयार होईल असे ठरवून तिचा दर आधीच ठरवला जातो. ठराविक कालावधीनंतर मागील अनुभवाचा आढावा घेऊन पुढील काळासाठी त्यात बदल केले जातात.
औष्णिक वीजकेंद्राच्या तुलनेत परमाणू वीज केंद्रामधील यंत्रसामुग्री अधिक गुंतागुंतीची असते, शिवाय ती वेगळ्या आणि खास प्रकारची असल्यामुळे तिच्या निर्मिती आणि तपासणीसाठी जास्त खर्च येतो, तसेच त्यासाठी जास्त कालावधी लागतो. त्यामुळे दर मेगावॉट कपॅसिटीसाठी अणू वीज केंद्राला अधिक भांडवल लागते. पण औष्णिक केंद्राला सतत प्रचंड प्रमाणात इंधन पुरवत रहावे लागते. त्यासाठी लागणारा कोळसा, तेल किंवा गॅस यावर खूप खर्च होतो. शिवाय या इंधनांना खाणीमधून काढून वीजकेंद्रापर्यंत नेऊन पोचवण्यासाठी भरपूर खर्च येतो, तसेच वाहतुकीच्या साधनांवर ताण पडतो. त्या मानाने अणू इंधन आकाराने अगदीच लहान असते आणि त्यावर कमी खर्च होतो. यामुळे असे म्हणता येईल की कोळसा किंवा तेलाच्या खाणीजवळ औष्णिक वीज कमी खर्चात तयार होते आणि त्यापासून दूर गेल्यास अणूविद्युत स्वस्तात तयार होऊ शकते. वाढत जाणा-या किंमतींचा विचार केला तर असे दिसते की वर्षे उलटून जात असतांना भांडवली खर्चावरील व्याजाचा बोजा कमी होत जातो, तर इंधनाच्या किंमती वाढत गेल्यामुळे तो खर्च वाढत जातो. अशा प्रकारे एकाच वर्षी सुरू झालेल्या या दोन प्रकारच्या केंद्रामधून तयार होणा-या विजेच्या दरांमध्ये पंधरा वीस वर्षांनंतर फरक पडलेला दिसतो.
निरनिराळ्या प्रकारच्या अणूविद्युत केंद्रांचा तुलनात्मक अभ्यास करतांना त्यांच्या उभारणीवर आणि चालवण्यावर येणा-या खर्चांचा विचार करावा लागेल. या केंद्राच्या उभारणीसाठी येणारा खर्च त्याच्या क्षमतेच्या समप्रमाणात वाढत नाही. केंद्राची क्षमता जितकी मोठी असेल त्या प्रमाणात त्यावरील दर मेगावॉटमागे येणारा भांडवली खर्च कमी होत जातो. यामुळे बहुतेक प्रगत देशांमध्ये १००० मेगावॉट युनिट्स बांधली गेली आहेत आणि चालवली जात आहेत. सुरुवातीच्या काळात उभारलेली २०० - ३०० मेगावॉट्स किंवा त्याहून लहाल क्षमतेची युनिट्स त्यांनी बंदच केली आहेत. भारतासारख्या देशात मात्र ती चालवणे आजही शक्य आणि आवश्यक आहे. अर्थातच त्यातून निघणारी वीज तुलनेने महाग पडते.
जगभरातले हजार मेगावॉटवर क्षमता असलेले रिअॅक्टर्स पी.डब्ल्यू.आर आणि बी.डब्ल्यू आर. या प्रकारचे आहेत. ग्राफाइट मॉडरेटेड रिअॅक्टर्स आता मागे पडले आहेत. हेवी वॉटर मॉडरेटेड रिअॅक्टर्स बनवणा-या कॅनडामध्ये पाचशे मेगावॉट्सपासून सातआठशे मेगावॉट्सपर्यंतची अनेक युनिट्स त्यांनी उभारली. पुढे विजेची मागणी वाढणेच थांबल्यामुळे हजार मेगावॉट्सचे डिझाइन करूनसुध्दा ते उभारले गेले नाही. भारतातील परिस्थिती पाहून आधी दोनशे मेगावॉट्सची अनेक युनिट्स उभारल्यानंतर तारापूर येथे पाचशे मेगावॉट्सची दोन युनिट्स उभारली, आता सातशे मेगावॉट्स युनिट्स उभारण्याची सुरुवात झाली आहे.
बॉइलिंग वॉटर रिअॅक्टरमध्ये एकच कूलंट सर्किट असते. रिअॅक्टर आणि टर्बाईन यांची स्थापना एकाच इमारतीत होते. एकंदरच केंद्राचा विस्तार आणि त्यामधील यंत्रसामुग्री आटोपशीर असल्यामुळे त्यासाठी कमी खर्च येतो. मात्र हे पॉवर स्टेशन चालत असतांना त्यातील सर्वच भागात किरणोत्साराचे प्रमाण मोठे असल्यामुळे कोणीही त्यात प्रवेश करू शकत नाही. विजेची निर्मिती थांबवल्यानंतरसुध्दा रिअॅक्टर पुरेसा थंड होण्याची वाट पहावी लागते. काही यांत्रिक बिघाड झाला तर दुरुस्ती करण्यासाठी सुध्दा कोणी आत जाऊ शकत नाही. त्यामुळे याची काळजी घेण्यासाठी अनेक पाठीराख्या (बॅकअप) पर्यायी व्यवस्था केलेल्या असतात. पण जपानमध्ये आलेल्या सुनामीसारख्या प्रसंगी त्या तोकड्या पडल्याचे दिसून आले. परिस्थितीत सुधारणा होऊन तिच्यावर ताबा मिळवणे शक्य होईपर्यंत ती आणखी किती बिघडणार आहे हेच सांगता येत नव्हते आणि त्यामुळे अव्वाच्या सव्वा वावड्या उडवणा-या लोकांना मोकळे रान मिळाले होते. प्रत्यक्षात तसे काहीच घडले नसले तरी या प्रसंगातून निर्माण झालेले भीतीचे वातावरण मात्र जगभर पसरले.

प्रेशराइज्ड वॉटर रिअॅक्टरमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी अशी दोन कूलंट सर्किट्स असल्यामुळे जास्तीची उपकरणे लागतात. त्यातील स्टीम जनरेटर आणि प्रेशराइजर ही अवाढव्य आकाराची असतात. प्रायमरी कूलंटचे तपमान आणि दाब या दोन्ही गोष्टी जास्त असल्यामुळे त्यासाठी लागणारे पंप्स, व्हॉल्व्हज, पाइप्स वगैरे सर्वांसाठी विशेष प्रकारच्या मिश्रधातूंचा उपयोग करावा लागतो. टर्बाइन आणि सेकंडरी कूलंट सिस्टिममधील सर्व उपकरणे वेगळ्या बिल्डिंगमध्ये ठेवली जातात. यामुळे बांधकामाचा खर्च वाढतो. या प्रकारात केंद्राची कार्यक्षमता कमी असते. वगैरे कारणांमुळे वीजनिर्मितीला थोडा अधिक खर्च येण्याची शक्यता असते. पण बी.डब्ल्यू.आर,मधील वर दिलेले दोष नसल्यामुळे गरज पडताच दुरुस्ती करणे सोपे असते आणि स्टेशन चालत राहिल्यामुळे विजेची अधिक निर्मिती झाली तर या खर्चाची भरपाई होते. शिवाय आणीबाणीची परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देता तिला हाताळणे शक्य असते.

प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिअॅक्टरमध्येसुध्दा प्रायमरी आणि सेकंडरी अशी दोन कूलंट सर्किट्स असल्यामुळे वरील सर्व गोष्टी लागू होतातच. त्याखेरीज इतर जास्तीची उपकरणे असावी लागतात. यातील तीनचारशे प्रेशर ट्यूब्स झिर्कोनियम नावाच्या खास धातूपासून बनवली जातात. मॉडरेटरसाठी निराळे सर्किट असते, त्यात पंप्स, व्हॉल्व्हज, हीट एक्स्चेंजर्स वगैरे असतातच. मॉडरेटरला थंड करतांना त्यातून निघालेली ऊष्णता वायाच जाते. लीक होऊन हवेत मिसळलेले हेवी वॉटर परत मिळवण्यासाठी व्हेपर रिकव्हरी सिस्टम असते आणि गोळा झालेल्या जड पाण्याचे शुध्दीकरण करून त्याचा दर्जा वाढवण्यासाठी अपग्रेडिंग सिस्टिम असते. ऑन पॉवर फ्यूएलिंग करण्यासाठी खास प्रकारची फ्यूएलिंग मशीन्स आणि ट्रान्स्फर सिस्टिम असते. या सर्वांसाठी जादा खर्च येतो. त्यामुळे वीज उत्पादनाचा खर्च वाढतो.

जगभरातील अनुभव पाहता पी.डब्ल्यू.आर. आणि बी.डब्ल्यू,आर. रिअॅक्टर्स अनेक देशांमध्ये निश्चितपणे स्वस्तात वीजनिर्मिती करत आहेत. जगातील सुमारे एक शष्ठांश वीजनिर्मिती यातून होत आहे. पी.एच.डब्ल्यू.आर. तग धरून आहेत आणि माफक प्रमाणात नफा कमावत आहेत, पण अर्थनिवेश करणा-यांना (इन्व्हेस्टर्सना) ती कदाचित आकर्षित करू शकत नाहीत असे दिसते. कॅनडा आणि भारत सोडता इतर देशांनी त्यात मोठा पुढाकार घेतला नाही. दक्षिण कोरिया, चीन. अर्जेंटिना, रुमानिया इत्यादि देशात अशी केंद्रे आहेत, पण इतरांच्या तुलनेत संख्येने ती जास्त नाहीत.
सत्तरीच्या दशकातील अणूशक्तीच्या सुवर्णयुगात सगळीकडे मोठ्या प्रमाणात अणूविद्यितकेंद्रे उभारली गेली. किरणोत्साराच्या धोक्याचा विचार करता त्यानंतरच्या काळात ती बांधणे कमी झाले होते. औष्णिक केंद्रांमधून मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होत असल्यामुळे पर्यावरणाचा विचार करता पुन्हा अणूविद्युत केंद्रांच्या उभारणीला वेग येईल अशी चिन्हे अलीकडे दिसू लागली होती. फुकुशिमा येथील सुनामीत झालेल्या घटनांनंतर त्याला ब्रेक लागला आहे. पण कोळसा आणि तेल काही दशकांनंतर संपणारच आहेत. त्यांची उपलब्धता कमी होताच त्यांच्या किंमती कशा भडकतात हे आपण पाहतच आहोत. लोखंडासारख्या अनेक धातूंची निर्मिती आणि त्यावर प्रक्रिया करणे तसेच विविध प्रकारची रसायने तयार करण्यासाठीही त्यांची आवश्यकता असते. त्यामुळे ती इंधने जाळून टाकण्यापेक्षा जास्तीत जास्त पुरवून वापरण्यावर भर दिला जाईल यात शंका नाही. आपली आजची जीवनशैली पुन्हा बदलून शंभर दोनशेवर्षे मागे जायला कोणीही तयार होणार नाहीत. त्यामुळे विजेची मागणी कमी होणार नाही. सौर ऊर्जा, वायू ऊर्जा वगैरे अजूनही खूपच महाग आहेत आणि त्यांची किंमत कमी होण्याची सध्या तरी आशा दिसत नाही. त्यामुळे काही काळ उलटून गेल्यानंतर पुन्हा अणूशक्तीच्या पर्यायावर गंभीरपणे विचार करावा लागणार आहे असे वाटते.

Tuesday, August 09, 2011

श्रावणमास - अनुशासन पर्व

लहानपणी श्रावणाचा महिना म्हणजे निव्वळ खादाडी, खेळ, उत्सव आणि मजाच मजा वाटत असे. निसर्गसुध्दा या काळात किती रम्य असतो ते बालकवींनी दाखवले आहेच. श्रावण महिन्याला दुसरी एक बाजू असते आणि ती अनेक लोकांना जाचक वाटू शकते असे मात्र तेंव्हा कधी वाटलेच नव्हते. आषाढातल्या पावसाच्या एक दोन झडीत सापडून सचैल स्नान घडले, डोक्यावरचे केस भिजल्याने ओले कच्च राहिले आणि त्यानंतर सर्दी खोकला झाला किंवा तो होईल असे आईला वाटले तर लगेच केशकर्तनालयात नेऊन अगदी बारीक हजामत केली जायची आणि पुढे महिना दीड महिना केसांना वाढू दिले जायचे. त्यामुळे श्रावण महिन्यात कटिंग केली नाही तरी ती गोष्ट लक्षात येत नसावी. त्या काळात दाढीमिशांचा प्रश्नच नव्हता. महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरात आल्यानंतर पंचांगाशी संबंध तुटला होता, श्रावणाचे आगमन झालेलेही समजले नव्हते. नेहमी आपला चेहेरा रोज चांगला घोटून तुळतुळीत ठेवणारे काही लोक ऑगस्ट महिन्याच्या सुमाराला मात्र दाढीचे खुंट वाढवू लागल्याचे मला जाणवले आणि त्याचे थोडे नवल वाटले. मी नेहमीसारखा हेअर कटिंग सलूनमध्ये (त्या काळात त्यांना जेंट्स पार्लर वगैरे नावे नव्हती) गेलो तर तिथे नेहमीसारखी गर्दी नव्हती. मोठ्या अदबीने मला मऊ खुर्चीवर बसवून केशकर्तनकाराने श्रावण महिन्याचे पुराण सुरू केल्यामुळे मला त्याचा उलगडा झाला. निष्कारण त्याच्या पोटावर पाय आणणारा हा असला कसला पायंडा? या त्याच्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हते. श्रावण महिन्याचा आणि दाढी किंवा हजामत न करण्याचा परस्पराशी काय संबंध असू शकतो हे मला आजपर्यंत समजलेले नाही.

आमच्या बाळबोध घरात अभक्ष्यभक्षण आणि अपेयपानच नव्हे तर त्यांचा बोलण्यात उल्लेख करणेसुध्दा वर्ज्य होते. दारू, मांस, अंडे अशा शब्दांच्या उच्चारानेसुध्दा आपली जीभ विटाळायची नाही, अगदीच आवश्यक झाले तर त्या गोष्टी खुणांनी दाखवायच्या असा संकेत होता. ज्या गोष्टी मुळातच कधीच खाल्ल्या प्यायल्या जात नव्हत्या त्या श्रावणमहिन्यात खायच्या प्यायच्या नाहीत असा नियम तरी कुठून असणार ? त्याबद्दल मी अनभिज्ञच होतो. घर सोडून बाहेरच्या जगात रहायला लागल्यानंतर माझे जग बदलले. त्याबरोबर 'तीर्थ' आणि 'प्रसाद' या शब्दांना नवा अर्थ प्राप्त झाला. आपण 'तीर्थप्राशन' केले असल्याच्या बढाया मारणारी काही मुले हॉस्टेलमध्ये असली तरी प्रत्यक्ष 'पिणारी' कोणी त्या काळात नव्हती. पण नॉनव्हेजचा समावेश मेसच्या नेहमीच्या खाण्यातच होता. दर रविवारी मिळणा-या फीस्टमध्ये कोंबडीच्या लुसलुशीत तंगडीऐवजी पचपचीत रसगुल्ला खाणारे अगदीच बावळट समजले जायचे. शिवाय पुढे फॉरीनला गेलो तर तिथे दूधभात आणि भेंडीची भाजी मिळणार नव्हती, तिकडच्या लोकांसारखा आहारच घ्यावा लागणार होता आणि तो जास्त पौष्टिक समजला जात असे. असा दूरदर्शी विचार केला आणि थोड्याच दिवसात मी सामिष भोजनावर ताव मारू लागलो. पण श्रावण महिना सुरू झाला आणि आमची टिंगल करणारी काही मुले एकदम शुध्द शाकाहारी बनली. आता त्यांना खिजवायचा चान्स मला मिळाला, कारण माझ्यासाठी श्रावण महिन्यात अमूक तमूक पदार्थ खायचे नाहीत असा वेगळा नियम नव्हताच. अभक्ष्यभक्षण न करण्याचा सर्वसाधारण नियम एकदा तोडल्यानंतर मग श्रावण महिना आहे की भाद्रपद आहे याने काय फरक पडतोय्?
नोकरीला लागल्यानंतर कधी कधी तीर्थप्राशन करण्याचे प्रसंग येऊ लागले. मला त्याची चंव फारशी आवडली नाही आणि परिणामाचेही विशेष आकर्षण कधी वाटले नाही. हिंदी सिनेमातले हीरो 'गम भुलानेके लिये' पीत असतात. माझ्या सुदैवाने तसली दुःखे माझ्या वाट्याला आली नाहीत. त्यामुळे मी कधीही पिण्याच्या नादी लागलो नाही. पण एकाद्या पार्टीच्या निमित्याने भरलेला पेला समोर आला तर मग त्यावेळी एकच प्यालामधला सुधाकर आणि तुझे आहे तुजपाशीमधला काकाजी या दोघांचे मनातल्या मनात द्वंद्व चालायचे आणि कधी या बाजूची तर कधी त्या बाजूची सरशी व्हायची. त्यातही श्रावण महिना आल्याने फरक पडत नसे कारण त्याची आठवणच येत नसे आणि श्रावण महिन्यासाठी खास नियम माझ्याकडे नव्हते. ज्या मित्रांना चटक लागली होती आणि श्रावण महिनाभर मद्याला स्पर्शही करायचा नव्हता, त्यांची मात्र पंचाईत होतांना दिसायची.

अशा एका रसखान विडंबनकाराने बालकवींचे शब्द थोडेसे बदलून लिहिले आहे,

श्रावणमासी, विरस मानसी, हळहळ दाटे चोहिकडे ।
क्षणात येते मनात पाप, क्षणात पश्चाताप घडे ।।

खरे तर खाण्यापिण्यामध्ये कसले पाप आले आहे? पण तशी समजूत असेल तर वाटायला लागते. या मनस्थितीचे वर्णन करतांना त्याला वाटते,

पुरण नकोसे, वरण नकोसे, उतरेना कंठी बासमती ।
मटणाच्या त्या रश्श्यावाचून कुंठित होई येथ मती ।।

बिच्चारा ! ! !

Sunday, August 07, 2011

श्रावणमास

श्रावणमासातला पहिला आठवडा संपायला आला आहे, तरी मला त्या महिन्याच्या सुरू होण्याने काही फरकच पडला नाही. हे किती विचित्र वायतंय् ? माझ्या लहानपणी असे होणे शक्यच नव्हते. श्रावणमहिना म्हणजे निरनिराळ्या प्रकारच्या वेगळेपणाने अगदी गच्च भरलेला असायचा. पहिल्याच दिवशी जिवतीचा पट लावून रोज तिची पूजा सुरू होत असल्यामुळे श्रावण महिन्याचे आगमन झाल्याचे सर्वांना समजत असे. रोजचा वार आणि तिथीनुसार त्या दिवशीच्या कहाण्या वाचायच्या. महिनाअखेरपर्यंत त्या तोंडपाठ होऊन जात असत. काही कहाण्यांमध्ये मजेदार आणि उद्बोधक गोष्टी असायच्या. शुक्रवारच्या कहाणीवर महादेवशास्त्री जोशी यांनी एक सुंदर कथा लिहिली होती आणि त्यावर मराठी चित्रपटसुध्दा निघाला होता. बहुतेक वारी काही वेगळा मेनू असायचा.

सोमवारी घरातली काही वडीलधारी माणसे उपास करत असत आणि बाकी सर्वांसाठी धान्यफराळ बनत असे. गेल्या पन्नास वर्षात 'धान्यफराळ' हा शब्दच कधी माझ्या कानावर पडला नाही. त्यामुळे त्याचे नियम मला आता सांगता येणार नाहीत. पण उपास म्हणजे साबूदाण्याची खिचडी, रताळी, खजूर वगैरे पदार्थ असत त्याऐवजी या धान्यफराळात वेगळे पदार्थ असत. बहुधा पाण्याऐवजी दुधात कणीक भिजवून त्याच्या दशम्या, चुर्मा असे काही तरी असे. दर सोमवारी आमच्या जमखंडी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रामतीर्थाची जत्रा असे आणि सगळी मुले टोळकी करून त्याला जाऊन मौजमजा करत असू. आमच्या घरात किंवा नात्यात कोणाकडेही एकादी तरी नवी सून किंवा माहेरपणाला आलेली मुलगी असायची आणि तिची मंगळागौर थाटाने केली जात असे. त्यात मुलांना धुडगूस घालायला वाव नसला तरी गोड धोड खायला तरी मिळायचे आणि दुरून थोडी गंमत पहायला, एकायला मिळत असे. शुक्रवारी पुरणाच्या दिव्याने जिवतीची आरती केली जायची आणि त्यानंतर घरातल्या सगळ्या बाळगोपाळांचे औक्षण व्हायचे. शनिवारी जेवणात ज्वारीच्या कण्या आणि बाजरीची भाकरी असायची. या दोन्ही गोष्टी माझ्या आवडीच्या नसल्या तरी त्यांच्या जोडीला चमचमीत कालवण असल्याने त्यांच्या आधाराने त्या घशाखाली उतरवल्या जायच्या.

तिथीनुसारसुध्दा श्रावण महिन्यात अनेक सणवार येत असत.  नागचवत आणि नागपंचमीच्या दिवशी नागोबांना घेऊन गारुडी लोक दारोदारी फिरत असत. गोल आणि चपट्या आकाराच्या खास बास्केट्स आणि त्यातले नागाचे वेटोळे यांचे नाते सर्वांच्या मनात इतके पक्के बसलेले असे की त्या बास्केटचा उपयोग दुसरी कोणतीही वस्तू ठेवण्यासाठी करायचा विचारही कोणी करत नसेल. तिकडच्या ग्रामीण भागात साप हा एक स्थानिक जैवसृष्टीचा अविभाज्य घटक असल्यामुळे त्याला पाहण्यात तसे नाविन्य नसले तरी नागपंचमीची गोष्ट वेगळी असायची. एरवी सापांना बहुधा माणसांची भीती वाटत असल्यामुळे ते बिळात किंवा झुडुपात लपून बसलेले असायचे आणि बाहेर आले तरी चाहूल लागताच संरक्षणासाठी पळतांना दिसत असत. सापाकडे पाहून भीती वाटण्यासारखे त्याचे रूप अक्राळ विक्राळ नसते, पण त्याच्याबद्दल भीतीदायक गोष्टी ऐकलेल्या असल्यामुळे माणसेही त्यांना घाबरतच असत. साप पाहून एक तर ती धूम पळ काढीत किंवा त्याला ठेचून मारून टाकीत असत. फणा उभारलेल्या नागाच्या डोळ्यांना डोळे भिडवून त्याच्यासमोर बसून किंवा उभे राहण्याचे धारिष्ट्य कोणी दाखवत नसावे, माझ्या बाबतीत तर ते अशक्य होते. त्याच्याकडे टक लावून त्याचे सौंदर्य निरखून बघायची संधी फक्त नागपंचमीला मिळत असे.


कर्नाटकात नागपंचमीला तंबिट्टाचे लाडू केले जात तर नारळी पोर्णिमेला नारळीभाताचा बेत असे. रक्षाबंधन केले जात असे, पण त्याचा मोठा सोहळा नसायचा. भाऊबीजेला जेवढे महत्व होते तेवढे या कार्यक्रमाला नसायचे. पाऊस पाणी, नद्यांचे पूर वगैरेमुळे या दिवसात प्रवास करणे थोडे अनिश्चित असल्यामुळे परगावाहून कोणी राखीसाठी येत नसे. श्रावण महिन्यात श्रावणी नावाचा एक धार्मिक विधी असायचा. तो मात्र अनिवार्य असे. गोकुळाष्टमीला रात्रीचे बारा वाजेपर्यंत जागून कृष्णजन्म साजरा करत असू. तोपर्यंत भजन, कीर्तन, गाणी वगैरे चालत असे. बहुतेक लोक श्रावणातल्या एकादे दिवशी घरी सत्यनारायणाची पूजा करत असत आणि सर्व आप्तेष्टांना दर्शनासाठी बोलावू प्रसाद देत असत. त्या निमित्याने साजुक तुपातला शिरा वरचेवर खायला मिळत असे. एकंदरीत पाहता श्रावण महिन्याते आगळेपण जन्मभर लक्षात राहण्यासारखे असायचे.

बालकवी ठोंबरे यांनी लिहिलेली श्रावणमासी हर्ष मानसी ही कविता माझ्या लहानपणी शाळेच्या पाठ्यपुस्तकात कोणत्या ना कोणत्या इयत्तेला असायचीच. तेंव्हा ती पाठ झालेली होतीच. आता आंतर्जालावर सगळ्या गोष्टी शोधणे सोपे झाले आहे. ती खाली दिली आहे.

श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे ।
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे ।।

वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे ।
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे ।।

झालासा सूर्यास्त वाटतो, सांज -अहाहा तो उघडे ।
तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे ।।

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा ।
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा ।।

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते ।
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते ।।

फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती ।
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती ।।

खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे ।
मंजूळ पावा गाई तयांचा श्रावण महिमा एकसुरे ।।

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला ।
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला ।।

सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती ।
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती ।।

देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात ।
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत ।।



Saturday, August 06, 2011

अणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग ८ - पी.एच.डब्ल्यू.आर.

प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर्स




तांदूळ निवडतांना आपण त्यातले वेगळे दिसणारे खडे वेचून त्यांना काढून टाकतो, पिठामधल्या कोंड्याचे कण आकाराने मोठे असल्यामुळे चाळणीतून खाली पडत नाहीत, रेती धुतली तर त्यातली माती पाण्याबरोबर वाहून जाते, पाण्यात मिसळलेला मद्यार्क (अल्कोहोल) त्याला उकळवून पाण्यापासून वेगळे केला जातो. एकमेकात मिसळलेले भिन्न पदार्थ अशा अनेक पध्दती वापरून आपल्याला पुन्हा वेगवेगळे करता येतात कारण त्या दोहोंच्या गुणधर्मात काही महत्वाचे फरक असतात. त्या फरकामुळे आपण त्यांचे वेगळेपण ओळखून त्यांना बाजूला करू शकतो. पण मूलद्रव्यांचे वेगवेगळे आयसोटोप्स मात्र सर्वच दृष्टीने अगदी एकसारखे असतात, त्यांचे एकूण एक भौतिक व रासायनिक गुणधर्म (फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज) जवळ जवळ समान असतात, त्यांचे अतीसूक्ष्म अणू एकमेकात बेमालूम मिसळलेले असतात. घन किंवा द्रवरूप अवस्थेत ते अणू जवळच्या इतर अणूंना घट्ट चिकटलेले असल्यामुळे त्यांना वेगळे करणे अशक्यच असते. वायूरूप स्थितीत मात्र प्रत्येक अणू स्वतःच सुटा होऊन फिरत असतो पण तो सुपरसॉनिक विमानाच्या गतीने दाही दिशांना भरकटत असतो. वेगवेगळ्या आयसोटोप्सच्या अशा गतीमान अणूंना गोळा करून त्यांचे निरनिराळे समूह करणे कोणत्याही सोप्या क्रियेने शक्य नसते. थोडक्यात सांगायचे तर आयसोटोप्सना सहजासहजी वेगळे करता येत नाही.

निसर्गात सापडणा-या युरेनियममध्ये यू २३५ आणि यू २३८ हे त्याचे दोन आयसोटोप्स असतात. त्यामधील यू २३५ भंजनक्षम असते, त्यापासून अणू ऊर्जा उत्पन्न करता येते, पण यू २३८ या कामासाठी उपयुक्त नसते. नैसर्गिक युरेनियममधून या दोहोंना वेगळे करण्यासाठी या सर्वात जड अशा मूलद्रव्याला वायुरूप अवस्थेत आणून त्या वायूचे पृथक्करण करणे हे कल्पनातीत महाकठीण कर्म असते. त्याबाबतचे सारे कार्य अत्यंत गुप्तपणे केले जाते. त्याची माहिती आणि त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री मिळत नाही. यामुळे व्यावसायिक दृष्ट्या विद्युत निर्मितीसाठी नैसर्गिक युरेनियमचा उपयोग कसा करता येईल याविषयी प्रयत्न सुरुवातीपासूनच चाललेले आहेत. त्या दृष्टीने ग्राफाईट मॉडरेटर रिअॅक्टर्स बनवण्याच्या प्रयत्नाबद्दल मागील भागात पाहिले.

हेवी वॉटर मॉडरेटर आणि नैसर्गिक युरेनियम फ्यूएल यांचा वापर करून सुध्दा ही गोष्ट साध्य करता येते. हैड्रोजन या मूलद्रव्याचा ड्यूटेरियम नावाचा एक वजनदार जुळा भाऊ (आयसोटोप) आहे. त्याचे दोन अणू आणि ऑक्सीजनचा एक अणू यांच्या संयोगाने जड पाणी (हेवी वॉटर) बनते. साध्या पाण्यातच ते अत्यल्प प्रमाणात असते. आपल्या शरीरात नेहमीच चमचाभर हेवी वॉटरसुध्दा असते असे म्हणता येईल. पण शुध्द हेवी वॉटरच्या निर्मितीसाठी हैड्रोजन या मूलद्रव्याच्या ड्यूटेरियम या आयसोटोपाला वेगळे काढावे लागत असल्याने हे सुध्दा सहजपणे करता येत नाही. मात्र पाणी हा द्रव आपल्या चांगला ओळखीचा आहे, आर्किमिडीजच्याही आधीपासून त्यावर संशोधन केले गेले आहे, पाणी आणि वाफ यांच्या गुणधर्मांबद्दल भरपूर आणि सविस्तर माहिती उपलब्ध आहे, विविध प्रकाराने त्यांचा वापर होत असलेली नानाविध प्रकारची यंत्रसामुग्री गेल्या दोन तीन शतकांपासून तयार होत आली आहे, शिवाय जड पाणी हे विनाशकारी, विस्फोटक किंवा विषारी असे भयानक द्रव्य नसल्यामुळे त्याच्या उत्पादनावर सरसकट फार कडक आणि जाचक आंतरराष्ट्रीय प्रतिबंध कदाचित घातले जात नसावेत. अशा अनेक कारणांमुळे युरेनियमच्या एन्रिचमेंटच्या तुलनेत हेवी वॉटर बनवणे किंचित सुलभ, कमी खर्चिक आणि आवाक्यातले वाटते.

इतर प्रगत देशांनी देखील सुरुवातीच्या काळात यावर संशोधन केले असले तरी कॅनडाने या बाबतीत स्पृहणीय यश मिळवले. कँडू या नावाने ओळखल्या जाणा-या अनेक रिअॅक्टर्सची उभारणी कॅनडामध्ये करून त्यांनी हे तंत्रज्ञान प्रस्थापित केले, तसेच अशा प्रकारचे रिअॅक्टर्स निर्यात केले. भारतीय अणूऊर्जेचे जनक डॉ.होमी भाभा यांनी दूरदृष्टीने विचार करून हेच तंत्रज्ञान भारतासाठी सर्वात चांगले आहे हे ओळखले आणि या क्षेत्रातील भारताच्या धोरणाला दिशा दिली. कॅनडामध्ये डग्लस पॉइंट या जागी २२० मेगावॉट क्षमतेचे पहिले पॉवर स्टेशन बांधले जात असतांना त्याच्या मागोमाग भारतात राजस्थानातील रावतभाटा या ठिकाणी तशाच स्वरूपाचा पहिला प्रकल्प कॅनडाच्या सहाय्याने उभारला गेला. त्यानंतर त्याच डिझाइनचा आणखी एक रिअॅक्टर त्याच्या बाजूला स्थापन केला गेला. हे करतांना आपल्या तंत्रज्ञांनी यासंबंधीचे तंत्रज्ञान आत्मसात केले आणि आधी त्यात थोडा थोडा आणि नंतर आमूलाग्र फरक करत अशा प्रकारची न्यूक्लियर पॉवर स्टेशन्स अनेक ठिकाणी उभारली.

पी.डब्ल्यू,आर प्रमाणेच प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर्स (पी.एच.डब्ल्यू.आर) मधले प्रायमरी कूलंट फक्त रिअॅक्टर, पंप आणि स्टीम जनरेटर्स एवढ्या भागात फिरत असते. स्टीम जनरेटर्समधून बाहेर पडलेली वाफ टर्बाइनच्या शाफ्टला फिरवून कंडेन्सरमार्फत परत येते. त्याला जोडलेल्या जनरेटरमध्ये विजेची निर्मिती होते. पी.एच.डब्ल्यू.आर. मधला सगळाच कन्व्हेन्शनल एरिया पी.डब्ल्यू.आर.सारखाच असतो. या दोन प्रकारच्या रिअॅक्टर्समध्ये काही महत्वाचे फरक आहेत. पी.एच.डब्ल्यू.आरमध्ये रिअॅक्टर व्हेसलचा सिलिंडर आडवा असतो आणि त्यात नळीच्या आकाराचे तीन चारशे कूलंट चॅनल्स (किंवा फ्य़ूएल चॅनल्स) बसवलेले असतात. या नळ्यांमध्ये जुडग्यांच्या आकारातली अनेक फ्यूएल बंडल्स ठेवतात आणि त्यांच्या मधून वाहणारे उच्च दाबाचे हेवी वॉटर त्यातील ऊष्णतेला बाहेर वाहून स्टीम जनरेटरकडे नेते. रिअॅक्टर व्हेसलमधील कूलंट चॅनेल्स सोडून त्यांना सर्व बाजूंनी वेढलेला उरलेला भाग हेवी वॉटर मॉडरेटरने भरलेला असतो. यातील जड पाण्याचा दाब अगदी कमी असतो. त्याचे तपमान वाढू नये यासाठी एका वेगळ्या पंपाद्वारे हे पाणी निराळ्या हीट एक्स्चेंजरमधून खेळवून थंड केले जाते. पी.डब्ल्यू.आर, मध्ये वाहणारे एकाच सर्किटमधले साधे पाणी कूलंट आणि मॉडरेटर ही दोन्ही कामे करते, पण पी.एच.डब्ल्यू.आर. मध्ये उच्च दाबाचे कूलंट आणि कमी दाबाचे मॉडरेटर अशा दोन वेगवेगळ्या सिस्टिम्समध्ये जड पाणी वहात असते. ते कोठेही एकमेकांत मिसळत नाही.

नैसर्गिक युरेनियममधील भंजनक्षम भाग कमी असल्यामुळे वीजनिर्मितीसाठी त्यातला जेवढा भाग खर्च होतो त्याची लगेच भरपाई करणे आवश्यक असते. फ्यूएलिंग मशीन्स नावाच्या खास यंत्रांद्वारे हे काम रिअॅक्टर चालत असतांनाच केले जाते. याला ऑन पॉवर रिफ्यूएलिंग म्हणतात. चित्रात दाखवल्याप्रमाणे एका कूलंट चॅनलच्या दोन बाजूंनी दोन मशीने त्याला जोडली जातात. एका बाजूने नवे इंधन आत ढकलले जाते आणि जुने खर्ची पडलेले इंधन (स्पेंट फ्यूएल) दुस-या बाजूच्या मशीनमध्ये घेतले जाते. त्यानंतर ती मशीने चॅनलपासून वेगळी होतात. स्पेंट फ्यूएल त्याच्या स्टोअरेज बे किंवा पूलमध्ये पाण्याखाली साठवून ठेवले जाते आणि पुढील चॅनलच्या फ्यूएलिंगसाठी एका फ्यूएलिंग मशीनमध्ये नवे फ्यूएल घेतले जाते.

ड्यूटेरियम हे मूलद्रव्य न्यूट्रॉन्सना अगदी अल्प प्रमाणात खाते (अॅब्सॉर्ब करते) या कारणाने हेवी वॉटर हे सर्वोत्कृष्ट मॉडरेटर समजले जाते. पण जे थोडे न्यूट्रॉन्स ड्यूटेरियमच्या न्यूक्लियसमध्ये प्रवेश करतात त्यांच्यामुळे ट्रीशियम नावाचा हैड्रोजनचा तिसरा आयसोटोप तयार होतो आणि तो मात्र रेडिओअॅक्टिव्ह असतो. तो इतस्ततः पसरू नये आणि मूल्यवान हेवी वॉटर वाया जाऊ नये याची विशेष काळजी घ्यावी लागते. या रिअॅक्टरमध्ये बसवलेली सर्व यंत्रसामुग्री, उदाहरणार्थ पंप्स, व्हॉल्व्हज, हीट एक्स्चेंजर्स, फिल्टर्स, पाइप्स, फिटिंग्ज, सील्स वगैरेची कसून तपासणी केली जाते आणि त्यांच्या लीकटाइटनेसला खूप महत्व दिले जाते.

प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर्स भारताच्या अणूऊर्जेच्या कार्यक्रमाचा गाभा असल्यामुळे त्यांचे डिझाईन, त्यामधील यंत्रांची निर्मिती, केंद्राची उभारणी आणि ती चालवणे या सर्व बाबतीत आपण खूप मजल मारली आहे आणि जवळजवळ स्वयंपूर्ण बनलेलो आहोत.