Thursday, January 27, 2011

दोन सूर्य अस्तंगत झाले


मी मुंबईला आलो त्यावेळी दूरदर्शन सुरू झाले नव्हते. चित्रपटकलाकार तेवढे सिनेमाच्या पडद्यावर दिसत असत. रेडिओच्या खरखरीमधून थोडे फार संगीत कानावर पडत असे, पण त्या काळात हिंदी सिनेमातली गाणी आणि मराठीतले विविध प्रकारचे सुगम संगीत हे ऐकण्यावरच मुख्य भर असायचा. श्रुतिका या नावाने लहान लहान नाटके रेडिओवर लागत पण त्यात आकाशवाणी कलाकारांचा सहभाग असे. नाट्यव्यवसाय आणि शास्त्रीय संगीत या क्षेत्रामधील व्यक्तींचे दर्शन प्रत्यक्ष कार्यक्रमातच होत असे. अशा काळात या दोन क्षेत्रात आपल्या प्रतिभेच्या तेजाने डोळे दिपवून टाकणारे दोन सूर्य तळपत होते. संगीतभास्कर पंडित भीमसेन जोशी आणि नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर.

पणशीकरांचे एक नाटक पाहिल्यानंतर माझ्या मनावर त्याचा एवढा प्रभाव पडला की मग एकामागून एक जसजशी त्यांची नाटके येत होती ती पहातच राहिलो. पणशीकरांच्या नावातच अशी जादू होती की ज्या नाटकात त्यांनी अभिनय केला होता किंवा ज्या नाटकांची निर्मिती त्यांनी केली होती ती उच्च दर्जाची असणार आणि आपले पैसे वसूल होणार ही खात्री असे. तो मी नव्हेच मधला लखोबा लोखंडे असो, अश्रूंची झाली फुले मधला प्राध्यापक विद्यानंद असो किंवा इथे ओशाळला मृत्यूमधला औरंगजेब असो, या सर्व नाटकातल्या त्यांच्या भूमिका निगेटिव्ह असल्या तरी त्यांचाच प्रभाव दीर्घकाळ रेंगाळत असे. तो मी नव्हेच या नाटकात रूढ अर्थाने कोणी नायक असा नव्हताच. निपाणीचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंडे, बोगस कॅप्टन परांजपे, ढोंगी बुवाबाज राधेश्याम महाराज अशासारख्या पाच वेगवेगळ्या नावांनी एकच माणूस फसवाफसवी करत होता. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरामधील या पात्रांना सशक्तपणे उभे करून दाखवण्याची अद्भुत करामत पणशीकरांनी करून दाखवली.

फ्रभाकर पणशीकर ऊर्फ पंत हे अभिनयसम्राट तर होतेच, त्याशिवाय बरेच काही होते. त्यांनी निर्माता म्हणून मराठी नाट्यक्षेत्राला केलेले योगदान अतुलनीय आहे. कट्यार काळजात घुसली यासारखे दुसरे सर्वांगसुंदर संगीत नाटक मला तरी पाहिल्यासारखे आठवत नाही. पं.जितेंद्र अभिषेकी आणि स्व.वसंतराव देशपांडे यांच्या सांगीतिक कौशल्यामुळे ते गाजले हे खरे असले तरी त्याची निर्मिती पणशीकरांनी केली होती हेसुध्दा लक्षात आले आणि राहिले होते. देवल किर्लोस्करांच्या काळात नाटकाच्या रंगमंचावर निरनिराळे देखावे निर्माण करण्यासाठी फक्त पाठीमागे पडदे टाकले जात असत. भवन, बगीचा किंवा अरण्याचे चित्र त्यावर रंगवलेले असे. पणशीकरांच्या काळापर्यंत नेपथ्य, प्रकाशयोजना यासारख्या कल्पना अस्तित्वात आल्या होत्या. पण त्यांनी फिरता आणि सरकता रंगमंच यासारखे तांत्रिक कौशल्याचे प्रयोग करून प्रेक्षकांना नवनवे धक्कादायक अनुभव दिले.

नाट्यदर्पण रजनी हा कार्यक्रम बंद होईपर्यंत मी दरवर्षी न चुकता पहात होतो. नाट्यक्षेत्रातल्या कलावंतांना त्यांच्या भूमिकाशिवाय व्यक्ती म्हणून जवळून पहाण्याची संधीसुध्दा त्यात मिळत असे. दूरदर्शन आणि इतर वाहिन्यांवर झालेल्या अनेक चर्चा, मुलाखती वगैरेंमधूनदेखील अधून मधून पणशीकरांची भेट होत असे. त्यांच्या नेहमीच्या बोलण्या वागण्यातच एक आदब तसेच रुबाब दिसून येत असे. चर्चा करतांना ते आपला मुद्दा हिरीरीने मांडत असत. नाट्यक्षेत्राशी संबंधित असलेले सारे प्रश्न ते जनतेपुढे किंवा सरकारपुढे पोटतिडिकेने मांडतांना दिसत. पंतांना अगणित पुरस्कार मिळाले होतेच, शिवाय महाराष्ट्र शासनातर्फे त्यांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार देण्यात येत होता. ज्या वर्षी भालचंद्र पेंढारकरांना हा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला त्यावेळी प्रभाकरपंतांनी केलेल्या भाषणात त्यांनी शासनालाच सुनावलेले परखड दोन बोल मला अजून आठवतात. मराठी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व, विवेचन करण्याची क्षमता, आपले विचार स्पष्टपणे मांडण्याची शैली वगैरे त्यांचे अंगी असलेले गुण त्यांच्या वक्तृत्वात तसेच त्यांनी केलेल्या लेखनात दिसून येत असत. अशा प्रखर व्यक्तीमत्व असलेल्या सूर्याचे दर्शन आता होणार नाही.

भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांच्याबद्दल खूप लिहून आले आहे. त्यात आणखी भर घालण्याची माझी योग्यता नाही. माझ्या व्यक्तीगत जीवनात आलेल्या अनुभवावर आधारित त्यांचे एक व्यक्तीचित्र काढण्याचा एक दुबळा प्रयत्न मी या ब्लॉगवर पूर्वीच केला आहे. परवाच्या वर्तमानपत्रात पंडितजींच्या निधनाची बातमी आणि त्यांच्या संबंधी लेख, मुलाखती वगैरेंनी संपूर्ण जागा व्यापली होती. शोकाकुल होऊन सर्व जग जणु काही स्तब्ध होऊन बसल्यामुळे आदले दिवशी कुठेही कोणतीही घटना घडलीच नाही असे वाटले. रोज सकाळी कपातला चहा संपेपर्यंत हातातला पेपरसुध्दा त्यातल्या बातम्यांचे मथळे वाचून झाल्यानंतर हातावेगळा होत असे. त्यादिवशी मात्र त्याचे वाचन दिवसभर चालले होते.

चार वर्षांपूर्वी मी एकदा असे लिहिले होते, "जानेवारीचा शेवटचा आठवडा खरे तर आनंदाने भरलेला असायला हवा. आपला प्रजासत्ताक दिन या आठवड्यात येतो. संक्रांत होऊन गेलेली असली तरी तिळगुळाची चव अजून जिभेवर रेंगाळत असते. मुंबईमध्ये सुखद गुलाबी गारवा असतो. या काळात जिकडे तिकडे संमेलने, मेळावे, महोत्सव वगैरेंचा जल्लोष उडालेला असतो. सगळं वातावरण मस्त असते. पण कां कोणास ठाऊक, अशा आठवड्यातच मनाला चटका देणा-या कांही घटना घडून गेल्या. महात्माजींचा स्मृतिदिन याच आठवड्यात येतो, याच सकाळात कच्छमध्ये भयानक भूकंप आला आणि या वर्षी तीन मोठी माणसे एकदम आपल्याला सोडून गेली. माझ्या भावविश्वातले तीन तेजःपुंज तारे निखळले." संगीतकार ओ.पी.नय्यर, साहित्यिक कमलेश्वर आणि राष्ट्रभक्त नेते सदानंद वर्दे हे तीन चमचमते तारे एकापाठोपाठ एककरून लुप्त झाले होते. काही वर्षांपूर्वी पं.सी.आर.व्याससुध्दा या महिन्यातच दिवंगत झाले होते.

आता या वर्षीच्या नववर्षाच्या सुरुवातीला जानेवारी या पहिल्या महिल्यात दोन सूर्य अस्तंगत होऊन जबर धक्का बसला आहे.

No comments: