Friday, January 28, 2011

सांगकाम्या

फक्त कोणी सांगेल तेवढेच काम करणा-या माणसाला सहसा कामच मिळत नाही. स्वतः पुढाकार घेऊन काम करणारे लोक सर्वांना हवे असतात. याचे एक उदाहरण पहा.

एक 'सांगकाम्या' माणूस होता. त्याला सांगितलेले काम तो मन लावून करत असे, पण देवाने त्यालासुध्दा एक डोके दिले आहे आणि ते केवळ टोपी ठेवण्यासाठी नाही या गोष्टीचा त्याला पत्ताच नव्हता. त्याचा जबरदस्त वशीला असल्यामुळे भिडेखातर त्याला कोणी ना कोणी आपल्या पदरी ठेवून घेत असे आणि त्याच्याकडून जमेल तसे काही काम करवून घेण्याची धडपड करीत असे. एकदा एका वर्तमानपत्रात त्याला वार्ताहराचे काम दिले गेले. त्याच्याकडे चौकस वृत्तीचा गंधही नसल्यामुळे तो स्वतःहून बातम्या गोळा करेल अशी अपेक्षा नव्हतीच. नाटक, सिनेमे, सभा, संमेलने, समारंभ अशा ठिकाणी जाऊन मजा करता करता तिथला ठरलेला कार्यक्रम कसा झाला, तिथे कोण कोण मंडळी आली होती, सजावट कशी केली होती, खायला प्यायला काय काय होते वगैरे मजकून लिहायचे सोपे काम त्याला दिले गेले.

एकदा शहरातल्या एका मोठ्या माणसाच्या मुलीचे लग्न होते. नेहमीप्रमाणे त्या जागी त्याला पाठवले गेले. दुसरे दिवशी सकाळी इतर सर्व वर्तमानपत्रांच्या मुखपृष्ठावर तिथे घडलेल्या घटनांविषयीची बातमी आठ कॉलमी ठळक मथळ्याने छापून आली, पण आपल्या हीरोच्या वृत्तपत्रात त्याचा साधा उल्लेखसुध्दा नव्हता. संतापलेल्या संपादकाने त्याला बोलावून विचारले, "तुला त्या ठिकाणी पाठवले होते ना? एवढी महत्वाची बातमी देण्याचे काम तू का केले नाहीस?"
"मी तिकडे अगदी वेळेवर जाऊन पोचलो होतो."
"मग काय झालं?"
"एक दरोडेखोरांची टोळी आली, त्यांनी आधी वीज घालवून टाकली, त्यामुळे कोण कोण आले होते ते दिसलेच नाही."
"पुढे काय काय झालं?"
"काही नाही. त्यांनी नव-या मुलालाच गोळी घातली, तो मरून गेला. मग लग्न कसं होणार?"
"अरे हे एवढं रामायण घडलं, लगेच ऑफीसात येऊन ते आम्हाला का नाही सांगितलंस?"
"मला लग्नसमारंभाचं सविस्तर वर्णन द्यायचं काम सांगितलं होतं. लग्न तर झालंच नाही. कोणी जेवण सुध्दा वाढलं नाही. ते वायाच गेलं. म्हणून मी घरी गेलो, दोन घास जेवलो आणि झोपलो. त्यात माझं काय चुकलं?"

संपादकाने कपाळाला हात लावला.

No comments: