Thursday, January 06, 2011

आत्याबाईला मिशा असत्या तर?

"आत्याबाईला मिशा असत्या तर? ......." असा एक प्रश्न मी शाळेत असतांना "म्हणी पूर्ण करा" या मथळ्याखाली परीक्षेत येत असे. तो वाचूनच आधी सर्वांना हंसू फुटत असे. आणि हंसून झाल्यानंतर ते तिची पूर्ती करत असत, " ..... तिला काका म्हंटले असते." शाळेच्या पुस्तकातल्या चित्रांवर वेगळे संस्कार करणे हा व्रात्य मुलांचा एक आवडता छंद असे. त्यात एकाद्या राणीला दाढीमिशा लावून तिचा राणा भीमदेव करणे किंवा एकाद्या राजाच्या कपाळाला रुपयाएवढे कुंकू लावून आणि कानात डूल वगैरे घालून त्याची पार 'सखूबाई' बनवणे वगैरे कल्पक प्रकार चालत असत.

१९६६ मध्ये जेंव्हा स्व.इंदिराजी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या त्या वेळी पं.नेहरूजींच्या अमदानीपासून मंत्रीमंडळात असलेली वजनदार ज्येष्ठ मंडळी त्यांच्या मंत्रीमंडळात होती. यापुढे त्यांच्या सल्ल्यानेच सगळा राज्यकारभार चालेल अशी समजूत झाल्यामुळे स्व.इंदिराजींना 'गूँगी गुडिया' हे नाव तत्कालीन शिष्ट लोकांनी दिले होते. लवकरच इंदिराजींनी आपला पराक्रम दाखवला आणि सर्व जुन्या खोडांना बाजूला सारून सत्ताधारी पक्षाची नव्याने उभारणी केली आणि त्याला प्रचंड बहुमताने निवडून सत्तेवर आणल्यानंतर त्यांनी नवे चेहेरे मंत्रीमंडळात आणले. ज्या काळात त्या सर्वसत्ताधीश बनल्या होत्या तेंव्हा एका विरोधी पक्षाच्या नेत्याने त्या सरकारामधल्या 'एकमेव पुरुष' आहेत असे तिरकस विधान केले होते.

आपले टपालखाते आता शंभर वर्षाहून जुने झाले आहे. त्याचे नवे बालपण सुरू झाले आहे असे म्हणायचे की त्याला त्या विरोधी नेत्याची आठवण झाली म्हणावे असे वाटण्यासारखी एक गोष्ट नुकतीच घडली. मला पोस्टाने आलेल्या एका पाकीटावरील तिकीटावर असा शिक्का पडला आहे की त्यामुळे काय परिवर्तन झाले आहे ते तुम्हीच पहा !

.

.
.
.
.
.
.
.
.
.

No comments: