Tuesday, May 13, 2008

एक संदर्भमय किंचितकथा

(आगाऊ खुलासा : याहू किंवा गूगलच्या शोधयंत्रां (१)वर एखादे सर्वसामान्य नाम टाकले तर "अमूक लक्ष संदर्भ सापडले आहेत त्यांतील पहिले दहा खाली दिले आहेत" असा कांहीसा प्रतिसाद येतो परंतु आपल्याला पाहिजे असलेले पान यात नेमके नसते. हे काम आपल्याला लई भारी(२) पडत असल्यामुळे दर वाक्यागणिक फक्त एक संदर्भ व क्वचित एक उपसंदर्भ अशी मर्यादा स्वतःला घालून घेत आहे. संपूर्ण माहिती हांताशी नसल्यामुळे कांही जागी टिंबे (... अशी) दिली आहेत(३), आवश्यक वाटल्यास वाचकांनी गाळलेल्या जागा स्वतःच भरून घ्याव्यात.
१. अधिक माहितीसाठी मनोगत या संकेतस्थळावरील ... यांचे शोधयंत्रावरील लेख वाचावेत.
२. हे शब्द मराठी ग्रामीण कथाकादंब-यामध्ये पानोपानी वाचायला मिळतील. कुणाकुणाची नांवे सांगणार?)
३. एक पूर्वापारपासून चालत आलेली प्रथा.

रामराम मंडळी. (४)

४. दूरचित्रवाणीवरील 'आमची माती, आमची माणसे', 'कृषिदर्शन' किंवा तत्सम कार्यक्रम पहावा.

एक आटपाट नगर होते.(५)

५. पहा 'संपूर्ण चातुर्मास', आवृत्ती .. पृष्ठ .., हे पुस्तक न मिळाल्यास कोठलाही कहाणीसंग्रह वाचावा. धार्मिक पुस्तकविक्रेत्यांकडे श्रावण महिन्यात हमखास मिळेल.

त्या नगरांत (५) एक लहान मुलगी रहात होती.

६. 'नगर' म्हणजे 'अहमदनगर' या गांवाच्या नांवाचे लघु रूप असे कधीकधी समजले जाते. पण ते इथे लागू होत नाही. या ठिकाणी 'नगर' म्हणजे 'गांव'. या शब्दांच्या व्याख्या समाजशास्त्रावरील ... ग्रंथामध्ये मिळतील.

ती वयाने वाढत वाढत(६) मोठी होत होती.

६. 'वाढता वाढता वाढे' - समर्थ रामदास स्वामीकृत हनुमानाचे स्तोत्रामधील एक शब्दप्रयोग.

ती मुलगी अत्यंत सुंदर, मोहक, सद्गुणी, कामसू व हंसतमुख होती.(७)

७. सिंड्रेला किंवा स्नोव्हाईट यांच्या कथा वेगवेगळ्या किंवा एकत्र दिलेल्या कोठल्याही पुस्तकांमधील त्यांचे वर्णन. बालवाङ्मयाच्या सर्व दुकानांत असे पुस्तक मिळेल.

सोळावे वर्ष लागल्यावर ती अप्सरेसारखी(८) दिसू लागली.

८. 'प्राप्ते तु शोडषे वर्षे गर्दभी अप्सरायते।' - एक संस्कृत सुभाषित. यातील 'गर्दभी' शब्द वाटल्यास वगळावा.

तिच्या शेजारच्या घरी एक तरुण(९) मुलगा रहात असे.

९. 'माझ्या शेजारी तरुण राहतो। टकमक टकमक मला ग पाहतो।' - 'बुगडी माझी सांडली गं' या सुप्रसिद्ध लावणीतील एक ओळ. कवि... गायिका... चित्रपट...

एकदा त्यांची अचानक नजरानजर (१०) झाली.
१०.'नजरानजर होणे' या वाक्प्रचाराबद्दल अधिक माहिती मराठी भाषेच्या व्याकरणातील 'म्हणी व वाक्प्रचार' या संबंधीच्या धड्यात वाचायला मिळेल. इयत्ता .... च्या मराठी भाषा या विषयाच्या अभ्सासक्रमासाठी लावलेले पुस्तक मिळाल्यास पहावे.

तिचे गोड स्मितहास्य पाहून त्याच्या काळजाचा(११) ठोका चुकला.

११. 'ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला।'- '...' या मराठी संगीत नाटकांतील एक लोकप्रिय पद.

तिच्या हृदयातसुद्धा प्रेमाच्या लाटा उठल्या(१२).

१२. 'उगवला चंद्र पुनवेचा, मम हृदयी दरिया उसळला प्रीतीचा।' - आणखीन एक लोकप्रिय पद. नाटक '...'

त्यानंतर जे व्हायचे होते ते घडू नये ते घडले (१३)

१३. 'शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलीकडले ..घडू नये ते घडले ' एक अजरामर मराठी गाणे. त्या ठिकाणी नेमके काय घडले असेल ते ज्याने त्याने आपापल्या कल्पनेतून समजून घ्यावे.

(तळटीप)
अ)प्रस्तुत लेखक (१४) अत्यल्पमति आहे.
१४. 'प्रस्तुत लेखक' हे लहानपणी कुठेतरी वाचलेले शब्द, बहुधा साहित्यसम्राट न.चिं.केळकरांसारख्या मोठ्या संपादकांच्या एखाद्या अग्रलेखातील एखादा छोटा उतारा कोठल्यातरी वृत्तपत्रांत वाचला असावा. त्यातले असतील. 'अत्यल्पमति' हा शब्द मात्र फक्त या किंचित गोष्टीच्या लेखकासाठीच वापरला आहे, त्यासंबंधी गैरसमज नसावा.
आ)त्यामुळे उपरिनिर्दिष्ट (१५) गोष्टीमध्ये लिहिलेला शब्दनशब्द त्याने नक्कीच पूर्वी कुठेतरी ऐकलेला किंवा वाचलेला आहे.
१५. अबब! केवढा मोठा शब्द? अर्थातच बालपणी वाचलेला. त्या काळच्या लेखकांची धन्य ते लेखनी कला!- संदर्भ -'धन्य ते गायनी कला' एका काळी तुफान लोकप्रिय झालेला सांगीतिक कार्यक्रम.
इ)वाचकांनी वाटल्यास ह.घ्या.(१६)
१६. आंतर्जालावरील लोकप्रिय संकेतस्थळांवर अनेक वेळा वाचलेली एक नम्र सूचना. या बाबतीत 'हलकेच घ्या' किंवा 'हसून घ्या' असे अर्थ अनर्थांचे पाठभेद असून इंग्रजी ई-मेल वर बोकाळलेल्या LOL वरून याची प्रेरणा मिळाली अशीही वदंता आहे.

1 comment:

Shirish Jambhorkar said...

1 number aahe