Friday, May 09, 2008

वानवडीचा मुक्काम- महादजी शिंदे यांची छत्री


पुण्याजवळ वानवडी येथे महादजी शिन्दे यांची छत्री आहे असे शाळेत असतांना इतिहासाच्या (कां भूगोलाच्या?) पुस्तकात वाचतांना खूप मजा वाटली होती. लढाईच्या धामधुमीत ते ती इथे विसरून गेले की कुणाला तरी त्यांनी आपली आठवण म्हणून ठेवायला दिली होती अशी पृच्छा सुद्धा केली होती. ती एक स्मारक म्हणून बांधलेली इमारत आहे असे समजल्यावर तितकीशी मजा राहिली नाही. तरीही ते नांव स्मरणाच्या कुठल्यातरी कोप-यात कोरले गेले आणि पुढच्या इयत्तेत गेल्यानंतर पुसले गेले नाही.
त्यानंतर अनेक वर्षांचा काळ गेला. अनेक वेळा पुण्याला जाणे व तेथे राहणेही झाले. पण वानवडीचा साधा उल्लेख सुद्धा कधी झाल्याचे आठवत नाही. आपण पुण्याला 'वानोरी' इथे फ्लॅट घेणार असल्याचे मुलाने सांगितले आणि जुनी आठवण एकदम जागी झाली. केंद्रीय विद्यालयात शिकतांना वानवडीची किंवा महादजी शिंदे यांची माहिती त्याला कधीच मिळाली नव्हती. त्यामुळे मी त्याबद्दल विचारल्यावर सुद्धा त्याच्या डोक्यात कुठलीच ट्यूब पेटली नाही.

दिवाळीनिमित्त त्याच्याकडे रहायला आल्यावर शोधाशोध सुरू केली. पुणे शहराने प्रसरण पावतांना वानवडीला गिळंकृत केले असल्याने आता ते 'पुण्याजवळ' राहिलेले नाही. त्याचाच भाग झाले आहे. 'विंडसर','ऑक्सफर्ड', 'रहेजा', 'गंगा' 'सेक्रेड हार्ट' अशा नांवांच्या मोठमोठ्या वसाहती उभ्या राहून सगळे वातावरण कॉस्मोपॉलिटन होऊन गेले आहे. मधेमधेच कोठे कोठे मराठमोळी जुनी वस्ती दिसते. त्याचेही बरेच शहरीकरण झालेले दिसते.

अशाच एका छोट्या रस्त्याच्या टोकाला महादजी शिंदे यांची सुप्रसिद्ध छत्री उभी आहे. ते जरी सन १७९४ मध्ये स्वर्गवासी झाले तरी त्यांच्या वंशजांनी सन १९१३ मध्ये हे स्मारक बांधले अशी नोंद केलेली संगमरवरी शिला तिथे बसवली आहे. नक्शीदार खांब व शिखर असलेले हे एक महादेवाचे प्रेक्षणीय असे मंदिर आहे. त्याची व्यवस्थित निगा राखलेली असल्याने चांगल्या सुस्थितीत आहे. शिंदे घराण्याचे आद्य संस्थापक सरदार राणोजी शिंदे यांच्यापासून अलीकडेच वारलेल्या माधवराव यांच्यापर्यंत सर्वांच्या तसबिरी भिंतीवर टांगल्या आहेत. त्यातच एक विजयाराजे यांचा फ्रेम न केलेला फोटो आहे.

येथील एका शिलेवरील लिखाण थोडे संस्कृतमध्ये व त्याहूनही थोडक्यात मराठीमध्ये केले असून हिंदीमध्ये लिहिलेली एक स्वतंत्र शिला आहे. त्यावर सुद्धा तत्कालीन संस्थानिकाचे नांव शिंदे न लिहिता सिंधिया असे लिहिलेले आहे. हा बदल कधी झाला हा आणखी एक संशोधनाचा विषय होईल.
संस्कृत लेखावर श्रीनाथ असे लिहिलेले पाहून ते एखादे स्तोत्र असावे असे वाटले. पण खालील मजकूर वाचल्यावर ते महादजी शिन्दे यांनी रचलेले नसून त्यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या छत्रीबद्दल असल्याचे समजते. शिन्देकुलरत्न महादजी हे संवत १८५० माघ शुद्ध १३ बुधवारी वैकुंठवसी झाले. त्यांचे प्रप्रपौत्र महाराज माधवराव शिन्दे यांनी संवत १९८१ ज्येष्ठ शुद्ध ५ शनिवारी या छत्रीची प्रतिष्ठापना केली असे त्यात लिहिले आहे.

या आवारात छत्रीची एक छोटीशी चौकोनी इमारत असून त्यावर एक घुमट आहे. ही इमारत बंदच ठेवलेली दिसली. तिच्या खिडकीमधून आतील समाधीचे दर्शन होते. तेथे त्यांचा मुखवटा ठेवला असून एक घोड्याची मूर्ती आहे. महादजींनी सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात मराठी राज्याचे सेनापतीपद भूषवले होते व वडगांवच्या लढाईत इंग्रजांचा पराभव केला होता. ग्वाल्हेर येथे त्यांची राजधानी असली तरी पुण्याच्या राजकारणात त्यांचे महत्त्वाचे स्थान होते व तेथेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ ही छत्री बांधण्यात आली.

त्याशिवाय एका दुमजली सुंदर इमारतीत महादेवाचे मंदिर असून त्याच्या गाभा-यात शिवलिंग आहे. चुनागच्चीच्या सुबक कोरीव काम केलेल्या भिंतीवर स्टेन ग्लासच्या खिडक्या आहेत. आंत गेल्यावर मधोमध उंच सीलिंग असलेला दिवाणखाना असून बाजूने सज्जे आहेत. त्याच्या कडेने शिन्देकुलातील महारथींच्या तसबिरी मांडून ठेवल्या आहेत. गाभा-याची वेगळी इमारत आहे त्यावर अत्यंत सुन्दर रेखीव काम केलेला उंच घुमट आहे. छत्री व देवळाच्या इमारतींच्या भोवताली एखाद्या तुरुंगासारखी पुरुषभराहून उंच भिंत आहे. आत जाण्यासाठी एक कमान व प्रवेशद्वार आहे. त्याच्या समोर एक मोठा जुना वृक्ष आहे.
हे एक ऐतिहासिक आठवणी जाग्या करणारे प्रेक्षणीय ठिकाण आहे. एकंदरीत पहाता वानवडीचा मुक्काम थोडा सत्कारणी लागला असे म्हणायला हरकत नाही.

5 comments:

HAREKRISHNAJI said...

काय योगायोग आहे बघा, परवा दिवशी पुण्याला जाताना इंद्रायणीत याचा हाच होटो पाहीला व कुतुहल जागृत झाले. स्थानाला भेट तर देयची होती, पण ठावठिकाणा माहीत नव्हता, तो आता कळला.
नक्की पत्ता सांगु शकाल का ?

Anand Ghare said...

वानवडी गांव पुणे स्टेशनच्या आग्नेय दिशेला आहे. तिकडे जाण्याचे मला दोन मार्ग माहीत आहेत.
१.पुणे कँपच्या पलीकडे पुणे मिलिटरी कँपमध्ये एएफएमसी लागते. त्याच रस्त्याने पुढे जातांना डाव्या बाजूला वानवडीसाठी फाटा फुटतो.
२. रेसकोर्सहून हडपसरकडे जातांना बिगबाजारपाशी उजव्या हाताला वळल्यावर तो रस्ता वानवडीमधूनच जातो

HAREKRISHNAJI said...

माहीती बद्द्ल धन्यवाद. वानवडी मधे ही जागा नक्की कोठेशी आहे ?

Anand Ghare said...

सेक्रेड हार्ट टाउनशिपजवळ वानवडीच्या मुख्य रस्त्यावर (हडपसर ते साळुंके विहार) महादजी शिंदे यांच्या नांवाचा चौक आहे. तेथून सुमारे १०० मीटरवर असेल.

HAREKRISHNAJI said...

धन्यवाद. शनिवार- रविवार च्या दरम्यान जावुन येईन.