Thursday, May 08, 2008

गांधर्व महाविद्यालय (भाग २)


आज झिम्बाब्वे किंवा ग्वाटेमालासारख्या देशात काय चालले आहे ते आपण घरबसल्या टीव्हीवर पाहू शकतो. शंभर वर्षांपूर्वी कसलीच दृक्श्राव्य माध्यमे उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रत्यक्ष जाऊन पाहणे किंवा वाचन, श्रवण एवढीच माहिती मिळवण्याची साधने असायची. त्यामुळे स्व.विष्णू दिगंबर पलुस्करांनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी आधी स्वतः देशभर भ्रमण करायचे ठरवले. त्या कामासाठी आपल्या गुरूजींचा आशिर्वाद आणि निरोप घेऊन त्यांनी मिरज सोडले आणि ते प्रथम बडोद्याला गेले. त्या काळातले बडोद्याचे महाराज त्यांच्या कलासक्तीसाठी प्रसिध्द होते. गायन, वादन, चित्रकला. शिल्पकला आदी सर्व कलांना ते सढळ हाताने मदत करून प्रोत्साहन देत असत. त्यामुळे बडोदा हे शहर पूर्वी अनेक कलाकारांना आकर्षित करीत असे.

असे असले तरी स्व.पलुस्कर थेट बडोद्याच्या महाराजांच्या चरणी मस्तक ठेवायला गेले नाहीत. त्यांनी तिथल्या एका देवळात आपल्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम ठेवला. देवदर्शनाला येणारी भक्तमंडळी व आजूबाजूला राहणारे लोक यांना तोंडी सांगणे, कांही हँडबिले वाटणे, जाहीर फलक लावणे अशा साधनाने प्रसिध्दी करण्यात आली. अशा प्रकारचे संगीत ऐकणे लोकांना नवीनच होते, पण त्यांना ते खूप
आवडले व त्यांच्या कार्यक्रमाला गर्दी होऊ लागली. याची बातमी महाराजांना लागली आणि त्यांनी सन्मानाने स्व.पलुस्करांना बोलावणे पाठवले. त्यांचे गायन ऐकून त्यांना राजगायकाचे पद देऊ केले.

त्या काळात ही एक मोठी गोष्ट होती. ते पद स्वीकारल्यावर राहण्याजेवण्याची उत्तम सोय होणार होती आणि आयुष्याची ददात मिटणार होती. महाराजांची मर्जी राखून ठेवण्यापुरते त्यांच्या दरबारात गायन केल्यानंतर उरलेला सारा वेळ संगीताची साधना करण्यात घालवता आला असता. पण पलुस्करांना मनापासून जे कार्य करायचे होते ते असे नोकरीत अडकून पडल्यावर करता आले नसते. त्यामुळे त्यांनी
विनम्रपणे नकार दिला आणि आपला मुक्काम हलवला. पुढील तीन चार वर्षे ते भारतभर फिरत राहिले. जागोजागी आपले कार्यक्रम करून दाखवून श्रोत्यांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी मिर्माण करायची तसेच इतर कलाकारांचे गायन ऐकून त्यातल्या बंदिशी, चिजा, गाण्याच्या पध्दती वगैरेंचा अभ्यास करायचा आणि त्यातून आपले ज्ञान व कौशल्य समृध्द करायचे असा दुहेरी कार्यक्रम त्यांनी सुरू ठेवला.

दि.५ मे १९०१ रोजी लाहोरला असतांना त्यांनी गांधर्व महाविद्यालय ही संस्था स्थापन केली आणि तिच्यामार्फत संगीताचे रीतसर शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्या काळी ही कल्पना नवीनच होती. परंपरागत गुरू शिष्य परंपरेने शिकवणारे बुवा किंवा उस्ताद आपापल्या मर्जीप्रमाणे किंवा कल्पनेप्रमाणे आणि शिष्याची कुवत व ग्रहणशक्ती पाहून त्यानुसार त्यांना संगीत शिकवत असत. शाळेय शिक्षणासारखा पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तके, परीक्षा पध्दती वगैरे कांहीसुध्दा या क्षेत्रासाठी त्या काळात अस्तित्वात नव्हते, कदाचित इतर कोणी त्याची कल्पनाही केली नसेल. पलुस्करांनी मात्र हे सगळे योजून ठेवले होते.

त्यांनी संगीताच्या शिक्षणातील प्रगती मोजण्याच्या पाय-या निर्माण केल्या. या कल्पनेचा विकास होऊन प्रारंभिक, प्रवेशिका (प्रथम व पूर्ण), मध्यमा (प्रथम व पूर्ण), विशारद (प्रथम व पूर्ण), अलंकार (प्रथम व पूर्ण) अशा श्रेणी निर्माण झाल्या. सुरुवातीला लहान मुलांच्या लक्षात राहतील अशी गाणी त्यांना चालीवर शिकवायची. यासाठी त्या काळातल्या बंदिशी न घेता पलुस्करांनी सोपी भजने निवडून त्यांना
रागदारीवर आधारलेल्या चाली लावल्या आणि ती शिकवायला सुरुवात केली. चाली लक्षात राहिल्यावर त्यांच्या आधाराने थोडे आलाप, ताना घ्यायला शिकवायच्या असे करत मुलांना गोडी वाटेल अशी हळू हळू प्रगती करीत त्यांना रागदारीचे ज्ञान ते देत जात असत. गोविंदराव पलुस्करांनी याची कांही उदाहरणे गाऊन दाखवली. अशा गाण्यांच्या छोट्या पुस्तिका स्व.विष्णू दिगंबरांनी खास तयार करवून घेतल्या होत्या.

स्व.विष्णू दिगंबर पलुस्करांनी विद्यार्थ्यांची दोन गटात विभागणी केली होती आणि ते त्यांना वेगवेगळ्या स्तरावर शिक्षण देत असत. सर्वसाधारण विद्यार्थ्यांना वर सांगितलेल्या पध्दतीने शिकवीत असत, तर कांही निवडक विद्यार्थ्यांना ते पुढे जाऊन संगीतशिक्षक बनावेत अशा हेतूने वेगळ्या पध्दतीने शिकवत असत. स्वतः उत्तम गाता येणे आणि शास्त्रशुध्द गायन समजून ते शिकवता येणे या वेगळ्या गोष्टी
आहेत हे त्यांना पूर्णपणे माहीत होते. त्यामुळे ज्यांनी शिक्षक बनावे असे त्यांना वाटले त्यांना ते स्वर, ताल, लय यांचेविषयीचे मूलभूत ज्ञान विस्तारपूर्वक देत, रागदारीमधील बारकावे समजावून सांगत, स्वरलिपीमध्ये प्राविण्य मिळवायला शिकवीत अशा अनेक प्रकाराने त्यांची उत्तम तयारी करवून घेत असत. कांही लोकांना दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे जमतात अशीही उल्लेखनीय उदाहरणे आहेत. मात्र
परंपरागत पध्दतीत स्वतः अधिकाधिक नैपुण्य मिळवण्यावर भर असे, तर पलुस्करांनी द्रष्टेपणाने संगीतशिक्षकांची पिढी तयार केली आणि संगीताच्या प्रसारकार्यासाठी त्यांना लखनऊ, काशी वगैरे ठिकाणी पाठवून दिले. तिथे जाऊन त्यांनी वेगवेगळ्या संस्थांमधून कार्य करून शास्त्रीय संगीताचा प्रसार केला अशी कांही उदाहरणे गोविंदरावांनी सांगितली.

शास्त्रीय संगीताला आता उच्चभ्रू वर्गात सन्मानाचे स्थान मिळाले आहे. आकर्षक वाटणा-या पाश्चात्य संगीताच्या कोलाहलातसुध्दा अभिजात हिंदुस्थानी संगीत आपली लोकप्रियता टिकवून आहे. हे सगळे होण्यामागे स्व. विष्णू दिगंबर पलुस्करांनी केलेल्या तपश्चर्येचा मोठा वाटा आहे असे म्हणावेच लागेल. त्यांनी सुरू केलेल्या गांधर्व महाविद्यालय या संस्थेने शंभर वर्षाहून अधिक काळ हा ज्ञानयज्ञ प्रज्वलित ठेवला आहे. येणा-या काळात हे काम पुढे नेण्यासाठी कांही नव्या योजना विचाराधीन आहेत असे सूतोवाच संस्थेच्या पदाधिका-यांनी केले. ठराविक कालावधीने या संस्थेच्या निवडणुका होतात आणि नवी मंडळी तिच्या कार्याची धुरा खांद्यावर घेऊन मोठ्या उत्साहाने आणि समर्थपणे ती वाहून नेतात हे गेली पंचवीस तीस वर्षे मी दुरूनच कां होईना, पण पहात आहे. त्यामुळे ती यापुढेही अशीच चैतन्याने भारलेली राहील अशी मला खात्री वाटते.

1 comment:

Dhananjay said...

Good article! Khare ahe. Pt Paluskar, Prof Deodhar sarkhya loka mulech aaj aapan shastriya sangeetacha anand gheu shakto.