Saturday, May 10, 2008

भक्ती आणि शक्ती


आजच्या जमान्यातले प्रसिध्द शिल्पकार श्री. मदन गर्गे यांचे मागील महिन्यात अत्यंत दुर्दैवी अपघाती निधन झाले. त्यापूर्वीच घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीचे प्रक्षेपण काल आणि आज ईटीव्हीच्या संवाद या कार्यक्रमात दाखवण्यात आले. एक असामान्य कलाकार सामान्य माणसापेक्षा किती वेगळ्या प्रकाराने विचार करत असतो याचे प्रत्यंतर या मुलाखतीतील वाक्यावाक्यात येत होते. कै.गर्गे यांनी मुंबईच्या
जे.जे. कला महाविद्यालयामध्ये शिल्पकलेचे रीतसर शिक्षण प्राप्त करून त्यात सुवर्णपदक मिळवले होते. पाश्चात्य व भारतीय अशा दोन्ही प्रकारच्या विविध परंपरागत शैलींचा तसेच आधुनिक शिल्पकलेचा अभ्यास त्यांनी केला होताच, ब्राँझ, दगड व सिमेंट या टिकाऊ माध्यमांचा कुशलतेने वापर करण्यात प्राविण्य मिळवले होते. त्यांनी घडवलेली अनेक शिल्पे गांवोगांवी उभी आहेत. आपल्या शिल्पांना
'पुतळा' म्हणणे त्यांना पसंत नव्हते. संपूर्ण मुलाखतीत ते त्यांचा उल्लेख शिल्प किंवा शिल्पकृती असाच करत होते. त्यांनी दोनशेवर सुरेख शिल्पे घडवली असून ती देशातच नव्हे तर परदेशातही नांवाजली गेली आहेत. पॅरिसमधील महात्मा गांधी यांचे पंधरा फूट उंचीचे शिल्प आणि पुण्याजवळ निगडी येथे उभे केलेले छत्रपती शिवाजी आणि संतसिरोमणी तुकाराम यांची भेट दाखवणारे पस्तीस फूट उंचीचे शिल्प ही शिल्पे त्यांच्या कलाविष्कारांची सर्वोच्च शिखरे दाखवतात.


या कलाकृतीबद्दल बोलतांना त्यांनी जी माहिती सांगितली त्यातून त्यांचे विलक्षण वेगळेपण दिसत होते. आपले शिल्प कशा प्रकारचे असावे याबद्दल ते कल्पनातीत खोलवर विचार करतात. त्यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी आणि संत तुकाराम हे समकालीन होते हे तर नक्कीच, पण त्यांची भेट नेमकी कधी आणि कुठे झाली याबद्दलचा ऐतिहासिक दस्तऐवज सापडला नाही. या दोन्ही महान व्यक्तींबद्दल
सर्वसामान्य सुशिक्षित मराठी माणसाला जसा मनापासून आदर वाटतो आणि बरीचशी माहिती असते तशी त्यांना होतीच. त्यातही सामान्य माणसाला जेवढे डोळ्यासमोर असते तेवढे दिसते पण कलाकार नेहमी त्याच्या पलीकडे जाऊन पहाण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे कै. गर्गे यांच्या मनात या दोन्ही विभूतींच्या रेखीव प्रतिमा जास्तच खोलवर कोरलेल्या होत्या. तरीसुध्दा प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी
त्यांनी इतिहासाच्या पानांची पुन्हा उजळणी केली, ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या आणि त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ते तिथली 'व्हायब्रेशन्स' घेऊन आले. शिल्पाचा विषय अशा प्रकारे स्वतःच्या रोमरोमात भरून घेतला आणि त्या कामात स्वतःला झोकून दिले.


संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचा प्रसंग कै. शांतारामबापूंनी तयार केलेल्या चित्रपटात मोठ्या नाट्यमय पध्दतीने रंगवला आहे. महाराजांचे हितशत्रू ही खबर त्यांच्या वै-याला देतात आणि कोठलासा खान त्यांना पकडण्यासाठी त्या जागेवर अचानक सशस्त्र हल्ला करतो. त्यावेळी विठ्ठलाच्या मायेने त्याला सगळेच श्रोते हुबेहूब शिवाजीसारखे दिसू लागतात आणि त्यामुळे चक्रावून तो माघारी जातो असा चमत्कार त्या सिनेमात दाखवला आहे. कै. गर्गे यांनी असे कांही दाखवण्याचा विचारही मनात आणला नसता. बहुतेक चित्रकारांनी या प्रसंगात शिवाजी महाराजांनी आपले मस्तक संत तुकारामांच्या चरणावर ठेवल्याचे दाखवले आहे. ज्या लोकांनी हे शिल्प उभे करायचे ठरवले होते त्यांचाही असाच मानस होता, पण कै.गर्गे यांच्या मनात वेगळी कल्पना होती ती त्यांनी त्या लोकांना पटवून दिली.


या शिल्पातून फक्त संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोन महान व्यक्तीच न दाखवता त्यातून भक्ती आणि शक्ती यांचा सुरेख संगम दाखवावा अशी संकल्पना त्यांनी मांडली. वयाने संत तुकाराम शिवाजी महाराजांपेक्षा वीसबावीस वर्षांनी मोठे होते हा फरक त्यात दिसायला हवा. शिवाजी महाराजांनी तुकारामांच्या पायावर डोके ठेवले असलेल्या प्रसंगात त्यांच्या अंगातील शक्तीचे प्रदर्शन
करता आले नसते. त्यामुळे ते एका वीराच्या पवित्र्यात ताठ उभे आहेत आणि फक्त त्यांनी आपली नजर खाली वळवली आहे, तसेच तुकारामांनी एक हात त्यांच्या खांद्यावर ठेऊन त्यांना शाबासकी तसेच आशिर्वाद देत दुसरा हात वर उंचावला आहे असे गर्गे यांनी दाखवले आहे. शक्ती आणि भक्ती या दोन भावना अशा प्रकारे त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट होतात. दोघांच्याही भव्य प्रतिमांमधून कलाकाराचे अद्भुत
कौशल्य तर दिसतेच. आजूबाजूला मांडलेल्या इतर कलाकृतीसुध्दा अतीशय देखण्या आणि चैतन्यपूर्ण आहेत.


या दोन भव्य प्रतिमांच्या बाजूला त्यांच्या अनुनायांच्या छोट्या छोट्या सुबक प्रतिमा आहेत. त्यात हातात भगवा ध्वज घेतलेले, तलवार पाजळून लढाईच्या मोहिमेवर निघालेले मावळे पुण्याच्या दिशेने एका रांगेत दाखवले आहेत तर टाळ, मृदुंग, वीणा धारण करून भजनात दंग असलेले वारकरी देहूच्या दिशेला आहेत. पराक्रम करून युध्द जिंकायला निघालेले मावळे बहिर्गामी वर्तुळाच्या (कॉन्व्हेक्स) चंद्रकोरेच्या
आकारात दाखवले आहेत तर अंतर्मुख होऊन परमार्थसाधना करणारे वारकरी अंतर्गामी (कॉन्केव्ह) वक्ररेषेत उभे आहेत. इतका सूक्ष्म विचार कै. गर्गे यांच्यासारखा संवेदनशील आणि व्यासंगी कलाकारच करू जाणे. सामान्य माणूस तितका विचार करेल किंवा करणार नाही पण याचा प्रभाव त्याच्या मनावर पडतोच.


असे हे अद्भुत शिल्प समस्त पुणेकरांनी पाहिले असेलच, मुंबईहून पुण्याला जाणा-या लोकांनीही कधी तरी जुन्या पुणे मुंबई मार्गाने चिंचवड, निगडी, देहू रोड या वाटेने जातांना ते पाहिले असेल आणि क्षणभर थांबून डोळ्यात सांठवून घेतले असेल. नसेल तर पुढच्या ट्रिपमध्ये तसे जरूर करावे.

1 comment:

Asha Joglekar said...

गेल्या डिसेंबर मधेच आम्ही देहू आळंदी दिवेआगर ला जाऊन आलो त्या वेळी पुण्याला परततांना निगडी ला मुद्दाम थांबून हा भक्ती आणि शक्ती संगम बघितला। तुमच्या ह्या लेखामुळे त्याची परत एकदा आठवण झाली. आभार.