Sunday, May 11, 2008

सूर्याचे न चालता चालणे

खगोलशास्त्रामधील नवनव्या घडामोडींची माहिती देणारे अभ्यासपूर्ण लेख तज्ञ मंडळी लिहीत असतात. या शास्त्रामधील कांही महत्वाचे शोध आधी कोणी लावले यावर अनेक वेळा वादविवाद होत असतात. "सूर्याचे न चालता चालणे" हा ज्ञानेश्वरीमधील एका ओवीचा भाग या संदर्भात उद्धृत केला जातो. हे चालणे कसकशा प्रकारचे असते याची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न या लेखात करीत आहे.

रोज सकाळी पूर्व दिशेला क्षितिजावर सूर्याचे लालचुटुक बिंब उदयाला येते. हा सूर्य प्रखर होता होता आकाशात वर वर चढत जाऊन माध्यान्हीला माथ्यावर येतो. त्यानंतर पश्चिमेकडे खाली उतरत संध्याकाळी त्याचे फिकट पडत जाणारे बिंब क्षितिजाला टेकून अदृष्य होते. हे दृष्य आपल्या सहाराष्ट्रात, किंवा ऊष्ण कटिबंधात सर्वत्र वर्षभर दिसते. एकदा डिसेंबर अखेरीस मी इंग्लंडमध्ये होतो. तिथे मात्र
आकाशाच्या दक्षिणेकडच्या छोट्याशा भागातच सकाळी तो डावीकडे उगवायचा, तिरका चालत भर दुपारी जेमतेम हातभर वर यायचा आणि संध्याकाळी उजवीकडच्या बाजूला अस्तंगत व्हायचा. हा सगळा प्रवास ७-८ तासात आटपायचा आणि घराच्या एका बाजूच्या खिडकीतूनच दिसायचा. दुस-या बाजूच्या खिडकीवर त्या दिवसात सूर्यप्रकाश पडतच नसे. आणखी उत्तरेला ध्रुवाजवळ गेल्यावर सूर्याचे दर्शनसुध्दा झाले नसते तर दक्षिण ध्रुवाजवळ तो चोवीस तास क्षितिजाभोवती घिरट्या घालतांना दिसला असता. तिथे उदयही नाही आणि अस्तही नाही. सूर्याचे हे वेगवेगळ्या प्रकारचे चालणे दररोज घडत असते.

पुढील माहितीसाठी आपण महाराष्ट्रात परत येऊ. रात्र झाल्यावर तगेच आकाशांत चांदण्या (ग्रह, तारे) दिसू लागतात, शुक्ल पक्षामध्ये सूर्य मावळताच चंद्र चमकतांना दिसतो. कृष्ण पक्षात तो सूर्यास्तानंतर उगवतो. त्या चांदण्यांकडे लक्ष देऊन पाहिल्यावर त्यांमधील फक्त एक ध्रुव तारा एका जागी स्थिर असून त्याच्या आजूबाजूच्या कांही चांदण्या त्याच्याभोवती फिरत आहेत असे दिसते. इतर सर्व चांदण्या इतक्या दूर असतात की आपण त्यांचा ध्रुवाबरोबर संबंध जोडू शकत नाही. सूर्यास्ताच्या वेळी त्या ज्या ठिकाणी असतील तेथून पश्चिमेकडे सरकत जात क्षितिजावरून मावळतांना दिसतात. तसेच पूर्वेच्या क्षितिजावरून नवनव्या तारका उगवून पश्चिम दिशेकडे जातांना दिसतात. याचाच अर्थ फक्त सूर्यच नव्हे तर चंद्र व इतर चांदण्यासुध्दा आकाशात सतत पूर्वेकडून पश्चिमेकडे जातांना आपल्या डोळ्यांना दिसतात व चक्षुर्वैसत्यम् या न्यायाने त्या आकाशमार्गे तसा प्रवास करीत असणार असेच सर्वसामान्य माणसाला वाटेल. हे झाले पहिल्या प्रकारचे चालणे.

या चालण्यावर परंपरागत पध्दतीने विचार करतांना सर्व सामान्य बुध्दीला एक गोष्ट समजत नाही. ती म्हणजे पश्चिमेकडे मावळलेले सूर्य,चंद्र व चांदण्या पूर्वेला कसे उगवतात? ते इकडून तिकडे जमीनीखालील एखाद्या बोगद्यातून सरपटत जातात कां ? पण तसा बोगदा तर कुठेच दिसत नाही. जमीनीखालील दुस-या एका आभाळातून ते वर्तुळाकार फिरतात कां? पण जमीनीखाली तर पाताळलोक आहे. तिथे आभाळ कसे असेल? असल्यास त्यातून जमीन खाली पडणार नाही कां? दररोज पूर्व दिशेला क्षितिजाखाली नवनवीन सूर्य चंद्र निर्माण होऊन ते पश्चिमेला क्षितिजाखाली नष्ट होत असतील कां ? पण ते तर चिरकाल राहणारे आहेत म्हणून यावत्चद्रदिवाकरौ असा वाक्प्रचार निर्माण झाला. सूर्यास्तानंतर आभाळभर एकदम दिसू लागणा-या चांदण्या कोठे निर्माण होतात? प्राचीन कालापासून अशा अनंत प्रश्नांनी जगभरातील अनेक विचारवंतांना छळले असेल. पण किती लोकांना त्याचे सयुक्तिक उत्तर मिळाले ?

आकाशातील लक्षावधी चांदण्या कधीही इतस्ततः भरकटत नाहीत, त्या नेहमी एकमेकापासून ठराविक अंतर ठेऊन समान वेगाने चालतात व त्यांचे समूह बनवले तर त्या समूहाचा आकार कधीही बदलत नाही असे त्यांचे निरीक्षण करणा-या विद्वानांना दिसले. त्यांनी आकाशाच्या संपूर्ण गोलाची संत्र्याच्या फोडीच्या आकाराच्या बारा भागात विभागणी करून प्रत्येक भागाला त्या भागात दिसणा-या तारकांपासून बनू शकणा-या आकारांची मेष, वृषभ इत्यादि नांवे दिली. बारा राशींचे हे नामकरण करणा-या विद्वानांची कल्पनाशक्ती अचाट असणार. निदान मला तरी वृश्चिक राशीतील विंचवाची नांगी सोडली तर बकरा, बैल, सिंह वगैरे प्राण्यांचा भास कधी झाला नाही. पण असामान्य कल्पकतेने चांदण्यांच्या समूहांच्या अमूर्त आकारांना मूर्त रूपे देऊन त्याच्या आधाराने त्यांनी आकाशाचा एक नकाशा निर्माण केला व खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी त्याचा उपयोग करून घेतला.

प्रामुख्याने चमकणारे शुक्र, गुरू, मंगळ वगैरे ग्रह मात्र तारकांच्या कुठल्याही समूहात सामील न होता सतत इतर चांदण्यांच्या जवळ किंवा त्यांच्यापासून दूर सरकत असतांना दिसतात. जरी अधून मधून मागे पुढे सरकतांना आढळले तरी ते मुख्यतः मेष, वृषभ, मिथुन या क्रमानेच बारा राशीमधून (आकाशाच्या विभागातून) भ्रमण करतात असे बारकाईने निरीक्षण केल्यास दिसते. मीन रास ओलांडल्यानंतर ते
पुनः मेष राशीत प्रवेश करून नवे परिभ्रमण सुरू करतात. सूर्य आभाळात असेपर्यंत कोणतेच तारे दिसत नाहीत. पण सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजानरील तारे आणि सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजावरील तारे पाहिल्यावर त्या दोन्ही वेळी सूर्याच्या आगेमागे कोणत्या चांदण्या आहेत ते समजते व त्यावरून सूर्य कोणत्या राशीत आहे याची कल्पना येते. ते पहात गेल्यास सूर्यसुध्दा आकाशाच्या मेष, वृषभ या विभागात त्या क्रमानेच पुढे पुढे सरकत असल्याचे समजते. कोठल्याही क्षणी कोणचा ग्रह आकाशाच्या कोणत्या भागात आहे हे तो अमक्या तमक्या राशीमध्ये आहे अशा शब्दात सांगितले जाते. कुंडली हा एक प्रकारचा नकाशा असतो व त्यात बारा राशींची बारा घरे विशिष्ट क्रमाने मांडलेली असतात व हे ग्रह त्या क्षणी ज्या ठिकाणी असतील तेथील राशीच्या चौकटीत दाखवतात. हा सारा प्रवास संथ गतीने सुरू असतो. मुंबईहून दिल्लीला जाणारी आगगाडी जशी महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश वगैरे राज्यांच्या सीमा पार करत जाते तसे ते एकामागून एक राशी ओलांडत जातात. कोणचाही ग्रह कधी टुणकन उडी मारून एका घरातून दुस-या घरात जात नाही.

रात्रीच्या वेळी जेंव्हा आकाशात मेष रास पश्चिम क्षितिजावर टेकलेली दिसते तेंव्हा तिच्या मागून वृषभ, मिथुन, कर्क, सिंह व कन्या या राशी पूर्वेकडे क्रमवार पसरलेल्या दिसतात. जसजशा त्या एकामागून एक अस्त पावतात तसतशा तूळ, वृश्चिक वगैरे उरलेल्या राशी पूर्वेला उगवून वर चढतात. याचाच अर्थ त्या राशीचक्रामधून भ्रमण करणारे सूर्य, चंद्र व इतर ग्रह ही यात्रा पश्चिमेकडून पूर्वेकडे या दिशेने करतात. त्यांचे हे दुस-या प्रकारचे विरुध्द दिशेने चालणे मात्र प्रत्यक्ष डोळ्याला कधीही दिसत नाही, पण राशीचक्राच्या आधाराने त्यांचा वेध घेणा-या निरीक्षकांना निश्चितपणे जाणवते. सूर्योदयापासून अस्तापर्यंतचे त्याचे पहिल्या प्रकारचे चालणे साध्या डोळ्यांना दिसते यामुळे अनादि कालापासून सर्वसामान्य माणसांनीसुध्दा ते पाहिलेले आहे. दुस-या प्रकारचे बारा राशीमधून त्याने केलेले भ्रमण सुध्दा निदान कांही हजार वर्षापासून विद्वानांना माहीत असावे असे पुरातन वाङ्मयातील उल्लेखावरून दिसते. हे दोन्ही प्रकारचे चालणे कशामुळे घडते याचा विचार करून जाणत्या लोकांनी आपापले तर्क व सिध्दांत वेळोवेळी मांडले असणार. तसेच आकाशाचे नेमके स्वरूप कसे आहे याबद्दल सुध्दा विचार झालाच असेल. आकाश, अवकाश, ग्रह, तारे वगैरेबद्दल मांडल्या गेलेल्या संकल्पनातून ज्या तत्कालिन किंवा मागून आलेल्या विद्वज्जनांनी मान्य केल्या त्यांचा पुढील पिढीच्या शिक्षणाच्या अभ्यासात समावेश झाला व या प्रकारे ते ज्ञान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचले.

"दिसते तसे नसते म्हणून जग फसते" या उक्तीप्रमाणे सूर्याचे हे दोन्ही प्रकारचे चालणे हा निव्वळ दृष्टीभ्रम आहे असे कोपरनिकसने ठामपणे सांगितले. पृथ्वीच्या स्वतःभोवती गिरकी घेण्यामुळे सूर्याचे पहिल्या प्रकारचे चालणे होत असल्याचा भास निर्माण होतो व त्याचेबरोबर चंद्र, ग्रह व तारे सुध्दा आपल्याभोवती फिरतांना दिसतात हे त्याने सिध्द केले. तसेच सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वीच सूर्याभोवती फिरत आहे हेसुध्दा गणिताच्या आधाराने दाखवून दिले. प्रत्यक्षात पृथ्वीला फिरतांना पाहण्यासाठी आपल्याला सूर्यमालिकेपासून दूर अंतराळात जावे लागेल आणि ते आजही शक्य नाही.

गुरू, मंगळ वगैरे ग्रह सूर्याभोवती फिरतात तसेच पृथ्वीसुध्दा सूर्याभोवती फिरते. यामध्ये मंगळ, गुरू व शनि हे बाह्य ग्रह सूर्याभोवती फिरता फिरता पृथ्वीप्रदक्षिणा सुध्दा करतात तर पृथ्वी सूर्याभोवती फिरतांना बुध व शुक्र यांच्याही सभोवती फिरते. या सर्वांच्या कक्षा व गति वेगवेगळ्या असल्यामुळे कांही ग्रह कधी कधी वक्री होतात असा भास होतो हे त्याने किचकट गणिताद्वारे दाखवून दिले व पृथ्वीच्या
सूर्याभोवती होणा-या भ्रमणामुळेच सूर्याच्या दुस-या प्रकारच्या चालण्याचा भास निर्माण होतो असे त्याने सांगितले. चंद्र मात्र खरोखरीच पृथ्वीभोवती फिरत असल्यामुळे त्याचे दुस-या प्रकारचे चालणे हा भास नसून ते सत्य आहे. मात्र तो जेवढ्या वेगाने पृथ्वीभोंवती फिरतो त्याच्या अनेकपट वेगाने तोसुध्दा सूर्याभोंवती फिरत असतो हे सत्य मात्र आपल्याला मुळीसुध्दा जाणवत नाही.

या सगळ्या गोष्टींचा निरीक्षण व विश्लेषण या द्वारे सखोल अभ्यास करून त्याने आपले सिध्दांत मांडले होते. तरीसुध्दा तत्कालिन इतर विद्वानांना ते मान्य नव्हते याची कल्पना असल्याने त्याने ते प्रसिध्द न करता फक्त लिहून ठेवले. तो मरणासन्न अवस्थेत असतांना त्याच्या कांही चाहत्यांनी ते छापून प्रसिध्द केले. पण त्याच्या मृत्युनंतर त्यावर मोठे वादळ उठले. त्यानंतर आलेल्या केपलर या शास्त्रज्ञाने मात्र त्याचे विचार उचलून धरले एवढेच नव्हे तर त्यात महत्वाच्या सुधारणा करून त्यामधील कांही तृटी दूर केल्या. तसेच ग्रहांच्या कक्षा व फिरण्याचा वेग यांची समीकरणे मांडली. गॅलीलिओने दुर्बिणीतून सूक्ष्म निरीक्षणे करून त्याला दुजोरा दिला व त्यानंतर आलेल्या सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचे नियम शोधून काढले व या सिध्दांतांना भरभक्कम शास्त्रीय आधार दिला. त्यानंतर वैज्ञानिक क्षेत्रात ते सर्वमान्य झाले व सामान्यज्ञानात त्याचा समावेश झाला. हे सर्व घडायला शंभर वर्षापेक्षा अधिक काळ लागला.

सूर्याच्या चालण्याचे याशिवायही कांही प्रकार आहेत. कधी तो ढगाआड लपतो किंवा ढगामागून बाहेर येतो असे आपण म्हणतो पण हा प्रकार मुख्यतः ढगांच्या हालचालीमुळे होतो हो आपल्यालाही ठाऊक असते. साहित्यिक क्षेत्रात तो पायी चालतच नाही, सात घोडे जुंपलेल्या रथांत बसून विहार करतो. संपूर्ण विश्व प्रसरण पावत असून सूर्यासह सारे तारे आपापल्या ग्रहमालिकांना बरोबर घेऊन विश्वाच्या केन्द्रापासून दूर दूर जात आहेत असे म्हणतात. पण कांही विद्वानांना ते मान्य नाही. कदाचित ही प्रत्यक्ष घडत असलेली सूर्याची सफर आपल्याला जाणवत सुध्दा नाही. त्याला कदाचित सूर्याचे "चालता न चालणे" म्हणावे लागेल.

No comments: