Sunday, November 17, 2013

मंगलयान - भाग १


पाच वर्षांपूर्वी भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांनी मिळून चंद्रयानाची मोहीम यशस्वी करून दाखवली होती. त्या वेळी या निमित्याने मी एक लेखमाला लिहिली होती. त्यात सुरुवातीला गुरुत्वाकर्षणाच्या नियमांसंबंधी सांगून झाल्यानंतर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करून आकाशात झेप घेण्याच्या मानवाच्या प्रयत्नांची माहिती दिली होती. हवेपेक्षा जड असूनसुद्धा हवेत तरंगत पुढे जाणारी विमाने, वातावरणाला भेदून त्याच्या पलीकडे जाणारे अग्निबाण (रॉकेट्स), पृथ्वीपासून बरेच दूर जाऊनही तिच्याभोवती फिरत राहणारे अनेक प्रकारचे कृत्रिम उपग्रह (सॅटेलाइट्स) आणि चंद्रापर्यंत जाणारी याने या त्यातल्या महत्वाच्या टप्प्यांविषयी सविस्तर माहिती मी त्या लेखमालेत करून दिली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या मंगळयानाच्या उड्डाणामुळे आता भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांनी त्याच्या पुढचे महत्वाचे पाऊल सध्या तरी फक्त उचलले आहे. सुमारे वर्षभरानंतर ते यान मंगळापर्यंत जाऊन पोचेल आणि तिथली माहिती पाठवू लागेल तेंव्हा हे पाऊल पुढे पडले असे म्हणता येईल.

वर्तमानपत्रांमधून या प्रयोगाची थोडी कुचेष्टा झाली आणि त्याला थोडा विरोधसुद्धा केला गेला. सगळ्याच नव्या कल्पना या चक्रातून जात असतात, हे अपरिहार्य आहे. पण या वेळी टीका करणा-यांपेक्षा अधिक लोकांनी कौतुकसुद्धा केले हे महत्वाचे आहे. काही लोकांना मात्र या बातमीचे विशेष महत्वच वाटले नाही. एकदा तुमच्याकडे मोटरगाडी आली आणि ती चालवता यायला लागली की त्यानंतर त्यात बसून मुंबईहून ठाण्याला जा, पुण्याला जा किंवा सोलापूरला जा, त्यात विशेष असे काय आहे? लागेल तेवढे पेट्रोल भरायचे आणि हवी तेवढी गाडी पळवायची! त्याच प्रमाणे एकदा आपले यान चंद्रावर गेले असल्यानंतर दुस-या यानाला मंगळावर पाठवायचे असेल तर त्यासाठी मोठे रॉकेट घ्यायचे, त्यात भरपूर इंधन भरायचे आणि त्याला मंगळापर्यंत पाठवून द्यायचे अशी अनेक लोकांची कल्पना असणे शक्य आहे. त्यासाठी तब्बल पाच वर्षे कशाला लागली? असेही त्यांना वाटले असेल

फेसबुकावरल्या माझ्या काही मित्रांनी तर हे यान इतके किलोमीटर जाणार आहे आणि त्यासाठी इतका खर्च होणार आहे वगैरेंचे त्रैराशिक मांडून दर किलोमीटरमागे फक्त बारा रुपये एवढा खर्च येणार आहे हे उत्तर काढले आणि हे मुंबईमधल्या टॅक्सीभाड्यापेक्षाही स्वस्त असल्याचे दाखवून दिले. अवकाशामधल्या (स्पेसमधील) निर्वात पोकळी(व्हॅक्यूम)मधून पुढे जात राहणा-या वाहनाला कसलाच विरोध नसतो, त्यामुळे तिथे भ्रमण करतांना ऊर्जा खर्च होत नाही आणि ती पुरवावीही लागत नाही. हे कदाचित त्यांच्या लक्षात आले नसेल. जवळचे उदाहरण घ्यायचे झाल्यास उतारावरून सायकल चालवतांना पायाने पॅडल मारावे लागत नाही. पण सायकल रस्त्यावरच रहावी यासाठी हातांनी हँडल धरून गरज पडल्यास मनगटाच्या जोराने ते थोडेसे वळवावे लागते. जोराने पॅडल मारतांना अंगाला घाम येतो, दम लागतो तसले काही सायकलचे हॅडल वळवतांना होत नाही, कारण त्यासाठी अगदी नगण्य असे परिश्रम करावे लागतात. त्याचप्रमाणे अवकाशात पाठवलेल्या चंद्रयान किंवा मंगळयान यांनाही वेळोवेळी आपली दिशा बदलण्यासाठी जोर लावावा लागतो, त्यात थोडे इंधन ख्रर्च होते. पण रॉकेटमध्ये भरलेले बहुतांश मुख्य इंधन त्याला सुरुवातीला जमीनीवरून प्रचंड वेगाने उड्डाण करण्यातच भस्म (किंवा वाफ) होऊन जाते. त्या वेळी निघालेला त्याच्या आगीचा भयानक भडका पाहूनच याची कल्पना येईल. आणखी काही दिवसांनी पृथ्वीला टा टा, बाय बाय करून हे मंगळयान मंगळ ग्रहाला भेटायला जायला निघेल त्यानंतरचा काही कोटी किलोमीटरचा त्या यानाचा प्रवास चकटफूच होईल. मंगळाजवळ गेल्यानंतर त्याला आपला मार्ग बदलून त्याच्या कक्षेत शिरण्यासाठी पुन्हा थोडे इंधन जाळावे लागेल.

हे असे असेल, तर मग चंद्राहून शेकडोपट दूर अंतरावर असलेल्या मंगळापर्यंत पोचण्यासाठी तितक्या पटीने इंधनाचीही गरज पडत नाही. यामुळे हे काम जास्तच सोपे व्हायला पाहिजे आणि एका दृष्टीने पाहता तसे आहे. पण हा मार्गच फार वेगळा असल्यामुळे त्यातली आव्हानेही अनेकपटीने कठीण आहेत. यामुळेच जगातल्या मोजक्या प्रगत देशांनी ती आतापर्यंत पेलली आहेत. दुस-या महायुद्धानंतर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (थोडक्यात यूएसए किंवा फक्त अमेरिका) आणि सोव्हिएट युनियन (यूएसएसआर किंवा रशिया) या दोन महाशक्ती उदयाला आल्या आणि जगावर वर्चस्व गाजवण्यासाठी त्यांच्यात चढाओढ सुरू झाली. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपणच जास्त प्रगत आहोत असे जगाला दाखवणे हा त्या स्पर्धेचा एक भाग होता. अवकाशविज्ञानाच्या (स्पेस सायन्स) बाबतीत रशियाने सुरुवातीला थोडी आघाडी मिळवली होती. स्पुटनिक हा पहिला उपग्रह, लायका ही कुत्री आणि युरी गागारिन हा पहिला कॉस्मोनॉट यांना अवकाशात पाठवण्यात त्या देशाने पहिला मान मिळवला. १९६१ साली युरी गागारिनने अंतराळात जाऊन यायच्याही आधी १९६० सालापसून रशियाने मंगळावर यान (स्पेसक्राफ्ट) पाठवण्याचे प्रयत्न सुरू केले होते, पण पहिल्या दहा वर्षांमध्ये ते ओळीने नऊ वेळा अपयशी ठरल्यानंतर १९७१ साली त्यांचा दहावा प्रयत्न यशस्वी झाला. अमेरिकेने त्या मानाने उशीरा सुरुवात केली असली तरी दुस-याच प्रयत्नात म्हणजे १९६५ साली त्यांचे यान मंगळापर्यंत जाऊन व्यवस्थितपणे पोचले. त्यानंतर काही प्रयोगांमध्ये अमेरिकासुद्धा यशस्वी होऊ शकली नाही. आतापर्यंत मंगळावर यान पाठवण्याचे ५१ प्रयत्न केले गेले आहेत, पण त्यातल्या फक्त २१ वेळा त्यांना यश आले आहे. त्यातले युरोपियन स्पेस एजन्सीचे दोन आहेत आणि बाकीचे प्रयत्न अमेरिका किंवा रशियाचे आहेत. युनायटेड किंग्डम (थोडक्यात इंग्लंड), जपान आणि चीन या देशांना अजूनपर्यंत यश आलेले नाही. भारताचा प्रयत्न आता नुकताच सुरू झाला आहे.

हिमालयातल्या अमरनाथ गुहेमधल्या बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन वर्षामध्ये फक्त काही दिवसच घेता येते असे म्हणतात. तो कालखंड सोडून इतर वेळी कोणीही यात्रेकरू तिथे जाऊ शकत नाही. पृथ्वीवरून मंगळावर जायचे असल्यास आपल्या मनाला वाटेल तेंव्हा कधीही तिकडे जाता येत नाही. आकृती क्र.१ मध्ये पाहिल्यास पृथ्वी आणि मंगळ हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या जवळ आलेले दिसतात, तशा परिस्थितीत ते सहज शक्य वाटते. पण या दोन ग्रहांमधले अंतर इतके जास्त आहे की ते पार करेपर्यंत काही महिने निघून जातील. तोपर्यंत ते दोघेही कुठल्या कुठे गेलेले असतील. आकृती क्र.२ मध्ये पाहिल्यास पृथ्वी आणि मंगळ हे दोन्ही ग्रह एकमेकांच्यापासून खूप दूर गेलेले दिसतात, इतकेच नव्हे तर ते सूर्याच्या दोन विरुद्ध बाजूला असतात. म्हणजे त्या यानाने मंगळाकडे जाण्यासाठी सूर्याच्या जवळून जायला पाहिजे आणि तसे गेले तर सूर्याच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाने ते त्याच्याकडे खेचले जाईल आणि त्याच्यापर्यंत जाऊन पोचायच्या आधीच सूर्यप्रकाशामधील ऊष्णतेनेच त्याची वाफ होऊन जाईल. या सगळ्यांचा विचार करता मंगळावर जाण्याची मोहीम काही विशिष्ट कालखंडातच हाती घेणे शक्य असते. क्र.१ मध्ये दाखवल्याप्रमाणे सूर्य, पृथ्वी आणि मंगळ हे एका रेषेत येण्याचा योग दर दोन वर्षांनंतर येतो. प्रत्येक वेळी ते ग्रह आकृती क्र.१ मध्येच दाखवलेल्या जागीच नसतील, आपापल्या कक्षांमधल्या इतर ठिकाणी (पण एकमेकांच्या जवळ) असू शकतील. ते कुठेही असले तरी त्या सुमारासच ही मोहीम हाती घेता येते.

यापूर्वी मार्च २०१२ मध्ये मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ आला होता, पण मंगळाच्या दिशेने पाठवलेली याने त्याच्या चार महिने आधी म्हणजे नोव्हेंबर २०११ मध्ये पृथ्वीवरून निघाली होती. यानंतर २०१४ च्या एप्रिल मे च्या सुमाराला पुन्हा एकदा मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ येईल. त्याला भेटायला पृथ्वीवरून या वर्षीच्या नोव्हेंबरपासून जानेवारी २०१४ पर्यंतच प्रस्थान करणे आवश्यक आणि शक्य आहे. या कारणामुळे या काळात भारताचे मंगळयान निघालेले आहे आणि नासाचे मॅव्हेन हे यानसुद्धा प्रस्थान करणार आहे. ही दोन्ही याने मंगळाच्या कक्षेत फिरून दुरूनच त्याचे निरीक्षण करण्यासाठी पाठवण्यात येत आहेत. मंगळावर उतरण्याची त्यांची योजना नाही. यानंतरच्या मोहिमा सन २०१६ किंवा २०१८ मध्ये घेण्यात येतील, त्यांची तयारी मात्र आतापासून सुरू झाली आहे.

.  . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .  (क्रमशः)    

Thursday, November 07, 2013

मंगल मंगळ - भाग १ ते ४

हा लेख चार भागांमध्ये लिहिला होता. या चार भागांचे एकत्रीकरण आणि थोडे संपादन केले, दि,०३-०८-२०२६

मंगल मंगळ - भाग १




रात्रीच्या वेळी आकाशात असंख्य चांदण्या लुकलुकतांना दिसतात. त्यातल्या काही ठळक व स्पष्ट दिसणा-या चांदण्यांचे तारकासमूह किंवा काँस्टेलेशन्स वगैरेंना सप्तर्षी, बिग बेअर यासारखी विशिष्ट नावे दिलेली आहेत. पूर्व आणि पश्चिम या दिशांना जोडणा-या आकाशाच्या कमानीच्या वर्तुळाकार पट्ट्याचे बारा समान भाग केले गेले आणि त्या भागातल्या तारकांमधून सुचलेल्या आकारांवरून त्यांना मेष, वृषभ आदि राशींची नावे दिली आहेत, तसेच त्या पट्ट्याचे सत्तावीस भाग करून त्यांची अश्विनी, भरणी इत्यादि नक्षत्रांमध्ये विभागणी केली आहे. कुठल्याही क्षणी या पट्ट्यातला अर्धा भाग आकाशात असतो आणि उरलेला अर्धा भाग जमीनीखाली असतो. आकाशातल्या असंख्य चांदण्यांमधले पाच तेजस्वी छोटे गोल इतर सर्वांहून वेगळे दिसतात. त्यांच्या प्रकाशमय ठिपक्यांचा आकार इतर चांदण्यांच्या तुलनेत किंचित मोठा असतो, त्यांचे चमकणारे तेज स्थिर असते, ते लुकलुकत नाहीत आणि मुख्य म्हणजे ते कोणत्याही नक्षत्र किंवा राशीचा कायमचा भाग नसतात, निरनिराळ्या काळात ते वेगवेगळ्या राशींमधील इतर तारकांच्या जवळ आलेले आणि त्यांच्यापासून दूर जातांना दिसतात. एका राशीमधून ते आरपार पलीकडे दुस-या राशीत जातात आणि असेच पुढे पुढे जात राहून बाराही राशींमधून भ्रमण करत राहतात. त्यांच्या या वैशिष्ट्यांमुळे अगदी प्राचीन काळामध्येच त्यांची 'ग्रह' या नावाने वेगळी गणना केली. 'ग्रह' या शब्दाला 'प्लॅनेट' हा आता रूढ असलेला अर्थ त्या काळात प्राप्त झालेला नव्हता. आकाशातल्या सूर्य हा तारा आणि चंद्र हा उपग्रह यांनासुद्धा पूर्वी 'ग्रह'च म्हंटले जात होते. ते दोन मोठे प्रकाशमान गोल आणि मंगळ, बुध, गुरू, शुक्र व शनि हे पाच त्यांच्या मानाने लहान दिसणारे ग्रह यांची नावे दिवसांना देऊन सात दिवसांचा आठवडा बनवला गेला.  .

सूर्याच्या उगवण्या आणि मावळण्यामधून दिवस व रात्र निर्माण होतात हे सगळ्यांना ठळकपणे जाणवत असते. दिवसाचा कालावधी सहा महिने रोज कमी कमी होत असतो, पण त्याच वेळी रात्रीचा कालावधी वाढत असतो. यामुळे दिवस आणि रात्र मिळून चोवीस तास किंवा साठ घटिका एवढा संपूर्ण दिवसाचा काल मात्र कायम असतो. त्यानंतर पुढील सहा महिने दिवसाचा कालावधी रोज वाढत जातो आणि त्याच वेळी रात्रीचा कालावधी कमी कमी होत असतो. या सहा सहा महिन्यांच्या भागांना मिळून वर्षभराचा काळ ठरवला गेला. अमावास्येच्या दिवशी चंद्र सूर्याच्या सोबत असल्यामुळे आणि त्याची पाठ पृथ्वीकडे झाल्यामुळे तो दिसतच नाही, त्यानंतर तो रोज आभाळात दिसणा-या सूर्यबिंबापासून थोडा थोडा दूर जातो, म्हणजे सूर्यास्तानंतर जास्त जास्त वेळ आभाळात दिसत राहतो, तसेच त्याचा आकार कलेकलेने वाढत जातो. पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी पश्चिमेच्या क्षितिजावर सूर्य नावळत असतांना पूर्वेच्या क्षितिजावर पूर्ण गोलाकृती चंद्र उगवतो आणि रात्रभर उजेड देत राहतो. त्यानंतर तो रोज थोडा थोडा वेळ उशीराने उगवत जातो तसेच कलेकलेने लहान होत जातो. चंद्राच्या या बदलत्या रूपावरून महिन्यामधली तिथी समजते. अशा प्रकारे सूर्य आणि चंद्र यांच्या निरीक्षणावरून कालगणना ठरवली गेली. 

पण माणसाचे सरासरी आयुष्य आणि स्मरणशक्ती यापेक्षा दीर्घकाळ असते. त्यामुळे त्याच्या आयुष्यातली एकादी घटना किती वर्षांपूर्वी होऊन गेली हे समजण्यासाठी त्याला इसवी सन, शालिवाहन शक, विक्रम संवत वगैरेंचा आधार घ्यावा लागतो. त्यांच्या आधाराशिवाय वर्षांची गणना करण्याची सोय निसर्गामध्ये अस्तित्वात आहे. चंद्रमा आपली आकाशातली जागा भराभर बदलत असल्याने एका राशीत फक्त सव्वादोन दिवस असतो, तर सूर्याला एक राशी पार करून पुढे जायला एक महिना लागतो. गुरू ग्रहाला यासाठी एक वर्ष आणि अत्यंत संथपणे म्हणजे शनैःशनै चालणा-या शनीला तब्बल अडीच वर्षे लागतात. याचा अर्थ गुरू आणि शनि हे ग्रह आज ज्या राशीमध्ये दिसतात तिथे पुन्हा परत यायला अनुक्रमे बारा आणि तीस वर्षे लागतात. त्यामुळे जन्म, मृत्यू, विवाह, राज्याभिषेक यासारख्या महत्वाच्या प्रसंगी हे ग्रह कोणत्या राशींमध्ये होते याची नोंद ठेवलेली असल्यास ती घटना गेल्या बारा वर्षांमध्ये कधी घडली हे आजच्या गुरूच्या ठिकाणावरून आणि गेल्या तीस वर्षांमध्ये कधी घडली हे आजच्या शनीच्या ठिकाणावरून समजू शकते. या दोघांचा संयुक्तपणे विचार केल्यास मागील साठ वर्षांपर्यंत जाता येते. हा आकडा सामान्य माणसासाठी पुरेसा आहे.

अशा प्रकारे गुरू आणि शनि या ग्रहांचासुध्दा कालगणनेसाठी चांगला उपयोग होतो. बुध हा ग्रह सूर्याच्या अगदी मागे पुढे फिरत असल्यामुळे तो दिसलाच तर सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर अगदी थोड्या वेळाकरता क्षितिजाजवळ दिसतो. यामुळे त्याचा कालगणनेत काही उपयोग नसतो. हा ग्रह पूर्णपणे उपेक्षित असाच म्हणावा लागेल कारण त्याची कशातच खिजगणती होत नाही. कोणाच्या बोलण्यातही कुठल्याही संदर्भात त्याचा कधी उल्लेख आलेला मला ऐकल्याचे आठवत नाही. शुक्राची चांदणी ही चंद्राच्या खालोखाल सर्वाधिक प्रकाशमान असल्याने काळोख्या रात्रीच्या वेळी चंद्राच्या अनुपस्थितीत तीच आकाशातल्या अंधुक प्रकाश देणा-या तारकांच्या जगावर राज्य करतांना दिसते. 'घनतमी शुक्र बघ राज्य करी' असे एका सुप्रसिद्ध कवितेत म्हंटलेही आहे. शुक्र हा ग्रहसुद्धा सूर्याच्या एक दोन घरे मागे पुढे चालत असतो, पहाटेच्या वेळी शुक्राचा तारा उगवला तर लवकरच सूर्योदय होणार असल्याची तो वर्दी देतो आणि रात्री तो मावळतांना दिसला तर झोपायची वेळ झाल्याचे दाखवतो. शुक्र हा ग्रह मध्यरात्री किंवा माथ्यावर आलेला कधीच दिसणार नाही.

राहता राहिलेला मंगळ हा ग्रह एकाद्या उनाड मुलाप्रमाणे वागतांना दिसतो. तो कधी वेगाने राशीचक्रातून पुढे सरकतांना दिसतो, तर कधी सुस्त झालेला असतो आणि कधी कधी तर चक्क उलट पावलांनी मागे मागे जात असतो. काही वेळा तो खूप तेजाने उजळलेला दिसतो तर कधी बराच फिकट झालेला असतो. त्याच्या अशा प्रकारच्या भ्रमणामुळे त्याचा माग ठेवणे शास्त्रज्ञांना जरा अवघडच वाटत होते. त्याचा आकाशमार्गावरला प्रवास बराच गुंतागुंतीचा असला तरी विद्वान निरीक्षकांनी तो समजून घेतला आणि त्याची गणिते ठरवून घेतली. मंगळाच्या या काहीशा अनियमित प्रवृत्तीमुळे त्याचाही कालगणनेत काही उपयोग होत नाही. मंगळ या ग्रहाची ही वैशिष्ट्ये प्राचीन काळापासून पाहिली गेली आहेत. आकाशातला हा एकच ग्रह तांबूस रंगाचा असा वेगळा दिसतो. हिंदू संस्कृतीनुसार लाल हा शुभ आणि मांगल्याचा प्रतीक असलेला रंग असल्यामुळेच कदाचित या ग्रहाचे नाव 'मंगल' असे ठेवले गेले असावे. वारांची नावे ठेवतांना सूर्य आणि चंद्र या मोठ्या आकाराच्या दिसणा-या गोलकांच्या पाठोपाठ मंगळाचे नाव ठेवले गेले.

पण पुराणातल्या नवग्रहांमध्ये मंगळाला फार मोठ्या मानाचे स्थान दिले गेले नसावे. बृहस्पती (गुरू) आणि शुक्राचार्य (शुक्र) हे अनुक्रमे देव आणि दानव यांचे गुरू होते आणि त्यांना मार्गदर्शन करून बलवान करत होते, त्यांचा उल्लेख अनेक कथांमध्ये येतो. शनीच्या अवकृपेला सगळेजण भीत असत. त्याच्या कहाण्याही पुराणांमध्ये येतात. त्याला तर देवच मानून त्याची देवळे उभारली गेली आणि अनेक भाविक लोक आजही अत्यंत भक्तीभावाने त्याची आराधना करत असतात. बिचारा बुध पुराणातही कुठे डोकावत नाही की आजही त्याची पूजा करणारा कोणता संप्रदाय नाही. तरी तोसुध्दा श्रावण महिन्यातल्या जिवतीच्या पटात मात्र हत्तीवर बसलेल्या राजस रूपात आपले दर्शन देऊन जातो. मंगळाचे मात्र कुठलेही चित्र किंवा विशिष्ट आकाराची मूर्ती मला दिसली नाही. त्याचे वेगळे देऊळही मी अद्याप पाहिलेले नाही की त्याची कोणती कथा ऐकली नाही. अनेक मोठ्या देवळांमध्ये एक नवग्रहांचे पॅनेल असते, त्यात तो तिस-या क्रमांकावर गर्दीत बसलेला पुसटसा दिसतो. इंटरनेटवर या देवतेची काही चित्रे मिळाली.

नवग्रहस्तोत्रामधील तिस-या श्लोकात मंगळाचे वर्णन असे केले आहे.
धरणीगर्भ संभूतं विद्युत्कांति समप्रभम् ।
कुमारं शक्तिहस्तं तं मंगलं प्रणाम्यहम् ।। ३ ।।
'धरणीच्या पोटांतून जन्म घेतलेल्या, विजेसारखी अंगकांती असलेल्या, हातात शक्ती हे शस्त्र धारण केलेल्या, कुमारस्वरूप अशा त्या मंगळाला मी नमस्कार करतो.' असा या श्लोकाचा अर्थ आहे. या श्लोकातल्या 'पृथ्वीपासून मंगळाची उत्पत्ती झाली होती' या कल्पनेवर मात्र कधीच आणि कोणीही भर दिलेला दिसत नाही.

.  . . . . . . .  . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

मंगल मंगळ - भाग २


आपल्या पूर्वजांनी खूप पूर्वीच्या काळात मंगळ या ग्रहावरून 'मंगळवार' हे आठवड्यातल्या एका दिवसाचे नाव ठरवले होते. पण आज एकाद्या तरी मंगळवारी किती लोकांना त्या मंगळ ग्रहाची आठवण येते? भाविक लोकांना दर मंगळवारी मंगलमूर्ती मोरया आठवतो. त्या दिवशी ते गणपतीची पूजा, प्रार्थना, आराधना करतात, वेळात वेळ काढून त्याच्या देवळात जाऊन दर्शन घेऊन येतात. एकादी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेंव्हा तिला 'अंगारकी चतुर्थी' म्हणतात आणि त्या व्रताचे महात्म्य त्या वेळी अनेकपटीने वाढते. त्या दिवशी तर भल्या पहाटे उठून प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी रांग लावणाऱ्या लोकांची संख्या हजारोंमध्ये असे, कदाचित आता ती लक्षांमध्ये गेली असेल. पण 'अंगारक' हा शब्द अंगार किंवा निखारा यावरून आला असून लाल रंगाच्या मंगळ ग्रहाचे ते एक नाव आहे ही माहिती त्यातल्या किती लोकांना असते? श्रावण महिन्यातल्या मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते. नवीन लग्न झालेल्या मुलींची पहिली मंगळागौर तर हल्ली एकाद्या हॉलवर गाजावाजा करून आणि अनेक आप्तेष्टांना आमंत्रण देऊन एकाद्या मंगल कार्यासारखी मोठ्या थाटामाटात साजरी होते. एरवीसुद्धा दर मंगळवार आणि शुक्रवारी अंबाबाईच्या देवळात दर्शन घ्यायला येणाऱ्यांची गर्दी जरा जास्त असते. या सगळ्यात 'मंगळ' हा ग्रह मात्र कुठेच नसतो.

फक्त मंगळच नव्हे तर बुध, गुरू वगैरे आकाशातल्या कुठल्याच ग्रहाबद्दल आजकालच्या लोकांना फारशी उत्सुकता वाटत असावी असे दिसत नाही. शाळेत शिकतांना केंव्हातरी सूर्यमालिकेवर एकादा धडा शिकलेला असतो आणि 'बॉर्नव्हिटा क्विझ काँटेस्ट' किंवा 'कौन बनेगा करोडपती' यासारख्या एकाद्या कार्यक्रमात त्याबद्दल एकादा प्रश्न विचारला जातो तेंव्हा त्याचे नाव कानावर पडते यापलीकडे कोणाचाच आकाशातल्या ग्रहांशी कधीही संबंध येत नसावा. खगोलशास्त्रामध्ये (अॅस्ट्रॉनॉमीत) रस घेणारे लोक संख्येने कमी आहेत. मुद्दाम प्रयत्न करून रात्रीच्या आकाशातल्या चांदण्यांमधून या ग्रहांना शोधून त्यांचा मागोवा घेणारे उत्साही लोक मला तरी फारच क्वचित वेळा भेटले आहेत. हिल स्टेशनवर फिरायला वगैरे गेले असतांना रात्रीच्या वेळी एकादा ग्रह कोणाला अचानक आकाशात दिसला तर त्याला तो ओळखता तरी येईल की नाही याची शंका आहे. दिवसेदिवस वाढत चाललेला रात्रीच्या वेळचा पृथ्वीवरील कृत्रिम उजेड आणि हवेमधील धुळीचे व धुराचे कण यामुळे वातावरणात येत असलेला धूसरपणा यामुळे रात्रीच्या निरभ्र आकाशात चमचमणारे ग्रहतारे अधिकाधिक निस्तेज आणि फिकट होत चालले आहेत. त्यांना पाहण्याचे आकर्षण वाटेनासे झाले आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमधल्या काँक्रीटच्या जंगलातल्या घरांच्या खिडक्यांमधून आकाशाचा एक सहस्रांश भागसुद्धा दिसत नाही. नेमक्या तेवढ्याशा तुकड्यात येऊन कोणता ग्रह आणि किती तारे दर्शन देणार आहेत?

माणसाला नेहमीच अज्ञाताची भीती वाटत असते असे मानसशास्त्रज्ञ सांगतात. आकाशात घडत असलेल्या घटना आदिमानवाच्या आकलनाच्या पलीकडे असल्यामुळे सू्र्य, चंद्र, ग्रह, तारे, पर्जन्य, वीज या सगळ्यांपासून त्याला प्रचंड भय वाटत असे. त्यांना अज्ञात आणि अचाट शक्तीरूपी देव मानून त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी तो त्यांची प्रार्थना करायला लागला. विज्ञानामधील प्रगतीमुळे निसर्गाच्या या रूपांविषयी अधिकाधिक माहिती मिळत गेल्यानंतर त्याची भीती कमी होत गेली आणि त्यांना निरखून पाहून समजून घेण्याचे धैर्य तो करायला लागला. पण ग्रहांच्या बाबतीतली जवळीक संपुष्टात आल्यामुळे कित्येक लोक आता पुन्हा आदिमानवाप्रमाणे त्यांना घाबरायला लागले आहेत असे वाटते. याचा लाभ घेण्याचे प्रयत्न अर्थातच हुषार लोक करणारच. 

बहुतेक माणसे आता प्रत्यक्षातल्या ग्रहांबद्दल अशी उदासीन झाली असली तरी त्या ग्रहांची नावे मात्र वेगळ्याच प्रकारे रोज आपल्या कानावर पडत असतात किंवा नजरेसमोर येत असतात. आजकाल कुठलेही दैनिक, साप्ताहिक किंवा मासिक घेऊन पहा, बहुतेक वेळा त्यात कुठे तरी राशीभविष्य दिलेले असतेच. काही लोक तर हातात अंक पडला की सर्वात आधी त्या पानावर जातात. टेलिव्हिजनच्या काही वाहिन्या भविष्याचा रतीब रोजच्या रोज घालत असतात. ते सांगणारी अनेक तज्ज्ञ मंडळी आजकाल जागोजागी आपापली दुकाने मांडून बसली आहेत आणि त्यांचा सल्ला घेण्यासाठी आधीपासून अॅपॉइंटमेंट घेऊन जावे लागते. पटावर सोंगट्या मांडाव्यात तशा प्रकारे ही तज्ज्ञ मंडळी कुंडलीच्या बारा घरात नऊ ग्रहांना मांडून ठेवतात आणि त्यातले ग्रह यथावकाश एक एक घर पुढे सरकवत असतात. त्यातला प्रत्येक ग्रह जिथे असेल तिथून अलीकडे, पलीकडे, तिसऱ्या, पाचव्या, आठव्या वगैरे इतर सर्व घरांपैकी कोणावर आपली मेहेरनजर किंवा कोणावर वक्रदृष्टी ठेवून त्यातून काही तरी उत्पात घडवून आणत असतो. एकाच वेळी निरनिराळ्या घरांकडे पाहण्याची त्याची दृष्टी वेगवेगळी असते आणि उडी मारून तो ग्रह पुढच्या घरात गेला की लगेच सगळ्याची उलटापालट होते, एकादा ग्रह नव्या घरात जाऊन आनंदित होतो, तर एकादा रुष्ट होतो, उत्साही होतो किंवा वैतागतो वगैरे सुरस आणि चमत्कृतीपूर्ण गप्पा मारून त्यात ऐकणाऱ्याला गुंगवून ठेवण्यात आणि त्यांच्या मनात ग्रहांविषयी भीती निर्माण करण्यात ते ज्योतिषी लोक पटाईत असतात.

खगोलशास्त्राचा विचार केला तर आकाशातला फक्त एक चंद्रच तेवढा दर दोन किंवा तीन दिवसांनी एका राशीमधून निघून दुसऱ्या राशीत जातो, सूर्य, बुध आणि शुक्र हे ग्रह महिन्यातून एकदा पुढील राशीत सरकतात, गुरू आणि शनि एकेका राशीमध्ये अनुक्रमे एक वर्ष आणि अडीच वर्षे इतका दीर्घ काळ मुक्काम ठोकून बसलेले असतात आणि मंगळाच्या बाबतीत थोडी अनिश्चितता असली तरी तोसुद्धा दीडदोन महिने तरी एका राशीत वास्तव्य करत असतो. असे असतांना हे ज्योतिषाचार्य मात्र रोजच्या रोज किंवा दर आठवड्याला आपली भाकिते बदलत असतात आणि अमक्या तमक्या ग्रहांच्या भ्रमणामुळे ती बदलत असल्याचेही सांगतात.

शिक्षणाचा आणि विशेषतः विज्ञानाचा प्रसार वाढला की लोकांच्या अंधश्रद्धा आपोआप कमी होतील असे शंभर वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या थोर समाजसुधारकांना वाटत होते. आता साक्षरता भरपूर वाढली आहे आणि त्याच्या सोबतीने किंवा कदाचित त्याच्या आधाराने फलज्योतिष, वास्तुशास्त्र, फेंगशुई, न्यूमरॉलॉजी, टॅरॉट वगैरे अनेक तथाकथित 'विद्या' जास्तच फोफावत चालल्या आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने आणलेल्या टेलिव्हिजनमधून त्या घरोघर पोचत आहेत आणि जास्तच लोकप्रिय होत आहेत. मुख्यतः विज्ञानाच्या अभ्यासासाठी म्हणून तयार झालेल्या संगणकांचा उपयोग करून या तथाकथित 'शास्त्रां'च्या कामासाठी निरनिराळे खास सॉफ्टवेअर निघाले आहेत. कोणाचीही जन्मतारीख व वेळ सांगितली की आजचे ज्योतिषी लोक त्यांच्या काँप्यूटरवरून चार पाच प्रकारच्या कुंडल्या आणि दहाबारा पानांचे त्याच्या नावासकट भविष्य असलेले सुबक प्रिंटआउट काढून ते आकर्षक फोल्डरमध्ये घालून हातात देतात. ते घेणारे लोकसुद्धा आपल्याला अत्याधुनिक वैज्ञानिक संशोधनामधून निघालेले 'लेटेस्ट प्रॉडक्ट' मिळाले आहे या भावनेने खूष होतात. शिवाय 'व्हायब्रेशन्स', 'एनर्जी', 'नॅचरल फ्रिक्वेन्सी', 'वेव्ह लेन्ग्थ', 'रेझॉनन्स' यासारखे फिजिक्समधले आणि 'सिनर्जी', 'सिम्बियॉटिक' यासारखे वजनदार इंग्रजी शब्द आजकालचे 'गुरू' लोक आपल्या बोलण्यात अशा खुबीने पेरत असतात की शिकल्या सवरल्या लोकांचासुद्धा त्यांच्या सांगण्यावर आणि विद्वत्तेवर प्रचंड विश्वास बसावा. 

भविष्य वर्तवणाऱ्या निरनिराळ्या विद्वान लोकांचे होरे अनेक वेळा वेगवेगळे दिसतात, एकाच दिवसाची चार वर्तमानपत्रे पाहिली तर त्यात चार दिशांना जाणारी भाकिते दिसतात, पण मंगळ या ग्रहाच्या बाबतीत मात्र बहुतेक सगळ्या ज्योतिषशास्त्रतज्ज्ञांचे बहुतेक वेळा एकमत असलेले दिसते. खरे तर मंगळ हा ग्रह त्याच्या नावाप्रमाणे शुभ, मंगलकारक, आनंददायी, लाभदायी वगैरे चांगला उपकारक ग्रह असायला हवा. पण ज्योतिषाचार्यांनी मात्र त्याला सर्रासपणे 'पापग्रह' असे ठरवलेले दिसते. त्यामुळे जास्त करून त्याची भीतीच घातली जाते. त्यातल्या त्यात तो कधी सौम्य असेल किंवा दाहक असेल, पण प्रेमळ आणि हितकारक मात्र सहसा कधी असणार नाही असा समज मंगळाच्या बाबतीत उगाचच पसरवला गेला आहे. लग्न ठरवतांना तर मंगळाला एकदम अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते. वर आणि वधू यांच्या जन्मपत्रिका पाहून त्या जुळवण्याचा प्रघात कधीपासून सुरू झाला आणि तो भारतातल्या कोणकोणत्या भागात कशा प्रकारे पाळला जातो कोण जाणे, पण मला समजायला लागल्यापासून निदान महाराष्ट्रात तरी त्या दोघांच्या पत्रिकेत मंगळ आहे की नाही हे आधी पाहतात. प्रत्येक जन्मकुंडलीमध्ये कुठल्या तरी घरात मंगळ असतोच, पण विशिष्ट चौकोन किंवा त्रिकोणात तो बसलेला असला तर "त्या व्यक्तीला मंगळ आहे" असे म्हणतात आणि इतरत्र असल्यास "त्याला मंगळ नाही" असे मानतात. मग त्याच्या किंवा तिच्यासाठी 'मंगळ' असलेलाच किंवा नसलेलाच जोडीदार शोधणे वगैरेमुळे अनेक चांगली स्थळे कटाप होतात. संख्याशास्त्रानुसार सुमारे ४० टक्के लोक 'मंगळी' आणि ६० टक्के 'अमंगळी' असतात. त्यामुळे मंगळ असलेल्यांना थोडा जास्त शोध घ्यावा लागतो. विशेषतः 'मंगळी' मुलीचे वडील जास्तच बेजार होतात. मुलीला 'मंगळ' असल्याकारणाने वारंवार नकार मिळालेल्या एका मुलीचे पिताश्री इतके वैतागले की त्यांनी मुलीच्या पत्रिकेची कॉपी काढतांना त्यातले 'मं' हे अक्षरच गाळून टाकले म्हणे. कुंडलीचा अर्थच बहुतेक लोकांना माहीत नसतो यामुळे यातला विनोदही त्यांच्यासाठी 'बंपर' असेल.

आजकाल अधिकाधिक मुले आणि मुली आपापसातच लग्न जमवायला लागली असल्यामुळे पत्रिका पाहणे, त्या जुळवणे वगैरेचे प्रमाण बरेच कमी झाले आहे, त्यामुळे मंगळाचा प्रभाव आणि भावही ओसरत चालला आहे. पुढे त्या दांपत्याचा संसार व्यवस्थित चालला तर कोणीही कसलीही चौकशी करत नाही. पण काही कारणाने त्यांच्यात काही बिनसले तर मात्र त्यांच्यातल्या एकाचे किंवा दोघांचेही आईवडील त्यांच्या कुंडल्या किंवा जन्मतारखा घेऊन आपापल्या तथाकथित तज्ज्ञांकडे धाव घेतात आणि योगायोगाने त्यांचे 'मंगळ अमंगळ' जुळत नसले तर सगळे खापर बिचाऱ्या मंगळावर फोडून मोकळे होतात.

आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त आणि भास्कराचार्य यांच्यासारख्या महान भारतीय विद्वान शास्त्रज्ञांनी ग्रहांच्या आकाशमार्गावरील भ्रमणाचे विस्तृत आणि सूक्ष्म निरीक्षण केले होते आणि त्यावर चिंतन, मनन वगैरे करून काही महत्वाचे निष्कर्ष काढले होते, सिद्धांत मांडले होते आणि ते ग्रंथरूपात लिहून ठेवले होते. यातल्या कोणीतरी किंवा कदाचित सगळ्यांनीच मंगळाबद्दलसुद्धा काही माहिती लिहिली आहे असे म्हणतात. ते नेमके काय होते याची मला कल्पना नाही आणि मंगळ ग्रह म्हणजे दगडमातीचा एक प्रचंड आकाराचा निर्जीव गोळा अंतराळातल्या आपल्या ठराविक कक्षेत फिरत असतो असे त्यामधून ध्वनित होते किंवा नाही हे ही मला माहीत नाही. या शास्त्रज्ञांचे विचार लोकांपर्यंत पोचले असते तर बरे झाले असते. मंगळाला किंवा कोणत्याच ग्रहाला नाक, कान, डोळे, मेंदू, हृदय वगैरे कसलेही अवयव नसतात, त्यामुळे त्यांना राग, लोभ, आनंद, दुःख वगैरे काही होत नाही, त्यातले कोणीही कपट कारस्थान करून आपला घात करू शकत नाही किंवा प्रसन्न होऊन आपल्याला धनलाभ, पुत्रप्राप्ती वगैरे करून देत नाही ही वस्तुस्थिती लोकांना कळली असती, कोणीही कोणाला मंगळाचा धाक घालू शकला नसता, कोणीही त्यामुळे भयभीत झाला नसता आणि कोणीही आपल्या चुकीचा दोषही त्या आकाशातल्या मंगळाला दिला नसता. 


 . . . . . .  . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

मंगल मंगळ - भाग ३


माझ्या लहानपणी घरात टीव्ही नव्हता आणि शाळेत होमवर्क देत नसत. रात्रीची जेवणे आठ साडेआठपर्यंत उरकायची आणि लगेच निजायची तयारी सुरू व्हायची. पाऊस किंवा कडाक्याची थंडी नसली तर मुलांची अंथरुणे गच्चीवर घातली जायची आणि अंथरुणावर पडूनच गप्पा गोष्टी, थट्टामस्करी करत आम्ही झोपी जात होतो. काळ्याशार आभाळात चमचमणाऱ्या चांदण्याच तेवढ्या डोळ्यासमोर असत. मी त्यातले ठळक दिसणारे ग्रह, तारे, राशी, नक्षत्रे वगैरेंची नावे विचारून आणि ऐकून घेतली होती. रोजच्या पाहण्यातून त्यांची उजळणी होऊन त्यातली बहुतेक नावे माझ्या लक्षात राहिली होती. गल्लीतल्या आणि आजूबाजूच्या भागातली माणसे नेहमी जशी रोज पाहून आपल्या ओळखीची होतात, कुठल्या घरात कोण माणसे राहतात ते ठाऊक असते, त्याप्रमाणे सगळे ग्रह माझ्या ओळखीचे झाले होते. त्यातला मंगळ ग्रह रोज केंव्हा उगवतो, केंव्हा माथ्यावर येतो आणि केंव्हा मावळतो? वगैरेची सर्वसाधारण माहिती असायची. पण या काळात तो अमक्याच राशीत का असतो? किंवा तो पुढे सरकत काही काळाने वेगळ्या राशीत का जात असतो? अशा प्रकारचे प्रश्न तेंव्हा पडत नसत. एका सर्वसामान्य लहान मुलाकडून ते अपेक्षित नव्हतेच.

पण खूप प्राचीन काळापासूनच जगभरातल्या अनेक विद्वान आणि कर्तृत्ववान लोकांनी अतीशय चिकाटीने आणि बारकाईने आकाशातल्या ग्रह ताऱ्यांचे आयुष्यभर निरीक्षण केले. काही विशिष्ट उपकरणांचा उपयोग करून त्या ग्रहांच्या आकाशातल्या स्थानांची अत्यंत सूक्ष्म अशी मोजमापे त्यांनी निरनिराळ्या वेळी घेतली, त्यातून मिळालेल्या आकड्यांवरून काळ काम वेगाची गणिते मांडली आणि त्यातून त्या ग्रहांच्या आकाशामधल्या भ्रमणासंबंधीची सूत्रे आणि कोष्टके तयार केली. भविष्यकाळात कोणता ग्रह कोणत्या जागी केंव्हा जाईल याचा अंदाज त्या माहितीच्या आधाराने त्यांना करता येऊ लागला आणि प्रत्यक्ष निरीक्षणावरून तो बरोबर असल्याची खात्री करून घेणे शक्य झाले. अशा रीतीने खगोलशास्त्राचा (अॅस्ट्रॉनॉमीचा) विकास होत गेला. त्याच काळात जमीनीवर घडत असलेल्या मुख्य घटनांची आकाशातल्या ग्रहांच्या भ्रमणाशी सांगड घातली जाऊ लागली आणि यातून ज्योतिषशास्त्र (अॅस्ट्रॉलॉजी) तयार झाले. आकाशातले ग्रह अमक्या अमक्या ठिकाणी असल्यामुळेच जमीनीवर त्या घटना घडल्या असेही समजले जाऊ लागले आणि त्याच्या आधाराने भविष्यवाणी केली जाऊ लागली, शुभ अशुभ, लाभदायक, हानीकारक वगैरे संकल्पना रूढ होत गेल्या. पुढल्या कालखंडात भारतात तेच शास्त्र अधिकाधिक लोकप्रिय होत गेले आणि आकाशाचा शास्त्रीय अभ्यास करण्याचे खगोलशास्त्र मात्र मागे पडले. मंगळ हा आकाशात भ्रमण करणारा लाल रंगाचा सुंदर ग्रह न राहता कुंडलीतला उपद्रवकारी पापग्रह ठरला.

कोपरनिकसने सूर्यमालिकेची कल्पना मांडली, केपलर आणि गॅलीलिओने ती निर्भयपणे आणि खूप त्रास सोसून ठामपणे जगापुढे ठेवली आणि न्यूटनने त्याला वैचारिक बैठक दिली. हे सगळे मी एका वाक्यात लिहिले असले तरी त्यात सुमारे दोनशे वर्षांचा कालखंड गेला. दुर्बिणीचा शोध लागल्यानंतर मात्र आकाशातल्या इतर ग्रहताऱ्यांबरोबरच मंगळाचेही निरीक्षण करण्याला वेग मिळाला. अधिकाधिक शक्तीशाली दुर्बिणी तयार करण्यात आल्या आणि मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावरील पर्वत, डोंगर, दऱ्याखोरी वगैरेंचे लहानसहान तपशीलसुद्धा पहाता आले. निरनिराळ्या प्रकारची इतर उपकरणेही तयार होत गेली आणि मंगळावरील दृष्य माहितीशिवाय तिथल्या निरनिराळ्या ठिकाणचे निरनिराळ्या वेळचे तापमान (टेंपरेचर), तिथल्या दगडमातीमधील तसेच तिथल्या वातावरणातले रासायनिक घटक (केमिकल काँपोझिशन) आणि त्यांची मूलतत्वे (एलेमेंट्स) अशी अनेक प्रकारची अद्भुत माहिती पुढील संशोधनामधून मिळत गेली.



पृथ्वीप्रमाणेच मंगळाचा पृष्ठभागसुद्धा खडकाळ जमीनीने व्यापलेला आहे, तिथे वातावरणसुद्धा आहे, पण ते अत्यंत विरळ आहे आणि त्यात मुख्यतः कार्बन डायॉक्साईड हा वायू आहे. मंगळाचा व्यास पृथ्वीच्या निम्म्यापेक्षा किंचित जास्त असल्यामुळे भूमितीच्या नियमानुसार त्याच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ सुमारे पाव हिश्श्याहून थोडेसे जास्त आणि घनफळ एक अष्टमांशाहून जास्त म्हणजे सुमारे एक सप्तमांश इतकेच आहे आणि त्याची घनतासुद्धा पृथ्वीपेक्षा कमी असल्यामुळे त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या एक नवमांश इतके कमी आहे. यामुळे मंगळाच्या जमीनीवरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरच्या मानाने सुमारे तीन अष्टमांश इतकेच आहे. असे असले तरी हिमालयाहूनसुद्धा उंच असे पर्वत त्यावर आहेत आणि खूप मोठमोठे खोल खळगे आणि दऱ्याही आहेत, पण सध्या तरी तिथल्या जमीनीवर वाहणारे द्रवरूप पाणी अस्तित्वात नसल्यामुळे त्या खळग्यांचे महासागर झालेले नाहीत. तिथे समुद्रच नसल्यामुळे समुद्रसपाटी कशी ठरवणार? एका सरासरी पृष्ठभागाची कल्पना करून त्याच्या तुलनेत पर्वत किती उंच आहेत आणि मोठाले खळगे किती खोल आहेत ते ठरवले जाते. मंगळाच्या जमीनीवरील खडकांमध्ये अनेक भागात लोखंडाचे खनिज (हेमेटाइट) असल्यामुळे आपल्याला हा ग्रह लालसर दिसतो, पण दुर्बिणीमधून पाहिल्यास पिवळी, सोनेरी, करडी, हिरवट वगैरे अनेक रंगाच्या छटा त्याच्या इतर भागात दिसतात. मंगळावर ज्वालामुखी पर्वत आणि वाळवंटेही आहेत, पण सगळा ग्रहच ओसाड असतांना कशाला वाळवंट म्हणतात कोण जाणे ! कदाचित त्या भागात खडक नसतील, चहूकडे बारीक वाळू किंवा मातीचे थर पसरलेले असतील.

पृथ्वीप्रमाणे मंगळ ग्रहसुद्धा स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याला प्रदक्षिणा घालत असतो. मंगळावरचा (त्याने स्वतःभोवती फिरण्याचा) एक दिवस साधारणपणे आपल्या २४ तासांहून फक्त सुमारे अर्धा तास जास्त एवढाच असतो, यामुळे मंगळावर होणारे दिवस आणि रात्रसुद्धा साधारणपणे आपल्या एवढेच असतात. पण हा ग्रह सूर्यापासून पृथ्वीच्या मानाने बराच म्हणजे जवळ जवळ दीडपट दूर असल्यामुळे त्याला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी मात्र पृथ्वीच्या जवळ जवळ दुप्पटीपेक्षा थोडा कमी इतका वेळ लागतो. पृथ्वीप्रमाणेच मंगळाचा आंस (अॅक्सिस) सुद्धा त्याच्या कक्षेशी कललेला असल्यामुळे मंगळावरही दिवस आणि रात्र लहान मोठे होत राहतात आणि उन्हाळा व हिवाळा असे दोन ऋतू असतात. तिथल्या जमीनीवर समुद्र, नद्या, तलाव किंवा पाणीच नसल्यामुळे त्यांचेपासून ढगही होत नाही, पाऊसही पडत नाही आणि त्यामुळे तिथे पावसाळा मात्र नसतो. मंगळाचे उत्तर आणि दक्षिण ध्रुवदेखील नेहमी पार गारठलेले असतात आणि ते मात्र पाण्याच्या बर्फाने आच्छादलेले आहेत आणि त्यावर सुका बर्फ (ड्राय आईस) म्हणजे गोठलेला कार्बन डायॉक्साइड वायू या पदार्थाचे काही थरही असतात. मंगळाला सूर्यापासून मिळणारा प्रकाश आणि ऊष्णता पृथ्वीच्या मानाने अर्ध्याहूनही कमी असल्यामुळे तिथल्या इतर भागातले सरासरी तपमानसुद्धा शून्य अंशाच्या खूप खाली असते. त्यामुळे तिथे द्रव स्वरूपातले पाणी सहसा मिळणार नाही. याचा अर्थ मंगळावर पाणी आहे, पण ते गोठलेल्या रूपात असते आणि मुख्यतः त्याच्या ध्रुवांजवळ आहे आणि कदाचित त्याचे साठे जमीनीखाली दडले असावेत अशीही शंका आहे. तिथल्याही हवेत पाण्याची थोडीशी वाफ असते आणि तिचेही गोठून हिमकण बनलेले ढग मंगळावर दिसतात.

दर वर्षी हिवाळ्यात हिमालयातल्या शिखरांवर बर्फ साठत जाते आणि उन्हाळ्यात ते वितळल्यामुळे गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा वगैरे नद्यांना पूर येतात. मंगळ ग्रहाच्या ध्रुवप्रदेशातसुध्दा वर्षातला अर्धा भाग दिवस आणि अर्धा भाग रात्र असते. मंगळावरचे हे अर्धे वर्ष आपल्या दहा बारा महिन्यांइतके दीर्घकाळ असते. त्यातल्या उन्हाळ्यात सतत पडणाऱ्या सूर्यकिरणांमुळे सुक्या बर्फाचे काही थर वितळून त्यातला कार्बन डायॉक्साईड वायू तिथल्या वातावरणात मिसळतो आणि हिवाळ्यात याच्या उलट हवेतला हा वायू गोठून ध्रुवप्रदेशात साठत जातो.

 . . . . . .  . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

मंगल मंगळ - भाग ४


शंभर वर्षांपूर्वी मंगळ या ग्रहासंबंधी जास्त तपशीलवार माहिती मिळालेली नव्हती, पण मंगळावरसुद्धा दिवस-रात्र, उन्हाळा-हिंवाळा, जमीन-वातावरण वगैरे असल्यामुळे हा ग्रह बराचसा पृथ्वीसारखा आहे एवढे नक्की झाले होते. त्यामुळे तिथेसुद्धा जीवसृष्टी निर्माण झाली असण्याची शक्यता काही शास्त्रज्ञांनी वर्तवली आणि विज्ञानकथा (सायन्स फिक्शन) लिहिणाऱ्यांच्या प्रतिभेला पंख फुटले. त्यांच्या कल्पनाशक्तीला बहर आला आणि मंगळावरील काल्पनिक प्राण्यांच्या जीवनावरील कथाकादंबऱ्यांचा पाऊस पडायला लागला. मंगळावरचे हे जीव माणसासारखेच असतील का? त्यांनासुद्धा नाक, कान, डोळे, हातपाय वगैरे अवयव असतील का? असल्यास किती असतील? त्यांना कदाचित वेगळ्याच प्रकारचे अवयव असतील आणि त्यातून आपल्याला माहीतही नसलेल्या वेगळ्याच संवेदना मिळत असतील का? त्यांनाही मेंदू, हृदय, बुद्धी आणि मन असेल का? त्यांचा मेंदू आपल्यापेक्षा जास्त विकसित असेल का? ते सुद्धा पृथ्वीवर काय चालले आहे याबद्दल विचार करत असतील का? त्यांना आपल्याबद्दल काही माहिती असेल का आणि ती किती असेल?  असे एक ना दोन, शेकडो प्रश्न उभे करून त्यांची आपापल्या मनाने आणि कल्पनेनुसार उत्तरे देण्याचा प्रयत्न या लेखकांनी केला. उडत्या तबकड्यांमध्ये बसून ते पृथ्वीवर येऊन गेल्याच्या वावड्यासुद्धा अनेक वेळा उठल्या.

दुर्बिणीतून मंगळाची पहाणी करत असतांना शास्त्रज्ञांना त्याच्या पृष्ठभागावर काही सरळ रेषा दिसल्या. निसर्गातल्या नद्या, नाले, नैसर्गिकरीत्या तयार होणारी दऱ्याखोरी, यासारख्या गोष्टी पृथ्वीवर तरी कुठेच अशा सरळ रेषेत नाहीत. जगभरातल्या सगळ्या देशांमध्ये त्या वेडीवाकडी वळणे घेतांना दिसतात, मग मंगळावर तरी त्या सरळ रेषेत कशा असू शकतील? तिथल्या बुद्धीमान जीवांनी किंवा महामानवांनी मुद्दाम खणून तयार केलेले हे प्रचंड आकाराचे कालवे असू शकतील असे पिल्लू कोणी तरी सोडले आणि मंगळवासीयांबद्दलचे कुतूहल जास्तच वाढले. ही अफवासुद्धा निदान काही दशके चालली. या सगळ्या रेषा मंगळावरील भूमीवर प्रत्यक्षात अस्तित्वात नसून तो एक प्रकारचा दृष्टीभ्रम होता हे नंतर झालेल्या संशोधनामधून सिद्ध झाले. याचा अर्थ फक्त पृथ्वीवरच मृगजळ दिसत नाही, अगदी मंगळावरसुद्धा एक प्रकारचे मृगजळ दिसले आणि त्याने भल्याभल्या शास्त्रज्ञांना चकवले म्हणायचे! 

एकादा मनुष्य अत्यंत वक्तशीर असतो तेंव्हा त्याच्या जाण्यायेण्यावरून लोक घड्याळ लावतात असे म्हंटले जाते. सू्र्य आणि चंद्र यांचे आकाशामधील परिभ्रमण असेच इतके नियमितपणे अचूक होत असते, की कुठल्याही प्रकारच्या घड्याळाच्या आधीपासून त्यांच्या चलनाच्या आधारावर कालगणना केली जाऊ लागली आणि आजवर केली जात आली आहे. हे दोघेही कधीच वाटेत क्षणभरही थांबत नाहीत. ते आकाशमार्गे अविरत चालत असतात. कधीही त्यांनी उलट दिशेने जाण्याचा तर प्रश्नच नाही. बुध, गुरू, शुक्र आणि शनि हे ग्रह आपापली गती थोडी बदलत असतात, पण त्याचे प्रमाण कमी असते आणि फार बारकाईने पाहिल्याखेरीज ते जाणवत नाही. याचे कारण बुध आणि शुक्र रात्रीचा थोडाच वेळ आकाशात दिसतात आणि गुरू व शनि अत्यंत मंद गतीने चालत असल्यामुळे त्यांचे निरीक्षण करण्यातच उभा जन्म जातो. मंगळ हा ग्रह मात्र बराच अनियमितपणा दाखवत असतो आणि त्याला समजून घेण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पहावी लागत नाही किंवा खास दुर्बिणीचीही गरज पडत नाही. साध्या डोळ्यांनासुद्धा तो जाणवतो. मंगळ हा आगळा वेगळा ग्रह कधी वेगाने राशीचक्रातून पुढे सरकतांना दिसतो, तर कधी सुस्त होऊन रेंगाळत असतो आणि कधी कधी तर चक्क उलट पावलांनी मागे मागे जात असतो. काही वेळा तो खूप तेजाने उजळलेला दिसतो तर कधी बराच फिकट झालेला असतो. त्याच्या अशा प्रकारच्या दिसण्यामुळे त्याचा माग ठेवणे शास्त्रज्ञांना जरा अवघडच वाटत होते. हे सगळे बदल कशामुळे होत असतील याचे कारणही त्यांना समजत नव्हते.

भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्या ग्रहांना महाशक्तीशाली देव मानले गेले असल्यामुळे ते आपापल्या मर्जीनुसार कसेही वागायला मोकळे होतेच, शिवाय माणसांचे जीवनसुद्धा त्यांच्या राजीखुषीवर अवलंबून असते असे म्हंटल्यावर त्यांच्या वाटेला जाण्याचे धैर्य कोण आणि कशाला दाखवील ? त्यातून मंगळ हा तर शीघ्रकोपी ग्रह ! त्याच्या अनियमित वाटणाऱ्या गतीचे रहस्य शोधून काढण्याचा प्रयत्न कोण करेल ? पश्चिमेकडील म्हणजे युरोपमधील देशात ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाल्यानंतर संपूर्ण जगात फक्त एकच परमेश्वर (गॉड) आहे असे मानले जाऊ लागले. त्यामुळे ग्रहांच्या कोपाला घाबरण्याचे कारण उरले नाही. त्यांच्या भ्रमणाची सविस्तर माहिती गोळा करणे आणि त्यावर विचारविनिमय, मनन, चिंतन वगैरे करून त्यातली सुसंगती शोधून काही शास्त्रीय सिद्धांत किंवा त्याविषयीचे नियम मांडणे शक्य झाले. पण आपली पृथ्वी संपूर्ण विश्वाच्या मध्यभागी नाही, सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या अनेक ग्रहांमधली ती एक आहे हा विचार मात्र ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीच्या विरोधात आहे असा निर्णय प्रतिगामी विचारांच्या तत्कालिन धर्मगुरूंनी दिला आणि दोनशे वर्षे त्या विचाराला कडाडून विरोध केला. अखेर धर्मगुरूंची सत्ताच कमजोर झाल्यानंतर तो विचार आणि त्याला अनुसरून मांडलेला सिद्धांत सर्वमान्य झाला.



मुळात आभाळातले कोणतेही ग्रह अधून मधून वक्री होऊन उलट दिशेने का जातांना दिसतात यावर विचार करतांनाच सूर्यमालिकेची कल्पना शास्त्रज्ञांना सुचली होती आणि त्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर त्यातून मिळाले होते. मंगळाच्या बाबतीत वर दिलेल्या विचित्र गोष्टी का घडतात यासाठी वर दिलेली आकृती पाहू. या चित्रात दाखवल्याप्रमाणे मध्यभागी असलेल्या सूर्याला पृथ्वी आणि मंगळ हे ग्रह आपापल्या कक्षांमधून प्रदक्षिणा घालत असतात. पहिल्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे कोणे एके दिवशी सूर्य, पृथ्वी आणि मंगळ हे तीघेही एका सरळ राशीत आहेत असे समजले (तसे दर दोन वर्षात एकदा होत असते) तर एक वर्षानंतर सूर्याभोवती फिरून पृथ्वी पुन्हा पूर्वीच्याच जागी परत येईल, पण मंगळाला त्याच्या मोठ्या कक्षेमधून हा प्रवास करायला जवळ जवळ दुप्पट वेळ लागत असल्यामुळे एका वर्षानंतर तो आकृती क्र.२ मध्ये दाखवलेल्या जागी असेल. अर्थातच त्या वेळी पृथ्वी आणि मंगळ यांच्यामधले अंतर अनेकपटीने जास्त झालेले असेल. त्यामुळे आपल्याला तो आकाराने लहान आणि फिक्कट दिसेल. त्या काळात पृथ्वीवरून पाहता तो सूर्याच्या जवळ दिसत असल्यामुळे त्याच्या सोबतीने उगवेल आणि मावळेल आणि त्याच्या प्रखर उजेडात बहुधा दिसणारच नाही. यामुळे सुमारे महिनाभर आपल्याला मंगळ ग्रहसुद्धा बुधाप्रमाणे दिसलाच तरी क्वचितच दिसेल. याउलट जेंव्हा तो आकृती क्र.१ मध्ये दाखवलेल्या जागी असेल तेंव्हा तो पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे त्याचे बिंब मोठे आणि अधिक प्रकाशमान दिसेल आणि सूर्याच्या विरुद्ध दिशेला असल्याकारणाने रात्रभर दिसत राहील. अमक्या अमक्या तारखेला मंगळ ग्रह चंद्राइतका मोठा दिसणार आहे अशा प्रकारच्या वावड्या अनेक वेळा उडवल्या जातात, माझे काही मित्रसुद्धा असा ईमेल्स मला फॉरवर्ड करतात आणि दरवेळी ते कसे अतिरंजीत आहे हे मला त्यांना समजावून सांगावे लागते असे घडत आले आहे. 

पृथ्वी आणि मंगळ हे ग्रह आपापल्या कक्षांमधून सतत पुढे पुढे जात असतात. त्यामुळे पृथ्वीवरून पाहतांना आपल्याला मंगळ हा ग्रह पृथ्वीच्या सापेक्ष गतींने जातांना दिसत असतो. पृथ्वी आणि मंगळ हे दोन्ही ग्रह आकृती क्र.१ मध्ये दाखवलेल्या जागी असतांना एकाच दिशेने (आकृतीमध्ये वरच्या बाजूला) जात असतात आणि त्यात पृथ्वीची गति थोडी जास्त असल्यामुळे आपल्याला मंगळ ग्रह उलट दिशेने मागे मागे जात आहे असे दिसते. रस्त्यावरून जातांना आपण एकाद्या मोटारीला ओव्हरटेक करून पुढे जातो तेंव्हा ती गाडी मागे जात आहे असे मोटारीमधून पाहणाऱ्याला वाटते तसे हे आहे. याच्या उलट हे ग्रह आकृती क्र.२ मध्ये दाखवलेल्या जागी असतील तर ते उलट दिशांना (आकृतीमध्ये पृथ्वी वरच्या बाजूला आणि मंगळ खालच्या दिशेला) जात असल्यामुळे आपल्याला मंगळ हा ग्रह दुप्पट वेगाने जातांना दिसेल. रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या माणसापेक्षा मोटारीत बसलेल्या माणसाला समोरून येणारी गाडी जास्त वेगाने येत आहे असे वाटते, तसेच हेही आहे. अशा प्रकारे निरनिराळ्या कालखंडात हे दोन ग्रह ज्या जागांवर असतील त्यानुसार आपल्याला मंगळाचा वेग कमी किंवा जास्त होतांना दिसतो. तो कमी कमी होत शून्यावर येऊन मंगळाने दिशाच बदललेली आपल्याला दिसते. त्याच प्रमाणे यथावकाशाने त्याचा उलट दिशेचा वेग पुन्हा कमी होत शून्यावर येऊन तो पुन्हा दिशा बदलतो आणि मूळ दिशेच्या मार्गी लागतो म्हणजे नेहमीप्रमाणे पुढे जाऊ लागतो. हा ग्रह वेगाने पुढे जात असतांना एकादी रास महिनाभरातच ओलांडून पलीकडे जातो तर कधी एकाद्या राशीत हळू हळू दहा पंधरा दिवस पुढे गेल्यावर मागे वळून हळूहळू सरकत आधीच्या राशीत प्रवेश करतो, तिथे काही दिवस घालवल्यावर घूम जाव करून पुन्हा पुढे सरकत पूर्वीच्या जागी जाऊन आणखी काही काळानंतर त्याच्या पुढल्या राशीत जातो. हे करतांना पाचसहा महिनेही उलटून जातात. हे सगळे दर दोन वर्षांच्या कालावधीत घडत असल्यामुळे निरीक्षकांना ते सहजपणे जाणवते.

पृथ्वीपेक्षा एवढा लहान असूनसुद्धा मंगळाकडे फोबोस आणि डीमॉस नावाचे दोन दोन चंद्र आहेत, पण ते आपल्या चंद्रासारखे सुंदर गोल नसून बेढब ओबडधोबड आकारांचे आहेत आणि आकाराने ते फक्त काही किलोमीटर्स इतके लहान आहेत. त्यामुळे त्यांना मोठ्या उल्का (अॅस्टरॉइड) असेसुद्धा म्हणता येईल. त्यातला फोबोस हा उपग्रह मंगळाभोवतालच्या आकाशात पश्चिमेकडून पूर्वेकडे अशा उलट दिशेने फिरत असतो आणि फक्त ११ तासात त्याला पूर्ण प्रदक्षिणा घालतो. डीमॉस हा उपग्रह सुमारे ३० तासात प्रदक्षिणा घालत असला तरी मंगळ ग्रह स्वतःभोवती साडेचोवीस तासात फिरत असल्यामुळे तो उपग्रह आभाळातून खूप हळूहळू सरकतांना दिसतो आणि रोज रोज न उगवता तब्बल साडेपाच दिवसांमध्ये एकदाच उगवतो पावणेतीन दिवस आणि रात्री आभाळात इकडून तिकडे जातो आणि मावळल्यानंतर पुन्हा पावणेतीन दिवस त्याचा पत्ताच नसतो. 

माणसाने चंद्रावर किंवा त्याच्या जवळपास जाऊन संशोधन करण्याच्या अनेक मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्यानंतर मंगळाकडे आपला मोर्चा वळवला. अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांनी मंगळाकडे याने पाठवली. काही युरोपीय देशांनी संयुक्तपणे मोहिमा राबवल्या. आजमितीला मंगळाच्या भूमीवर फिरत असलेली दोन स्वयंचलित वाहने (रोव्हर्स) आणि त्याच्या भोवताली आभाळात फिरत असलेले तीन कृत्रिम उपग्रह असे पृथ्वीवरील पाच दूत मंगळावर हजर आहेत आणि तिकडची माहिती पाठवत आहेत. जपान आणि चीन या देशांनीसुद्धा मंगळावर आपापली याने पाठवण्याचे प्रयोग केले होते, पण ते यशस्वी ठरले नाहीत. आता दिवाळीमध्ये आपल्या भारताने एक मंगलयान अवकाशात उडवले आहे. अजून पर्यंत ते पृथ्वीच्याच कक्षेत आहे, वर्षभरानंतर मंगळावर जाऊन पोचणार आहे. त्यासंबंधीची माहिती मी एका निराळ्या लेखमालिकेत द्यायचे ठरवले आहे. त्याची पूर्वपीठिका समजण्यासाठी मंगळ या ग्रहाची माहिती या लेखमालिकेत दिली आहे.


.  . . . . .  . . . . . .  . . (समाप्त)   



 

Friday, November 01, 2013

अणू, रेणू आणि देवाचा कण - भाग ३

 आधीचे भाग
 अणू, रेणू आणि देवाचा कण - भाग १

http://anandghan.blogspot.in/2013/10/blog-post_29.html
 अणू, रेणू आणि देवाचा कण - भाग २
http://anandghan.blogspot.in/2013/10/blog-post_30.html

अणू हा जगातला सर्वात सूक्ष्म कण नाही. त्याचा भाग असलेले प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स हे कण आकाराने अणूपेक्षा खूपच लहान असतात, तीन भिन्न प्रकारांचे हे कण अणूच्या अंतरंगात निवास करत असतात, हे सत्य सुमारे शंभर वर्षांपूर्वी सर्व वैज्ञानिकांनी मान्य केलेले होते. अणूंच्या मध्यभागी धनविद्युतभार (पॉझिटिव्ह चार्ज) असलेले प्रोटॉन्स आणि कुठलाही विद्युतभार नसलेले न्यूट्रॉन्स असतात आणि ऋण विद्युतभार (निगेटिव्ह चार्ज) असलेले इलेक्ट्रॉन्स त्यांच्या सभोवती घिरट्या घालत असतात असे चित्र त्या काळातल्या शास्त्रज्ञांना अचानक किंवा उगाच सुचले नाही. त्याच्या आधी विज्ञानातले इतर अनेक शोध लागलेले होते. त्यामधून मिळालेल्या माहितीवरून असा निष्कर्ष निघायला मदत होत होती.
 
एकाद्या आम्लामध्ये (अॅसिडमध्ये) दोन भिन्न पदार्थांचे दांडके (रॉड) बुडवून त्यांना तारेने जोडले की त्यामधून विजेचा सूक्ष्म प्रवाह वाहू लागतो हे सिद्ध झाल्यानंतर त्यावर अनेक प्रयोग करून वीज निर्माण करणा-या शक्तीशाली आणि कार्यक्षम अशा बॅट-या तयार केल्या गेल्या. लोहचुंबकाच्या जवळून एक तांब्याची तार वेगाने नेली किंवा तारेच्या जवळून लोहचुंबक वेगाने नेला तर त्या तारेमधून विजेचा प्रवाह वाहतो हे सिद्ध झाल्यानंतर त्या तत्वावर वीज निर्माण करणारे डायनॅमो बनवले गेले. या शोधांच्या अनुषंगाने विजेचा सूक्ष्मतम प्रवाह आणि दाब मोजणारी अत्यंत संवेदनशील (सेन्सिटिव्ह) उपकरणे तयार केली गेली. बॅटरीमध्ये रासायनिक आणि डायनॅमोमध्ये विद्युतचुंबकीय कारणांमुळे वीज तयार होते म्हणजे काय होते यावर शास्त्रीय विचार आणि चर्चा होत होत्या. एका बाजूच्या इलेक्ट्रोडमधून विजेचे कण बाहेर पडतात आणि ते दुस-या बाजूच्या इलेक्ट्रोडकडे तारेमधून प्रवाहित होतात असे समजले गेले. या सूक्ष्म कणांना इलेक्ट्रॉन्स असे नाव दिले गेले. विजेच्या उपकरणांच्या सहाय्याने त्यांचे अस्तित्व ओळखता येऊ लागले. विजेचे हे कण त्या इलेक्ट्रोडमधल्या अणूमधूनच बाहेर पडत असणार हे निश्चित होते. त्या अर्थी आधी ते कण त्या अणूंचा भाग असणार. अणूंमध्ये जर ऋण विद्युतभार असलेले इलेक्ट्रॉन्स असतील तर त्यांच्या उलट परिणाम साधून समतोल राखण्यासाठी धनविद्युतभार असलेले प्रोटॉन्सही अणूमध्ये असायलाच हवेत. हैड्रोजनच्या अणूमधून इलेक्ट्रॉन बाजूला काढला तर फक्त प्रोटॉन उरतो, त्याचे अस्तित्वही प्रयोगामधून दाखवले गेले.

इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स हे दोन्ही प्रकारचे कण जवळ जवळ आले तर एकमेकांवर आदळून एकमेकांमध्ये विलीन का होत नाहीत असा प्रश्न उद्भवतो. याचे स्पष्टीकरण देण्यासाठी असा विचार केला गेला की अणूमधील इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स यांची प्रत्यक्षात भेट होत नाही. सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे ज्याप्रमाणे सर्व ग्रह त्याच्या भोवती फिरत राहतात, त्याचप्रमाणे अणूमधले सारे इलेक्ट्रॉन्स त्या प्रोटॉन्सच्या सभोवती अतीशय वेगाने घिरट्या घालत असतात. धनविद्युतभार असलेले प्रोटॉन्स एकत्र कसे राहू शकतात, ते एकमेकांना ढकलून दूर का जात नाहीत, अशी आणखी एक शंका होती. त्यांना एकत्र बांधून ठेवणारा कोणता फोर्स असावा हा प्रश्न होता. कुठलाही विद्युतभार नसलेले न्यूट्रॉन्स नावाचे कण त्यासाठी जबाबदार असावेत असा तर्क केला गेला. न्यूट्रॉनचे अस्तित्व प्रयोगशाळेत सिद्ध करायला बराच काळ जावा लागला. पण त्यानंतर मात्र त्या कणाने जगाच्या इतिहासावर परिणाम करणारा धुमाकूळ घातला. 

प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स यांच्या रचनेमधून अणूच्या अंतर्गत रचनेची (अॅटॉमिक स्ट्रक्चर) मॉडेल्स तयार केली गेली. जगातले सर्व पदार्थ फक्त ९२ मूलद्रव्यांपासून बनलेले आहेत हा विचार आश्चर्यकारक होताच, पण हे ९२ अणूसुध्दा प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स या फक्त तीनच मूलभूत कणांपासून बनले आहेत हे जास्तच धक्कादायक म्हणता येईल.

अणूची रचना या मॉडेल्समध्ये दाखवल्याप्रमाणे असल्यास त्याचा ९९ टक्क्यांपेक्षा जास्त भाग रिकामी पोकळी असेल, त्या मोकळ्या जागेत १ टक्क्यांपेक्षा कमी वस्तुमानाचे इलेक्ट्रॉन्स रिंगण घालून फिरत असतील, अणूच्या मध्यभागी असलेल्या १ टक्क्यांपेक्षा कमी जागेत त्याच्या ९९ टक्क्यांपेक्षा जास्त वस्तुमानाचे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स बसलेले असतील अशा प्रकारचे चित्र निर्माण होते. कॉमनसेन्सला हे विचित्र वाटते, कदाचित पटणारही नाही, पण अणूची रचना अशा प्रकारची आहे हे मान्य केले तर विज्ञानातली अनेक कोडी उलगडतात. यामुळे हे मान्य करावेच लागले. अणूच्या या प्रकारच्या रचनेमुळे दोन किंवा अधिक अणूं(Atom)चा संयोग कसा होतो आणि त्यामधून निर्माण झालेल्या रेणू (molecule )ची रचना कशा प्रकारची असते त्याचा उलगडा होऊ शकतो हा त्याचा मुख्य फायदा होता, त्याचप्रमाणे पाणी तयार होतांना हैड्रोजनच्या दोन अणूंबरोबर ऑक्सीजनचा एकच अणू का जोडला जातो, याच्या उलट हैड्रोजनच्या एका अणूंबरोबर ऑक्सीजनचे दोन अणू का जोडले जात नाहीत, किंवा दोन्ही मूलतत्वांचे तीन चार वा दहा वीस अणू एकमेकांशी का जुळू शकत नाहीत वगैरे प्रश्नांची उत्तरे या मॉडेलमुळे मिळतात. अशा प्रकारे बहुतांश भागात फक्त रिकामी पोकळी असलेल्या अणूचा आकार नेमका केवढा मोठा आहे हे सांगता येणार नाही. पण १ घनसेंटिमीटर एवढ्या आकारमानाचे सोने किंवा लोखंडाचे वजन किती ग्रॅम भरते हे मोजले तर तेवढ्या वजनात किती अणू असतात याचा हिशोब करून बाजूबाजूला असलेल्या दोन अणूंच्या केंद्रांमधले अंतर काढता येईल आणि त्या अणूचा आकार सुमारे तेवढा आहे असे म्हणता येईल. वायुरूप पदार्थांच्या बाबतीत तेही कठीण आहे.

ऊष्णता आणि प्रकाशकिरण एका ठिकाणाहून (सूर्यापासून किंवा दिव्यामधून) निघून दुसरीकडे (पृथ्वीकडे किंवा खोलीभर) का जातात यावरही संशोधन चाललेले होते. त्यांचेही सूक्ष्म कण असावेत असा अंदाज खूप पूर्वीच्या काळात केला जात होता, पण प्रकाशकिरणांचे काही गुणधर्म पाहता ते समजून घेण्यात काही अडचणी येत असल्यामुळे प्रकाशकिरणांचे कण नसून त्यांच्या लहरी (वेव्हज) असाव्यात असा विचार सुरू होऊन तो सर्वमान्यही झाला आणि आजवर आहे. विद्युत (Electicity) आणि चुंबकीयता (magnetism) यांवर संशोधन करतांना ऊष्णता आणि प्रकाश ही ऊर्जेची रूपेसुध्दा विद्युतचुंबकीय लहरी (Electromagnetic Radiation) असल्याचे दाखवून दिले गेले. पण काही विशिष्ट बाबतीतली निरीक्षणे पाहता त्यांचे नीट स्पष्टीकरण होत नव्हते. त्याचा उलगडा करण्यासाठी क्वान्टम थिअरी मांडली गेली. यामुळे प्रकाशकिरणांचे फोटॉन नावाचे कण असल्याचा विचार पुन्हा सुरू झाला. फोटोइलेक्ट्रिक इफेक्टमध्ये एका इलेक्ट्रोडवर अल्ट्राव्हायोलेट प्रकाशकिरणांचा झोत टाकला तर त्यामधून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. याचे समाधानकारक स्पष्टीकरण आइनस्टाईनने क्वान्टम थिअरी मधून दिले.
आइनस्टाईनने केलेल्या पुढल्या संशोधनातून वस्तुमान (मास) आणि ऊर्जा (एनर्जी) याच एका नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सिद्ध झाले. फोटॉन, इलेक्ट्रॉन यासारखे अतीसूक्ष्म आणि अतीजलदगतीने जाणारे कण किंवा लहरी असे दुहेरी अस्तित्व (ड्युआलिटी) त्यांना मिळाले.

प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स या तीन मूलभूत कणांना मान्य केल्यानंतर तिथेच थांबतील तर ते शास्त्रज्ञ कसले? आणि असे मध्येच थांबले तर ते विज्ञान कसले? या सूक्ष्म कणांचे विविध गुणधर्म तपासून पहाण्यासाठी त्यांनी आणखी खोलात जाऊन पुढील संशोधन सुरू ठेवले. मग त्यातून मिळालेले गुणधर्म त्यांना कशामुळे प्राप्त झाले असावेत हे प्रश्न आलेच. त्यातून पार्टिकल फिजिक्स या नावाची एक वेगळी शाखा जन्माला आली आणि तिचा आकार वाढत गेला. निरनिराळ्या प्रकारच्या अतीसूक्ष्म कणांची कल्पना केली गेली, प्रयोगशाळेत, तसेच अंतराळामधून येत असलेल्या किरणांमध्ये (कॉस्मिक रेज) त्यांना शोधण्याचे प्रयत्न चालत राहिले. न्यूट्रिनोज, अँटिन्यूट्रिनोज, मेसॉन्स, पियॉन्स, म्युऑन्स, केऑन्स, हेड्रॉन्स, क्वार्क्स, अँटिक्वार्क्स, बोसॉन्स, फर्मिऑन्स वगैरे नावांचे आणखी अनेक उपप्रकार असलेले कित्येक सूक्ष्म कण यामधून पुढे आले. यातले बरेचसे कण अत्यंत अल्पजीवी असतात. काही कारणाने ते निर्माण होतात आणि आणि लगेच दुस-या एकाद्या कणात विलीन होऊन जातात, पण त्यापूर्वी आपला ठसा उमटवून जातात. त्यावरूनच ते येऊन गेल्याची माहिती कळते.

बोसॉन हे नाव सत्येन्द्रनाथ बोस या भारतीय वैज्ञानिकाच्या नावावरून दिले गेले आहे. पीटर हिग्ज या शास्त्रज्ञाने १९६४ मध्ये हिग्ज बोसॉन्स या नावाच्या पार्टिकलची कल्पना मांडली होती. त्याने दिलेल्या वर्णनाचा सूक्ष्म कण अस्तित्वात असला तर त्याच्या प्रभावामुळे आतापर्यंत न सुटलेली अनेक कोडी सुटू शकतील असे प्रतिपादन त्याने केले होते. या अद्भुत गुण असलेल्या कणाला पत्रकारांनी 'गॉड पार्टिकल' (देवाचा कण) असे नावही देऊन टाकले होते आणि काही निरीश्वरवादी विद्वानांनी त्यावर नाक मुरडले होते.

पीटर हिग्जने मांडलेले विचार अनेक शास्त्रज्ञांना तात्विक दृष्ट्या पटले आणि आंतरराष्ट्रीय सहयोगामधून त्यांनी लार्ज हेड्रॉन कोलायडर या नावाची अतीप्रचंड अशी भूमिगत प्रयोगशाळा युरोपमध्ये उभी केली. पूर्वी कधीही न केले गेलेले प्रयोग या प्रयोगशाळेत केले गेले आणि जात आहेत. प्रलय, कयामत किंवा डूम्सडे वर्तवणा-या अनेक घाबरट लोकांनी या प्रयोगशाळेचाच इतका मोठा धसका घेतला होता की तिथे चाललेला एकादा प्रयोग शास्त्रज्ञांच्या हाताबाहेर जाईल आणि सर्व जगाला भस्मसात करून टाकेल अशी भीती त्यांनी जगाला घातली. अशा प्रकारचा अग्निप्रलय होऊ घातला असल्याच्या बातम्या प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये मोठमोठ्या मथळ्यांसह (हेडलाईन्स) छापून आल्या होत्या, पण असे काही झाले नाहीच, 'हिग्ज बोसॉन पार्टिकल' या नावाचा 'देवाचा कण' खरोखर अस्तित्वात असावा असा निष्कर्ष त्या ठिकाणी झालेल्या प्रयोगांमधून काढला गेला. या शोधाबद्दल पीटर हिग्जला यंदाचे नोबेल पारितोषिकसुद्धा मिळणार आहे. हा सूक्ष्म कण प्रोटॉनच्या हजाराव्या हिश्श्यापेक्षा लहान असेल आणि त्याचे आयुष्य एका सेकंदाच्या कोट्यांश भागाच्याही कोट्यांश भाग इतके अल्प असते, पण तेवढ्यात तो एकादा चमत्कार करून जाऊ शकतो.

प्रत्येक पदार्थांमधील अगणित अणू रेणूंना कोणती अज्ञात शक्ती एकमेकांशी बांधून ठेवत असावी याबद्दल पूर्वीपासून विचार चाललेलेच होते आणि अजूनही त्यांचे संपूर्ण उत्तर मिळालेले नाही. यातच लिश्वाचे रहस्य दडलेले आहे. या सूक्ष्म कणांवर प्रभाव पाडणारे चार महत्वाचे बल (फोर्स) आहेत.
१. विद्युतचुंबकीय (Electromagnetic ) - याच्या आकर्षणामुळे इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्सच्या सभोवती फिरत असतात, रेणूंमधले भिन्न अणू एकत्र राहतात. पण प्रोटॉन्स एकमेकांना दूर लोटतात.
२. स्ट्राँग इंटरअॅक्शन - याच्या आकर्षणामुळे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स विद्युतचुंबकीय फोर्सवर मात करून न्यूक्लियसमध्ये एकत्र राहतात.
३. वीक इंटरअॅक्शन - या फोर्समुळे न्यूक्लियसमध्ये बदल घडून येतात
४. गुरुत्वाकर्षण - हे सर्व कणांना एकमेकांकडे खेचत असते

या चार रहस्यमय बलांचे रहस्य जाणून घेण्यात या देवाच्या कणाची माहिती उपयोगी ठरेल आणि या दिशेने चाललेल्या संशोधनाला चालना मिळेल अशी आशा वर्तवण्यात येत आहे.

 . . . . .. .  . . . .. .  (समाप्त)

Wednesday, October 30, 2013

अणू, रेणू आणि देवाचा कण - भाग २



गेल्या तीन चार शतकांमध्ये युरोपात विज्ञानयुग अवतरले आणि अनेक शास्त्रज्ञांनी निरनिराळ्या दिशांनी वैज्ञानिक पद्धतीने संशोधन सुरू केले. निरनिराळी मूलद्रव्ये (Elements) आणि त्यांची संयुगे (Compounds) यांची रासायनिक सूत्रे (Chemical Formulae) मांडली गेली. दोन मूलद्रव्यांच्या (Elements) संयोगातून (Reaction)  प्रयोगशाळांमध्ये त्यांची संयुगे (Compounds) तयार केली आणि त्या संयुगांचे विद्युतशक्तीने पृथःकरण (Electrolysis) करून त्यातली मूलद्रव्ये वेगळी काढून दाखवली आणि त्यांची समीकरणे सप्रयोग सिद्ध केली गेली. हे करतांना मूलद्रव्याचा (Elements) सर्वात लहान कण हा Atom, आणि संयुगाचा (Compounds) सर्वात लहान कण हा molecule या त्या शब्दांच्या शास्त्रीय व्याख्या रूढ झाल्या. कुठल्याही पदार्थाचा या दोघांपेक्षा लहान कण अस्तित्वात नसतो असेच पुढील दोन तीन शतकेपर्यंत समजले जात होते.

या जगात असंख्य प्रकारचे नैसर्गिक रासायनिक पदार्थ आहेत. त्यांचेसंबंधी संशोधन करत असतांना त्यांचे पृथःकरण करून त्यांच्यामध्ये असलेले घटक वेगवेगळे केले गेले किंवा त्यांची ओळख पटवून घेतली गेली. ते पहात असतांना एक आश्चर्यजनक गोष्ट आढळून आली. नैट्रोजन, ऑक्सीजन, हैड्रोजन, क्लोरिन यासारखे प्रमुख वायू, लोह, तांबे, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, पोटॅशियम, पारा (मर्क्यूरी) यासारखे मुख्य धातू आणि कार्बन, सिलिकॉन, सल्फर, फॉस्फोरस यांसारखे काही अधातू अशा निवडक मूलद्रव्यांपैकीच काही एलेमेंट्स जगातल्या बहुतेक सगळ्या पदार्थांमध्ये मुख्यतः असतात असे दिसले. अधिक संशोधनानंतर हीलियम, आर्गॉन, रेडियम, युरेनियम वगैरे आणखी काही मूलद्रव्ये मिळाली, पण एवढी प्रचंड विविधता असलेल्या पृथ्वीवरील निसर्गात सर्व मिळून फक्त ९२ च मूलद्रव्ये आहेत हे प्रयोग आणि चिंतन यामधून नक्की ठरले. गेल्या शंभर वर्षांमध्ये त्यात आणखी सुमारे वीस मानवनिर्मित मूलद्रव्यांची भर आता पडली आहे. पण त्यांचे प्रमाण इतके कमी आहे की त्यांचे अस्तित्व फक्त नावापुरतेच आहे. याचा अर्थ हे संपूर्ण जग फक्त सुमारे शंभर प्रकारच्या मूलद्रव्यांच्या अणूंपासून बनलेले आहे. त्यातलीही निम्म्याहून जास्त मूलद्रव्ये अत्यंत दुर्मिळ (रेअर अर्थ्स) अशी आहेत. त्यांचा प्रत्यक्षात फारसा उपयोग केला जात नाही. फक्त चाळीस पन्नास प्रकारच्या अणूंपासून जवळ जवळ सगळे जग निर्माण झाले आहे असे म्हणता येईल.

या उपयोगी मूलद्रव्यांचे गुणधर्म प्रयोगशाळांमध्ये बारकाईने तपासून पाहतांना त्यातून निसर्गाचे विशिष्ट नियम समजत गेले. या चाळीस पन्नासामधलीसुध्दा सगळीच मूलद्रव्ये इतर सगळ्याच मूलद्रव्यांशी संयोग पावत नाहीत. उदाहरणार्थ लोह आणि सोने यांचे संयुग बनत नाही. दागीने बनवण्यासाठी सोन्यामध्ये तांबे मिसळले जाते पण ते फक्त मिश्रण असते. या दोन धातूंमध्ये रासायनिक प्रक्रिया (Chemical Reaction) होत नाही. जी मूलद्रव्ये संयोग पावतात ती विशिष्ट प्रमाणातच एकमेकांशी जुळतात. दोन भाग हायड्रोजन आणि एक भाग ऑक्सीजन मिळून पाणी तयार होते. जगातल्या कुठल्याही समुद्रातले, नदीतले किंवा डबक्यातले पाणी घेऊन तपासून पाहिले तर त्यात हेच प्रमाण दिसते. दोन भाग हायड्रोजन आणि दहा भाग ऑक्सीजन यांना जरी एकत्र ठेऊन त्यात ठिणगी पाडली तरी त्यातल्या फक्त एक भाग ऑक्सीजनचा उपयोग होईल आणि ९ भाग ऑक्सीजन शिल्लक राहील. त्याच प्रमाणे दहा भाग हायड्रोजन आणि एक भाग ऑक्सीजन एकत्र ठेऊन त्यात ठिणगी पाडली तरी फक्त दोन भाग हायड्रोजनचा उपयोग पाणी निर्माण करण्यात होईल आणि ८ भाग हायड्रोजन तसाच शिल्लक राहील. ठिणगी पडली नाही तर हायड्रोजन आणि ऑक्सीजन वायूंचे ज्वालाग्राही मिश्रण तयार होईल. नैट्रोजन, ऑक्सीजन, हैड्रोजन, क्लोरिन वगैरे वायूंचे अणू एकटे रहातच नाहीत. जेंव्हा त्यांचा दुस-या एकाद्या मूलद्रव्याच्या अणूंशी संयोग होत नाही तेंव्हा ते आपल्याच भावाशी जोडून घेऊन जोडप्याने एकत्र राहतात. या वायूंच्या प्रत्येक molecule मध्ये दोन दोन Atom असतात. यासारख्या अनेक गोष्टी या संशोधनांमधून समोर आल्या. हे असे का होत असावे याचा विचार केला गेला.

दोन, तीन किंवा अधिक मूलद्रव्यांपासून संयुग तयार होते तेंव्हा त्या मूलद्रव्यांचे अणू (Atom) एकमेकांना बांधून घेतात किंवा एकमेकांमध्ये अडकतात आणि त्यातून त्या संयुगाचा रेणू (molecule ) तयार होतो. त्या पदार्थाचे सगळे गुणधर्म या रेणूमध्ये असतात, रेणू हा त्याचा सर्वात सूक्ष्म असा कण असतो. त्याच्या अंतरंगात निरनिराळे अणू (Atom) असतात, पण ते सुटे नसतात रासायनिक (Chemical) बंधनात ते जखडले गेलेले असतात. संयुग बनल्यानंतर मूलद्रव्यांचे गुणधर्म शिल्लक रहात नाहीत. हायड्रोजन आणि ऑक्सीजन यांचे कुठलेच गुणधर्म पाण्यामध्ये नसतात, पाण्याचे गुण सर्वस्वी भिन्न असतात. भिन्न अणूंचे मिळून संयुग होत असतांना  त्यांच्यात हे बंध कां, कसे आणि केंव्हा तयार होऊ शकतील याची तात्विक चिकित्सा अणूंच्या मॉडेल्सवरून केली जाते. प्रत्येक मूलद्रव्यांचे अणू ठराविक प्रमाणातच दुस-या मूलद्रव्यांचे अणूंशी जुळतात याचे कारण त्या अणूंच्या अंतर्गत रचनेमध्ये असणार, हे विचार प्रबळ झाले. यावरून अणूच्या अंतर्गत रचनेची मॉडेल्स तयार केली गेली. अशी काही मॉडेल्स चित्रामध्ये दाखवली आहेत.

मुळात अणू हाच इतका सूक्ष्म कण असतो की कुठल्याही प्रकारच्या सूक्ष्मदर्शक यंत्रानेसुद्धा अख्ख्या अणूचे दर्शन घेणे देखील केवळ अशक्य आहे. त्याच्या अंतरंगात डोकावून पाहण्याचा प्रश्नच येत नाही. यामुळे अणू या मूल कणाची रचना कशी असावी यावर फक्त तात्विक विवेचन करणे शक्य आहे. पण ही रचना अशा अशा प्रकारची असल्यास त्यामुळे त्या अणूचे गुणधर्म असे असे होतील आणि तो पदार्थ अशा अशा प्रकारे वागेल असे तर्कानेच ठरवता येते.  या कामात निरनिराळ्या मॉडेल्सचा उपयोग केला जातो. प्रत्यक्षामध्ये अणूचे बाह्य किंवा अंतरंग असेच असेल किंवा वेगळेच असेल, हे कोणीच पुराव्यानिशी सांगू शकणार नाही. पण अभ्यास करण्यासाठी ते असे असे आहे असे गृहीत धरून त्याची समीकरणे मांडली जातात आणि प्रयोगावरून ती सिद्ध झाली तर तेवढ्यापुरते तरी ते मॉडेल बरोबर आहे असे मानले जाते.

 

या सगळ्या मॉडेल्समध्ये असे दाखवले आहे की अणूंच्या मध्यभागी एक अणूगर्भ (न्यूक्लियस) असतो. त्यात धनविद्युतभार असलेले प्रोटॉन्स नावाचे आणि कुठलाही विद्युतभार नसलेले न्यूट्रॉन्स नावाचे कण असतात. अणूचे बहुतेक सगळे वस्तुमान या दोन प्रकारच्या कणांमध्येच असते. इलेक्ट्रॉन्स नावाचे ऋण विद्युतभार असलेले अतीसूक्ष्म कण या न्यूक्लियसच्या सभोवती घिरट्या घालत असतात. प्रत्येक अणूमधील प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स यांची संख्या नेहमी समसमान असते. त्यामुळे या दोघांनी मिळून बनलेला अणू न्यूट्रल म्हणजे विद्युतभारहीन असतो. या प्रकारच्या रचनांमधून हे स्पष्ट होते की अणू हा सर्वात सूक्ष्म कण राहिला नाही. त्याचा भाग असलेले प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स हे कण अणूपेक्षा खूपच छोटे असतात, विशेषतः इलेक्ट्रॉन्स तर अगदीच सूक्ष्म असतात.

 . . . .  . . . . . . . . . . .  . . (क्रमशः)

Tuesday, October 29, 2013

अणू, रेणू आणि देवाचा कण - भाग १

मातीचे ढेकूळ नुसते हाताने चुरगाळले तरी त्याचा भुगा होतो, मातीच्या मानाने दगड बराच कठीण असतो, पण त्यालाही फोडून त्याचे तुकडे करता येतात, ते करतांना दगडाचा थोडा बारीक चुराही निघतो, करवतीने लाकूड कापतांना त्याचाही पिठासारखा भुसा पडतो, गहू, ज्वारी वगैरे धान्ये दळल्याने त्यांचे पीठ होते वगैरे नित्याचे अनुभव आहेत. कुठलाही घनरूप पदार्थ कुटून, ठेचून किंवा घासून त्याची पूड करता येते, ते करतांना त्या पदार्थाचे बारीक कण वेगवेगळे होतात. यातल्या प्रत्येक कणांमध्ये मूळ पदार्थाचे सगळे गुण असतात. पावसाचे पाणी लहान लहान थेंबांमधून पडते आणि आता थंडीच्या दिवसात सकाळी आपल्याला पानांवरले दंवबिंदू दिसतील. ते तर आकाराने खूपच लहान असतात. थोडक्यात सांगायचे तर जगातल्या सगळ्या वस्तूंचे रूपांतर त्यांच्याच सूक्ष्म कणांमध्ये होऊ शकते.

चिमूटभर साखरेतले निरनिराळे कण डोळ्यांना दिसतात आणि बोटाने त्यांना वेगळे करता येतात. त्याची पिठीसाखर केली तर तिचे कण मात्र डोळ्यांनाही वेगवेगळे दिसत नाहीत आणि त्यातल्या एका कणाचा वेगळा स्पर्शही बोटाला जाणवत नाही. डोळे आणि त्वचा या आपल्या ज्ञानेंद्रियांच्या जाणीवा सुमारे एक दशांश मिलिमीटरपेक्षा सूक्ष्म आकाराच्या पदार्थांना ओळखत नाहीत. नाक आणि जीभ मात्र अधिक संवेदनाशील इंद्रिये आहेत. डोळ्यांना न दिसणा-या कणांचा गंध किंवा रुची यावरून ती वस्तू ओळखता येते. पण एका मर्यादेच्या पलीकडे तेसुद्धा शक्य नसते. अनेक सूक्ष्म कणांनी मिळून तयार झालेली चिमूटभर पिठीसाखर एकत्रितपणे डोळ्यांना दिसते आणि बोटांना जाणवते. हीच साखर पेलाभर पाण्यात घालून ढवळली की ती पाण्यात विरघळून जाते आणि पूर्णपणे अदृष्य होते. साखरेमुळे त्या पाण्याला आलेला गोडवा जिभेला जाणवतो या अर्थी ती साखर नष्ट झालेली नसते, पण पाण्यात विरघळण्याच्या क्रियेत तिचे कण अत्यंत सूक्ष्म झालेले असल्यामुळे ते मात्र डोळ्यांना मात्र दिसत नाहीत.

पदार्थांच्या अशा प्रकारे होत असलेल्या विघटनाच्या गुणधर्मांबद्दल विचार करतांना काही तत्वज्ञान्यांना असे वाटले की जगातले सगळे पदार्थ मुळात सूक्ष्म अशा कणांच्या समुदायामधूनच बनत असावेत. असे असंख्य कण एकमेकांना चिकटून त्याचा आकार बनतो आणि त्यांच्यामधले बंधन तोडल्यास ते वेगळे किंवा सुटे होतात. कोणताही पदार्थ वायुरूप असतो तेंव्हा हे सूक्ष्म कण इतस्ततः सुटे फिरत असतात, पण तो द्रवरूप झाला की ते एकमेकांना सैलसर चिकटतात आणि घनरूपात ते एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात. उदाहरणार्थ पाण्याची वाफ हवेत सगळीकडे विरून जाते, द्रवरूप पाणी एकत्र राहते, पण त्याला स्वतःचा आकार नसतो आणि त्याला गोठवून बर्फ केल्यास त्याचा ठोकळा बनवता येतो. तो आपला आकार टिकवून ठेवतो. हे सगळे कशामुळे होते हा प्रश्न होता. एक अज्ञात शक्ती या कणांना एकमेकांशी बांधून ठेवत असते एवढेच माहीत होते.

"कुठल्याही पदार्थाचे लहान लहान तुकडे करत गेल्यास अशी एक वेळ येईल की त्याचे आणखी लहान तुकडे होऊ शकणार नाहीत" असा सिद्धांत कणाद या भारतीय तत्वज्ञान्याने (वाटल्यास शास्त्रज्ञाने म्हणावे) मांडला होता. पदार्थांच्या या सर्वात लहान कणाला त्याने 'अणू' असे नाव दिले होते. 'वैशेषिक' नावाची तत्वज्ञानाची एक शाखा कणादमुनींनी सुरू केली होती. 'नैनम् छिन्द्यन्ति शस्त्राणि" असा हा अविभाज्य अणू त्या तत्वज्ञानानुसार अमर असतो. दोन किंवा तीन अणूंचे गट असू शकतात, निरनिराळ्या पदार्थांचे अणू एकमेकांशी संयोग पावून त्यातून वेगवेगळे नवे पदार्थ उत्पन्न होतात असे प्रतिपादनसुध्दा कणादाच्या या तत्वज्ञानात होते असे म्हणतात. या सगळ्या गोष्टी रसायनशास्त्रातल्या प्राथमिक आणि मूलभूत तत्वांशी ब-याच प्रमाणात जुळतात. पारंपारिक भारतीय शास्त्रांनुसार माती, पाणी, उजेड, वारा म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू आणि त्याशिवाय आकाश ही पंचमहाभूते समजली जातात. विश्वामधील कोणताही पदार्थ यांच्यामधूनच तयार होतो असे मानले जाते. या पंचमहाभूतांच्या जोडीला दिक्, काल, मन आणि आत्मा यांचाही विचार करून अशा एकंदर नऊ तत्वांमधून सर्व सजीव तसेच निर्जीव सृष्टी निर्माण झाली आहे असे महर्षी कणादमुनींनी प्रतिपादन केले आहे. हे देखील ढोबळमानाने पाहता बरोबरच आहे, पण स्पष्ट अस्तित्व असलेली माती किंवा पाणी, विचार किंवा भावना यांनीच समजता येत असलेले मन आणि पूर्णपणे काल्पनिक संकल्पना असलेला आत्मा यांची अशा प्रकारे एकत्र मिसळ करणे सायन्समध्ये बसत नाही.

मूलद्रव्य (Elements), संयुग (Compounds) किंवा मिश्रण (mixtures) यापैकी एकात जगातील सर्व वस्तूंची गणना होते. हे सत्य कणादमुनींच्या काळात बहुधा प्रस्थापित झालेले नसावे. त्यामधील मूलद्रव्य आणि संयुग यांना विशिष्ट गुणधर्म असतात आणि त्यांचे मिश्रण केले तरी ते गुण टिकून राहतात. सर्व पदार्थांच्या या तीन वर्गात केलेल्या विभाजनामुळे त्यांचे सर्वात लहान कण या अर्थाने Atom आणि molecule  हे शब्द वापरात आले आणि या इंग्रजी शब्दांसाठी अणू, परमाणू, रेणू वगैरे मराठी प्रतिशब्द आता रूढ झाले आहेत. (त्यातसुध्दा अनुक्रमे परमाणू व अणू आणि अणू व रेणू असे दोन पाठभेद आहेत.) अणू या शब्दाचा कणादमुनींना अभिप्रेत असलेला अर्थ कशा प्रकारचा होता कोण जाणे, पण तो Atom किंवा molecule या शब्दांच्या सध्या प्रचलित असलेल्या अर्थांपेक्षा निश्चितपणे निराळा होता. अणू या कणादमुनींच्या संकल्पनेचा आकार, वजन, क्रमांक, विद्युत भार, त्याची अंतर्गत रचना अशा प्रकारची कसलीही शास्त्रीय माहिती कुणादमुनींच्या तत्वज्ञानात दिलेली आहे असे माझ्या अल्पशा वाचनात मला तरी कुठे आढळले नाही. अणू हे सर्व पदार्थांचे अतीसूक्ष्म असे कण आहेत असे मात्र बहुधा त्यांनीच पहिल्यांदा खूप पूर्वी सांगितले होते एवढे सर्वमान्य आहे. जगातले सगळेच ज्ञान ब्रह्मदेवाने वेदांमधून काही निवडक ऋषींना दिले होते असा ज्यांचा दृढ समज आहे अशा लोकांच्या दृष्टीने पाहता कणादमुनींनी देखील हे ज्ञान वेदाध्यनामधून प्राप्त केले असेल तर त्यांना अणूचे आद्य संशोधक म्हणता येणार नाही. शिवाय प्राचीन काळामधील काही जैन मुनी आणि डेमॉक्रिटस नावाचा ग्रीक फिलॉसॉफर यांनीसुध्दा परमाणू आणि अॅटम या सूक्ष्म कणांची कल्पना केलेली होती असेही सांगितले जाते. प्राचीन काळामधले हे सगळे प्रयत्न फक्त अचाट कल्पनाशक्ती आणि तर्कशुध्द विचार यांमधून केले गेले होते. प्रात्यक्षिके, प्रयोग, निरीक्षण, परीक्षण, गणित वगैरेंमधून त्यांना जोड देऊन ते विचार शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध केले गेले नव्हते, तसेच अणू, परमाणू, रेणू वगैरे शब्दांच्या व्यवस्थित शास्त्रीय व्याख्या केलेल्या नव्हत्या.

अणू हे सूक्ष्म सूक्ष्म म्हणजे नेमके किती सूक्ष्म असतात हे बहुतेक लोकांना माहीत नसते. अब्ज, खर्व, निखर्व, परार्ध वगैरे संख्यांचा नेमका अर्थही सहसा कोणाला समजत नाही. यापेक्षा तुलनेने असे सांगता येईल की भारताची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या कित्येक पट अणू धुळीच्या एका कणात असतात. अशा प्रकारच्या अवाढव्य संख्या १, २, ३, ४ असे करून मोजता येत नाहीत. त्यासंबंधी काही सिद्धांत मांडले जातात, त्यांच्यासोबत काही समीकरणे येतात, प्रयोगांमधून मिळालेल्या माहितीवरून किचकट आकडे मोड करून त्या ठरवतात. हे सिद्धांत आणि समीकरणे अनेक शास्त्रज्ञांनी तपासून पाहिल्यानंतर त्या आकड्यांना सर्वमान्यता मिळते. कणादमुनींच्या कालखंडात हे सगळे झाले असल्याचा निर्देश कुठे दिसत नाही. 



 . . . .  . . . . . . . . . . .  . . (क्रमशः)

Tuesday, October 22, 2013

स्मृती ठेवुनी जाती - १० मालिनी खासगीवाले

कै.श्रीराम परांजपे हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि ख्यातीप्राप्त इंजिनियर होते, त्यांच्या निधनाची बातमी वर्तमानपत्रांमध्ये छापून आली. कै.मालिनीताई खासगीवाले प्रसिध्दीपासून दूर राहिलेल्या समाजसेविका होत्या. त्या कधी निजधामाला गेल्या हे मलाही समजले नाही. परांजप्यांची ओळख माझ्या नोकरीमध्ये झाली, तर मालिनीताईंची ओळख नातेसंबंधांमधून झाली. परांजपे यांचा आणि माझा परिचय सत्तेचाळीस वर्षांपूर्वी झाला आणि थोडाच काळ राहिला तर गेली चाळीस वर्षे नेहमीच मालिनीताईंची अधूनमधून भेटगाठ होत राहिली होती. माझ्या दृष्टीने पाहता या दोन्ही व्यक्ती मला वडीलधा-या आणि आदरणीय होत्या, त्या कायम लक्षात राहण्यासारख्या वैशिष्ट्यपूर्ण होत्या आणि त्यांचे निधन काही काळापूर्वी झाले एवढाच त्यांना जोडणारा मुख्य धागा म्हणता येईल. यामुळे मी या दोन लेखात या दोघांचा एकापाठोपाठ एक समावेश केला आहे. त्यांचा एकमेकांशी परिचय असण्याची बरीच शक्यता होती, त्या एकमेकांना भेटल्या असाव्यात किंवा वारंवार भेटत असतीलही, पण त्याच वेळी मीसुध्दा त्या जागी उपस्थित होतो असे मात्र कधी झाल्याचे मला आठवत नाही.

माझ्या काही मित्रांना एका प्रॉजेक्टसाठी वर्षभरासाठी फ्रान्सला पाठवायचे ठरले तेंव्हा त्यांच्याकडून एक बाँड घेतला गेला. त्या बाँडवर कोणा वरिष्ठ दर्जाच्या अधिका-याची गॅरंटीयर म्हणून सही पाहिजे होती. त्या मित्रांचे वरिष्ठ अधिकारी स्वतःच त्या टीममध्ये जात असल्यामुळे ते सही देऊ शकत नव्हते. यामुळे इतर मित्रांचे नातेवाईक, नातेवाईकांचे मित्र, शेजारी वगैरेंमधून माझे मित्र त्यांच्यासाठी गॅरंटीयर शोधत होते आणि त्यांना ते मिळाले. त्यातल्या एका मित्राने मला आनंदाने सांगितले, "चला, आज माझं काम एकदाचं झालं, केमिस्ट्री डिव्हिजनमधल्या डॉ.खासगीवाल्यांनी मला सही दिली."     
त्या वेळी डॉ. कारखानावाला नावाचे पारशी सद्गृहस्थ केमिस्ट्री डिव्हिजनचे डायरेक्टर होते. हा खासगीवाला त्यांचाच सगेवाला असावा असे वाटून मी म्हंटले, "हा पारशी कसा काय तयार झाला?" 
मित्राने सांगितले, "अरे ते कोणी खासगीवाला नाहीत, पुण्याचे घरंदाज खासगीवाले आहेत." खासगीवाले हे नाव मी पूर्वी कधी ऐकले नसल्याने मला मराठी वाटत नव्हते. त्यांच्या पूर्वजांमधल्या कोणाला पेशव्यांच्या काळात ही उपाधी मिळाली होती असे स्पष्टीकरण त्यावर मिळाले. माझ्या मित्राशी जुजबी ओळखपाळखसुद्धा नसतांना त्याच्यावर एवढा विश्वास टाकून आर्थिक धोका पत्करणा-या त्या उदार मनाच्या सद्गृहस्थांबद्दल माझ्या मनात आदरयुक्त कुतूहल निर्माण झाले. आपण एकदा त्यांना पहावे, भेटावे असे वाटले, पण माझा मित्र तर फ्रान्सला निघून गेला होता, आता मला त्यांच्याकडे कोण नेणार? यामुळे ते राहून गेले.

माझे लग्न झाल्यानंतर अलकाचे सगळे नातेवाईक माझे आप्त झाले. तिच्या लहान गावातल्या माहेरच्या पुरातन आणि अवाढव्य वाड्यात तीन पिढ्यांमधले बरेचसे लोक रहात असत, अजूनही राहतात. शिक्षण आणि नोकरीच्या निमित्याने बाहेरगावी राहणारी मुले आणि लग्न होऊन सासरी गेलेल्या माहेरवाशिणीसुध्दा वर्षामधून काही काळासाठी सवड काढून तिथे येऊन सर्वांच्या सहवासात रहात आले आहेत. त्यामुळे त्या सर्वांमध्ये खास जवळीक निर्माण झाली आहे. चुलत बहिणींचे दीर, जावा, नणंदा किंवा चुलत चुलत काकूंचे भाऊ, वहिनी यासारखे दूरचे नातेवाईकसुध्दा तिथल्या बहुतेकांना माहीत असतात. एकदा अलकाच्या एका चुलत चुलत बहिणीकडे आम्ही गेलो असतांना त्यांनी मला विचारले, "तुम्ही बीएआरसीमधल्या डॉ.खासगीवाल्यांना ओळखत असालच ना?"
"मी त्यांचं नाव ऐकलं आहे, पण आमची अजून प्रत्यक्ष भेट झाली नाही. आमचं डिपार्टमेंट एवढं मोठं आहे की काम पडल्याशिवाय सहसा कोणाची ओळख होत नाही."
"अहो, आमचे हे मामा आणि आमच्या या मामीसुद्धा फारच चांगली माणसं आहेत, तुम्ही त्यांना भेटाच."
त्यावर अलका म्हणाली, "हो, मला ते लोक माहीत आहेत. ते कुठे राहतात?"
"तेसुद्धा तुमच्या चेंबूरलाच राहतात."
"हो का? मग नक्की भेटू."
या मामामामी म्हणजे डॉक्टर आणि मालिनीताई खासगीवाले या व्यक्तींची माझी पहिली ओळख ही अशी सांगण्या ऐकण्यातून झाली. मला देखील त्या दोघांना भेटण्याचे कुतूहल आणि इच्छा होतीच, त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी मला एक धागाही मिळाला. पण संधी आणि वेळ मिळत नव्हता. त्यांचा पत्ता वगैरे लिहून घ्यायचेही राहून गेले होते. प्रयत्न करून मला तो मिळू शकला असता, पण तेवढे कष्ट घेतले गेले नाहीत. एकदा मी ऑफिसला गेलेलो असतांना आणि काही कामासाठी अलका कुठेतरी गेली असतांना तिला चेंबूरच्या बाजारात की बसमध्ये खासगीवाले मामी अचानक दिसल्या. समोरासमोर येताच, "मामी!", "तू अलका ना?" अशा संवादामधून त्यांनी आपल्या स्मरणातले जुने धागे पुन्हा जोडून घेतले. खरे तर मामींना त्या वेळी अलकाला त्यांच्या घरीच घेऊन जायचे होते, पण त्या काळात टेलीफोन, मोबाईल वगैरे काही सोय नसल्याने मला निरोप कसा द्यायचा हा प्रश्न होता आणि मी ऑफीसातून घरी येऊन दारावर लागलेले कुलूप पाहिले असते तर गोंधळ झाला असता. "पुढच्या वेळी आम्ही चेंबूरच्या मार्केटमध्ये येऊ तेंव्हा नक्की तुमच्या घरी येऊ." असे आश्वासन देऊन अलकाने त्यांच्या घराचा पत्ता आणि जवळपासच्या खुणा विचारून घेतल्या.

त्या काळात आम्ही चेंबूरच्या सिंधी कँपमध्ये रहात होतो. तिथले सगळे वड्डी साँई दुकानदार आमच्यासारख्या भोळ्या भाबड्या ग्राहकांना गंडवायला टपून बसले आहेत असा आमचा ग्रह झालेला असल्यामुळे आम्ही नेहमी खरेदीसाठी चेंबूर स्टेशनजवळच्या बाजारात जात होतो. आम्ही पुढल्या खेपेला तिकडे गेलो तेंव्हा खासगीवाल्यांचे घर शोधून काढले. ते हमरस्त्यावरच असल्यामुळे सहजच सापडले. आम्हाला पाहून त्या दोघांनाही खूप आनंद झाला. त्यांनी अत्यंत आपुलकीने आमचे स्वागत केले. आम्ही कुठे राहतो, तिथे आमचे बस्तान कसे बसले आहे, काही अडचणी आहेत का वगैरेची वडिलधा-या माणसांच्या मायेने चौकशी केली, आमच्या कुटुंबांमधल्या समाईक नातेवाईकांची विचारपूस केली. थोडे बसणे बोलणे झाल्यानंतर "आमच्या स्वैपाकाची तयारी सुरू झालेलीच आहे, आता रात्रीचे जेवण करूनच जा," असा आग्रहही मामींनी केला. पण असे आगांतुकपणे कुणाच्या घरी जायचे आणि थेट पाटावर जाऊन बसायचे हे माझ्यातल्या जावयाला शोभणारे नव्हते. माझे आढेवेढे पाहून मामांनी ते ओळखले आणि पुढे कित्येक वर्षे ते मला "या जावईबापू !" असेच गंमतीने म्हणत राहिले.

त्या दिवशी मामींनी आम्हाला निदान सूप तरी पिऊन जायला सांगितले आणि पोटात भूक लागलेली असल्याने आम्हीही ते आनंदाने मान्य केले. त्यापूर्वी म्हणजे लहानपणी आमच्या घरी टमाट्याचे सार बनवले जात असे ते रस्समसारखे पाणीदार असायचे. चिनी हॉटेलांमधले सूप चांगले दाट असायचे पण ते बेचव वाटायचे. मामींनी तयार केलेले सूप तसेच दाट होते, पण त्याला मराठी माणसाला आवडावी अशी रुची आणि खास फ्लेव्हर होता, शिवाय त्यात थोडे ताजे लोणी किंवा क्रीम घालून त्याची चंव आणखी वाढवली असावी. असे अप्रतिम सूप मी पहिल्यांदाच चाखून पाहिले होते हे मी मोकळेपणे सांगून टाकले. त्यांना त्याची खात्री असावीच. पहिला बाउल संपताच त्यांनी लगेच तो भरून दिला. त्याबरोबर दिलेल्या साइड डिशेस खाऊन आमचे तसेही जवळ जवळ पोटभर जेवण होऊन गेले. "चेंबूरला बाजार करायला केंव्हाही आलात तर थोडी विश्रांती घ्यायला आमच्याकडे याच, शिवाय तुम्हाला पुन्हा कधी सूप प्यावेसे वाटले तर निःसंकोचपणे मुद्दाम आमच्या घरी म्हणूनही या." असे मामींनी निरोप देतांना प्रेमाने सांगितले. आमची मुले लहान असतांना आम्हालाही त्यांचे कपडे बदलणे, त्यांना दूध पाजणे वगैरेंसाठी निवा-याची जागा लागत असायची आणि आम्ही खासगीवाल्यांकडे अधून मधून जात राहिलो. एकदा आम्ही बाजारहाट करतांना माँजिनीमधून घेतलेल्या सामानातले सूपस्टिक्सचे पॅकेट मामींनी पाहिले आणि आपणहून सूपसाठी टोमॅटो शिजवायला ठेवले. त्यांनी वेळोवेळी इतर अनेक चविष्ट पदार्थही कौतुकाने करून आम्हाला खाऊ घातले.  

मामा तर रसायनशास्त्रातले डॉक्टरेट होतेच, मामीसुध्दा नुसत्या सुग्रण हाउसवाइफ नव्हत्या. त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून काही पदव्या आणि पदविका घेतल्या होत्या आणि त्या महाराष्ट्र शासनाच्या समाजविकास किंवा अशाच एकाद्या खात्यात अधिकारीपदावर होत्या. अनाथ, निराधार बालके किंवा महिलांसाठी चेंबूर मानखुर्द भागातच तीन चार वसतीगृहे आहेत, मुंबईमध्ये आणखी किती तरी असतील. अशा प्रकारच्या संस्थांच्या कामाशी मालिनीताई निगडित होत्या. या कामात त्यांना अनेक बरेवाईट, जास्त करून वाईटच अनुभव अनेक वेळा येत, काही वेळा त्यांना त्या संस्थांमध्ये जाऊन मुक्कामाला तिकडेच रहावे लागत असे. अशा वेळी त्यांची ओढाताण होत असे. एरवी त्या आपला वेळ नोकरी आणि घरगृहस्थी यांमध्ये व्यवस्थितपणे वाटून देत असत, कधी कधी कामामध्ये आणीबाणीचे प्रसंग आले तर मात्र त्यांना ताबडतोब तिकडे धावावे लागत असे. पण हे सगळे काम त्या हंसतमुख राहून, शांत चित्ताने, तळमळीने आणि मन लावून करत असत. त्याबद्दल त्यांनी तक्रारीच्या सुरात बोललेले मी कधीच ऐकले नाही. त्या वसतीगृहांमधल्या दुर्दैवी स्त्रिया आपल्या किंवा सर्वसामान्य लोकांच्या मानाने किती हाल अपेष्टा आणि मानसिक त्रास भोगत आहेत, त्यांच्या जीवनात किती असुरक्षितता आहे याची त्यांना खूप कणव वाटत असे आणि त्यांना कशा प्रकारे मदत करता येईल, त्यांचे कष्ट कसे कमी करता येतील याचे विचार त्यांच्या मनात घोळत असत. उंबरठा हा चित्रपट पाहतांना माझ्या डोळ्यासमोर मालिनीमामी येत राहिल्या. त्या सिनेमातल्या स्मिता पाटीलला तिच्या घरातून तीव्र विरोध झाल्यामुळे तिला घराचा उंबरठा ओलांडून जावे लागले होते. मामींच्या सुदैवाने मामा त्यांच्या पाठीशी उभे असल्याने त्यांच्या जीवनात असले द्वंद्व आले नाही. त्यांना भरपूर कसरत किंवा धावपळ मात्र करावी लागत असे.

खासगीवाले मामा इतके सीनियर होते की त्यांना अणुशक्तीनगरमध्ये चांगले प्रशस्त क्वार्टर सहज मिळू शकले असते, पण मामींना गरज पडताच पटकन कुठेही जाण्यायेण्यासाठी चेंबूर स्टेशनजवळ असलेली लहानशी जागा जास्त सोयीची होती. त्यामुळे ते दोघेही तिथेच राहिले. मामांना रिटायर होऊन आता वीस वर्षे तरी होऊन गेली असतील. त्यांच्या काही काळानंतर मामीही सेवानिवृत्त झाल्या. त्यानंतर ते दोघे पनवेलला बांधलेल्या त्याच्या नव्या आणि मोठ्या घरात रहायला गेले आणि आमच्या भेटी दुर्मिळ झाल्या. मामा शास्त्रज्ञ आहेत त्याबरोबर उत्तम संगीतज्ञही आहेत, ते स्वतः तबला वाजवून अनेक गायक कलाकारांना साथ देत असत. वयोमानानुसार त्यांचे वादन कमी होत गेले तरी चेंबूर भागातल्या सगळ्या मुख्य संगीत सभांना एक जाणकार श्रोता म्हणून ते पनवेलहूनसुद्धा आवर्जून येत राहिले. मामींनाही गायनाची आवड असल्याने बहुतेक वेळी त्यासुद्धा त्यांच्यासोबत येतच असत. अशा ठिकाणी आमच्या भेटी आणि गप्पा होऊ लागल्या. 

पण वयोमानानुसार पुढे पुढे ते भेटणे हळूहळू कमी होत गेले आणि त्यांना तसेच आम्हालाही तपासण्या किंवा औषधोपचार यासाठी हॉस्पिटलला जाण्याची जास्त गरज पडू लागली. गेल्या चार पाच वर्षात आमच्या भेटी बहुधा हॉस्पिटलमध्येच झाल्या असाव्यात. मागच्या वर्षीच एकदा आम्ही दोघे हॉस्पिटलच्या मेडिकल ओपीडीमध्ये आमचा नंबर येण्याची वाट पहात बसलो होतो. अलकाची प्रकृती जरा जास्तच खराब झालेली असल्यामुळे ती डोळे मिटून स्वस्थ बसली होती. खासगीवाले मामामामीही त्यांच्या फॉलोअप व्हिजिटसाठी आले होते. आमची नजरानजर होताच मी त्यांना हात दाखवला. पण नेहमीप्रमाणे आम्ही दोघे लगेच त्यांच्याकडे गेलो नाही यावरून काही तरी घोळ आहे हे त्यांच्या लक्षात येताच ते दोघे उठून आमच्याकडे आले. पाठीवरून हात फिरवून धीर दिला, "सगळं ठीक होऊन जाईल, काळजी करू नको" वगैरे सांगितले आणि आमच्याजवळ बसून राहिले. हॉस्पिटलमध्ये आलेले असले तरी ते दोघे तसे ठीकच दिसत होते, मामांच्या शरीरावरल्या वृद्धापकाळाच्या खुणा गडद होत होत्या, त्यांना त्या त्रस्त करतांना दिसत होत्या, त्यांची श्रवणशक्ती मंदावली होती, त्यामुळे संवाद साधणे कठीण जात होते, पण मामी पूर्वीसारख्याच चुणचुणीत दिसत होत्या त्यांना कसलाही त्रास होत नसावा असे त्यांच्या देहबोलीमधून आणि चेहे-यावरून वाटत होते.

दीड दोन महिन्यापूर्वी डॉक्टरांना प्रकृती दाखवण्यासाठी अलका हॉस्पिटलमध्ये गेली होती. त्या दिवशी जरा जास्त गर्दी असल्यामुळे तिचे काम संपायला बराच उशीर झाला. तोंवर जेवायची वेळ होऊन गेली होती. त्यामुळे तिच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने तिला लवकर घरी परतणे आवश्यक होते. हॉस्पिटलमधून बाहेर निघण्याच्या वाटेवर तिला अचानक खासगीवाले मामा भेटले. मामींना वॉर्डमध्ये अॅडमिट केले असून त्यांच्यावर केमोथिरपी होत असल्याचे धक्कादायक वृत्त त्यांनी सांगितले. पण हॉस्पिटलच्या नियमानुसार ती पेशंटला भेटण्याची वेळ नव्हती आणि त्यासाठी तीन चार तास तिथे थांबणे अलकाला शक्यच नव्हते. या ट्रीटमेंटने मामी लवकरच ब-या होतील असेच तेंव्हा वाटत होते. सवडीने पुन्हा जाऊन त्यांना भेटावे असा विचार करून ती घरी आली. पण तिच्या स्वतःच्या आजारपणामुळे आणि त्यातून आलेल्या अशक्तपणामुळे त्या वेळी ते जमले नाही. मामा किंवा मामींबरोबर संपर्क नसल्यामुळे त्या हॉस्पिटलमध्ये आहेत की घरी गेल्या आहेत हेही समजायला मार्ग नव्हता. त्यामुळे शक्य झाल्यानंतरसुध्दा त्यांना कुठे जाऊन भेटायचे हे समजत नव्हते.

दहा बारा दिवसांपूर्वी आम्ही तिस-याच एका गावी गेलो असतांना मामांचा एक सख्खा भाचा तिथे आम्हाला भेटला तेंव्हा त्याच्याकडून कळले की मामी कालवश झाल्या. ही दुःखद बातमी मुद्दाम कोणालाही सांगायची नाही असे मामांनी त्यांच्या निकटवर्तीयांना सांगून ठेवले होते. त्या दोघांनीही त्यांच्या सद्वर्तनाद्वारे असंख्य माणसे जोडून ठेवली होती. ही बातमी ऐकून त्या सर्वांना धावत यावेसे वाटेल आणि त्यांना ते कष्ट पडू नयेत असा विचार त्याच्या मागे होता. कदाचित मामींनी स्वतःच तसे सांगून ठेवले असेल. त्या नेहमी दुस-यांचाच विचार करत असत. त्यामुळेच त्यासुध्दा सर्व परिचितांच्या स्मरणात चिरकाल राहणार आहेत यात शंका नाही.

Sunday, October 20, 2013

स्मृती ठेवुनी जाती - ९ - श्रीकांत परांजपे ( एस.आर.परांजपे )

इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण होताच माझी अणुशक्ती खात्यात निवड झाली आणि त्यांच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये माझे प्रशिक्षण सुरू झाले. त्याची सुरुवात फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स यासारख्या विज्ञानाच्या मूलभूत शाखांच्या शिक्षणापासून झाली. निसर्गाच्या कोणत्या नियमांमुळे आणि सिध्दांतानुसार अणुशक्ती निर्माण होते याचे फिजिक्स, ती कोणकोणत्या नैसर्गिक पदार्थांपासून होते याची केमिस्ट्री आणि ते सगळे किती प्रमाणात होते याचे गणित समजून घेण्यासाठी त्याच्या संबंधातली इत्थंभूत पायाभूत माहिती असायला हवी हा यामागचा दृष्टीकोण असावा. विज्ञान आणि गणित हे विषय मला शाळेत असतांनापासून आजपर्यंत प्रिय असले तरी महत्प्रयासाने इंजिनियरिंगची डिग्री घेतल्यानंतर त्यावर काहीतरी प्रत्यक्ष काम करण्याची मी आतुरतेने वाट पहात होतो. त्यामुळे या सैध्दांतिक किंवा पुस्तकी शिक्षणासाठी त्या वेळी आमच्यापैकी कोणीच फारसा उत्सुक नव्हता.

आम्हाला हे विषय शिकवणारे कोणतेही शिक्षक कॉलेजातले प्रोफेसर नव्हते. आमच्याहून पाच सहा वर्षे वयाने मोठे आणि एकच ग्रेड वरच्या हुद्द्यावर आमच्याच खात्यात काम करणारे निरनिराळे अधिकारी येऊन थोडा थोडा भाग शिकवून जात होते. त्या काळातले आमचे ट्रेनिंग स्कूल मुंबईतल्या मरीन लाइन्सवर होते आणि आमच्या लेक्चरर्सना तिथे येण्याजाण्यासाठी ऑफिसचे व्हेइकल कधी मिळाले तर मिळत असे, कधी मिळतही नसे. त्या काळातल्या लालफितीमधून टॅक्सीभाड्याचे ऱिइंबर्समेंट मिळवणे फार जिकीरीचे काम होते आणि त्या काळातली सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही चांगली नव्हती. शिवाय मुलांना शिकवणे हे त्या लोकांचे मुख्य काम नव्हतेच. यामुळे त्यांच्यातल्या काहीजणांना या कामात मनापासून रस वाटत नसे. केवळ नोकरीचा भाग म्हणून ते लोक हा जुलमाचा रामराम करून जात. कधी कधी ते मरीन लाइन्सला येऊच शकत नसत आणि त्यांना दिलेला पोर्शन उरलेल्या पीरियड्समध्ये कसाबसा कव्हर करून टाकत असत. आमच्या बॅचमधली बहुसंख्य मुले मुंबईबाहेरून आलेली होती, त्यांच्या हातात पहिल्यांदाच त्यांच्या हक्काचे पैसे पडत होते, ट्रेनिंगच्या सुरुवातीला बराचसा मोकळा वेळही मिळत होता. यामुळे आम्ही बहुतेक सगळी मुले जमेल तेवढी आपापल्या जिवाची मुंबई करून घेत होतो. असा सगळा आनंद होता. 

रिअॅक्टर इंजिनियरिंग हा नवा विषय सुरू होणार असल्याची बातमी येतांच सर्व मुलांना खूप आनंद झाला. आपल्याला आता काही तरी प्रत्यक्ष कामाचे शिकायला मिळेल असे सर्वांना वाटले. त्यासाठी एस.आर.परांजपे नावाचे लेक्चरर येणार असल्याचे समजले आणि मराठीभाषी मुले जरा जास्तच खूष झाली. आम्ही त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहू लागलो. पहिल्या पीरियडची वेळ झाली तरी परांजपे सर आले नव्हते. त्यांच्या आगमनाची आणखी पाच दहा मिनिटे वाट पहायची आणि जवळच्या इराणी किंवा उडपी हॉटेलात किंवा मरीन ड्राइव्हच्या मसुद्गकिना-यावर जाऊन बसायचे असे आमचे बोलणे चालले असतांनाच ते धावतपळत आणि कपाळावरला घाम टिपत टिपत क्लासरूममध्ये येऊन धडकले. शिडशिडीत शरीरयष्टी, जाड भिंगांचा आणि जाड फ्रेमचा चश्मा, चेहे-यावर भोळसट वाटावा इतका सौम्य भाव वगैरेंमुळे त्यांचे पहिले इम्प्रेशन काही फारसे चांगले उमटले नाही. वयाने आणि हुद्द्याने ते आमच्यापेक्षा निदान बारा तेरा वर्षांनी सीनियर असले तरी आपण मोठे ऑफिसर असल्याचा कसलाच रुबाब त्यांच्या वागण्यात किंवा बोलण्यात दिसला नाही. त्या वेळी तर ते एकाद्या म्युनिसीपालिटीच्या शाळेतल्या मास्तरासारखे दिसत आणि वावरत होते, त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि पहिल्याच वाक्याच्या एका शब्दात अडखळून न्नन्नन्नन्न असा चमत्कारिक उच्चार यायला लागल्यावर तर मुलांची साफ निराशा झाली.

मागच्या बाकावर बसलेल्या मुलांची कुजबूज वाढून त्याला गोंगाटाचे रूप आले, तरीही सरांनी तिकडे अजीबात लक्ष न देता त्यांचे किंचित तोतरे बोलणे चालूच ठेवले. त्यांनी बहुधा पूर्वीच्या काही बॅचेसनाही शिकवले असावे आणि त्यांना या सगळ्याची संवय झाली असणार. समोरच्या बेंचांवर बसलेल्या मुलांवर आपले लक्ष केंद्रित करून त्यांनी शांतपणे आपला विषय शिकवायला सुरुवात केली. परांजपे सरांनी त्यासाठी भरपूर पूर्वतयारी केलेली होती. विषयावर तर त्यांचे प्राभुण्य होतेच, त्यासंबंधीची सर्व इत्थंभूत माहिती त्यांच्याकडे त्यांच्या अगदी नखाग्रांवर (फिंगरटिप्सवर) होती. त्याची सुरेख प्रकारे मांडणी करून ती मनोरंजक पध्दतीने सांगायला त्यांनी सुरुवात केल्यानंतर मात्र बाकीची मुलेही त्यात गुंगून गेली.

बिलियर्डमधल्या चेंडूसारखा सारखा एक न्यूट्रॉन येऊन युरेनियमच्या एका अणूला धडकतो आणि त्याचे विखंडन करून त्यातून आणखी न्यूट्रॉन जन्माला येतात, ते पुढे आणखी युरेनियमच्या अणूंचे विखंडन करत जातात अशा प्रकारचे सोपे चित्र न्यूक्लियर फिजिक्स शिकत असतांना आमच्या मनात तयार झालेले होते. प्रत्यक्षातल्या रिअॅक्टरमध्ये युरेनियमचे कित्येक परार्ध अणू वास करत असतात. आणि दर सेकंदाला कित्येक अब्ज न्यूट्रॉन येऊन युरेनियमच्या निरनिराळ्या अणूला धडकत असतात किंवा इतर पदार्थांमध्ये ते शोषून घेतले जात असतात, क्षणोक्षणी जन्माला येऊन लगेच नष्ट होणा-या न्यूट्रॉन्सचा एक महाप्रचंड घोळका रिअॅक्टरमध्ये घोंघावत असतो हे एक वेगळे चित्र परांजपे सरांनी छान उभे केले. १९४२ साली डॉ.एन्रिको फर्मीने यशस्वीरीत्या तयार केलेल्या पहिल्या पाईलपासून ते पुढील दोन शतकांमध्ये झालेल्या अनेक प्रकारच्या प्रयोगांमधून अणुशक्तीचा विकास कसा होत गेला, गोल, चौकोनी, षट्कोनी, उभे. आडवे, लांबट, बसकट वगैरे निरनिराळ्या आकारांचे असंख्य प्रकारचे लहानमोठे रिअॅक्टर्स अनेक देशांमध्ये तयार केले गेले, त्यातले काही चालले, बरेचसे चाललेच नाहीत, युरेनियम, प्ल्युटोनियम यासारखी इंधने आणि त्यांच्या जोडीला साधे पाणी, जड पाणी (हेवीवॉटर), कार्बन डायॉक्साइड, सोडियम वगैरे पदार्थांचा उपयोग त्यात कसा केला गेला, त्यांचे परिणाम काय झाले, वगैरेंचे सुसंगत आणि सविस्तर असे वर्णन त्यांनी केले. हा विषय रोचक होताच, परांजपे सरांनी तो फारच चांगल्या रीतीने समजावून सांगितला. ते करता करता अमेरिका, रशीया, इंग्लंड, फ्रान्स, कॅनडा वगैरे देशांनी त्यातल्या निरनिराळ्या पध्दतींवर जास्त भर का दिला आणि भारताच्या दृष्टीने त्यातले काय शिकण्यासारखे आणि फायद्याचे आहे हेसुध्दा ते सांगत गेले. त्यांनी जे काही सांगितले ते सर्वांच्या स्मरणात पक्के रुतून बसले.

लेक्चर झाल्यानंतरसुध्दा परांजपेसर थांबून रहात, मुलांनी विचारलेल्या कोणत्याही शंकेचे उत्तर देतांना त्याचे समाधान होईपर्यंत त्याचे विवेचन करून समजावून सांगत. काही मुले अवांतर प्रश्नही विचारत. त्या काळात फॉरेनला जाण्याची प्रचंड क्रेझ होती कारण ती संधी फार थोड्या लोकांना मिळत असे. त्यामुळे "सर, तुम्हाला कधीतरी फॉरेनला जायचा चान्स मिळाला का हो?" अशी जराशी तिरकस पृच्छा एका वात्रट मुलाने करताच "निदान सात आठ वेळा तरी मी कुठे कुठे जाऊन आलो असेन." असे त्यांनी अगदी शांतपणे सांगताच वर्गातल्या सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अणुशक्ती खात्यात ते किती मोठ्या पोस्टवर आहेत याची तोपर्यंत कोणाला कल्पनाच नव्हती. "आमचे ट्रेनिंग संपल्यावर आम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये घ्याल का?" असे काही मुलांनी त्यांना विचारल्यावर सरांनी त्यांनाच उलट विचारले, "तुम्हाला चेस आणि ब्रिज खेळायला येते का?" हे ऐकून सगळे गारेगार झाले. परांजपे सर ज्या प्रकल्पावर काम करत होते तो मंजूरीसाठी बराच काळ सरकार दरबारी रखडत पडला असल्यामुळे त्यावर काम करणा-या लोकांना वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पडला होता असा त्याचा अर्थ होता असे नंतर कळले. 

रिअॅक्टर इंजिनियरिंग या विषयाचा जेवढा भाग परांजपे सरांना दिला होता तो शिकवून संपल्यावर पुढील भागांसाठी त्यांच्या ऐवजी त्यांचेच सहकारी दिवेकर सर आले. त्यानंतरच्या काळात अणुशक्ती विभागाच्या काही कार्यक्रमांमध्ये परांजपे सर आम्हाला अधून मधून भेटत, दर वेळी त्यांना नमस्कार करताच तेसुध्दा लगेच ओळख दाखवून आमची विचारपूस करत. असा जवळ जवळ दीड वर्षांचा काळ उलटून गेला आणि परांजपे सरांचा फास्ट ब्रीडर टेस्ट रिअॅक्टर (एफबीटीआर) मार्गाला लागल्याची बातमी आली. हा प्रकल्प फ्रान्सच्या सहाय्याने उभारला जाणार होता. तोपर्यंत परांजपे सरांच्या हाताखाली काम करणारा एक लहानसा सेक्शन होता. पण प्रॉजेक्टचे काम पाहण्यासाठी त्याचा खूप मोठा विस्तार करावा लागणार होता. त्यामुळे बीएआरसीमधल्या अनेक लोकांनी त्यात सामील होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आनंद दीक्षित आणि रवीन्द्र काळे या माझ्या मित्रांचीही त्यात निवड झाली. त्यातल्या दीक्षितच्या बरोबरच मी त्या काळात एका फ्लॅटमध्ये रहात होतो. त्यामुळे "एसआरपींनी आज हे केले, ते केले, असे सांगितले, तसे सांगितले ..."  वगैरे मधून त्यांचा उल्लेख आमच्या रोजच्या बोलण्यात होऊ लागला आणि त्यामधून त्यांची एक आणखी वेगळी प्रतिमा मनात तयार होत गेली.

ते नुसते बोलघेवडे शिक्षक नव्हते, कोट्यवधी रुपये खर्चाच्या एका मोठ्या प्रॉजेक्टची संपूर्ण जबाबदारी पेलण्याची क्षमता त्यांच्यात होतीच. त्याचे सारे सविस्तर प्लॅनिंग, त्यात पडणारी कामे आणि त्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ यांची जुळवाजुळव करणे, त्यानंतर ती कामे सुयोग्य सहाय्यकांना वाटून देणे, त्यांच्यामध्ये सामंजस्य राखणे ही महाकर्मकठीण कामे ते व्यवस्थितपणे सांभाळत होते. अणुशक्तीखात्यात आणि बाहेरील अनेक वरिष्ठांशी त्यांच्या चांगल्या ओळखी होत्या. ते वरून जेवढे साधेसुधे दिसायचे तेवढेच पक्के आतल्या गाठीचे होते. त्यांच्या मनात नेमके काय चालले आहे हे सहजासहजी कोणाला कळून देत नसत. त्यांच्या काही आवडीनिवडी होत्या, छंद होते, त्यातला एक होमिओपाथी हा होता. असे त्यांच्या व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू त्यामधून समोर येत गेले. ठरल्याप्रमाणे त्यांच्या टीमसह ते वर्षभरासाठी फ्रान्सला जाऊन आले आणि लवकरच कल्पकमला चालले गेले. त्यानंतर त्यांची भेट होण्याचे योग दुर्मिळ होत गेले. त्यांचे सहकारी असलेले माझे अनेक जुने मित्र या ना त्या कारणाने कुठे ना कुठे भेटत असत तेंव्हा त्यांच्या बोलण्यामध्ये परांजपे सरांचा नेहमी उल्लेख येतच असे. अखेरीस संचालक या पदावरून सेवानिवृत्त होऊन ते कल्याणला सेटल झाले असल्याचे त्यामधून समजले.

त्यालाही जवळ जवळ वीस वर्षे होऊन गेली. कालांतराने माझे ते मित्र आणि मी स्वतः रिटायर होऊन निरनिराळ्या शहरांमध्ये राहू लागलो. आमच्याही गाठी भेटी कमी होत गेल्या आणि झाल्या तरी आता त्यात एसआरपींचा (श्रीकांत परांजपे यांचा) विषय निघणे बंद होऊन गेले. ते नाव हळूहळू विस्मरणात जात चालले होते. अचानक लोकसत्तामधल्या एका बातमीने माझे लक्ष वेधून घेतले. ती त्यांच्या दुःखद निधनासंबंधीची होती आपली स्मृती मागे ठेऊन ते पुढे चालले गेले होते, आता यानंतर ते आता कधीच प्रत्यक्षात दिसणार नाहीत. 

--------------------------------

Monday, October 07, 2013

तेथे कर माझे जुळती - १६ - स्व. कमलाताई काकोडकर



माझ्या आयुष्यात मला प्रत्यक्ष भेटलेल्या ज्या मोठ्या व्यक्तींच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे त्यांच्याबद्दल या सदरात दोन शब्द लिहायचे असे मी पाच वर्षांपूर्वी ठरवले होते. यातल्या काही व्यक्तीबद्दल लहानमोठे ग्रंथ आणि अगणित लेख लिहिले गेले आहेत. त्या महान लोकांची समग्र माहिती एका लेखात थोडक्यात देणे मला शक्यही नाही, माझी तेवढी पात्रताही नाही आणि हे लेख लिहिण्यामागे माझा तसा उद्देशही नाही. "मी सुध्दा या थोर लोकांना भेटलो आहे." अशी शेखी मारण्याचे माझे वय आता राहिले नाही, पण त्यांना भेटल्याचा मला निश्चितच आनंद आणि अभिमान वाटतो. फक्त माझ्या कांही जुन्या व्यक्तिगत आठवणी आणि या महान लोकांचा माझ्या जीवनावर पडलेला प्रभाव यासंबंधी माझे चार शब्द मी या निमित्याने मांडणार आहे. यामुळे यातसुध्दा कदाचित थोडासा मीच डोकावलेला दिसणार याला काही इलाज नाही. या लेख मालिकेतले हे सोळावे पुष्प प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांच्या मातोश्री स्व.कमलाताई काकोडकर यांना समर्पित करीत आहे. काही दिवसापूर्वी त्यांचे वृध्दापकालाने दुःखद निधन झाले. एक दुर्मीळ असे ध्येयवादी व्यक्तिमत्त्व वर्तमानातून इतिहासात गेले! सध्या सुरू असलेल्या नवरात्राच्या दिवसात आदिशक्तीच्या आधुनिक काळामधील या रूपाचे दर्शन समयोचितच आहे.

डॉ.अनिल काकोडकर आणि मी अणुशक्तीनगर वसाहतीच्या एकाच भागात वर्षानुवर्षे रहात होतो. आमच्या क्वार्टर्स साधारणपणे एकाच प्रकारच्या होत्या, आमची मुले एकाच शाळेत शिकत होती, एकाच डिस्पेन्सरीत आम्ही वैद्यकीय कारणांसाठी जात होतो आणि रोजच्या उपयोगी वस्तू आणण्यासाठी कॉलनीमधल्या एकाच बाजारात जात होतो. इतकेच नव्हे तर आम्हाला कॉलनीच्या बाहेर कुठे जायचे असेल तर त्यासाठी आम्ही एकाच बसस्टॉपवर जात होतो. त्यामुळे अधून मधून कुठे ना कुठे आमची एकमेकांशी गाठ भेट होतच असे. काकोडकरसाहेबांच्या मातोश्री कमलाताई त्यांच्याबरोबर रहात असल्यामुळे त्यासुध्दा नेहमीच्या पहाण्यातल्या होत्या. त्यांच्या वयाचा विचार करता कॉलनीतले सगळेजण त्यांना आजीच म्हणत असत. माझे त्यांच्याशी कधीच फारसे बोलणे झाले नसले तरी माझ्या पत्नीबरोबर ते नेहमी होत असे. कमलाताईंचे वागणे बोलणे अत्यंत साधेपणाचे असायचे. कॉलनीमधल्या त्यांच्या वयाच्या इतर काही आज्या खूप बोलक्या होत्या. आपली मुले, नातवंडे वगैरेंचे कौतुक करतांना त्यांच्या जिभेवर सरस्वती नाचत असे. त्यांच्या किरकोळ कामगिरींचे पुराणसुध्दा त्या रंगवून सांगतांना थकत नसत. पण काकोडकर आजी त्या सर्वांहून फार निराळ्या होत्या. स्वतःची किंवा आपल्या कुटुंबाची बढाई करणे त्यांच्या स्वभावात नव्हते.

खरे पाहता त्यांच्याकडे सांगण्यासारखे खूप म्हणजे खूपच होते. काकोडकरसरांनी अणुशक्तीखात्याच्या प्रशालेत प्रवेश केल्यापासूनच, किंबहुना त्याच्याही आधी इंजिनियरिंग शिकत असतांनापासून नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्यांची बुध्दीमत्ता, ज्ञान, कर्तृत्व, संघभावना, कामाबद्दल असलेली तळमळ, निष्ठा हे सगळेच गुण इतके उच्च स्तरावरचे होते की पहिल्या भेटीमध्येच कोणावरही त्यांची छाप पडल्याखेरीज रहात नसे. अणुशक्तीशी निगडित असलेली एकापाठोपाठ एक नवनवी आव्हानात्मक कामगिरी त्यांच्याकडे विश्वासाने सोपवली जात असे आणि ते रात्रंदिवस जिवाचे रान करून ती यशस्वीरीत्या फत्ते करून दाखवत असत. यामधून त्याच्या यशाची कमान सतत उंचावत राहिली आणि त्यांची निवड अधिकाधिक उच्च पदांवर होत गेली. डिपार्टमेंटमध्ये त्यांचे करीयर नेहमीच सुपरफास्ट ट्रॅकवर राहिले होते. काकोडकर आजींना या सर्वाचे मनापासून कौतुक आणि सार्थ अभिमान वाटत असणारच. पण तरीही त्या मितभाषीच राहल्या. मुलाच्या प्रगतीबरोबर कॉलनीमधल्या लोकांच्या मनातले त्यांचे स्थानसुध्दा उंचावत जात होतेच. अधिकाधिक लोक त्यांना जास्त मान देत होते, त्यांच्याकडे अधिक आदराने पाहिले जात होते, पण त्यांनी कधीही त्याचे भांडवल केले नाही. त्यांचे वागणे आणि बोलणे नेहमीच अत्यंत साधेपणाचे राहिले.

त्यांचे स्वतःचे जीवनसुध्दा अद्भुत किंवा कल्पनातीत वाटावे इतक्या वेगळ्या परिस्थितीमधून गेलेले होते, पण त्याबद्दल क्वचितच कुणाला माहिती झाली असेल. आजींच्या बोलण्यात त्याचा उल्लेख त्या बहुधा कधीच करत नसाव्यात किंवा जाणीवपूर्वक मुद्दाम ते टाळत असाव्यात. कॉलनीमधल्या माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांना त्याची पुसटशीसुध्दा कल्पना कधी आली नाही. एक सुसंस्कृत, सुस्वभावी, शांत, प्रेमळ आणि कर्तबगार मध्यमवर्गीय आजी एवढेच त्यांचे व्यक्तीचित्र माझ्या मनात तयार झाले होते. याच्या पलीकडे मला त्यांच्याबद्दल काही माहिती नव्हती. त्यांनी खूप कष्ट सोसून आपल्या मुलांचा सांभाळ केला आणि त्यांना जीवनात इतक्या उंचीवर नेऊन पोचवले वगैरे अस्पष्ट कुणकुण कधी तरी कानावर आली असेल, पण त्याचा जास्त तपशील कधी समजला नव्हता. माझ्या पिढीमधल्या मध्यमवर्गातल्या, विशेषतः ग्रामीण भागातल्या अनेक मुलांनी अनेक अडचणींना सामोरे जाऊन, धडपड करून उच्च शिक्षण घेतले होते आणि त्यात त्यांच्या कुटुंबीयांनीही खस्ता खाल्ल्या होत्या हे सर्वांना माहीत असल्यामुळे कदाचित त्याला त्या वेळी फार मोठे महत्व दिले गेले नसेल.

डॉ.काकोडकर अणुशक्ती आयोगाचे अध्यक्ष झाल्यानंतर अणुशक्तीनगर सोडून मलबारहिलवरील निवासस्थानी रहायला गेले आणि आजीही तिकडे गेल्यानंतर त्यांचे दर्शन होईनासे झाले. ऑफीसातल्या वाढत्या कामाचे आणि वाढत असलेल्या कुटुंबातले इतर व्यापही वाढत गेल्यामुळे माझ्या स्मरणातून त्या जवळ जवळ बाहेर गेल्या होत्या. कमलाताई काकोडकर यांनी एक आत्मचरित्र लिहिले आहे असे अचानक मला कुणाकडून तरी समजले आणि त्या इतक्या मोठ्या व्यक्ती होत्या हे मला इतके दिवस कसे कळले नव्हते याचे नवल वाटले. त्या पुस्तकाचे नाव त्यांनी एक धागा सुताचा असे का ठेवले आहे याचा काही उलगडा लागत नव्हता.. या पुस्तकाच्या प्रकाशनाशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीकडून ही माहिती मिळाल्यावर मी त्याबद्दल चौकशी केली. ती ऐकून मी केवढा आश्चर्यचकित झालो ते सांगता येणार नाही. या पुस्तकाच्या प्रकाशनसमारंभाला उपस्थित रहाण्याचे भाग्यही मला मिळाले.   

सुप्रसिध्द गांधीवादी नेते कै.दादा धर्माधिकारी यांचे सुपुत्र आणि सुप्रसिध्द निवृत्त न्यायमूर्ती श्री.चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली या पुस्तकाचे समारंभपूर्वक प्रकाशन करण्यात आले. त्यांनी खूप वर्षांपूर्वीपासून कमलाताईंना जवळून पाहिले होते. त्या काळातल्या आठवणी त्यांनी सांगितल्या. कमलाताईंचे शिक्षण महात्मा गांधीजींच्या वर्धा येथील सेवाग्राममधील महिलाश्रमात झाले. स्वतः गांधीजी आणि स्व.कस्तुरबा यांचा सहवास त्यांना लाभला आणि देशभक्तीबरोबरच सेवा, संग्राम, सहनशीलता वगैरेंचे जे संस्कार त्या कालावधीत त्यांच्या मनावर बिंबले गेले ते त्यांनी आयुष्यभर जपून ठेवले आणि पुढच्या पिढीला दिले. त्या नेहमी खादीची साधी सुती वस्त्रेच वापरत राहिल्या. सन १९४२च्या चले जाव आंदोलनात त्यांनी भूमिगत होऊन सक्रिय भाग घेतला. त्यांचे पती स्व.पुरुषोत्तम काकोडकर यांना दीर्घकाल पोर्तुगीजांच्या बंदिवासात रहावे लागल्यानंतर कमलाताईंनी मध्यप्रदेशातल्या एका लहानशा गावात आधी शिशुवर्ग सुरू करून ती शाळा वाढवत नेली आणि नावारूपाला आणली. पुढे मुलांच्या शिक्षणासाठी ती सोडून त्या मुंबईत आल्या आणि खादी ग्रामोद्योग केंद्रात काम करत राहिल्या. ज्या काळातल्या सर्वसामान्य स्त्रिया कोणाच्या सोबतीशिवाय घराचा उंबरठासुध्दा ओलांडायला घाबरत असत त्या कालखंडातला हा कमलाताईंचा खडतर जीवनप्रवास त्यांनी ज्या धैर्याने आणि जिद्दीने केला त्याला तोड नाही. कमलाताईंच्या आयुष्याचा धागा उलगडताना स्त्री जन्माची एक वेगळीच कहाणी पाहायला मिळाल्याचे चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. त्या काळातील मोठ्या माणसांच्या सहवासानंतर आताची माणसे पिग्मी वाटतात, अशी खंतही त्यांनी त्या प्रसंगी व्यक्त केली होती.

स्वत: कमलाताईंनी त्यांच्या जीवनाचा हा एक धागा सुखाचा नसून सुताचा का हे सांगताना जीवनातील चरख्याचे माहात्म्य सांगितले. स्वराज्याचा सूर्य उगवला, पण सुराज्य आले नाही, नवकोट नारायण भरपूर झाले पण गरीब माणसाचे भले झाले नाही, अशी खंत व्यक्त करतानाच कमलाताईंनी आम्ही कसे जगलो याविषयी येणाऱ्या पिढीला प्रश्न् पडू नयेत म्हणून हे पुस्तक लिहिल्याचे सांगितले. स्वातंत्र्य ते आणीबाणी, आणीबाणी ते टेलिकॉम क्रांती, टेलिकॉम क्रांती ते आजचे जागतिकीकरण असा सगळा प्रवास सजगपणे करणारी आणि त्याविषयी कसोशीने बोलण्याची इच्छा असणारी व्यक्ती म्हणजे कमलाताई असल्याचे पुस्तकाचे शब्दांकन करणारे पत्रकार चंदशेखर कुलकर्णी यांनी सांगितले. वयोमानानुसार स्वतः सगळे लिहून काढणे कदाचित कमलाताईंना आता अवघड झाले असल्यामुळे त्यांनी सांगितलेल्या हकीकती कुलकर्णी यांनी व्यवस्थितपणे लिहून दिल्या असाव्यात.

डॉ.अंजली कुलकर्णी आणि डॉ.अनुराधा हरकरे या दोन भगिनींनी मिळून फुलाला सुगंध मातीचा या नावाचे एक सुरेख पुस्तक लिहिले आहे. यात निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये शिखरावर जाऊन पोचलेल्या पाच प्रसिध्द व्यक्तींच्या जडणघडणीवर त्यांच्या मातापित्यांचा, विशेषतः त्यांच्या आईचा किती प्रभाव पडला होता हे या पुस्तकात त्यांनी दाखवून दिले आहे. यासाठी त्यांनी या पालकांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि या मुलाखतींमधून त्यांचे आगळे वेगळे व्यक्तीमत्व दिसून येते. या पुस्तकातला पहिलाच लेख स्व.कमलाताई आणि डॉ.अनिल काकोडकर यांच्यावर आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनसोहळ्यालाही मी उपस्थित राहिलो होतो. या पुस्तकाच्या लेखिकांना मुलाखत देतांना काकोडकर आजींनी सांगितले होते, "प्रत्येक आईला आपलं मूल खूप मोठं व्हावं, यशस्वी व्हावं असं वाटतं. परंतु त्यासाठी योग्यरीत्या पालकत्व निभावणं आवश्यक असतं. पालकांनी मुलांसमोर आदर्श ठेवणं, गरज पडल्यास स्वतःवरही वागणुकीची बंधनं घालणं गरजेचं असतं ..."  त्यांनी तरुण पिढीला असा संदेश दिला आहे, "रोज एक तरी काम स्वतःच्या कुटुंबासाठी सोडून दुस-या कुणासाठी तरी करून बघा, प्रत्येकाने असे ठरवले तर आपल्यासोबत दुस-याचा, पर्यायाने हळूहळू देशाचा विकास होईल."

दुनिया गोल आहे. यामुळे आपल्याला कोण कुठे आणि केंव्हा अकल्पितपणे भेटेल हे सांगता येणार नाही. माझ्या मुलाचे लग्न झाल्यानंतर काही काळाने आम्हाला समजले की आमच्या सुनेच्या आईचे (मंगलाताईंचे) माहेर खरगोणला कमलाताई काकोडकरांच्या घराजवळ होते आणि त्यांनी म्हणजे आमच्या विहीणबाईंनी त्यांच्या लहानपणी काकोडकर आजींना खूप जवळून पाहिले होते. तेंव्हाच त्या गोष्टीला निदान वीस पंचवीस वर्षे उलटून गेली होती, पण त्याचा तपशील त्यांच्या चांगला लक्षात होता. ही गोष्ट आम्ही आजींना भेटल्यावर सांगितली तेंव्हा त्यांनाही ही जुनी ओळख लगेच आठवली. त्यानंतर जेंव्हा जेंव्हा आमची भेट झाली तेंव्हा त्यांनी "आमची मंगला कशी आहे.." याची जरूर चौकशी केली. दोन तीन वर्षांपूर्वी आम्ही आमच्या दूरच्या नात्यातल्या एका मुलीच्या लग्नाला ठाण्याला गेलो होतो, तिथे काकोडकर आजी सौ.काकोडकरांना घेऊन आल्या होत्या. त्या दोघी नव-या मुलाकडच्या बाजूने आल्या होत्या. आपण कोणी व्हीआयपी आहोत असा कसलाही आभास त्यांच्या वागण्यात नव्हता. ही गोष्ट आधीपासून ठाऊक नसली तर कुणाला तसे मुळीसुध्दा वाटले नसते. भोजन संपल्यावर त्यांनी आम्हाला थोडा वेळ जवळ बसवून घेतले, अत्यंत आपुलकीने आमची चौकशी केली. तिथून आम्हाला ठाण्यातच दुस-या एका आप्तांना भेटायला जायचे होते हे आमच्या बोलण्यात येऊन गेल्यावर त्या घरी परत जातांना वाटेत आम्हालाही त्यांच्या गाडीने सोडतील अशी नुसती ऑफर दिली नाही तर आम्ही ती स्वीकारावी असा प्रेमळ आग्रह केला. पण ठाण्यातले त्यांचे घर आणि आम्हाला जायचे असल्याची जागा मंगल कार्यालयाच्या भिन्न दिशांना आहेत आणि दिवसा उजेडी आम्हाला तिथे रिक्शेने जायला कसलाही त्रास नाही वगैरे सांगून कसेबसे त्यांना ते पटवून दिले. दुस-यासाठी शक्यतो काही तरी करायला हवे असा त्यांनी नुसता संदेश दिला नव्हता, अखेरपर्यंत त्या स्वतः तसा विचार आणि आचरण करीत होत्या हे अशा छोट्या उदाहरणातून सहज लक्षात येते..

ती भेटच आमची काकोडकर आजींबरोबर झालेली अखेरची भेट ठरली. मागच्या महिन्यात त्यांची प्राणज्योत मालवल्याची बातमी वर्तमानपत्रात वाचली आणि क्षणभर मन सुन्न होऊन गेले. स्त्रीला आदिशक्तीचे रूप का म्हणतात याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे स्व.कमलाताई काकोडकर. आम्हाला ते पहायला मिळाले, त्यांच्याकडून प्रेमाचे चार शब्द आणि शब्दाविना मिळालेली अदम्य स्फूर्ती, जीवन कसे जगावे याचा न सांगता आपल्या आचरणामधून दिलेला वस्तुपाठ मिळाला हे आमचे भाग्य.

Saturday, October 05, 2013

घटाघटाचे रूप आगळे

घटाघटाचे रूप आगळे। प्रत्येकाचे दैव वेगळे।
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार ।।

असे कवीवर्य स्व.ग.दि.माडगूळकरांनी लिहिले आहे. पन्नास वर्षांपूर्वीच्या ग्रामीण महाराष्ट्रामधील जीवनावरील या गीतात अगदी चपखलपणे बसणारी ही उदाहरणे आहेत. श्रीकृष्णाच्या गोकुळामधल्या गोपिकांपासून ते माझ्या आधीच्या पिढीमधल्या काळातल्या खेड्यांमध्ये राहणा-या घराघरातल्या गृहीणींपर्यंत सगळ्याजणी आपापल्या घरांमधले दूध, दही, लोणी वगैरे खाद्यपेय पदार्थ मातीच्या गाडग्यामडक्यांमध्ये ठेवत असत. त्या काळात स्टेनलेसस्टीलची भांडी अजून निघालेली नव्हती, काचेच्या किंवा चिनी मातीच्या पात्रांची किंमत परवडत नसे आणि त्या वस्तू खेडेगावातल्या बाजारात मिळत नसल्यामुळे मुद्दाम बाहेरून आणाव्या लागायच्या. त्या मानाने स्थानिक कुंभाराने तयार केलेली मातीची मडकी, घडे वगैरे स्वस्त आणि सहज उपलब्ध होत असत. ती फुटली तरी त्याची फारशी हळहळ वाटायची नाही. मोठे तोंड असलेली अनेक लहानमोठी मडकी घरात आणून रचून ठेवलेली असत. गरजेप्रमाणे त्यातले एक एक काढून घेऊन त्यात दूध, दही, लोणी वगैरे ठेवले जात असे. घरातला सगळा स्वयंपाक चुलींवर होत असल्यामुळे तो झाल्यानंतर चुलींमधले धगधगते निखारे वेगळ्या मडक्यात काढून ठेवले जात असत आणि तळाशी पडलेली राख वेगळी ठेवली जात असे. निखारे थंड केल्यानंतर त्याचा कोळसा पुन्हा ज्वलनासाठी वापरला जाई आणि राखेचा उपयोग भांडी घासण्यासाठी होत असे. एका चुलीतले निखारे बाहेर काढून त्यांचा उपयोग दुसरी चूल, शेगडी किंवा बंब पेटवण्यासाठी केला जात असे. अशा वेळी त्यांना इकडून तिकडे घेऊन जाण्यासाठी मातीच्याच उथळ पात्रांमध्येच ठेवले जात असे.

शहरात वाढलेल्या पुढच्या पिढीतल्या मुलांना फ्रीजमधून काढून खायचे अमूल बटरच ओळखीचे झाले असणार. मोठ्या डे-यामध्ये रवीने ताक घुसळून काढलेला ताज्या लोण्याचा गोळा त्यांना क्वचितच पहायला मिळाला असेल आणि त्या छान लोण्याच्या गोळ्याला मातीच्या मडक्यात घालून ठेवण्याची कल्पनासुध्दा कदाचित सहन होत नसेल. गॅस, ओव्हन किंवा इलेक्ट्रिक हॉटप्लेटवरच घरातला स्वयंपाक होत असल्यामुळे निखारा किंवा अंगार हे शब्दसुध्दा त्यांच्या कानावर पडले असण्याची शक्यताही कमीच आहे. कुंभाराने तयार केलेल्या एका मडक्याला लोण्याची स्निग्धता आणि मऊपणा अनुभवायला मिळतो तर तशाच प्रकारच्या दुस-या मडक्याला मात्र निखा-याचे दाहक चटके सहन करावे लागतात, हे ज्याचे त्याचे नशीब आहे हे या ओळींमधून सांगितलेले सत्य किती विदारक आहे याची पूर्ण जाणीव त्यांना कदाचित होणार नाही. त्यासाठी दुसरी उदाहरणे द्यावी लागतील.

गदिमांच्या गीतातले घट या जगातल्या माणसांची प्रतीके आहेत हे उघड आहे. मातीची सगळी मडकी कुंभारांकडून एक एक करूनच बनवली जातात, अजून तरी त्याचे यांत्रिक साचे निघालेले नाहीत. त्यामुळे ती एकासारखी एक दिसत असली तरी त्यांचा आकार, गोलाई. कडांची जाडी यात थोडा थोडा फरक असतोच. पंजाब, बंगाल, महाराष्ट्र, तामीळनाडू, किंवा जर्मनी, चीन, आफ्रिका वगैरे भागातली माणसे त्यांच्या वंशानुसार साधारणपणे सारखी दिसली तरी त्यातल्या प्रत्येकाचा चेहेरा वेगळा असतो. त्याचप्रमाणे उतरंडीमधले प्रत्येक मडके वेगळे आहे हे त्यांना निरखून पाहिल्यास समजेल. निरनिराळ्या घटाचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे केला जातोच. वर दिल्याप्रमाणे काही मडक्यांमध्ये लोणी आणि कांहींमध्ये अंगार ठेवला जातोच, काही मडकी तर अंत्यविधीच्या वेळी फक्त काही मिनिटांसाठीच वापरली गेल्यावर लगेच फोडून टाकली जातात. याच्या उलट हजार दोन हजार वर्षांपूर्वी तयार केले गेलेले काही सुबक नक्षीकाम केलेले रांजण आपल्याला पुरातनवस्तूसंग्रहालयांमध्ये (म्यूजियम्समध्ये) आजही पहायला मिळतात. जगभरातले रसिक पर्यटक त्यांना पाहण्यासाठी येतात आणि त्या रांजणांची व त्यांना बनवणा-या कारागीरांची तोंड भरून तारीफ करतात. त्यातल्या काही रांजणांमध्ये एका काळी सुवर्णमुद्रा भरून ठेवल्या गेल्या असतील आणि प्राणपणाने त्यांचे संरक्षण करणारे सैनिक त्यांच्या पहा-यावर ठेवले जात असतील.

निरनिराळ्या घटांमधल्या कशाचा उपयोग कोणत्या कामासाठी व्हावा हे ठरवण्याचा काडीमात्र अधिकार त्या पात्रांना नसतो. या बातीत काहीही करायला ती असमर्थ असतात. माणसे त्यामानाने थोडी सुदैवी असतात. माणसाचे आयुष्यसुध्दा सर्वस्वी त्याच्या नशीबावर अवलंबून असते असे गदिमांच्या गीतात ध्वनित होत असले तरी याबाबतीत माझी मते थोडी वेगळी आहेत. मी इतका सर्वस्वी दैववादी नाही. निदान काही प्रमाणात तरी माणूस स्वतःच्या प्रयत्नाने आपली वर्तमानकाळातली परिस्थिती बदलून आपले भविष्य घडवू शकतो. सर्वच बाबतीत ते शक्य होणार नसले तरी काही प्रमाणात तो यशस्वी होऊ शकतो, नशीबाने आलेल्या परिस्थितीमुळे निर्माण झालेले मनातले रागद्वेशाचे निखारे फेकून देऊन त्यांच्या जागी सुंदर, मोहक आणि कोमल भावनांची फुले गोळा करून ठेऊ शकतो, हे करता करता इतरांच्या प्रेमाचा किंवा मायेचा लोण्याचा गोळासुध्दा त्याला मिळू शकतो.

हे सगळे मला आज कां आठवले असेल? सकाळी उठून फिरायला जायला निघालो आणि शेजारी असलेल्या महात्मा गांधी कॉम्प्लेक्सपर्यंत गेलो तर तिथे कोप-यावर बरीच गर्दी जमलेली दिसली. जवळ जाऊन पाहिले तर सुंदर सजवलेल्या मटक्यांचे ढीग रचून ठेवलेले होते आणि त्या भागातल्या कोकिळाबेन, ऊर्मिलाबेन वगैरे शेठाण्या, त्यांच्या सेजल, हेतल वगैरे सुना आणि चिंकी, डिंकी वगैरे मुलींना सोबत घेऊन त्याला गराडा घालून उभ्या होत्या. एक एक घट निरखून पहात होत्या, त्यांचे आकार, त्यावर रंगवलेली नक्षी, कांचांच्या तुकड्यांना चिकटवून केलेली डिझाईन्स वगैरे पाहून पसंत केलेल्या मडक्याच्या भावावरून घासाघीस करत होत्या. या सगळ्या घटाघटांचे रूप आगळे वेगळे असले तरी त्या सर्वांचे दैव मात्र साधारणपणे सारखेच असावे. त्या सगळ्यांची आज छान पूजा केली गेली असेल, नऊ दिवस त्यांच्या सभोवती रासगरबा खेळला जाईल. त्यासाठी तयार केलेली खास गाणी लाऊडस्पीकरवर जोरजोरात वाजवली जातील, रंगीबंरंगी कपडे आणि अलंकार लेऊन सजलेल्या युवती प्रचंड उत्साहाने आणि बेभान होऊन त्या गाण्यांच्या तालावर नाचतील. त्यांची यात सतत चढाओढ होत राहील. या घटांना (ते सजीव नसतात, पण असले तर) ती सगळी मौजमजा पहायला मिळेल आणि .... नऊ दिवसांनंतर ते सगळे संपुष्टात आल्यानंतर त्यांना कोणीही विचारणार नाही, बहुधा त्यांचे आयुष्यही तिथेच संपेल, पण नऊ दिवसांचेच त्यांचे आयुष्य मात्र दिमाखात जाईल.