Tuesday, October 22, 2013

स्मृती ठेवुनी जाती - १० मालिनी खासगीवाले

कै.श्रीराम परांजपे हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि ख्यातीप्राप्त इंजिनियर होते, त्यांच्या निधनाची बातमी वर्तमानपत्रांमध्ये छापून आली. कै.मालिनीताई खासगीवाले प्रसिध्दीपासून दूर राहिलेल्या समाजसेविका होत्या. त्या कधी निजधामाला गेल्या हे मलाही समजले नाही. परांजप्यांची ओळख माझ्या नोकरीमध्ये झाली, तर मालिनीताईंची ओळख नातेसंबंधांमधून झाली. परांजपे यांचा आणि माझा परिचय सत्तेचाळीस वर्षांपूर्वी झाला आणि थोडाच काळ राहिला तर गेली चाळीस वर्षे नेहमीच मालिनीताईंची अधूनमधून भेटगाठ होत राहिली होती. माझ्या दृष्टीने पाहता या दोन्ही व्यक्ती मला वडीलधा-या आणि आदरणीय होत्या, त्या कायम लक्षात राहण्यासारख्या वैशिष्ट्यपूर्ण होत्या आणि त्यांचे निधन काही काळापूर्वी झाले एवढाच त्यांना जोडणारा मुख्य धागा म्हणता येईल. यामुळे मी या दोन लेखात या दोघांचा एकापाठोपाठ एक समावेश केला आहे. त्यांचा एकमेकांशी परिचय असण्याची बरीच शक्यता होती, त्या एकमेकांना भेटल्या असाव्यात किंवा वारंवार भेटत असतीलही, पण त्याच वेळी मीसुध्दा त्या जागी उपस्थित होतो असे मात्र कधी झाल्याचे मला आठवत नाही.

माझ्या काही मित्रांना एका प्रॉजेक्टसाठी वर्षभरासाठी फ्रान्सला पाठवायचे ठरले तेंव्हा त्यांच्याकडून एक बाँड घेतला गेला. त्या बाँडवर कोणा वरिष्ठ दर्जाच्या अधिका-याची गॅरंटीयर म्हणून सही पाहिजे होती. त्या मित्रांचे वरिष्ठ अधिकारी स्वतःच त्या टीममध्ये जात असल्यामुळे ते सही देऊ शकत नव्हते. यामुळे इतर मित्रांचे नातेवाईक, नातेवाईकांचे मित्र, शेजारी वगैरेंमधून माझे मित्र त्यांच्यासाठी गॅरंटीयर शोधत होते आणि त्यांना ते मिळाले. त्यातल्या एका मित्राने मला आनंदाने सांगितले, "चला, आज माझं काम एकदाचं झालं, केमिस्ट्री डिव्हिजनमधल्या डॉ.खासगीवाल्यांनी मला सही दिली."     
त्या वेळी डॉ. कारखानावाला नावाचे पारशी सद्गृहस्थ केमिस्ट्री डिव्हिजनचे डायरेक्टर होते. हा खासगीवाला त्यांचाच सगेवाला असावा असे वाटून मी म्हंटले, "हा पारशी कसा काय तयार झाला?" 
मित्राने सांगितले, "अरे ते कोणी खासगीवाला नाहीत, पुण्याचे घरंदाज खासगीवाले आहेत." खासगीवाले हे नाव मी पूर्वी कधी ऐकले नसल्याने मला मराठी वाटत नव्हते. त्यांच्या पूर्वजांमधल्या कोणाला पेशव्यांच्या काळात ही उपाधी मिळाली होती असे स्पष्टीकरण त्यावर मिळाले. माझ्या मित्राशी जुजबी ओळखपाळखसुद्धा नसतांना त्याच्यावर एवढा विश्वास टाकून आर्थिक धोका पत्करणा-या त्या उदार मनाच्या सद्गृहस्थांबद्दल माझ्या मनात आदरयुक्त कुतूहल निर्माण झाले. आपण एकदा त्यांना पहावे, भेटावे असे वाटले, पण माझा मित्र तर फ्रान्सला निघून गेला होता, आता मला त्यांच्याकडे कोण नेणार? यामुळे ते राहून गेले.

माझे लग्न झाल्यानंतर अलकाचे सगळे नातेवाईक माझे आप्त झाले. तिच्या लहान गावातल्या माहेरच्या पुरातन आणि अवाढव्य वाड्यात तीन पिढ्यांमधले बरेचसे लोक रहात असत, अजूनही राहतात. शिक्षण आणि नोकरीच्या निमित्याने बाहेरगावी राहणारी मुले आणि लग्न होऊन सासरी गेलेल्या माहेरवाशिणीसुध्दा वर्षामधून काही काळासाठी सवड काढून तिथे येऊन सर्वांच्या सहवासात रहात आले आहेत. त्यामुळे त्या सर्वांमध्ये खास जवळीक निर्माण झाली आहे. चुलत बहिणींचे दीर, जावा, नणंदा किंवा चुलत चुलत काकूंचे भाऊ, वहिनी यासारखे दूरचे नातेवाईकसुध्दा तिथल्या बहुतेकांना माहीत असतात. एकदा अलकाच्या एका चुलत चुलत बहिणीकडे आम्ही गेलो असतांना त्यांनी मला विचारले, "तुम्ही बीएआरसीमधल्या डॉ.खासगीवाल्यांना ओळखत असालच ना?"
"मी त्यांचं नाव ऐकलं आहे, पण आमची अजून प्रत्यक्ष भेट झाली नाही. आमचं डिपार्टमेंट एवढं मोठं आहे की काम पडल्याशिवाय सहसा कोणाची ओळख होत नाही."
"अहो, आमचे हे मामा आणि आमच्या या मामीसुद्धा फारच चांगली माणसं आहेत, तुम्ही त्यांना भेटाच."
त्यावर अलका म्हणाली, "हो, मला ते लोक माहीत आहेत. ते कुठे राहतात?"
"तेसुद्धा तुमच्या चेंबूरलाच राहतात."
"हो का? मग नक्की भेटू."
या मामामामी म्हणजे डॉक्टर आणि मालिनीताई खासगीवाले या व्यक्तींची माझी पहिली ओळख ही अशी सांगण्या ऐकण्यातून झाली. मला देखील त्या दोघांना भेटण्याचे कुतूहल आणि इच्छा होतीच, त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी मला एक धागाही मिळाला. पण संधी आणि वेळ मिळत नव्हता. त्यांचा पत्ता वगैरे लिहून घ्यायचेही राहून गेले होते. प्रयत्न करून मला तो मिळू शकला असता, पण तेवढे कष्ट घेतले गेले नाहीत. एकदा मी ऑफिसला गेलेलो असतांना आणि काही कामासाठी अलका कुठेतरी गेली असतांना तिला चेंबूरच्या बाजारात की बसमध्ये खासगीवाले मामी अचानक दिसल्या. समोरासमोर येताच, "मामी!", "तू अलका ना?" अशा संवादामधून त्यांनी आपल्या स्मरणातले जुने धागे पुन्हा जोडून घेतले. खरे तर मामींना त्या वेळी अलकाला त्यांच्या घरीच घेऊन जायचे होते, पण त्या काळात टेलीफोन, मोबाईल वगैरे काही सोय नसल्याने मला निरोप कसा द्यायचा हा प्रश्न होता आणि मी ऑफीसातून घरी येऊन दारावर लागलेले कुलूप पाहिले असते तर गोंधळ झाला असता. "पुढच्या वेळी आम्ही चेंबूरच्या मार्केटमध्ये येऊ तेंव्हा नक्की तुमच्या घरी येऊ." असे आश्वासन देऊन अलकाने त्यांच्या घराचा पत्ता आणि जवळपासच्या खुणा विचारून घेतल्या.

त्या काळात आम्ही चेंबूरच्या सिंधी कँपमध्ये रहात होतो. तिथले सगळे वड्डी साँई दुकानदार आमच्यासारख्या भोळ्या भाबड्या ग्राहकांना गंडवायला टपून बसले आहेत असा आमचा ग्रह झालेला असल्यामुळे आम्ही नेहमी खरेदीसाठी चेंबूर स्टेशनजवळच्या बाजारात जात होतो. आम्ही पुढल्या खेपेला तिकडे गेलो तेंव्हा खासगीवाल्यांचे घर शोधून काढले. ते हमरस्त्यावरच असल्यामुळे सहजच सापडले. आम्हाला पाहून त्या दोघांनाही खूप आनंद झाला. त्यांनी अत्यंत आपुलकीने आमचे स्वागत केले. आम्ही कुठे राहतो, तिथे आमचे बस्तान कसे बसले आहे, काही अडचणी आहेत का वगैरेची वडिलधा-या माणसांच्या मायेने चौकशी केली, आमच्या कुटुंबांमधल्या समाईक नातेवाईकांची विचारपूस केली. थोडे बसणे बोलणे झाल्यानंतर "आमच्या स्वैपाकाची तयारी सुरू झालेलीच आहे, आता रात्रीचे जेवण करूनच जा," असा आग्रहही मामींनी केला. पण असे आगांतुकपणे कुणाच्या घरी जायचे आणि थेट पाटावर जाऊन बसायचे हे माझ्यातल्या जावयाला शोभणारे नव्हते. माझे आढेवेढे पाहून मामांनी ते ओळखले आणि पुढे कित्येक वर्षे ते मला "या जावईबापू !" असेच गंमतीने म्हणत राहिले.

त्या दिवशी मामींनी आम्हाला निदान सूप तरी पिऊन जायला सांगितले आणि पोटात भूक लागलेली असल्याने आम्हीही ते आनंदाने मान्य केले. त्यापूर्वी म्हणजे लहानपणी आमच्या घरी टमाट्याचे सार बनवले जात असे ते रस्समसारखे पाणीदार असायचे. चिनी हॉटेलांमधले सूप चांगले दाट असायचे पण ते बेचव वाटायचे. मामींनी तयार केलेले सूप तसेच दाट होते, पण त्याला मराठी माणसाला आवडावी अशी रुची आणि खास फ्लेव्हर होता, शिवाय त्यात थोडे ताजे लोणी किंवा क्रीम घालून त्याची चंव आणखी वाढवली असावी. असे अप्रतिम सूप मी पहिल्यांदाच चाखून पाहिले होते हे मी मोकळेपणे सांगून टाकले. त्यांना त्याची खात्री असावीच. पहिला बाउल संपताच त्यांनी लगेच तो भरून दिला. त्याबरोबर दिलेल्या साइड डिशेस खाऊन आमचे तसेही जवळ जवळ पोटभर जेवण होऊन गेले. "चेंबूरला बाजार करायला केंव्हाही आलात तर थोडी विश्रांती घ्यायला आमच्याकडे याच, शिवाय तुम्हाला पुन्हा कधी सूप प्यावेसे वाटले तर निःसंकोचपणे मुद्दाम आमच्या घरी म्हणूनही या." असे मामींनी निरोप देतांना प्रेमाने सांगितले. आमची मुले लहान असतांना आम्हालाही त्यांचे कपडे बदलणे, त्यांना दूध पाजणे वगैरेंसाठी निवा-याची जागा लागत असायची आणि आम्ही खासगीवाल्यांकडे अधून मधून जात राहिलो. एकदा आम्ही बाजारहाट करतांना माँजिनीमधून घेतलेल्या सामानातले सूपस्टिक्सचे पॅकेट मामींनी पाहिले आणि आपणहून सूपसाठी टोमॅटो शिजवायला ठेवले. त्यांनी वेळोवेळी इतर अनेक चविष्ट पदार्थही कौतुकाने करून आम्हाला खाऊ घातले.  

मामा तर रसायनशास्त्रातले डॉक्टरेट होतेच, मामीसुध्दा नुसत्या सुग्रण हाउसवाइफ नव्हत्या. त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून काही पदव्या आणि पदविका घेतल्या होत्या आणि त्या महाराष्ट्र शासनाच्या समाजविकास किंवा अशाच एकाद्या खात्यात अधिकारीपदावर होत्या. अनाथ, निराधार बालके किंवा महिलांसाठी चेंबूर मानखुर्द भागातच तीन चार वसतीगृहे आहेत, मुंबईमध्ये आणखी किती तरी असतील. अशा प्रकारच्या संस्थांच्या कामाशी मालिनीताई निगडित होत्या. या कामात त्यांना अनेक बरेवाईट, जास्त करून वाईटच अनुभव अनेक वेळा येत, काही वेळा त्यांना त्या संस्थांमध्ये जाऊन मुक्कामाला तिकडेच रहावे लागत असे. अशा वेळी त्यांची ओढाताण होत असे. एरवी त्या आपला वेळ नोकरी आणि घरगृहस्थी यांमध्ये व्यवस्थितपणे वाटून देत असत, कधी कधी कामामध्ये आणीबाणीचे प्रसंग आले तर मात्र त्यांना ताबडतोब तिकडे धावावे लागत असे. पण हे सगळे काम त्या हंसतमुख राहून, शांत चित्ताने, तळमळीने आणि मन लावून करत असत. त्याबद्दल त्यांनी तक्रारीच्या सुरात बोललेले मी कधीच ऐकले नाही. त्या वसतीगृहांमधल्या दुर्दैवी स्त्रिया आपल्या किंवा सर्वसामान्य लोकांच्या मानाने किती हाल अपेष्टा आणि मानसिक त्रास भोगत आहेत, त्यांच्या जीवनात किती असुरक्षितता आहे याची त्यांना खूप कणव वाटत असे आणि त्यांना कशा प्रकारे मदत करता येईल, त्यांचे कष्ट कसे कमी करता येतील याचे विचार त्यांच्या मनात घोळत असत. उंबरठा हा चित्रपट पाहतांना माझ्या डोळ्यासमोर मालिनीमामी येत राहिल्या. त्या सिनेमातल्या स्मिता पाटीलला तिच्या घरातून तीव्र विरोध झाल्यामुळे तिला घराचा उंबरठा ओलांडून जावे लागले होते. मामींच्या सुदैवाने मामा त्यांच्या पाठीशी उभे असल्याने त्यांच्या जीवनात असले द्वंद्व आले नाही. त्यांना भरपूर कसरत किंवा धावपळ मात्र करावी लागत असे.

खासगीवाले मामा इतके सीनियर होते की त्यांना अणुशक्तीनगरमध्ये चांगले प्रशस्त क्वार्टर सहज मिळू शकले असते, पण मामींना गरज पडताच पटकन कुठेही जाण्यायेण्यासाठी चेंबूर स्टेशनजवळ असलेली लहानशी जागा जास्त सोयीची होती. त्यामुळे ते दोघेही तिथेच राहिले. मामांना रिटायर होऊन आता वीस वर्षे तरी होऊन गेली असतील. त्यांच्या काही काळानंतर मामीही सेवानिवृत्त झाल्या. त्यानंतर ते दोघे पनवेलला बांधलेल्या त्याच्या नव्या आणि मोठ्या घरात रहायला गेले आणि आमच्या भेटी दुर्मिळ झाल्या. मामा शास्त्रज्ञ आहेत त्याबरोबर उत्तम संगीतज्ञही आहेत, ते स्वतः तबला वाजवून अनेक गायक कलाकारांना साथ देत असत. वयोमानानुसार त्यांचे वादन कमी होत गेले तरी चेंबूर भागातल्या सगळ्या मुख्य संगीत सभांना एक जाणकार श्रोता म्हणून ते पनवेलहूनसुद्धा आवर्जून येत राहिले. मामींनाही गायनाची आवड असल्याने बहुतेक वेळी त्यासुद्धा त्यांच्यासोबत येतच असत. अशा ठिकाणी आमच्या भेटी आणि गप्पा होऊ लागल्या. 

पण वयोमानानुसार पुढे पुढे ते भेटणे हळूहळू कमी होत गेले आणि त्यांना तसेच आम्हालाही तपासण्या किंवा औषधोपचार यासाठी हॉस्पिटलला जाण्याची जास्त गरज पडू लागली. गेल्या चार पाच वर्षात आमच्या भेटी बहुधा हॉस्पिटलमध्येच झाल्या असाव्यात. मागच्या वर्षीच एकदा आम्ही दोघे हॉस्पिटलच्या मेडिकल ओपीडीमध्ये आमचा नंबर येण्याची वाट पहात बसलो होतो. अलकाची प्रकृती जरा जास्तच खराब झालेली असल्यामुळे ती डोळे मिटून स्वस्थ बसली होती. खासगीवाले मामामामीही त्यांच्या फॉलोअप व्हिजिटसाठी आले होते. आमची नजरानजर होताच मी त्यांना हात दाखवला. पण नेहमीप्रमाणे आम्ही दोघे लगेच त्यांच्याकडे गेलो नाही यावरून काही तरी घोळ आहे हे त्यांच्या लक्षात येताच ते दोघे उठून आमच्याकडे आले. पाठीवरून हात फिरवून धीर दिला, "सगळं ठीक होऊन जाईल, काळजी करू नको" वगैरे सांगितले आणि आमच्याजवळ बसून राहिले. हॉस्पिटलमध्ये आलेले असले तरी ते दोघे तसे ठीकच दिसत होते, मामांच्या शरीरावरल्या वृद्धापकाळाच्या खुणा गडद होत होत्या, त्यांना त्या त्रस्त करतांना दिसत होत्या, त्यांची श्रवणशक्ती मंदावली होती, त्यामुळे संवाद साधणे कठीण जात होते, पण मामी पूर्वीसारख्याच चुणचुणीत दिसत होत्या त्यांना कसलाही त्रास होत नसावा असे त्यांच्या देहबोलीमधून आणि चेहे-यावरून वाटत होते.

दीड दोन महिन्यापूर्वी डॉक्टरांना प्रकृती दाखवण्यासाठी अलका हॉस्पिटलमध्ये गेली होती. त्या दिवशी जरा जास्त गर्दी असल्यामुळे तिचे काम संपायला बराच उशीर झाला. तोंवर जेवायची वेळ होऊन गेली होती. त्यामुळे तिच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने तिला लवकर घरी परतणे आवश्यक होते. हॉस्पिटलमधून बाहेर निघण्याच्या वाटेवर तिला अचानक खासगीवाले मामा भेटले. मामींना वॉर्डमध्ये अॅडमिट केले असून त्यांच्यावर केमोथिरपी होत असल्याचे धक्कादायक वृत्त त्यांनी सांगितले. पण हॉस्पिटलच्या नियमानुसार ती पेशंटला भेटण्याची वेळ नव्हती आणि त्यासाठी तीन चार तास तिथे थांबणे अलकाला शक्यच नव्हते. या ट्रीटमेंटने मामी लवकरच ब-या होतील असेच तेंव्हा वाटत होते. सवडीने पुन्हा जाऊन त्यांना भेटावे असा विचार करून ती घरी आली. पण तिच्या स्वतःच्या आजारपणामुळे आणि त्यातून आलेल्या अशक्तपणामुळे त्या वेळी ते जमले नाही. मामा किंवा मामींबरोबर संपर्क नसल्यामुळे त्या हॉस्पिटलमध्ये आहेत की घरी गेल्या आहेत हेही समजायला मार्ग नव्हता. त्यामुळे शक्य झाल्यानंतरसुध्दा त्यांना कुठे जाऊन भेटायचे हे समजत नव्हते.

दहा बारा दिवसांपूर्वी आम्ही तिस-याच एका गावी गेलो असतांना मामांचा एक सख्खा भाचा तिथे आम्हाला भेटला तेंव्हा त्याच्याकडून कळले की मामी कालवश झाल्या. ही दुःखद बातमी मुद्दाम कोणालाही सांगायची नाही असे मामांनी त्यांच्या निकटवर्तीयांना सांगून ठेवले होते. त्या दोघांनीही त्यांच्या सद्वर्तनाद्वारे असंख्य माणसे जोडून ठेवली होती. ही बातमी ऐकून त्या सर्वांना धावत यावेसे वाटेल आणि त्यांना ते कष्ट पडू नयेत असा विचार त्याच्या मागे होता. कदाचित मामींनी स्वतःच तसे सांगून ठेवले असेल. त्या नेहमी दुस-यांचाच विचार करत असत. त्यामुळेच त्यासुध्दा सर्व परिचितांच्या स्मरणात चिरकाल राहणार आहेत यात शंका नाही.

No comments: