Thursday, November 07, 2013

मंगल मंगळ - भाग १





रात्रीच्या वेळी आकाशात असंख्य चांदण्या लुकलुकतांना दिसतात. त्यातल्या काही ठळक व स्पष्ट दिसणा-या चांदण्यांचे तारकासमूह किंवा काँस्टेलेशन्स वगैरेंना सप्तर्षी, बिग बेअर यासारखी विशिष्ट नावे दिलेली आहेत. पूर्व आणि पश्चिम या दिशांना जोडणा-या आकाशाच्या कमानीच्या वर्तुळाकार पट्ट्याचे बारा समान भाग केले गेले आणि त्या भागातल्या तारकांमधून सुचलेल्या आकारांवरून त्यांना मेष, वृषभ आदि राशींची नावे दिली आहेत, तसेच त्या पट्ट्याचे सत्तावीस भाग करून त्यांची अश्विनी, भरणी इत्यादि नक्षत्रांमध्ये विभागणी केली आहे. कुठल्याही क्षणी या पट्ट्यातला अर्धा भाग आकाशात असतो आणि उरलेला अर्धा भाग जमीनीखाली असतो. आकाशातल्या असंख्य चांदण्यांमधले पाच तेजस्वी छोटे गोल इतर सर्वांहून वेगळे दिसतात. त्यांच्या प्रकाशमय ठिपक्यांचा आकार इतर चांदण्यांच्या तुलनेत किंचित मोठा असतो, त्यांचे चमकणारे तेज स्थिर असते, ते लुकलुकत नाहीत आणि मुख्य म्हणजे ते कोणत्याही नक्षत्र किंवा राशीचा कायमचा भाग नसतात, निरनिराळ्या काळात ते वेगवेगळ्या राशींमधील इतर तारकांच्या जवळ आलेले आणि त्यांच्यापासून दूर जातांना दिसतात. एका राशीमधून ते आरपार पलीकडे दुस-या राशीत जातात आणि असेच पुढे पुढे जात राहून बाराही राशींमधून भ्रमण करत राहतात. त्यांच्या या वैशिष्ट्यांमुळे अगदी प्राचीन काळामध्येच त्यांची 'ग्रह' या नावाने वेगळी गणना केली. 'ग्रह' या शब्दाला 'प्लॅनेट' हा आता रूढ असलेला अर्थ त्या काळात प्राप्त झालेला नव्हता. आकाशातल्या सूर्य हा तारा आणि चंद्र हा उपग्रह यांनासुद्धा पूर्वी 'ग्रह'च म्हंटले जात होते. ते दोन मोठे प्रकाशमान गोल आणि मंगळ, बुध, गुरू, शुक्र व शनि हे पाच त्यांच्या मानाने लहान दिसणारे ग्रह यांची नावे दिवसांना देऊन सात दिवसांचा आठवडा बनवला गेला.  .

सूर्याच्या उगवण्या आणि मावळण्यामधून दिवस व रात्र निर्माण होतात हे सगळ्यांना ठळकपणे जाणवत असते. दिवसाचा कालावधी सहा महिने रोज कमी कमी होत असतो, पण त्याच वेळी रात्रीचा कालावधी वाढत असतो. यामुळे दिवस आणि रात्र मिळून चोवीस तास किंवा साठ घटिका एवढा संपूर्ण दिवसाचा काल मात्र कायम असतो. त्यानंतर पुढील सहा महिने दिवसाचा कालावधी रोज वाढत जातो आणि त्याच वेळी रात्रीचा कालावधी कमी कमी होत असतो. या सहा सहा महिन्यांच्या भागांना मिळून वर्षभराचा काळ ठरवला गेला. अमावास्येच्या दिवशी चंद्र सूर्याच्या सोबत असल्यामुळे आणि त्याची पाठ पृथ्वीकडे झाल्यामुळे तो दिसतच नाही, त्यानंतर तो रोज आभाळात दिसणा-या सूर्यबिंबापासून थोडा थोडा दूर जातो, म्हणजे सूर्यास्तानंतर जास्त जास्त वेळ आभाळात दिसत राहतो, तसेच त्याचा आकार कलेकलेने वाढत जातो. पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी पश्चिमेच्या क्षितिजावर सूर्य नावळत असतांना पूर्वेच्या क्षितिजावर पूर्ण गोलाकृती चंद्र उगवतो आणि रात्रभर उजेड देत राहतो. त्यानंतर तो रोज थोडा थोडा वेळ उशीराने उगवत जातो तसेच कलेकलेने लहान होत जातो. चंद्राच्या या बदलत्या रूपावरून महिन्यामधली तिथी समजते. अशा प्रकारे सूर्य आणि चंद्र यांच्या निरीक्षणावरून कालगणना ठरवली गेली. 

पण माणसाचे सरासरी आयुष्य आणि स्मरणशक्ती यापेक्षा दीर्घकाळ असते. त्यामुळे त्याच्या आयुष्यातली एकादी घटना किती वर्षांपूर्वी होऊन गेली हे समजण्यासाठी त्याला इसवी सन, शालिवाहन शक, विक्रम संवत वगैरेंचा आधार घ्यावा लागतो. त्यांच्या आधाराशिवाय वर्षांची गणना करण्याची सोय निसर्गामध्ये अस्तित्वात आहे. चंद्रमा आपली आकाशातली जागा भराभर बदलत असल्याने एका राशीत फक्त सव्वादोन दिवस असतो, तर सूर्याला एक राशी पार करून पुढे जायला एक महिना लागतो. गुरू ग्रहाला यासाठी एक वर्ष आणि अत्यंत संथपणे म्हणजे शनैःशनै चालणा-या शनीला तब्बल अडीच वर्षे लागतात. याचा अर्थ गुरू आणि शनि हे ग्रह आज ज्या राशीमध्ये दिसतात तिथे पुन्हा परत यायला अनुक्रमे बारा आणि तीस वर्षे लागतात. त्यामुळे जन्म, मृत्यू, विवाह, राज्याभिषेक यासारख्या महत्वाच्या प्रसंगी हे ग्रह कोणत्या राशींमध्ये होते याची नोंद ठेवलेली असल्यास ती घटना गेल्या बारा वर्षांमध्ये कधी घडली हे आजच्या गुरूच्या ठिकाणावरून आणि गेल्या तीस वर्षांमध्ये कधी घडली हे आजच्या शनीच्या ठिकाणावरून समजू शकते. या दोघांचा संयुक्तपणे विचार केल्यास मागील साठ वर्षांपर्यंत जाता येते. हा आकडा सामान्य माणसासाठी पुरेसा आहे.

अशा प्रकारे गुरू आणि शनि या ग्रहांचासुध्दा कालगणनेसाठी चांगला उपयोग होतो. बुध हा ग्रह सूर्याच्या अगदी मागे पुढे फिरत असल्यामुळे तो दिसलाच तर सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर अगदी थोड्या वेळाकरता क्षितिजाजवळ दिसतो. यामुळे त्याचा कालगणनेत काही उपयोग नसतो. हा ग्रह पूर्णपणे उपेक्षित असाच म्हणावा लागेल कारण त्याची कशातच खिजगणती होत नाही. कोणाच्या बोलण्यातही कुठल्याही संदर्भात त्याचा कधी उल्लेख आलेला मला ऐकल्याचे आठवत नाही. शुक्राची चांदणी ही चंद्राच्या खालोखाल सर्वाधिक प्रकाशमान असल्याने काळोख्या रात्रीच्या वेळी चंद्राच्या अनुपस्थितीत तीच आकाशातल्या अंधुक प्रकाश देणा-या तारकांच्या जगावर राज्य करतांना दिसते. 'घनतमी शुक्र बघ राज्य करी' असे एका सुप्रसिद्ध कवितेत म्हंटलेही आहे. शुक्र हा ग्रहसुद्धा सूर्याच्या एक दोन घरे मागे पुढे चालत असतो, पहाटेच्या वेळी शुक्राचा तारा उगवला तर लवकरच सूर्योदय होणार असल्याची तो वर्दी देतो आणि रात्री तो मावळतांना दिसला तर झोपायची वेळ झाल्याचे दाखवतो. शुक्र हा ग्रह मध्यरात्री किंवा माथ्यावर आलेला कधीच दिसणार नाही.

राहता राहिलेला मंगळ हा ग्रह एकाद्या उनाड मुलाप्रमाणे वागतांना दिसतो. तो कधी वेगाने राशीचक्रातून पुढे सरकतांना दिसतो, तर कधी सुस्त झालेला असतो आणि कधी कधी तर चक्क उलट पावलांनी मागे मागे जात असतो. काही वेळा तो खूप तेजाने उजळलेला दिसतो तर कधी बराच फिकट झालेला असतो. त्याच्या अशा प्रकारच्या भ्रमणामुळे त्याचा माग ठेवणे शास्त्रज्ञांना जरा अवघडच वाटत होते. त्याचा आकाशमार्गावरला प्रवास बराच गुंतागुंतीचा असला तरी विद्वान निरीक्षकांनी तो समजून घेतला आणि त्याची गणिते ठरवून घेतली. मंगळाच्या या काहीशा अनियमित प्रवृत्तीमुळे त्याचाही कालगणनेत काही उपयोग होत नाही. मंगळ या ग्रहाची ही वैशिष्ट्ये प्राचीन काळापासून पाहिली गेली आहेत. आकाशातला हा एकच ग्रह तांबूस रंगाचा असा वेगळा दिसतो. हिंदू संस्कृतीनुसार लाल हा शुभ आणि मांगल्याचा प्रतीक असलेला रंग असल्यामुळेच कदाचित या ग्रहाचे नाव 'मंगल' असे ठेवले गेले असावे. वारांची नावे ठेवतांना सूर्य आणि चंद्र या मोठ्या आकाराच्या दिसणा-या गोलकांच्या पाठोपाठ मंगळाचे नाव ठेवले गेले.

पण पुराणातल्या नवग्रहांमध्ये मंगळाला फार मोठ्या मानाचे स्थान दिले गेले नसावे. बृहस्पती (गुरू) आणि शुक्राचार्य (शुक्र) हे अनुक्रमे देव आणि दानव यांचे गुरू होते आणि त्यांना मार्गदर्शन करून बलवान करत होते, त्यांचा उल्लेख अनेक कथांमध्ये येतो. शनीच्या अवकृपेला सगळेजण भीत असत. त्याच्या कहाण्याही पुराणांमध्ये येतात. त्याला तर देवच मानून त्याची देवळे उभारली गेली आणि अनेक भाविक लोक आजही अत्यंत भक्तीभावाने त्याची आराधना करत असतात. बिचारा बुध पुराणातही कुठे डोकावत नाही की आजही त्याची पूजा करणारा कोणता संप्रदाय नाही. तरी तोसुध्दा श्रावण महिन्यातल्या जिवतीच्या पटात मात्र हत्तीवर बसलेल्या राजस रूपात आपले दर्शन देऊन जातो. मंगळाचे मात्र कुठलेही चित्र किंवा विशिष्ट आकाराची मूर्ती मला दिसली नाही. त्याचे वेगळे देऊळही मी अद्याप पाहिलेले नाही की त्याची कोणती कथा ऐकली नाही. अनेक मोठ्या देवळांमध्ये एक नवग्रहांचे पॅनेल असते, त्यात तो तिस-या क्रमांकावर गर्दीत बसलेला पुसटसा दिसतो. इंटरनेटवर या देवतेची काही चित्रे मिळाली.

नवग्रहस्तोत्रामधील तिस-या श्लोकात मंगळाचे वर्णन असे केले आहे.
धरणीगर्भ संभूतं विद्युत्कांति समप्रभम् ।
कुमारं शक्तिहस्तं तं मंगलं प्रणाम्यहम् ।। ३ ।।
'धरणीच्या पोटांतून जन्म घेतलेल्या, विजेसारखी अंगकांती असलेल्या, हातात शक्ती हे शस्त्र धारण केलेल्या, कुमारस्वरूप अशा त्या मंगळाला मी नमस्कार करतो.' असा या श्लोकाचा अर्थ आहे. या श्लोकातल्या 'पृथ्वीपासून मंगळाची उत्पत्ती झाली होती' या कल्पनेवर मात्र कधीच आणि कोणीही भर दिलेला दिसत नाही.

.  . . . . . . .  . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

 

No comments: