Saturday, October 05, 2013

घटाघटाचे रूप आगळे

घटाघटाचे रूप आगळे। प्रत्येकाचे दैव वेगळे।
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार ।।

असे कवीवर्य स्व.ग.दि.माडगूळकरांनी लिहिले आहे. पन्नास वर्षांपूर्वीच्या ग्रामीण महाराष्ट्रामधील जीवनावरील या गीतात अगदी चपखलपणे बसणारी ही उदाहरणे आहेत. श्रीकृष्णाच्या गोकुळामधल्या गोपिकांपासून ते माझ्या आधीच्या पिढीमधल्या काळातल्या खेड्यांमध्ये राहणा-या घराघरातल्या गृहीणींपर्यंत सगळ्याजणी आपापल्या घरांमधले दूध, दही, लोणी वगैरे खाद्यपेय पदार्थ मातीच्या गाडग्यामडक्यांमध्ये ठेवत असत. त्या काळात स्टेनलेसस्टीलची भांडी अजून निघालेली नव्हती, काचेच्या किंवा चिनी मातीच्या पात्रांची किंमत परवडत नसे आणि त्या वस्तू खेडेगावातल्या बाजारात मिळत नसल्यामुळे मुद्दाम बाहेरून आणाव्या लागायच्या. त्या मानाने स्थानिक कुंभाराने तयार केलेली मातीची मडकी, घडे वगैरे स्वस्त आणि सहज उपलब्ध होत असत. ती फुटली तरी त्याची फारशी हळहळ वाटायची नाही. मोठे तोंड असलेली अनेक लहानमोठी मडकी घरात आणून रचून ठेवलेली असत. गरजेप्रमाणे त्यातले एक एक काढून घेऊन त्यात दूध, दही, लोणी वगैरे ठेवले जात असे. घरातला सगळा स्वयंपाक चुलींवर होत असल्यामुळे तो झाल्यानंतर चुलींमधले धगधगते निखारे वेगळ्या मडक्यात काढून ठेवले जात असत आणि तळाशी पडलेली राख वेगळी ठेवली जात असे. निखारे थंड केल्यानंतर त्याचा कोळसा पुन्हा ज्वलनासाठी वापरला जाई आणि राखेचा उपयोग भांडी घासण्यासाठी होत असे. एका चुलीतले निखारे बाहेर काढून त्यांचा उपयोग दुसरी चूल, शेगडी किंवा बंब पेटवण्यासाठी केला जात असे. अशा वेळी त्यांना इकडून तिकडे घेऊन जाण्यासाठी मातीच्याच उथळ पात्रांमध्येच ठेवले जात असे.

शहरात वाढलेल्या पुढच्या पिढीतल्या मुलांना फ्रीजमधून काढून खायचे अमूल बटरच ओळखीचे झाले असणार. मोठ्या डे-यामध्ये रवीने ताक घुसळून काढलेला ताज्या लोण्याचा गोळा त्यांना क्वचितच पहायला मिळाला असेल आणि त्या छान लोण्याच्या गोळ्याला मातीच्या मडक्यात घालून ठेवण्याची कल्पनासुध्दा कदाचित सहन होत नसेल. गॅस, ओव्हन किंवा इलेक्ट्रिक हॉटप्लेटवरच घरातला स्वयंपाक होत असल्यामुळे निखारा किंवा अंगार हे शब्दसुध्दा त्यांच्या कानावर पडले असण्याची शक्यताही कमीच आहे. कुंभाराने तयार केलेल्या एका मडक्याला लोण्याची स्निग्धता आणि मऊपणा अनुभवायला मिळतो तर तशाच प्रकारच्या दुस-या मडक्याला मात्र निखा-याचे दाहक चटके सहन करावे लागतात, हे ज्याचे त्याचे नशीब आहे हे या ओळींमधून सांगितलेले सत्य किती विदारक आहे याची पूर्ण जाणीव त्यांना कदाचित होणार नाही. त्यासाठी दुसरी उदाहरणे द्यावी लागतील.

गदिमांच्या गीतातले घट या जगातल्या माणसांची प्रतीके आहेत हे उघड आहे. मातीची सगळी मडकी कुंभारांकडून एक एक करूनच बनवली जातात, अजून तरी त्याचे यांत्रिक साचे निघालेले नाहीत. त्यामुळे ती एकासारखी एक दिसत असली तरी त्यांचा आकार, गोलाई. कडांची जाडी यात थोडा थोडा फरक असतोच. पंजाब, बंगाल, महाराष्ट्र, तामीळनाडू, किंवा जर्मनी, चीन, आफ्रिका वगैरे भागातली माणसे त्यांच्या वंशानुसार साधारणपणे सारखी दिसली तरी त्यातल्या प्रत्येकाचा चेहेरा वेगळा असतो. त्याचप्रमाणे उतरंडीमधले प्रत्येक मडके वेगळे आहे हे त्यांना निरखून पाहिल्यास समजेल. निरनिराळ्या घटाचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे केला जातोच. वर दिल्याप्रमाणे काही मडक्यांमध्ये लोणी आणि कांहींमध्ये अंगार ठेवला जातोच, काही मडकी तर अंत्यविधीच्या वेळी फक्त काही मिनिटांसाठीच वापरली गेल्यावर लगेच फोडून टाकली जातात. याच्या उलट हजार दोन हजार वर्षांपूर्वी तयार केले गेलेले काही सुबक नक्षीकाम केलेले रांजण आपल्याला पुरातनवस्तूसंग्रहालयांमध्ये (म्यूजियम्समध्ये) आजही पहायला मिळतात. जगभरातले रसिक पर्यटक त्यांना पाहण्यासाठी येतात आणि त्या रांजणांची व त्यांना बनवणा-या कारागीरांची तोंड भरून तारीफ करतात. त्यातल्या काही रांजणांमध्ये एका काळी सुवर्णमुद्रा भरून ठेवल्या गेल्या असतील आणि प्राणपणाने त्यांचे संरक्षण करणारे सैनिक त्यांच्या पहा-यावर ठेवले जात असतील.

निरनिराळ्या घटांमधल्या कशाचा उपयोग कोणत्या कामासाठी व्हावा हे ठरवण्याचा काडीमात्र अधिकार त्या पात्रांना नसतो. या बातीत काहीही करायला ती असमर्थ असतात. माणसे त्यामानाने थोडी सुदैवी असतात. माणसाचे आयुष्यसुध्दा सर्वस्वी त्याच्या नशीबावर अवलंबून असते असे गदिमांच्या गीतात ध्वनित होत असले तरी याबाबतीत माझी मते थोडी वेगळी आहेत. मी इतका सर्वस्वी दैववादी नाही. निदान काही प्रमाणात तरी माणूस स्वतःच्या प्रयत्नाने आपली वर्तमानकाळातली परिस्थिती बदलून आपले भविष्य घडवू शकतो. सर्वच बाबतीत ते शक्य होणार नसले तरी काही प्रमाणात तो यशस्वी होऊ शकतो, नशीबाने आलेल्या परिस्थितीमुळे निर्माण झालेले मनातले रागद्वेशाचे निखारे फेकून देऊन त्यांच्या जागी सुंदर, मोहक आणि कोमल भावनांची फुले गोळा करून ठेऊ शकतो, हे करता करता इतरांच्या प्रेमाचा किंवा मायेचा लोण्याचा गोळासुध्दा त्याला मिळू शकतो.

हे सगळे मला आज कां आठवले असेल? सकाळी उठून फिरायला जायला निघालो आणि शेजारी असलेल्या महात्मा गांधी कॉम्प्लेक्सपर्यंत गेलो तर तिथे कोप-यावर बरीच गर्दी जमलेली दिसली. जवळ जाऊन पाहिले तर सुंदर सजवलेल्या मटक्यांचे ढीग रचून ठेवलेले होते आणि त्या भागातल्या कोकिळाबेन, ऊर्मिलाबेन वगैरे शेठाण्या, त्यांच्या सेजल, हेतल वगैरे सुना आणि चिंकी, डिंकी वगैरे मुलींना सोबत घेऊन त्याला गराडा घालून उभ्या होत्या. एक एक घट निरखून पहात होत्या, त्यांचे आकार, त्यावर रंगवलेली नक्षी, कांचांच्या तुकड्यांना चिकटवून केलेली डिझाईन्स वगैरे पाहून पसंत केलेल्या मडक्याच्या भावावरून घासाघीस करत होत्या. या सगळ्या घटाघटांचे रूप आगळे वेगळे असले तरी त्या सर्वांचे दैव मात्र साधारणपणे सारखेच असावे. त्या सगळ्यांची आज छान पूजा केली गेली असेल, नऊ दिवस त्यांच्या सभोवती रासगरबा खेळला जाईल. त्यासाठी तयार केलेली खास गाणी लाऊडस्पीकरवर जोरजोरात वाजवली जातील, रंगीबंरंगी कपडे आणि अलंकार लेऊन सजलेल्या युवती प्रचंड उत्साहाने आणि बेभान होऊन त्या गाण्यांच्या तालावर नाचतील. त्यांची यात सतत चढाओढ होत राहील. या घटांना (ते सजीव नसतात, पण असले तर) ती सगळी मौजमजा पहायला मिळेल आणि .... नऊ दिवसांनंतर ते सगळे संपुष्टात आल्यानंतर त्यांना कोणीही विचारणार नाही, बहुधा त्यांचे आयुष्यही तिथेच संपेल, पण नऊ दिवसांचेच त्यांचे आयुष्य मात्र दिमाखात जाईल. 

No comments: